STORYMIRROR

Omkar Jitendra Patil

Abstract Tragedy Inspirational

4  

Omkar Jitendra Patil

Abstract Tragedy Inspirational

होय ! परत येतील....

होय ! परत येतील....

11 mins
4



‌           आजवर खूप बोललो, लिहिलं, तुम्ही भरभरून दाद दिलीत. पण आजची गोष्ट जरा वेगळी आहे. एका चित्रानेच आपल्या चित्रकाराविषयी काय सांगावे ? एखाद्या साहित्यकृतीला आपल्याच लेखकाचे वर्णन करायला शब्द सापडतील का ?

             हा प्रवास सुरू होतो. त्याकाळी कोडोली गावच्या प्रतिष्ठित, गावचे टगे रघुनाथ पाटील (आण्णा) आणि इंदूबाई यांना 1972 साली 'जितेंद्र' नामक पुत्ररत्न झाले. तेव्हाची एकत्र कुटुंब पद्धती आणि पाण्याच्या अभावामुळे (तेव्हा चांदोली धरण नव्हते) प्रचंड गरिबी, वडिलांचा दरारा अशा वातावरणात ते हळूहळू मोठे होऊ लागले. वडिलांनी कधी 'ज़ोत्या' शिवाय हाक मारली नाही. घरी त्यांच्यापेक्षा मोठी सहा सात भावंडे होती. त्यामुळे ते अंगणवाडी ,बालवाडीच्या वयात दुसरी तिसरीला भावंडांसोबत जाऊन बसायचे. मोठे दोन चुलते 'मास्तर' होते त्यामुळे नापास व्हायचा प्रश्नच नव्हता. याचा परिणाम मात्र दहावीत असताना झाला. दहावीच्या परीक्षेत ते कसे बसे पास झाले. परंतु वय अत्यंत कमी असल्याने पुढे कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही. त्यावेळीच खऱ्या अर्थाने शिक्षणाची कास सुटली. त्यांच्या मते 'शिक्षण' म्हणजे खूप मोलाची गोष्ट होती. "पदवीधर होणे म्हणजे जीवन कलेत पारंगत होणे" असा त्यांचा समज होता.

             पुढे वडील व मोठे बंधू (दिलीप) यांच्या सल्ल्यानुसार कळंबा, कोल्हापूर येथे 'प्रिंटिंग प्रेस' चे औद्योगिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. तो काळ अत्यंत हलालकीचा होता. रात्री दहा वाजता, कोल्हापूरहून सायकलवरून निघत होते. वाघबीळ मार्गे घरी यायला रात्रीचे दीड-दोन वाजायचे. तोपर्यंत आई न जेवता वाट बघत बसायची.

             त्या काळचा एक किस्सा त्यांच्या तोंडून ऐकला होता. ITI च्या मार्गदर्शकांनी एकदा सर्वांसमोर लहान-लहान प्लॅस्टिकचे ठोकळे ठेवले. व ते एकावर एक ठेवून मोठी मिनार रचायला सांगितली. अगदी एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखी. प्रत्येक जण जायचा ते सर्व रचेपर्यंत कोलमडायचे. कोणीच यशस्वी होत नव्हते. त्यावेळी ते तिथून जरा बाहेर जाऊन काहीतरी घेऊन आले. आणि आपला नंबर येताच, ते सर्व ठोकळे एकावर एक ठेवण्याऐवजी चिटकवले. संपूर्ण मिनार तयार झाला. इतर विद्यार्थ्यांनी 'सर सर' असा कांगावा करताच, "चिटकवता येणार नाही, असा नियम नव्हता" असे सरांनी उत्तर दिले. कायम चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची, नवनवीन गोष्टी आत्मसात करण्याची त्यांची खूप चांगली सवय होती.

             या काळातच त्यांना वाचनाची सवय जडली. कोल्हापूर मध्ये 'करवीर वाचनालय' आणि कोडोली मध्ये 'दत्त मोफत वाचनालय' यांनी त्यांच्या वाचनाच्या भुकेला योग्य आकार दिला. रात्री झोप लवकर येईल की नाही ? हे कायम ते कोणते पुस्तक वाचतात याच्या वरती ठरलेलं असायचं. पुस्तक रटाळवाणे असले की लगेच झोप यायची. पण एखादे चांगले पुस्तक हाती लागले की रात्रीचे पाच वाजलेले ही कळत नव्हते. माझ्यासाठी ते म्हणजे 'व्यवहार ज्ञानाचे विद्यापीठ'च होते. पण ते कायम शिकलेल्या व्यक्तींचा खूप आदर करायचे.

              शिक्षण पूर्ण होताच, अनुभवासाठी एक वर्ष सांगली येथे काम केले. शासकीय मुद्रणालयात जागा भरायच्या होत्या, त्यावेळी मुलाखत चांगली होऊन सुद्धा 'वशिलेबाजी'मुळे नाकारले गेले. मध्यंतरी बराच काळ गेला. 'कॉन्ट्रॅक्ट बेस'वरती शासकीय मुद्रणालयामध्ये काम करतच होते. सोबत कोडोली मधील यशवंत ज्युनिअर कॉलेज मधून अकरावी-बारावी रडत खडक पूर्ण केली. आणि शिक्षणाला कायमचा पूर्णविराम दिला.

                आपल्याकडे आत्ता आत्ता 'स्टार्ट अप' चे वातावरण दिसू लागले. पण आपल्याला नोकरी मिळत नाही. हे बघून 1998 साली तत्कालीन एक लाख रुपये (आत्ताचे जवळ जवळ दहा लाख) कर्ज घेऊन स्वतःचा मुद्रण व्यवसाय सुरू केला. धाडसाला हळूहळू फळ येऊ लागले. तेव्हा चार कामगार होते. अतिशय उत्तम व्यवसाय चालला होता.

             पुढे 1999 साली कर्म-धर्म संयोगाने बावची येथील बाबुराव पाटील यांची कन्या वनिता हिच्याशी विवाह झाला. ती उच्च शिक्षित होती (M.A.B.Ed.) शिक्षणाबद्दलची आत्मीयता, आदर पत्नीच्या रूपाने मिळाल्यामुळे ते खूप नशीबवान समजत होते. पण मनासारखं घडेल ते जीवन कसले ! एका वर्षानंतर म्हणजेच मे 2000 मध्ये त्यांना 'ओंकार'नावाचे पुत्ररत्न प्राप्त झाले. पहिला मुलगा म्हंटल्यावर सगळ्यांनाच आनंद झाला होता. पण आता मात्र आईची खरी कसोटी होती. एकीकडे नोकरी मिळवणे हे आव्हान होतेच. पण दुसरीकडे आपल्या बाळाकडे दुर्लक्ष होऊन द्यायचे नव्हते. तीन-चार वर्ष निघून गेली. तरीही ओंकार चालेना..... बसायलाही येत नव्हते. मग मात्र डॉक्टरांना दाखवलं. आणि ओंकारचे अपंगत्व सिद्ध झाले. हा धक्का म्हणण्यापेक्षा तो 'चालावा' म्हणून या दोघांनी कंबर कसली. सांगली येथे 'ॲक्युपंचर'वर आधारीत उपचार सुरू केले. त्यामुळे बराच फरक पडला. त्यावेळी तेथील डॉक्टर 50 हजार मागत होते. 'चालवून दाखवतो' अशी खात्री देत होते. परंतु प्रेसचे कर्ज, उपचार खर्च यामुळे त्यावेळी इतकी मोठी रक्कम जमवणे शक्य नव्हते. किंबहुना तो चालायचा अंतिम टप्प्यात होता. त्यामुळे आज ना उद्या चालेल या आशेवरती दोघे होती.

             या सर्वांच्या गडबडीत आईचे (वनिता) नोकरीला लागण्याचे वय संपत चालले होते. बऱ्याच ठिकाणी मुलाखती चांगल्या झाल्या परंतु त्यानंतर त्यावेळी 'सव्वा लाखाची' मागणी सर्वत्र होत होती. ना पैसा, ना भक्कम कोणाचा पाठिंबा अशा परिस्थितीत हे दोघेही चाचपडत होते. यावेळी आधार फक्त प्रेसचा होता. भरपूर प्रयत्न केल्यानंतर अखेर 'आपल्या नशिबात नोकरी नाही' असे त्यांनी तिला सांगून टाकले. तोपर्यंत दुसरे पुत्ररत्न अर्थात 'अवधूत' झाला. एकीकडे प्रेस च्या व्यवसायामध्ये 'अपसेट प्रिंटिंग' हे नवे पर्व सुरू झाले होते. त्यामुळे छपाईच्या कामानिमित्त वडगाव,आष्टा,कोल्हापूर कायम फिरतीवर असायचे. अशा परिस्थितीत वर्षभरातच कौटुंबिक वर्चस्ववादाला कंटाळून त्या दोघांनी वेगळा संसार सुरू केला. खूप हलालकीचे ते दिवस होते. साधी मोटरसायकलही नव्हती. त्यावेळी हा सगळा प्रवास सायकलवरून केला. ओंकारच्या शाळेचा विषय समोर आला, तेव्हा सुरुवातीला मतिमंद शाळेत घालण्यात आले. पण नंतर त्याची स्मरणशक्ती (IQ) ही अत्यंत उत्तम असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी स्वतःहून ओंकारला सामान्य शाळेत घालण्याचा निर्णय घेतला. मी याच्याकडे 'क्रांतिकारी' घटना म्हणून बघतो. कारण तेव्हाच या चित्रकाराने या चित्राचा 'श्री गणेशा' केला. या काळात मी त्यांच्यासोबत खूप फिरलो. 'जम्पिंग चिम्पिंग' असा आवाज करत ज्योतिबा-नाईकबाच्या पायऱ्या त्यांच्याच काखेत बसून चढलो. तर कधी कोल्हापूर मधील 'शाहू पॅलेस' समोर बसून काळवीटांना फरसाणा खाऊ घातला. अपंगत्व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी दिवस-दिवसभर सरकारी कार्यालयात बसून काढलेले आठवते. नंतर मात्र बघता बघता सगळ्याचाच जम बसू लागला. तेव्हा संतोष चव्हाण (संतोषदादा) नावाचा एक साथीदार भेटला. त्यांनी या कष्टाच्या वेळेस खूप मदत केली.  

             माझी शाळा नियमितपणे चालू झाली. दररोज शाळेत ने-आण करणे, हे तर असायचे. पण रात्री जेवताना सगळ्यांनी एकत्र बसून 'आज काय झाले?' यावर मनसोक्त गप्पा मारायच्या. माझ्या अभिव्यक्तीवर याचा खूप मोठा प्रभाव पडला. त्यांचे धाडस, वेगळा विचार यापैकी थोडेसे का असेना, मला घेता आले, असे म्हणायला हरकत नाही. जिन्यावरून एकटा चढणे असो किंवा रहदारी असलेल्या रस्त्यावर एकट्याने फिरणे. त्यांनी कायम धाडस करायला शिकवले. कधी कधी तर मी फिरायला गेलो असताना, मागून बघायला यायचे. की मी कोणाची मदत घेतो काय ? पाठीमागून अचानक आवाज यायचा "ओंकार...."मी गारठायचो. मी लहानपणी खूप मार खाल्ला आहे. हे प्रांजळपणे ते कधी कधी कबूल ही करायचे. दररोज रात्री दुधाने भरलेला पेला, मी स्वतःच्या हाताने घेऊन प्यायला जमले पाहिजे. याच्यासाठी सराव चालू असायचा. त्यामुळे लहानपणी मी मार खाल्लेला नाही, असा दिवस गेला नाही. याचा परिणाम 'हेंदकळत' का असेना स्वतःच्या हाताने मला पाणी पिता येते. त्यांनी माझ्यावर जितके लक्ष दिले, त्या तुलनेने अवधूत कमनशिबी ठरला. त्याच्यावरही लक्ष होते, पण माझ्या इतके नाही. 

                 बघता-बघता मी एक-एक इयत्ता वरवर जाऊ लागलो. अडचणी आल्या, पण त्या त्यांनी सोडवल्या. हे सगळं करताना त्यांचं वाचन वेड जरा थंडावल असलं तरी पूर्णपणे संपलं नव्हतं. घरी कायम दोन-तीन पुस्तक ठेवलेली असायची. मी ती हाताळायचो, पण कधी वाचली नाही. सगळं व्यवस्थित होते. परंतु 'मी चालेन', या विचाराला कुठेतरी 'तडा' जाऊ लागला. कारण चालण्यापेक्षा 'अभ्यास' मला आणि त्यांनाही महत्त्वाचा वाटू लागला. सातवीत असताना, एकदा वक्तृत्व स्पर्धा जिंकलो. म्हणून त्यांनी अभिमानाने पाठीवरून हात फिरवला होता. मी दहावीच्या परीक्षेपर्यंत येऊन ठेपलो. त्यांनी आत्तापर्यंत 'रेखाटलेल्या' चित्राची आता छाननी होणार होती. निकाल लागला 75.40% मिळवून मी उत्तीर्ण झालो. निश्चितच ही त्यांची जीत होती. फक्त 'हुशार' असून उपयोग नाही ! सध्याच्या जगात टिकायचं असेल, तर वेगळे काहीतरी केलं पाहिजे. या माझ्या वृत्तीला त्यांनीच लेखनाकडे वळवून 'फाटक्या पंखातील बळ'हे पुस्तक साकारले. त्यावेळेला लोक त्यांना म्हणायचे "पाटील तुम्ही, म्हणून हट्ट पुरवतात" त्यावर ते उत्तर द्यायचे "इतर मुले, दहावी झाल्यानंतर गाडी,मोबाईल मागतात. माझा मुलगा जरा वेगळा आहे. त्याचा हट्टही जरा वेगळा असणार" खरंच त्यांनी लिहिता न येणाऱ्या मुलाला लेखकांच्या पायरीला आणून बसवले. मी पाचवीत असताना, वडिलार्जित जुनी व सोबत जवळपासही थोडी विकत जागा घेऊन, त्यांनी घर बांधायला काढले. त्यावेळी ध्येय होते. माझा 'दहावीचा अभ्यास' या घरात झाला पाहिजे. प्रत्येक महिन्यासाठी काहीतरी बांधकामाचे साहित्य घेऊन ठेवायचे, असं करत-करत मी दहावीचा नाही, पण बारावीचा अभ्यास त्या घरात केला. बारावीला मी कॉलेजमध्ये प्रथम आल्यामुळे त्यांना खूप आनंद झाला. कोणी माझ्या जरा जरी कौतुक केलं तरी त्यांची छाती फुगून येई. बघता-बघता अवधूतची दहावी झाली. त्याला 87% पडले. तो माझ्यापेक्षा हुशार असला, तरी कायम सगळ्यांच्या कौतुकाचा विषय मीच ठरत होतो. माझ्या बारावीनंतर, एक मोठा निर्णय घेण्याची वेळ आली. लवकर नोकरी लागायचे, असेल तर 'स्पर्धा परीक्षा' शिवाय पर्याय नाही. हे ओळखून जळगावला एका मोठ्या स्पर्धा परीक्षा केंद्रात मला पाठवायचे ठरले. अर्थात या मध्ये माझाच पुढाकार होता. आम्ही सामान घेऊन गेलो. दिवसभर थांबलो. तेथील परिस्थिती बघून मी माझा 'शब्द' फिरवला. अर्थात कोणीही चिडले असते.पण त्यावेळी सुद्धा ते आणि आई दोघेही माझ्या पाठीशी राहिले. माझ्या एका चुकीच्या निर्णयामुळे जवळजवळ वीस हजार रुपयांचा चुराडा झाला. त्यानंतर मी 'वारणाविश्वा'त सामील झालो. आणि चमत्कार घडला. माझ्यातल्या वकृत्व आणि लेखन कलेला योग्य ती दिशा मिळाली. या प्रत्येक टप्प्यावर ते फक्त सोबत नव्हते, तर मी त्यांच्यावर आधारलो होत़ो. मला आठवतंय गाडीच्या पेट्रोल टाकीवर बसून, प्रत्येक महिन्याला वकृत्व स्पर्धेसाठी कुठे, ना कुठे जायचो. त्यांचा अखंड दिवस खराब करायचो. तरीही कधी मागे हटले नाहीत. पहिल्याच संधीत मी 'वारणा वार्षिक' साठी चार-पाच लेख अगोदरच दिले. पण त्यांची इच्छा होती. की मी कॉलेज आणि विद्यापीठ यांच्या संबंधावर काहीतरी लिहावे. मी माहिती काढण्याचा प्रयत्न केला. पण 'विद्यापीठ कायदा' अत्यंत क्लिष्ट असणार व सहजासहजी हाती लागणार नाही.हे कळून चुकले. पण एकीकडे त्याची इच्छा मोडवत नसल्यामुळे, मी भावनिक आणि सामाजिक अंगाने 'विद्यापीठ वास्तूला काय वाटत असेल ? 'असे भावविश्व रंगवून 'मी विद्यापीठ बोलतोय' हे लिहिण्याचा प्रयत्न केला. लेखन वाचल्यावर त्यांचे शब्द होते, "ओंकार तू इतकच सगळं लिहिलेस, पण नंबर बसू शकेल, असा तुझा हा एकमेव लेख आहे" गतवर्षी 2018-19 विद्यापीठ नियतकालिक स्पर्धेचा निकाल लागला. आत्मकथन विभागात हा लेख प्रथम आला. त्यांचे शब्द ब्रह्म वाक्य ठरले......! पण ते पाहायला तेच.......
   एस. वाय. चा वर्ग दुसऱ्या मजल्यावर असल्याने मला अगदी लहान मुलासारखं उचलून नेत होते. अनेकदा अनेकांनी कधी कधी मी सुद्धा घरी बसून 'अभ्यास करणे व फक्त परीक्षेला जाणे' हा पर्याय सुचवला. पण त्यांना तू मुळीच मान्य नव्हता. महाविद्यालय, प्राध्यापक, तेथील वातावरण हे सगळं त्यांना मिळालं नसल्यामुळे, ते मला मिळावं यासाठी कायम त्यांच्या जीवाचा आटापिटा सुरू असायचा.एक वेळ तर अशी आली की ,मला उचलल्यामुळे त्यांच्या पोटात दुखू लागलं. तरीही 'कॉलेज चुकवायचं नाही' हा त्यांचा दंडक होता. माझी मात्र मधल्या-मधी फसगत व्हायची. एका बाजूला माझं संपूर्ण आभाळ असणारे वडील होते. तर दुसरीकडे त्यांनी दिलेली स्वप्न...... या दोन्हीपैकी एक निवडणे माझ्यासाठी जवळजवळ अशक्यच होतं. काही गोष्टी ठळकपणे मला जाणवत होत्या. जगाच्या भाषेत कदाचित त्याला. Six sense म्हणत असावे. आपला 'बाप' खंगत चाललाय आणि त्याच कारण आपलं शिक्षण आहे ! ही गोष्ट घेऊन जवळजवळ महिनाभर मी फक्त विचार-विचार आणि विचार करत होतो. कारण एखादं निर्णय घेऊन, तो त्यांच्यापुढे मांडला. की ते लगेच खोडून काढायचे. एक वेळेस तरी "तुम्ही अजून हवे आहात.आम्ही सेटल होईपर्यंत. यात आमचा स्वार्थ समजा, पण स्वतःला जपा" इथपर्यंत बोलावे लागले. त्यावर त्यांचे उत्तर असे होते "तुला नोकरी लागून दहा-वीस वर्ष होईपर्यंत मी आहे मला काही होत नाही.ती जबाबदारी माझी" याच्यापुढे मी किंवा माझा भाऊ काय बोलणार ? माझ्या या अवस्थेवर एक पर्याय होता. 'इलेक्ट्रिक व्हीलचेअर'चा. मी जर स्वतःहून एकट्या कॉलेजला येणं सुरू झालं, की दुसऱ्या मजल्यावर जाण्यासाठी काहीतरी 'जुगाड' लावता आला असता. पण त्यावेळी नशिबाने साथ दिली नाही. पन्नास हजार रुपयांची सायकल घेण्यासाठी अनेक आमदार, खासदार, मंत्री यांना अर्ज विनंती केली. पण त्यावेळी कोणीच दाद घेतली नाही. पैसे साठवण्याचाही खूप प्रयत्न केला पण आकडा 15 हजारच्या पुढे गेला नाही....

 ‌.           ‌ शेवटी काळाने माझ्या या अडचणीवर पडदा टाकला. कोरोनामुळे लॉकडाऊन झाला. आणि कॉलेज बंद झाले. जगाला सळो की पळो करून सोडणारा 'कोरोना' माझ्यासाठी मात्र देवदूत ठरला...... त्यानंतरचा काळ मात्र अत्यंत वाईट आणि निर्दयी होता. पुढे काही दिवसातच त्यांच्या स्वादुपिंडाच्या कॅन्सरचे निदान झाले. 'किमोथेरेपी' या अत्यंत वेदनादायी उपचारांची सुरुवात झाली. हा सर्वांसाठी मोठा धक्का होता. परंतु सावरण्यासाठी वेळ नव्हता. तर 'यातून लवकरात लवकर कसे बाहेर पडता येईल ?' याचाच विचार सर्वजण करत होते. कधीच विषय निघाला तर म्हणायचे "एवढे चार-पाच महिने 'केमो' झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे तुझे कॉलेज आपली प्रेस सर्व सुरू होईल.....!" या काळात मी त्यांच्याशी एवढा एकरुप झालो होतो. की सकाळी माझे डोळे उघडल्यावर "आई पप्पांनी पित्ताची गोळी घेतली का ?" आपसूक तोंडातून निघायचं. आईच्या कामातून जरा मागे-पुढे होताच मी चिडायचो रागवायचो. .'हातन हुईना काय, आणि तोंड घेतय घाई' अशी तेव्हाची काय ? आत्ताची पण तीच अवस्था आहे ! या काळात आपल्याला अजून काय काय करता ? येईल. याच्या कॅन्सर वरील अभ्यास वाढला. प्रत्येक गोष्ट नीट तपासून घ्यायची सवय लागली. विश्रांती मिळावी म्हणून, किंवा सकल जेवण घेतलं पाहिजे म्हणून वेळ प्रसंगी मी पै-पाहुणे दुखावले.... मला सध्या ते महत्त्वाचे नव्हते. 'यातून काही जगत नाही' अशी भावना ठेवून दररोज लोकांनी घर भरू लागले..... याला मी कडाडून विरोध केला वेळप्रसंगी मित्रांना बोलवून पाहुण्यांचा त्रास त्यांना होणार नाही,अशी सोय करण्यासाठी धडपडलो. त्यांचा स्वभाव माणूस प्रिय असल्यामुळे,आमच्या दोघांचे वारंवार खटके उडायचे. माझी काळजी त्यांना आणि नंतर सर्वांना अति काळजी वाटू लागली. असेच काही दिवस निघून गेले. आणि अचानक 'हारनीया'चे निदान झाले. आता मी मात्र पूर्णपणे खचून गेलो. रात्रीचा उठून विचार करू लागलो. अशा अडचणी येत गेल्या. पण मी त्याचा भरपूर मोठा धसका घेतला. त्यांच्या दोन-तीन दिवसात 'माझं काहीतरी बिनसलंय' हे लक्षात आलं. अनेकांनी विचारलं. पण मलाच कळत नव्हतं काय झालं ? म्हणून माझे काही निवडक मित्र,जवळच्या नातेवाईकांना हाताशी धरून त्यांनी योजना तयार केली.‌ ती काय होती? त्यातून काय साध्य झाले ? त्यावेळी खरंच काय घडत होते की माझा मानसिक आजार होता ? या अशा अनेक प्रश्नांची उत्तर मी शोधतोय..... ती योग्य वेळ आल्यावर योग्य त्या व्यक्तीकडून मला मिळतील. पण पप्पांनी माझ्यासाठी 'अट्टाहास' केला होता, एवढं नक्की..…..

              त्यानंतर मला बावची या माझ्या मामाच्या गावी पाठवण्यात आले. मी त्यांच्यापासून तुटून 'माझ्याच विश्वात' रमलो. महिन्याभरानंतर मी जेव्हा परतलो. तेव्हा परिस्थिती खूपच बदलली. स्वादपिंड पूर्णपणे 'बंद: पडण्याच्या मार्गावर होते. शस्त्रक्रिया होऊनसुद्धा, म्हणावेतसा फरक पडत नव्हता.अन्न पचत नव्हते. शरीराचा पूर्ण 'सांगाडा' बनला होता. एकदा, दोनदा त्यांच्या बोलण्यावरून, ते माझ्यावर रागावले आहेत. असे जाणवले. कारण विचारण्याची त्यांची अवस्थाच नव्हती. मग मी फार लक्ष घातले नाही. कदाचित माझाच त्रास होईल. असे मला वाटले. जीवनातील सर्वात वाईट गोष्ट कोणती ? या प्रश्नाचे उत्तर माझ्या मते "हातबल झालेला बाप" इतकेच असू शकते.  

                माझ्या आजवरच्या आयुष्यातील काळा दिवस, अखेर उजाडला. 20-10-2021 सकाळी १० वाजता. दोनदा माझ्या कानावर 'ओंकार' त्यांनी मारलेली हाक ऐकू आली. माझा भास असेल म्हणून दुर्लक्ष केलं. सायंकाळी खोलीत कोणीही नसताना त्यांची 'तल्कली' होऊन त्यांनी मृत्यूला जवळ केले. काय चाललंय ? काय झालंय ? हेच कळत नव्हतं. माणसे जमली. सर्व विधी झाले. 'यापुढे ते दिसणार नाहीत' ही भावनाच स्वीकार करण्यासारखी नव्हती. चित्रकाराने चित्राचा शेवट स्वतःच्या रक्ताने केला होता. पण त्या चित्राची बाजारातील किंमत चित्रकाराच्या नजरेस पडली नाही ! पुढे आठवड्याभरानंतर मला सावरण्याचा मार्ग सापडला. ते या जगात नाहीत,आता कधीच आपल्याला दिसणार नाहीत. हा विचार डोक्यात आला, की आदळ-आपट करू वाटायची. सर्व काही उध्वस्त करून टाकावे,असे वाटायचे.अगदी स्वतःला सुद्धा....‌ मग मनाला समजवायचे. 'गेले असतील वडगाव-आष्टा किंवा कोल्हापूरला, येतील संध्याकाळी परत' मग कुठे शांत वाटायचे. मला सवय आहे, वाट पाहण्याची. मी पाहीन...... पुढे सहा महिन्यानंतर एक चमत्कार घडला.आणि त्यांच्या आशीर्वादाने सायकल मिळाली.आज गाडीच्या पेट्रोल टाकीवर बसून फिरणारा, मी अगदी एकटा पारगाव, पोखले-केखले वाठारपर्यंत. फिरतोय. पण बघायला ते नाहीत. असू दे...लवकरच येतील परत......

-ओंकार जितेंद्र पाटील
मु.पो. काेडाेली शाहु कॉलनी, 
(हॉटेल आनंद समोर) 
ता. पन्हाळा जि. कोल्हापपूर -416114
mail:- 08omkarjitendrapatil@gmail.com
Mob :- 9175416417


Rate this content
Log in

More marathi story from Omkar Jitendra Patil

Similar marathi story from Abstract