Suresh Kulkarni

Inspirational

1.5  

Suresh Kulkarni

Inspirational

गोष्ट एका बाळाची!

गोष्ट एका बाळाची!

4 mins
7.7K


लहानपणी अनेक गोष्टी मी ऐकल्यात , अकबर -बिलबर , राजा -राणी , इसाप नीती , वाघा -कोल्ह्याच्या , परीच्या , राक्षसाच्या , रामायणातल्या , महाभारतातल्या वगैरे . त्याच काळात एक सर्वात निराळी कथा माझ्या आई कडून मी ऐकलेय .

एका भरल्या घरात - तेव्हाची एकत्र कुटुंब पद्धती मुळे सगळीच घर 'भरली'असत म्हणा - एक लहान म्हणजे चार -सहा महिन्याचं दुर्लक्षित बाळ होत . भावंडात चौथ्या नंबरच , घराचं प्रेम पहिल्या कुलदीपकातून पाझरून त्याचा पर्यंत पोहचत नसावं . जन्मजात अशक्त , रडकं , किरकिर . फारस कोणी लक्ष देत नसे . त्याची आई सासुरवाशीण . घरकामाचा रगाड्यात अडकलेली . पोटच्या गोळ्या साठी जीव तुटायचा . पण कामाचा रेटा आणि जावा ,सासूचा तोंडाचा पट्टा ! असह्य होती ! ( हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पातल्या व्यथा सुद्धा सौम्य वाटाव्यात अश्या काही गोष्टी 'सासुरवासात ' घडत ! चार चौघात 'सासुरवाशणी ' ला कोरडी सहानभूती मिळे , पण अशी सहानभूती दाखवणाऱ्या चार भिंतीत आपल्या सुनेचा छळच करत ! ) पहिला महिना -दोन महिने ती बाळा कडे देऊ शकली , पुन्हा जमेना .

" लहान लेकरं रडायचीत , काही होत नाही !"

" जन्मल्या पासून किरकीरच कार्ट ! सदा भोकाड पसरलेलेच ! "

"घटकाभर रडल्यान काही टाळू पडत नाही ! तू नको लक्ष देऊ ! तू आपलं सयपाकाचं बग ! "

" काही नाय ,तुलाच काम टाळायचं असत म्हणून लेकराचं निमित्य करून आराम करतीस , तुझी सगळी थेर आमाला काय नवी आहेत ?"

"आग , त्या रड्क्याच्या काय नादी लागतेस? , रडलं -रडलं अन गप पडलं ! तू आपलं भांडी घासून घे ! "

" काय करायचंय असलं किडक कार्ट ! मेलल बर ! सगळ्यांची तरी सुटका होईल !"

असले जावा ,सासूचे सल्ले नेहमीचेच होते .

झालं . व्हायचे तेच झाले . तापीचं निमित्य झालं , लेकराच्या अंगावर पुरळ उठले ! अंगाची आग होत असावी , ते जिवाच्या आकांतानं रडू लागलं .

" आत्ये , बाळ खूप रडतेय हो !अंगभर पुरळ अन फोड आलेत ! दवाखान्यात नेवूत का ?" बाळाच्या आईनं काकुळतीने सासूला विचारलं .

दवाखाना -डॉक्टर -औषध -पैसे , बापरे , नकोच !

"एव्हड्या तेव्हड्याला डॉक्टर काय करायचंय ? मी विठामावशील विचारून येते ." सासूने मोडता घातला . विठामावशी म्हणजे घरगुती उपचार ठाऊक असणारी एक म्हातारी होती . ' लिंबाच्या पाण्यात कपूर घालून लेकराला नाहू घाला म्हणजे पुरळ कमी होतील .' हा विठामावशीचा सल्ला अमलात आणला. त्या लहानग्या जीवाची अवस्था भयानक झाली . भाजल्या सारखे फोड अंगभर पसरले ! अगदी डोळ्याच्या पापण्यांवर सुद्धा ! त्याला रडताही येईना , दोन्ही ओठावर फोड ! अंगावर तीळ ठेवायला जागा उरली नव्हती ! आईने धीर सोडला ! सासू तावातावाने विठामावशीला भांडायला गेली !

विठामावशीचा सल्ला खरे तर योग्यच होता . पण सासूने घाईत नीट ऐकून घेतलाच नव्हता . कडू लिंबाच्या पाल्या ऐवजी खाण्याच्या लिंबाच्या रसाचा अन कापराचा वापर झाला होता ! पण चूक मान्य करण्या ऐवजी सारे खापर सुने वर फोडून हि बया मोकळी झाली ! ' मी लिंबाचा पालाच म्हणाले पण हि हेन्द्री , चार लिंब अंगुळीच्या पाण्यात पिळून टाकली ! मनाचं कारभार केला !' सासूने कांगावा केला .सून मुळूमुळू रडत राहिली . तिचे चित्त थाऱ्यावर नव्हते . तिला काही ऐकू येत नव्हते . तिला फक्त मरणाच्या दारातले आपले बाळ दिसत होते !

त्या लेकराचे हाल सुरूच होते . संध्याकाळ पर्यंत फोडातून पाणी झिरपू लागले !पुरुष मंडळी कामावरून परत आली . पुन्हा सगळ्यांनी मिळून बाळाच्या आईचा 'उद्धार ' केला . वैद्य आले ,पण नाडी कशी पहाणार ? हात भर फोड ! नाकाजवळ सूत धरले !

" थोडी धाक- धुकी आहे , पण खरे नाही ! " वैद्यांनी निर्णय दिला .

तोवर त्याच्या देहाला मुंग्या लागूंलागल्या ! दुपट्या वरून काढून, लेकरू पोत्यावर ठेवले ! दारा आड !

निसर्गाचा एक नियम असतो , - सरवायवल ऑफ फिटेस्ट - म्हणजे , सशक्तालाच जगण्याचा अधिकार देणे ! त्या प्रमाणेच घडत होते ! अशक्ताला निसर्ग हि नाकारतो !

पण नियती ? तिच्या मनात काय होते ? दुसरे दिवशी त्या बाळाने डोळे उघडले ! अस्पष्ट हुंदकार दिला ! रात्र भर जवळ बसलेल्या आईच्या बोटाला हलकासा स्पर्श केला ! दोन दिवस घिरट्या घालणाऱ्या मृत्यूला - जा , मी येत नाही , मला अजून जगायचे आहे , असे ठणकावून सांगितले असावे !

दोन महिन्यांनी सासू नातवाला घेऊन विठामावशीच्या ढाळंजत बसून सांगत होती .

"आमची थोरली सून, रमा , ह्या लेकराची आई , एकदम येडपट आहे ! एक काम धड करत नाही ! ऐकलं एक केलं भलतंच ! लेकरू मरू धातलं तरी बघितलं नाही ! दोन दिवस हे बोचक मी मांडीवर घेऊन बसले होते ! म्हणून तर जगलं ! बघा , बघा कसा लब्बाडावानी हसतोय ! " खरच ते छोटं मुलं आजी कडे ' काय खोटारडी म्हातारी आहे ' असल्या नजरेनं पहात होते !

हे सारे खरे असावे असे, आता मला वाटतंय ! कारण ------ आजीने माझ्या चुलत भावांचे जसे लाड केले , मांडीवर घेऊन मुके घेतले , तसे मला कधीच जवळ घेतले नाही . खरे तर मला पण तिच्या सश्या सारख्या मऊसूत गोधडीत झोपायचे होते !

सगळ्यांना सगळे मिळत नाही असे म्हणतात . पण हे खरे नाही ! काहींना सारे काही मिळते , न मागता आणि काहींना काहीच मिळत नाही , अगदी मागून सुद्धा !


Rate this content
Log in