Deepali Aradhye

Inspirational

3.2  

Deepali Aradhye

Inspirational

गोकुळधाम खेलमहोत्सव

गोकुळधाम खेलमहोत्सव

2 mins
185


'तारक मेहता का उलटा चष्मा' - सब टीव्ही वर दाखवली जाणारी एक हिंदी मालिका. आता साधारण नऊ-दहा वर्षे झाली असतील. मालिकेची तारीफ करणारे कमी आणि नावं ठेवणारी मंडळी जास्त भेटतील, पण असो, इथे प्रत्येकाच्या मताचा आदर आहे. या मालिकेतील बायकांना सासू नाही म्हणून त्या सुखी, अशीही बालिश विधाने ऐकायला मिळतात, कायम. पण त्यातला विषय-आशय बघतो का खरंच आपण?

 

डिजिटल गोष्टींच्या आहारी जाणारी बालपिढी, याबद्दल भाष्य करताना या मालिकेत दाखवलं जातं की आईवडील, त्यांच्यासोबत आजोबा आणि सोसायटीतील इतर सभासद, जे मित्रपरिवार दाखवले आहेत, असे सगळेच त्यांच्या लहानपणी खेळले जाणारे खेळ खेळतात. मुलांना खेळ कसे खेळायचे हे दाखवण्यासाठी आणि मुलांना त्यात सहभागी करून घेण्यासाठी. हा आशय आपण समजावून घेतला का? आपल्या मुलांसाठी काहीतरी ठोस भरभक्कम देताना मैदानी खेळ किती महत्वपूर्ण भूमिका निभावतात, हे आता सिद्ध झालंय. तसंच, पालक म्हणून त्यांच्या दैनंदिन जीवनात एक दिवसाचा संपूर्ण सहभागही मुलांच्या मानसिकतेत सकारात्मक भूमिका निभावतो, हेदेखील आता माहिती आहे.


याच मालिकेचे, दोन ते तीन भाग #गोकुळधाम_खेलमहोत्सव साठी वापरण्यात आले. मुलं, स्त्रिया, पुरुष प्रत्येकासाठी वेगवेगळ्या प्रकारचे खेळ. सोबतच सगळ्यांचे एकत्र असणारे खेळ. अशा वैविध्यासहीत अनेक प्रकारचे खेळ दाखवले गेले. इथे शारीरिक क्षमता तपासल्या गेल्या, तसेच मानसिक क्षमता सुद्धा. वेळ आली तर भांडण केले जातात, तेच वेळ आली तर एकी दाखवली जाते. एकमेकांशी संवाद साधण्याचं महत्व अधोरेखित केले जाते, तसंच प्रसंगी प्रायव्हसी जपण्याचं स्वातंत्र्यही मिळतं-दिलं जातं.

 

गोकुळधाम_खेलमहोत्सव मध्ये कोणकोणते खेळ दाखवले गेले, त्यावर एक नजर. पंजा लढवणे, पोत्याची स्पर्धा, उलट पळत जाण्याची स्पर्धा, चमचा-लिंबू, फुगा फुगवून तो फोडण्याची स्पर्धा, तीन पायाची शर्यत. ज्याद्वारे मानसिक क्षमता तपासताना सकारात्मक भाव-विचारबुद्धी वाढीस लागेल अशा पद्धतीने चित्रीकरण झाले. तर शारीरिक क्षमता केवळ बाह्यांगाने न तपासता, त्यासोबत मानसिक अथवा भावनिक ताकद जोडली गेली तर अंगकाठीने बारीक असणारी व्यक्तीही जिंकू शकते, हा संदेश पोहोचविला गेला आहे.

 

शेवटची स्पर्धा दाखवली गेली ती, पती-पत्नीचा एकएक पाय बांधून चालण्याची. याद्वारे काय सूचित होते, संसार करताना एकमेकांसोबत असलेला ताळमेळ, कधी कोणी पुढे गेला तर मागे राहिलेल्यासाठी क्षणभर विसावा आणि पुन्हा एकदा सोबत चालणे. आणि शेवट काय आहे या स्पर्धेचा? तर सगळेच कपल एकाच वेळी फिनिश लाइन टच करतात. एकी आहे. बापूजी काय सांगतात? एकच गोल्ड मेडल आहे ना, मग एकाच मोठ्या रिबिनीमध्ये ते गुंफून सगळे एकत्रित उभे राहून एकाच वेळी ते मेडल गळ्यात घालू या!

 ही मालिका तर हृदयाच्या जवळ आहेच, पण त्यातही गोकुळधाम खेलमहोत्सव मनाला फारच भावून गेले, एवढं नक्कीच!


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational