घर व्यवस्थापन आणि खोटे बोलणे
घर व्यवस्थापन आणि खोटे बोलणे


घर म्हटले की स्वयंपाकघर आलेच... अन् व्यक्ती तितक्या प्रकृती याप्रमाणे प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते... अन् या सगळ्याचा मेळ घालून स्वयंपाक करणे हे एक प्रकारचे युद्धपातळीवरचे काम असते.... त्यामुळे थोडे खोटे बोलून कोणालाही न दुखावता सुवर्णमध्य काढून आपल्याला ही लढाई जिंकायला लागते... आणि तुम्हाला तर माहिती आहेच, "प्रेमात अन् युद्धात सारे काही माफ असतेच..."
घर नावाची कंपनी चालवत असताना आपल्यालासुद्धा व्यवस्थापन, वेळेचे नियोजन, कोणत्याही गोष्टीचे प्लानिंग हे करायला लागते अन् अशा वेळेस एखादी वेळ मारून न्यायला खोटे बोलले तरी ते चांगले असते...
जसे की एखाद्या दिवशी आपल्याला नाश्ता बनवायचा नसेल किंवा नेहमी करणारे पदार्थ जर आधीच्या एक-दोन दिवसात झाले असतील तर अशा वेळेस मुद्दामून रात्री जास्त भात करायचा आणि त्याला मस्त फोडणी देऊन कोथिंबीर टाकून फोडणीचा भात बनवत बोलायचं काल रात्री चुकून जास्त झाला म्हणून आज नाश्त्याला फोडणीचा भात केला...
एखाद दिवशी नवऱ्याला मस्त कढी, मुगाची उसळ खायचा मूड येतो आणि जर आपण मुग भ
िजत घालायला विसरून गेलो तर.. आज ना अमुक तिथी आहे आज मुग खायचे नसतात... आता लगेच भिजवते उद्यासाठी... तुमचे एक खोटे वाद मिटवते....
एखादी भाजी सगळ्यांना आवडत असते तरी पण कोणाचा मूड असतो तर नसतो अशावेळेस मला जर कॊणी विचारले, आज काय भाजी आहे? तेव्हा माहिती असूनसुद्धा मी सांगते, अजून ठरवलं नाही... या खोटे बोलण्याने काय होते तर जास्त चर्चा होत नाही... आणि आपण ठरवलेला मेनू वाद विवाद न होता पार पडतो...
घरात एखादी वस्तू संपत आली तरी सर्वच बायका ती संपली असेच जाहीर करतात... आपल्याला माहित असते की असे सांगितलं तरंच ती वस्तू तातडीने घरात येते हे त्यांना माहित असते त्यामुळे नक्कीच हे खोटे चांगले असते...
खरे तर जेवढी उदाहरणं देऊ तेवढी कमी आहेत... पण ज्या खोटे बोलण्यामुळे कामे लवकर होतात किंवा वाद होऊ नये म्हणून खोटे बोलावे लागते असे ठिकाण म्हणजे "घर" आणि ही संस्था म्हणा किंवा आपल्या संसाराचा गाडा नीट चालावा म्हणून त्या घरातील स्त्रीला असे खोटे बोलावे लागतेच.....
तुम्हालासुद्धा असा अनुभव आहे का??