Pratibha Tarabadkar

Crime Thriller

4.3  

Pratibha Tarabadkar

Crime Thriller

एकमेका साह्य करू - भाग 1

एकमेका साह्य करू - भाग 1

4 mins
325


 नीरव शांततेत मोबाईलची रिंग कर्कश्श पणे वाजली आणि इ.कदम दचकून जागे झाले.त्यांनी घड्याळात पाहिले,पहाटेचे पाच वाजले होते.हवालदार पाटील बोलत होते,'सर, शांतीनगरमध्ये घरफोडी झाली आहे.एकदम चार घरे फोडली आहेत.'इ.कदमांची खाडकन् झोप उडाली.'काही जीवितहानी?'

 'नाही सर.घरांमध्ये कोणी नव्हतं.'इ.कदमांनी निःश्वास सोडला.आणि ते पांघरूण झुगारून आवरायच्या तयारीला लागले.


 शांतीनगर ही टुमदार बंगल्यांची वसाहत शहराच्या एका टोकाला होती.सुरुवातीला गणपतीचे मंदिर,त्याच्या समोर छोटीशी बाग,त्यात बसण्यासाठी बाकं आणि नंतर समोरासमोर बंगल्यांची ओळ असे त्या वसाहतीचे स्वरुप होते.वसाहतीत शिरताच वृद्धांचा एक घोळका इ.कदमांना सामोरा आला.सर्वांचे चेहरे चिंतातूर दिसत होते.'मी देशमाने',शांतीनगरचा सेक्रेटरी'.इ.कदमांनी त्यांना प्रतीनमस्कार केला आणि सर्वजण ज्या बंगल्यामध्ये घरफोडी झाली होती तेथे जाण्यासाठी निघाले.'ते बंगले रिकामेच आहेत का?'इ.कदमांच्या प्रश्नावर देशमानेंनी नकारार्थी मान हलविली.'आमच्या वसाहतीत सारे वृद्धच रहातात.शिक्षणसम्राटांनी मोठमोठ्या शिक्षणसंस्था उभारल्या, वेगवेगळे अभ्यासक्रम काढले पण मुलं शिकून बाहेर पडल्यावर या भागात नोकऱ्या कुठेत?मग काय, साऱ्या मुलांनी एकतर पुण्या मुंबईचा रस्ता धरला नाही तर परदेशाचा? त्यामुळे येथील मंडळी मुलांकडे येऊन जाऊन असतात.हे चारही बंगल्यांचे मालक असेच मुलांकडे गेले आहेत.त्यांना कळवलंय आणि ते लगेचच परत निघाले आहेत.'


 बोलता बोलता घरफोडी झालेला पहिला बंगला आला.सर्व मंडळींना बाहेर थांबवून इ.कदम आपल्या टीमसह बंगल्यात शिरले.बंगल्याच्या ग्रीलच्या दाराचे तसेच लाकडी दाराचा कडी कोयंडा उचकटून चोर घरात शिरलेले दिसत होते.बेडरुममधील लोखंडी कपाटातील लॉकरशी झटापट करून ते उघडले होते.आतील महत्वाची कागदपत्रे विखरुन पडली होती.त्या लॉकरमधील काय काय गेले ते बंगल्याचे मालकच सांगू शकले असते.उरलेल्या तीन बंगल्यांची हीच परिस्थिती होती पण नवल म्हणजे एका घरातून नवाकोरा टी.व्ही.तर एका घरातून चक्क नवाकोरा फ्रिजसुद्धा चोरांनी नेला होता हे मात्र चक्रावून टाकणारे होते. 'वसाहतीत राखणदार ठेवला नाही का?'इ.कदमांच्या प्रश्नावर देशमाने म्हणाले,'अहो टिकतात कुठे राखणदार?थोडा जास्त पगार मिळाला की जातात सोडून! पुष्कळ झालेत बदलून!''आणि c.c.कॅमेरा आहे कोणी लावलेला?''नाही हो सर, इतकी वर्षे रहातोय आम्ही इथे,पण असा प्रसंग कधी आलाच नव्हता.मात्र आता लगेच बसवून घेऊन.'


 देशमानेंकडे शांतीनगर चे सारे रहिवासी जमले.'बरं तुमचा कोणावर संशय?'इ.कदमांच्या प्रश्नावर सारे एकमेकांकडे टकामका बघू लागले.'एका वेळी चार घरं फोडली चोरांनी, तेसुद्धा त्या बंगल्यांचे मालक घरात नाहीत,घर रिकामं आहे हे पाहून!यांचा अर्थ त्यांची तुमच्या घरांवर त्यांनी आधीच पाळत ठेवली होती.'इ.कदमांनी हा मुद्दा लक्षात आणून दिल्यावर सारेजण हबकून गेले.'तुमच्याकडे कामवाल्या येत असतील ना?'इ.कदमांच्या या प्रश्नावर साऱ्यांनी एक सूरात सांगितले,आमचा त्यांच्यावर अजिबात संशय नाही.त्या आमच्या कडे वीस पंचवीस वर्षे काम करतात.दहाच्या बसने येतात आणि पाचच्या बसने परत जातात.'

 'पण त्यांची मुलं?व्यसनी नवरे?'

 'नाही सर, मुलं पोटापाण्यासाठी पुण्या मुंबईत आणि नवरा माळकरी त्यामुळे त्यांच्यावर आमचा अजिबात संशय नाही'सर्वांनी निक्षून सांगितले.इ.कदमांनी शांतीनगरच्या रहिवाशांवर नजर फिरवली.सारी एकजात वयस्कर मंडळी!'तुम्ही कोणी एखादी खोली भाड्याने देण्याचा विचार कधी केला नाही का?सोबत झाली असती,या वसाहतीत माणसांचा वावर वाढला असता.दिवसाच इतका शुकशुकाट तर रात्री किती असेल!'


 'अहो सर,असाच विचार करून आम्ही कॉलेजच्या मुलांना रहावयास भाड्याने खोल्या दिल्या.म्हटलं सोबतपण होईल आणि चार पैसे पण मिळतील.पण कसचं काय!इतकी व्रात्य कार्टी होती ना, रात्री बारा वाजता केक कापून, फटाके फोडून वाढदिवस साजरा करायची, बाईकची शर्यत लावायची! आम्ही जीव मुठीत धरून वावरत होतो.एकदा या देसायांच्या खोलीत एका मुलाने गर्लफ्रेंड आणली तेव्हा मोठ्ठे भांडण झाले.शेवटी सर्वांची परिक्षा झाल्यावर एकजात सगळ्याच मुलांना येथून काढून टाकले.त्यांचं काय अडतंय म्हणा, अजून चार पैसे जास्त दिले की मिळते दुसरीकडे जागा! उडवायला कुठून एवढे पैसे आणायची कुणास ठाऊक!'शेवटच्या वाक्यावर इ.कदमांनी कान टवकारले.'सगळ्या मुलांची नावे आणि पत्ते यांची लिस्ट करून मला द्या असे बजावून इ.कदम उठले. पोलीस स्टेशनमध्ये जीप शिरताच त्यांच्या लक्षात आले की आज खूपच गर्दी जमली आहे.एकाच वसाहतीत चार चार घरफोड्या?फारच सनसनाटी घटना घडली होती गावात! गावातील नगरसेवक, स्थानिक पत्रकार, स्थानिक केबल टीव्ही चे फोटोग्राफर यांनी एकच गर्दी केली होती.'तपास चालू आहे'असे सांगून त्यांना कटवण्यात इ.कदमांच्या नाकी नऊ आले.

 

ज्या घरांमध्ये चोरी झाली आहे त्या बंगल्यांचे मालक आले आहेत असा शांतीनगरचे सेक्रेटरी देशमाने यांचा फोन आला तसे इ.कदम ताबडतोब पोलिस स्टेशनमधून निघाले.घरांमधील हातांचे ठसे आधीच घेतल्याने बंगल्यांच्या मालकांनी आत प्रवेश केला ‌होता.काय काय चोरीला गेले याची शहानिशा केली असता अडीनडीला लागेल म्हणून ठेवलेली रोख रक्कम, चांदीची भांडी, किरकोळ दागिने इ.ऐवज चोरीला गेला होता तसेच नवाकोरा फ्रिज आणि टी.व्ही.या सर्वांचा एकत्रित आकडा दोन लाखांपर्यंत जात होता.फ्रिज आणि मोठा फ्लॅट स्क्रीन टी.व्ही.उचलण्यासाठी तीन चार माणसं तरी लागली असतील.शिवाय नेण्यासाठी एखादे वाहन सुद्धा वापरले असेल.


 'सर, मध्यरात्री मी वॉशरुमला जाण्यासाठी उठलो होतो तेव्हा एक वाहन जाताना आवाज आला पण अर्धवट झोपेत असल्याने मला नक्की कळलं नाही',बाभळे म्हणाले.इ.कदमांच्या हातात देशमानेंनी विद्यार्थ्यांची लिस्ट दिली. जीपमध्ये इ.कदम विद्यार्थ्यांची लिस्ट काळजीपूर्वक वाचत असताना हवालदार पाटील म्हणाले,'सर, मला ‌नाही वाटत ही चोरी विद्यार्थ्यांनी केली असेल!'इ.कदमांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिले.'सर, फ्रिज,टी.व्ही.उचलून नेणं हे अंगमेहनत करणारेच करु शकतात.शिवाय कुलूप,कडीकोयंडा एखाद्या स्क्रू ड्रायव्हर ने उचकटून काढले आहेत.इतक्या सफाईदार पणे काम करणारा माणूस हा या बाबतीत सराईत असला पाहिजे.'हवालदार पाटील यांनी केलेले चोरांबाबतचे विश्लेषण किती अचूक होते.इ.कदमांनी त्यांच्या कडे कौतुकाने पाहिले.

 

पण मग चोर शोधायचे तरी कसे?चोर बंगल्याचे गेट उघडून आत आले, बाहेरील ग्रील, मुख्य दरवाजा यांचा कडीकोयंडा उघडून राजरोसपणे चोरी करून निघून गेले तरी कोणाला पत्ताच नाही?'सर, उन्हाळ्याचे दिवस असल्याने सर्व जण बेडरुमची दारं खिडक्या बंद करून ए.सी.लावून झोपले होते त्यामुळे असेल कदाचित! रहिवाशांच्या या खुलाशाने इ.कदम गोंधळात पडले.मग चोरांचा शोध लावायचा तरी कसा? कोणावरही संशय नाही,ना रखवालदार, ना c.c.t.v., पोलिसांचे श्वानही काहीच माग दाखवेना.पोलिसांच्या खबऱ्यांनाही काहीच सुगावा लागला नाही.सर्व सोनारांना सूचना दिल्या होत्या की कोणीही दागिने विकण्यास आले तर ताबडतोब खबर करा पण तेथूनही अजून काहीच समजेना.त्यातच स्थानिक पुढारी, पत्रकार यांनी भंडावून सोडले होते.इ.कदम अगदी त्रासून गेले होते.


 त्यात सकाळी सकाळी बातमी आली,'लक्ष्मीनगरमधील विसपुते सराफांचा बंगला फोडला.'

(क्रमशः)


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime