एकच झुरका
एकच झुरका
एक झुरका ! नावातच काय नशा आहे नाही ? झुरका हा शब्द ऐकताच ,एक वेगळीच नशा चढते... .मग ही नशा अनुभवाशी वाटते ...त्यासाठी
वेगवेगळे बहाणे शोधले जातात. टि.व्ही .,सिनेमात आवडत्या हिरोची ,ते Stylish झुरके famous होऊन जातात.
त्या पिक्चर मधील झुरक्याच्या सीन खाली
लिहलेले असते "धूम्रपान सेहत के लिये हानिकारक होता है "
हे सहजच नजरेआड होते. लक्षात राहतो तो फक्त झुरका !सेहत च नंतर पाहल्या जाईल हो !
आधी त्या झुरक्याची मजा तर लुटू दया - -
असाच कोवळ्या वयातील मुलांचा झुरक्याचा एक अनुभव - - - -
त्या दिवशी सुजाता बस स्टॅण्डवर बसली होती. बस येण्यास अर्धा तास वेळ होता . नेहमी वर्दळीत असणारे बस स्टॅन्ड आज का कुणास ठाऊक ,पण
थोडे शांत होते. सुजाताच्या mobile ची बॅटरी Low असल्याने ,तिने तो पर्स मधुन काढण्याचे टाळले. घरी जाईपर्यंत mobile चालला पाहिजे.
mobile चे एक बरं असते, तो हातात असला की, आजूबाजूचे भान राहत नाही ."आपण बरे अन आपला mobile बरा ."
mobile नसल्याने सुजाता समोर दिसेल त्याचे निरीक्षण करीत होती. तिच्या समोरच्या बाकड्यावर घाईने तीन मुले आली. त्यांच्या शाळेच्या ड्रेसेस वरून आणि school bags वरून ती सातवी, आठवीत शिकणारी असावीत.
एकाने खिशातून सिगारेटचे पाकीट काढले. लगेच दुसऱ्याने माचीस काढली. सुजाताची उत्सुकता ताणल्या गेली. ती अधिक बारकाईने
निरीक्षण करू लागली .
सिगारेट पेटली .पाहिल्याने एक झुरका ओढला .धूर हळूच हवेत सोडला . एक दोन झुरके मारून झाल्यावर सिगारेट दुसऱ्याच्या हाती
दिली .त्यानेही तेच केले .मग तिसऱ्याच्या हातात
- - - -
अगदी शिस्तबद्धतेणे हा कार्यक्रम सुरू होता . सुजाता हे सर्व अवाक होऊन बघत होती. कोणीतरी म्हणते ,माणसाला टेन्शन असले की,
माणुस नशा करतो .या वयात या मुलांना कसली टेंशन ?मुलं बऱ्या घराची दिसतात .आई,
वडिलांचे लक्ष नसेल का ?
अशी कोवळी मुले स्वतःच आयुष्य सिगारेट च्या धुरासोबत जाळताना बघुन सुजाताचे मन हळहळले.
सिगारेट संपली. मुलं नशेतुन बाहेर आली .
"उद्यासाठी एक आहे ." त्यातील एक जण म्हणाला.
Bags घेऊन ती निघाली.
मै जिंदगीका साथ निभाता चला गया
हर फीक्र को धुवेमे उडाता चला गया
बाजुला mobile वर गाणे ऐकत, कोणीतरी असेच झुरके आपल्याच धुंदीत सोडत होता.