एक शब्द
एक शब्द
संवाद. संवादातले वाक्य, नि वाक्यातले शब्द. कितीतरी सांगणारे हे शब्द . शब्द तलवार, शब्द बाण , शब्द फूल, शब्द धार. काहीतरी सांगू जाता उगाच रेंगाळणारे शब्द. काही वेळा अंतर्धान पावणारे नि:शब्द होणारे शब्द आणि काही वेळा खूप गरज असणारे प्रकट शब्द. जिथे हवेत तिथे उमटायलाच हवेत ना हे शब्द.
तिचा लेक अमेरिकेहून आला होता. तिचं बरं चालल होत, सवय झाली होती नवरा गेल्यावर एकटीने रहायची . सुरकुतलेल्या हाताना थोडा कंप होता इतकच . त्यालाही वाटलं, अपेक्षेपेक्षा जास्त रमलीये ही, का उगीच बरोबर येण्याचा आग्रह करा. तो काही न म्हणताच निघून गेला. तिचे मन ठसठसत राहिले. माझ्या नाळेचा विळखा इतका सैल की मला नुसतं चल, नाही म्हणाला. वय झालेले कान आतुरले होते रे ऐकायला तो एक शब्द...
ती, आपल तेच खर करणारी. कमी शिकलेल्या, कमी जातीतल्या मुलाशी हट्टाने लग्न केले.आई बाबांनी लाख परींनी समजावले. आतड्याचा पीळ म्हणूनच केल त्यांनी आकांडतांडव . पण मग त्यांनीच पोटाशी धरलं, जमेल तेवढी मदत केली. पण तिने अबोला धरला. त्यांना फक्त अपेक्षा होती, आई बाबा मी चुकले, ऐकण्याची, नि मग मनातली अंतरे वाढतच गेली. इतका महाग होता पोटच्या मायेला तो एक शब्द?
तो चिमुकला, भाबडा जीव, शाळा, अभ्यास रहाट गाडग्यात पिचून गेलेला. सगळ्या स्पर्धात पहिला येऊन अकाली दमलेला. एका महत्वाच्या परीक्षेत नाही पडले मनासारखे दान. इतका बोल लावला त्याला घरच्यांनी की मानेभोवती अपेक्षांचा फास घेऊन बिन स्पर्धेच्या जगात कायमचा निघून गेला तो. का नाही म्हटले कोणी की बाळा, आमचे तुझ्या मार्कांवर नाही, तुझ्यावर प्रेम आहे. का नाही उमटला तेव्हा तो एक शब्द?
ती त्याचे सगळे अवकाश व्यापून टाकणारी, त्याची आई, पत्नी, अभिसारिका, मंत्री होणारी. असेच व्हायला शिकवले होते तिला. तो ही तिचाच. दोघे एकत्र मोठे झालेले , पण त्याने कधीतरी तू माझी आहेस म्हणावे अशी अपेक्षा करत केस रुपेरी झाले तिचे. आणि अखेरीस वाट बघत तिची पणती झाली पांढऱ्या पीठावरची. आता त्याने आक्रोश केला आणि कावळ्यासमोर उच्चारला तिला हवा होता तो एक शब्द.