एक प्रवास असाही
एक प्रवास असाही
भंडारदरा धरण,घोरपडा देवी ,रंधा वॉटर फॉल , सांदण दरी ट्रेक ,अमृतेश्वर मंदिर
गेले कित्येक दिवस आमच्या ग्रुप मध्ये 'सांधण दरी' ट्रेक करायचा असे ठरत होते पण म्हणतात ना वेळ आल्याशिवाय काहीही होत नाही . तसेच झाले 26 जानेवारी 2023 मध्ये जायचे नक्की झाले . माझ्या मिस्टरांचा पाय दुखत होता .त्यामुळे आम्ही दोघेही येणार नाही असे डिक्लेअर करून टाकले होते .पण जाण्याच्या दिवशी परत ग्रुप मधील सर्वांचे फोन आले .आम्ही तुम्हाला बरोबर नेणारच .जायचे नव्हते म्हणून मी काहीच तयारी केली नव्हती .26 जानेवारीला रात्री दहा वाजता निघायचे होते .संध्याकाळी सहा वाजता मिस्टरांचा दुकानातून फोन आला आपण ट्रीपसाठी जायचे आहे .मुलगाही म्हणाला तुम्ही दोघांनीही या ट्रिप साठी जाच .मग काय माझी प्रचंड ओढाताण झाली . एक तासात सगळी आवरावर केली .अगदी कपड्यांना इस्त्री सुद्धा केली .बॅग भरून झाली . बाजारातून काही वस्तू आणायच्या होत्या . त्या आणायला गेले . आल्यावर रात्रीचे जेवण बनवायचे होते पण शेवटी जेवणाचा शॉर्टकट मारला .
रात्री पावणेदहा वाजता ज्या ठिकाणी आम्ही सारे जण जमणार होतो त्या ठिकाणी पोहोचलो .18 सिटरची ट्रॅव्हल बस माणगाव वरून नऊ वाजता आली होती .सारे जमेपर्यंत साडेदहा वाजले .मग बस समोर उभे राहून सगळ्यांचा फोटो काढला . गाडी सुटली गप्पा गोष्टी करत ,हसत - खेळत प्रवास चालला होता .बसमध्ये बसून एक पिक्चर सुद्धा बघून झाला .
शेंडी गावात नाश्ता करून मग आम्ही पुढील प्रवासासाठी जाणार होतो .शेंडी गावापर्यंत पोहोचण्यासाठी महाड वरून जवळजवळ आठ तास लागले .आम्ही सकाळी सहा वाजताच तेथे पोहोचलो . प्रचंड थंडी होती नाश्त्याला अजून दोन तास अवकाश होता .एवढा वेळ गाडीत बसून काय करणार .मग हॉटेलच्या मालकांशी चर्चा करून आम्हाला दोन रूम्स दिल्या गेल्या . एक -दीड तास विश्रांती घेऊन फ्रेश झालो .आमच्यातील काहीजण मॉर्निंग वॉकलाही जाऊन आले व आजूबाजूच्या परिसराची माहिती गोळा करून आले . हॉटेलमध्ये अतिशय चविष्ट मिसळ व कांदेपोह्यांचा नाश्ता करून ज्या ठिकाणी शेंडी गावात आठवडा बाजार भरतो त्या ठिकाणी भेट देण्यास गेलो .रस्त्यात जाताना गुलमोहरच्या रंगासारखी सुरेख फुलझाडे फुलांनी भरगच्च भरली होती .फोटोसेशनही झाले . तेथून पुढे भंडारदरा धरण पाहण्यासाठी गेलो .त्या ठिकाणी थोडे जंगल होते .झाडे खूप जुनाट होती .एका झाडांमध्ये तर माणसे बसू शकतील एवढी मोठी ढोली होती .झाडांच्या रचनाही खूप छान होत्या . मग काय तिथेही फोटोसेशन झालेच . लांबूनच भंडारदरा डॅमचे दर्शन घेतले 'अम्ब्रेला वॉटर' फॉल तेथेच आहे .पण पावसाळ्यात या धबधब्याचे अतिशय सुंदर दर्शन होते .येथील दगडांचा आकार उघडलेल्या छत्रीसारखाच आहे .त्यामुळेच या धबधब्याला अम्ब्रेला वॉटर फॉल असे म्हटलेले आहे .
तेथून पुढे भंडारदरा डॅम मध्ये जेथे बोटिंग केले जाते त्या स्पॉटला गेलो . तेथील विस्तीर्ण पाण्याचा साठा , निसर्गदृश्य मन मोहून टाकणारे होते . तेथेही वेगवेगळ्या पोजमध्ये फोटोसेशन झालेच .पुढे 'घोरपडा देवी' या देवीचे दर्शन घेतले .या ठिकाणचा परिसर बघितला तर मला महाड जवळील 'वाळणकोंड ' या गावची आठवण झाली .या ठिकाणी प्रवरा नदीचे पाणी पन्नास मीटर खोल दरीत झेपावते .त्या भागास ' रंधा धबधबा ' असे म्हणतात हा धबधबा म्हणजे जणू काही सळसळते तारुण्यच . या धबधब्यातून येणाऱ्या पाण्याचा आवाज संगीतमय वातावरण निर्माण करतो . पावसाळ्यात हा धबधबा उग्र रूप धारण करतो .अगदी चित्रपट सृष्टीतील किंवा कोणीही व्यक्ती या रंधा वॉटर फॉलच्या प्रेमात पडेल असाच हा धबधबा आहे .
घोरपडा देवीचे दर्शन घेऊन झाल्यावर अनेक कमानीतून आम्ही चालत चालत खाली बोटिंगसाठी खाली उतरलो .कमानीतून जाताना कडेलाच लाकडाची सुंदर रेलिंग्स आहेत . शिवाय विसाव्यासाठीही जागा आहेत .शेवटी निसरड्या मातीच्या वाटेवरून आमच्यातले काहीच बोटिंग करण्यासाठी खाली उतरलो . बोटीमध्ये बसलो . जवळजवळ शंभर फूट नदीचे पाणी खोल आहे तसेच त्या ठिकाणहून वाल्या कोळीने ज्या ठिकाणी रामाचे नामस्मरण केले होते ती जागा त्या ठिकाणी दीड दोन तासाच्या अंतरावर आहे असे नावाडी सांगत होता . बोटिंग करताना आजूबाजूच्या डोंगराची रचना जणू काही कोरीव काम केल्यासारखीच होती हे पहावयास मिळाले . खूप उंचावर डोंगरावर अनेक मधमाशीची पोळी होती . नदीचे पाणी एकदम स्वच्छ होते . बोटिंग करताना या साऱ्या परिसराचे शूटिंग करण्याचा मोह मला आवरला नाही . अगदी ज्या ठिकाणी धबधब्याचे पाणी पडते त्या ठिकाणपर्यंत बोटिंग करून आलो . नावाडी घोरपडा मंदिर कडे जाण्यासाठी एक दुसरी वाट आहे हे सांगत होता .पण आम्ही आमच्या पहिल्याच मार्गाने परतीच्या वाटेवर निघालो .तिथेच खडकांवर एक मंदिर आहे . पण निसरडी पाण्यातून जाणारी वाट व शेवाळ असलेले दगड असल्यामुळे आम्ही तिथे चढून गेलो नाही .काही पर्यटक मात्र पाण्यातून वाट काढत त्या देवीचे दर्शन घेत होते . आम्ही दगडांवरून वाहणाऱ्या पाण्याचा आनंद मनमुराद लुटला.असे हे विलोभनीय दृश्य निसर्गाने मनाला घातलेली भुल न विसरण्यासारखेच .त्यापुढे आम्ही अहमदनगर जिल्ह्यातील साम्रद या गावी वस्ती करणार होतो त्या मार्गावर निघालो .वाटेवर आजोबा पर्वत , रतनगड ,अलंग - मदन - कुलंग गड आणि कळसुबाई शिखर यांचे लांबूनच दर्शन घेतले . रस्त्यावरून जाताना भंडारदरा धरणाचे बॅकवॉटर दिसते .
साम्राद गावी शुभम नावाच्या गाईडने आमचे राहण्याचे जेवणाची व्यवस्था केली होती .तो आम्हाला शेंडी गावात नेण्यासाठी आला होता . आम्ही आमच्या राहण्याचा ठिकाणी पोहचलो .त्या ठिकाणी आजूबाजूला बॅकवॉटर आहे . फ्रेश झालो .जेवण जेवलो .आता प्रवासाचा खूप थकवा आला होता . विश्रांती घेतली . संध्याकाळी ताजे तवाने झाल्यावर सर्वजण पत्ते खेळण्यास बसलो . हौजी गेमही खेळलो . मस्त थंडगार वातावरणात बार्बेक्यूचा आस्वाद घेतला . शेकोटी पेटवून त्याभोवती सारेजण बसून अंताक्षरी खेळलो. रात्रीचे जेवण झाले . काही जण तंबूमध्ये झोपले .
सकाळी नाश्ता करून 'सांदण दरी ' या ठिकाणी ट्रेकला जायचे होते .सारे जण झोपी गेलो . सकाळी आटपून झाल्यावर थोडेसे फोटोसेशन झाले . बाकी सगळ्यांचे आटपेपर्यंत आम्ही मॉर्निंग घेऊन आलो .सकाळी नाष्टा करून नऊ वाजायच्या दरम्यान आम्ही ट्रेकला जाण्यासाठी सज्ज झालो . 'सांदण दरीचे ' मी फक्त गुगल वर फोटो बघितले होते . हा ट्रेक अगदी सहज करता येईल असेच मला वाटले होते .आम्ही बसमध्ये बसलो . सांधण दरी भागात पोहोचलो . पायवाटेने काही अंतर चालून गेलो .ज्या ठिकाणी सांदण दरी कमानीवर लिहिलेले होते त्या ठिकाणपासून ट्रेकसाठी सुरुवात झाली .आमच्याबरोबर असलेले ट्रेकर श्री .राजेश बुटाला यांनी तर 25 ते 30 वेळा ही ट्रेक केली आहे .त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ट्रेकिंगला सुरुवात केली . आशिया खंडातील सांदण दरी ही खोलदऱ्यांमधील दुसऱ्या क्रमांकावर असलेली दरी आहे . जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक ,ट्रेकर्स येथे येत असतात .जमिनीला पडलेल्या एका मोठ्या भेगेमुळे ही दरी तयार झाली आहे . ही दरी निसर्गाचा अद्भुत असा चमत्कार आहे . ती 200 ते 400 फूट खोल व चार किलोमीटर लांब वर पसरलेली आहे . सह्याद्रीच्या कुशीत लपलेली ही 'सांधण दरी ' हे आश्चर्य आजही अनेकांना माहित नाही .
भले मोठेमोठाले कातळी दगड , कुठे अरुंद वाटा ,कातळी टोकेरी दगड यातून वाट काढत काढत पुढे जात होतो .आमच्याबरोबर फक्त प्रथमोपचार पेटी , मोबाईल ,गॉगल्स व पाण्याची बाटली एवढेच साहित्य होते . एका ठिकाणी तर एक पाय टाकू शकू एवढीच जागा होती .तिथून पाय सोडून दगडावरून घसरत खाली आलो . माझ्या उंचीचा फायदा मला चांगला झाला .आमच्यातील मेंबर्स एकमेकांना चढ-उतार करण्यासाठी साथ देत होते .आमच्यातील काहीजण पडले . जखमीही झाले .पण पुढचा प्रवास चालूच ठेवला .कमानीतून खाली उतरून आल्यावर जवळजवळ चार फूट उंची एवढ्या पाण्यातून आम्ही चालत गेलो .त्या ठिकाणी एकच पर्यटकांना ने आण करण्यासाठी नाव होती . ज्यांना पाण्यातून चालत जायचे नव्हते ते नावेत बसून पलीकडे गेले .बरोबर असलेल्या सामानाची सॅक त्या नावेतून पलीकडे नेण्यात आली .या पाण्याच्या साठ्याच्या आधी काही ट्रेकर्स पर्यटक रॅपलिंग करत दरीत उतरत होते .रॅपलिंग साठी प्रत्येकी तीनशे रुपये ,नावेतून जाण्यासाठी वीस रुपये तसेच लिंबू सरबत पंचवीस रुपयाला होते .पाण्यातून जाण्यासाठी माझ्या उंचीचा फायदा मला झालाच .
पाण्यातून जायच्या आधी पायातील शूज काढून फ्लोटिंगची चप्पल घातली . त्या चपला सांभाळताना नाके नऊ आले कारण त्या चपला हातात एका साध्या बॅग मध्ये होत्या. अशावेळी सामान ठेवण्यासाठी सॅकचाच वापर करायला पाहिजे .पाय शेवाळ्यावरून घसरत होते डोंगराच्या कडेकडेने हात धरून चालत होतो. वरती विंचूचे वास्तव्य . मनात भिती .पुढे गेलो परत शूज घातले . आता शूज थोडे ओले झाले होते . परत पुढे थोड्या पाण्यातून जावे लागले . आता जरा बऱ्यापैकी रस्ता आहे असे वाटले . मी पटापट जायला बघत होते आणि एका दगडावरून माझा पाय सटकला .कोणीतरी म्हणाले शूज ओले झालेत म्हणून घसरलात . गुडघ्याला जखम झाली .कशी बसे स्वतःला सावरले . माझे मिस्टरही लगेचच मला सावरण्यासाठी पुढे आले . आता जरी लागले तरी न डगमगता पुढे चालू लागले .परत पुढे मोठमोठाले दगड . परत कसरत करत करत पुढे गेले .अगदी शेवटपर्यंत मी गेले नाही .मी उतरू शकत होते .पण त्या ठिकाणी माझ्यासाठी वरती चढून येणे मलाच अशक्य वाटत होते . अनेक ट्रेकर्स वस्तीसाठी आपला बाडबिस्तारा घेऊन जात होते .काही तरुण मुले जी आली होती ती पटापट दगडांवरून उड्या मारत चालत होती . मी कुतूहलाने त्यांना विचारले , "अरे तुम्हाला भीती नाही वाटत ?कसे पटापट जाता या दगडांवरून चालत . " तर ते म्हणाले , " आम्ही डोंगरात असलेल्याच गावात राहतो .अशा दगडातून पटापट चालणे आम्हाला नित्याचेच आहे . " तेथील मोठमोठाले दगड पाहून पावनखिंड लढवताना बाजीप्रभू व मावळ्यांनी असे मोठमोठाले दगड ढकलून शत्रुसैनिकांना कसे गारद केले याची आठवण झाली . तसेच खरोखरच अशा या दऱ्याखोऱ्यातून हे मावळे कसे फिरले असतील ? असे मनात प्रश्न पडू लागले . परत माघारी निघालो . मला तीन ठिकाणी चढणे अवघड होऊन बसले .दोन ठिकाणी माझा निभाव लागला .मिस्टर मला धीर देतच होते . परत पाच मिनिटे कंबरभर पाण्यातून चालले . पायाची बोटे वाकडी झाली . पाणी खूपच गार होते .परत एका दगडावर मी बसले .बोटे हळूहळू सरळ केली आणि पुढे चालू लागले . आता तिसऱ्या ठिकाणी तर माझ्यावर खूपच अवघड प्रसंग आला . मिस्टरांना म्हटले तुम्ही पहिले वरच्या बाजूला जा मग मी येते . पण मला वरती दगडावरून चढणे खूपच अवघड होऊन बसले .आता डोळ्यातून धारा सुरू झाल्या .मिस्टर मला वरती येण्यासाठी सारखे हात देत होते .पण मनात आले मला हात देताना ते खाली आले तर ? मी वरती पाय ठेवला आणि माझा जरा जरी पाय चुकला तर ? तर मी डायरेक्ट खाली पडणार .थोडा वेळ थांबले .काय करावे समजत नव्हते .परत एक शेवटचा प्रयत्न .काय माहित कुठून माझ्या एवढे बळ आले .मी माझा एक पाय वरती टाकला व मिस्टरांनी माझा हात जोरात खेचला . कशीबशी मी वरती आले . थोडीशी मनातून घाबरलेली होते . थोडावेळ एका दगडावर विश्रांती घेऊन परत पुढची वाट चालू लागलो . आमच्यातील मागे राहिलेली मंडळी कसरत करत ,एकमेकांना मदत करत ,वाट काढत येत होती .शेवटी कमानीच्या ठिकाणी पोहोचलो . एक आनंदाचा सुस्कारा सोडला कारण एवढेच की आम्ही सारे सुखरूप ट्रेकिंग करून आलो .
या ठिकाणी लहान मुले वयोवृद्ध तरुण मंडळीही ट्रेकिंग साठी आली होती .या दरीच्या सुरुवातीला सावधानतेसाठी कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत .प्रथमोपचार ,पिण्याचे पाणी यांसारख्या साध्या गोष्टींचाही अभाव आहे . या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बंधन ,शासकीय आपत्कालीन व्यवस्था ,तपासणी चाचण्याही नाहीत .काही मुले सिगारेट ओढीत होते आणि सिगारेटच्या धुराने पोळ्यावरून मधमाशा उडाल्या तर काय अवस्था होईल हे न सांगणे बरे .आमच्यातील आम्ही काहीजण पडलो पण फार मोठी इजा कोणालाही झाली नाही हे आमचे नशीबच म्हणायचे .नाहीतर फॅक्चर वगैरे काही झाले असते तर त्या माणसास उचलून नेणे अवघडच होते . या ठिकाणी मोबाईल फोनच्या रेंज साठी पाच ते दहा किलोमीटर अंतरावर जावे लागते .
'सांधण दरी ' हा ट्रेक आमच्यासारख्या सराव न करता डायरेक्ट जाणाऱ्या 50 ते 55 वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी अवघड नव्हे तर खूपच रिस्की होता . 'सांधण दरी ' सर करणे वाटते तितके सोपे नाही .केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर साहस करू नये हे मात्र नक्कीच .अगदी दर पावसाळ्याला त्या दरीतील भौगोलिक रचना बदलत असते असे समजले .पावसाळ्यामध्ये वरून दगडधोंडेही खाली पडत असतात .सगळ्यांनी एकमेकांना सांभाळत प्रोत्साहन देत हा अवघड प्रवास पार पाडला .आयुष्यात खूप मोठे साहस केल्याचे एक प्रकारचे समाधान वाटले . नंतर आम्ही परत आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी दुपारी तीन वाजता पोहोचलो . फ्रेश झालो , जेवलो .विश्रांती घेण्यासाठी मी आडवी झाले . पण काय झोप येते ?सारखे दरीतून दगडांवरून चढतोय , चालतोय ,उतरतोय असेच भास होत होते . संध्याकाळी 'सह्याद्रीचा कोकणकडा ' येथे सूर्यास्त बघण्यासाठी गेलो . सूर्यास्ताचे निसर्गदृश अतिशय मोहक होते.परत आलो .रात्री ,पत्ते गाण्यांच्या भेंड्या खेळलो. जेवून झोपलो . त्या रात्रीही मला नीट झोप लागली नाही .सकाळी उठून महाडला निघण्यासाठी नाश्ता करून निघालो . वाटेत असणाऱ्या 'आय लव वाईल्ड लाईफ ' या पॉईंटवर अतिशय सुंदर ,मनाला भुरळ पडेल असे निसर्गदृश्य पाहण्यासाठी थांबलो .परत लहान होऊन रस्त्यावर बसून ,तसेच स्लो मोशन मध्ये चालताना फोटोसेशन केले .वाटेत नेकलेस वॉटर फॉल , न्हानी वॉटर फॉल यांसारखे वॉटर फॉल लागले. न्हानी वॉटर फॉल जेथून पडतो त्या ठिकाण पर्यंत आम्ही जाऊन आलो.
पाऊस नसल्यामुळे फक्त कोरडेच दर्शन घेतले.या ठिकाणी जाण्यासाठी झुलता ब्रिज व वरती जाण्यासाठी उत्कृष्ट रेलिगची सोय करण्यात आली आहे .पावसाळ्यात सुद्धा कोणीही वाहून जाऊ नये याची खबरदारी घेण्यात आली आहे .पुढे रतनवाडी येथील 'अमृतेश्वर मंदिर ' बघण्यासाठी गेलो .समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा आहे .प्रवरा नदीच्या उगमस्थळीचे रतनगडच्या पायथ्याशी असलेले हे मंदिर अप्रतिम शिल्पकलेचा जणू काही नमुनाच आहे . हे मंदिर इ .स . अकराव्या शतकातील चालुक्य शैलीतील आहे .अमृतेश्वराच्या रहाळात देखणी कोरीव श्रीमंती लाभलेली ' पुष्करणी ' आहे .याला स्थानिक लोक 'विष्णूतीर्थ ' असे म्हणतात मंदिरच्या समोर करप नावाची जंगली झाडे आहेत .त्यांना जांभळ्या रंगाची फुले येतात . या ठिकाणी 'काजवा फेस्टिवल ' बद्दलची माहिती आम्हास मिळाली . या ठिकाणी पर्यटकांची राहण्याची ही सोय होते .
अतिशय सुंदर कोरीव काम असलेले मंदिर पाहून साऱ्या आठवणी मनात साठवून पुढचा प्रवास चालू केला व रात्री जवळजवळ दहा वाजता सुखरूप घरी पोहोचलो .
