एक प्रवास असा ही...
एक प्रवास असा ही...
सोंडेघर डॅम ,साईबाबा मंदिर खेर्डी(कादवली), हर्णै _खेम, कड्यावरचा गणपती ( आंजर्ले )
माहेरवाशिणींची माहेरच्या गावातील ट्रीप
कितीतरी दिवस आमच्या दापोली भिशीचा ग्रुप ट्रीपला जायचे ट्रीपला जायचे प्रत्येक भिशीच्यावेळी ठरवत होता .पण ट्रीपला जायचा काही योग जमून येत नव्हता . अचानक परवा 20 जुलै या तारखेला एका मैत्रिणीने व्हाट्सअपला मेसेज टाकला की आपण दापोली जवळील हर्णे - खेम या ठिकाणी पावसाळी ट्रीपला जायचे का ? मग काय होय नाही होय नाही करताना नऊ जणी तयार झालो आणि 22 जुलैला आम्ही सकाळी साडेदहा वाजता महाड वरून सगळ्याजणी निघालो .जाताना दुतर्फा हिरवीगार झाडी , लुसलुशीत पोपटी गवत ,वेगवेगळ्या पक्ष्यांचे सुंदर आवाज घेत जात होतो .एवढा सारा निसर्ग पाहून आता फोटोसेशन तर नक्कीच झालेच पाहिजे . मग मैत्रिणी ईथे उतरूया तिथे उतरूया खूप चांगला स्पॉट आहे असे म्हणत होत्या .शेवटी रेवताळा पुलाच्या आधी फोटोसेशन झालेच.तीन _ फोटो काढून झाल्यावर परत गाडीत बसलो . गाण्याच्या भेंड्यांची चांगलीच रंगत रंगली होती . सोंडेकर डॅम बद्दल मी ऐकून होते . मग मैत्रिणींना म्हटले जाऊया का सोंडेघरला . सगळ्या तयार झाल्या . सोंडेंघर गावापासून दोन-तीन किलोमीटरच्या अंतरावर हा डॅम आहे .तोही अगदी अरुंद भागात जेमतेम एकच गाडी जाईल एवढाच रस्ता . वाटेत एक झाड पडले होते .आता वाटले आम्हाला जाता येणार नाही . पण पाच मिनिटातच आम्हाला आमच्या गाडीला जाता येईल एवढी वाट करून दिली गेली . पुढे पुढे जात असताना असे वाटत होतो आम्ही रस्ता चुकतो की काय .हळूहळू पुढे गेलो .आता थोडीशी पाण्याची जागा दिसू लागली म्हणजे नक्कीच जवळपास डॅम असण्याची शक्यता वाटू लागली .रस्ता फार एकांताचा .एखादाच माणूस रस्त्यात दिसत होता .त्यामुळे जायचे की नाही, का परत जायचे असा विचार चालू झाला .तितक्यात एक माणूस आला . त्यांनी सांगितले गाडी गेट पर्यंत जाते व तिथून तुम्ही पुढे चालत जाऊ शकता .चला सर्वांना हायसे वाटले .मग काय गेटच्या इथे गेलो .पण गेटला कुलूप दिसले .मग कट्ट्यावरून खाली उतरायचे ठरवले .पण मी गेट जवळ गेले तर एक कुलूप उघडेच होते व दुसरे लावलेले होते .सहज म्हणून मी बघितले तर कडी पटकन उघडली गेली .सगळ्याजणी हर्षित झाल्या . आम्ही डॅम वर गेलो .काय ते डोंगर , हिरवीगार झाडे , पाण्याने भरलेला डॅम, काय म्हणून निसर्गाचे वर्णन करू ?डोळ्यांचे पुरते पारणेच फिटून गेले.मग परत एकदा फोटोसेशन सुरू .सिंगल फोटो , ग्रुप फोटो विचारून सोयच नाही. रस्त्यामध्ये खूप मोठमोठे असे सुरवंट होते .त्यांचेही फोटो काढले . पुढे खेर्डी -कादिवली येथील साईबाबा मंदिरात गेलो .तशा यापूर्वीही आम्ही सगळ्या माहेरवाशिणी सात वर्षांपूर्वी या देवळात गेलो होतो .पण आता कितीतरी बदल झाला आहे . मंदिरात एकदम छान थंडावा आहे . निसर्गही खूप छान आहे .तेथील मूर्ती सुद्धा बघण्यासारखे आहेत . नवग्रहांचे सुद्धा मंदिर आहे .पावसाळा असल्यामुळे काही भाग गुळगुळीत झाल्यामुळे आम्हाला खालपर्यंत जाता आले नाही . हा परिसर अतिशय निसर्गरम्य व शांत असा आहे . किती वेळा गेलो तरी परत परत जावेसे वाटते या मंदिरात .
आता पुढे पोटापाण्याची काहीतरी सोय करायला हवी होती . म्हणून आम्ही हॉटेल श्रेयस (दापोली ) मध्ये पेटपूजा करण्यासाठी निघालो . एका मैत्रिणीकडे त्या हॉटेलचा फोन नंबर होताच .लगेच आमचे दहा जणांचे बुकिंग केले .हॉटेलमध्ये आलो.ज्वारीची भाकरी ,वांग्याचे भरीत ,डाळिंबाची उसळ , आळुच्या वड्या ,मिरची ठेचा ,लोणचे , सोलकढी ' जीरा राईस आणि गरमागरम उकडीचे मोदक या साऱ्याचा आस्वाद हॉटेलमध्ये घेतला अतिशय स्वादिष्ट असे जेवण होते आणि बरं का हे सारे पदार्थ अगदी आम्हाला गरमागरम मिळाले (सोलकढी सोडून हां. )आता पोट गच्च भरले होते.थोड्यावेळाने ड्रायव्हर सांगायला आला की आता आपल्याला खेम डॅम वर जाता येणार नाही .तिथे कोणाला जाऊन देत नाहीत .थोडे वाईट वाटले होते सर्वांना. मग दुसरे स्पॉट ठरवत होतो .कुठल्यातरी धबधब्यावर जायच म्हणजे जायचंच .आपल्याला डॅमवर जाऊन नाही दिले तर परत यायचं आणि दुसऱ्या धबधब्यावर जायचं.परत एकदा मूड आला
22 जुलैला माझ्या बहिणीचा मेघाचा वाढदिवस असतो .मग सगळ्या मैत्रिणींनी तिला सरप्राईज द्यायचे ठरवले .मी आणि माझी मैत्रीण दापोलीतून केक घेऊन आलो .नंतर साऱ्या मैत्रिणी गाडीत बसलो आणि खेम डॅमकडे रवाना झालो .दापोलीतून आंजर्ल्याकडे जाताना अनेक बदल झालेले आहेत .पण आमच्याबरोबर असलेल्या एका मैत्रिणीने ड्रायव्हरला कसे कसे जायचे हे सांगितले .त्यामुळे चुकायला कमी झाले .शेवटी पोहोचलो एकदा डॅमच्या इथे.समोरून येणारे पाणी पाहून मन हर्षित झाले ,उत्साह वाढला . कधी एकदा पाण्यात जातोय आणि धमाल करतोय असे झाले .आमच्या बरोबर असणारी एक मैत्रीण तिला पाण्याची भीती वाटत होती पण आम्ही तिला आमच्याबरोबर पाण्यामध्ये नेलेच .डॅम वरून येणाऱ्या पाण्यामध्ये मनमुराद चिंब झालो .शिवाय दुसरा एक ग्रुप आला होता त्यांनी डेक लावला होता . मग काय गाण्याच्या तालावर आम्हालाही नाचावेसे वाटले तोही आनंद लुटला .
फोटोसेशनचे सारे काम आमच्या ड्रायव्हरने केले . अतिशय मनमिळावू ,चांगल्या स्वभावाचा होता तो.प्रत्येकाला हवे तसे फोटो काढून देत होता .त्याची कोणतीही कटकट नव्हती. खेमदेवाचे दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो .आता कपडे चेंज करण्यासाठी जागा नव्हती .मग आम्हाला त्या ठिकाणी असणाऱ्या एका माणसाने वरती काही रूम्स रिकाम्या होत्या त्या ठिकाणी जाण्यास सुचविले . आम्ही कपडे चेंज केले .त्या ठिकाणी अनेक तुळशीची रोपे व कडीपत्त्याची रोपे होती . ती आम्ही मैत्रिणींनी उपटून घेतली घेतली व आंजर्ल्याच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी निघालो .गणपतीचे दर्शन घेतले .अथर्वशीर्ष म्हटले . याही ठिकाणी आता पूर्वीपेक्षा काही बदल झाले आहेत . नंतर जिथे गणपतीचा पाय आहे त्या ठिकाणी गेलो . दर्शन घेतले .त्या ठिकाणी समोरूनच सुवर्णदुर्ग किल्ल्याचे व अथांग पसरलेल्या समुद्राचे मनमोहक असे दर्शन झाल .येथे ही आमचे फोटो सेशन झाले . मग आम्ही आमच्या बर्थडे गर्ल चा वाढदिवस साजरा करण्यासाठी झाडाच्या खाली एका कट्ट्यावर बसलो .तेथेच भेळ बनवली .कोणी कोणी काय काय पदार्थ आणले होते ते खाल्ले .केक कापला .अशाप्रकारे निसर्गाच्या सानिध्यात मेघाचा लक्षात राहण्याजोगा वाढदिवस आमच्या साऱ्या माहेरवाशी मैत्रिणींनी साजरा केला .जवळजवळ साडेसहा नंतर आम्ही परत महाडला येण्यासाठी निघालो .आता वाटेत कोठेही न थांबता थेट महाडला साडेदहा वाजता पोहचलो . त्यादरम्यान गेल्यावर्षी 22 जुलैला आलेल्या पुराच्या आठवणींना परत एकदा उजाळा देण्यात आला.परत त्या आठवणींनी अंगावर काटा उभा राहिला होता.
