एक नाताळातील गंमत
एक नाताळातील गंमत
खूप वर्षांपूर्वीची गोष्ट. गुलाबी थंडी पडली होती आणि डिसेंबर महिना चालू होता.
तेव्हा दीक्षा अवघ्या दहा वर्षांची होती.नेहमीप्रमाणे ती शाळेला गेली होती. मधल्या सुट्टीमध्ये वर्गातल्या मित्र-मैत्रिणींबरोबर गप्पा मारताना सांताच्या गप्पांना उत आला. नेमकं पुढच्या आठवड्यात नाताळ असल्यामुळे या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या. वैदेही सांगत होती, पायाच्या मोजामध्ये आपल्याला हव्या त्या गोष्टींची यादी २४ डिसेंबरला रात्री ठेवली की सकाळी उठल्यावर आपल्याला त्या गोष्टी मिळतात. हे ऐकल्यानंतर सगळ्यांच्या अंगात एक वेगळाच उत्साह संचारला. कागद आणि पेन घेऊन सगळ्यांनी आपापली यादी तयार केली. दीक्षा ने सुद्धा न चुकता तिची भली मोठी यादी रात्री मोजामध्ये घालून टेबलावर ठेवली.
सकाळी उठल्यानंतर डोळे पुसत ती उत्साहाने बघायला गेली की तिच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत का ते. अहो आश्चर्यम !! तिचे आवडते चॉकलेट्स होते.
पण यादी मधले फारसे काही नसले तरी हे चॉकलेट्स बघून तिच्या चेहऱ्यावर एक हास्यछटा उमटलीच. आदल्याच दिवशी तिने आईला हे आणताना बघितलेले होते. त्यामुळे हुशार दीक्षाने घडलेला प्रकार बरोबर जाणला.
