क्रांतिकारी ज्योत
क्रांतिकारी ज्योत
'मेरा रंग दे बसंती चोला' हे गाणं गुणगुणत, हसत आणि अभिमानाने फाशीवर चढणाऱ्या क्रांतिकारी युवकांची कथा आपल्याला सर्वांनाच माहित आहे. अवघ्या काहीच वर्षांच्या आयुष्यात भगतसिंग, राजगुरू, सुखदेव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेला पराक्रम आपल्याला देशाच्या इतिहासातल्या एका अमर गाथेकडे घेऊन जातो.स्वातंत्र्य काळापर्यंत आपल्याला अनेक वीर लाभले याचे कारण एकच अन्यायाविरुद्ध असलेली चीड आणि त्यातून घडलेली क्रांती.
भगतसिंगबद्दल सांगायचे झाले तर, एवढ्या लहान वयात देशासाठी कोणतीही जबाबदारी घ्यायची तयारी, सुखसमृद्धी असलेल्या घरातले असूनही ऐशो-आरामाचा केलेला त्याग, आणि फक्त देशासाठीच लढण्याचा निर्धार, हे उद्देश घेऊन निघालेला तरुण खरंच असामान्य होता. अशा या असामान्य व्यक्तिमत्त्वाने, हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशनमध्ये सामील झाल्यानंतर चंद्रशेखर आझाद, रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, सचिंद्रनाथ संन्याल, राजेंद्र आणि रोशन सिंग यांच्या समवेत देशातील घटनांना वेगळे वळण दिले. काहीच दिवसांत या संघाचे रूपांतर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये केले. भारतातील तरुणांना स्वातंत्र्यलढ्यात सामील करून घेण्यासाठी नवजवान सभा स्थापन केल्या.
साँडर्सची हत्या आणि संसदेत केलेला बॉम्बस्फोट यामुळे संघातील काही तरुणांना तुरुंगवास भोगावा लागला. मात्र, यामुळे देशातील लोकांना जागृत करण्याची संधी या क्रांतिकारकांनी साधली. त्यांनी स्वतःहून आत्मसमर्पण केले आणि देशवासीयांना आपल्या उद्दिष्टांबद्दल जागरूक केले.
"अब भी जिसका खून नही खोला वो खून नही पानी है, जो देश के काम ना आए वो बेकार जवानी है."
जणू हीच त्यांची जीवनधारा होती. देशासाठी आत्मसमर्पण करायचे ध्येय लहानपणीच ठरविले असल्यामुळे, ते पूर्ण करण्याचा ध्यास या थोर वीरांकडे होता.
स्वातंत्र्यदिनानिमित्त हमखास टीव्हीवर देशभक्तीपर चित्रपट दाखवले जातात, त्यातला माझा आवडता चित्रपट म्हणजे 'द लिजेंड ऑफ भगतसिंग'. राजकुमार संतोषी यांचे सादरीकरण आणि ए. आर. रहमान यांचे संगीत या गोष्टींनी चित्रपटाला चार चांद लावले आहेत. या चित्रपटाने भगतसिंग यांच्या जीवनातील अनेक कंगोरे उलगडून दाखवले आहेत. चित्रपटातील गाण्यांमधील ओळी मनाला भिडणाऱ्या आहेत.
"दिल से निकलेगी न मर कर भी वतन की उल्फ़त
मेरी मिट्टी से भी ख़ुशबू-ए-वफ़ा आएगी!!"
या ओळींचा अर्थ असा की, प्राण गेल्यानंतरही देशावरचे प्रेम काही आमचे कमी होणार नाही. माझ्या मातीमध्ये जी निष्ठा आहे, त्याचा सुगंध कायम दरवळत राहील.या चित्रपटाने आणि त्यातील गाण्यांनी मला नेहमीच देशभक्तीचा अभिमान वाटायला लावला आहे.
भगतसिंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बलिदानाचा विचार करून आपल्यालाही स्वतःच्या जीवनात देशासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते. स्वातंत्र्याचे हे अमूल्य वरदान आपल्याला मिळवून देण्यासाठी कित्येक वीरांनी आपले जीवन समर्पित केले, त्यांचे स्मरण करणे हे आपले कर्तव्य आहे.
इन्कलाब जिंदाबाद!!
