एक व्हिएतनामी सफर
एक व्हिएतनामी सफर
फेब्रुवारी 2020 मध्ये आम्ही व्हिएतनामची सफर केली. व्हिएतनामला जायचं उद्देश असा की एक तर जवळचा देश आणि खूप कमी लोकांना माहीत असलेला. इंटरनेटवर सर्च केले असता बरेच छान फोटोज दिसले म्हणलं चला तर मग जाऊन येऊया. हा देश प्रामुख्याने प्रवासयात्रा या व्यवसायावर चालणारा आहे . तिथली लोकं खूपच छान आदरातिथ्य करणारी आहेत.
आम्हाला हॅनोईच्या हॉटेलमधला एक प्रसंग आठवतो. आम्ही जेव्हा तिथे पोहोचलो त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्हाला 'सापा' या गावी जाण्यासाठी निघायचे होते आणि ती बस सकाळी सातची होती. आम्ही हॉटेल मॅनेजरला नाश्ताची वेळ विचारली तर त्याने सात ते दहा अशी सांगितली. मग आम्ही ठरवलं की बस सकाळी जिथे थांबेल तिथे आपण नाश्ता करू. दुसऱ्या दिवशी सकाळी आवरून आम्ही हॉटेलमधून निघालो तेव्हा आम्हाला हॉटेलच्या मॅनेजरने नाश्त्याचे पार्सल आणून दिले.आम्हाला त्यांना हे देताना बघून खूप आश्चर्य वाटले आणि एक सुखद धक्का बसला. कारण एवढ्या सकाळी सुद्धा त्यांनी आमचा विचार केला आणि आम्हाला पार्सल दिले.त्यात काळजी आणि आपुलकी दिसली.
नंतर आम्ही चालत एका बस स्टॉप वर गेलो तिकडे सापा ठिकाणी जायची बस आली. आम्हाला बसमध्ये चढायच्या आधी एक कॅरीबॅग देण्यात आली. त्यामध्ये चप्पल आणि बूट काढायचे होते आणि आपल्या सोबत बाजूला ठेवायचे होते. हे का बरं तर बस घाण होऊ नये असा उद्देश. तिकडे सतत पाऊस पडत असल्यामुळे चप्पल घाण होतं. त्यामुळे स्वच्छता राखण्यासाठी पाऊल उचलले असावे. बस मध्ये वाय-फाय ची सुविधा ही होती प्रवाशांचा वेळ चांगला जावा अशी अपेक्षा. ही पण एक काळजीच झाली.
प्रगत देशांमध्ये बऱ्याच सुविधा असतील पण मला इथे हा अनुभव नमूद करावासा वाटला.
