कुलधरा
कुलधरा
गेल्या फेब्रुवारी महिन्यात राजस्थान दौरा केला. Sam sand dunes मध्ये वाळवंटाची मजा घेऊन स्वारी परत जेसलमेर कडे वळवली. पण विमानाला अजून वेळ असल्यामुळे अजून काही ठिकाणांना भेट देण्याचे ठरवले, त्यामधील एक ठिकाण म्हणजे 'कुलधरा'. जेसलमेर पासून जवळपास 18 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावात आत जाण्यासाठी एक प्रवेशद्वार आहे. ते दिवसा प्रवाशांसाठी खुले केले जाते तर रात्री बंद ठेवले जाते. ते का बरं चला तर मग जाणून घेऊया...
कुलधरा गावाची ख्याती ही एक झपाटलेलं तसेच शापित गाव म्हणून आहे. कुलधराच्या कथा आसपासच्या गावात बरेच प्रसिद्ध आहेत. अस म्हटलं जातं काही वर्षांपूर्वी पालीवाल समाजाची वस्ती येथे राहत होती . गावाच्या सरपंचाची मुलगी खूप सुंदर होती आणि एका मंत्रीचा जीव तिच्यावर होता, त्याने लग्नासाठी मागणीही केली होती पण तिच्या घरच्यांना आणि इतर गावकऱ्यांना सुद्धा हे मान्य नव्हते आणि त्याचा बदला म्हणून त्याने गावकऱ्यांना त्रास देणे सुरू केले. कर वाढवला आणि इतर छळ सुद्धा सुरू केले. शेवटी कंटाळून हजारो गावकरी एका रात्रीत हे गाव सोडून निघून गेले आणि जाता जाता त्यांनी शाप दिला की या गावात परत कोणीही आनंदाने राहू शकणार नाही , परिणामी दीडशे वर्षापासून तिथे वस्ती नाहीये. आसपासचे लोक म्हणतात की रात्री चित्र विचित्र आवाज ऐकू येतात आणि इकडे कोणी राहायला आले तर बाहेर परत जात नाहीत.
आम्ही या गावाला भेट दिली तेव्हा आम्हाला पडक्या भिंती दिसल्या. एक मंदिर होते आणि मंदिराच्या बाहेर चौकीदार होता. आमच्यासारखी भेट देणारी आणखी दोन माणसं होती बाकी सर्वत्र शांतता होती. तिकडच्या भिंती शेणाने सारवलेल्या होत्या आणि अशाप्रकारे बांधलेल्या होत्या की उन्हाळ्यातही तिकडे थंडावा टिकून राहील. वाळवंटातला प्रदेश असूनही तिथे अशा बांधणीमुळे घरात गारवा राहायचा. असे हे गाव कधी ऐकिवात नव्हते आणि ध्यानात मनात नसताना या गावची भेट झाली. हे गाव बघायला मिळाले, या गावात सगळे येतीलच असं नाही म्हणून या गावाची कथा सांगण्याचा एक प्रयत्न होता.
