दोन पाखरं (भाग २)
दोन पाखरं (भाग २)


दिवसांमागून दिवस चालले होते. सर्वकाही छान चालू होते. आयुष्य अधिकच सुंदर वाटू लागले होते. एका ऐवजी आता दिवसातून तीन चार फोन आरामात होऊ लागले. पण वेळेची बंधने पळून एकमेकांच्या कामांत मुळीच अडथळा येणार नाही, याची जाणीव ठेवून. स्वतःपेक्षा समोरच्याच्या कामाची जास्त काळजी असे; पण दिवसाच्या शेवटी बोलण्याची ती आतुरता वेगळीच असे. दिवसभरात झालेल्या सर्व गोष्टी एकमेकांना सांगायच्या असत, ऐकूनही घ्यायच्या असत. ती वेळ म्हणजे संपूर्ण दिवसभरातला पर्वणीचा क्षण असे.
अगदी निराळे नाते होते ते. मैत्रीच्याही फार पलीकडे. प्रेम वगैरे नाही अगदीच. तसं प्रेमही म्हणता येईल, पण जगाच्या व्याख्येतले नव्हे. त्यामुळे आकर्षण नाही. एकमेकांकडून अपेक्षा नाहीत कि कसली बंधने नाहीत, निखळ होतं सर्वकाही... दोघांनाही समाजसेवेची विशेष आवड. एक शाळा काढायची इचछा होती आधीपासूनच दोघांना. मग काय आता दोन सोडून एकाच शाळा निघणार, हे वेगळ्याने सांगायला नको. त्या शाळेची प्रत्येक गोष्ट सोबत ठरवली जाई. शाळेच्या विटा भिंतींपासून तर अभ्यासक्रम बनवण्यापर्यंतच्या सर्व गोष्टींचे नियोजन होत असे. सर्वकाही ठरवून झाले होते. आयुष्य सोबत काढायचे नव्हते, पण एकमेकांना आयुष्यभर सोबत करायची होती. सर्व स्वप्ने सोबत साकारायची होती.
पण या सगळ्या स्वप्ननगरीत तर जगाचा विसरच पडला होता !! जे काही चालले होते, ते जगाच्या नियमांच्या बाहेरचे होते. तासंतास फोनवर बोलताना आसपास असणाऱ्या प्रश्नार्थक नजर साहजिकच होत्या. कोणाशी बोलता, काय बोलता, इतक्या वेळ कसा बोलता ?? एक ना एक हजारो प्रश्न. खरे पाहता त्यांचंही बरोबरच होतं. दोघेही वस्तुस्थिती सोडूनच वागत होते. तिच्या स्वप्नांचा राजकुमार तिला ह्या जन्मात तरी मिळणार नव्हता; पण त्याची स्वप्नपरी त्याच्या आयुष्यात केव्हाच आलेली होती. तिच्यासोबत अनेक मखमली आठवणी साठवलेल्या होत्या. भविष्याची स्वप्ने रंगवली होती. जीवापाड प्रेमही होते (जगाच्या व्याख्येतले !!!). तिचा तर विसर पडून चालणार नव्हते. गोष्टी कळत होत्या पण वळत नव्हत्या. स्वप्नपरीला जेव्हा ह्या सर्वाविषयी कळले तेव्हा तिचे रागावणेही साहजिकच होते. त्याला धारेवर धरून १०० प्रश्न विचारानेही गृहीत होते. पण उत्तर देताना मात्र त्याने आपल्या नव्या 'मैत्रिणीची' बाजू घेणे अपेक्षित नव्हते. भांडण सुरु झाले. साहजिकच होते ते....
पण इकडे मात्र मनाची दुविधा होती. समोर जिच्यासोबत आयुष्य काढायच ती उभी होती, अन दुसरीकडे मैत्रीचं नातंही तितकंच जीवापाड होतं. सवयीप्रमाणे मैत्रिणीला फोन केला आणि झाल्या गोष्टी सांगितल्या. एक ना एक दिवस हे होणार होते हे तिलाही ठाऊकच होते; पण इतक्या लवकर होईल याची कल्पना नव्हती. जग समजूतदार असल्याचा तिचा गोड़ गैरसमज दूर झाला होता. ती नेहमीच जगाला दूषणं देत. पण ह्या गोष्टीला तो नेहमी विरोध करे. आता आपल्या मतावर ठाम राहण्यासाठी तिला एक कारण भेटले होते. ह्या सर्वात तिला जास्त दोषी ठरवण्यात आले होते. त्याची सर्व परिस्थिती ऐकली आणि यापुढे आपण बोलणार नसल्याचे त्याला सांगून मोकळीही झाली. हे सांगताना हृदयावर दगड होता, डोळे अश्रूंनी दाटले होते, मन अगदी गहिवरून आले होते; पण ह्या सगळ्याला आता मात्र मोल नव्हते. तिने मन घट्ट केले होते (त्याला दाखवण्यापुरते ). तो निशब्द होता. त्याला भरपूर समजावले. परिस्थितीची जाणीव करून दिली. तिच्या निर्णयाप्रमाणे वागण्याची कबुली घेतली आणि फोन ठेवूनही दिला.
आता अश्रूंना मोकळी वाट करायला जागा होती. अंग शहारून गेले होते. त्याच्याशी न बोलण्याचा विचारही सहन होत नव्हता. फोनवर त्याला ठणकावून मोकळी झाली होती; पण स्वतःला सावरणे अजून बाकी होते. संध्याकाळ झाली . रात्र झाली. लक्ष फक्त फोनकडे होते. त्याचा फोन नक्की येणार, हे मन सांगत होते. मनाचा कौल खरा ठरला आणि फोन वाजला. चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. सोबत एक समाधानही होते. पण बोलायला सुरवात केली अन शब्द जड जात होते. अचानक परकेपणा जाणवत होता. अश्रू अजूनही अव्याहतपणे चालूच होते. तिने बोलणं उरकते घेतले. मनातून इच्छा प्रचंड होती.: पण दुपारपासून रात्री पर्यंतची ती वेळ मनावर खूप काही बिंबवून गेली होती..... आपण बोलतोय त्या व्यक्तीवर दुसऱ्याच कोणाचा हक्क असल्याचा जाणवलं. काहीतरी चुकतंय असं वाटू लागलं. आयुष्यात पहिल्यांदा 'हक्काची' व्यक्ती असण्याचं मोल कळलं होतं. जगाच्या बाजारात ह्या शब्दांपल्ल्याडच्या नात्याला क्षणभर तरी हार मानावी लागली होती.....