Sarita Sawant Bhosale

Tragedy

3.8  

Sarita Sawant Bhosale

Tragedy

देवदासी नको माणूस म्हणून जगू द्या

देवदासी नको माणूस म्हणून जगू द्या

4 mins
453


   दुसऱ्या दिवशी जागतिक महिलादिन म्हणून संस्थेत "महिला सक्षमीकरण" असं शीर्षक ठरवून एक कार्यक्रम आयोजित केला. प्रमुख पाहुण्या म्हणून महिला जिल्हाधिकारींना आमंत्रण देऊन झालं होतं...बाकी भाषणाची तयारी,मुलींकडून कविता वाचनाची तयारी करून घेतली. स्त्री मुक्ती,स्त्री पुरुष समानता अशा विषयांवर घोषणा दर्शवणारे फलक संस्थेत ठिकठिकाणी लावून रात्री दहाला घरी पोहचले. आमच्या घरी नेहमीच स्त्री पुरुष समानतेचा जागर होत असतो त्यामुळे मी येण्याआधीच नवऱ्याने मुलाला हाताशी घेऊन बरीच कामं उरकली होती. मी ही जेवून सकाळी लवकर उठायचं म्हणून झोपून गेले. पहाटे चारलाच फोन खणाणला. इतक्या पहाटेचा गजर का लावलास म्हणून नवऱ्यालाच ऐकवत फोन हातात घेतला तर तो गजर नसून शेखर (संस्थेतला सहकारी आणि चांगला मित्र) चा फोन येत होता. "तू आताच्या आता संस्थेत ये..एका मुलीची केस आहे..आल्यावर बोलू तू लवकर ये". मी काही बोलायच्या आत शेखरने एवढं बोलून फोन कट केला होता. तडक उठून तोंडावर पाणी मारून तयारी करून तातडीने संस्थेत पोहचले.


    एक मुलगी निपचित बेशुद्ध अवस्थेत बेड वर पडली होती. डोक्यावर मार लागलेला...शरीरावरही बऱ्याच जखमा दिसत होत्या. शेखरने डॉक्टरांना बोलवून तिच्यावर उपचार करून सलाईन लावली होती. मध्ये मध्ये ती कण्हतही होती..अचानक नको नको अशी किंचाळू लागली..डोळे मात्र उघडत नव्हती...थोड्या वेळाने शांत होऊन पुन्हा निपचित पडली. शेखर,मी आणि डॉक्टर तिथून बाहेर आलो. डॉक्टरांनी सांगितलं तिच्यावर बलात्कार झालाय..त्या मानसिक धक्क्याने ती अशी ओरडत असावी..काही वेळाने शुद्धीवर येईल पण तिला खुप जपावं लागेल. 


  आजपर्यंत कौटुंबिक हिंसा झालेल्या,अत्याचार झालेल्या,मुलगी आहे म्हणून टाकून दिलेल्या, मुल होत नाही म्हणून घराबाहेर काढलेल्या स्त्रीयांना संस्थेत सक्षम होताना बघत होते. आज एक बलात्कारपीडित मुलगी माझ्या समोर होती. विचारात गुंग असतानाच आतून नको..नको..मला वाचवा असा आवाज ऐकू आला. मी आणि शेखर धावत आत गेलो. ती मुलगी घाबरून ओरडत होती. तिला शांत करण्यासाठी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला तशी ती हळूहळू शांत झाली. तिला प्रेमाने कुशीत घेतलं तशी ती ओक्साबोक्शी रडू लागली. जणू प्रेमळ आपुलकीच्या स्पर्शासाठी ती खूप दिवस आसुसली होती. काही वेळाने तिला खायला वगैरे देऊन बोलतं केलं. इथे ती पूर्ण सुरक्षित आहे याची खात्री पटवून दिली तेव्हा तिने तिच्याबद्दल सांगायला सुरुवात केली.


  मंजिरी नाव तिचं. ती बाजूच्याच गावात आईसोबत राहत होती. तिची आई देवदासी असल्या कारणाने प्रथेप्रमाणे हिलाही वयात आल्यावर देवासोबत लग्न लावून देवदासी बनवलं गेलं. देवावर अपार श्रद्धा असल्यामुळे आपलं लग्न चक्क देवाशीच होतंय हे पाहून तिला खूप आनंद झाला. देवदासी झाल्यावर घरोघरी पोट भरण्यासाठी अन्न मागायला जाऊ लागली. येता जाता लोक तिची छेड काढायचे,पदर ओढायचे, नको नको ते बोलायचे. त्या दिवसानंतर प्रत्येक रात्री नवीन माणूस येऊन तिच्या शरीराचे लचके तोडून निघून जायचा. 

   देवदासी म्हणजे देवाला सोडलेली आणि सगळ्या गावाचा तिच्यावर हक्क असणारी मुलगी हे आता कुठे तिला कळायला लागलं होतं. आईला मुलीचा आधार आता पोट भरण्यासाठी झाला होता त्यामुळे आईला सांगूनही मुलीची दया येत नव्हती उलट हीच प्रथा आहे आणि नाही पाळली तर देव आपल्यावर कोपेल असंच सांगायची. मंजिरी रोजच्या शोषणाने आणि लोकांच्या हीन वागणुकीने थकली होती. देवाला रोज म्हणायची की द्रौपदीचे वस्त्रहरण होताना कृष्ण तिचा देव बनून वाचवायला आला..आज तुझ्याच नावाने मला वाहिलंय..रोज माझं वस्त्रहरण होतंय पण तू का येत नाहीस??? त्या रात्रीही मंजिरी मंदिरात अश्रू गाळत बसलेली असताना चारजण मद्यधुंद अवस्थेत तिथे आले. त्यांची नजर मंजिरीवर पडताच मंजिरी तिथून जीव वाचवण्यासाठी धावू लागली पण मंजिरी त्या जनावरांच्या तावडीत सापडलीच. बाजूच्या एका जंगलात नेऊन त्या चारही नराधमांनी मंजिरीवर जोरजबरदस्ती करून स्वतःच्या शरीराची भूक शमवली आणि मंजिरीला रस्त्या कडेला फेकून दिली. शेखरला त्या रस्त्याने येताना मंजिरी विव्हळत पडलेली दिसली आणि तो इथे तिला घेऊन आला. मंजिरीची कहाणी ऐकून मन सुन्न झालं. 

    महिलाजागतिक दिनानिमित्ताने स्त्री मुक्ती, स्त्री पुरुष समानता , आज स्त्रीने आकाशालाही गवसणी घातली, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रगती केली वगैरे वगैरे जे मी बोलणार होते ते सगळंच खोटं वाटू लागलं. कसली प्रगती? कुठली समानता? इथे अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलींना अजूनही मुलगी म्हणून जगता येत नाही....तिला फक्त उपभोगाचं साधन समजून उपभोगल जातं आणि कचरा समजून फेकूनही दिलं जातं...काही मुलींना तर रस्त्यावर जिवंत जाळलं जातं अशा समाजात स्त्री पुरुष समानता तर फार लांबची गोष्ट राहिली पण आधी माणूस म्हणून जगण्याचा समान हक्क तरी तिला मिळायला हवा. शोभेची बाहुली असल्यासारखी वागणूक तिला एकविसाव्या शतकात मिळते ही तर अधोगतीकडे जाणारी लक्षणे आहेत.

दिवसाढवळ्या मुलीची छेड काढली जाते,तिच्यावर ऍसिड फेकलं जातं, जिवंत जाळलंही जातं... मुलीचे आई वडील न्याय मागण्यासाठी वर्षोनुवर्षे 

कोर्टाच्या पायऱ्या चढण्यात चपला झिजवतात.. काहींचे शेवटचे क्षणही जवळ येतात पण न्याय मात्र तारखांमध्येच अडकून पडतो. अशा वेळी न्यायदेवता खरंच आंधळी आहे का असं वाटतं.

   इथे सामान्य मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची ही परवड आहे तर मंजिरीसारख्या अंधश्रद्धेत अडकलेल्या मुलींना कसा न्याय मिळणार?? त्या न्याय मागायला तरी कोणाकडे जाणार?? देवाच्या नावाखाली अघोरी प्रथा चालवून एका मुलीचा जगण्याचा हक्कच हिरावून घेतला जातो आणि या वास्तवापासून अनभिज्ञ असलेलो आपण स्त्री पुरुष समानतेवरुन मात्रसभा रंगवत असतो.

     मंजिरीच्या रूपाने देवदासी प्रथेविरोधी आवाज उठवून अशा मुलींना माणूस म्हणून जगण्याचा हक्क देणे, बलात्कारपीडित मुलींना दोषी म्हणून नाही तर सन्मानाने समाजात जगण्याचा हक्क देणे हे नवीन ध्येय आज मला मिळाले. आज स्त्रीचे वस्त्रहरण होताना कृष्ण नाही येणार..इथे ही लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. अंधश्रद्धा, बलात्कार, एकतर्फी प्रेमातून खून,ऍसिड हल्ला यांसारख्या विळख्यातून जेव्हा स्त्रीची मुक्तता होईल, नवरात्रीत देवी म्हणून पूजणाऱ्या स्त्रीला कोणताही विरोध न करता मंदिरात प्रवेश मिळेल आणि ती समाजात फक्त एक माणूस म्हणून अभिमानाने जगेलं तेव्हाच समानता आहे असं म्हणता येईल. तेव्हाच स्त्रीला खरा न्याय मिळाला म्हणता येईल.

 

    मुलगा मुलगी भेद किंवा स्त्री पुरुष समानता याविरोधातच लढाई लढून समानता नाही मिळवता येणार. त्यासाठी अशा तळागाळातील मुलींना या प्रथेतून मुक्त करून माणूस म्हणून जगवलं पाहिजे तेव्हाचं महिलादिन खऱ्या अर्थाने साजरा होईल.

सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव. कथा लेखिकेच्या नावासहितच शेअर केली जावी अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

धन्यवाद!

फोटो साभार गुगल


                    


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy