देवाची काठी
देवाची काठी


' तुम्ही इतरांबरोबर कसे वागता , तेच कर्म फिरून तुमच्याकडे येत असतं ' .
प्रसंग 10 वर्षांपूर्वीचा आहे .दहावीत होतो.चिपळूणला आमच्या जुन्या घरासमोर एक कुटुंब रहात होतं . बायको आणि नवरा दोघेचं होते . बायको लोकांना गोधड्या , पांघरूण वगैरे शिवून द्यायची . नवऱ्याचा 'लाल -काला ' करायचा बिझनेस होता .
लाल - काला म्हणजे शफल गॅम्बलिंग . तीनपैकी एक चित्र लाल . शफल झाल्यावर लाल चित्र ओळखणाऱ्याला डबल मिळायचे . ही व्यक्ती रोज बेदम प्यायची .कधी धंदा झाला म्हणून तर कधी लॉस झाला म्हणून . राडे , आरडाओरडा ओघाओघाने आलंच . नुकतीच माझी दहावीची परीक्षा संपली होती .
त्यादिवशी आमच्या समोरच्या बिल्डिंगमधे एक अनोळखी माणूस झाडू घेऊन शिरला होता . अंगकाठी अतिशय किडकिडीत . चाळीशीचा असावा . दोन चार दिवस न जेवल्यामुळे अशक्तपणा सुद्धा दिसत होता .त्याने बिल्डिंगमधल्या साऱ्या फ्लॅटसमोरचा कचरा काढला , गच्चीची सुध्दा साफसफाई केली. दीड दोन तासात सर्व कामं झाल्यावर त्याने प्रत्येक फ्लॅटमालकाकडे जाऊन साफसफाई केल्याचे सांगितले आणि बदल्यात खायला किंवा पाच पन्नास रुपये देण्याची विनंती केली.
बहुतांशी जणांनी त्याचं काम बघून खुशीखुशीत त्याला ती रक्कम दिली सुद्धा . जेव्हा हा माणूस त्या गृहस्थाकडे आला तेव्हा नुकतेच हे साहेब टल्ली होऊन आले होते .मूड पण खराब असावा . त्याने काहीच न ऐकता या माणसाला मारायला सुरुवात केली .पहिल्या मजल्यापासून ते अगदी रस्त्यावर येईपर्यंत लाथा- बुक्क्याने हवा तसा तुडवला वर " तुला कोणी समाजसेवा करायला सांगितली रे ? , आम्ही राहू कचऱ्यात .. तुझी गरज नाही ' वगैरे सुरूच होतं " . सोसायटीतले काही लोक मधे पडले आणि त्या गृहस्थाला थांबवून , त्या बिचाऱ्या माणसाला जायला सांगितलं . अगोदरच अशक्त आणि वर काही चूक नसताना मार खायला लागल्यामुळे तो माणूस कसाबसा उठला आणि निघून गेला .हा सगळा प्रकार मी आमच्या घराबाहेर येऊन बघत होतो .
जाताजाता त्या माणसाने ह्या गृहस्थाकडे काही वेगळ्याच नजरेने पाहिलं .त्या वेळेला कळलं नाही .पण आज हळूहळू समजायला लागलं आहे .' जगातली सगळी घृणा , तिरस्कार , द्वेष , तळतळाट त्या नजरेत होता '. तो माणूस निघून गेल्यावर बाकीची लोकं सुद्धा आपापल्या कामाला निघून गेली .हा प्रसंग घडल्याचा दुसऱ्या दिवशी तो गृहस्थ ,त्याच जागी जिथे त्या माणसाला लाथा - बुक्क्याने तुडवलं होतं तिथेच रक्त ओकून मेला होता.
देवाच्या काठीला आवाज नाही . पण तिचा तडाखा फार जबरदस्त बसतो .