देवा दमलास का रे?
देवा दमलास का रे?
रोज झोपण्या आधी देवाला नमस्कार करून झोपायची सवय. अगदी प्रत्यक्ष नाही तरी मनोमन देवाला नमस्कार करून मग झोपावं म्हणजे वाईट स्वप्न पडत नाहीत अस मोठी माणसं सांगायची. दिवस भरात घडलेल्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल देवाशी हितगुज केलं की बरं वाटत. घडलेल्या चुकांची माफी मागावी आणि चांगली बुद्धी दे अस रोज देवाला सांगावं अश्या प्रकारच्या शिकवणीतून आपण सर्वच जण वाढलो, लहानाचे मोठे झालो आहोत.
आज झोपण्याआधी देवाला नमस्कार करायला गेले. समईचा मंद प्रकाश दत्त महाराजांच्या फोटो वर पडला होता. संध्याकाळची निराजनांतील वातही अजून मंद तेवत होती. त्या प्रकाशात देवघर अस काही उजळून निघालं होत की, वाह ! खूप छान वाटत होतं. जरा बारकाईने पाहिलं आज देव रोजच्या सारखे प्रसन्न नव्हते तर शांत वाटत होते.. म्हटलं का रे बाबांनो आज ते रोजचं चैतन्य, प्रसन्न मुद्रा कुठे गेली? काही चुकलं का आमचं? आज थकल्या सारखे दिसताय ?
जो आपला तारणहार, विश्वनिर्माता, करता - करविता अशा परमेश्वराला मी एक अजाण,भाबडा प्रश्न विचारत होते.. देवा तू दमलास का? थकला आहेस का आमच्या सततच्या कटकटींना ?? माझ्या विचारांच मलाच हसू आलं. तोही मंद हसला असेल माझ्या ह्या प्रश्नावर... ही कोण वेडी, खुळी मला विचारते ??
पण खरंच बघा न जरा विचार करून,चराचरातील प्रत्येक जीव सतत काही न काही सारखा देवाला सांगतो, मागतो आहे. काहीही झालं की त्याला दोष तरी देतो, माझ्याच वाट्याला हे असं का असं सारख विचारतो, कधी कधी त्याचे आभारही मानतो. क्षुल्लक गोष्टींसाठी त्याला वेठीस धरतो.. तो वैतागत नसेल? दमत नसेल का? कंटाळत नसेल?
मधे एक सिनेमा आला होता, अगं बाई अरेच्चा ! ह्या सिनेमातल्या नायकाला म्हणे सतत सर्व बायकांच्या मनातलं ऐकू यायचं.. थोडा वेळ ठीक आहे हो, पण सतत आजूबाजूच्या लोकांचे आवाज कानावर पडत राहिल्यानी डोकं भणभणत असेल. तसच काहीस देवाचं होत नाही का? केवळ मनुष्य नाही तर चराचरातील प्रत्येक जीवाशी त्याचा जीव जोडला गेलाय. सगळ्यांच्या हाकेला ओ देऊन धावणारा हा किती थकून जात असेल? कोणाला ह्याची जाणीवच नसेल का?
वाटलं देवही माझ्याशी गप्पा मारतोय म्हणतोय, कशाला मनुष्य जन्माला घातला?.. ह्यांच्या वासना, इच्छा,आकांक्षा,स्पर्धा,अहंकार संपतच नाहीत. खऱ्या अर्थाने मनुष्य जन्माचा उपभोग, सुख आणि उद्दिष्टच कळत नाही. तरी इतर कोणाला नाही तेवढी सद्सद्विवेक बुद्धि, ज्ञान ह्या जीवाला दिलं. करणारे त्याचा योग्य उपयोग करतात पण हेप्रमाण अगदीच कमी. तुमच्या सारख्या नुसत्या वेड्यांचीच गर्दी जास्त. स्वतः हवं तसं वागतात, हवी नको ती कर्म करतात आणि मग माझ्याच वाट्याला हे असं का म्हणून मलाच विचारतात? पेरावे तैसे उगवावे हा सृष्टीचा नियमच आहे हे ही विसरतात..त्याच बोलणं ऐकून वाईट वाटलं..हळू हळू चूक कळाली.
मग काय कोण जाणे मला देवाचीच दया म्हणू कि कीव तत्सम भावना आली आणि मी सहानुभूती च्या स्वरात देवाला म्हणलं की बाबा रे, रोज इतकं काम करून तू खरचं थकत असशील. आमच्या सारखे चोराच्या उलट्या बोंबा मारणारेच खूप...तर आजच्या पुरत मी तुझ्या कडे काहीही मागणार नाही. आजच्या पुरता तरी तुझ्याकडे काही मागण्याचा हव्यास सोडते. तेवढाच तुझा भार हलका करू शकते मी. किंवा तू अस करतोस का? तू माझं तुझ्याकडे काहीही मागणच बंद होऊ देत अशी बुद्धी दे. एकुणात समाधान, शांती दे.. म्हणजे मी पुन्हा काही मागणारच नाही न... ?
नाही नाही म्हणता मीहि योग्य ते मागणं मागितलंच देवाला.. स्वार्थ आणि परमार्थ म्हणतात तो हाच का?.. त्याचा भार हलका व्हावा म्हणून एकदाच आयुष्यच कल्याण कर म्हंटल की झाल. देवा तू जो रोज मला आरास दाखवतोस नं जो मला बाह्यरंगी फसवं रूप, फसवी माया दाखवतो. तू सोडून इतर कोणीही मला तारणहार नाहीये ह्याची मला खात्री आहे. मग तूच मला आपलं मानलसं तर मग मला काही मागावं ही लागणार नाही आणि तुला रोज रोज माझी गाह्राणी ऐकावी ही लागणार नाहीत. बघ हे पटत का तुला..
देव म्हणाला,"बायका मुळातच गोड गोड बोलून फसवतात हे काय नविन नाही. तू त्याला अपवाद कशी असणार.? ". नाही म्हणता सगळंच मागितलंस की तू... एवढं बोलून हळूच हसत हसत दुसऱ्याच्या हाकेला ओ द्यायला माझ्या कडून "मिस्टर इंडिया" सारखा गयाबच झाला..बायका गोड बोलून फसवतात हे काही अंशी खरे,पण देवा तुही माझ्या प्रश्नांची उत्तरं न देताच गेलास की रे.. तुझी खेळी तुलाच माहिती.. तू आमचा मदारी.. आम्ही तुझ्या डमरुच्या तालावर नाचणार..
हं....चल "जमुरे" बराच उशीर झाला.. नाही म्हणता म्हणता बराच वेळ गप्पा झाल्या.. पण आता समईच्या प्रकाशात देवघर अजून खुललं होत .. देवालाही कोणी तरी जवळ बसावं चार शब्द मायेने बोलावं असं वाटत असेल का? आता ह्याच उत्तर त्या परमेश्वरालाच माहिती..(देव - हं, एकतोय ह मी सार..) मी मनातच जीभ चावली.. अत्ता तरी लगेच बोलवुन पुन्हा प्रशानांचा भडीमार नको त्याला..( देव- "नशीब ")
चला माझं काम झालं.. झोपते रे बाबा.. श्रीराम जय राम जय जय राम....
