घनशाम सावरकर

Abstract Children Stories Inspirational

3.4  

घनशाम सावरकर

Abstract Children Stories Inspirational

"देव तेथेचि जाणावा" (लघुकथा)

"देव तेथेचि जाणावा" (लघुकथा)

7 mins
444


          डिसेंबर महिन्याचा पहिलाच आठवडा होता.कडाक्याची थंडी पडायला सुरुवात झाली होती. शनिवारी सकाळ सत्रातील शाळा असल्यामुळे आठव्या इयत्तेत शिकणारा गोपाळ शाळेत जाण्यासाठी तयार झाला होता.आज त्याचा पेपर असल्यामुळे त्याला जरा घाई होती. त्याचा भाऊ नरेश आज शाळेत येणार नव्हता. सायकल वरून पडल्याने त्याच्या पायाला दुखापत झाली होती....

       "प्रभाते मनी राम चिंतीत जावा |

       पुढे वैखरी राम आधी वदावा |

       सदाचार हा थोर सोडू नये तो |

       जनी तोची मानवी धन्य होतो |"  

  संत 'रामदास स्वामी' यांचा हा श्लोक आई देवाजवळ हात जोडून म्हणत होती.तिला देव-धर्माची फार आवड..सकाळी आंघोळ करून पूजा पाठ करणे आणि नंतर घरातली काम करणे.. अशी तिची दैनंदिनी होती.

     गोपाळ सकाळी नित्यनेमाने दररोज आईला नमस्कार करीत असे..त्याने आईला नमस्कार केला व बाहेर सायकल काढत गोपाळ आईला म्हणाला,

      "आई येतोवं मी!" 

      "अरे,,अरे थांब ते परीक्षेची फी घीऊन जानं सोबत!" आई गोपाळला हाक मारत म्हणाली,, 

      "अरे हाव,,दे बर ते वीस रुपये आठवणच नोती मले !"गोपाळ दचकून सायकल थांबवत म्हणाला,

      घरातून वीस रुपये आणून आईने गोपाळच्या हाती दिले आणि म्हणाली,

      " चांगला सोडवजो पेपर!"

       "हाव हाव आई!" म्हणत,सायकल चालवत तो निघू लागला.

       थंडीची झुळूक अंगावर शहारे आणत होती.झाडेही जणू अंग चोरून उभी होती. सूर्यनारायण निघायला आज जरा कंटाळाच करत होते.पूर्वेस लाल तांबूस झालेले मनोहरी आकाश पाहून मन आनंदाने झुलत होते.अंगात स्वेटर असल्यावरही थंडी हवा अंगाला गुदगुल्या करत होती. 'एखाद तान्ह बाळ त्याच्या आईजवळ जाण्यास जस आतुरते अगदी तशीच आतुरता सूर्याची छटा पाहून सुंदर लाल,तांबूस,कोवळ्या किरणांची,, 'सूर्योदयाची' लागली होती.अश्या प्रसन्न वातावरणात तो निघाला होता..

       शाळा अजून थोडी लांब होती.मधात एक महादेवाचे मंदिर असल्यामुळे गोपाळने सायकलचा वेग थोडा कमी केला होता. तेवढ्यात त्याला मंदिराच्या भिंतीजवळ कोणीतरी व्यक्ती जमिनीवर पडलेली दिसली.गोपाळने सायकल त्या व्यक्तीकडे वळवली.त्याठिकाणी बघितले तर एक म्हातारी थंडीमुळे काकुडलेली दिसली.बऱ्याच दिवसापासून उपाशी असल्याने भुकेने मलूल झाली असेल.असा अंदाज होता.तिचे हात पाय थंडीमुळे थरथर कापत होते.एवढ्या भयंकर मरणाच्या थंडीतही तिच्या अंगावर काहीच नव्हते.गोपाळला आजीची दया आली.गोपाळने सायकलवरून उतरून आजीला आवाज दिला,

       "आजी तुले थंडी वाजून रायली काय?" आजीच्या तोंडून आवाज निघत नव्हता.ती बोलण्याचा प्रयत्न करत होती पण तिच्या तोंडून,

      "अं,, उं,,अं,,अं !"

      "हू,, हू,, हू,,हू"

एवढच येत होतं..तिच्या अंगात थंडी भरली असल्याने हातपाय पोटूशी घेऊन,डोकं पायात खुपसून शरीराचं गाठोड केले होते तिने..अंगावर सुरकुत्या पडलेल्या,ठिगळ पडलेलं मळकट लुगडं होत,केस कितीतरी दिवसापासून विंचरले नसतील ,रंगाने गोरी असेल पण काळपट थर चढलेला,वयाने जवळपास सत्तर असेल,पण वाटत मात्र चांगल्या घरची होती,तिच्याकडे पाहून गोपाळला अतिशय वाईट वाटले.

       "इतकी म्हतारी आजी, थंडीत कुडकुडुन रायली अन तिले घर ना दार,इले कोणीच नशीन सांभाळाले म्हणून हे उपाशीपोटी इथं पळली हाय.!"गोपाळ विचार करून मनाशीच बोलला,

       "आजी तू मंदिरात काऊन नई झोपली वं!" निरागसपणे खाली वाकून गोपाळ आजीला विचारू लागला,

 पण आजीच्या तोंडून काही केल्या आवाज येत नव्हता. तेवढ्यातच मंदिरात हरिपाठ सुरू झाला. 

    "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला"  

    "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला"  

हे बोल कानी पडल्यावर मात्र आजीसुद्धा 

     "गो,,पा,,,ला गो,,पा,,ला गो,,पा,,ला" 

 म्हणण्याचा प्रयत्न करू लागली पण आवाज इतका कमी की तिच्यात प्राणच उरला नसेल.आणि हे शेवटचे बोल तर नसतील ना?...गोपाळला किंचितसी भीती वाटली.

    "घाबरू नको आजी,,तू इथ थांब..मी आलोच लवकर घरून!"

     असं म्हणत,तो सायकलवर बसत परत वाऱ्याच्या वेगाने घरी गेला.'एखादी चिमणी आपल्या पिल्लांसाठी ज्याप्रमाणे वणवण भटकून चारा आणते अगदी त्याच मायेने गोपाळ आपल्या घरी गेला होता.'आणि आईला म्हणाला,

     "आई वं आई,,,आई वं आई!"

     "काय झालं रे गोपु,,तू काहून आला वापस पेपर हाय ना तुयाला!"आई स्वयंपाक करतांना गोपाळला मोठया आवाजात बोलली,

      गोपाळ तर आपला पेपर आहे ते पण विसरला होता.पण त्याला आजीला सोडून जाणे त्याला कधीच पटणारे नव्हते.मूल्यसंस्कार त्याच्या आई-वडिलांनी त्याला दिले होते.आजीची अवस्था पाहून तो खिन्न झाला होता.त्याला आजीची काळजी वाटायची की बिचारी मरणार तर नाही? त्याने त्याच्या आईला आजीबाबत सांगितले.

      "महादेवाच्या मंदिराजवळ एक आजी थंडीत तशीच पळून हाय...तिचे हातपाय थरथर कापून रायले...अन ते कायीच बोलत नाई.उपाशी असंन ते..आपल्या घरची शाल दे अन खायले दे काईतरी तिले.नाहीतर ते जगनार नाई!"

      गोपाळची आई खूप कनवाळू होती तिला अश्या लोकांची खूप दया येत असे.गोपाळला ती म्हणाली ,,

      "थांब लगेच ने बाळा!"

      आई क्षणभरातच एक शाल,नुकतीच टाकलेली भाकर,अन चहा-पाणी आणून देत म्हणाली,

      "गोपु हे घे,,आजीले तूया हातान खाऊ घालजो ,,जाय लवकर मरीन थे नयीतन!"

      "हवं दे आई,,मी नाई मरू देत तिले!"  

      असे विश्वासपूर्ण बोलून आईच्या हातची पिशवी घेऊन तात्काळच गोपाळ निघाला.  

     'एखाद्या हरणाच्या पाडसाला वाघ भक्ष करण्यासाठी झडप घालणार हे जेंव्हा त्या पाडसाच्या दुभत्या हरिणी माय ला दिसते ना आणि त्यांनतर ते हरीणी ज्या पद्धतीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्या पिलाला वाचवते ना अगदी थेच ममत्व,दातृत्व गोपाळच्या वागण्यातून दिसत होतं...'

     गोपाळ क्षणाचाही विलंब न लावता आजी जवळ पोहचला होता..

     त्याने आजीच्या अंगावर शाल टाकली आणि म्हणाला,

       "हे घे शाल गुंडाळतो मंग थंडी वाजणार नाई तुले,,अन हा चहा घे गरम हाय थंडा होईल नाईतन,,, लवकर घे ,,,थंडी निगुंन जाईल!"

       गोपाळने आजीच्या पाठीला आधार देत बसवले.तीचे हात-पाय थंडीने गारठले होते.. मात्र शाल गुंडाळल्यामुळे तीला आता थोडं सोयीस्कर वाटत होत.. .गोपाळने चहा झाकनात ओतून तीच्या ओठाला लावला... 

      "घे थोळसाक लवकर,, बरं वाटीन तुले!" आजी चहा प्यायला लागली.

 तीन चहा झट्कनच संपवला होता..चहा पिताच तिच्या डोळ्यात पाणी आले...आजी रडू लागली होती..तिचे दुःख,यातना पाहून गोपळालाही रडू आवरत नव्हते.ती गोपाळकडे केविलवाण्या नजरेने बघत होती.तिच्या जीवनाची कहाणी ती गोपाळकडे पाहून जणू सांगत होती...आणि या ईतक्या छोट्या गोपाळ कडे एकटक बघून विचार करू लागली...…..तीला तिच्या मुलाची आठवण आली होती..तिचा एकुलता एक मुलगा आणि सून अपघातात मरण पावले होते...आता तिला कोणीच नव्हते..

      "माह्या नातू असाच मले माया लावत असता!.."ती हात उचलत गोपाळच्या गालाला हात लावत बोलली,

     गोपाळ आजीच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला,

      "आजी म्या तुह्यासाठी भाकर आणली हाय खाऊन घे!"!"

      "वा रे पोरा..!लय देवासारखा हायस रे तू राजा!" ती गोपाळला म्हणाली,

       "आजी माणसात देव असते माह्यी आई मले नेहमी सांगते!"आजीला भाकर चारत गोपाळ म्हणाला,

       "लय गुणवान हायेस पोरा,,म्हातारा होय बापा!"आजीने दुसरा हात गोपाळच्या डोक्यावरून फिरवत आशीर्वाद दिला,

 आता तिला बरं वाटत होतं.तिच्या पोटात दोन घास गेले होते.आणि सूर्य काहीसा वर आला होता..आजी आता थोडी नजर टाकत होती.तिने पूर्ण डोळे उघडून..गोपाळला ती निरखून बघत होती.कृष्णासारखा सावळा रंग,डोळे पाणीदार,चेहऱ्यावर तेज,काळे दाट केस,कपाळावर अष्टगंध लावलेला गोपाळ तिला दिसला होता....

       "पोरा शाळेत चालला होता काय?"" जाय बाप्पा शाळेत!" माह्या नातासारखा हायस तू,,सुखाशी राय बापा!"आजीने केविलवाण्या शब्दात म्हटलं,

 आजीने शाळेचे नाव काढताच..गोपाळला पेपर ची आठवण झाली होती.परंतु गोपाळला तीला सोडून जावेसे वाटत नव्हते का कुणास ठाऊक तिच्या सोबत त्याचे एक दैविक नातेचं होते.

       "जाय,,जाय,,शाळेत पोरा लवकर!"आजी गोपाळ ला म्हणाली,

आजीचे बोलणे किंचितसे निखळले होते..परंतु तिलाही तो आधारवड वाटायचा..

       "बर आजी!! मी जातो पण तू अतिच थांब हे भाकर खाय,,अन हे घे वीस रुपये ठेव जवळ मी येतोच पेपर झाल्यावर अतीसा!" असं म्हणत गोपाळने तिच्या हातावर वीस रुपये ठेवले..

        "बाबु,,जाय तू शाळेत,मोठा साहेब होय अस म्हणत,,तुय नाव काय हाय पोरा,,,आजीने डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद देत म्हंटले,,

गोपाळने आजीला नमस्कार केला,,

"'गोपाळ'हाय माह्य नाव!"गोपाळ म्हणाला

       

    "लय गोळ नाव हाय बाबू तुह्य!!

" "गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला!" डोळ्यातले अश्रू पुसत आजी म्हणू लागली, 

     "लवकर येतो मी!"अस म्हणत आजीकडे बघत तो तिथून सायकलने निघू लागला..

     गोपाळ शाळेत पोहोचताच सर्व शाळा पेपर असल्यामुळे शांत झाली होती.गोपाळ चाचपडत वर्गाजवळ पोहोचला होता.सर ओरडतील याची भीती वाटू लागली होती. पेपरला अर्धा तास उशीर झाला होता.वर्गात वानखडे सर होते.

     "आत येऊ का सर!"असे म्हणत गोपाळने सरांची नम्रतेने परवानगी घेतली,

     "अरे गोपाळ तू,,ये,, ये!" असं म्हणत सरांनी त्याला आत बोलावले,

      त्याने पेपर घेतला आणि त्याच्या बाकावर जाऊन बसला.पण त्याच्या डोळ्यासमोरुन ते आजीचे दृश्‍य काही केल्या जात नव्हते.तिचे थरथर कापणारी हातपाय,तिचं बोलणं, तिचा आशिर्वाद,तिचा चेहरा,जसेच्या तसे त्याच्या दृष्टिपटलावर उभे राहत होते.तेवढ्यात वानखडे सरांनी त्याच्या जवळ येऊन त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाले,

      "त्या आजीला मदत करताना तुला मी पाहिले मंदिराजवळ... गरजूंना मदत करणे आपले आद्यकर्तव्य आहे.मला तुझा सार्थ अभिमान वाटतो गोपाळ!!""..असं म्हणत सरांनी गोपाळला पेपर सोडवण्यास प्रोत्साहित केले.

गोपाळचा अभ्यास चांगला असल्यामुळे त्याला पेपर सोडविण्यात काही अडचण गेली नाही. तो पेपरमध्ये शेवटचा प्रश्न सोडवत असताना..

    'जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या अभंगाचे सोदाहरण देऊन स्पष्टीकरण द्या..असा प्रश्न होता'. गोपाळ लिहू लागला.....

  "जे का रंजले गांजले..।।

  त्यासी म्हणे जो आपुले..।।

  तो चि साधू ओळखावा..।।

  देव तेथेची जाणावा.."।।

          -संत तुकाराम महाराज

    जे लोक भुकेले आहेत,तहानलेले आहेत आंधळे आहेत.अपंग आहेत,ज्यांना मदतीची गरज आहे.अश्यांचे दुःख आपलं मानून त्यांना मदत जो करतो...त्यावेळी त्यात ईश्वराचा वास असतो.असे समजावे.अश्या लोकांच्या गरजा आपण पूर्ण करुन समाजात त्यांना मान दिला पाहिजे.त्यांच्यात विश्वास निर्माण केला पाहिजे.दुःखीतास नेहमी जवळ करणारा ईश्वरस्वरूप असतो.'माणसाने माणसाशी माणसासम वागणे म्हणजेच 'माणुसकी'..अशा लोकांना मदत केल्यानेच आपल्यातल्या माणुसकीचे दर्शन होत असते. गोपाळच्या अशा सविस्तर ,समर्पक, उत्तराने शिक्षकांचे मन जिंकले होतं.खरं तर त्याच्या उत्तरापेक्षाही त्याने आज केलेले सत्कार्य हे मोठे होते.त्याचे हे ईश्वरस्वरूप कार्य केले होते.त्याचा पेपर ही तर एक औपचारिक गोष्ट होती.गोपाळने पेपर वेळेत सोडवून सरांच्या हाती दिला.परत एकदा सरांनी त्याच्या पाठीवर हात फिरवत शाबासकी दिली.पण गोपाळला आता आजीची आठवण झाली होती.गोपाळ इतर कोणाला काहीच न बोलता लगेच दप्तर घेऊन मंदिराच्या दिशेने निघाला होता.

    'एखादं वासरू भटकत असताना त्याच्या आईची आठवण होऊन ज्याप्रमाणे ते सैरावैरा पळून गोठ्याकडे निघते अगदी त्याच प्रकारे गोपाळ आजीकडे निघाला होता.'

    तिला बघायचे होते तिची विचारपूस करायची होती.तिची सेवा करायची होती. मंदिराजवळ त्याच जागेवर गोपाळ येऊन पोचला होता.परंतु बघितले तर त्याठिकाणी कोणीच नव्हते.आजी कुठेच दिसत नव्हती.

    "आजी,,आजी कुठी हायस तू मी आलोना,,येनं मी आलोय,,,,!"

    मोठंमोठ्याने आवाज देत गोपाळने संपूर्ण मंदिर..संपूर्ण मंदिराचा परिसर,,आजूबाजूचा परिसर,, संपूर्ण धुंडून काढले होते.परंतु आजीचा पत्ता लागला नाही..तसाच हतबल होऊन सायकल हाताने ओढत नेत तो घरा जवळ पोहचला.आणि आईला सर्व हकीकत सांगितली.त्यावर आई म्हणाली,,,

    "अरे बाळा निराश होऊ नकोस..

ही माणसं अशीच असतात.. देवासारखी..कधी आशीर्वाद देऊन जातात.. आयुष्यभरासाठी..!"

     झालेल्या परीक्षेत गोपाळ पहिला आला होता.त्या दिवशी तो खूप आनंदी होता.गुणपत्रक घेऊन घरी येत असताना त्याला आजीची आठवण झाली.तो मंदिरा जवळ गेला.त्याला गुणपत्रक दाखवायचे होते.त्याची नजर तिला पाहण्यासाठी आतुरली होती.

   'ज्या वेळी सुदामा आपल्या जीवश्चकंठश्च मित्र कृष्णाला भेटायला निघाला होता.अगदी तशीच उत्कंठा गोपाळमध्ये आजीला भेटण्यासाठी होती..'   

     पण तिचा पत्ता लागला नाही.कुठे गेली कुणालाच माहिती नव्हते.शेवटी निराश होऊन घरी जायचा..तो नेहमी त्या मंदिराच्या ओट्यावर जाऊन बसायचा आणि आजीच्या त्या दिवशीच्या आठवणीत रमायचा..

 काही दिवसानंतर......

     तो नियमित अभ्यासाला लागला होता.शाळेत जाता येता त्याच्या कानावर मंदिरातले ते भजन मात्र कानी यायचे.

     'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला'

 आणि आजीची आठवण एखाद्या मंद झुळूकी सारखी त्याच्या मनाला स्पर्श करून जायची


Rate this content
Log in

More marathi story from घनशाम सावरकर

Similar marathi story from Abstract