Manasi Gangal

Horror Thriller

4.3  

Manasi Gangal

Horror Thriller

डोह..

डोह..

5 mins
337


जोशी गुरजी ओ.. गुरजी....म्हादू बेंबीच्या देठापासून बोंबलत होता.. तांबडं फुटायला अजून अवकाश होता. 

म्हादू ला काही दम निघत नव्हता .. जोशी गुरुजी शाळेतले एकमेव मास्तर आणि ज्योतिषी पण . 

काय रे? का बोंबलतोस? मास्तर बाहेर येत म्हणाले.. 

अहो शेवंता सापडत नाय.. 

म्हणजे?? अरे काल तर भेटली होती... घराकडे जातीये म्हणाली... मग गेली कुठे पोर? 

.काल पासून शोधतोय... आता तुमीच सांगा कायतरी... 

मास्तरांनी झोळीतून पंचांग काढलं... प्रश्न कुंडली मांडली आणि मग अचानक त्यांचा चेहराच पडला.... 

ती पंचांगाची गुंडाळी तशीच टाकून ते जंगलाच्या दिशेनं पळत सुटले.. त्यांच्या मागे म्हादू पळाला... काल अवस होती... पोर नक्की ओढली गेली ह्या भीतीनं ते थरथर कापत होते.. 

डोहा जवळ आले आणि मटकन खालीच बसले.. डोकं धरून... शेवंताच पैंजण कातळापाशी पडलं होतं..  

शेवंताच प्रेत फुगून वर आलं होतं... गावकऱ्यांनी ते ओढून बाहेर काढलं... आणि मसणवाट धरली... शेवंता... सावळी भुरकट डोळ्यांची..लांब केस... 14 वर्षांची परकरी पोर.. म्हादूची भाची... आई बाप आधीच हिला टाकून गेलेले.. कारण हि चौथी पोर... सांभाळायला जड झाली म्हणून म्हादू कडे सोडली... इथं सोडली तेव्हा जेमतेम सहा वर्षांची होती.. मागल्या वर्षी म्हादू ची बायको साथीच्या रोगानं मेली... आणि हिला नहाण आलं... तेव्हा पासून तिला म्हादू जास्तचं जपत होता.. आणि आज अचानक हि गेली सोडून... म्हादू आक्रंदत राहिला.. 

गुरुजी त्याला घेऊन घरी आले आणि एकाएकी म्हादू ला पहिला वेडाचा झटका आला 

आज बरोबर एक महिना झाला होता तिला जाऊन... म्हादू ला वाटायचं ती येईल... बोलेल.. आणि तो डोहापाशीच जास्त रेंगाळू लागला... आणि रात्र जशी पहिला प्रहर ओलांडून अजून गडद झाली तसे म्हादूचे झटके वाढायला लागले  आणि एका बेसावध क्षणी त्याचा पाय निसटला आणि तो डोहात पडला... कुणालाहि कळलं नाही... कारण आता..... काजळ घालून नटलेल्या अवसे नं आता डोहाबाहेर पाय ठेवला... निपचित पडलेलं अरण्य.. दचकून जागं झालं... बिळातली पिल्लावळ उर धपापत, उसनं अवसान आणत गावाच्या दिशेनं पळत सुटलं... त्यातच एक रानडुक्कर, गावाची वेस ओलांडून शेतात घुसलं... शिरप्या तसा हट्टा कट्टा गडी... आणि अंधाराच भयं कधी वाटलंच नाही... 


कारण हि तसंच होतं... मसणातल्या रामी आणि गण्यांचं हे तगलेलं पाचवं आणि शेवटचं पोरं.. 


अशाच एका पावसात त्याचा बाप ह्या जंगलात गेला तो कायमचाच... आणि पाठची चार पोरं साथीच्या रोगानं .. मग एक दिवस रामी नं हि जीव सोडला.. तेव्हा शिरप्या फक्त 6 वर्षाचा होता... 

गावातल्या पाटलांनी पोटी पोरं नाही म्हणून खूप नवस सायास केले.. मग गावातल्या भगता नं देवीला कौल लावला.. आणि पाटलाला सांगितलं... ह्या पोराला सांभाळा म्हणजे ह्याच्या आईच्या आशीर्वादानं पोरं होईल सांगितलं आणि हा घरी येताच वर्षात पाळणा हलला... तेव्हापासून हा पाटलाच्या काळजाचा तुकडा होता... आता चांगला तरुण पैलवान गडी झाला होता म्हणून शेतातल्या घरात... 

.. पण आजची अवस (अमावस्या ) विचित्र चं होती.. हजारो वर्षात असा मुहूर्त यायचा... जेव्हा अवस एका बाईच्या रूपात डोहातून बाहेर यायची.. आणि मग गावात बळी जायचा डोहाला... 

जर आपणहून कुणी जीव दिला आणि डोहाला तो मान्य नसेल तर तो बुडू द्यायचा नाही... पण पौर्णिमा आणि अमावस्या... ह्या दिवशी मात्र एक तरी बळी जायचाच.. 

...


अवस उठली तिच्या लांब काळ्या नागिणी सारख्या बटा सावरल्या.. डोहाच्या बाजूला एक मोठा कातळ होता... गेलेला बळी... रात्री डोह पाण्यावर आणत असे अन मग बाजूच्या पिंपळावरचा खवीस त्याची कवटी फोडे.... त्या रक्ताचे अगणित अभिषेक झेलून तो कातळ त्याचा मूळ काळा रंग विसरून गेला होता... तिनं डोहात बोट बुडवून कातळात रुतवलं अन आपल्या पांढऱ्या फटाक कपाळावर गोल फिरवलं.. 

हेच तिचं कुंकू... अंगात गर्द हिरवी साडी, गावात कुणाचाही जन्म झाला तर डोहाशी ओटी येई... अवसेचा मान म्हणून... त्याच्या उरलेल्या बांगडया.. 

नि गळ्यात काळा धागा....कुमारिकाच होती ती... युगानुयुगं प्रतीक्षेत...  


रानातली जनावर हि आज बाहेर पडत नसत... तिच्या नजरेला जो पडेल तो तिचा घास होणार... 

अवस निघाली... झुलत.. पायातले चाळ वाजवत.. अन साथ पाचोळ्याची.. एका अनामिक लयीत ती गावाच्या वेशी पाशी आली... 

तिची वर्दी वावटळीनं आधीच दिली होती... आभाळ भरून आलं आणि विजांनी सलामी दिली.. आता फक्त गडगडाट, भेदक किंकाळ्या तिच्या हडळ दासिंच्या... 

अत्यंत काळीज हेलावणार वातावरण.. 


शिरप्या मात्र पाऊस येणार म्हणून चिंतेत.. 

तो बाहेरच्या खाटेवर निजला होता तो उठून झोपडीत आला ... का कुणास ठाऊक.. 

अचानक त्याला चाळ ऐकू येऊ लागले... त्याला तर ते बैलांच्या गळ्यातले घुंगुर वाटले पण नंतर आवाज स्पष्ट झाला... चाळ घालून कोण बया या वक्ताला आली? असा विचार करत तो बाहेर आला आणि अचानक... अचानक वीज चमकली... त्या काळ्या मिट्ट अंधारात त्याच्या समोर दात विचकणारी, खदाखदा हसणारी,  हिरव्या पाताळातली एक बाई उभी दिसली... नाही म्हणायला शिरप्या हि तंतरलाच... पण स्वतः ला सावरत त्यानं पुन्हा निरखून पाहिलं... त्याला वाटलं गावातली पोरं तर टवाळकी करायला सोंग घेऊन आली असली तर... उद्या गावभर बोभाटा.. पाटलाचा पोरगा भित्रा... केवळ बापाची बदनामी होऊ नये म्हणून तो पुढं आला... आणि जोरात ओरडला.. 

कोण आहेस तू?.. म्या शिरप्या!!!!


आज पहिल्यांदाच कुणीतरी अवसे समोर नं घाबरता उभा होता... तिला शिरप्या आवडला.... पावसानं भिजलेलं त्यांचं रांगडं रूप, जाड भुवया रुंद कपाळ, कानात बाळी, रुंद खांदे मान..पाण्याच्या असंख्य पागोळ्या त्याच्या शरीरावरून कोसळणाऱ्या आणि त्याच्या प्रत्येक अवयवाशी सलगी करणाऱ्या... अचानक तिची विखारी नजर थिजली... मग जराशी निवळली... आणि मग मनात भरलं हे पाखरू... शिकार तर होणार.. बळी हि मिळणार पण तिच्या गरजा भागवून... ती पुन्हा हसली पण आता गूढ.. 

अनाकलनीय... तिच्या नजरबंदीत तो पुरता अडकला.. तिच्या जवळ आला... इतरांना भेसूर भयानक वाटणारी ती त्याला मात्र अप्सरा भासली... रानभूल पाडली तिनं.. तिला कारभारीण करायची ह्याच विचारानं पछाडला गेला.. आणि तिच्या अजून जवळ येत त्यानं तिच्या समोर येत तिला इचारलं.. कारभारीण होशील ह्या पाटलाची?... तिनं मान खाली घातली.. 

आणि त्यानं होकार समजून आपल्या गळ्यातली सोन्याची चेन तिच्या गळ्यात घातली.. 

तिनं क्षणात पुन्हा वर पाहिलं... आणि त्यानं तिला कवेत घेतलं.. 

बेसावध त्याला तिनं झोपडीत नेलं.. आणि त्याच्या वर हक्क गाजवू लागली. काळानं त्याच्या पौरुषाचा फडशा पाडायला मदतच केली आणि आता तिचे दोन सुळे पुन्हा त्या विजेच्या प्रकाशात पुन्हा चमकले .. अचानक त्याचं डोकं गरगरू लागलं आणि मसणातल्या त्याच्या माय ला कळलं... तिचा लेकरा साठी तळमळणारा आत्मा गावाच्या वेशीकडे झेपावला... अवसेला आवेग आवरायचा नव्हता. 

आणि तशा अवस्थेत त्याच्या माय नं अवसेच्या जटांना हात घातला आणि तिला मागे खेचली. 

आत्म्याची ताकद अमर्याद.. दोघीही जुंपल्या..पण त्यात एका लेकराची पेटून उठलेली माय... मग अवसे नं प्रतिकार करूनही तिला मागे फिरावं लागलं.. अवस डोहापाशी आली... डोह फुत्कारला... त्याचा बळी त्याला हवा होता.. 

अवसेनं स्वतः ला कातळावर आपटला... ती मनुष्य देहात होती... आज तिचाच बळी गेला...

पण मरताना तिनं डोहाला रक्ताने माखलं... आणि शेवटचं मागणं मागितलं... आता बळी मागू नको... गावाला सोड... 

. शांत हो.. डोहानं हि मान्य केलं.. 

तिचा देह आता डोहात शिरला... खोल खोल गेला... 

.काही वेळानं डोहाचे तरंग थांबले. अचानक त्याला शुद्ध आली आणि हाका मारत, तिला शोधत तो तिथवर पोचला आणि.....त्याचा पाय कातळाला अडखळून तो डोहात पडला... डोह फसफसला... फिदि फिदी हसत सुटला...त्याची माय केविलवाणी झाली... तिचं पोरं ती वाचवू नाही शकली... डोहानं शब्द मोडला आणि त्याचा हि बळी गेला.... आणि काळ हि क्षणभर थांबला..या अमानुष चक्राचं एक आवर्तन पाहत.. 


आता रात्र सरत होती आणि एकेक जनावर पाण्यासाठी डोहाकडे येऊ लागलं.. 

डोह...शांत.. स्थिर... गंभीर.. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror