ती अन तो
ती अन तो


एक msg आणि तिचा मूड बदलला .हम्म.. त्याचाच reply होता ..तो येतोय .
हलकासा मेकअप आवडती न्यूड पिंक लिपस्टिक आणि आरमानी चा परफ्युम.. सावळी तरी स्मार्ट.. तिच्या लांब काळ्याभोर केसात माळलेला नाजूक जुईचा गजरा.. एक उत्तम निवेदिका म्हणून नाव कमावलेली.. पण प्रौढ कुमारिका.. एकुलती एक.. आता आई बाबाही साथ सोडून निजधामाला गेलेले.. त्यामुळे एकटीच..
ती चातकासारखी वाट पाहात होती ..
आणि दाराची बेल वाजली. तिने धपापणाऱ्या मनाला सावरत अलगद दार उघडलं आणि तो आत
आला.. उंच राजबिंडा, व्यायामानं कमावलेलं शरीर ...गोरा आणि बदामी डोळ्यांचा.. पांढरा शुभ्र दरबारीं कुर्ता लखनवी आणि सुरवार... कोरलेली दाढी... साधारण बरेच पावसाळे पाहिलेले काळे पांढरे पण मिलटरी कट मधे राखलेले केस.. अजूनही रांगडा गडी..
..तिची नजरबंदीच झाली जणु..
तो आता सोफ्यात विसावला ...पाणी घेताना तिने त्याला केलेला हलकासा स्पर्श त्यालाही नकळत सुखावला .. तिला अलगद हाताचा आधार देत त्यानी आपल्या बाजूला बसवलं ...काय ती अदब ..काय ती ऋजुता.. ती घायाळ.. फिदा... तिची अन त्याची ओळख तशी एका बक्षीस समारंभातली.. ती निवेदिका आणि तो आला होता प्रमुख पाहुणा म्हणून.. हो तर.. मोठा नावाजलेला साहित्यिक होता.. अनेक उत्तम कथासंग्रह कवितासंग्रह आणि संस्कृत श्लोकांचं रसग्रहण.. असे अनेक मानसन्मान मिळवलेला... प्रचंड लोकसंग्रहाची आवड.. आणि मुळात उत्तम वक्ता.. विदुर.. मुलंबाळ नसल्यानी तसा विनापाशच.. झालं.. फोन नंबर कार्यक्रमामुळे आधीच save झालेले होते.. अन संवाद वाढत गेला...त्या बरोबरच मैत्रं ही... आजवर ते बाहेरच भेटले.. पण आज तिने मुद्दाम आग्रह करून घरीच या असं कळवलेलं.. तिचं इतकं गोड निमंत्रण त्यांन ही खुल्या दिलाने स्वीकारलं.. पत्ता पाठवलाच होता तिने.. अन आज त्यालाही तिच्या मनाचा अंदाज घ्यायचा होता... स्वारी फिदा होती तिच्यावर.. पण प्रौढ वयातलं प्रेम... ती कसं स्वीकारेल ही धाकधूक कायम !
..आज त्याचं इथवर येणं हे त्यांच्यातल्या उमलणाऱ्या नात्याचंच एक प्रतीक होतं ..तिचा आकर्षित होणं... त्याला कळत होतं.. पण... तो थोडासा अलिप्तच राहत होता.. असं एकदम कसं विचारावं ह्या विचारात गुंतलेला.. .
तिने त्याच्यासाठी चहा आणि त्याची आवडती ड्रायफ्रूट बिस्किटे आणली.. आणि कप ओठाला लावताच.. त्याची कळी खुलली.. आहाहा ! अप्रतिम!! तो उद्गारला.. अगदी त्याला आवडतो तस्साच झाला होता चहा.. ..पुन्हा एक नजरबंदी... पण या वेळी मात्र त्याचा संयम डळमळला.. .ती रिकामे कप आणि ट्रे ठेवायला किचन कडे वळली आणि तो तिला पाठमोरा येऊन न्याहाळू लागला...
ती तिच्याच तंद्रीत! झटकन वळली.. आणि थेट तिचा चेहरा त्याच्या छातीपाशी ..उष्ण श्वास ..धपापणारे उर आणि नीरव शांतता.... आणि त्याची स्थिरावलेली नजर..
...त्याने अलगद तिला बाहुपाशात घेतले अन
कपाळावर ओठ टेकवले ...
तिच्यासाठी ह्यात अपार सुख होतं...
..आज प्रथमच ती पुरुषस्पर्श अनुभवत होती...
ती नजरानजर . त्याच्या मिठीत विरघळणं.. आणि मग सुरु झाला दोन श्वासांचा एकत्र प्रवास.. एका लयीत.. अलवार क्षणांची मोहक शृंखला... एका अनामिक नात्याचा युगुल प्रवास.. ..आज त्यालाही बऱ्याच वर्षांनी हे सुख अनुभवता आलं .अन मग जाग आली ती एका मेसेज टोन मुळे ..त्याने अलगद तिचा हात बाजूला केला ..तिचं निरागस शांत
पहुडलेलं रूप डोळ्यात साठवत त्यानी मेसेज वाचला.. वेळ पहिली.. आणि आठवलं.. एका प्रकाशकाची मीटिंग होती.. निघणं गरजेचं होतं.. एकदा तिला हाक मारून उठवूयात असं मनातही आलं पण नको.. लागलीये झोप.. नको उठवायला असं म्हणून.. आवरून बाहेर आला..
Latch ओढून निघून गेला..
सगळी उर्वरित संध्याकाळ मीटिंग आणि डिनर मध्ये गेली.. घरी पोचेपर्यंत दहा वाजून गेले होते.. कामाच्या व्यापात फोनकडेही लक्ष न्हवतं.
अरे ! पण रोजचा. तिचा येणारा मेसेज आज मिस कसा झाला.. या विचारानी त्याला काळजी वाटून गेली...
कुठेतरी मनात अपराधी पणाची भावना दाटून आली.. बापरे.. काय वाटलं असेल तिला. आपण संयम ठेवायला हवा होता का? पण तिचा ही उत्स्फूर्त प्रतिसाद होता.. नाही नाही.. काहीतरी भलताच विचार करतोय आपण.. आपलीही तिच्याबद्दल ची ओढ तिला जाणवली आहेच कि ... याच विचार चक्रात त्यानं तिला कॉल केला.. 1.. 2..5.. 7.. रिंग वाजतच राहिली.. प्रतिसाद शून्य... ऑनलाईन असेल.. कदाचित.. नाही.. last seen.. आपण पोचलोघरी त्या सुमारास.. म्हणजे 3.15pm..
अरे.. काय चालवलय हिनं .. इथे काळजीनं जीव जाईल माझा..
इतक्यात नोटिफिकेशन रिमाईंडर .. मेल चा.. सहज उघडून पाहिला...
आणि... आणि तो मटकन खालीच बसला... तिचा मेल..
आणि ह्या attachments.. ह्या कसल्या आता..
Omg.. मेडिकल रिपोर्ट्स.. अरे हे लेटेस्ट आहेत...
नवजीवन हॉस्पिटल...
आता जे काही त्यानी वाचलं त्यावर त्याचा विश्वास बसणं केवळ अशक्य होतं..
तिला ब्रेन ट्युमर होता.. ह्यात आधीचेही रिपोर्टस होते..तब्बल सहा महिन्यांपूर्वीची तारीख आहे... म्हणजे आपण त्याच दरम्यान भेटलो होतो...
तो भूतकाळात रमला काही क्षण.. तिचा कार्यक्रम ठरवायला आलेला कॉल.. मग आपल्या घरी येऊन घेतलेली आपली माहिती.. एक छोटी मुलाखत सुद्धा..
अचानक तो भानावर आला..
त्याने घाईघाईत त्या वर दिलेला इमरजन्सी नंबर वर कॉल केला...
पलीकडून तिचे डॉक्टर बोलत होते.. बोला.. मी डॉक्टर पेंडसे बोलतोय.. हॅलो... इथे त्यानी सगळा धीर एकवटला.. आणि एका दमात विचारलं.. ती अमुक अमुक तुमची पेशंट होती का?.. हो.. येस्स... पण सॉरी एक वाईट बातमी आहे .. त्या आज संध्याकाळीच गेल्या... "काय? त्याचा कातर आवाज... हो.. गेल्या काही महिन्यांपूर्वीच त्यांच्या ट्युमरच निदान झालं होतं...पण मोठी धीराची बाई ! एकट्याच असूनही कायम हसतमुख.. आणि मुळात सतत कामात व्यग्र.. पण गेले काही दिवस खूप आनंदी होत्या.. औषधांना ही उत्तम प्रतिसाद देत होत्या... रुटीन चेकअप ला मीच जायचो घरी.. आज गेलो तर दार बंद... बऱ्याच वेळा बेल वाजवूनही दार उघडलं नाही तेव्हा शेजाऱ्यांकडून किल्लीने दार उघडून आत गेलो ...चेहरा शांत.. समाधानी.. पण ठोकेच लागेनात.. त्या झोपेतच गेलेल्या होत्या... आपण कोण त्यांचे? हॅलो...
तिच्या आठवणींनी त्याचे डोळे भरून आले. मनोमन त्यानी तिला पत्नी मानलं होतं.. उद्याच तो तिला लग्नाची मागणी घालणार होता..आज तिच्या घरून निघतानाच त्याचा निर्णय फायनल झाला होता.. हवी होती तिची सोबत.. ... आणि... आणि आजचं ह्या नव्या नात्यानी त्याच्या मनात केलेल्या गृह प्रवेशाचा कलश.. त्याच्या मनाबाहेरच उपडा झाला....