डावे-उजवे....... सौ कांचन चाबूकस्वार
डावे-उजवे....... सौ कांचन चाबूकस्वार
माझ्या वकिलीची आयुष्यामध्ये एखाद्या मानसशास्त्रज्ञ पेक्षा देखील मानवी मनाचे पैलू माझ्यासमोर उलगडलेले मी पाहिले आहेत.
सारासार विवेकबुद्धी बरेच जण गहाणच ठेवतात. गोड बोलून कोपराने मऊ माती खण्ण्याचे बरेच नातेसंबंध दृष्टी समोर आले आहेत.
त्यातलंच एक उदाहरण बहुतेक घरांना लागू पडेल म्हणून हा प्रपंच.
नेहमीप्रमाणे सदाशिव खोत यांचा मला फोन आला. सदाशिव खोत हे फक्त नावालाच खोत, सगळं काही भांडण-तंटे मध्ये गमावून बसलेले, विचित्र स्वभाव मात्र धाकट्या मुलावर कमालीचा जीव.
सदाशिव खोत यांची वाडी आमच्या देसाई च्या वाड्याजवळ, आमच्या वडिलांनी मेहनतीने, काडीला काडी जुळवून, पै पै साठवून आपल्या नारळाचा बिजनेस उभा केला. मला शिकवलं, माझ्या बहिणीला उत्तम शिकवलं. आमचे वडील आमच्यासाठी एकदम आदर्श.
सदाशिव खोत खडक स्वभावाचे. फोनवरती त्यांनी मृत्युपत्र विषयी मला सूचना केली. " कांता पुढच्या रविवारी घरी ये, आता माझा भरोसा नाही, जे काय आहे त्याचं मृत्यूपत्र करून ठेवायचं आहे."
रविवारी सकाळीच मी घरी जाऊन थडकलो. सदा भाऊ माझी वाटच बघत होते. करकरणाऱ्या झोपाळ्यावर बसून मस्तपैकी सुपारी कातरत होते. योगेंद्र त्यांचा धाकटा मुलगा वाडीमध्ये गेला होता, तर जितेंद्र त्यांचा मोठा मुलगा मुंबईला एका प्रसिद्ध बँकेमध्ये अधिकारी म्हणून काम करत होता. योगेंद्र विशेष शिकला नाही, त्याला वाडी मधलं पण काम धड जमत नव्हतं. नुसता टिंगल-टवाळी करणे, संध्याकाळी कुठेतरी तंद्री लावून बसणे, हा योगेंद्र चा आवडता उद्योग. तसा तो सदाशिव भाऊंच्या पतपेढी वरती पण काम करत असे.
" कांता, तुला तर आमच्या घरची परिस्थिती माहित आहे, जितेंद्र शहरात बरं चाललं आहे, महिन्याच्या महिन्याला पगार येतो, इथे पण तो पैसे पाठवतो, खत घालायच्या वेळी फवारणी करायच्या वेळी पैसे सगळे जितेंद्रचे असतात. तुला तर माहित आहे वाडी मधून किती उत्पन्न येत असेल ते. त्यातून योगेंद्र च्या पदरात दोन मुलीच आहेत, पुढे त्यांचे लग्न कार्य सगळेच होणार, तर जितेंद्र ला व्यवस्थित एक मुलगा एक मुलगी आहे, शिवाय त्याच्याकडे पैसे आहेत त्यामुळे मला जितेंद्रची काळजी नाही. "
जितेंद्र आणि मी एकाच वर्गात होतो, बरेच वेळेला जितेंद्र गावातले त्यांच्या मामांच्या कडेच राहायचा, मामा डॉक्टर होते आणि त्यांना शिक्षणाविषयी फार तळमळ होती. मामांनीच पुढाकाराने जितेंद्रची फी भरून त्याला शहरात शिकायला पाठवले होते. जितेंद्रने मेहनत करून बीकॉम एमकॉम केले, गावातलीच चुणचुणीत शिल्पा त्याची बायको होती. शिल्पाने बेकरी, चॉकलेट बनवणे, इत्यादि बारीक-बारीक कोर्स केले होते आणि स्वतःचा छोटासा बिझनेस ती आपल्या हिमतीवर चालवत होती. खरं म्हणजे तिची धडपड वाखाणण्याजोगी होती. मुंबईला राहून स्पीकिंग इंग्लिश चा कोर्स करून ती मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये देखील ऑर्डर पुरवत असे. त्याच्या उलट योगेंद्र ची बायको चूल आणि मूल मध्येच अडकली. न स्वतः काही धडपड केली योगेंद्र प्रोत्साहन दिले त्याच्यावरती धाक ठेवला. योगेंद्र आणि जितेंद्र म्हणजे रेड्या- बैल याचं जोत झालं होतं.
" मी ठरवले आहे, वाडी घर सगळं काही योगेंद्र ला द्यावे, घरातली एखादी खोली जितेंद्र साठी ठेवून द्यावी." सदाभाऊ बोलत राहिले.
" भाऊ, अशी वाटणी बरोबर नाही, कायद्यामध्ये वडिलोपार्जित इस्टेट सगळ्या मुलांमध्ये सारखी वाटली जाते. आणि स्वकष्टार्जित इस्टेट फक्त ज्या त्या माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे ज्याला कोणास द्यायची त्याला देता येते. तुम्ही जितेंद्रचा हक्क पूर्णपणे मारत आहात." मी हिम्मत करून सदा भाऊंना म्हंटले. खरं म्हणजे मी त्यांच्यापासून जरा दूरच बसलो होतो, आता जरी आम्ही मोठे झालो असलो तरी सदाभाऊ कोणाच्याही कानफटीत लगावून देत, आणि त्यामध्ये त्यांना काहीही गैर वाटत नसे.
" तुम्ही शहरातली माणसं आम्हाला काही येडपट समजला? शेवटी माझी सेवा योगेन्द्र करणार आहे, आणि मला त्याचे भविष्य नको का बघायला?" सदाभाऊ त्रासाने म्हणाले.
तेवढ्यात गावातली चार अनुभवी वृद्ध मंडळी सदा भाऊंच्या दिवाणखान्यात जमले. पानसुपारीचा डबा फिरला आणि घरामध्ये चहाची ऑर्डर गेली.
" अरे सदा, बाप म्हणून तू जितेंद्र साठी काय केलेस
?" विषय समजल्यानंतर माझे वडील सदा भाऊंना म्हणाले.
" ते पण खरं, जितेंद्र कायमच मामाकडे राहिला, शहरातला खर्चदेखील मामाने दिला, तू काय केलेस त्याच्यासाठी?" कुलकर्णी मास्तर म्हणाले.
" सदा तुझी काय बुद्धी भ्रष्ट झाली का? तुझ्या वाडीला खत पाण्यासाठी, फवारणीसाठी, एवढेच काय तर तुझ्या हृदयाच्या च्या ऑपरेशन साठी देखील पैसे कोणी दिले होते रे? जितेंद्र ने ना? ते लेकरू कष्ट करून तुम्हा सगळ्यांचे भार उचलतो आहे, आणि बापजाद्यांची जमीन तुला आपल्या मुलांमध्ये व्यवस्थित वाटता येत नाही?" लेले आजोबा खेदाने म्हणाले.
" शहरात राहणं, आपलं बस्तान बसवणं, वाटते तेवढे सोपे नाही रे. सुपारीचे खांड यासारखे वरिष्ठ लोक हाताखालच्या लोकांना कातरून काढत असतात. आमची मुलं सांगतात ना." कुलकर्णी मास्तर म्हणाले.
" सम-समान वाटणी कशी करू? माझा योगेंद्र भिकेला लागेल. त्याच्यात काही हुनर न कला. ना शिक्षण ना अक्कल, शिवाय पदरात दोन पोरी. माझा जीव तुटतो रे त्याच्यासाठी." सदाभाऊ डोळ्यात पाणी आणून म्हणाली.
" अंगावर पडलं ना सगळं काही जमेल" लेले आजोबा म्हणाले." सतत त्याला पंखाखाली झाकून ठेवले होतेस, होऊ देत ना चुका, बसू दे थोडा मार, येईल अक्कल आपोआप."
" सदाभाऊ तू थोडे दिवस तीर्थयात्रेला जा, आपण सगळे जण जाऊ, दे जबाबदारी योगेंद्र ला, आणि आल्यावर ठरव कोणाला किती आणि काय द्यायचं ते.
एक लक्षात ठेव तुझा नंतर जितेंद्र- योगेंद्रला बघणार आहे. त्याला दुःख देऊन तुला चालायचं नाही. दोघांमध्ये समान वाटणी कर, त्याच्यानंतर जितेंद्र ला आपल्या भावाला काही द्यावं असं वाटलं तर तो देईल. समसमान वाटणी ने दोघांमध्ये प्रेम पण राहील नाहीतर जितेंद्र घरापासून तुटेल. आणि तसं झालं तर तुमच्या घराला ते परवडणार नाही. " . माझे वडील अधिकार वाणीने सदा भाऊंना म्हणाले.
बोलता-बोलता सगळी मित्रमंडळी तीर्थयात्रेच्या कल्पनेने थोडीशी आनंदित झाली. आता मला नवीन वर्षातच त्यांच्याकडे जावे लागणार होतं.
मी शहरांमध्ये परत आलो. आल्यावर जितेंद्रला सहजच भेटलो.
जितेंद्रने नेहमीप्रमाणे भरभरून, अतिशय प्रेमाने आपल्या कुटुंबाविषयी चौकशी केली. धाकटे वहिनीने पाठवलेले घरचे पोहे नारळाच्या वड्या अतिशय आनंदाने त्यांनी घरी नेल्या.
काही दिवसांनी सहजच मी जितेंद्रला मुद्दामच घरी बोलावले आणि गावच्या मिटिंग मध्ये काय झालं हे त्याच्या कानावर घातलं.
" मला कल्पना होती, भाऊ नेहमी डावं-उजवं करत. त्यांना स्वतःला शिक्षणाची अजिबातच आवड नव्हती त्याच्यामुळे मी शिकतोय म्हटल्यावर ती माझी जबाबदारी मेव्हणा वर टाकून ते मोकळे झाले. तुला तर माहिती आहे ना माझ्याकडून मामी किती काम करून घ्यायचे ते. पाच पाच किलोमीटर तंगडतोड करत शाळेत जायचं घरी आल्यावर ती मामी च्या हाताखाली काम करायचं मग अभ्यास किती हालअपेष्टा काढल्या. शहरात पण मामा पाठवतील तेवढ्याच पैशात मी गुजराण करत होतो तुला तर सगळंच माहिती आहे." जितेंद्र कधीही बोलायचं नाही पण आज त्याला राहवत नव्हतं.
" अरे भाऊ नी कधी मला नवीन कपडे देखील केले नाहीत, सगळे लाड मठ्ठ योगेंद्र चे केले. खाण्यापिण्यात देखील कायम डावं-उजवं. घरी गेल्यावर आईने कधी कौतुक आणि गोडधोड केलं तर भाऊ कुचेष्टेने म्हणत, शहरात वडे भजी खात असेल तुझा पोरगा कशाला फालतू लाड करतेस. आई गेल्यापासून मला घरी जावसं वाटत नाही. देऊ देत भाऊंना वाडी आणि घर योगेंद्र ला." जितेंद्र चेहरा दुःखाने अतिशय पीळवटला गेला होता.
त्याच्या खांद्यावर हात ठेवून मी म्हटलं," असं निराश होऊ नकोस, बघुया काय करता येईल ते."
जितेंद्रने पाठवलेल्या पैशावर ती सदाभाऊ ची तीर्थ यात्रा फारच व्यवस्थित पार पडली, त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांना काय सल्ले दिले ते आल्यावरती जाणवलं. पुढच्या महिन्यातच मला बोलवण आलं, माझ्यासोबत जितेंद्र आणि त्याच्या कुटुंबाला देखील भाऊंनी गावी बोलवलं होतं.
डिसेंबर सुंदर महिना चालू होता, आपल्या वाडीची आणि घराची समसमान वाटणी दोन्ही मुलांमध्ये केली, एक छोटा हिस्सा त्यांनी स्वतःसाठी राखून ठेवला अडीअडचणीला किंवा कोणाला द्यायचं असेल तर. अशा रीतीने घरात पडणारी भेग सगळ्या मित्र मंडळ यांनी यशस्वीरित्या बुजवली आणि सर्व कुटुंबाला परत जोडले.