चूक
चूक
प्रांजल आजकाल जरा जास्तच उत्साहित असायची कारण पुढच्या आठवड्यात प्रांजलचा वाढदिवस असतो. प्रांजलने प्रतिकला म्हणजेच तिच्या नवऱ्याला वाढदिवसाच्या दिवशी ऑफिसमधून सुट्टी घ्यायला सांगितली. तिने मनात खूप काही प्लान करून ठेवले होते म्हणून प्रतिकने त्या दिवशी सुट्टी घ्यावी असे तिला वाटत होते. प्रतिकने ते ऐकलं न ऐकलंसं करून ‘let’s see…..बघुयात त्या वेळी एवढंच उत्तर दिलं.
प्रांजलला त्याचं हे उत्तर फारसं काही आवडलं नाही. तिची चिडचिड होत होती. तिला वाटत होतं प्रतिकला आपल्यापेक्षा ऑफिसची कमिटमेंट, काम सर्वात जास्त महत्त्वाची आहेत. तो नेहमीच असं वागतो.
"काय हो प्रतीक तुम्ही नेहमीच असं करता. एक दिवस सुट्टी घ्या म्हटलं तर तुमची काही ना काही कारणं असतातच. मी जास्त काही मागते का हो तुमच्याकडे... एक दिवस सुट्टी फक्त!!! तेही तुम्हाला जमू नये." म्हणत ती भांड्यांची आदळआपट करायला लागली.
"तुम्ही स्वत: तर आपणहून कधी माझ्या वाढदिवसाचा विषय काढतच नाही, तरीही जाऊ द्या कामातून लक्षात राहत नसेल, उगीच कशाला लहान लहान गोष्टी ताणून धरायच्या म्हणून मी आपलं दुर्लक्ष करते आणि स्वतः तुम्हाला आठवण करून देते. तरीही तुम्हाला त्याचं काही कौतुक नाही. तुमचं आपलं ठरलेलं नेहमीचंच उत्तर, "बघू परत. वैताग आला आहे मला." ती बडबड करतच भांडी घासत होती.
"लहानपणी बरं होतं, आई आठवडा आधीपासूनच वाढदिवसाच्या तयारीला लागायची. आपण फक्त ऑर्डरी सोडायच्या, काय हवं काय नको ते फक्त सांगायचं. गिफ्ट, नवे कपडे सगळं किती छान होतं आणि इथे मागूनही काही मिळत नाही. वाऽऽऽ! किती छान मजेत जात होता तो आठवडा!"
जाऊ दे आपण आता विषयच काढायचा नाही असं ती ठरवते. पण दररोज प्रतिकला टोमणे मारणे आणि मी बिचारी किती सोशिक हे दाखवणं चालूच होतं.
शेवटी वाढदिवसाचा दिवस उजाडला. दहा वाजत आले तरी प्रतीक काही उठायचं नाव घेत नाही हे पाहून ती पाण्याचा तांब्या आणून त्याच्यावर ओतते.
"अरे, राहिला माझा वाढदिवस कमीत कमी ऑफिस आहे म्हणून तर उठावं ना?" ती बडबडते.
इतक्यात दारावरची बेल वाजते आणि प्रांजल जाऊन दार उघडते तर प्रतिकने ऑनलाईन मागवलेला फुलांचा गुच्छ दारात हजर!!! प्रांजलला अगदी भरून आलं. तिने प्रतिककडे पाहिलं. तोही हसत होता. तिला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा दिल्या आणि... get ready madam!!! म्हणत अंथरुणातून उठला.
प्रांजलच्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवण आणि तिला आवडेल तसा दिवस व्यतीत करायचा असा बेत त्याने ठरवला होता. प्रांजलला तिच्या मागच्या आठवड्यातील वागण्यावर खूप पश्चात्ताप होत होता. प्रतिकचं ऑफिसमधून सुट्टी न घेणं आणि त्याच्या वागण्यावर तिने घेतलेली शंका या गोष्टी तिला त्रास देत होत्या. पण हे सगळं क्षणात विसरून ती स्वत:शीच हसली आणि तयारीला लागली!!!
"प्रतीक, मला माफ करा. वेडीच आहे मी, मला काहीच कळत नाही. अशा लहान लहान चूका मी नेहमीच करत असते." ती हॉटेलात जेवण करता करता प्रतिकची माफी मागत होती.
"अगं तू नाही चुकली, मीच सगळ्यात मोठी चूक केली आहे." प्रतीक तिच्याकडे पाहत हसत बोलतो.
"काय हो, कोणती चूक." प्रांजल त्याला विचारते.
"तुझ्याशी लग्न करून पण ही माझ्या आयुष्यातील सगळ्यात गोड चूक आहे हं." तो तिच्याकडे पाहत डोळे मिचकावतो.
वरील प्रांजल आणि प्रतीकची गोष्ट यात विशेष असं काही नाही. नेहमी सगळ्याच घरात हे घडतच असतं.
या गोष्टीकडे जर बारकाईने विचारपूर्वक पाहिलं तर काही गोष्टी सहज आपल्या लक्षात येतील. गैरसमज होण्यासाठी आपलं अनवधानाने केलेले वर्तन आणि विचारच कारणीभूत ठरतात. प्रतिकने त्याच्या कृतीतून आपलं प्रेम व्यक्त केलं होतं पण संवाद नीट न झाल्यामुळे प्रांजलचा रागाचा पारा चढला आणि पूर्ण आठवडा प्रतिकच्या प्रेमावर, शंका घेण्यात गेला पण शेवट गोड झाला हे महत्वाचं.