छपऱ्याची मंजा - भाग १
छपऱ्याची मंजा - भाग १
चैती अष्टमीस देवीच्या भंडाऱ्याचं कढाणीतलं मटण खाऊन खिरणीकर तृप्त ढेकर देत गरमाईत झोपण्याच्या तयारीस लागले. पण पाटलाचा गणा मात्र मटण खाऊन खलाटीत निघाला. गुढीपाडव्यास बऱ्याच वावरातला गहू कापला गेला होता. पण गणाचा गहू पसाद असल्यानं शेवटचं पाणी फिरवून तो ही कापणी करणार होता. म्हणून शेवटचे राहिलेले दहा-बारा पाळगे आज भरले की झालं, असा विचार करत तो खलाटीत निघाला. जाताना सब-स्टेशन लागलं. मागच्या यादेनं व दिवसभराच्या मटणाच्या वासानं त्याच्या अंगावर काटा उभा राहिला.
गोवंडी वाटेतून फपाट्यातून तो चालू लागला. तसं आभायातून उगवलेला अर्धा चांदही त्याच्या पुढे पुढे सरकू लागला. वाटेच्या कडेच्या साबरीतून चांदाचा रूपेरी प्रकाश झिरपत फपाट्यात सांडत होता. वर पाहता पाहता फपाट्यात फिश सुई सुई सू आवाज आला नी गणानं चांदावरची नजर खाली फेकत उडी मारत दौड लावली. त्याचं सारं अंग शहारलं. नाडीचे ठोके वाढत छाती धडधड करू लागली. घरून निघतानाच बाबानं काठी ठोकत चालायचं बजावलं होतं. 'या दिवसात रात्री फपाट्यात गोवंडीत जनावर पडलं असतं' हे आठवलं नी तो हातातली काठी आपटत लांब लांब फर्लांगी भरू लागला.
मळ्यात येताच उंबराच्या छायेतली धाव त्याला घाबरवू लागली. उंबराखालचं बैलाचं गोळा करून ठेवलेलं शेण उचलत थाळण्याजवळच्या कुंड्यातून भरलेल्या बादलीत कालवत पाईपात टाकलं. फुटबाॅलची झडप खाली पडून चार-पाच बादल्यात पाईप भरला. त्यानं ओले हात मनिला पॅन्टला पुसत स्टार्टर उचलताच 'गुईंग टर्रर्र फट' आवाज करत मोटारीनं पाणी धरलं. गणा दांडातून सरकणाऱ्या पाण्यासोबत गव्हाच्या राहिलेल्या पाळग्याकडं सरकू लागला. दांडाच्या पाण्यातून अष्टमीच्या चांदव्याचं चांदणं वाहत चाललं होतं. वातावरणात दिवसाची गरमाई कमी होत थंड सुरकी चालायला लागली होती. पिवळ्या भरलेल्या गव्हाच्या लोमा त्या सुरकीत लईत डुलत होत्या. चांद आता वर वर चढत होता. गव्हाच्या पाळग्यातून गजा विहीरीकडं पाहू लागला. भलं मोठं उंबराचं झाड सुरकीनं हालत असेल तरी अंतरावरून त्याला झटाधारी साधू ध्यानास बसल्यागत भासत होतं. त्याची सावली मात्र आता धावेकडून हळूहळू सरकत चांदाच्या प्रकाशानं विहीरीपलिकडे जात विहीरीवरील चुन्या सिमेंटात बांधलेल्या थाळण्याच्या हुडाच्या भिंती चमकत होत्या.
एका पाठोपाठ पाचेक पाळगे भरले गेले. आता अर्धा चांद फिकट तांबूस होत मावळणीकडं झुकायला लागला. तोच निरव शांततेत मोटारीचा 'खट' आवाज होत सुरू असलेला गुईंग असा आवाज बंद होत मोटारीनं पाणी सोडलं. गजाला विहीरीकडं जायला भिती वाटत असतानाही जाणं भाग होतं. पाळग्यातून तो खालच्या बांधावरनं होत चिंचेच्या झाडाकडनं विहीरीकडं येऊ लागला. चिंचेच्या झाडावर वाऱ्याच्या सुरकीत पिकलेल्या चिंचा एकमेकींना ठोकल्या जात होत्या. गजाच्या याच झाडाच्या चिंचाची चिंचवाणी करत खिरणीकरांनी शिमग्याला शेवाळ्या चोपल्या होत्या. महिना उलटायला आला होता तरी झाड चिंचांनी लगडलेलंच होतं. आता आखाजीस येणाऱ्या सासुरवाशिणी लेकीबाळीदेखील आपल्या सासरी वानवळा म्हणून याच चिंचा नेतील.
गणाचा सासुल लागताच झाडावरील भारद्वाज पंखाची फडफड करत उडाला. त्यानं गजाच्या अंगाचा थरकाप उडाला व तो वर पाहू लागला. भारद्वाज उडत उडत विहीरीच्या उंबरावर विसावला. गजानं विहीरीवर येत फ्यूज पाहीले. नंतर पाळणकडं श्रीपत पाटलाच्या मळ्यातील लाईटकडं पाहताच तो बंद झालेला दिसताच एक डिवो गेल्याचं त्याच्या ध्यानात आलं. त्यानं कुंड्यात पाय धुत खिशातनं कातरलेली सुपारी काढली व तोंडात टाकली. आता कोणी तरी ट्रांन्सफाॅर्मरवर जाऊन डिवो टाकेल तेव्हाच मोटार सुरू होईल. पण शिवारातले बरेच गहू कापले गेल्यानं भरणा जवळपास आटोपलाच होता. पण त्याला तरी विहीरीवर थांबायला भिती वाटू लागली.मागच्या वर्षापासून त्यांनी मळ्यातला मुक्काम सोडलाच होता. आज मात्र काही करून राहिलेला गहू भरावाच लागणार होता व श्रीपती पाटलांचा भुईमुग व ऊस असल्यानं ते जातीलच म्हणून तो धावेपासून लांब कापूस काढून रिकाम्या झालेल्या शेतात आला. थंड सुरकी, मटणाचं चेपलेलं जेवण यानं डोळे जड झाले. खालचे ढेकळं साफ करत त्यानं लाईटची वाट पाहत अंग टाकलं. नी भितीवर गाढ झोपेनं मात करत गजा घोरू लागला.
चांद बुडाला. कुणीतरी डिवो टाकला असावा. स्टार्टरची पेटी लटकवलेल्या पोलवरील बल्ब पिवळा प्रकाश धावेवर, थाळण्यात फेकू लागला. पण गजा मात्र गव्हाला पाणी भरायचं सोडून फर्राट घोरत होता. घोरता घोरता त्याला पहाटेच्या थंड वाऱ्यानं की हसण्याच्या आवाजानं तीनच्या सुमारास थोडी जागेची जाणीव आली. त्याला पडल्या पडल्या हसणं कानावर ऐकू येऊ लागलं. सुरुवातीस आपण कुठं झोपलोय, हे त्याला कळेना. पण खाली टोचणाऱ्या खड्यांनी व गोवंडी वाटेकडनं येणाऱ्या कर्णकर्कश 'टिटीव टिव, टिटीव टिव, टिटिटीव' टिटवीच्या आवाजानं आपण मळ्यात झोपलोय हे समजण्या इतपत सुध त्याला आली. पण हसतंय कोण?म्हणून त्यानं पडल्या पडल्या डोळे किलकिले करत विहीरीच्या धावेकडं पाहिलं. बल्ब सुरू दिसताच लाईट आलीय हे त्यानं ओळखत नजर थेट आवाजाकडं थाळण्यात नेली. थाळण्यात त्याला पडल्या जागेवरून जे दिसत होतं त्यानं त्याची सारी उरलीसुरली झोपेची धुंदी पळून त्याच्या काळजाची धडधड जोरात वाढू लागली. कुणीतरी थाळण्यात आभाळाकडं तोंड करून झोपलं असावं. त्यानं आपले पाय वर करत पावलावर एका छोट्या मुलाला पोटावर तोललेलं होतं. हातानं मुलाचे हात धरत तो मुलाला पायानं वरखाली करत होता व तो मुलगा जोरजोरात हसत होता,
"बाबा गुदगुल्या होताहेत उतरवा ना. बाबा, बाबा सांभाळा हळू ना! विहीरीत पडेन बरं!" मुलगा हसता हसता विनवत ही होता.
"नाही रे नाही पडू देणार!"असं म्हणत खालचा माणुस जोरजोरानं मुलाला पायानं वर खाली करत हसवत होता.
गजाला आता तो माणूस थाळण्यात दिसत नसला तरी त्यानं तो छगन छपरी असल्याचं मुलावरून ओळखलं. गजाला पडल्या जागी थंड वाऱ्यातही दरदरून घाम फुटला व त्याचं सर्वांग ओलं झालं. आता काय करावं त्याला सुधरेना. उठून पळावं तर त्याच्या अंगातली शक्तीच, सारी गात्रे गलितगात्रे झाल्यागत झालं. तो पडून पडून तसाच पाहू लागला.
“गटल्या माफ कर... मी खादाड, हाफशा, अप्पलपोट्या आहे, असं तुझ्या मंजा मायला वाटतं. पण तुझ्या मंजा मायला दाखवू रे आपण की मरुनही मटण खायला नाही येता येत. नी मरू पण मटण खाणारच नाही आपण... चल..."असं म्हणत त्या छगण्यानं पायानंच गटलूला फुटबाॅलसारखं विहीरीत उडवलं. पोरगं, "बाबाsssssssss.बा..."आक्रोश मांडणार तोच "चुबाॅक... टुब...” करत विहीरीत आवाज व पाठोपाठ पाणी उडालं. नी छगण्यानंही "गटल्या थांब मी पण आलोच...” म्हणत पाण्यात उडी घेतली...
गजाची झोपल्या जागेची ढेकळं भिजून केव्हा मऊ झाली हे कळायच्या आत गजानं उठत वाऱ्याच्या वेगानं गावाकडं धूम ठोकली. तोच मागून छगन्या व पोरगं गटलू पाठलाग करू लागलं.
"गजा पाटील! पळू नका थांबा थांबा. अहो ऐका ना पळू नका. मी छगन छपरी. आमच्या मंजीस निरोप द्यायचाय हो." छगन सारखा पाठीमागं धावतोय व आपलं मानगूट पकडेलच म्हणून गजा ऊर फुटेस्तोवर धावत होता. इतुकलं बारकं गटलूही आपल्या बापासोबतच भन्नाट धावत गजाला टिपायला करत होतं.
"गजा पाटील, एका वर्षात ओळख विसरलात का? थांबा जरा नी ऐका. आमच्या मंजीला फक्त एवढं सांगा की आज खिरणीच्या गावदेवीच्या भंडाऱ्यात साऱ्या गावानं मटण चेपलं पण तरी आम्ही नाही आलोत मटण खायला! आम्ही इतके खादाड नाहीत की मरूनही खायला येऊ! द्या हो एवढा निरोप...”
गजा पाटील गोवंडी वाट, साबरी, बांध जे लागेल ते तुडवत धावत होते. दम फुटुन ऊर बाहेर यायला करत होता. गजा पाटील गावाकडं धावत होते असं त्याला वाटत होतं पण पहाटेचा झेंडू फुटेस्तोवर गजा पाटील सारं शिवार धावतच होता. पण त्याला गाव काही सापडत नव्हतं. खिरणीत पहाटेचा कोंबडा आरवण्या आधीच टिटव्यांनी कल्लोड करत लोकांना जागं केलं. तोच एकानं गावात सब स्टेशन जवळ गजा पाटील पडल्याची बोंब ठोकली. सारा गाव गोळा झाला. पण गजा पाटील तर केव्हाच गाव सोडून गेला होता. कालचं मटण तर बाधलं नाही?असा जो तो शंका व्यक्त करू लागला. पण अंगावरच्या फाटलेल्या कपड्यांनी ती शंकाही बाद केली. उशीरानं आलेल्या डाॅक्टरानं 'हृदयविकाराचा झटका' इतकंच त्रोटक सांगत साऱ्या शंका बाजूला करत गजा पाटलाला अखेरचा निरोप देण्यासाठी अंगणात लाकुड,गोवरी पेटवत हलगी घुमवली.
पण आता खिरणीत जेव्हा जेव्हा मटणाचा भंडारा व गोंधळ होणार होता. तेव्हा तेव्हा छगन छपरी गटलूसहीत मंजाला सांगण्यासाठी येणारच होता अशी पुसटदेखील शंका कुणास आली नाही.