STORYMIRROR

UTKARSH DURYODHANe

Thriller

3  

UTKARSH DURYODHANe

Thriller

ब्रह्मांडयुद्ध

ब्रह्मांडयुद्ध

16 mins
231

वर्ष 2754,

स्थळ, आपली पृथ्वी,     

 

             पृथ्वीवर सद्यस्थितीत, सर्वत्र पाण्याचे साम्राज्य आहे. सर्वत्र महासागराने हाहाकार माजवलेला आहे. पूर्ण जमिनीखालील पाणी समुद्रात मिसळून खारट बनले आहे. जमिनीखालील पाणी नाही म्हणजे तलाव नाही, झुळझुळ वाहणाऱ्या नद्याही नाहीत, तळे ही नाहीच. सोबतच पृथ्वीवरील पूर्ण बर्फ वितळलेले आहे, ह्याचेच कारण म्हणजे, अर्ध्याहून जास्त जमीन पाण्याखाली गेलेली आहे. ह्याचा फायदा समुद्रातील असलेल्या जलचर प्राण्यांना व्हायला हवा होता, पण ह्याच्या उलट त्यांच्यावर परिणाम झाला आहे. पूर्ण समुद्रात, एवढ्या वर्षात मानवनिर्मित रसायन पसरल्याने समुद्रातील जवळपास ९५% जलचर प्राणी विलुप्त झालेत. जे पाच टक्के उरले आहेत, त्यांनी अश्या परिस्थितीनुसार स्वतःला बदलून घेतलं, आपले अस्तित्व टिकविण्यासाठी.        

 

               उरलेल्या जमिनीवरीलही प्राण्यांचेही असलेच हाल. वातावरणात प्राणघातक विषारी वायूमुळे फक्त काहीच प्राणी शिल्लक आहेत. पृथ्वीवर सद्यस्थितीत फक्त दोनच खंड आहेत, एकतर आफ्रिका खंड आणि दुसरा म्हणजे आशिया खंड, बाकीचे पाचही खंड एकतर समुद्रात बुळले आहेत, तर काही नुकत्याच झालेल्या विश्वयुध्दात अणुबॉम्ब मुळे नष्ट झाले आहेत. शिल्लक असलेले दोनही खंड विभागले गेले आहेत, आफ्रिकेत इतर प्राणी असणार आणि आशिया खंडात फक्त मनुष्यवस्ती. मागील काही वर्षातच मानवाला कळले आहे की, इतर प्राणांशीवाय आपलेही अस्तित्व राहणार नाही, आपणही जगू शकणार नाही. म्हणूनच इतर प्राण्यांसाठी विशेष वेगळा खंड दिल्या गेला आहे.            

 

                  वर्ष 2500च्या काळात मानवी लोकसंख्या जवळपास पाचशे बिलिअनपर्यंत पोहोचली होती. लोकांना खायला काही नव्हतं, सर्वत्र रोगराई पसरली होती, कुणालाही कुणाचा खून करण्याची मुभा दिल्या गेली होती, सर्वत्र कत्तली, मारहानी, भांडण, जिथेतीथे प्रेताचा सडा, सर्वत्र चिड्या-मुंग्यांसारखे लोक, काही पाण्यासाठी झगडणारे तर काही एक वेळच्या जेवण मिळविण्यासाठी काहीही करण्यास तयार होणारे. चोरांची संख्या वाढूनही फायदा नव्हता, कारण चोरण्यासाठी काहीही शिल्लक नव्हते. जगभरात दोनच नेते होते, दोघांनाही पृथ्वीचा राजा बनण्याची हौस होती. सर्व लोक विभागले गेले दोन वेगवेगळ्या नेत्यांसोबत. दोनही नेते एकमेकांचे कट्टर वैरी. आपापल्या लोकांना विरुद्ध नेत्याविषयी भडकावून, लोकांत द्वेष वाढवून सर्वत्र भांडणे निर्माण करू लागली होती. पृथ्वीतलावर कुठल्याही व्यक्तीला अधिकार नव्हता त्या दोन नेत्याविरुद्ध बोलण्याचा, आणि एका पार्टीतून दुसरी पार्टीही बदलविण्याचा अधिकार नव्हता. 

 

               लोकांच्या आपापसातील भांडणात मोठमोठे युद्ध होऊ लागले होते. प्रत्येक युद्धात लोकांचा बळी अश्याप्रकारे जायचा जणू लाल मृतांचा गावच बनून जायची ती जागा, पण तरीही युद्धात कोण जिंकले हे निश्चित करता येत नव्हते. म्हणून खरा विजेता कोण?, हे ठरवून घेण्यासाठी शेवटी सर्वात मोठ्या युद्धाची, म्हणजे विश्वयुद्धाची घोषणा करण्यात आली. कुणालाही विश्वयुद्ध नको होतं, कारण मागील विश्वयुद्धाचे असर अजून संपलेले नव्हते, पण पर्यायही नव्हता कारण त्या दोन नेत्याच्या विरोधात बोलणे म्हणजे तसेही मरण पत्करणेच होय, म्हणून, सर्वच लोक म्हणजे पाचशे बिलिअन लोक स्वतः युद्धात भाग घेतले होते. 

 

              चौथे विश्वयुध्द शेवटी घडलेच. ह्या विश्वयुध्दात 95% लोक मारले गेले, पण तरीही निर्णय लागला नव्हता की विजेता कोण, म्हणून शेवटी अणुबॉम्ब सोडण्याचा निर्णय घेतला आणि ज्याची भीती होती तेच घडले. ह्या सर्वात मोठ्या विश्वयुध्दात जवळपास सर्वच लोक मरण पावले, फक्त खूप अडचणींचा सामना करून वाचलेल्या लोकांची संख्या 50-60 मिलियन लोक वाचले होते. ह्यांच्यातील एक माणूस पुढारी नेता म्हणून पुढे आला. त्यानेच सर्व लोकांना सांभाळले, सर्वांना एकत्र करून नवीन युगाची सुरुवात केली. मोठमोठ्या अणुबॉम्ब मुळे पूर्ण खंडच्या खंडच नष्ट झालेत. उरलेत फक्त दोन आफ्रिका आणि आशिया. 

 

             तोच पुढारी असलेल्या नेत्याचे नाव अतृपत्नकृत होते. त्याने आपल्यासारख्याच एवढ्या मोठ्या भीषण लढाईतून वाचलेल्या जिवंत लोकांना एकत्र गोळा केले, त्यांचे मनोबल वाढविले, ज्यांना उपचाराची गरज होती, त्यांना उपचार दिला. काही लोकांची मदत घेऊन, सर्वत्र पडून असलेल्या मृतांना वेगळे केले. आफ्रिका खंडात अडकलेल्या सर्व लोकांना जमा करून आशिया खंडात आणले. चीनचा दक्षिण भाग, भारताच्या उत्तर भागात म्हणजे काश्मीरच्या पूर्वेला, हिमालयाच्या जवळच मानवी वस्ती निर्माण केली. अतृपत्नकृत चांगलाच शिक्षित होता. तो नुकताच केनियाची स्पेस एजन्सी KSR मध्ये रूजू झाला होता. वयही जास्त नव्हतेच त्याचे. विश्वयुद्ध होणार हे ठाऊक झाल्यावरच तो परत आपला देश भारतात आला होता., त्याचा पूर्ण परिवार त्या लढाईत मारला गेला होता. पण स्वतःचे दुःख सावरून, लोकांना चांगले धडे गुरवू लागला होता. त्यानेच सर्वांचे प्राण वाचवून, सर्वांना एकत्र करून नव्या युगाची स्वप्ने रंगविण्याऱ्या अतृपत्नकृतचे प्रत्येक आदेश उत्साहाने पार पळू लागले. अतृपत्नकृतही लोकांना चांगले धडे गुरवू लागला, सर्वांत प्रेम, दया, आपुलकीचे मूल्य समजावू लागला. हा पहिला युग होता, जिथे सर्व लोक एकमताने एकाच व्यक्तीवर एवढा विश्वास दाखवीत होते. अतृपत्नकृतने सर्व लोकांना विभागून घेतले, सर्वांना वेगवेगळी कामे दिलीत, काहींना शेती करायला सांगितले, जेणेकरून सर्वाना जीवन जगता येईल, काहींना, शेती करायला वातावरण निर्माण करायला सांगितले कारण अणुबॉम्बच्या एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतर पूर्ण आकाशात काळे ढग निर्माण झाले होते. वेदरिंग कंट्रोलर मशीनने हवामान बदलविता येत होते, ढगांना कॅट्रोल करता येत होते. सोबतच काही मोजक्या लोकांना, सर्व नागरिकांच्या शिक्षणाची जबाबदारी दिली. काहींना रिसर्च फिल्डवर फोकस करायला सांगितले. काही नागरिकांना दुसऱ्या छोट्या मोठ्या कामावर लक्ष द्यायला सांगितले, काहींना एनर्जीचा उपयोग करायला सांगितले, जेणेकरून सर्वांना सुलभ जीवन जगता येईल, तर काहींना शहरांची निर्मिती करायला सांगितले, स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी आणि पुढच्या पिढीला वाढविण्यासाठी. 

 

                सर्वच लोक एकमत असल्याने, कुठेही भांडण नाही, कुठेही राग-द्वेष नाही, सर्व लोक मिळून मिसळून काम करत होते. सर्वांच्या जिद्दीने आणि चिकाटीने, दिवसरात्र केलेल्या मेहनतीच्या जोरावर, फक्त एका वर्षात, एक हायटेक शहराची निर्मिती झाली, जिथे कुणीही गरीब नव्हते, कुणीही श्रीमंत नव्हते, कुठलाही भेदभाव नव्हता, सर्वांना दोन वेळेचे जेवण मिळत होते, राहायला घर होते, जीवन जगायला ज्या वस्तू पाहिजे असेल, ते सर्वच लोकांकडे उपलब्ध होते. सर्व 60-70 मिलियन लोक शिक्षित बनले होते, फक्त एका वर्षात लोकांना हेही समजलं होतं की, जास्त लोकसंख्या वाढली तर आपली पूर्ण मानवजात एक ना एक दिवस विलुप्त नक्की होईल, म्हणून सर्वाना ह्याची समज झाली. सर्वांनी आपले फक्त एकच अपत्य ठेवण्यावर जोर दिला, कुणीही दुसऱ्या अपत्याबदल विचारही करत नव्हते. सर्व मुलांना आपलीच मुले संबोधू लागले होते. ह्याच काळात, अतृपत्नकृतने मोठा निर्णय घेतला की, आशिया खंडात लोकवस्ती राहील, आणि आफ्रिका खंडात फक्त प्राणी राहणार,.., तिथे कोणत्याही प्राण्यांना मारण्याचा किंवा त्यांना त्रास द्यायचा कोणत्याही मानवाला हक्क राहणार नाही, असा जणू कायदाच बनवून टाकला. आता आफ्रिकेमध्ये कोणत्याही माणसाला राहता येत नव्हते, पण आशिया खंडात जंगली प्राण्यांना, आणि पाळीव प्राण्यांना जगवायची अनुमती होती. सर्व लोकांचा उद्धार केल्याने अतृपत्नकृतला राजा बनविण्यात आले. त्याला जणू देवाचा दर्जा दिले.            

 

 ह्याच काळापासून विज्ञानिक युग सुरू झाले. प्रत्येक क्षेत्रात प्रगती वाढतच जात होती. सर्वांनी विज्ञानावर जोर दिला, जेवढे आत्तापर्यंत रिसर्च झाले होते, तिथूनच पुढे त्याचा विस्तार करू लागले होते. फक्त पुढील पाच वर्षात एक नवीन स्पेस रिसर्च प्रोग्रॅम सुरू झाला होता. पुढील दहा वर्षातच मानवजात पहिल्या प्रकारच्या सभ्यता बनण्याच्या वाटचालीवर होते(Type-1 civilisation). अशी वाटचाल जिथे, मानवाचा पूर्ण कंट्रोल होता, पृथ्वीवर, सूर्यापासून मिळणारी पूर्ण ऊर्जेचा उपयोग करण्यासाठी मानव सक्षम होता. वातावरणावर पूर्ण मानवाचा कंट्रोल होता. उपग्रह चंद्रावर, ग्रह मंगळावर, नेपचूनच्या उपग्रह ट्रीटॉन, शनीच्या उपग्रह टायटन वर मानवाची ये-जा होऊ लागली. सोबतच मानवाने ह्याहूनही दुसरे ठिकाण आपल्याच जवळच्या ग्रहावर किंवा त्यांच्या उपग्रहावर बघून ठेवली होती, जिथे मानवाला जगायला उत्तम जागा ठरत असेल, तिथे तिथे आपल्या कॉलनी वाढवू लागलेत, जी जागा उत्तम नसेल, तिथे आपल्या रीतीने काही विज्ञानाच्या मदतीने मानवाच्या राहण्यासाठी मूलभूत अशी जागा बनवू लागले. सोबतच काही लोकांना तिथे राहायलाही पाठविले. अतृपत्नकृतच्या मते, जर पूर्ण मानवजात पृथ्वीवरच असली आणि एकाच वेळी पृथ्वीला काही झाले, तर संपूर्ण मानवजातच नष्ट होईल, जसे चौथ्या विश्वयुद्धात होता होता वाचले. मानवजातीचे अस्तित्व टिकून राहावे म्हणून, वेगवेगळ्या ग्रहावर काही मानवाला ठेवण्यात आले, पण त्यांनाही पृथ्वीवरून अतृपत्नकृतच कंट्रोल करत होता, तोच सर्वाना आदेश देत होता.

            

                ह्याच युगात, मानवनिर्मित रोबोटलाही त्यांचं अस्तित्व देण्यात आलं, कारण साल 2150च्या नंतर रोबोटचे अस्तित्वच मिटविण्यात आले होते. कारण होते, लोकांची वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या नोकऱ्या. त्या काळात एवढे ऍडव्हान्स रोबोट निर्माण झाले होते, की ते स्वतःचा विचारही करू शकतील. पण तरीही मानव जातीला प्राथमिकता देऊन, पूर्ण लोकांचा विचार करून सर्व रोबोट्सला तेव्हाच नष्ट करण्यात आले होते. पण अतृपत्नकृतने पुन्हा रोबोटचा काळ आणला. रोबोट्सला मानवाने बनविले, पण त्यानंतरचे रोबोट्स स्वतः रोबोट्स बनवू लागले. रोबोट्सची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स प्रगत असल्याने, मानवासारख्याच हावभाव, भावना, दुसऱ्याप्रति प्रेम आणि आपुलकी अवगत असल्याने, त्यांनाही नागरिकता मिळू लागली. रोबोट्सच्या फॅक्टरी मध्ये रोबोट्सच रोबोटला बनवत होते, आणि बनवलेल्या रोबोट्सला इतर रोबोट्सला देऊन ते इतर रोबोट्स मिळालेल्या नव्या रोबोटची जणू आपल्या अपत्यप्रमाणेच सेवा करत होते. म्हणजेच रोबोट मेल आणि रोबोट फिमेल मिळून एक नवा रोबोट घेत आणि आपला संसार थाटत जात. त्यांनी स्वतःची कॉलनी बनविली, आशिया खंडाच्या एकदम दक्षिणेला जिथे सूर्यप्रकाश जास्त प्रमाणात येत होते, कारण त्यांची चार्जिंग सूर्याच्या उष्णतेनेच होऊ शकत होती. 

 

               आपला इतिहास विसरून, सर्वजण आपापल्या संसारात एकदम आनंदी होते. पूर्ण लोकांची जनसंख्या नियंत्रणात होती, सर्वाना सुखसुविधा मिळत होत्या, कुठेही गुन्हे नाही, कुठेही भांडण नाही, फक्त सर्वत्र मानवजातीचा विकास होत चालला होता.       

...................................................      

वर्ष 2790,  

              अतृपत्नकृतची तब्येत एकाएकी खालावली. तो म्हातारा झाला होता. सर्व लोक त्याला म्हणत होते की, स्वतःला रोबोटमध्ये बदल. म्हणजे त्याच्या मेंदूतील पूर्ण माहिती रोबोटच्या आर्टिफिशिअल माईंडमध्ये स्टोअर होईल, म्हणजे अतृपत्नकृतचे शरीर तर मरणार, पण तो रोबोटच्या रुपात जिवंत राहील, आणि तो पुढे कधीही मरणार नाही. पण अतृपत्नकृत ह्यासाठी मुळीच तयार नव्हता. त्याला पूर्ण आयुष्य नैसर्गिकरित्याच जसे जगले, तसेच नैसर्गिकरित्या मारायचे होते, त्याच्या मते त्याने पूर्ण आयुष्य जगले आहे, एक नव्या युगाची सुरुवातही केली आहे, पूर्ण लोकांचा प्रिय असून, त्याला देवाची जागा दिल्या गेलेली आहे आणि आता म्हातारपणही बघितले आहे, आता त्याला फक्त मरणाचा आस्वाद घ्यायचा आहे.

 

               पण सर्व लोकांना भीती होती की, जर अतृपत्नकृत जिवंतच राहणार नाही, तर त्याच्या जागी दुसरा राजा बनेल, त्याला एक पंचवीस वर्षाचा मुलगा आहे, त्याच्यावरही अतृपत्नकृतने चांगले संस्कार घडविले आहे, हा तर पात्र आहे राजा बनण्यासाठी, सोबतच काही शंका नाही की तो सर्व जनतेला सांभाळू शकेल, पण त्याच्या नंतरचा राजा आणि त्याच्याही नंतरचा चौथा राजा कसा असेल काही ठाऊक नाही. पुढेही लोकांमध्ये भांडण होऊ शकतील, लोक विभागले जातील आणि पाचवे विश्वयुद्ध घडलेच तर, पूर्ण मानवजात नक्कीच नष्ट होईल. म्हणून सर्व लोक त्याचा मरण्यावर विरोध दर्शवित होते. एकदा की अतृपत्नकृतने जगाचा निरोप घेतला, तसाच हळूहळू पृथ्वीचा विनाश अटळ आहे, असे सर्व लोकांचे म्हणणे होते.   पण असे असतानाही अतृपत्नकृतला हे मान्य नव्हते. 

 

                 म्हणून सर्व लोकांनी मिळून ह्या निर्णयावर आले की, अतृपत्नकृतच्या नंतर कुणीही राजा बनणार नाही, त्याचा एकुलता एक मुलगाही नाही. सर्व लोकांच्या सहमतीने अतृपत्नकृतलाही लोकांचे म्हणणे ऐकावे लागले. जसे आता चालू आहे, तसेच पुढेही चालत राहणार. हे सर्व व्यवस्थित सुरू आहे की ह्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी, अतृपत्नकृतची काही महत्वाची माहिती एका उत्कृष्ट रोबोटमध्ये टाकण्यात आली.  

 

               तो दिवस आलाच, ज्याची सर्वांना भीती होती. अतृपत्नकृतलाही कळले होते की हा त्याच्या जीवनाचा शेवटचा दिवस आहे. संपूर्ण ग्रहावर, उपग्रहांवर असलेले सारेच लोक पृथ्वीवर परत आलेत, अतृपत्नकृतला शेवटचे बघायला. सर्वांचा डोळ्यांत पाणी होते, कुणालाही हा क्षण बघवत नव्हता. दुसरीकडील रोबोट्सही जमले होते. सर्वांच्या जीवनातला देवासमान माणूस आपल्यापासून दुरावतोय, ह्याची कल्पना करणेच जमत नव्हते कुणाला. पण अतृपत्नकृतनेच सर्वांना शांत केले, सर्वाना समजावून सांगितले की, "जीवन असेल तर मृत्यूही अटळच आहे. पण कुणीही रडत बसायचे नाही, तर मला जमिनीत पुरवताच, आपापल्या कामाला लागायचे, आपाल्या मानव सभ्यतेला सर्वांनी मिळून पुन्हा उंचीवर न्हायचे आहे, सर्वांचे कल्याण बघायचे आहे, भांडण चुकूनही करायचा नाही, लोकसंख्याही वाढू द्यायची नाही, आपुलकीने सर्वांसोबत वागायचे, सारे लोक, सारे प्राणीमात्रांना सोबत घेऊन चालायचे. रोबोट्सला आपल्या विकासात सामील करून घ्यायचे, तेच आपल्या मानव जातीला शिखरावर नेण्यास परिपक्व आहेत. " एवढे बोलून त्याने प्राण सोडला.

 

                     त्या दिवशी कुणालाही झोप आली नाही, कुणीही जेवण केले नाही. पण अतृपत्नकृतच्या इच्छेप्रमाणे काम मात्र सारेच करू लागलेत. पाणावलेल्या डोळ्यांनीच वेगवेगळ्या ग्रहावरील आलेले मानव, पुन्हा आपापल्या जागी जाऊ लागलेत. 

 

                      दिवस सरत गेलेत, लोक स्वतःला सावरू लागले आणि आपल्या कामात व्यस्त होऊ लागलेत. पृथ्वीसोबतच, सर्व ग्रह, उपग्रहावर अतृपत्नकृतचा एकतरी मोठा पुतळा तयार केला होताच, त्याची उणीव भासू नये, आणि त्याची आठवण काढता यावी सोबतच पुढच्या पिढीला अतृपत्नकृतबदल जाणण्याची जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून. आता पूर्ण मानवजातीला कुणीही कॅट्रोल करत नव्हते. फक्त तो रोबोट अतृपत्नकृतच्या मेमोरीच्या आधारे, सारे ठीक चालले की नाही हे बघत होता. पण सर्व व्यवस्थितच चाललं होतं. 

 

                      काही वर्षानंतर, पृथ्वीवर एक मेसेज मिळाला, पण तो मेसेज, खूप दुरून आला होता. पृथ्वीवरील काही वैज्ञानिकांनी त्या मेसेजची पाळताळणी केली, आणि कुठून आला आहे ह्याचा पत्ता लावला. त्यांना कळलं होतं की, हा मेसेज एका जवळच्याच ताऱ्यावरील एका ग्रहावरून प्राप्त झाला होता. त्या ग्राहचे नाव होते, अल्फासेंच्युरी-बी. सर्व मानवाला ठाऊक होते की, तिथे परग्रहवासी आहेत, पण त्यांच्यापर्यंत मेसेज पाठवणे जरा मुश्किलच होते, आणि त्यांच्यासोबत संवाद साधणेही मुश्किलच, कारण त्या ग्रहाची पृथ्वीपासून लांबीच एवढी होती की, अजूनपर्यंत तिथे पोहोचण्याची मानवाची तयारी नव्हती. पण मेसेज मध्ये लोकांना कळलं की, ते लवकरच दुसऱ्या प्रकारच्या सभ्यता बनण्याच्या मार्गावर आहेत(type-2 civilisation). जिथे त्या परग्रहवासींना आपल्या ग्रहाची ऊर्जा तर संग्रहित करू शकत होते, पण सोबतच त्यांच्या ताऱ्याची, म्हणजेच त्यांच्या सूर्याची ऊर्जाही कंट्रोल करायचे होते, जे त्यांच्या ऊर्जेसाठी पुढे कामी लागेल. सोबतच ते परग्रहवासी आपल्या पूर्ण सोलर सिस्टीमला कंट्रोल करू इच्छित होते. तर त्यासाठी त्या परग्रहवासीयांना मानवाची मदत हवी आहे. त्यांना ऊर्जेची गरज आहे. ही ऊर्जा त्यांना मानव मिळून देऊ शकतो. त्या परग्रहवासीयांना मानवी तारा म्हणजे सूर्याचा अभ्यास करायचा होता. त्यांच्याकडे दोन तारे आहेत. अल्फा सेंच्युरी-A आणि दुसरा अल्फा सेंच्युरी-B , ह्यांच्यातील B तारा लहान आहे आणि आता त्याची जास्त ऊर्जा शिल्लक राहिली नाही, पण A तारा खूप मोठा आहे, अभ्यासासाठी. त्याची ऊर्जा उपयोगात आणली तर नक्कीच ते परग्रहवासी दुसऱ्या प्रकारच्या सभतेमध्ये येईल, पण A तारा खूप मोठा असल्याने आणि जास्तच ऊर्जा देत असल्याने, त्याच्यावर अभ्यास करणे कठीण जाणार, पण मानवी सूर्य हा हुबेहुन त्यांच्या A ताऱ्यासारखा आहे, पण A पेक्षा खूप लहान आहे आणि ऊर्जाही कमी काढतो. सूर्याचाच अभ्यास करून, त्यांना आपल्याच A बदल जास्त जाणून घ्यायचे आहे. सूर्याची रचना बघून A ताऱ्याच्या ऊर्जेचा उपयोग करायचा आहे. म्हणून ते परवानगी मागत होते. सोबतच ह्याच्या बदल्यात, मानवाला पहिल्या सभ्यतेतून दुसऱ्या सभ्यतेत लवकर बदलायला मदत करायला ते तयार होते. मानवालाही हा सौदा मान्य झाला. सर्व लोकांनी त्यांना परवानगी दिली, सूर्याचा अभ्यास करण्याची आणि सोबतच पृथ्वीवर त्यांच्या स्वागताची तैयारी केली. पहिल्यांदा अधिकृतपणे एखादे परग्रहवासी पृथ्वीवर येणार होते. हा मानवासाठी खूप आनंदाचा क्षण होता. 

 

                   परग्रहवासी आपली टोळी घेऊन पृथ्वीवर आली. ते स्वतःला केपलर्सवासीय म्हणत होते. त्यांचे पृथ्वीच्या जमिनीवर आगमन झाले. पृथ्वीवासीय आणि केपलर्सवासीय एकमेकांना भेटून आनंदित होते. काही दिवस पृथ्वीवर मुक्काम करून, नंतर त्यांच्या टोळीतील काही लोक, आपल्या छोट्या यानाने सूर्याचा रस्ता पकडला. ते दोन चार लोक सूर्याचा अभ्यास करणार होते, आणि बाकीचे, पृथ्वीचा अभ्यास करणार होते, सोबतच पृथ्वीवसीयांना काही विकासाच्या गोष्टी सांगून पृथ्वीवसीयांच्या ज्ञानात भर पाडत होते.

 

                   केपलर्सवासीय पृथ्वीवरील लोकांसोबत मस्त गोड गोड बोलून त्यांची मने जिंकत होती. पण त्यांचा इरादा नेक नव्हताच. ते केपलर्सवासीय पृथ्वीवसीयांची सौर यंत्रणा आपल्या ताब्यात घेण्याचा वेगळाच हेतू होता. केपलर्सवासीयांनी इथे येण्यापूर्वीच पूर्ण प्लॅन बनवून घेतला होता. ते पृथ्वीवरील लोकांत आपापसांत भांडण निर्माण करून, आणि जेव्हा येथील लोकांची भांडणं संपतील आणि सर्वत्र मृत्यूचा सडा पसरून राहील, तेव्हा केपलर्सवासीय मोठ्या संख्येने पृथ्वीवर येतील आणि पृथ्वीवरील लोकांना असाहाय्य करतील, आणि पृथ्वीवरील लोकांना आपले गुलाम बनवायची योजना त्यांनी आखलेली होती.              

 

  केपलर्सवासीयांनी पृथ्वीचा अभ्यास करणे सुरू केले. पृथ्वीवरील विरुद्ध गट, वेगवेगळ्या विचारांच्या लोकांबदल माहिती जमा करू लागलेत. पण पृथ्वीवरील सारेच लोक एकाच मताचे होते, पृथ्वीवर कसलेही वेगळे गट नव्हते वा विरुद्ध विचार करणारे लोकही नव्हतेच. ही मात्र केपलर्सवासीयांसाठी चिंतेची बाब होती, कारण लोकांत भांडण झाले नाहीत, तर आपण पृथ्वीवरील लोकांना हरवू शकणार नाही. म्हणून त्यांना कोणतीतरी गोष्ट अशी शोधायची होती ज्याने, कमीतकमी दोन वेगवेगळे गट पडतील आणि लोक आपले मत सिद्ध करायला भांडणं करायला तयार होतील. पण असा काहीही मुद्दा त्यांना मिळत नव्हता, कारण पृथ्वीवासीय सर्वांसोबत गुण्यागोविंदाने राहत आले आहेत. केपलर्सवासीय पृथ्वीवरील सर्व लोकांना मारू शकणार नाहीत, जर असे केले तर, त्यांना हवे असलेले आणि त्यांचे म्हणणे ऐकणारे गुलामही मिळू शकणार नाहीत, जे त्यांना फक्त पृथ्वीवरील लोकांनाच बनवायचे होते. काही मिळाले नाही म्हणून शेवटी पृथ्वीचा इतिहास बघू लागलेत. कारण अशी कोणतीही समुदाय भांडण न करता राहूच शकत नाही, हेही त्यांना ठाऊक होते. पृथ्वीचा इतिहास जाणून घेतल्यावर त्यांना समजले की, पृथ्वीवर आतापर्यंत पाच विश्व युद्ध झाले आहेत. चार विश्वयुद्ध मर्यादेत होते, पण शेवटचे विश्वयुद्ध जास्तच भयंकर बनले होते, ज्यात सारेच लोक मृत पावू शकत होते, पण काही लोक वाचलेत आणि त्यां सर्वाना एकत्र करून एक माणसाने नव्या युगाची सुरुवात करून दिली. पाचव्या विश्वयुद्धानंतर सर्वाना समजले की, पुढे जर विश्वयुद्ध घडलेच तर कुणीही जिवंत राहू शकणार नाही, म्हणून आताच्या काळात पृथ्वीवरील कोणत्याही माणसाला भांडण नकोसे आहे. पण जर लोकांत भांडण झाली नाहीत तर लोकांना आपल्या ताब्यात घायचेच कसे? हाच त्यांच्यापुढे प्रश्न उभा होता.

 

                    केपलर्सवासीयांकडले सर्वच पर्याय संपले होते. पण तेही हार पत्करणाऱ्यांपैकी नव्हतेच. कुठलाही पर्याय दिसला नाही म्हणून, वेगवेगळ्या ग्रहावर, उपग्रहांवर असलेल्या लोकांना पृथ्वीवरील लोकांसोबत भांडण लावण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्नही असफल ठरला. खूप विचार केल्यानंतर केपलर्सवासीयांकडे आता फक्त एकच पर्याय शिल्लक दिसत होता. तो म्हणजे, पृथ्वीवर असलेल्या रोबोट्स कम्युनिटी आणि मानव जातीत वाद निर्माण करणे, जेणेकरून पुढे ह्याचे रूपांतर मोठ्या युद्धात होईल. 

 

                  पृथ्वीवरील काही केपलर्सवासीय रोबोट्स कम्युनिटीमध्ये मानवाबदल खोटे दावे करून, त्यांच्याविरुद्ध तिरस्काराची भावना निर्माण करू लागले. सुरुवातीला रोबोट्स कम्युनिटी मानायला तयारच नव्हती, पण केपलर्सवासीयांनी खोटे पुरावेही सादर केलेत, लोकांविरुद्धचे. रोबोट्सना समजविण्याचा प्रयत्न करू लागले की, लोक त्यांना आताही आपले गुलामच मानत येत आहेत, म्हणून आजही रोबोट कम्युनिटीला पूर्ण हक्क मिळाले नाहीत. लोक त्यांचा फक्त फायदा काढून घेत आहेत आणि मानवच रोबोट्सला निर्माण केले आहे, म्हणजे मानवच त्यांना कॅट्रोल करू शकतात, असा मानवाचा समज आहे, असे केपलर्सवासीय, रोबोट्सला सांगू लागलेत. हेही समजावून सांगितले की, आता रोबोट कम्युनिटी मानवावर निर्भर नाहीत, आणि आता मानव रोबोट्सची निर्मितीही करत नाहीत, तर रोबोट्सच रोबोटची निर्मिती करतात, अश्या दृष्टीने बघितले तर बनविणारे रोबोट्सच नव्या रोबोट्सचे मायबाप असतात. पण तरीही लोक सर्व रोबोट्सला आपले गुलाम मानतात, एव्हढेच नाही तर काही वर्षानंतर जसे लोकांच्या गरजा संपेल, तसतसे रोबोट्सला नष्ट करणे सुरू होईल, आणि तेव्हा होईल रोबोट्सचा विनाश. अश्या गोष्टी सांगून रोबोट्सच्या मनात मानवाविरुद्धची भीतीची भावना निर्माण केली. सोबतच रोबोट्सचा ब्रेनवॉश करण्यात आला, मानवप्रजाती विरुद्ध पूर्णतः विरुद्ध भावना निर्माण करण्यात आल्यात. एवढेच काय?, तर आपल्या स्वतःचा सॉफ्टवेअरने, रोबोट्सची प्लॅनिंग मानवप्रजातीविरुद्ध सेट केली, आणि रोबोट्सला आपल्या केपलर्सवासीयांमध्ये सामील केले आणि अशी ग्वाही दिली की, जेव्हा युद्ध संपेल आणि पूर्ण पृथ्वी त्यांची होऊन जाईल, तेव्हा रोबोट्सला पूर्ण हक्क मिळणार.

 

                  रोबोट्सचे एवढे मन परिवर्तित केल्याने, हळूहळू एकेक रोबोट्स लोकांविरुद्ध आवाज उठवू लागलेत. आता लवकरच युद्ध होणार हे दिसताच केपलर्सवासीयांनी आपल्या ग्रहावरील सैन्य लोकांना, पूर्ण तैयारी करून पृथ्वीवर येण्याचे संदेश दिले.

 

                    हे सर्व एवढं गुप्तपणे केपलर्सवासीयांनी घडवून आणलं की पृथ्वीवसीयांना ह्याची चाहूलही लागली नाही. पण अचानकपणे रोबोट्सच्या कम्युनिटीवरून एवढा आक्रोश, ह्याबदल पृथ्वीवसीयांना समजण्याची एक संधीही मिळाली नाही. लोक रोबोट्सला समजावण्याचा प्रयत्न करत होते, पण रोबोट्सचे ब्रेन वॉश केल्याने, त्यांना आता आपल्या हक्कासाठी फक्त युद्ध हवं होतं.      

 

                    केपलर्सवासीयांनी पृथ्वीवासीयांना मध्यस्थीचा प्रस्ताव ठेवला, भांडण मिटविण्यासाठी. पृथ्वीवासीयांनी ह्यासाठी होकारही दिला, पण हीच पृथ्वीवासीयांची चूक ठरली, सर्व केपलर्सवासीयांच्या योजनेप्रमाणे घडू लागेल होते. केपलर्सवासीय रोबोट्सच्या पक्षाकडून असल्याने ते भांडण आणखी वाढवू लागले होते. आता युद्ध होणार हे पृथ्वीवसीयांना चांगलेच समजले होते.  

 

                   काही दिवसांत केपलर्सवासीय सैनिक ही मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर आले. आता पृथ्वीवासीयांना कळले की ही सर्व केपलर्सवासीयांचीच युक्ती आहे. हे समजले तर खरे, पण आता खूप वेळ झाली होती. रोबोट्स पूर्णपणे केपलर्सवासीयांकडून होते. पृथ्वीवरील मानवाची संख्या रोबोट्स आणि केपलर्सवासीयांपेक्षा जास्त होती, पण पृथ्वीवरील जवळपास सर्वच शस्त्रसाठा रोबोट्सकडे होता. त्यांच्याकडेच पूर्ण हायटेक बंदूक, मोठमोठे बॉम्ब, न्यूक्लिअर कॅट्रोल होते. त्यांच्या सोबतीला केपलर्सवासीयांकडे त्यांचे ऍडव्हान्स मशिणी होत्या, जे फक्त युद्धासाठी बनलेले होते, आणि अश्या परिस्थितीत पृथ्वीवासीयांना जिंकणे खूप अवघड होते. केपलर्सवासीयांनी पृथ्वीवासीयांकडे एक प्रस्ताव ठेवला, की हार पत्करून, नेहमीसाठी गुलाम बनून जा, आणि आपल्या पूर्ण सौर यंत्रणा ताब्यात देण्याची धमकी दिली, अन्यथा सर्व लोकांना फक्त मरणच येणार हे स्पष्टपणे सांगितले.

 

                     पृथ्वीवासीयांना गुलामगिरी मुळीच नको होती. आपण हरणार हे सर्व लोकांना ठाऊक असूनसुद्धा, पूर्ण पृथ्वीवासीय आपल्या जवळपास असलेले छोटे-मोठे शस्त्र घेऊन लढण्यासाठी मैदानात उतरले. आपल्या मातृभूमीसाठी, आणि आपल्या हक्क साठी, पृथ्वीवासीय झुंज देण्यास तयार होते, सर्व लोकांना युद्धात मरण पत्करणे पूर्णपणे कबूल होते, पण हार पत्करून गुलामगिरी मात्र कधीच मंजूर नव्हती. आपल्या पृथ्वीसाठी प्राण अर्पण करायला युद्धाची सुरुवात पृथ्वीवासीयांनीच केली.  केपलर्सवासीयांनी पूर्ण लोकांना पटवून दिले की, कितीही प्रयत्न केले तरी आमच्यासोबत जिंकणे खूप कठीण आहे, पण पृथ्वीवासीयांनी त्यांना ठळकपणे सांगितले की, आम्हालाही गुलामगिरी मंजूर नाही. 

 

                    जे नको होतं तेच घडलं. दोघांत भीषण युद्ध घडले. पण पूर्ण बाजू रोबोट्स आणि केपलर्सवासीयांकडे होती. फक्त पृथ्वीवासीयांची माणसे मरून पडत होती. हे सर्व डोळ्यांदेखत घडत असतानादेखील कोणताही पृथ्वीवासीय मागे सरकायला तयार नव्हता. केपलर्सवासीयांच्या एका बळी मागे पृथ्वीवासीय लोकांचे हजारो बळी जात होते. पूर्णपणे केपलर्सवासीय जिंकत होते. 

 

                  पण केपलर्सवासीयांना दिसू लागले की, पूर्ण लोक मरायला पुढे येत आहेत. जर असेच सर्व जण मरेल तर, गुलाम कुणाला बनवायचे आणि ह्या सौर यंत्रणेचा कंट्रोल पुढे कसा हाताळायचा?, हाच प्रश्न त्यांना पडू लागला. कारण नियोजितपणे पृथ्वी आणि बाकीचे ग्रह पूर्णपणे सांभाळणे केपलर्सवासीयांना जमणे अवघड होते. पण त्यांना आठवले की, जरी पृथ्वीवसील सर्व लोक मरण पावले तरी, इथल्याच जवळपासच्या ग्रहावर असलेले बाकीचे लोकही आहेत, त्यांनाही आपण गुलाम बनवू शकतो.  

 

                  पण बाकीच्या ग्रहावर असलेले लोकही पृथ्वीवर येऊ लागलेत, आणि पृथ्वीवरच्या आपल्याच लोकांच्या बाजूने होऊन त्यांची लढाईत मदत करू लागले. पण त्यांचेही प्राण तसेज जाऊ लागले होते, जसे पृथ्वीवरील लोकांचे. 

 

                    युद्धाच्या काही तासांतच पृथ्वीवासीयांचे जवळपास तीस ते चाळीस मिलियन लोक मरण पावले होते आणि हा आकडा वाढतच चालला होता. जर असेच चालू राहिले तर पूर्ण लोक मरण पावतील, हे केपलर्सवासीयांना चांगलेच समजले. 

 

                     पूर्ण बाजू केपलर्सवासीयांकडे होती. ते जिंकत असून सुद्धा त्यांच्यात जिंकण्याची जराही उत्सुकता नव्हती वा हौस उरली नव्हती. पण पृथ्वीवासीयांची पूर्ण ऊर्जा संपत आली होती, लोक मारायला पुढे येत होती, तरीही कुणीही थकलेले नव्हते.   

 

                    शेवटी, केपलर्सवासीयांना त्यांच्या ग्रहावरून एक संदेश प्राप्त झाला, की लढाई सोडून परत आपल्या ग्रहाकडे येण्याचा. ह्याचे कारण होते, पृथ्वीवासीयांची एकजूट. केपलर्सवासीयांचे जिंकणे निश्चित होते, पण असे एकतर्फी विजय मिळवूनही ते आनंदी राहू शकत नव्हते. जिंकूनही नेहमीच हे सतावत राहणार की, पृथ्वीवासीयांसोबत युद्ध धोक्याने आणि फसवेगिरीने जिंकले आहे. केपलर्सवासीयांना हे मुळीच मान्य नव्हते की, कुणाच्या लाचारीचा आणि असहायतेचा फायदा घेऊन युद्ध जिंकले, असे असले तरीही केपलर्सवासीयांसाठी ही हारच असती. असे जिंकून कधीच ब्रह्मांडाचा गुरू आपण बनू शकणार नाही, म्हणून पृथ्वीवरील केपलर्सवासीय हार पत्करून, स्वतःहुन मागे सरकले, आणि युद्धाची समाप्ती करून पृथ्वीवासीयांची क्षमा मागितली. बेन वॉश केलेल्या रोबोट्सला सांगितले की, ही सर्व युक्ती त्यांचीच होती, पृथ्वीवासीयांची ह्यात कुठलीही चूक नाही आणि रोबोट्सच्या आपला मेमोरी सॉफ्टवेअर डिलीट करून, एक एक यान आपल्या ग्रहावर परंतु लागले. 

 

                   काही वेळातच सर्व यान परतले होते, फक्त एक शेवटचे यान शिल्लक होते. तेच केपलर्सवासीय होते, जे अभ्यासाच्या बहाण्याने पृथ्वीवर सर्वांत आधी आली होती. त्यांनी पृथ्वीवासीयांना विचारले की, "तुम्ही हरणार हे ठाऊक असतानासुद्धा तुम्ही हार का पत्करली नाही?"             

 

पृथ्वीवरील लोकांनी स्पष्टपने सांगितले की,  "मानवजात आधीपासूनच कधी हार पत्करत आलेली नाही, मग ते युद्धात असो, महामारीत असो, वा संशोधनात असो, आमच्यात फक्त जिद्दीने जिंकणारे रक्तच संचारते, आम्हाला विजय हवा, किंवा मृत्यू, पण गुलामगिरी मुळीच नको आणि जर गोष्ट मातृभूमीची असेल तर मरायलाही तयार होऊ, पण हार पत्करून गुलामगिरीचे आयुष्य कुणालाही नको..." 

            

         केपलर्सवासीयांचे पूर्ण यान त्यांच्या ग्रह अल्फासेंच्युरी-बी वर परतले होते. अधिकृतपणे हे युद्ध जिंकलेले नसले तरी, कित्येक लोकांचा बळी गेलेला असला तरी, पृथ्वीवर पुन्हा एका नव्या युगाची सुरुवात होणार होती.               

(समाप्त)



Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller