बंड्या
बंड्या
ठिगळाची पॅंट अन् मागच्या दिवाळीचा शर्ट, एका खांद्यावर अडकवलेली पिशवी अन् दुस-या हातात काठी असा हा सगळा थाट घेउन स्वारी अगदी दिमाखात शाळेला निघाली होती. आज काय राम्या, शाम्या अन् पांडू रस्त्यात भेटले नाहित म्हणजे आपल्याला उशीर झालेला दिसतोय एवढा अंदाज आला होता. तरीहि रस्त्यात येना-या सगळ्या गोष्टी अगदी न्याहाळत पायवाट काढायचं काम चाल्लं होतं.
'तुकोबाच्या रानातूनच घुसू अाज, तेवढंच पाच मिनिटं वाचतील, म्हणून विचार चाल्ला होता. तेवढ्यात पाटलांची आंब्याची बाग समोर आली. बहर चांगलाच फुल्ला होता.आख्खी बाग शोभून दिसत होती. 'आता कितिबी शिव्या खाउ पण ह्या उन्हाळ्याला चार पाच कै-या तरी नेणार बाबा', एवढं बोलून स्वारी पुढे निघाली. तुकोबाच्या रानात धसकटं तशिच राहीलेली होती. चप्पलही तुटायला अाली होती. ते काही परवडणारं नव्हतं, मग 'आज उशिर झाला तर होउद्या पण मोठ्या वाटेनंच जाउ' असा निर्धार झाला. अचानक शाळेच्या घंटेचा आवाज कानावर आला, मग मात्र हातातली काठी पडली. स्वारी जे तडक सुटली ते सरळ शाळेच्या मैदानातच हजर. आपल्या ठरलेल्या जागेवर गडी पोहोचला एकदाचा.
परिपाठ, मनाचे श्लोक उरकले, पुन्हा घंटा झाली अन् पोरं आपापल्या वर्गात जाउन बसली. खिडकीशेजारच्या बाकावर जाउन स्वारी निवांत बसली. फडके मास्तर दारातून आत येताना पाहताच, "नमस्ते गुरूजी" म्हनत पोरं उभी राहिली. पोरांना बसायला सांगून मास्तर आपले फळ्याकडे वळाले. फळा पुसलेला नाही म्हणून त्यांची अापली भूनभून चालू होती. दोन मिनिटं आपल्याला मिळाली म्हणून पोरांच्या अगदी दोन वर्ष भेटलीच नाहीत अशा गप्पा सुरू झाल्या.मास्तरांनी फक्त एक नजर वळवून पाहिले अन् पोरं चिडीचुप.
गणिताचा तास म्हटल्यावर वही उघडण्यापासून सगळंच जिवावर आलं होतं. पेन्सिल अजून सहा महिने टिकवायची होती अन् मास्तरचं ऎकून तसही काही कळत नाही म्हणून आता खिडकीतून डोकावनं सुरू झालं. काय ते माहित नाही पण डोक्यात विचार मात्र सुरू होता.
'बंड्या गजानन आहेर', इयत्ता तिसरी, तुकडी अ. बंड्या तसा स्वभावाने शांत. जन्म झाला तेव्हा आई वारली. बाप कायम रागातच बोलतो. 'पांढ-या पायाचा' ,'दळभद्री' असं काहितरी म्हणतो. पण ' आपल्याला ते काही कळत नाही', म्हणून बंड्याही सोडून देतो. आज्जी बाबांचा मात्र पोरावर अपार जीव. आईविना पोरगं म्हणून आज्जीचा जीव हळहळतो,अन् बापाच्या शिव्या नको म्हणून पोरगं बाबांकडचं राहतं.
गणिताचा तास संपला. बाकीचा दिवस त्यातल्या त्यात चांगला जणार होता. मधल्या सुट्टीत पोरंचे डबे खाउन होइपर्यंत बंड्याचा आज अजून एका झाडावर चढण्याचा विक्रम उरकला होता. खेळाचा तास अन् मराठीचा धडा वाचून झाल्यावर एकदाची घाटा झाली.आज बंड्या तसा खूषच होता. महिन्याचा ठरलेला रूपया आज आज्जी देणार होती. आज खाउच्या दुकानात जायचं एवढं ठरवून तो घराकडं निघाला. झपाझप पावलं टाकत बंड्या पोहोचला. पारापासूनच भरपूर गर्दी दिसत होती. पण घरापूढं एवढी लोकं का बरं म्हणून बंड्या आत शिरला. बाबा कपाळाला हात लावून बसलेला होता. बंड्याला पाहून तर आज्जीनं अजूनच मोठा टाहो फोडला.बंड्या समोर पाहतो तर बाप जमिनीवर पडलेला हो्ता!
'औषध घेतलंय', असं काहितरी सगळे म्हणत होते. आता मात्र बंड्याच सारचं अवसान गळालं. बापाकडं पहिल्यांदाच करून नजरेनं त्यानं पाहिलं अन् काहितरी खरंच भयानक झालय, एवढं मात्र त्याला उमगलं.