भयभीत भाग -२
भयभीत भाग -२
भयभीत - भाग ३
रोहन येणार होता त्यामुळे उद्या संध्याकाळची काळजी नव्हती, मीनल ला शांत झोप लागली. पुढचा दिवस उजाडला.नेहमीसारखा नॉर्मल दिवस गेला. अॉफिस झालं , मग क्लास झाला. मीनल बस स्टॉपवर उतरली . हळू हळू ती दर्ग्याजवळ येऊन थांबली. ती आज जरा लवकर आली होती. रोहनची वाट पहात होती इतक्यात तिला सायकलची घंटी ऐकूआली. दर्ग्याच्या पुढेच पाठमोरा तो माणूस उभा होता. मीनलच्या काळजात धस्स झालं.!! आता काय ?? प्रश्न पडला. एवढ्यात तिच्या बाजूला एक बाइक एकदम थांबली.
" अगं मीनल , इथे काय करतेस ? घरीच जायचयं ना ? चल सोडतो घरी. बस ना !" तो अनिकेत होता , त्यांच्या कॉलनीत रहायचा . रोहनचा सिनियर होता. पुष्कळदा घरी यायचा.
मीनल ला तर प्रथम कळेचना कि काय प्रतिक्रिया द्यावी. ती फक्त हो हो म्हणत होती. तिला जणु देवच भेटला होता. "हो ना रे , रोहन येतो म्हणाला होता घ्यायला , त्याचीच वाट पाहत होते !" ती पटकन गाडीवर बसली. ती शक्यतो कुणाच्या बाईकवर बसायची नाही. बसल्यावर तिने डोळे बंद केले . पुढे गेल्यावर तिने हळूच अर्धे डोळे उघडून पाहिले.
तो माणस मागून येत होता सायकलवर , क्रमाने घंटी वाजवत. घरासमोर आली तर रोहन गेटमधून गाडी काढत होता." अरे ताई आलीस? मी येतच होतो. " "अरे वा अन्या,थँक्यू ! माझी चक्कर वाचवली बुवा!"
"अजुन काय म्हणतोस?"
मीनल वैतागली होती.
"काय रे रोहन ? आता निघतोयस? हा आला म्हणून बरं झालं नाहितर. . . ?"
"अगं ताई ,तुझी वेळ पाळत होतो, बघ ना किती वाजलेत? तूच दहा मिनिट लवकर आलीस!" ती वरमली.
"सॉरी रे! अंधार आहे म्हणून!"
ते दोघे बोलतच थांबले होते. मीनल आत आली.
काही केल्या ती घटना तिला विसरेना .
मामा किंवा मामीला सागावं तर ते आईबाबांना सांगणार, ते म्हणतील-
"परत ये! तुझे क्लास आणि नोकरी काही नको. "
या विचारेने तिने माघार घेतली. अजुन थोडे दिवस पाहुयात असे वाटले.
दुसर्या दिवशी ऑफिसमधलं काम थोडं लांबलं. उशीरापर्यंत थांबावं लागलं.
क्लासला सुट्टी होती.
पण घरी जाण्याचं कसं ? असा विचार मनात आला.
तिचे बॉस आले आणि म्हणाले ,
" मीनल घरी जाण्याची काळजी करू नकोस . सुभाष चौकाच्या पुढे राहतेस ना तू? डन! मला तिकडेच काम आहे , मी सोडीन तुला घरापर्यंत . "
"नको सर . its ok मी जाईन सर!"
" Its ok . meenal. Any how I have to go there. ok finish your given task fast."
संध्याकाळी सरांच्या गाडीत जाताना ती दबावाखालीच होती , का ते माहित नाही.
तिचे सर खूप चांगले होते , माणूस आणि बॉस म्हणूनही.
त्यांना उगीच त्रास दिला असं वाटायला लागलं.
तिचा नेहमीचा बस स्टॉप गेला , मग दर्गा दिसली.
आणि तो माणूस सायकल घेवून तिथे उभा होता.
अचानक पणे चमकणार्या लाईट मधे तिची नजरानजर झाली आणि तो कुत्सित हसला.
इतकं विभत्स हसु होतं ते कि क्षणात अंगावर शहारा आला.
सरांना घरापर्यंत कशाला न्यायचं म्हणून ती म्हणाली ," सर इथे कॉर्नर ला सोडा सर . कॉलनीचं गेट आहे.
समोरच घर आहे , सर मी जाईन."
" are you sure. . then ok meenal, as you wish . take care ,bye "
सरांची गाडी गेली.
मीनल कॉलनीच्या गेटमधून आत आली आणि आपसूकच मागे वळून पाहिले तर कोपर्यावर तो उभा होता सायकल थांबवून आणि तिलाच पाहत होता.
बापरे तिला एकदम धडधडायला झालं .
घाम फुटला .
पावले थरथरायला लागली.
तशीच भेदरलेली ती घरी आली.
आपल्या खोलीत जाऊन पडून राहीली.
* * * * *
आज एक महिना झाला , हा मीनलचा क्रमच झाला होता.
कुणासोबत तरी गाडीवर यायचं किंवा मग ऑटोरिक्षातून घरी यायचं.
पण २-४ दिवसातून एकदा तरी असं व्हायचं कि तिला पायी यावं लागायचं.
आणि तो माणूस एकदमच अंधारातून यायचा .
पूर्वी सायकलवर 'येता का ',' बसा' म्हणायचा.
काही दिवसांनी तर तो - "आता सोबत येता का ?"
असं गचाळ नजरेने म्हणायचा !
मग काही दिवसांनी तो थांबायचा आणि "मामाला सांगू का ?"
किंवा
"काय मग कधी यायचं घरी? "
असं म्हणून घंटी वाजवत निघून जायचा.
मीनलला हे रोजचे तीळ तीळ मरण असह्य झाले.
तो मामाला काय सांगणार आहे? हेच तिला कळेना पण एक अनामिक दहशत निर्माण झाली.
परवा तो बोलला कि " मामाला नसल सांगायचं तर बोला . . काय देसान ?"
आणि तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत निघून गेला .
ती नज़र आठवली तरी मीनलला शिसारी आली.
त्याला घरी येवून मामांना काय सांगायचय?
नाही तर त्याला काय हवय पैसे ??? कि आणखी काही ??
पण मलाच का छळतोय हा? कशा साठी?
मी काय चूक केलीय? मी तर त्याला ओळखतही नाही.
काय हवंय आणि का हवय ?
अशा अनेक गोष्टी तिची चिडचिड वाढवू लागल्या !
कथा पुढे :-
हे कुठेतरी , कुणाजवळ तरी बोलणं आवश्यक होतं , नाहीतर विचार करून तिचं डोकं फुटुन जाईल कि काय अशी भीती तिला वाटत होती. ती सतत दडपणाखाली असायची.
ऑफिसमधे असताना एक दिवस अचानक प्रवीणचा फोन आला.
"हाय , कशी आहेस ? क्लासेस कसे चाललेत? "
"होे रे! मी छान आहे . मजेत! तू काय म्हणतोस ?"
"मीनल आज फ्री असशील तर भेट ना संध्याकाळी! मी आत्ताच सिटीत अालोय. "
"हो नक्की भेटूया संध्याकाळी. .मी कॉल करते . . ऑफिसमधून निघायच्या वेळी मी तुला कळवते. बाय ! "
प्रवीन मीनलचा चांगला मित्र होता. तिच्याच गावात रहायचा . घरीही सतत येणं जाणं होतं .
मीनलला लहानपणापसून तो व्यक्ति म्हणून खूप आवडायचा !
त्याचा खूप आदर वाटायचा आणि आधारही !
पण प्रवीण साठी मात्र ती फक्त एक छान मैत्रिण होती.
मीनलने नेहमी विश्वासाने त्याच्यासमोर मनातलं व्यक्त करण्याचा प्रयत्न केला .
संध्याकाळी तो ऑफिसमधे घ्यायला आला.
दोघे कॉफी डे मधे गेले. ऑर्डर दिली.
बराचवेळ जनरल गप्पा झाल्या .
मग प्रवीण म्हणाला " अॅक्चुअली एक गुड न्यूज़ द्यायची आहे. पुढच्या महिन्यात माझी एंगेजमेंट आहे. डेट काढलीय. रीतसर आमंत्रण द्यायला पुन्हा येईनच . सहज सांगतोय. "
तिने अभिनंदन केलं , पुन्हा थोड्या गप्पा झाल्या.
"मीनल एक विचारू का गं. तू नेहमीसारखी नॉर्मल वाटत नाहियस ! तू इतकी टेंसड का आहेस ? काही प्रॉब्लेम आहे का इथे?" प्रवीणने न राहवून विचारलच !
म्हणजे तसं आहे पण काही नाही सोड ना !
सांग यार मीनल. मी काही मदत करू शकलो तर बघतो.
"ऐक ना प्रवीण . गेल्या महिन्या- सव्वा महिन्यापूर्वी पासून मी प्रचंड
दडपणाखाली आहे. पण तू प्रॉमीस कर कि कुणाला सांगणार नाहीस!"
"" अरे मीनल कुणाच्या प्रेमात वगैरे पडलियस काय?" तो मिश्कीलपणे म्हणाला.
"नाही रे. तुला गंमत काय सुचतीय? खरं तर प्रॉब्लेम असा आहे कि. . . . "
आणि तिने इत्थंभूत माहिती प्रवीणला दिली.
प्रवीण दबलेल्या आवाजात ओरडलाच "आर यू मॅड ! अाता सांगतेस हे ?
अरे तेव्हाच सांगायचे ना मला ! आणि मामा आहेत ना घरी , रोहन पण आहे . कुणालाही सांगायचं . .नाहीतर सँडल काढून दोन ठेवून द्यायच्या तोंडात!"
"अरे पण?"
"त्याला का भीतेस तू ? कळेल का ? "
"माहित नाही रे पण. . त्याची नज़र जेवढी भयानक आहे ना तेवढाच त्याचा चेहरा आणि बघणं . आणि नेमकं मी येते त्यावेळी वर्दळ नसते तिथे! मी एकटीच असते. "
" ओके ओेके. टेंशन घेवू नको. ते सगळं सोड. आज मी येतो तुला घरी सोडायला. मामांची आणि रोहन ची पण भेट होईल. "
"तू येणार . . घरी सोडवायला ? "
"का गं काय झालं ?"
"बरं ठीक आहे निघूयात. उशीर झालाय."
दोघे गाडीवर निघाले. जाताना भीती नसली तरीही कुठेतरी धाकधुक होतीच मीनलच्या मनात.
तो माणूस कुठेच दिसला नाही. आज उशीर झाला म्हणून बरं झालं असं वाटलं तिला.
कॉलनीच्या गेटआधी कोपर्यावर एक वाचनालय होतं . दोघं तिथे आले तेव्हा वाचनालय उघडच होतं.
" प्रवीण २ मिनीटं थांब रे! या टेंशन मधे महिनाभरात मी माझी पुस्तकं पण परत केली नाहित. फाईन लागेल. दोन मिनिट थांब ना! मी आता पुस्तकं परत करून येते. आज उघडं आहे वाचनालय !"
"ओके ये मी थांबतो इथे."
प्रवीण वाचनालयाबाहेरच्या बागेत थांबला आणि मीनल आत गेली.
रात्रीचे ८ वाजत आले होते.
वाचनालयात एखादं माणूस असेल. गर्दी नव्हती. सामसूम होती.
तिने पुस्तकं परत केली , दुसरी घेतली नाहित.
मीनल बाहेर आली अन प्रवीणशी हात मिळवत म्हणाली " थँक्यू रे तू इथेपर्यंत आलास माझ्यासाठी , आणि अभिनंदन पुन्हा एंगेजमेंट साठी !"
प्रवीण ने थँक्यू म्हणून तिच्या खांद्यावर थाप दिली.
तिला किती आधार वाटला . जणु मी आहे सखी , भिऊ नकोस !
प्रवीण काही बोलणार इतक्यात एक घाणेरडा लगट आवाज आला--
"" आज काय नवा यार का ?"
मीनल ला धस्स झालं.
तोच तिथे अंधारात बाकड्यावर बसलेला होता.
मीनलचे डोळे भीतीने विस्फारले. ती ओेरडली. .
"प्रवीण . . प्रवीण हाच तो. . !"
प्रवीण ने शर्टच्या बाह्या वर केल्या , मीनल ला मागे होण्याचा इशारा केला आणि त्या माणसाकडे तत्परतेने
वळला.
क्रमशः
© सौ. स्वाती बालूरकर देशपांडे ,"सखी "
दिनांक २८ . ०४ . २०१९