Nilesh Bamne

Horror Thriller

4  

Nilesh Bamne

Horror Thriller

भय इथले संपत नाही...

भय इथले संपत नाही...

11 mins
24.2K


रात्रीचा एक वाजला होता... कोणत्यातरी कर्णकर्कश आवाजाने मला जाग आली. आमच्या इमारतीतील आमचं घर दुसऱ्या मजल्यावर असल्यामुळे इमारतीच्या खालचे आणि आजूबाजूचे आवाज स्पष्ट कानावर येत असतात. रोज मध्यरात्री कुत्र्यांचे भुंकणे आता सरावाचे झाले होते, पण त्या रात्री कुत्रे भुंकत नव्हते तर रडत होते. त्यांच्या तो रडण्याचा आवाज मला अस्वस्थ करत होता. का कोणास जाणे अचानक कोठेतरी वाचलेले अथवा ऐकलेले मला अचानक लक्षात आले की, जवळपास एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणार असेल तर कुत्रे असे रडतात, त्यांना म्हणे यम दिसतो... पण दुसऱ्याच क्षणाला माझं मन मला म्हटलं, नाही! ही अंधश्रद्धा आहे!! नव्हे अंधश्रद्धाच आहे. पण तरीही एका अनोळख्या भीतीने माझ्या मनात घर केल्यामुळे मला झोपच येत नव्हती. अचानक कुत्र्यांचे ते भेसूर रडणे थांबले आणि मला हायसे वाटणार इतक्यात बाहेरच्या खोलीतील बाबांचा मोबाईल खणखणला आणि पटापट खोलीतील दिवे लागले. माझ्या मनात विचार आला, इतक्या रात्री उशिरा कोणाचा फोन आला असेल आणि का? मी बाहेरच्या खोलीत गेलो तर सर्वांचे चेहरे पडलेले होते. मी भीतभीतच विचारले, काय झाले? तर बाबा दबक्या आवाजात आमच्याच इमारतीत तेराव्या मजल्यावर राहणारे त्यांचे मित्र आताच गेल्याचे म्हणाले... माझ्या मनात एक भयभीत करणारा प्रश्न निर्माण झाला, म्हणजे कुत्र्यांच्या रडण्याबाबत जे म्हटले जाते ते खरे आहे का?

        

त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा मध्यरात्री तोच कुत्र्यांचा रडण्याचा भेसूर कर्णकर्कश आवाज कानावर आला आणि भीतीने माझ्या हृदयाचे ठोके वाढले. सकाळी कळले रात्री आमच्याच इमारतीतील एक म्हातारी वारली... आता मात्र हे कुत्र्यांचे रडणे माझ्या हृदयातील भीतीने धडधडणे ठरू लागले... असे धडधडणे यापूर्वी तेव्हा व्हायचे जेव्हा आम्ही लहान होतो आणि पत्र्याच्या चाळीत राहत होतो. तेव्हा संध्याकाळचे सात वाजले की अचानक घरावर मोठमोठे दगड पडायचे! घराचे झप्पर तोडून एखादा दगड आपल्या डोक्यात पडेल, या भीतीने रात्र रात्र झोप यायची नाही. कोणीतरी म्हणायचे हे दगड भुते फेकतात. त्यात तथ्यही असावं, कारण दगडांचा अक्षरशः पाऊस पडायचा. पण कधीच कोणी त्या दगडाने जखमी झाला नाही. हे प्रकरण जवळ जवळ वर्षभर सुरू होतं. त्यानंतर आमची शेजारीण त्यातील एक दगड एका मंत्रिकाकडे घेऊन गेली आणि दगड पडणे थांबले ते कायमचे... त्यानंतर मध्यरात्री पत्र्यांवर थाप मारणे सुरू झाले. कित्येकदा तर चक्क एका स्त्रीचा किंचाळण्याचा आवाज ऐकू येत असे.

        

एका संध्याकाळी माझ्या बाबांना एक मोकळे केस सोडलेली बाई चाळीच्या शेजारच्या बांदाच्या दिशेने चालत जाताना दिसली. बाबांनी तिचा पाठलाग केला, तर अचानक ती अदृश्य झाली. नंतर कळलं काही वर्षांपूर्वी त्या बांदापलीकडे असणाऱ्या एका घरात राहणाऱ्या स्त्रीने सरकारी हॉस्पिटलच्या चौथ्या मल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. तीच ती बाई येथे जखीण बनून वावरत होती... त्यानंतर कित्येक वर्षं तिचा वावर तिथे होता. एक दिवस आमच्याच शेजारी राहणारी माझ्या मामाची मुलगी संध्याकाळी दारात केस विंचरत बसली होती. काय झाले देव जाणे. ती अचानक मोठमोठ्याने हसायला लागली... आमची मामी तिने लगेच तिच्या अंगावरून काढून टाकले. त्यानंतर ती बरी झाली. ती हसण्याचे तिला आठवतही नव्हते. माझा बारका मामा, तो तर मानवगणाचा. तो कामावर जाताना त्याला वाटेत चार रस्ता लागत असे. त्यावेळी त्या रस्त्यावर बरेच लिंबू-पोवळे, बांगड्या वगैरे काळी पिंजर टाकून मंत्रवून अंगावरून काढून टाकलेले साहित्य ठेवलेले असायचे. चालताना मामाची लाथ चुकून त्या साहित्याला लागली आणि घरी येताच त्याला दरदरुन घाम फुटला आणि तो अंग झाडू लागला. त्याला आवरायला सहा माणसेही कमी पडू लागली. तेव्हा आमच्या चाळीतील एक गृहस्थ आले आणि त्यांनी काहीतरी तंत्रमंत्र केले तेव्हा तो पूर्वपदावर आला. 

       

आमच्या शेजारच्या चाळीत राहणाऱ्या एका स्त्रीने नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आग लावून घेऊन आत्महत्या केली... त्यानंतर मध्यरात्री ती बऱ्याच लोकांना पांढऱ्या साडीत त्या चाळीबाहेर वावरताना दिसायची. आमचा सार्वजनिक शौचालयात जाण्याचा आणि तिचा फिरण्याचा मार्ग एकच होता. आमच्या चाळीत एक भैय्यानी नुकतीच भाड्याने राहायला आली होती. एका भर दुपारी ती शौचालयात गेली असता तिने तिला झपाटले. घरी आल्यावर ती अंग झाडायला लागली. तशा आजूबाजूच्या मराठी बायका जमा झाल्या, तर ती त्यांच्याशी मराठीत बोलू लागली. मग तिला घट्ट पकडून शेजारच्या भुताखेताबद्दल ज्ञान असणाऱ्या व्यक्तीने तिच्या कपाळाला इबुत लावली आणि म्हणाला, सांग तू कोण आहेस? सांग तू कोण आहेस? त्यावर तिने त्या जळून मेलेल्या स्त्रीचे नाव सांगितले. इतकेच नव्हे तर आपल्या नवऱ्या मुलांचीही नावे सांगितली. त्याने तिला विचारले हिला सोडायला काय घेशील, तर ती म्हणाली मला भाजलेला सुखा जवळा आणि चपाती हवी आहे. त्यावर तो म्हणाला, ती दिल्यावर जाशील... त्यावर ती हो म्हणताच एक बाई भाजलेला जवळा आणि चपाती घेऊन आली. तो तिने बकाबका खाल्ला आणि तिने तिला सोडताच ती भैय्यानी बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा झालेले काहीच तिला आठवत नव्हते. 

        

आम्ही ज्या सरकारी शाळेत जायचो ती शाळा पूर्वीच्या जंगलाच्या जमिनीवर होती. तिथे पूर्वी अनेक प्रेते पुरली वगैरे होती. आमच्या शाळेच्या जवळच एक सार्वजनिक शौचालय होते. त्यातील काही शौचालयाच्या कड्या आतून लावलेल्या होत्या. आत कोणीही नसताना तेथे म्हणे काही बायकांनी स्वतःला जाळून घेतले होते. दुपारी शाळा सुटल्यावर आम्ही घरी येताच माझ्या सोबतच शाळेत असणाऱ्या शेजारच्या मुलीला अचानक घाम फुटला आणि ती अंगावरील कपडे काढून फक्त चड्डीवर वेड्यासारखी करायला लागली. त्यानंतर महिनाभर तिने अंघोळ केली नाही. तशीच उघडी बोडकी केस सोडून अक्की चाल फिरत राहायची. कोणालाच ओळखायची नाही. तिच्या आई-वडिलांनी अनेक तांत्रिक मांत्रिक केले पण काहीच फरक पडत नव्हता. शेवटी माझे बाबा म्हणाले, माझ्या मामाकडे घेऊन जाऊया, आला गुण तर आला. माझ्या बाबांचे मामा त्यांना वयाच्या चौदाव्या वर्षीच भगवान शंकराचा साक्षात्कार झाला होता, तेव्हापासून ते साधनेत पण संसारी होते. त्यांचे दादरला एक शंकराचे मंदिर होते. बाबा तिला आणि तिच्या वडिलांना घेऊन त्यांच्याकडे गेले. ते मंदिरातच बसले होते. बाबांनी त्यांना समस्या सांगितल्यावर त्यांनी देवळाचे दार बंद करायला सांगितले. दार बंद करताच त्यांनी शंकराची इबुत घेऊन तिच्या कपाळाला लावताच ती दाराच्या फटीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागली. पण निरर्थक प्रयत्न करून थकल्यावर ती बेशुद्ध झाली. थोड्यावेळाने ती सवरल्यावर तिला घरी घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती नेहमीसारखी दुकानावर बटर आणायला गेली. त्यानंतर तिला तसा त्रास पुन्हा कधीच झाला नाही. 

      

चार-पाच वर्षांपूर्वी माझ्या एका मित्राने चाळीत एक खोली भाड्याने घेतली होती. एक दिवस तो मला भेटायला आला. तेव्हा तो मला म्हणाला, ही खोली छान आहे, मोठी आहे आणि भाडेही खूपच कमी आहे. पण शेजारी पाजारी म्हणतात या खोलीत एका महिन्यापेक्षा अधिक कोणीही टिकत नाही. मी त्यावेळी त्याला काहीच म्हणालो नाही. पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली म्हणून त्याच चाळीत राहणाऱ्या माझ्या दुसऱ्या मित्राला मी फोन लावला आणि चौकशी केली असता तो म्हणाला, चार-पाच वर्षांपूर्वी त्या खोलीत एका बाईने आपल्या दोन लहान मुलांसह स्वतःला जाळून घेतले होते. आता मात्र माझ्या मनात धडकी भरली. पण मित्राला सांगावे कसे? महिन्याभरातच तो मित्र माझ्याकडे आला आणि मला म्हणाला, मी ती खोली रिकामी केली! मी, का? असा उगाचच प्रश्न केला तर तो म्हणाला, काय माहीत नाही. त्या घरात गेल्यापासून चित्रविचित्र भास होतात आणि बायकोही आजारी पडली. काही दिवसांपूर्वी एक दिवस आम्ही तिच्या माहेरी थांबलो. दुसऱ्या दिवशी येऊन पाहतो तर काय आमच्या घरातील सर्व पाण्याने भरलेले हंडे रिकामे उपडे घालून ठेवले होते. मग मी शेजारी चौकशी केली तर शेजारी म्हणाले, येथे एका बाईने आपल्या दोन मुलांसह जाळून घेतले होते. त्यांचे आत्मे भटकत आहेत. येथे हा असा अनुभव येथे भाड्याने राहायला येणाऱ्या प्रत्येकाला येतो... काहींना तर ती दिसायचीही रात्री अपरात्री... त्यावर मी म्हणालो, बर झालं वेळीच खोली खाली केलीस... यापुढे कोणतेही घर भाड्याने घेताना त्याची अगोदर चौकशी करत जा! 

      

माझा मित्र आणि मी त्याच्या बाईकवरून एका कामानिमित्त घोडबंदर रोडमार्गे ठाण्याला जात होतो, तर जाताना घोडबंदर रोडवरील एका नाक्यावर अचानक त्याची बाईक थांबली. जेथे बाईक थांबली ती जागा खूपच शांत शांत होती. आजूबाजूला काहीच नव्हते, फक्त दाट झाडी होती. त्याने बाईक सुरू केली आणि आम्ही ठाण्याला गेलो. त्यानंतर एक दिवस त्याच रस्त्याने आम्ही डोंबिवलीला गेल. दुसऱ्या कामासाठी, तर पुन्हा त्याच जागेवर येताच बाईक धीमी होऊन बंद पडली. मला वाटलं तिथे थोडी चढण आहे म्हणून मित्र बाईक थांबवतो. ते डोंबिवलीचं कामही आटपलं. त्यानंतर काही दिवसांनी त्याच मार्गाने आम्ही कल्याणला जात असताना मित्राने बाईक पुन्हा त्याच ठिकाणी आल्यावर थांबवली. बाईक सुरू करून थोड्या अंतरावर गेल्यावर मी मित्राला विचारले, तू प्रत्येकवेळी बरोबर याच ठिकाणी बाईक का थांबवतोस? त्यावर तो म्हणाला, अरे! मी थांबवत नाही, प्रत्येकवेळी बरोबर या ठिकाणी आल्यावर आपली बाईक थांबते... आता मात्र माझ्या मनात भीतीने घर केलं... त्यावर तो म्हणाला त्या जागेवर बरेच अपघात झालेत म्हणतात... त्यांनतर बाईकवरून पुन्हा तिकडे जाणे झाले नाही... 

       

बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही चाळीतील सर्व मित्र एका मित्राच्या लग्नाला त्याच्या गावी गेलो होतो. आमच्या मित्रात एक मित्र मानवगणाचा होता आणि त्याला भूत जिथे असतील तिथे दिसायची! माझे काही मित्र दारू प्यायचे आणि फुकटची भेटली तर जरा जास्तच प्यायचे. त्या लग्नात रात्री पी पी प्यायले आणि त्याच गावातील आमच्या दुसऱ्या मित्राच्या घरी झोपायला जाण्यासाठी जंगलातून रस्ता तुडवत जात असताना आमचा तो मित्र म्हणाला, बघ! या झाडावर भूत आहे. त्याच गावातील आमचा मित्र म्हणाला, हो! हे खरं आहे. त्या गावात जी जी झाडे झपाटलेली होती ती तो बरोबर सांगत होता. आमचा एक मित्र त्याला जरा जास्तच चढली होती आणि त्याचा भुतांवर विश्वास नव्हता. त्याला जोरात लघवीला झाली. एका झाडाजवळ येताच त्याने त्या मित्राला विचारले, या झाडावर भूत आहे का? तो हो म्हणताच तो त्या झाडावर मुतला... त्यानंतर आम्ही आपआपल्या गावी जाऊन सोळा-सतरा दिवसात मुंबईला परत आलो. पण तो काही आला नव्हता म्हणून चौकशी केली असता कळले की तो गावी गेल्यापासून खूप आजारी पडला आहे. तेव्हा झालेला प्रकार कोणीतरी त्याच्या घरी सांगितला आणि मग तंत्रमंत्र केल्यावर तो बरा झाला...

      

ही गोष्ट माझ्या जन्माच्याही अगोदरची आहे, माझे चुलत काका मिलेटरीत होते. असं म्हणतात पश्चिम बंगालमध्ये असताना ते एका बंगाली मुलीच्या प्रेमात पडले. तिने त्यांना लग्नाबद्दल विचारले असता त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीचा विचार करता ते नाही म्हणाले आणि सुट्टी काढून गावी आले. त्यांच्या या कृतीचा त्या बंगाली मुलीला प्रचंड राग आला. तिने त्यांच्यावर बंगाली विद्येने काळी जादू केली. गावाला आल्यानंतर काही दिवसातच तो वेड्यासारखा करू लागला. सारखे त्याच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. म्हणून एका तांत्रिकाकडे चौकशी केली असता तो म्हणाला, त्याच्यावर काळी जादू केलेली आहे. येत्या अमावस्येला त्याच्या जीवाला धोका आहे, त्यामुळे रात्रभर डोळ्यात तेल घालून त्याच्यावर लक्ष ठेवा! तांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे सारे डोळ्यात तेल घालून जागे होते. पण कशी काय ती सर्वांना झोप लागली. सकाळी उठून बघतात तर तो गायब म्हणून गावभर शोधाशोध केली पण तो सापडला नाही. गावाच्या सीमेबाहेर एक आंब्याचं झाड होतं. त्या झाडावर त्याने फास लावून घेतला होता. त्याने कोयता झाडाच्या बुंद्यात मारून ठेवला होता आणि स्वतःच स्वतःचे हात पाय बांधून त्याने फास लावून घेतला होता... त्यानंतर कित्येक दिवस तो गावच्या लोकांना त्रास देत होता. कित्येक दिवस लोक रात्री घराबाहेर पडायलाही घाबरत होते. गावकऱ्यांनी कसाबसा त्याचा बंदोबस्त केला... पण आपले हात पाय बांधून घेऊन कोणी फास कसा लावून घेऊ शकतो हे कोडे काही कधीच उलगडले नाही...

       

आमच्या चाळीत राहणारा माझा एक बेवडा मित्र रोज रात्री बारा-एक वाजेपर्यंत हायवेला लागून असलेल्या नाल्याच्या कडेला असणाऱ्या कठड्याला लागून बाईक थांबवून रोज एक कॉटर पीत असे चकण्यासोबत. एक दिवस असाच तो अमावस्येच्या रात्री दोन-चार उकडलेली अंडी घेऊन दारू पीत होता. इतक्यात एक सुंदर तरुणी त्याच्या बाजूला येऊन बसली. ती त्याला म्हणाली, मलाही दे ना दारू. त्याने ती बाटली तिच्या हातात दिली. एक घोट तो एक घोट ती मारत होती. तिने त्यासोबत अंडीही खाल्ली... दारू संपल्यावर ती त्याला म्हणाली, चल आपण बाईकवरून फिरुया. रात्रभर बाईकवरून फिरून त्याने तिला तिथेच सोडले असता ती म्हणाली, उद्या दारूसोबत मच्छी घेऊन ये! दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच... असे बरेच दिवस चालले. त्याच्या आईला प्रश्न पडला हा रोज मच्छी मटण अंडी घेऊन जातो कोठे आणि रात्रभर कोठे भटकत असतो आणि सकाळी आल्यावर प्रचंड थकलेला असतो... त्यामुळे त्याच्या आईने त्याच्या भावाला त्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितले तर त्याने पाहिले तो एकटाच त्या कठड्यावर बसून कोणाशीतरी दारू पिता पिता गप्पा मारत असतो आणि दारू संपली की निघून जातो... एक दिवस त्या तरुणीने त्याला तिच्यासाठी साडी आणि बांगड्या आणायला सांगितल्या. त्याने त्या आणल्या असता त्याच्या आईला संशय आला आणि त्या रात्री त्याच्या आईने व भावाने आणि इतरांनी त्याला घरातच पकडून ठेवले असता, ती त्याला घराबाहेरून हाका मारू लागली. त्यावर तो ती मला बोलावतेय. मला जायला हवं म्हणू लागला. तेव्हा सर्वांना खात्री पटली, हा झपाटलेला आहे. दुसऱ्या दिवशी त्याला घेऊन सर्व आरेतील एका मुस्लिम मांत्रिकाकडे गेले. त्याने त्याचे तंत्रमंत्र केले आणि तो म्हणाला, त्या जागेत फार पूर्वी एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा खून केला होता. तिनेच याला झपाटले होते. नशीब तुम्ही त्याला आजच माझ्याकडे घेऊन आलात नाहीतर उद्या अमावस्या होती ती त्याला घेऊन गेली असती... 

       

माझे एक काका आहेत. हल्ली ते गावी असतात. त्यांच्याबाबतीत फारच विचित्र गोष्टी घडतात. त्यांना मिळालेला हा शाप आहे की वरदान तेच कळत नाही त्याच्याबद्दल. मी अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या होत्या की ते ज्या चांगल्या गोष्टीवर त्यांची नजर पडेल आणि ते छान म्हणताच त्या वस्तूचे नुकसान होते... उदा. ते एखाद्याच्या बागेत गेले आणि एखाद्या झाडाकडे पाहून त्यांनी स्तुती केली की ते झाडच मोडून पडते, त्यांनी एखाद्या लहान मुलांची स्तुती केली की ते मूल आजारी पडते... एकदा तर ते उपस्थित होते म्हणून एक घर बांधत असताना घराची विटच लागत नव्हती... ते छान म्हणाले म्हणून कित्येकांच्या खिडकीच्या नव्या कोऱ्या काचा फुटल्या. नव्या नवरीची जरी त्यांनी स्तुती केली तर तीही आजारी पडते... मला स्वतःला हे सगळे अशक्य वाटत होतं तर माझे बाबा म्हणाले, हा दोष त्याच्या आईकडून त्याच्यात आला आहे. त्याची आई तर याच्यापेक्षा भारी होती. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही म्हणतात पण तिच्या शापाने आपली एक गाय मेली होती. आपली एक गाय चुकून तिच्या आवारात शिरली आणि तिने काही झाडे खाल्ली त्यावर ती म्हणाली, ज्या गुराने माझे झाडे खाल्ली त्याच्या जिभेचे लाळे पडतील आणि खरंच दुसऱ्या दिवशी त्या गाईच्या जिभेचे लाळे पडून ती मेली. गटामुळे गावातील लोक तिला भयंकर घाबरत असत. ती त्या काळच्या एका मोठ्या मांत्रिकाची मुलगी होती. तिच्यात हा दोष उपजत होता आणि तिच्यातून तो तिच्या मुलांमध्ये आणि आता मुलांच्या मुलांमध्ये आला आहे. माझा या सगळ्यावर विश्वास बसत नव्हता. पण गेल्याच वर्षी मी गावी गेलो होतो. मी माझ्या अंगणात खुर्चीत बसलो होतो. माझ्या मामाचा कलम भरपूर आला होता, तोच पाहत होतो इतक्यात ते काका आले आणि कलमाकडे पाहून म्हणाले, या एका फांदीवर खूप आंबे आहेत! असं म्हणून ते त्यांच्या वाड्याकडे गेले आणि त्या आंब्याची ती आंब्यांनी भरलेली फांदी मोडून खाली पडली... त्यानंतर आम्ही गावातील एका फणसाच्या झाडावरून काही फणस काढले तर ते म्हणाले बघून घे फणसाचे गरे खराब निघतील आणि खरोखरच सर्व फणस खराब निघाले. पण त्याच फणसावरील त्यापूर्वी आणलेला फणस चांगला निघाला. तरीही मला हा योगायोग वाटला. पण त्यानंतर आमच्या गावच्या घरात लाद्या टाकण्याचे काम सुरू असताना ते आले आणि शेवटची सर्वात जाड असणारी लादी तुटून काम करणारा माझा मित्र खाली आला. त्याला दुखापत झाली. पण आमच्या सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. त्या काकांची ती आई आणि त्यांचे वडील एकाच दिवशी वारले. कदाचित आपण एकत्र मरावं ही तिचीच इच्छा असावी... त्या काकांचे लहान भाऊ काही वर्षांपूर्वी घाटकोपरला दरड कोसळली होती, त्यात गाडले गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांच्या त्या आईचा धावा केला आणि ते बचावले होते... आता ते काका समोरून येताना जरी दिसले तरी माझ्या काळजात धस्स... होते.


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror