जगावेगळे आयुष्य...
जगावेगळे आयुष्य...
जगावेगळे आयुष्य...
लेखक :- निलेश बामणे
विजयच्या गावी घटस्थापना असल्यामुळे त्याचे आई- वडील काही दिवसांसाठी गावी गेले होते. त्यामुळे आता विजयचा घरगडी होणार होता. घरात घरगडी झाल्यावरच त्याच्या मनात कधीतरी हा विचार येतो की आपण लग्न केले असते तर बरे झाले असते का ? पण दुसर्याच क्षणाला त्याच्या मनात असाही विचार येतो की पुरुषाची स्त्री ही खरोखरच गरज असते ! त्यांना तिच्याकडून प्रेम आणि पोरं हवी असतात अथवा स्त्री शिवाय त्यांना आपले आयुष्य अपुर्ण वाटत असते म्हणून लग्न करतात..? पण विजयला खूप विचार केल्यावर असे वाटते की प्रत्येक पुरुष स्त्रीचा आयुष्यभर फक्त आणि फक्त फायदा उचलत असतो. आपल्या आयुष्यातील फक्त रिकाम्या जागा भरण्यासाठी तिचा वापर करत असतो. नेमके तेच विजयला आवडत नाही. विजयला नेहमीच वाटत आले की प्रत्येक स्त्रीची स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख असायला हवी ! तिच्या आयुष्यातील कोणताही पुरुष ही तिची ओळख नसावी. पण विजयचा अभ्यास असे सांगतो की बहुसंख्य स्त्रियांनाच पुरुषांना वगळून त्यांना त्यांची स्वतंत्र ओळख नकोय ! विजयच्या आयुष्यात अशा खूप स्त्रिया आल्या होत्या ज्या फक्त यशस्वी पुरुषाच्या शोधात होत्या त्यातील एकीतही एखाद्या पुरुषाला यशस्वी करण्याची धमक नव्हती. विजयला नेहमी वाटायचे की त्याच्या आयुष्यात अशी कोणी तरी येईल जी त्याला तो यशस्वी व्हावा म्हणून साथ देईल. पण तशी कोणी त्याच्या येण्याची वाट पाहता पाहता तो बिचारा अर्धा म्हातारा झाला होता. त्याचे बहुसंख्य केसही आता पांढरे झालेले होते. त्याच्या चेहर्यावरील पुर्वीचे ते तेजही नाहीसे झालेले होते. त्याच्या शरीरातील ताकदही दिवसेन दिवस कमी होत चालल्याची त्याला जाणीव होऊ लागली होती. त्याच्या आयुष्यात आता कोणी स्त्री नव्याने येईल याची त्याला खात्री वाटत नव्हती. आली तरी आता त्याच्या आयूष्यात ती किती रंग भरेल अथवा तो तिच्या आयुष्यात किती रंग भरेल याबद्दल त्याला शंका वाटत होती. त्यात आता जगावर तीसर्या महायुद्धाचे ढग दाटू लागले आहेत. माणूस माणसाच्या जीवावर उटला आहे. करोडो रुपयांची संपत्ती जी उभारायला कित्येक वर्षे लागली असतील ती क्षणात बेचिराख होत आहे. हजारो लोकांचे आयुष्य संकटात आहे. माणसाला फक्त माणूस म्हणून जगणे का शक्य होत नाही. ते शक्य झाले असते तर जगात किती आनंद, शांती, समाधान आणि सुख असते.
माणसाचा निरर्थक गोष्टी मिळविण्यासाठीचा संघर्ष काही आजचा नाही. तो हजारो वर्षापासून चालत आलेला आहे. विजयला नेमका हा संघर्ष नेहमीच नकोसा वाटायचा ! आजही नकोसा वाटतो. त्यामुळे त्याच्या आयुष्यात आलेली कोणतीच स्त्री त्याची व्हावी म्हणून त्याने कधीच संघर्ष केला नाही. त्याला नेहमी वाटायचे की कोणतीही स्त्री आपल्या आयुष्याचा भाग अगदी सहज व्हायला हवी. पण त्याच्या दुर्दैवाने तसे काही झाले नाही. त्याने मनात आणले असते तर इतर मार्गांनी तो कोणत्याही स्त्रीला आपल्या आयुष्याचा भाग सहज करू शकला असता पण त्याला तसे करायचे नव्हते. प्रेम ही भावना खूपच छान आहे पण त्यात काही मिळविण्यापेक्षा त्यागाला अधिक महत्व द्यावे लागते. जे नेमके बहुसंख्य मानवांना जमत नाही. त्यामुळेच जगात अशांती आहे. विजयला त्याचे आयुष्य शांततेत घालवायचे होते. कोणत्याही स्त्रीमुळे, तिच्या सोबत आलेली अशांती ही त्याला त्याच्या आयुष्यात नको होती. त्यामुळेच त्याच्या वाट्याला जे आयुष्य जगण्याला आले तो तेच आयुष्य आता पर्यत जगत आला. या जगात निरुपद्रवी प्राण्यांना त्रास देणारेच हिंसक प्राणी जास्त असतात. त्याप्रमाणे त्याच्या साध्या सरल जगण्याचा कित्येकांनी फायदा घ्यायचा तो घेतलाच. त्यामुळे विजय आता त्या माणसांतही फार रमत नाही. त्याला शक्य झाले असते तर तो ही शांततेत निसर्गाच्या सानिध्यात एकांतात एखाद्या साधुसारखे आयुष्य जगला असता. आता जगभरातील युद्धात जो निरपराध लोकांचा बळी घेतला जात आहे. तो त्याला एक माणूस म्हणून प्रचंड व्यतीत कारतो. माणसाची क्रुरता आता माणसाच्याच मुळावर उठलेली दिसत आहे.
माणूस जे काही मिळविण्यासाठी सतत धडपडत असतो त्यातील काहीही तो जोपर्यंत जिवंत आहे फक्त तोपर्यंतच कामाचे असते. तरीही माणूस त्याच्या गरजेपेक्षा जास्त जमा करण्यासाठी अट्टहास का करत असतो. अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर कळते की आपण जे काही जमा केले आहे ते किती निरर्थक आहे. त्यावेळी माणसाला आपले फक्त आणि फक्त जीवन मह्त्वाचे असते त्या परिस्थितीत जागण्यासाठी तो कोणतीही किंमत मोजायला तयार असतो. काही माणसे आपल्या हिंसक वृत्तीमुळे आणि अविचारी अतर्कीय विचारांमुळे लाखो लोकांचा जीव धोक्यात घालतात. सामान्य माणसांना बाकी कशाचीच चिंता नसते त्यांना चिंता असते ती फक्त आणि फक्त जगण्याची.
आता जर तिसरे महायुद्ध झालेच तर त्याने कोणाला काय साध्य होणार आहे ? पण त्या युद्धामुळे जी हानी होईल ती कदाचित कधीही भरून न येणारी असेल. त्यापुढे विचार करता कदाचित पृथ्वीचे अस्तित्वही धोक्यात आलेले असेल. एका माणसाला दुसर्या माणसावर अधिराज्य का गाजवायचे असते ? तेच कळत नाही. ईश्वराने माणसाला सर्व प्राण्यात सर्वात जास्त बुद्धीमान बनवले पण माणसाने काय केले आपल्या बुद्धीच्या साह्याने आपल्याच सर्वनाशाची साधने निर्माण केली. एका धर्माचा माणूस दुसर्या धर्माच्या माणसाचे अस्तित्व नष्ट करण्यासाठी झटतो आहे पण कोणाच्याही मनात आपण फक्त माणूस म्हणून जगू या ! असा विचार का बरे येत नाही. हा प्रश्न विजयला सतत व्यतीत करत असतो.
एक विशिष्ट व्यक्ती आपली व्हावी म्हणून माणूस कित्येकांना त्रास द्यायला तयार होतो. पण ती मिळविलेली व्यक्ती गेल्यावर तो मात्र तिच्यामागून कधीच जात नाही. आता युद्धामुळे ज्यांना ज्या गोष्टींशी काहीही देणे घेणे नाही अशा निरअपराध व्यक्तींना नाहक जीव गमवावा लागतो. माणसाचे जगणे हेच महत्वाचे आहे कशासाठी तरी जगणे हा फक्त भ्रम आहे. काहीप्रमाणात सामान्य माणसे युद्धापासून दूर ठेवली तरी युद्धात लढताना मारली जाणारीही शेवटी माणसेच असतात ना ? आप आपल्या आहे त्या परिघात माणूस सुखी का राहू शकत नाही... त्याला सारखे अस्तित्वात नसलेल्या क्षितिजाचेच आकर्षण का असते. प्रत्येक माणूस आयुष्यभर काही ना काही मिळविण्यासाठी सतत झटत राहतो. त्याला एक गोष्ट मिळाली की त्याला दुसरी गोष्ट हवी असते. त्याची हाव कधीही संपत नाही. अगदी मृत्यू समोर उभा असतानाही. विजयही त्याला अपवाद नव्हता पण ! त्याची हाव सामान्य माणसांपेक्षा थोडी वेगळी होती. त्याला जे काही हवे ते जगाच्या कल्याणासाठी हवे होते. त्याला त्याच्या जगण्याला अर्थ देण्याची हाव होती. सामान्य माणूस म्हणून जन्माला येऊनही त्याला सामान्य माणसासारखे मरायचे नव्हते. माणूस म्हणून त्याला त्याच्या आयुष्यात काहीतरी इतरांपेक्षा वेगळे करायचे होते. त्यामुळेच तो लेखक झाला. अनेक विषयांवर बेताचे शिक्षण असतानाही अभ्यासपुर्ण लेख लिहिले आजही लिहित आहे. हजारो लोक त्याचे विचार वाचतही आहेत. एक लेखक म्हणून समाजात त्याची थोडीफार ओळखही झालेली आहे. पण अजूनही त्याला खंत वाटते की त्याच्या हातून काहीही भव्य दिव्य काम झालेले नाही. बर्याच वादग्रस्त विषयांवर भाष्य करण्याची त्याला हुकी येते पण त्याच्या होणार्या संभाव्य परिणामांचा विचार करून तो गप्प बसतो. त्याचा समाजात घडणार्या बर्याच गोष्टींना विरोध होता. पण त्या गोष्टींना फक्त त्याने एकट्याने विरोध करुन त्या बदलणार नाहीत याची त्याला खात्री होती त्यामुळेच त्या गोष्टींच्या विरोधात त्याने आपल्या कथांच्या माध्यामातून आवाज उटविण्याचा प्रयत्न केला. सरल सरल समजाच्या विरोधात दंड थोपटणे ही आत्महत्या ठरते. हे त्याला अभ्यासाअंती लक्षात आलेले होते. कोणा एका माणसाच्या बोलण्याने समाज बदलत नसतो. समाजात बदल करण्याची एक प्रक्रिया असते जिला तिचा वेळ हा द्यावाच लागतो. विजयला एक गोष्ट लक्षात आली होती. समाजात बदल हा आपल्याला समाजात राहूनच समाजाच्या कलाने घेत आपण आपल्या जगण्याच्या कृतीतून करायला हवा ! विजयला नेहमीच असे वाटायचे की त्याने मांडलेला प्रत्येक विचार हा त्याने त्याच्या प्रत्येक्ष आयुष्यातही जगायला हवा ! विजय तो जगतही आला त्यामुळेच आज त्याच्या वाट्याला हे एकाकी नाही म्हणता येणार पण जगावेगळे आयुष्य आलेले आहे...
विजय आता वयाने वाढला असला तरी त्याचे मन मात्र अजूनही तरूणच आहे. आजही सुंदर तरुणी पाहिल्या की त्याच्या मनात फुलपाखरे उडायला लागतात. आज कित्येक दिवसानंतर विजय छान तयार होवून त्याच्या मित्रायला भेटायला चालला होता. त्याने छान लालसर रंगाचा टी- शर्ट घातला होता. करड्या रंगाची जीन्स घातली होती. पायात पिवळसर रंगाचे नवीन बुट होते. एका हातात सोनेरी रंगाचे घड्याळ तर दुसर्या हातात चांदीचा कडा होता. ऑक्टोबर हिट असल्यामुळे त्याने डोळ्यांवर काळा गॉगल चढवला होता. तो एखद्या म्हातार्या नायकाच्या रुबाबात बस स्टॉपवर उभा होता. नुकत्याच वयात आलेल्या आणि तारुण्याच्या धुंदित असणार्या तरुणी त्याच्याकडे पाहात होत्या पण आता त्या काही त्याच्या प्रेमात वगैरे पडणार नव्हत्या. पण हल्लीच्या तरुणींना जसे चित्रपटातील म्हातारे हिरो आवडतात. तसा तो त्यांना नक्कीच आवडू शकत होता. त्याच्या नजरेत त्या फक्त सुंदर होत्या, कामुक होत्या, त्यातील काही मादक होत्या तर काही अगदीच बाळीश... मुलीला बोलताना ऐकल्यावर त्याला लगेच कळते की ती मुलगी यापैकी नक्की कोणत्या प्रकारातील आहे. त्या सर्व तरुणीत एक तरुणी त्याच्या ओळखीची नाही म्हणता येणार पण त्याला कदाचित ओळखणारी होती कारण ती त्याच्या इमारतीत राहणारी होती. ती मुलगी कधी त्याला त्याच्या समोरून येताना दिसल्यास तो त्या मुलीचा चेहरा नेहमीच वाचण्याचा प्रयत्न करतो पण का कोणास जाणे त्या मुलीच्या चेहर्यावर त्याला कोणत्याच भावभावना दिसत नाहीत. तिच्या कानाला सतत भले मोठे एअरफोन लावलेले असतात . पण आपण काही ऐकतानाही आपल्या चेहर्यावरील हाव भाव बदलत असतात पण तिच्या चेहर्यावरील हावभाव त्या परिस्थितीतही बदलत नाहीत. कोणाशी हसणे नाही कोणाशी बोलणे नाही. ती आपल्या आपल्यातच सतत रमत असते. पुर्वी विजयने एखादी बस सोडली तर कित्येक तरूण मुली त्याच्यासाठी बस सोडायच्या पण ! ह्यावेळी तसे कोणी केले नाही त्यामुळे आता तो म्हातारा झाल्याची त्याला जाणीव झाली. विवाहीत स्त्रिया मात्र त्याच्याकडे पाहतात पण त्यांच्या त्याच्याकडे पाहण्यात त्याला प्रेम दिसत नाही. दिसते ती फक्त कामवासना ... त्यांच्याकडे पाहणे हे त्याच्या तत्वात बसत नाही.
पुर्वी कधीतरी विजय त्याच्या सवयीने जिच्या प्रेमात पडला होता अशी एक तरूणी आता विधवा झालेली आहे. त्यावेळी त्याने तिच्या प्रेमाचा स्विकार न करण्याला त्याची त्याची अशी काही कारणे होती म्हणण्यापेक्षा तेंव्हा त्याच्या आयुष्यात खूप तरूणी होत्या असे म्हणता येईल. आता त्या तरूणीला पाहिल्यावर त्याच्या मनात विचार येतो की आपण हिच्यासोबत लग्न करुन हिचे आयुष्य सावरूया का ? पण दुसर्या क्षणाला त्याच्या मनात हा विचार येतो की तिच्या आयुष्याबद्दल हा निर्णय घेण्याचा अधिकार तिने आपल्याला दिलाय कोठे ? आपण विचारल्यास कदाचित ती आपल्यासोबत तडजोड म्हणून लग्न करायला तयार होईलही पण ती आपल्या प्रेमात पडलेली नसेल. ती नव्याने तुझ्या प्रेमात पडली असती आणि तू तिच्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला असतास तर तो निर्णय योग्य म्हणता आलाही असता. त्यात तू फक्त सहानुभुती म्हणून तिच्याशी लग्न करायचा विचार करतो आहेत. सध्याचे तिचे दिसने तुला भुरळ घालत नाही. तिला पाहिल्यावर क्षणभरही तुझ्या भावना चाळावत नाहीत. तुझ्या मनात गुदगुळ्या होत नाहीत. हल्लीच तू कोठे तरी वाचले होतेस आपल्यावर प्रेम नसलेल्या व्यक्ती सोबत लग्न म्हणजे... वेश्यागिरीच म्हणावी लागेल. त्यामुळे त्याबाबतीत त्याने विचार करणे सोडून दिले. विजय विचारी असल्यामुळे खूप लोक त्याचा सल्ला मानतात त्याच्यासोबत अनेक विषयांवर सल्ला- मसलत करतात. त्याने कित्येकांना दिलेले सल्ले अचुक असतात. पण त्याच्यासमोर कोणी मुर्खासारखे बोलले की त्याच्या डोक्यात तिडीक जाते. विजयने त्याच्या बाबांना त्याच्याच इमारतीत एक दुकान भाड्याने घेऊन दिले होते. वास्तवात दुकानाचा करार हा तीन वर्षाचा अथवा पाच वर्षाचा असतो पण विजयने एक वर्षाचाच करार केला कारण ती जागा पाहताच त्याच्या मनात शंका निर्माण झाली होती. विजयच्या बाबांचा त्या जागेत प्रत्यक्ष फारसा व्यवसाय होत नव्हता. पण नावासाठी दुकान म्हणून त्या जागेचा उपयोग होत होता म्हणजे सामान वगैरे ठेवण्यासाठी.... त्या दुकानाचे भाडे इतर दुकानाच्या तुलनेत कमी असल्यामुळे त्या जागेत असणार्या समस्यांकडे विजय आणि विजयचे बाबा दुर्लक्ष करत होते. एक वर्ष पुर्ण झाल्यावर विजयचे 500 रुपये वगैरे भाडे वाढवून देण्याची तयारी होती. पण त्या दुकानाचा मालक ज्याला या दुकानातील समस्यांची कल्पना नव्हती. त्याने शहानपणा करुन इतर दुकानांच्या भाड्याची चौकशी केली आणि तितकेच भाडे वाढवून मागितले... विजय खिशातील पैसे घालून वेळच्या वेळी वर्षभर भाडे देत होता त्यामुळे कदाचित त्याचा गैरसमज झाला असावा की त्या जागेत उत्तम व्यवसाय होतो. पण तो त्याचा भ्रम होता. विजयला त्या जागेचे अधिकचे भाडे देऊन त्याचे पोट भरण्यात अजिबात रस नव्हता. विजय जरी लेखक असला तरी पक्का व्यवसायिकही होता. तो भावनेच्या भरात कोणताही निर्णय कधीच घेत नाही. विजयने त्या मालकाला स्पष्ट सांगितले मी तुला जास्तीत जास्त 500 रुपये वाढवून देईन ! या जागेतील समस्या तुला माहीत नाहीत... विजयला आता त्याला त्या समस्या सांगून सावध करायचे नव्हते . कारण तो मुर्ख त्याला व्यवसाबद्दल धडे द्यायला लागला. विजय त्याला सरळ म्हणाला,’’ आता मला निर्णय घ्यायचा नाही, निर्णय तुला घ्यायचा आहे ... जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घे आणि मला सांग ! विजयच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेची त्या मुर्खाला कल्पना नव्हती. विजय स्वप्नातही कोणाचे नुकसान करण्याचा विचार कधीच करत नाही. पण आता त्यालाच आपल्या पायावर धोंडा मारून घ्यायचा असेल तर त्याला विजय तरी काय करणार ? तो असा विचार करेल याची विजयला अगोदरच कल्पना आल्यामुळे विजयने त्या दुकानातील सामान कमी करायला अगोदरच सुरुवात केली होती. त्याने त्याला दिलेली डिपॉझीटची रक्कमही जास्त होती. जी तो लगेच देऊ शकणार नव्हता. ती रक्कम घेण्यासाठी विजय आता त्याला दुसरा भाडेकरू भेटेपर्यत थांबणार नव्हता. त्यामुळे त्याने जर विजयची अट मान्य केली तर तो फायद्यात राहणार होता. नाहीतर विजयने दुकान रिकामे केल्यावर निदान त्याला एक महिना तरी दुसरा भाडेकरू भेटणार नव्हता. त्यामुळे होणारे नुकसान त्याला झेलावे लागणारच होते. त्यात तो नवीन भाडेकरू त्या जागेत किती महिने टिकेल याची खात्री देता येणार नव्हती. तसेही ते दुकान आता विजयलाच सोडायचे होते. पण तसे त्याला कोणाला सांगायचे नव्हते. वर्षभर त्याच्या खिशाने जो चटका सोसला होता तो त्याला आता यापुढे सोसायचाच नव्हता. विजयला त्या जागेत धंदा करुन स्वत:चे नुकसान करून घेत त्या दुकानाच्या मालकाचे पोट भरत राहायचे नव्हते. त्यामुळे जे होत होते ते त्याच्याच मर्जीने होत होते. पण खरी समस्या तर तेंव्हा निर्माण होणार होती जर त्या दुकानाच्या मालकाला जरा डोके असेल आणि त्याने सारासार विचार करुन जर विजयची अट मान्य केली तर ... त्या परस्थितीत विजयच्या खिशाला आणखी 500 रुपयांचा फटका बसणार होता. ते 500 रुपये कसे वसूल करायचे यासाठी त्याला त्याचा मेंदुला त्रास द्यावा लागणार होता. धोड्या वाढीव भाड्याची लालसा त्या दुकान मालकाला केवढ्याला पडणार होती याची त्याला कल्पनाही नव्हती. त्याच्या त्या दुकानात व्यवसाय करण्यासाठी विजयला त्याच्या ओळखीचे वजन वापरावे लागत होते. त्याची त्या दुकान मालकाला कल्पनाच नव्हती. तो एका भ्रमात होता. त्याचा भ्रम दूर होईल तेंव्हा त्याला कळेल की आपण किती मोठा गाढवपणा केलेलाआहे. तो गाढवपणा त्या दुकानमालकाने करावा अशी विजयची मनापासून इच्छा होती. पण आता नक्की काय होणार हे विजयच्या हातात नाही तर नियतीच्या हातात होते. विजयचे काय ? त्याला लिखानासाठी खाद्यच हवे असते ते कोणत्याही मार्गाने का मिळेना ! जसे नवरा मरो नाहीतर नवरी मरो भटाला दक्षिणा मिळाल्याशी मतलब....
यंदाच्या दिवाळीनंतर म्हणे 35 लाख लग्न होणार आहेत. हल्ली लग्न करणे सोप्पे झाले आहे पण ते टिकविणे फारच अवघड झालेले आहे कारण हल्ली ते मोडणेही सोप्पे झालेले आहे. आता नवरा- बायकोच्या घटस्फोट घेण्याची समाजात फारशी चर्चा होत नाही. त्या दोघांचे पटले नसेल म्हणून घेतला घटस्फोट ! इतकी सहज प्रतिक्रिया असते समाजाची म्हणूनच आज समाजात लग्नाचा दहावा, पंचवीसावा अथवा पन्नासावा वाढदिवस जोशात साजरा केला जातो. कारण सर्वांना हे जाणून घेण्याची उत्सुकता असते की त्यांचे लग्न इतके वर्षे टिकले कसे ? विजयचे एक दोन मित्र सोडले तर बर्याच मित्रांची लग्ने बर्यापैकी टिकलेली आहेत. पण ते विजयला लग्न न करण्याचा सल्ला देतात आणि त्यावर एक विशेष टिप्पणीही जोडतात तू लग्न केले नाहीस म्हणून सुखी आहेस. आता विजय सुखी आहे हे त्यांचे त्यांनीच ठरवले. त्याच्या बर्याच मित्र – मैत्रीणींची मुले – मुली आता लग्नालाही झालेली आहेत. विजयला आता या वयात कोणाशी लग्न करणे ही एक मोठी जोखीम वाटते. त्याला आपल्यामुळे कोणाच्या वाट्याला संघर्ष यावा असे अजिबात वाटत नाही. कालच विजयचा एक मित्र तो त्याच्या बाबांच्या दुकानात बसलेला असताना त्याच्याकडे 500 रुपये मागू लागला. विजयने त्याला स्पष्ट सांगितले माझ्याकडे पैसे नाहीत. त्याला जरी वाटले असेल की तो खोटं बोलतो आहे तरी तो खरेच बोलत होता. विजयकडे त्यावेळी पैसे असते तरी त्याने त्याला दिले नसते कारण त्या पैशातून तो दारूच प्यायला असता. त्या मित्राच्या वडिलांनी दारुच्या व्यसनात त्यांचे सारे आयुष्य वाया घालवले पण मरेपर्यत काही दारू सोडली नाही. पण त्यांच्या तीन मुलांनी त्यातून काहीही बोध घेतला नाही. उलट ते ही आता त्यांच्या वडिलांच्या वाटेवर चाललेले आहेत. विजय किशोर अवस्थेत असे पर्यत त्याचे वडिल दारु प्यायचे म्हणून त्याला त्याचे शिक्षण पुर्ण करता आले नाही त्यामुळे विजय तेंव्हा पासून दारू आणि दारू पिणार्यांचा जितका तिरस्कार करतो तितका तिरस्कार कोणाचाही करत नाही. दारू पिणारा व्यक्ती वयाने कितीही मोठा असला आणि तो दारू पिऊन त्याच्या वाटेला गेला तर त्या व्यक्तीची इज्जत काढायला तो अजिबात मागे-पुढे पाहात नाही. विजयच्या मते दारू ही माणसाची ओळख बदलते. दारुत माणसाचे सर्व चांगले कर्म अक्षरश: वितळून जात असतात. दारूमुळे माणसाची किंमत तर कमी होतेच पण त्याच्या शब्दांचीही किंमत कमी होते. तो मित्र दारुड्या नसता तर विजयने त्याला दुसर्या कोणाकडून उसने का होईना पैसे घेऊन त्याला दिले असते. विजयवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे कारण एकच तो दारू पित नाही. दारू पिणारा माणूस कशानेही मेला तरी लोक म्हणतात,’’ दारू पिऊन मेला. “ दारू पिणारा माणूस कोणतेही गुपित आपल्या पोटात लपवून ठेऊ शकत नाही. त्याचा एक विवाहीत मित्र दारु प्यायला की आपल्या मित्रांना त्याचे विवाहबाह्य शारीरीक संबंध कोणा कोणा बरोबर आहेत. ते कोठे आणि कसे कसे आले याबद्दल सविस्तर माहिती देऊन बसतो. आता हे त्याच्या दारूड्या मित्रांनी दारूच्या नशेत त्यांच्या बायकांना सांगितले आणि त्यांच्या बायकांनी चुकून त्याच्या बायकोला सांगितले तर किती पंचाईत होइल... ? कल्पना न केलेली बरी... याला ही काही अपवाद असतात जे दारू प्यायल्यावर मुके होतात. विजयच्या आजुबाजुला शेकडो बेवडे असताना आणि तो दारुचा प्रचंड तिरस्कार करत असतानाही त्याने कधीच कोणाला दारू सोडण्याबद्दल सल्ला दिला नाही. त्याचा दुसरा एक मित्र उत्तम नोकरीला होता. काही कारणाने ती नोकरी सुटली. आता तो दारुच्या व्यसनाच्या आहारी गेला आहे. त्याच्या सोबत अनेक सुखाची सुंदर स्वप्ने रंगविलेल्या अतिशय सुंदर बायकोला बाईकवरून कामावर सोडायला आणि आणायला जातो. आता एक मुलगी असल्यामुळे त्याची बायको तिच्या नशिबाला दोष देत आहे. तो कामाला नाही ह्यापेक्षा तो दारुड्या झालेला आहे याचे दु:ख तिला जास्त आहे. ती दिसायला अतिशय सुंदर आहे आता ह्या परिस्थितीत जर तिचे पाऊल वेडे वाकडे पडले तर तिला दोष कसा बरे देता येईल..? संसार हा काही तिच्या एकटीचा नाही. तो नेहमीच दोघांचा असतो. आता ही जी 35 लाख लग्ने होणार आहेत त्यांचा संसार सुरु झाल्यानंतर पुढच्या काही वर्षात वैवाहीक समस्यांचे आकडेही नक्कीच काही लाखातच असतील त्याचे मुख्य कारण...आयुष्यात संघर्षाचा अभाव हे तर असेलच पण त्यासोबतच मीपणा हे एक सर्वात महत्वाचे कारण असेल. त्यामुळे हल्ली विवाहीत जोडप्यांना आपल्या सर्व समस्या आप - आपल्याच सोडवाव्या लागतात.
विजयची त्याच्या आयुष्यात स्वत:हून आलेल्या एखाद्या स्त्रीला प्रेम आणि मान- सन्मान देण्याची तयारी आहे पण त्याला तिला त्याच्यामुळे दु:ख झालेले नको आहे. हा असाच विचार लहान पणापासून केल्यामुळेच तो अविवाहीत राहिला. त्याच्या आजुबाजुला असणारे दारुडे पुरुष त्यांच्या बायकांना जो त्रास द्यायचे तो त्रास त्याला नेहमीच असह्य व्हायचा ! किती स्वप्ने उराशी बाळगून एखादी स्त्री एखाद्या पुरुषाच्या आयुष्यात त्याची पत्नी म्हणून येते पण तिच्या वाट्याला जेंव्हा तिच्या स्वप्नांची झालेली राख रांगोळी पहाणे येते तेंव्हा त्या स्त्रीयांना किती वेदना होत असेल याची विजय फक्त कल्पनाच करत आला. विजयला नेहमीच त्याच्या आजुबाजुला हसत- खेळत राहणारी माणसे आवडतात. त्यामुळेच तो स्वत:ही त्याला कितीही मानसिक त्रास होत असला तरी हसतमुखच राहतो. आता जे जगावर तिसर्या महायुद्धाचे ढग दाटून आले आहेत ते पाहता सुखाचा संसार हे येत्या काळात लग्न करणार्यांसाठी कदाचित एक स्वप्नही ठरू शकते. हा असा ! विजय जसा जगाचा आणि पुढचा विचार करतो तसा विचार करताना त्याला त्याच्या सोबतचा कोणीच दिसत नाही. प्रत्येकाला फक्त आणि फक्त आपल्याच संसाराची काळजी पडलेली आहे. ते काळजीत तेंव्हा पडतील जेंव्हा युद्धाच्या झळा त्यांच्या घरापर्यत पोहचतील. शेवटी सामान्य माणसे आणि एक लेखक यांच्यातील हाच तर महत्वाचा फरक असतो. हल्ली विजय रोज सकाळ संध्याकाळ युद्धाच्या बातम्या पाहतो आणि दु:खी होतो कारण जे उभारायला कित्येक वर्षे लागतात ते तो क्षणात नष्ट होताना पाहतोय. आपल्याला आपले जुने घर पाडून नवीन घर बांधायचे असले तरी जुने घर पाडताना दुख: हे होतेच ! जे या युद्धात भरडले जात आहेत त्यांच्या दुखा:ची विजयला कल्पनाही करवत नाही.
युद्ध ही गोष्ट टाळता येण्यासारखी कधीच नव्हती का ? असा प्रश्न विजय सारखा स्वत:ला विचारत असतो. अगदी महाभारतातील युद्ध देव स्वत: तेथे उपस्थित असतानाही थांबवू शकला नव्हता. कधी कधी विजयला वाटते एकमेकांशी युद्ध करणे हे माणसाच्या रक्तातच आहे का ? तो शांततेत आयुष्य का व्यतीत करू शकत नाही.. ? नवरा – बायकोलाही एकमेकांसोबत शांततेत आयुष्य काढणे शक्य होत नाही. ते ही कधी ना कधी एकमेकांच्या उरावर बसतात. त्यामुळेच हल्ली काही लोक साठीतही घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करू लागलेले आहेत. त्यामुळेच कदाचित आज जगाला युध्द थांबविण्यापेक्षा ते करणे अधिक सोयिचे वाटू लागलेले आहे. आयुष्यभर जपलेली कित्येकांची स्वप्ने या युद्धामुळे धुळीला मिळाली असतील. अजूनही मिळतील. मृत्यू काय तो आज ना उद्या येतो पण तो अनाहुतपणे येतो. पण युद्धात मृत्यू मनुष्याच्या मानेवर तलवारीसारखा सतत लटकत असतो. हे सतत मरणाच्या सावटाखाली जगण्यापेक्षा कित्येकांना मृत्यू जवळचा वाटू शकतो. जगभरात शस्त्रांची निर्मिती करणार्यांच्या मनात आपण निर्माण केलेली शस्त्रे कोणत्या ना कोणत्या मानवाचाच जीव घेणार आहेत असा साधा विचारही मनात येत नसेल का ? युद्धाने बाकी काही साध्य होत नाही पण प्रत्येक माणसाच्या जीवाची किंमत सारखीच आहे हे मात्र नक्कीच सिद्ध होते. कारण कोणतीही गोळी कोणाला काही विचारून लागत नाही. माणूस हा प्राणी शांततेत का जगू शकत नाही प्रत्येक माणसाला का दुसर्या माणसावर राज्य गाजवायचे असते. विजयने नेहमीच स्वत:ला या मानवी स्वभावापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले म्हणून तो जगापेक्षा वेगळा विचार करू शकतो. देवाला जेंव्हा मानव जात काही प्रमाणात संपवावीशी वाटेल तेंव्हा त्याचे खापरही मानवावरच फुटायला हवे म्हणून माणसाच्या मेंदूत ही युद्धखोरी विधात्याने जाणीवपुर्वक भरून ठेवलेली असवी कदाचित..!
विजयला हल्ली एका गोष्टीचे जास्त वाईट वाटते ती गोष्ट म्हणजे तो बुद्धीजीवी असतानाही त्याला आपल्या उदरनिर्वाहासाठी वेगळी मेहनत करावी लागते. त्याच्या बुद्धीच्या मानाने त्याला पैसे कधीच मिळाले नाही. आजही मिळत नाही. पण हल्ली हलकी कामे करणारे म्हणजे जेथे बुद्धीची फार गरजच नसते अशी कामे करणारे जास्त पैसे कमावतात. विजयला ही आता असे वाटू लागले आहे उगाच आपण आपली बुद्धी झिजवतो आहोत. त्यापेक्षा हलकी कामे केली असती तर मेंदुवर भार न देता आपण जास्त पैसे कामावून आज आनंदात मजा मस्ती करत जीवन जगू शकलो असतो. पण काय करणार वाघ गवत खाऊन जगू शकत नाही ना ? असो !आता ते युद्धाचे व्हिडिओ पाहण्यात त्याच्या मोबाईलचा डेटा संपत चाललेला होता. इतके साध्य सुरु असणारे युद्ध त्याने मनावर घेतले होते. काल त्याचा एक मित्र त्याला भेटायला आला होता. विजय आणि त्याच्यात गप्पा सुरु असताना तो म्हणाला,’’ त्याच्या लग्नाच्या पुर्वी तो ज्या कारखाण्यात कामाला होता तेथे दोन तरुणी त्याच्या प्रेमात पडलेल्या होत्या. पण त्या त्याच्या जातीतील नसल्यामुळे तो त्या दोघींपैकी कोणाशीही लग्न करू शकत नव्हता. पण तो त्यांच्यासोबत फिरायला वगैरे जायचा. पण त्याचे त्यांच्यासोबत शारिरीक संबंध नव्हते आले. पुढे त्याचे लग्न झाले. त्या दोघींचेही लग्न झाली. त्या दोघींना एक - एक मुलं ही झाले पण काही कारणाने दोघींचेही नवरे लग्नानंतर दोन वर्षाच्या आत वारले. त्यानंतर त्या दोघी पुन्हा त्याच्या संपर्कात आल्या असता त्या त्याच्यासोबत अनैतिक शारीरीक संबधही ठेवायला तयार झाल्या होत्या. त्याचीही त्यांच्यासोबत तसेसंबंध ठेवण्याची मानसिक तयारी झालेली होती. पण पुढचा संभाव्य धोका लक्षात येताच त्याने त्यावेळी पाऊल मागे खेचले. त्या दोघींनी आता दुसरे लग्नही केले. फक्त तोच नाही तर विजयच्या बर्याच विवाहीत मित्रांची दुसर्या स्त्रीसोबत शरीरीक संबंध ठेवण्याची सुप्त इच्छा आहे. म्हणजे हल्ली मालिकांच्या माध्यमातून जे अनैतिक संबंधांचे चित्र उभे केले जात आहे ते अगदिच काही चुकीचे नाही. पण विजय मात्र अविवाहीत असतानाही असा कोणा परक्या स्त्री –सोबत अनैतिक संबंध प्रस्तापित करण्याचा विचार त्याच्या मनातही येत नाही. त्याला नेहमीच कोणावर तरी आपण मनापासून प्रेम करण्यापेक्षा आपल्यावर मनापासून निस्वार्थ प्रेम करणारी कोणीतरी भेटावी असेच वाटत होते. पण त्याच्या दुर्दैवाने तशी कोणीही त्याला अजून भेटली नाही.
ज्याची कोणावर प्रेम करण्याचीच लायकी नाही अशा पुरुषांच्या प्रेमात हल्ली शेकडो स्त्रिया पडतात. कधी - कधी विजयच्या मनात शंका निर्माण होते की आज कदाचित कोणाला कोणावर खरे प्रेम करायचेच नाही. आपण खर्या प्रेमाची अपेक्षा धरुन आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा तर केला नाही ना ? त्या गाढवपणात आपण आपले तारुण्य आणि सौंदर्य दोन्ही वाया घालविले. जेंव्हा मुली मागे लागत होत्या तेंव्हा तू त्यांना भाव देत नव्हतास आता तुला भावच राहिला नाही आणि कोणीतरी आता तुझ्या प्रेमात पडावी ही थोडी बाळीशपणाचीच इच्छा म्हणावी लागेल. जग म्हणते की पुरुष आणि घोडा कधीही म्हातारा होत नाही. पण हे त्या पुरुषांसाठी म्हटले जाते ज्यांच्यात घोड्यासारखी ताकद असते. तुला तर हल्ली वीस किलो वजन उचलतानाही घाम फुटतो.
विवाहाच्या बाबतीत विजयच्या मनात त्याच्या सभोवतालच्या वातावरणामुळे लहानपणापासूनच नकारात्मक भावना तयार झालेल्या होत्या कारण त्याच्या लहानपणी त्याला त्याच्या आजुबाजुला एकही सुखी , आनंदी आणि समाधानी विवाहित जोडपे दिसलेले नव्हते. जवळ – जवळ सर्वच विवाहीत पुरुष आपल्या बायकांना प्रचंड मारझोड करत असत. त्या मारझोडीतच त्यांना पोरं झालेली असावीत असेही कधी कधी विजयला वाटून जाते कारण त्यांच्यातील प्रेम असे कधी ओसंडून वाहताना दिसलेच नाही. स्त्री – पुरुष विवाह का करतात.. ? एकमेकांना एकमेकांचे प्रेम मिळावे म्हणून... वंश वाढावा म्हणून... पण हल्ली असे दिसू लागले आहे की काही फक्त प्रेम मिळावे म्हणून लग्न करतात तर काही फक्त वंश वाढावा म्हणून लग्न करतात. त्यापुढे जाऊन काही फक्त समाजाचे तोंड बंद करण्यासाठी लग्न करतात. विजयला नेमके हे समजाचे तोंड बंद करण्यासाठी विवाह करायचा नव्हता. तसे जर करायचे असते तर त्याने कधीच विवाह केला असता. त्या बाबतीत त्याच्या घरच्यांचीही तशीच इच्छा होती. पण विजयने त्याच्या आयुष्यात विवाह केला तर त्याला त्याच्या विवाहालाही एक वेगळा अर्थ द्यायचा होता. त्याला एका सामान्य नवरा व्हायचे नव्हते जो आपल्या पत्नीला फक्त भोगाचे साधन मानतो. त्याला एक पती म्हणूनही समाजापुढे एक आदर्श ठेवायचा होता. काही मुर्ख लोक असेही म्हणतात की त्याने लग्न न केल्यामुळे तो एक आदर्श मुलगा झालेला नाही. त्यावर विजयचे स्पष्ट म्हणने असते की जो पर्यत मी माझ्या आई – बाबांसोबत एकत्र राहतो आहे तोपर्यत मी एक उत्तम मुलगा आहे. नाहीतर आज लग्न झाल्या झाल्या कित्येक मुलं आपल्या आई – वडिलांना राम भरोसे सोडून आपल्या बायकोला घेऊन वेगळा संसार मांडतात. कित्येक मुलं आज लग्न झाल्यावर आई- वडिलांचीही संपत्तीसारखी विभागणी करून घेतात. याचा अर्थ अजिबात असा नाही की ते आपल्या आई – वडिलांना आपली संपत्ती मानतात. त्याचा अर्थ हाच होतो की ते आई - वडिलांना ओझे मानतात. विजयला तसे नाही करायचे ! कितीही मानसिक त्रास झाला तरी त्याला त्याच्या आई- वडिलांसोबतच राहायचे आहे. पण बहुतेक त्याच्या आई - वडिलांना त्यांच्या वाट्याला आलेले सुख जड झालेले आहे. लग्न करणे ही काही विजयसाठी मोठी गोष्ट कधीच नव्हती. पण त्याला समाजासाठी काहीतरी ठोस कार्य करायचे होते. पण त्याच्या घरून त्याला ते स्वातंत्र नसल्यामुळेच तो ते करु शकला नाही. त्याला कितीही वाटले तरी त्याला त्याच्या घरच्यांना त्रास होईल असे काहीही करायचे नाही. त्यामुळेच विजयने त्याच्या ओळखीचा कधीही स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी उपयोग करुन घेतला नाही. त्याने त्याच्या ओळखीने इतर लोकांची कामे मात्र कोणताही मोबदला न घेता कित्येकदा करून दिली. आजही करुन देत आहे. त्यामुळेच आजही समाजात त्याला खूप मान आहे पण त्याच्या घरच्यांचे असे म्हणने आहे की फक्त मान सन्मानाने पोट नाही भरत. पुर्वी या गोष्टीमुळे विजयला घरच्यांचा प्रचंड राग यायचा पण आता येत नाही कारण पुर्वी त्याचे वडिल घर चालवत होते. पण यापुढे त्याला त्याच्या आई- वडिलांचीही आर्थिक जबाबदारी घ्यावी लागणार होती. त्यात त्याचे वयही वाढू लागले होते. आताच वेळ आहे तो वेळीच सावधान होऊन आपल्या भविष्यासाठी थोडी का होईना आर्थिक तरतुद करुन ठेऊ शाकतो. लिखानातून त्याला पुर्वी वाटले होते की त्याला आर्थिक फायदा होईल पण अजुन तरी तसे काही झाले नाही. भविष्यात होईल की नाही ते त्याला माहीत नाही. त्यामुळेच आता तो लेखक आहे आथवा जगापेक्षा थोडा वेगळा आहे हे विसरूनच वागावे लागणार होते. त्याला आता त्याच्या आयुष्यात एका स्त्रीचा सहभाग गरजेचा वाटू लागला होता कारण जर तिने त्याच्या अर्ध्या जबाबदार्या उचलल्या तरच तो थोडा मोकळा होऊन काहीतरी करू शकेल.
विजयने जगावेगळे आयुष्य जगण्याच्या नादात बरेच काही गमावले होते. त्या गमावलेल्या गोष्टींची किंमत त्याला आज कळते आहे. त्यावेळी त्याने त्या गोष्टी गमावल्या नसत्या तर कदाचित आज त्याचे भविष्य सुरक्षित असते. पण आता वर्तमान परस्थितीत त्याला त्याचेच काय ? संपुर्ण जगाचे भविष्य अंधारात दिसते आहे. विजयला त्याचे जे काही आयुष्य शिल्लक उरले आहे ते आनंदात समाधानात आणि भरभरून जगायचे आहे त्यासाठी आता तो प्रसंगी त्याची लेखक असण्याची ओळखही विसरायला तयार आहे. त्याच्या आयुष्यातील त्याची सर्वात मोठी समस्याच हीच आहे की त्याला सामान्य माणसासारखे जगताच येत नाही. त्याच्याशी संवाद साधल्यास कोणाच्याही सहज लक्षात येते की तो सामान्य नाही. त्याचे असामान्य असणे हेच त्याच्यासाठी मोठी डोके दुखी ठरत आहे. नेमके हे त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येत नाही. त्याचे मोठेपण जगाने मान्य केले तरी ते त्याच्या कुटुंबाने अजूनही मान्य केलेले नाही. हिच त्याच्यासाठी सर्वात मोठी शोकांतिका आहे...
विजयचे बाबा दहा दिवस कोकणात त्यांच्या गावी नवरात्रीला देवाच्या माळी लावायला गेल्यामुळे विजय सतत दहा दिवस त्यांच्या दुकानात बसत होता, कोणी ग्राहक आला तर... पण का कोणास जाणे दहा दिवसात एकही ग्राहक आला नाही. जे आले ते त्याच्याच ओळखीचे त्याच्यासोबत गहन विषयावर चर्चा करणारे कारण इतका निवांत विजय तसा सहजा सहजी कोणाला सापडत नाही. त्यात विजय जवळ असणारी रोख रक्कम घरखर्चात संपली आणि नेमका त्यावेळेला त्याच्या बाबांना ज्याने हे दुकान भाड्याने घेऊन दिले होते तो त्याच्याकडे ऊसने पैसे मागायला आला. त्यामुळे विजयने नाईलाजाने त्याच्या भावाकडून ऊसने पैसे घेऊन त्याला दिले. पण तो पैसे मागणाराही महाभाग होता. त्याला रोज दारु प्यायला 200 रुपये लागतात. तो काही त्याने दिलेले पैसे परत करणार नाही याची त्याला खात्री होती. नाईलाजाने का होईना काही कामाच्या बेवड्यांना दुखावने विजयला शक्य होत नाही. पण तो त्यांच्यावर जास्तीचा भरोसाही ठेवत नाही. या दहा दिवसात विजयला मात्र घरातील सर्व कामे करावी लागली. त्याला ती सर्व कामे त्याच्या लहानपणापासून करायची सवय आहे त्यामुळे घरात कोणी स्त्री नसतानाही त्याचे काही अडत नाही. हे ही एक कारण आहे त्याला लग्न करण्याची गरज वाटत नाही. त्याला कधी- कधी असेही वाटते की तो अ- लैंगिक तर नाही ना ? म्हणजे पुर्वी त्याच्या आयुष्यात इतक्या सुंदर सुंदर तरुणी असतानाही कोणाशी शारिरिक जवळीक साधावी असा विचारही त्याच्या मनाला कधी शिवला नाही. म्हणजे त्याला स्त्रियांच्या सुंदर दिसण्याचे आकर्षण आहे पण त्यांच्या शरीराचा उपभोग घेण्याची इच्छा त्याच्या मनात निर्माण होत नाही. त्यामुळेच कदाचित कधीच कोणा तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला नाही. लग्न करण्यासाठी तो कधीच आतून आतूर झाला नाही. त्याला स्त्रियांसोबतची मैत्री आवडते पण शारीरीक जवळीक आवडत नाही. तशी जवळीक साधण्याचा प्रयत्न कोणा तरुणीने स्वत:हून केला तरी त्याला ते आवडत नाही. अनेक वेळा अनेक तरुणींशी विवाह करावा असा विचार त्याच्या मनात यायचा पण तो विचार ती आपल्या आयूष्यात राहाव्या या कारणाने असायचा. त्यांची लग्न झाली की तो त्यांना सहज विसरून जायचा त्यानंतर तो त्यांच्या आयुष्यात काय चालले आहे याची साधी चौकशीही करायचा नाही. आजचे कित्येक पुरुष आपल्या लग्न झालेल्या प्रेयसीशी तिच्या लग्नानंतरही सर्व प्रकारचे संबंध ठेवतात. विजयने अजूनही लग्न न केल्यामुळे विजयच्या बाबतीत त्यांच्या डोक्यात विजयची काही चुकीची प्रतिमा तर तयार झालेली नसेल ना ? अशीही विजयच्या मनात कधी कधी शंका निर्माण होते. निसर्गातील प्रत्येक सुंदर गोष्टीचे त्याला आकर्षण आहे पण ते सौंदर्य ओरबडायला त्याला आवडत नाही.
तो लहान असताना त्याचे मित्र जिवंत फुलपाखरु पकडून त्याला वहीच्या मधोमधे ठेऊन दाबून मारत आणि त्या मेलेल्या फुलपाखरांचा संग्रह करत असत. विजयला त्यापेक्षा एखादे फुलपाखरू त्याच्या हातावर येऊन बसले तर जास्त आनंद होत असे. आजही विजय गावी गेला असता जंगालातील फुलपाखरांचे फोटो काढायला तो त्यांच्या मागे धावतो. सुरवंटाचे फुलपाखरू होणे म्हणजे मृत्यूला कवटाळण्यासारखे आहे. त्यामुळेच विजयला फुलपाखराबद्दल नेहमीच सहानुभुती वाटते. विजयलाही कधी कधी त्याचे आयुष्य हे त्या फुलपाखरासारखे वाटते. म्हणजे त्याच्या लहानपणी त्याच्या वाट्याला प्रचंड संघर्ष आला. तारूण्यात त्याच्या सौंदर्याच्या अनेक जणी प्रेमात पडल्या पण त्याचे सौदर्य ही त्या फुलपाखराच्या सौंदर्यासारखे क्षणिक ठरले. आता उरल्या त्या फक्त आठवणी... त्या ही त्याच्या साहित्यात बंदीस्त झालेल्या आहेत जसे त्या फुलपाखराचे कलेवर त्या वहित बंद झालेले असते.
विजयचे आई-बाबा आता गावावरून माघारी आल्यामुळे त्याला आता थोडी उसंत मिळणार होती. म्हणजे थोडे हात पाय मारता येणार होते. लेखक म्हणून त्याच्या लिखानाकडे त्याला लक्ष देता येणार होते. पूर्वी काय व्हायचे तो कोणाच्यातरी नव्याने प्रेमात पडायचा आणि त्याला नव्याने एखादी प्रेमकथा सुचायची पण हल्ली तसे काही होत नाही. तो स्वत:हून कोणाच्या प्रेमात पडला तरी त्याच्या वाट्याला अपेक्षा भंगच येतो. त्यामुळे हल्ली त्याने प्रेमकथा लिहिणे जवळ जवळ सोडले आहे. पुर्वी तो वास्तववादी प्रेमकथा लिहायचा त्यामुळे वाचक त्याच्या प्रेम कथांच्या प्रेमात पडायचे. हल्ली त्याला मनासारखी प्रेमकथा लिहिणे शक्यच होत नाही. त्याला सतत वाटत राहते की त्याच्या आयुष्यातील प्रेम कोठेतरी हरविले आहे. विजय जितका भाऊक आहे तितकाच कठोरही आहे. ज्याला त्याच्या कठोरतेचा प्रत्यय येतो तो त्याच्या वाटेला कधीच जात नाही. हल्ली पैशाच्या कमतरतेमुळे तो सतत तणावात असतो त्याच्या डोक्यावर कधीही नव्हे ते कर्ज झालेले आहे. त्यामुळे त्याला साहित्यात काही नवनिर्मिती करण्या ऐवजी जास्तीचे पैसे कमावण्यासाठी काय करता येईल याचाच विचार सातत्याने करावा लागतो. यापुर्वी लिखान करता करता विजय त्याचा खर्च भागावा म्हणून काम करत होता. पण आता त्याला लिखानातून फार फार तर प्रसिद्धी मिळेल. पण त्याने त्याच्या डोकावरील कर्ज थोडेच कमी होणार होते. त्यासाठी त्याला बहुतेक आता अंगमेहनतच करावी लागणार होती जी तो पुर्वी करत होता. तो जो पर्यत अंगमेहनत करत होता तोपर्यत त्याचे पोट सपाट होते. तो झिरो फिगर वगैरे होता पण सध्या खुर्ची उबवत असल्यामुळे त्याचे पोट बाहेर आलेले आहे हे ही एक कारण आहे हल्ली स्त्रिया त्याच्याकडे फार आकर्षित वगैरे होत नाहीत. त्यात त्याचे एखाद्या शास्त्रज्ञासारखे पांढरे झालेले दाढी केस ! ज्यामुळे कधी कधी त्याच्यापेक्षा वयाने मोठे असणारे स्त्री – पुरुष त्याला काका म्हणतात. त्याला कोणी काका म्हटले तर त्याचा त्याला राग येत नाही. पण हल्ली तो खरोखरच काकासारखा दिसू लागला आहे याचा त्याला प्रचंड राग येऊ लागला आहे. तसा तो आता सर्वार्थाने काका या गटात मोडायला तशी एक – दोन वर्षेच शिल्लक आहेत. पण त्याच्याच वयाच्या अभिनेत्यांवर अजुनही सोळा वर्षाच्या मुली मरतात तेंव्हा त्याला आपण कोठेतरी कमी पडलेलो आहोत याची खात्री वाटते. कधी कधी त्याच्या मनात विचार येतो तरूण स्त्रिया त्याला भाऊ म्हणायचे नाही म्हणून काका म्हणत असाव्यात. पण त्याला काका म्हणणारे पुरुष जे त्याच्यापेक्षा वयाने जास्त आहेत त्यांना तर गाढवच म्हणावे लागेल... त्याबाबतीतही त्याला एक शक्यता दिसते त्या सर्वांचे काका त्यांच्याहून लहान असावेत...
उद्या दसरा असल्यामुळे सोने लुटवायला सुंदर तरुणी त्याच्या घरी येतील त्यासाठी तो आपले पांढरे केस काळे करण्याचा विचार करत होता. त्याने केस बारीक करुन काळे केले आणि दाढी मिश्या चकाचक केल्या की ते त्याला काका म्हणणारे तोंडात बोटे घालतात. त्याला नेहमीच वाटायचे कोणीतरी त्याचा तो आहे तसाच स्विकार करणारी त्याच्या आयुष्यात यायला हवी होती. पाढंरे केस काळे करण्याचाही त्याला आता कंटाळा आला आहे. याबाबतीत काही भारतीय चित्रपट अभिनेत्यांचा त्याला अभिमान वाटतो. ते अभिनेते असूनही आपले पांढरे केस मिरवतात. त्याच्यात आणि विजयच्यात फक्त पोटाचा फरक आहे. आता विजय पहिल्यांदा ते वाढलेले पोट कमी करण्याच्या मागे लागणार होता. कधी कधी विजयला प्रश्न पडतो केसच्या रंगाने काय फरक पडतो तिकडे परदेशात बहुसंख्य लोकांचे केस पांढरे असतात. आपल्याकडे एखाद्या पुरुषाचे दाढी केस पिकलेले असले की त्याला म्हातारा समजतात. त्यात पोट वाढलेले असले की आणखीणच जास्त भर पडते. तसेही विजयला आता कोणाच्या मनात घर करण्यात अजिबात रस नाही त्याला आता घरात मन रमवायचे होते. उदर्निर्वाहासाठी आता काय बरे करावे याच विचारात विजय होता. इतके वर्षे तो त्याला झेपेल ते काम करत राहिला पण आता त्याला काहीतरी ठोस आणि वेगळे काम हवे होते. जगाची वैचारीक गणिते सोडवता सोडवता तो त्याची आर्थिक गणिते सोडवायला विसरला होता. आता त्याला ती गणिते पहिल्यांदा सोडवायची होती. लिहिता लिहिता अर्धे आयुष्य संपले पण लिखानातून त्याला आर्थिक फायदा असा काहीच झाला नाही म्हणजे तो कदाचित सुमार दर्जाचा लेखक होता. हे त्याने आता स्वत:लाही पटवून दिले...
शेवटी विजयला जे होणे अपेक्षित होते तेच झाले. विजयच्या बाबांनी जे दुकान भाड्याने घेतलेले होते त्या दुकानाचा मालक फक्त 500 रुपये भाडे वाढवत भाडे करार वाढवायला तयार झाला. त्याने तसे केले नसते तर त्याला डिपॉझिटचे पैसे परत करावे लागले असते. त्यात जर एकाद महिन्यात चांगला भाडेकरु भेटला तर ठिक ! नाहीतर तेलही गेले आणि तुपही गेले अशी परिस्थिती निर्माण झाली असती. बहुतेक जो विचार विजयने केला होता. तोच विचार त्या मालकानेही केला. विजय कोणत्या परिस्थितीत कोणता माणूस काय विचार करतो हे अचूक ओळखतो. कारण माणसे वाचने हे तर त्याचे नेहमीचेच काम आहे. विजयला पुन्हा नवीन दुकान शोधण्यापेक्षा त्याच मालकाला 500 रुपये वाढवून देणे सोयिचे वाटले. पण आता ते जास्तीचे 500 रुपये वसूल कसे करायचे याच्याच तो विचारात होता. त्या दुकानाच्या बाबतीत मागच्या वर्षभरात त्याने ज्या चुका केलेल्या होत्या त्या चुका त्याला पुन्हा करायच्या नव्हत्या. त्या जागेत त्याने वर्षभर चांगला जम बसवलेला आहे. आता खर्या अर्थाने तो त्या जागेतून उत्पन्न मिळवू शकणार होता. त्याला आता त्या जागेचा 100% उपयोग करायचा होता. जो त्याला मागच्या वर्षभरात करता आलेला नव्हता. विजयच्या मनात अशीही शंका येत होती की त्याला कदाचित आता विजयचे सामाजिक मूल्यही कळले असावे. विजय लोकांना कोणत्याही समस्ये बाबतीत अचूक व योग्य सल्ला देत असल्यामुळे लोक त्याचा सल्ला घेण्यासाठी आतूर असतात. पण त्याचा सल्ला सर्वांनाच मिळत नाही. त्याच्या एका मित्राच्या बहिणीचे एका वर्षापुर्वी लग्न झालेले होते. लग्नानंतर वर्षभरात पाळना हळून ती एका मुलाची आई झाली होती. तिचा प्रेमविवाह झालेला होता. लग्नापुर्वी जवळ जवळ 10 वर्षे त्यांचे प्रेमप्रकरण सुरु होते. ती दिसायला पिटासारखी पांढरी होती आणि तो कोळशासारखा काळा ! म्हणजे त्या दोघांची राधा - कृष्णाची जोडी होती असे म्हणायला काही हरकत नव्हती. पण लग्नानंतर अवघ्या वर्षभरात तिच्या प्रेमाची धुंदी उतरली कारण तिच्या सासरच्या माणसांकडून तिला खूप त्रास होत होता त्याची दोन कारणे होती. ती उच्च शिक्षित असतानाही कमावत नव्हती हे एक कारण दुसरे कारण तिच्या आई- वडिलांनी लग्नात तिला फार काही दिले नव्हते म्हणजे सोप्प्या भाषेत सांगायचे तर हुंडा दिलेला नव्हता.
अत्यंत पैशासाठी हापापलेल्या घरात ती सून म्हणून गेली होती. त्यात ज्याच्या भरोशावर गेली होती. तो तिचा नवरा आणि पुर्वाश्रमिचा प्रियकर नालायक निघाला होता. भरल्या घरात तिला प्रसंगी उपाशीही रहावे लागत होते. ती ही आता ह्या लग्नाला वैतागलेली होती. पण घरच्यांच्या विरोधात जाऊन तिने लग्न केलेले असल्यामुळे तिला काही ठाम निर्णय घेणेही शक्य होत नाही. ती विजयकडे सल्ला मागायला आली असता विजय तिला स्पष्ट म्हणाला, ‘ तुझ्या समस्येवर माझ्याकडे काही उपाय नाही कारण तू आयुष्यभराचा जोडीदार म्हणून चुकीच्या पुरुषाची निवड केलेली आहे. तू त्याच्या घरच्यांच्या आणि त्याच्याही एकुण मानसिकतेचा अगोदर विचार करायला हवा होता. निदान लग्नानंतर लगेच मुल जन्माला घालताना तरी विचार करायला हवा होता. आता तुझ्याकडे एकच मार्ग आहे. तुला जो काही त्रास होत आहे तो सहन करत त्याच्यासोबत आयुष्य काढावे लागेल नाहीतर त्याला सोडून तुला तुझ्या आयुष्याचा वेगळा विचार करावा लागेल. पण तसा विचार करणे आता तिच्यासाठी सोप्पे नव्हते कारण लहान मुलगा ! या सगळ्यात फरफड होईल ती त्या मुलाची ! प्रेमविवाह करण्याची फार मोठी किंमत ती मोजत होती. पण या सगळ्याचा जो शेवट होतो तो शेवट तिच्या बाबतीत होऊ नये इतकीच त्याची इच्छा होती. पण नियतीच्या पुढे कोणाचेच काही चालत नाही. ज्या लोकांच्या डोक्यात हुंड्याचा किडा वळवळत असतो त्यांना कोणीही समजावू शकत नाही कारण ही माणसे सारासार विचार करण्याच्या पलिकडे तर गेलेली असतातच पण ह्यांचा मेंदूही गुन्हेगारी वृत्तीचा असतो. त्यामुळे प्रेम करतानाही ते डोळसपणे करावे या मताचा विजय आहे. त्यामुळेच कोणाचे प्रेम त्याच्या विचारांवर भारी पडू शकले नाही. जिने जिने त्याच्या विचारांना तडा देण्याचा प्रयत्न केला. ती ती त्याच्या आयूष्यातून वजा झाली.
अशीच त्याच्या नात्यातील एक स्त्री ती हुंड्यासाठी हापापलेली नव्हती पण पैशाची जरा जास्तच लालची होती. तिच्या लालचीपणामुळेच तिच्यावर तिच्या म्हातारपणी मुलगा – सून आणि नातीपासून लांब राहण्याची वेळ आलेली होती. तिने आयुष्यभर अफाट कष्ट करुन माया गोळा केली. मुलाला शिकवून इंजिनिअर केले. तो मुलगा एका चांगल्या ठिकाणी नोकरीला लागला त्याचे लग्न झाले . पण तिला नोकरी करणारी सून हवी होती. तशी नोकरी करणारी सून तिला मिळाली होती. पण त्या सुनेने लग्न झाल्यावर नोकरी सोडली. तिने नोकरी करावी अशी तिच्या नवर्याचीही इच्छा नव्हती. तरीही ती स्त्री स्वत:च आपल्या सुनेसाठी नोकरी शोधायला लागली. ज्याचा त्या सुनेला प्रचंड राग आला. पण ती काही बोलली नाही. त्यानंर काहीच महिन्यांनी ती गरोदर राहिली तिने एका मुलीला जन्म दिला. मुलगी होताच तिने आपले रंग बदलले आणि नवर्याला दुसरे स्वत:चे घर विकत घ्यायला लावून वेगळी झाली. आता काही यापुढे ती नोकरी करण्याचा विचार करणार नव्हती. ती विचार करेल तरी का ? तिच्या नवरा जितके कमावत होता त्यात त्यांचे उत्तम चालू शकत असताना. त्यात तिला काही थोड्या शारीरीक कुरबुर्याही सुरु असतात. आता त्या स्त्रीने आपल्या अपेक्षा सुनेवर लादल्या नसत्या तर तिची सुन तिच्या मुलाला आणि नातीला घेऊन वेगळी झाली नसती. त्यामुळेच दुसर्यांच्या आयुष्यात किती ढवळाढवळ करावी यालाही काहीतरी मर्यादा असावी.
विजय नेहमीच नवरा- बायको हे एकमेकांना पुरक असले तरी माणूस म्हणून त्यांचे आयुष्य वेगळे मानत आला. कोणाच्याही व्यक्तीगत आयुष्यात कोणीही केलेली ढवळाढवळ त्याला पुर्वीही मान्य नव्हती आणि आजही मान्य नाही. त्यामुळेच त्याला कालही वाटत होते आणि आजही वाटते त्याने जर चुकून लग्न केले तर त्याच्या बायकोची स्वत:ची अशी एक वेगळी ओळख असावी. जी ओळख त्याच्या आईची नव्हती. पण अशा स्वत:ची अशी ओळख जपणार्या स्वतंत्र विचाराच्या स्त्रिया फार कमी असतात. लग्नामुळे कोणाही स्त्री – पुरुषाच्या आयुष्यात फार बदल होता कामा नये. म्हणजे त्याच्या माणुस म्हणून जगण्यावरच बंधने येता कामा नये. त्यांना त्यांचा असा स्वतंत्र विचार करता यायला हवा ! हल्ली पत्नीने नोकरी करावी की नाही हे ती नाही तर तिचा नवारा ठरवताना दिसतो, हे चुकीचे आहे. कित्येक विवाहीत स्त्रियांना नोकरी आणि घर सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागते ज्याचे दुरगामी परिणाम त्यांच्या तब्बेतीवर होतात. म्हणजे त्या आयुष्य जगत असतात पण आयुष्याचा मनमुराद आनंद मात्र घेत नाहीत. माणूस जगला किती ? त्याने आयुष्यभर किती माया गोळा केली यापेक्षा त्याने जगण्यातून किती आनंद मिळविला ही गोष्ट महत्वाची असायला हवी ! काही लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी फिरून आनंद मिळतो. विजयला लिखानातून आनंद मिळतो. विजयला त्याचा आनंद मिळविण्यासाठी फारसे पैसे लागत नाहीत. त्यामुळे तो त्याच्या आयुष्यात पैशाच्या मागे अजिबातच धावला नाही. याचा अर्थ असा अजिबात नव्हता की त्याला पैशाची गणिते समजत नाहीत. बाकी काही पण तो दुसर्यांच्या आनंदात मात्र आनंदी व्हायला शिकला आहे. पण तो दुसर्याच्या दु:खात मात्र दु:खी होत नाही. कारण त्याचा काहीही उपयोग नसतो. त्याला एकाच वेळी खूप लोकांच्या समस्या सोडवाव्या असे वाटते पण ज्या समस्या पैशाने सुटू शकतात अशा समस्या तो त्याच्या मनात असतानाही सोडवू शकत नाही. त्याला नेहमीच वाटते ज्या समस्या पैशाने सुटतात अशा समस्या या जगात अस्तित्वातच राहायला नको ! तसे झाले तरच सामान्य माणसांचे जगणे सोप्पे होईल. ते आपल्या जगण्यातून सर्वार्थाने आनंद घेऊ शकतील...
विजय आज त्याचे खांद्यापर्यत वाढलेले पांढरे काळे केस कापायला केशकर्तनालयत गेला. तो अगदी शाळेत असल्यापासून त्याचे पांढरे झालेले केस काळे करत आला असल्यामुळे कधी कधी त्यालाच कळत नाहीत त्याचे नेमके किती केस काळे आणि किती केस पांढरे आहेत. पण यावेळी केस कापल्यावर पहिल्यांदा त्याच्या लक्षात आले की त्याचे आता सर्व केस पांढरे झालेले आहेत . तो जर दिसायला गोरा असता म्हणजे पिटासारखा गोरा असता तर त्याने यापुढे केस काळे करणे सोडून दिले असते. पण आपल्या देशात केसाच्या रंगावरून कोणत्याही माणसाच्या वयाचा अंदाज घेतला जातो म्हणजे अगदी वीस वर्षाच्या मुलाचे केस पांढरे झालेले असतील तर चाळीशीत केस काळे असलेला त्या वीशीतल्या तरुणाला काका बोलतो. विजयला ही नेहमीच वाटते आपण जसे आहोत तसेच जगासमोर जावे पण आपल्या देशातील लोकांचे वागणे फारच विचित्र असते म्हणजे बायकोचे केस काळेभोर असतील आणि तिच्या नवर्याचे पांढरे शुभ्र असतील तर तिच्या नवर्याला तिचा अजोबा म्हणायलाही हे लोक कमी करणार नाहीत. विजय शाळेत असतानाच त्याचे केस पिकायला लागल्यामुळे शाळेतील मुले त्याला म्हातारा म्हणून चिडवायचे ! आपल्या देशात म्हातारे पण केस काळेभोर असणारे स्वत:ला तरूण समजतात. त्या उलट ते तरुणपणी केस पिकलेल्यांना म्हातारे समजतात. या बाबतीत स्त्रिया जागरुक म्हणाव्या लागतील त्यांचे केस आकाली पिकले तरी त्या ते शक्यतोवर कोणाच्या लक्षात येऊ देत नाहीत. त्या उलट पुरुष त्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणजे विजय स्वत: हल्ली त्याचे कितीही पांढरे केस दिसायला लागले, त्याला कोणीही काका म्हटले तरी तो केस कापल्या खेरीज हल्ली केस काळे करीत नाही. तरीही आता त्याचे सर्व केस पांढरे झालेले आहेत हे गुपित त्याच्या व्यतिरीक्त फक्त त्याच्या केस कापणार्याला माहीत आहे.
कधी - कधी विजयच्याही मनात विचार येतो हे आपण आता केस काळे करणे बंद करायला हवे ! ते पांढरे केस काळे न केल्यामुळे आता आपल्या आयुष्यात फार काही फरक पडणार नाही. त्यात भर म्हणून हल्ली त्याच्या कानावरील केसही मोठ्या जोमात वाढू लागले आहेत. काही लोकांचे असे म्हणणे आहे की ज्यांच्या कानावर असे केस वाढलेले असतात ते नशिबवान असतात. लक्ष्मी त्यांच्यावर प्रसन्न असते. विजयचे केस वाढलेले असताना ते फारसे दिसत नाहीत. पण केस कापल्यावर फार विचित्र दिसतात. ते कापल्यावर आपल्याकडील लक्ष्मी कमी होते अशीही काहींची अंधश्रद्धा आहे. पण विजयच्या शरीरावर अशी त्याच्या नशीबात खूप लक्ष्मी असल्याची अनेक चिन्हे आहेत पण लक्ष्मी काही त्याच्या आयुष्यात अजून तो अर्धा म्हातारा झाला तरी आलेली नाही. आयुष्यभर त्याला त्याच्या नशिबातील लक्ष्मी लुबाडणारेच भेटले आजही भेटत आले आणि आजही भेटत आहेत.
त्याच्या एका सुमार बुद्धीमत्ता असणार्या व सर्वसाधारण काम करणार्या मित्राला दिवाळीला पन्नास हजार बोनस मिळणार होता. ते एकल्यावर विजयला त्याचे आयुष्य वाया गेले असल्याची पहिल्यांदा अनुभुती आली. त्याने त्याच्या आयुष्यात पन्नास हजार आतापर्यत एकत्र कधीच पाहिले नव्हते. तो नोकरी करत होता तेंव्हाही त्याचा बोनस कधीच दहा हजाराच्या पुढे गेलेला नव्हता. विजयने त्याच्या आयुष्यात पैशाकडे जरा जास्तच दुर्लक्ष केले होते हे आता त्याच्या लक्षात आलेले होते. आता त्याचा एक मित्र एक दहा नोकर्या सोडून एका ठिकाणी नवीन कामाला राहिला तेथे त्याला सुरुवातीला वीस हजार पगार मिळतो आहे. ते ऐकल्यावर विजयच्या ही मनात विचार आला आपणही हातातले सर्व फावळे उद्योग सोडून नोकरीच करावी. पण का कोणास जाणे आता कोणाकडे गुलामी करायला त्याचे मन नाही मानत. लहान पणापासून विजयने किती मोठी मोठी स्वप्ने पाहिली होती. पण त्यातील एकही स्वप्न पूर्ण झालेले नाही. त्याच्यासोबतच्या दारुड्या , झुगारी आणि बाईलवेड्या मित्रांनी ही आपापली मालमत्ता उभी केलेली आहे. विजयचे हात मात्र आजही मोकळेच आहेत. ह्या एका गोष्टीमुळे कधी कधी त्याच्या मनात देवाच्या अस्तित्वाबद्दल शंका निर्माण होते. म्हणजे त्याच्या चांगुलापणाचे देवाने त्याला फळही दिले नाही आणि त्याच्या चांगुलपणाचा गैर फायदा घेणार्याला शिक्षाही दिली नाही.
विजयने त्याच्या आयुष्यात केलेले प्रत्येक काम मनापासून अचूक आणि उत्तमच केले पण त्याला आपण केलेल्या कामाचा योग्य मोबदला घेणे कधीच जमले नाही. ते जमले असते तर आज त्याचीही व्यक्तीगत मालमत्ता असती. त्याच्या घरातील प्रत्येक व्यक्तीला बहुतेक चांगुलपणाचा शाप आहे. लोकांना मदत करताना ते फारसा आर्थिक गणिताचा विचार करीत नाहीत. पण काही लोक हा त्यांचा गाढवपणा मानतात. विजयच्या तोंडावर कोणी बोलत नाही पण ! त्याच्या तुलनेत निर्बुद्धी आणि मुर्ख आणि अविचारी असणारे लोक मनातल्या मनात नक्कीच म्हणत असतील ... हा आमच्या पेक्षा जास्त शिकलेला, आमच्या पेक्षा जास्त हुशार, आमच्या पेक्षा जास्त बुद्धीमान आणि निर्व्यसनी असतानाही आज ह्याच्याकडे त्याचे म्हणावे असे काहीच नाही. आमच्यापेक्षा अत्यंत सामान्य आयुष्य जगतोय ! त्याच्याकडे साधी दुचाकीही नाही. कोणाकडे पैसे मागत नसला तरी तो दुसर्यावर किंवा स्वत:वरही पैसे खर्च करू शकत नाही. त्याच्या आयुष्यात कसलीच मौज मजा नाही. रोजचेच ते सामान्य आयुष्य जगतो आहे. पोटापाण्यापुरतेच कमावतो आहे. त्यातून वेळ मिळाला की लोकांच्या आयुष्यातील सांसारिक समस्या सोडविण्याचा प्रयत्न करु पाहतो आहे. पण स्वत: मात्र संसार करण्याच्या भानगडीत पडत नाही.
विजयला संसार करायचा नव्हताच असे नाही पण पण तो संसारिक समस्यांमध्येच इतका गुंतून पडला की त्याला त्यातून बाहेर पडण्यास उसंतच मिळाली नाही. त्याला सतत वाटत राहिले तो जगासाठी झटत राहिला तर एक दिवस जग त्याची दखल घेईल पण तसे काहीच झाले नाही आज जग त्याला वेडा म्हणत आहे. या जगात मोफत दिलेल्या कोणत्याच गोष्टीची कोणालाच फारशी किंमत नसते हेच वास्तव आहे. हल्ली कोणी कोणाचे उपकार लक्षात ठेवत नाही. उपकार करुन घेणारीही असाच विचार करत असतो की ह्याने माझ्यावर उपकार करण्यामागेही ह्याचा नक्कीच काहीतरी स्वार्थ असणार ! पूर्वी विजय कित्येकांना समोरची व्यक्ती मदत न मागताही मदत करायचा पण हल्ली तो तशी मदत कोणालाही करणे टाळतो. त्याला हल्ली त्याच्या आजुबाजुला बहुसंख्य लोक हे फक्त स्वार्थी विचार करणारे दिसतात. प्रत्येकाला हल्ली फक्त आपलाच स्वार्थ साधायचा असतो मग त्यासाठी कोणाचा जीव गेला तरी त्यांना त्याची फिकर नसते. विजय नेहमीच आपले कितीही नुकसान झाले तरी आपल्यामुळे कोणाचे नुकसान होता कामा नये असाच विचार करत आला. त्याने आता पर्यत कित्येकांचे होणारे नुकसाना टळावे म्हणून मदत केली. पण त्यांनाही आता त्याची जाण नाही. त्यामुळे हल्ली लोकांच्या होऊ घातलेल्या नुकसानीकडे तो काना डोळा करतो. त्याचा सल्ला लाख मोलाचा असतानाही लोकांना त्याचे मूल्य कळत नाही. त्यामुळे तो हल्ली कोणाला सल्ला देणे टाळतो. न मागता कोणालाही सल्ला आणि मदत द्यायची नाही हे त्याने मनाशी पक्के आता पक्के ठरवून टाकले आहे.
हल्लीच त्याच्या वाचनायत एक बातमी आली एक सुंदर तरुणी लिंग बदलून मुलगा झाली. आता तिचे आई वडील तिच्या लग्नासाठी मुलगी शोधत आहेत. ते वाचून विजय मनात म्हणाला,’’ येथे मुलांना लग्नासाठी मुलगी मिळत नाही तेथे मुलीचा मुलागा झालेल्याला लग्नासाठी मुलगी कोठून मिळणार ? विजयला कळत नाही हे लोक लिंग बदलून नक्की साध्य काय करतात...? काही लोक अपवादात्मक असू शकतात त्यात काही नवळ नाही. पण आपण जसे आहोत तसेच स्वत:ला का नाही स्विकारत हे लोक ! लिंग बदल करून काय होते फक्त बाह्य रुप बदलते. हे म्हणजे स्त्रीने पुरुषाचा वेष घेण्यासारखे आहे. त्यापेक्षा आपण जे आहोत तेच आहोत पण आपल्यात काही गुण हे विषमलिंगी आहेत हे स्विकारून का जीवन जगत नाही. आज समाजाने समलैंगिकता स्विकारली असली तरी समलैंगिक लोकांचे शारिरिक संबंध हे अनैसर्गिकच असतात ते आपण कसे स्विकारतो. म्हणजे नवर्याने पत्नीसोबत अनैसर्गिक सबंध ठेवणे चुकीचे आणि समलैंगिक व्यक्तीने तसे संबंध ठेवले तरी चालते... या आशा अनैसर्गिक गोष्टींना खतपाणी घालणे भविष्यात खूप सामाजिक समस्या निर्माण करणारे ठरणार आहे. पूर्वी विवाहीत स्त्री – पुरुषांनी विवाह बाह्य शरीरसंबंध ठेवणे कायद्याने गुन्हा होता. आता तो नाही म्हणजे लग्न एका बरोबर संबंध दुसर्याबरोबर अशी परिस्थिती निर्माण होईल... ह्या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर विजयला आपण लग्न न करण्याचा घेतलेला निर्णय कधी –कधी योग्यच वाटतो.
दिवाळी जवळ आली की सर्वांनाच फार आनंद होतो असे काही नाही. फार पूर्वी म्हणे दिवाळी अती श्रीमंत लोकच साजरी करायचे आणि ते गरीब लोकांना कधी नव्हे ते गोड-धोड खायला घालायचे, दान – धर्म वगैरे करायचे... आजच्या काळात ते चित्र थोडे बदलले असले तरी पूर्णपणे बदलले नाही. आजही दिवाळी त्यांचीच असते जे श्रीमंत असतात अथवा ज्यांना बोनस मिळतो. विजय नोकरी करत असतानाही दिवाळी मनापासून उत्साहात साजरी करावी इतका बोनस त्याला कधीच मिळाला नव्हता. आता तर काय तो ही त्याला मिळणार नव्हता उलट काही लोकांना त्यालाच दिवाळी द्यावी लागणार होती. विजय लहान असताना त्याला हस्तकलेची आवड असल्यामुळे तो दिवाळीत खूप छान छान कंदील तयार करीत असे. पण तो कामाला राहिला आणि ते सर्व मागे पडले. त्याच्या लहानपणी तो त्याच्या आईला दिवाळीचा फराळ करायलाही मदत करीत असे ! स्वत: दारात छान रांगोळी काढत असे. पण आता तो भुतकाळ झालेला आहे. लहान असताना तो परिस्थिती नसतानाही लवंगे तर लवंगे फटाके तरी वाजवत असे पण कामाला राहिल्यावर काही रुपये कमविण्यासाठी दिवसभर घाम गाळायला लागल्यावर मात्र त्याने फटाके वाजवायचे कायमचे बंद केले. आता तर त्याला फटाक्यांच्या आवाजाचाही त्रास होतो. त्यासोबत त्यामुळे होणारे प्रदुषणही आता त्याला होणे नकोच आहे. त्यामुळे हल्ली इतरांनीही फटाके न वाजविण्याबाबत तो आग्रही असतो. त्याच्या लहानपणी तर तो त्याच्या मित्र – मैत्रीणींना देण्यासाठी दिवाळीची शुभेच्छापत्रेही स्वत:च्या हाताने तयार करीत असे. पण हल्ली तो त्यांना दिवाळीला भेटतही नाही कारण त्यांच्या डोळ्यात त्याला जे प्रश्न दिसतात त्यांची उत्तरे तो देऊ शकतो पण त्याला ती त्यांनाच काय कोणालाच द्यायची नाही.
फार वर्षापुर्वी विजय व्यक्तीगत टेलरने शिवलेले कपडे घालत असे पण मागचे कित्येक वर्षे तो रेडीमेड कपडेच वापरतो पण वॉशिंगमशिन घेतल्यापासून त्याला असे जाणवते की त्याच्या कपड्यांचे आयुष्य फारच कमी झालेले आहे. तरी आईच्या आग्रहास्तव कित्येक वर्षांनी त्याने एक कापड टेलरला शर्ट शिवण्यासाठी दिले . व्यक्तीश: त्याला असेच कपडे जास्त आवडतात ज्यांना इस्त्री करावी लागत नाही. त्यामुळे लगेच तयार होऊन कोठेही जाता येते. त्याला तसे हल्ली कपड्यांचे फार आकर्षण राहिले नाही. कारण हल्ली त्याच्यावर कोठे फार तयार होऊन जाण्याची वेळ येत नाही. तसेही तो हल्ली कोणतेच सार्वजनिक कार्यक्रमाना उपस्थित राहात नाही कारण अशा कार्यक्रमावर विनाकारण खर्च होणारा पैसा हे एक कारण तर आहेच त्यासोबत आणखी एका कारण आहे ते म्हणजे तेथे होणारी अन्नाची नासाडी... हल्ली लोक स्वत: पलिकडे कोणत्याच गोष्टीचा विचार करीत नाही. म्हणजे जर मी पाण्याचे विजेचे अन्नाचे पैसे देऊ शकतो तर मी त्याची बचत का करावी.. ? म्हणजे लोक सर्व गोष्टी पैशात पाहायला लागले आहे. भविष्याची चिंता सर्वानाच आहे पण ती फक्त पैशाच्या बाबतीत इतर गोष्टींच्या बाबतीत नाही. मला ज्या गोष्टी सुख देता आहेत त्या गोष्टींमुळे इतरांना त्रास होत असेल तर मला त्याच्याशी काहीही देणे घेणे नाही. जगात सर्वत्र फक्त आणि फक्त स्वार्थच भरलेला आहे सध्या असेच चित्र सर्वांना दिसत आहे. विजयची दिवाळी म्हणजे आपल्या बहिणीला भाऊबीज देण्याइतके पैसे आपल्याकडे असावे बस इथपर्यत सिमीत आहे.
विजय एका रेल्वे उड्डानपुलाला लागून असलेला जिना उतरत असताना त्या जिन्याची एका पायरीला भेगा गेलेल्या असल्यामुळे तो त्या पायरीवरून पाय घसरून पडला त्यामुळे त्याच्या पाठीववर जोरात फटका बसला . तो फटका इतका जोरात होता की काही वेळ त्याला श्वास घ्यायलाही त्रास होत होता. पण या सगळ्यात त्याला दोन मराठी जेष्ठ नागरीकांनी मदतीचा हात दिला. त्यामुळे माणसात अजूनही थोडा चांगुलपणा जिवंत आहे याची त्याला खात्री पटली. त्याच्या जागी दुसरा कोणी असता तर सरळ घरी गेला असता पण त्याही परिस्थितीत पाठ इतकी दुखत असतानाही तो त्याचे नियोजित काम करूनच घरी गेला. खूप विचार केल्यानंतर त्याला आठवले की यापुर्वीही तो एकदा त्याच जिन्यावरुन असाच पाय घसरून पडलेला होता. त्याला त्यावेळीही त्या जिन्यावर काहीतरी नकारात्मकता असल्याचे जाणवले होते. त्याचे नशिब चांगले म्हणून त्याच्या डोक्याला मार लागला नाही. एक अज्ञात शक्ती नेहमीच त्याला तारत असते . त्या शक्तीने खरेतर यावेळीही त्याला तारले होते. अशा संकटाच्या वेळीच कदाचित त्याला त्याचा चांगुलपणा उपयोगी येतो. वास्तवात तो त्या पायरीवरून पाय घसरून पडायला प्रत्यक्षात अनेक तांत्रिक बाबी कारणीभूत होत्या. भारतात जोपर्यत अपघात होत नाही तोपर्यत अपघात टाळण्यासाठीचे प्रयत्न दुर्दैवानी केले जात नाही. याचे विजयला नेहमीच वाईट वाटते. आपघात टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची भारतीयांची मानसिकताही नाही. पण विजय याकडे दुर्लक्ष करूच शकत नव्हता त्यामुळे याची बातमी करून त्याने सोशल मिडियावर प्रकाशित केली कारण त्याला त्या जिन्याच्या पायरीवरून आणखी कोणी पडणे अपेक्षित नव्हते. आपल्याला जो त्रास झाला तो इतरांना होऊ असे नुसते वाटणे हे ही मोठेपणाचे लक्षण असते.
दुसर्या दिवशीही पाठ दुखत असतानाही तो त्याचे नियोजित काम करायला घराबाहेर पडलाच ! त्याच्यात एखाद्या सामान्य माणसात क्वचितच आढळणारी सहनशक्ती आहे. जी त्याला प्रत्येक वेळी वेदनेतून उभे राहायला मदत करते. विजयवर क्रेडिटकार्डचे इतके कर्ज असतानाही बॅंकेने त्याला पुन्हा कर्जाची ऑफर दिली पण त्याने ती स्पष्ट नाकारली असतानाही बॅंकेने भविष्यात कर्ज हवे असल्यास निदान 10,000 चे तरी कर्ज घ्यावेच लागेल म्हटल्यावर त्याने सारासार विचार करून ते कर्ज घेतले. पूर्वी विजय फार लक्ष्मीच्या मागे धावत नव्हता. पण आता कदाचित लक्ष्मी आणि तो सोबत चालण्याचा प्रयत्न कारु पाहता आहेत. पूर्वी विजय त्याच्याकडे चालून आलेली कामे दुसर्यांना करायची संधी देत असे . पण त्या दुसर्यांना त्याची अजिबात जाणिव नाही हे लक्षात आल्यावर आता ती कामे तो स्वत:च करू लागला आहे. कदाचित पूर्वीही लक्ष्मी स्वत:हून त्याचे दार ठोठावू पाहात होती पण तोच तिच्यासाठी आपले दारा न उगडता तिला दुसर्याचे दार उघडून देत होता. त्याची चूक आता त्याला लक्षात आली होती. त्यामुळे ती चूक त्याने सुधारण्याचा निर्णय घेतला. हल्ली माणसाला फक्त स्वत:च्या वेळेची किंमत असते पण दुसर्यांच्या वेळेची किंमत नसते. बाकीच्यांच्या तुलनेत विजयकडे प्रचंड वाचाशक्ती आहे ती इतकी जास्त आहे की तो सहज बोलून गेलेल्या गोष्टी प्रत्यक्षात घडतात. कदाचित त्याच्या अभ्यासामुळे ही त्याच्या बोलण्यात अचूकता आलेली असावी. हे ही नाकारता येणार नाही. त्यामुळेच तो सामान्य माणसांशी फक्त बोलतो. त्यांच्याशी संवाद करीत नाही. त्याच्या सोबत संवाद करणारी माणसे नेहमीच समाजातील प्रतिष्टीत म्हणावी अशीच असतात. त्यामुळे कधी कधी आपली पातळी सोडून खाली उतरने त्याला अवघड होते ज्याचा त्याच्या कुटुंबियांना नेहमीच त्रास होतो. म्हणजे त्याला मुर्खांसोबत कोणत्याच विषयावर संवाद करायला आवडत नाही, तो त्याला त्याच्या वेळेचा दुरुपयोग वाटतो.
विजयच्या आयुष्यात काही अशी माणसे आहेत जी सतत पैशाचा विचार करत असतात. त्याच्यासमोर त्यांना त्यांच्या आणि इतरांच्या आरोग्याचीही काळजी वाटत नाही. विजयला नेहमीच वाटत असते आपण आपली तब्बेत सांभाळून जे झेपेल तितकेच पैशासाठी धावाधाव करावी. बरं ते ज्यांच्यासाठी इतकी धावाधाव करता आहेत त्यांच्या लेखी त्यांच्या धावाधावीचे किंमत भविष्यात शून्यच असणार आहे. याचे त्यांना भानही नसते. आज प्रत्येकाला जास्तीचे पैसे कमवायचे आहेत ते फक्त आणि फक्त सुखाची भौतिक साधने विकत घेण्यासाठी ! विजयने अगदी लहानपणापासून ते आतापर्यत स्वत:ला या भौतिक साधनांपासून जितके दूर ठेवता येईल तितके दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. ती भौतिक सुख - साधने त्याच्या सभोवताली असतानाही. विजयला नेहमीच शांत सुखाचे आणि समाधानाचे आयुष्य जगायचे होते. पण ते काही त्यालाच काय या जगात कदाचित कोणालाच अजून जमलेले नाही...
विजयचे आयुष्य सध्या फारच विचित्र वळणावर येऊन थांबलेले आहे. काही बाबतीत त्याच्या आयुष्याचा उलटा प्रवास सुरु झालेला आहे. विजय लहान असताना त्याने त्याच्या बाबांसोबत अनेक धंदे केले होते त्यातीलच एक धंदा म्हणजे दिवाळीला रांगोळी विकणे... मागील कित्येक वर्षे म्हणजे विजय नोकरीला लागल्यापासून हा धंदा करणे त्याच्या वडिलांनी बंद केला होता कारण दोघांनाही वेळ नव्हता. पण ह्यावेळी मात्र त्यांनी रांगोळीचा धंदा करण्याचा निर्णय घेतला. विजय त्याच्या दुकानात रांगोळी प्लास्टीकच्या पिशव्यांमध्ये भरून त्याची पॅकींग करत असताना त्याच्या ओळखीचे एक गृहस्थ त्याला भेटायला आले असता ते विनोदाने म्हणाले,’’ तुझा रांगोळी पॅकींग करतानाचा फोटो तुझ्या जुन्या मालकाला पाटवू का ? त्यावर विजयही त्यांना म्हणाला , ‘’ बिनधास्त पाठवा ! नाहीतरी तो मला काय काढून देत होता. त्या माणसाकडे काम करून विजयने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा गाढवपणा केलेला होता. त्या माणसाकडे तो कामाला राहिल्यापासून त्याची प्रत्येक दिवाळी...त्याच्या मनासारखी साजरी झालेली नव्हती. ह्यावेळी भले त्याला बोनस मिळणार नव्हता तरी त्याची दिवाळी दिवाळीसारखी साजरी होत होती. कारण ह्यावर्षी त्याचा अपेक्षाभंग होणार नव्हता. जो ह्यापुर्वी त्या मालकामुळे प्रत्येक दिवाळीला झालेला होता. या सर्वातून विजयने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठा बोध घेतला होता. कोणाकडून कधीच कोणत्याच अपेक्षा ठेवायच्याच नाही म्हणजे आपल्या वाट्याला अपेक्षा भंगाचे दु:ख येत नाही. त्यामुळे सध्यातरी विजयला कोणाकडून कोणतीच अपेक्षा नाही. कदाचित त्याच्या
कित्येक वर्षानंतर पुन्हा रांगोळी विकण्याचा धंदा करताना त्याला त्याचे जुने दिवस आठवले. जे फार काही चांगले नाही म्हणता येणार पण तरीही त्या दिवसांनी त्याच्या आयुष्यात सर्वाधिक आनंद पेरलेला होता असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. विजय जेंव्हा नवीन नवीन लिहायला लागला होता तेंव्हा त्याच्या लिखानाचा आवाका इतका जास्त होता की तो दहा- दहा दिवाळी अंकात प्रत्येक वर्षी साहित्य पाठवायचा ...त्यातील चार-पाच दिवाळी अंकात त्याचे साहित्य हमखास प्रकाशित व्हायचे. खरे तर आता त्याचा साहित्य निर्मितीचा आवाका वाढायला हवा होता पण त्याच्या बाबतीत ते अगदीच उलटे झालेले आहे त्याचा लिखानाचा वेग मंदावला आहे. हल्ली तो दिवाळीत फार फार तिन दिवाळी अंकासाठी साहित्य पाठवतो ते ही तेथे जेथे ते प्रकाशित होण्याची खात्री असते. पुर्वी जशी त्याला प्रसिद्धीची नशा होती. ती नशा आता शिल्लक राहिली नाही. त्याचे एक कारण हे ही म्हणता येईल की त्याच्याकडे प्रसिद्धीसोबत पैसा आला नाही. उलट त्याच्या खिशातलाच पैसा जास्त खर्च झाला. त्याच्या आयुष्यात त्याच्याकडून झालेली सर्वात मोठी चूक ही होती की साहित्य निर्मितीच्या नादात त्याने त्याच्या आयूष्यातील पैसे कमाविण्याची सर्वात मोठी आणि योग्य संधी गमावली होती. त्यामुळेच आज त्याचे आर्थिक भविष्य म्हणावे तितके सुरक्षित नाही. पण त्याने त्याच्या तरूण साहित्यिक मित्रांना मात्र ती चूक करू दिली नाही. ज्यामुळेच ते विजयला त्यांचा साहित्यिक गुरु मानतात. एके काळी सतत प्रसिद्धीत असणारा विजय आता कोठेतरी हरवलेला आहे. कदाचित साहित्यातून मिळणार्या प्रसिद्धीसाठी त्याची आता पैसे मोजण्याची तयारी नाही. कारण त्याची सर्व आर्थिक गणिते आता बिघडलेली आहेत. त्यामुळे त्याला त्याची पातळी सोडून पुन्हा जगाच्या नजरेत त्याच्या कुवतीपेक्षा हलकी समजली जाणारी कामे करावी लागत आहेत. ज्याला त्याचा नाईलाज आहे कारण मनुष्य धर्म कोणाला चुकलेला नाही.
पुर्वी जेंव्हा विजयची महागडे कपडे विकत घेण्याची ऐपत नव्हती, त्यावेळी त्याला त्या कपड्यांचे प्रचंड आकर्षण होते पण ते आकर्षण त्याला आता उरलेले नाही कारण आता त्याला वाटते की त्याच्या कपड्यांमुळे त्याला किंमत येता कामा नये तर त्याने घातलेल्या कोणत्याही कपड्यांना त्याच्यामुळे किंमत यायला हवी.
पुर्वी म्हणजे काही वर्षापुर्वीपर्यत विजय दिवाळीत त्याच्या आईला फराळ बनवायला मदत करीत असे पण हल्ली त्याचे वजन वाढल्यामुळे त्याचा दिवाळीचा फराळ खाणे टाळण्याकडेच जास्त कल असतो. तरीही तो अधून मधून त्याची चव चाखतोच पण मर्यादेत राहून... तशी ही दिवाळी त्याच्यासाठी नेहमीच्या दिवाळीसारखी अजिबात नव्हती. ही दिवाळी त्याच्यासाठी त्याने मागे केलेल्या आर्थिक चुका सुधारण्याची सुचना घेऊन आलेली होती. पुर्वी विजय स्वत:हून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असे पण हल्ली तो जे त्यालाच शुभेच्छा देतात जो त्याला शुभेच्छा देतो. हल्ली विजय तसा बराचसा आत्मकेंद्रित झालेला आहे. विजयच्या बाबांनी रांगोळी विकून त्यांच्या दिवाळीची सोय केली असे म्हणायला काही हरकत नव्हती. पण विजयने दिवाळी पैसे मिळावेत म्हणून ज्यांची ज्यांची कामे केली होती त्यांच्याकडून काही त्याला पैसे आलेले नव्हते. विजय अशा लोकांना काही बोलत नाही पण योग्य वेळ आल्यावर मात्र काही न बोलता त्यांना तो त्यांच्या कर्माची शिक्षा देतोच. जशी त्याने त्याच्या जुन्या मालकाला तो बेसावध असताना अचानक नोकरी सोडून दिलेली होती. विजयचे त्याने जे नुकसान केले होते त्या नुकसानी समोर विजयमुळे त्याचे झालेले नुकसान न च्या बराबर असल्यामुळे विजयला त्याचे वाईट वाटले नाही. जगाला विजयची फक्त हळवी बाजू माहीत आहे कारण जग नेहमी त्याच्या हळव्या बाजुचाच फायदा उचलत असते. पण ज्यांनी त्याची दुसरी बाजु पाहिलेले आहे ते त्याच्या वाकड्यात शिरण्याचा स्वप्नातही विचार करीत नाहीत. विजयच्या हातात त्याच्या गरजे एवढेच पैसे येतात म्हणूनच कदाचित त्याचे पाय जमिनीवर आहेत. विजयच्या पाहण्यात असे आले आहे की ज्याच्याकडे कमी मेहनत करून जास्त पैसे येतात त्याची पैशाची हाव दिवसेन दिवस वाढत जाते. त्यानंतर ते व्यसनांच्या आहारी जातात. पैशासोबत त्यांची व्यसनेही दिवसेन दिवस वाढत जातात. काही दारुच्या, तर काही झुगाराच्या तर काही विषमलिंगी व्यक्तीच्या आहारी जातात. मनुष्य स्वभावच असा आहे की त्याला एक गोष्ट मिळाली की लगेच त्याच्या मनात त्याहून चांगली दुसरी गोष्ट मिळविण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे विजयचा पुर्वीपासून जे मिळेल त्याच्यात सुखी आणि समाधानी राहण्याचा प्रयत्न होता. पण हल्लीच्या जगाची कोणी सुखा समाधानात जगावे अशी इच्छाच नसते. माणसाचे भौतिक सुखांच्या मागे वेड्यासारखे धावणेच त्याच्यासाठी जीवघेणे ठरत आहे. त्यामुळेच लोकांचा प्रेमावरचा आणि नात्यांवरचा विश्वास उडालेला आहे. आज माणसापेक्षा त्याच्याकडे असलेल्या भौतिक सुखांना जास्त किंमत आलेली आहे. पुर्वी विजयचा प्रेमावर, प्रेमातील ताकदीवर प्रचंड विश्वास होता. पण सध्याची परिस्थिती पाहता त्याचा तो विश्वास डळमळीत व्हायला लागलेला आहे. त्याचे महत्वाचे कारण हे आहे की आजकाल लोक भौतिक सुखांसाठी प्रेमही सहज लाथाडायला लागलेले आहेत. विवाहीत स्त्री – पुरुषांचे प्रेम ते ही टिकून राहणे हल्ली भौतिक साधनांवर अवलंबून आहे. आपल्या जोडीदाराकडून मिळाणारी भौतिक सुखे जरा कमी झाली की ते ती सुखे दुसर्या कोणाकडून मिळतात का ? याचा शोध घ्यायला सुरुवात करतात... तो शोध ज्यांचा संपतो ते नैतिकता आपल्या पायाखाली सहज तुडवतात. हे आजचे जग डोळे झाक करीत असलेले वास्तव आहे. आज आपल्याला जास्तीची भौतिक साधने गोळा करता यावीत म्हणून आपल्या जोडीदारावर त्याची इच्छा नसतानाही अधिकचे पैसे कमाविण्यासाठी जोर- जबरदस्ती केली जात आहे. लग्नात हुंडा घेणे-देणे हा कायद्याने गुन्हा असला तरी भौतिक सुख- साधनांच्या रुपात तो दिला – घेतला जातो हे ही एक वास्तवच आहे. आज लग्न भौतिक साधनांवर ठरते त्यामुळेच त्या लग्नाचे आयुष्य कमी असते. ह्यामुळेच भविष्यात लग्न टिकविणे फार अवघड आणि जिकरीचे होणार आहे. हल्ली कोणातेही स्त्री- पुरुष आपल्या जोडीदाराला एका मर्यादे पलिकडे आनंद देऊ शकत नाही. कारण आज लोकांच्या आनंदाच्या आणि सुखाच्या व्याख्याच फार विचित्र झालेल्या आहेत. लोक आज नैतिकतेची व्याख्या आपल्या सोयीप्रमाणे बदलायला लागलेले आहेत. त्यामुळे आज समाजात व्यभिचार प्रचंड बोकालायला लागलेला आहे. म्हणजे अगदी साठी पार केलेल्या लोकांचेही विवाह बाहय अनैतिक संबंध हल्ली सर्रास पाहायला मिळतात. पण समाज अशा गोष्टींना आता इतका सरावला आहे की त्याला त्याचे आता काही वाटत नाही. आता एकूनच समाज मन या विचारावर येऊन पोहचलेले आहे की... कोणतेही स्त्री – पुरुष संबंध समाज स्विकारेल फक्त त्यात जोर – जबरदस्ती नसावी... इतकेच...
मुंबईत एका दिवसात 150 कोटी रुपयांचे फटाके वाजविण्यात आले. त्या 150 कोटीत विजयचा 1 रुपयाचाही फटाका नव्हता ह्याचा त्याला अभिमान वाटतो. इतक्या मोठ्या प्रमाणात फटाके वाजविले गेल्यामुळे मुंबईच्या हवेत जे प्रदुषण झालेले आहे त्याचा त्रास मुंबईतील नागरीकांना पुढचे कित्येक दिवस होत राहणार हे नक्की ! फटाके वाजवून नक्की कोणत्या प्रकाराचा आनंद मिळतो हे विजयला तो लहान असताना फटाके वाजवत होता तेंव्हा ही कळत नव्हते आणि आता तर कळतच नाही. पण त्या फटाक्यांच्या आवाजाने त्याचे डोके मात्र नक्की उठते. तो कर्णकर्कश आवाज त्याला हल्ली असहनीय होतो. त्या आवाजाने त्याचा रक्तदाब वाढतोय की काय असे त्याला सतत वाटत राहाते. त्याहून विजयला ह्या गोष्टीचे जास्त वाईट वाटते की लोक चुकीच्या गोष्टींवर अक्षरश: पैसा उधळतात म्हणण्यापेक्षा जाळतात. फटाक्यांमुळे लागलेल्या आगीत होणारे नुकसान त्याचा तर कोणी अलेखच मांडत नाही. विजयच्या एका मित्रांने मुलांना 500 रुपयांचे फटाके वाजवायला आणून दिले ते ही त्याला महाग वाटत होते. विजयच्या मनात त्याला बोलायचे खूप होते की,’’ इतके महाग वाटतात तर फटाके वाजवायचेच नाही आणि मुलांनाही फटाके न वाजविण्याची सवय लावायची ! पण ते त्याला जन्मात जामणार नव्हते. त्याचे मुख्य कारण हे होते की तो प्रवाहासोबत वाहवत जाणार्यांपैकी एक होता. विजयचे तसे नव्हते, त्याला त्याच्या लहानपणापासूनच प्रवाहाच्या विरोधात पोहण्याची सवय होती. त्या सवयीमुळेच तो लेखक झाला. त्याच्या प्रवाहाच्या विरोधात पोहण्याला त्याच्या घरच्यांकडून कालही विरोध होता आणि आजही विरोध आहे. पण तो विरोध त्याने कालही जुमानला नाही, आजही जुमानत नाही आणि भविष्यातही जुमानणार नाही. त्याच्या मेंदूला जी गोष्ट पटत नाही ती तो कधीही स्विकारत नाही. नेमक्या त्याच्या ह्या स्वभावामुळेच त्याचे लग्न झाले नाही अथवा त्याने ते केले नाही असे म्हणता येईल.
प्रवाहाच्या विरोधात पोहणारे लोक समाजाला फार रुचत नाहीत हे वास्तव आहे. भले मग ते कितीही विचारी, हुशार आणि अभ्यासू का असेनात... विजय जर लग्नावर आणि इतर समारंभावर होणार्या खर्चावर काही बोलला तर लोक म्हणतात... तुझे लग्न झालेले नाही म्हणून तू असे बोलतोस... लग्न ही विजयची व्यक्तीगत बाब आहे नव्हे ती सर्वांचीच व्यक्तीगत बाब आहे. प्रत्येक सामाजिक कृतीचा संबंध लग्नाशी लावणे चुकीचे आहे हे काही सुशिक्षित लोकांनाही कळत नाही. विजयने चाळीशी पार झाली तरी त्याने लग्न केले नाही. त्याच्यात तशी लग्न न होण्यासारखी काहीही कमी नाही पण त्याला लग्नच करायचे नाही. त्यासाठीची त्याची व्यक्तीगत अशी काही कारणे आहेत. तर झाले असे त्यांच्या गावात तरूण लोकांचे एक मंडळ तयार केले त्या मंडाळात असा निर्णय घेण्यात आला होता की ज्या कोणाचे लग्न झालेले आहे त्यांनी व इतरांनी त्यांचे लग्न झाल्यावर ह्या मंडाळाचे सभासद व्हावे ! त्याप्रमाणे वयाच्या बावीसव्या वर्षी ही लग्न करून काही ह्या मंडळाचे सभासद झाले पण विजयने चाळीशी पार केली तरी फक्त त्याचे लग्न झालेले नाही म्हणून त्याला त्या मंडळाचा सभासद करून घेतला नाही. विजयच्या ज्ञानाचा त्या मंडळाला उपयोगच झाला असता. विजय आपले म्हणने त्यांना पटवून देऊ शकला असता. त्यांना ते पटलेही असते. पण त्यांच्या गाढवपणाचा त्याला प्रचंड राग आला होता त्यामुळे तो त्यांना काहीही बोलला नाही. आजही तो त्या मंडळाचा सभासद नाही. आता काय तो त्यांच्या मंडळाचा सभासद व्हावा म्हणून त्याचे लग्न लावून देणार आहेत का ? भारतीय समाज विवाहसंस्थेकडे आजही डोळसपणे पाहायला शिकलेला नाही. त्यामुळेच देशात घटस्फ़ोटाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. विवाह करून आपल्या आणि दुसर्यांच्या डोक्यालाही ताप होणार आहे हे माहित असणारे जर लग्न करायचे नाही म्हणत असतील तर त्यांच्यावर दडपण आणून त्यांना विवाह करायला भाग पाडणे हे ही नैतिकतेत बसत नाही.
विजयचा एक चुलत भाऊ त्याच्या लग्नाला चार एक वर्षे झाली. त्याच्यासोबत लग्न झालेल्यांना दोन दोन पोरंही झाली. त्याच्या घरच्यांची अपेक्षा होती की वर्षभरातच त्यांना मुल व्हावं ! पण तसे काही झाले नाही. त्यानंतर बरेच डॉक्टर वगैरे झाले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी ती मुलगी कोकणातील गावची असल्यामुळे देवा- भुताचे प्रकार सुरु झाले. म्हणजे उपास – तापास, कोंबडी नारळ वगैरे, हे सर्व करून काहीही होत नाही. हे विजयला पक्के माहीत होते. पण त्याला दुसर्यांच्या फाटक्यात पाय घालायला नाही आवडत. तुकारामांनी शेकडो वर्षापुर्वी सांगितले होते नवसाने पोरं होत नाहीत. पण सुशिक्षित लोकांच्याही डोक्यात अजूनही प्रकाश पडत नाही. पण या बाबतीत त्यांच्यापेक्षा समाजाचा दोष जास्त आहे कारण समाज त्यांना ह्या मार्गाने जायला भाग पाडतो. लग्नानंतर दोन – चार वर्षात पोरंबाळं नाही झाल तर लोक मुद्दाम त्याबद्दल खोचून खोचून चौकशी करतात. या बाबतीत दुर्दैवाने स्त्रियाच जास्त आघाडीवर असतात. त्यांच्या मते जी स्त्री मुलांना जन्म देत नाही ती काही कामाची नसते. काही पुरुष ही हा बाबतीत आपल्या पत्नीला जाच करतात हे ही सत्य आहे. एकदा विजयच्या त्या चुलत भावाच्या बायकोला विजय समोरच ती एका वयस्कर स्त्रीच्या पाया पडली असता त्या बाईने मुद्दामच हसत अष्ट पुत्रवती भव ! असा आशिर्वाद दिला. विजयच्या मते ती स्त्री त्याच्या चुलत भावाच्या बायकोने पाया पडावे या लायकीचीच नव्हती. ती समोरची स्त्री वयस्कर आणि नात्यानेही जेष्ठ होती. म्हणून विजय त्यावेळी तिला काही बोलला नाही. म्हणजे काहींच्या आयुष्यातील समस्या लग्न करूनही सुटत नाही उलट त्यांचा मानसिक त्रास प्रचंड वाढतो. त्यात हल्ली समाजात स्त्री- पुरुष अनैतिक संबंधाचे प्रमाणही प्रचंड वाढलेले आहे. एखाद्या स्त्रीला फक्त मुलं होत नाही या कारणासाठी तिला घटस्फ़ोट देणारे महाभागही समाजात कमी नाहीत. या बाबतीत विजयचे मात्र स्पष्ट मत होते. त्याने लग्नच केले नाही पण केलेही असते तरी त्याला त्याच्या पत्नीने कोणत्याही कारणाने मुलांना जन्म नसता दिला तरी त्याला त्यामुळे काही फरक पडणार नव्हता. त्या बबतीत तो फारच स्पष्ट बोलत असे की आपला कोठे कोणा राजा- महाराजांचा वंश आहे जो वाढायलाच हवा !
कित्येक लोक विनाकारण आपल्याला मुलं नाही याचा त्रास करून घेतात. समाजात कित्येक लोक आहेत ज्यांची मुले परदेशात स्थायिक झालेली आहेत जी मुले आपल्या आई- वडिलांकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्याबाबतीत त्यांची त्यांची अशी काही कारणे असतील पण येथे ते महत्वाचे नाही… म्हणजे कित्येकांना मुलं असून नसल्यासारखीच आहेत. त्यात समाजात घटस्फोटाचे प्रमाण वाढल्यामुळे कित्येक मुलांच्या मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे ज्यांना आपण आपले लग्न टिकवू शकू की नाही याबद्दल शंका असेल त्यांनी लग्नच करू नये, केले तरी मुलांना जन्माला घालू नये असे विजयचे स्पष्ट मत आहे. ज्या मुलांना आपण उत्तम आयुष्य देऊ शकत नाही त्यांना जन्माला घालण्याचा कोणालाच नैतिक अधिकार नाही. भविष्यात विजयने लग्न केले तरी त्या लग्नाचा उद्देश वंश वाढविणे हा अजिबातच नसेल. नव्हे ! तसा तो कोणाचाच असायला नको ! प्रत्येकाचा वंश हा कधी ना कधी नष्ट होतोच. मुलांना जन्माला घालून जर आपलेच आयुष्य जगणे अवघड होणार असेल तर मुलांना जन्माला न घालणे उत्तम ! त्याहून वाईट गोष्ट ही आहे की जन्माला घातलेल्या मुलांना कित्येक लोक आपली खाजगी संपत्ती समजतात. म्हणजे त्या मुलांच्या आयुष्याचे सर्व निर्णय तेच घेत असतात. आयुष्यभर आपल्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करीत असतात. जन्माला येणारा प्रत्येक जीव हा स्वतंत्र असतो त्याचे स्वातंत्र्य आपण आबादीत ठेवायलाच हवे हे भारतीय समाजमनाने अजून स्विकारले नाही. ते जो पर्यंत स्विकारले जात नाही तोपर्यंत प्रत्येक माणसाच्या आयुष्याचा आपण स्वातंत्रपणे विचार करुच शकणार नाही. विजयला एक माणूस म्हणून त्याचे स्वातंत्र्य जपायला आवडते त्यामुळे त्याच्या आयुष्यात कोणी म्हणजे कोणीच केलेली ढवळाढवळ त्याला सहन होत नाही. ती तो सहन करीत नाही...
दिवाळीच्या बाबतीत दिवाळी झाल्यावर विजयच्या तोंडी एक संवाद नेहमी असतो तो संवाद म्हणजे,’’ दिवाळी आली आणि दिवाळा काढून गेली.“ दिवाळीला विजय नेहमीच अनावश्यक खरेदी करतो. ह्या वेळीही त्याने तसाच पिवळया रंगाचा एक शर्ट अनावश्यक खरेदी केलेला आहे. त्यात त्याने शिवून घेतलेला नवीन शर्टही त्याला फारसा आवडलेला नाही कारण तो खूपच चमकिला आहे. विजय त्याच्या बहिणीचे लग्न होण्यापूर्वी भाऊबीजेला जी काही भेट द्यायचा ती तिच्याच पसंतीची द्यायचा, तेंव्हा तो पैशांचा फार विचार करीत नसे. पण हल्ली तो तिला मागील काही वर्षे रोख पैसेच देतो. जेणेकरून तिला जे हवे ते खरेदी करता यावे. बिनकामाच्या वस्तू भेट देऊन त्याचा का उपयोग ? त्यापेक्षा पैसे दिले तर तिला तिच्या कामाची वस्तू घेता येतील अथवा पैसेही दुसर्या कोणत्याही कामाला वापरता येतील. असा त्याचा विचार असतो. सध्या विजयचे आर्थिक गणित बिघडल्यामुळे कुटुंबातील इतर व्यक्तींसाठी फार खरेदी करणे त्याला जमले नाही तरीही त्याने त्याच्या कामासाठी एक प्रिंटर मात्र विकत घेतला. आता त्याला त्याच्या कामाच्या प्रिंट मारायला दुसरीकडे जावे लागणार नाही. आता ही गुंतवणुक तरी त्याला किती लाभदायक ठरते देवच जाणे. ह्यावेळी विजयला कोणाकडून दिवाळी मिळाली नाही पण इतरांना दिवाळी देण्याची संधी मात्र त्याला मिळाली. कदाचित देवाचीच इच्छा आहे की तो नेहमी देणार्याच्या भुमिकेत असावा.
फार पूर्वी विजय सायकल चालवित असे पण हल्ली कित्येक वर्षे त्याने सायकलही चालवलेली नाही. आता विजयला असे वाटू लागले आहे की आपण स्कुटर चालवायला शिकावे ! पण आता स्कुटर चालवायला त्याचे मन तसे धजावत नाही. हातात दुचाकी असली तर आपल्याकडून होणार्या कामांचा वेग वाढतो. इतकी वर्षे तो एकाच जागेत वर्षानुवर्षे आतल्या आत काम करीत असल्यामुळे त्याला कधी दुचाकीची तशी गरज भासली नाही. पण आता जेंव्हा त्याला पायाची थोडी समस्या उद्भवली तेंव्हा त्याला जाणवले आपल्याकडे दुचाकी असती तर आपला त्रास थोडा कमी झाला असता. योगायोगाने त्याच्या एका भावाचा मित्र परदेशात कामाला गेल्यामुळे त्याने त्याची स्कुटर विजयच्या भावाला वापरायला दिल्यामुळे आता स्कुटर चालवायला शिकणे तसे त्याला सहज शक्य आहे फक्त ते त्याने मनावर घ्यायला हवे. विजय ते मनावर घेणारच होता. मुंबईत नाही तरी त्याला त्याच्या कोकणातील गावी दुचाकीची नितांत गरज आहे याची त्याला खात्री पटलेली आहे. कारण तेथे दुकानात चॉकलेट आणायला जायचे म्हटले तारी रिक्षाला येऊन जाऊन 150 रुपये खर्च येतो. पायी गेल्यास अर्धा तास लागतो. पूर्वी विजय गावी गेल्यावर दिवसातून दुकानात तीन फेर्या तरी मारीत असे पण हल्ली त्याच्या पायातील हाड वाढल्यापासून त्याला ते शक्य होत नव्हते. तरीही तो एखादी फेरी मारायचाच व्यायाम म्हणून... आता विजयने दुचाकी चालविणे जरा जास्तच मनावर घेतलेले आहे. त्यासाठी त्याने शिकावू ड्रायव्हरचा परवाना काढण्याचाही निर्णय घेतलेला आहे.
आता दिवाळी संपल्यामुळे विजयला पुन्हा आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे लागणार होते. आता त्याला अजिबात आळस करून जमणार नव्हते. त्याचे मुख्य कारण हे होते की त्याच्या डोक्यावर लाखभर रुपयाचे कर्ज झालेले होते पण त्याच्याकडे सध्यातरी उत्पन्नाचा खात्रीलायक असा कोणताही स्त्रोत नव्हता. एकदा का तो त्याला मिळाला असता तर त्याचे डोके जरा शांत झाले असते आणि त्याला नवीन काहीतरी लिखाण करायला सुचले असते. जे मागील वर्षभर त्याला आर्थिक विचारांमुळे शक्य झालेले नव्हते. कधी – कधी विजयच्या मनात विचार येत असे की त्याने त्यांच्या यंत्रांच्या राज्यात पुन्हा परतून जावे का ? पण सध्या सुरु असणारे त्याला शारीरिक त्रास त्याला तसे करण्याची परवानगी देत नव्हते. त्याला कोणत्याही क्षेत्रात का होईना त्याच्या बुद्धीचा पुरेपुर वापर करायचा होता. जो त्याला सध्या करता येत नव्हता.
विजयाचा एका ब्रोकर मित्र त्याला भाड्याने काही फ्लॅट पाहायला घेऊन गेला असता त्या फ्लॅटचे 30-40 हजार भाडे ऐकूनच विजयला घाम फुटला आणि त्याला एक प्रश्न सतावू लागला. नुसते घराचे 30 – 40 हजार भाडे भरणार्याला महिन्याला पगार किती असेल... निदान लाखभर रुपये तरी असेल . पण इतका पगार असणारी व्यक्ती भाड्याच्या घरात का राहते ? हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. ही भाडी ऐकल्यावर विजयला त्याचे उत्पन्न म्हणजे नच्या बरोबर वाटायला लागले. म्हणजे जगाच्या आर्थिक स्पर्धेत तो कोठेतरी खूपच मागे पडलेला होता. त्याचे ते मागे पडणे आता कोठेतरी त्याला खटकायला लागलेले होते. नव्हे त्याला असेही वाटू लागले होते की त्याचे आयुष्य वायाच गेले. त्याचा लेखक होण्याचा घेतलेला निर्णय चुकलेला होता. त्या निर्णयामुळेच त्याने त्याच्या आयुष्यात अनेक चुकीचे आर्थिक निर्णय घेतले. त्याच्या बाबांच्या मालकीचे घर नसते तर मुंबईत भाड्याच्या घरात राहायला त्याला परवडले असते का ? तर या प्रश्नाचे उत्तर विजयला स्वत:ला दुर्दैवाने नाही ! असेच द्यावे लागले. त्यामुळेच विजयने भविष्यात त्याच्या कोकणातील गावी राहण्याचा निर्णय मनोमन घेऊन टाकलेल आहे. त्यासाठीची मानसिक तयारी करायला त्याने सुरुवातही केलेली आहे.
विजय त्याच्या काही मित्रांना भेटायला गेला असता त्यांनी त्याचे लक्ष त्याच्या वाढलेल्या पोटाकडे वेधले... विजयच्या त्या वाढलेल्या पोटाकडे त्याचे लक्ष गेले नाही असे अजिबात नाही. पण त्याला सतत होणार्या दुखापती आणि सांध्यात जाणविणार्या वेदना पाहता त्याला पोट कमी करण्यासाठी व्यायाम करणे जर धोकादायकच वाटत होते. आता कोठे तो जरा जरा पायाच्या दुखण्यातून सावरला होता. त्याच्या पोटाचा वाढता घेर त्यालाही अस्वस्थ करतो पण सध्यातरी तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आहे कारण आता त्याला नवीन ताप ओढावून घ्यायचा नाही. तशा आता कोठे त्याला पोरी पटवायच्या आहेत. जेंव्हा तो झिरो फिगर होता. तेंव्हा लोक त्याला सुकड्या म्हणायचे ! आता कदाचित जाड्या म्हणत असतील. मागे त्याने अचानक वजन कमी करण्याचा घेतलेला निर्णय त्याच्या गळ्याशी आला होता. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तो आता कोणताही अट्टहास करणार नव्हता. त्याला आता त्याचे वजन कमी करायचे आहे पण सावकाश ! मागे वजन कमी करण्याच्या नादात तो त्याची नैसर्गिक ताकद गमावून बसला होता. कारण त्याने त्याचे जेवन कमी केले होते. जेवन कमी करुन वजन कमी करणे हा बहुतेक चुकीचा मार्ग असावा अशी त्याची खात्री पटली होती. आता त्याने बाकीचे व्यायम करण्यापेक्षा पोट कमी करणारे व्यायामाचे प्रकार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मागे त्याच्या पायाच्या वाढलेल्या हाडाच्या समस्येवर नुसत्या व्यायामाने विजय मिळविला होता. पण त्याच्या त्या व्यायामात सातत्य होते. पोट कमी करण्यासाठीही त्याला ते सातत्य ठेवावे लागेल. पायाच्या समस्येमुळे त्याच्या नियमित कामात अडचण येत होती पण वाढलेल्या पोटामुळे तशा काही समस्या येत नाही. त्यात त्याच्या वाचनात एक लेख आला होता ज्यात असे लिहिले होते की हल्ली मुलींना म्हणे पोट पुढे असणारे पुरुष आवडतात, हे कसे शक्य आहे ? असा प्रश्न विजयलाही पडला होता पण हल्ली काहीही अशक्य नाही असे त्याने स्वत:लाच समजावले. जसे काही वर्षापुर्वी मुलींना वयाने मोठे असणारे पुरुष आवडू लागले होते आणि आता वयाने लहान असणारे आवडू लागले आहेत. त्याप्रमाणे पुर्वी मुलींना बॉडी बिल्डर आवडाचे तसे आता पोट पुढे असणारे आवडू लागले असतील. विजयला पुर्वी सडपातळ झिरो फिगर असणार्या मुली आवडायच्या पण हल्ली त्याला जरा अंगाने भरेलेल्या मुली म्हणजे स्त्रिया आवडू लागल्या आहेत. तसाही तो स्त्रियांच्या सौंदर्याचा हल्ली फक्त प्रशंसक आहे. कोणतेही सौंदर्य ओरबडण्याचा त्याचा स्वभावच नाही. एखाद्या झाडावरील फुल खुटायलाही त्याला अवघडलेल्यासरखे होते. त्याचा हा शक्यतो कोणालाही न दुखावण्याचा स्वभावच बर्याचदा त्याच्याच दु:खाला कारणीभुत ठरतो. तिकडे इस्त्राईल आणि हमासचे युध्द सुरु आहे त्याच्या बातम्या पाहाताना तेथे युद्धात भरडले जाणार्या सर्वसामान्य नागरिकांचा विचार करून त्याला प्रचंड वाईट वाटते . त्यामुळे अगदी छोट्यात छोटे भांडाणही टाळण्याकडे त्याचा कळ असतो. त्यामुळे काही लोक त्याला भित्रा समजतात. पण वास्तवात वेळ पडली तर तो वाघाच्याही जबड्यात हात टाकायला मागेपुढे पाहणार नाही असा त्याचा स्वभाव आहे. पण त्याला शांत आयुष्य जगायला आवडते. त्यामुळेच आतापर्यत आपल्या नशिबात जे आणि जितके आहे तितकेच आपल्याला मिळते आहे असे स्वत:ला समजवत आयुष्य जगत आला. कोणाशी स्पर्धा नाही, कोणत्या गोष्टीचा हव्यास नाही, कोणाच्या प्रगतीवर जळणे नाही... ह्या सगळ्या गोष्टींमुळेच तो सामान्य माणसापेक्षा कदाचित वेगळा ठरतो.
दिवाळीत विजयला त्याने काम केलेल्या काही लोकांकडून आणि ज्यांच्याकडून त्याने उसने दिलेले पैसे येणे अपेक्षित होते ते काही आलेच नाही. ते न येताही दिवाळी पारही पडली. आता त्याला काळजी वाटत होती ती क्रेडीट कार्डची बिले भरण्याची. त्याबाबतीत त्याच्या मनात कधी - कधी असा विचार येतो की मी काही महिने कोठे नोकरी करावी का ? जेणे करून माझ्यावर झालेले कर्ज मला फेडता येईल. त्याच्या वडिलांचे दुकान सांभाळल्यामुळे त्याच्या हातात काहीच येत नाही उलट तेथे त्यानेच छोटी- छोटी गुंतवणुक केल्यामुळे त्याच्या डोक्यावरील कर्ज मात्र कमी होण्याऐवजी दिवसेन दिवस वाढत चाललेले आहे. काही उत्पन्न मिळावे म्हणून आता पर्यत त्याने जी जी गुंतवणुक केली ती वायाच गेली होती. म्हणजे त्याच्या गुंतवणुकीला अपेक्षित यशच येत नव्हते. छोटी मोठी कामे करून जे काही मिळते ते ही फारच कमी असते. म्हणजे त्यात फार फार त्याचा वरखर्च निघतो. हे असेच चालू राहिले तर मागच्या वर्षासारखे हे वर्षही निघून जाईल आणि त्याच्या हाती काही लागणार तर नाही पण त्याच्या डोक्यावरील कर्ज मात्र वाढत जाईल. त्याच्या बाबांच्या दुकानात थांबून त्याने फक्त त्याचा उदरभरणाचा प्रश्न सोडविलेला आहे. आता दिवाळीला त्याने जे काही पैसे खर्च केले ते काही त्याची जमा पुंजी नव्हती. त्यामुळे ते कर्जही त्याच्या डोक्यावर नकळत वाढलेच होते. कित्येक लोक एक काम करून भागत नाही म्हणूनच नव्हे तर जास्तीचे पैसे कमविता यावे म्हणून एका नोकरीवरून माघारी आल्यावर दुसरीकडे पार्टटाईम नोकरी अथवा छोटा - मोठा धंदा करतात. येथे विजयला एकाच कामातून हक्काचे उत्पन्न मिळत नाही. त्याला पैसे कमाविण्याच्या पूर्वी अनेक संध्या होत्या पण आता वयानुसार त्या संध्या कमी होत चालल्या आहेत. आता त्याने कोणाकडे नोकरी करण्याऐवजी इतर लोकांसाठी नोकर्या निर्माण करणे हेच त्याच्या हातात आहे. आता तो तेच उत्तम रित्या करू शकतो.
काल विजय काही कामानिमित्त एका कारखान्यात त्या कारख़ान्याच्या मालकाला भेटायला गेला होता. त्या मुर्खाने त्याच्या कारखान्यात एकच माणूस कामाला ठेवलेला आहे दुर्देवाने तो ही मुका आणि बहिरा आहे. त्या कामगाराच्या कामाच्या कौशल्याबद्दल विजयच्या मनात शंका नाही पण त्या कारखान्यात येणार्या लोकांची गोची होते ना ! त्यात मालक जागेवर नसतो आणि बर्याचदा त्याचा फोनही लागत नाही. या परिस्थितीत त्याने आणखी एक माणूस कामाला ठेवायला हवा होता अथवा तो स्वत: तेथे पुर्णवेळ उपस्थित राहायला हवा होता. त्याला कळत नाही त्याच्याशी व्यवस्थित संपर्क होत नसल्यामुळे त्याच्या हातून कित्येक कामे निघून गेली असतील आणि जातही असतील. विजय त्याचा पुर्वीचा कारखाना एकहाती एकटा सांभाळत होता. पण त्याची तेवढी क्षमता होती. तरीही त्या कारखान्यात त्याच्यावर अन्यायच झाला. त्याच्या चांगुलपणाचा फायदा घेतला गेला. एक मराठी माणूस म्हणून मराठी माणसाला मदत करण्याची त्याला फार मोठी किंमत मोजावी लागली. एका मराठी माणसाच्या डोक्यात दुर्दैवाने दुसर्या मराठी माणसाला मोठं करण्याचा विचारच नसतो . तो नेहमीच फक्त स्वत:ला अधिका अधिक मोठं करण्याचा स्वार्थी विचार करीत राहतो. पण हे ही तितकेच खरे आहे की मराठी माणसाला मोठे करण्यात हातभार लावलेला लोकांनाही तो यश मिळताच लगेच विसरतो. विजयच्या आयुष्यात अशी बरीच मराठी माणसे आहेत. विजय कित्येक मराठी माणसांच्या कामी आला पण त्यातील एकही त्याच्या मात्र कामी येऊ शकला नाही. त्यात विजयने अशा कारखान्यात काम करण्यात आयुष्य वाया घालविले की तसाच दुसरा कारखाना तो तांत्रिक कारणांमुळे आता सुरुही करू शकत नव्हता आणि आता तसा नवीन कारखाना सुरु करुन त्याचा काही उपयोगही नव्हता. त्यामुळे त्याने त्या कारखान्यासाठी त्याची जी बहुमुल्य वर्षे वाया घालविली त्याचा आता काहीही उपयोग नव्हता. पण त्या कारखान्यात तो ज्या यंत्रांवर स्वार व्हायला शिकला होता. ती यंत्रे आजही बाजारात चालता आहेत. ती ही अजून काही वर्षे चालतील. त्यामुळे त्यातील एखादे यंत्र घेऊन तो आपला नवीन व्यवसाय सुरु करू शकतो. पण त्याबाबतीत त्याला पून्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल... त्याला आता त्याचा वेळ फार वाया न घालविता जे काही साध्य करण्यासारखे आहे तेच साध्य करायचे आहे. त्याच्या मते त्याच्या वेळेची किंमत कोणीही पैशात नाही करू शकत म्हणजे ती पैशात होऊच शकत नाही.
विजयने घेतलेला नवीन प्रिंटर सतत चालू राहावा म्हणून विजयने त्याच्या दुकानाच्या बाहेर झेरॉक्सचा बोर्ड लावला जेणे करून रोज त्याचा प्रिंटर सुरु राहिली त्यातून मिळणार्या दोन- चार रुपयांनी त्याला फार काही फरक पडणार नव्हता. पण त्या निमित्ताने त्याचा लोकांशी संवाद वाढणार होता. त्याच्या पहिल्याच दिवशी त्याच्या दोन मित्रांनी त्याच्याकडून झेरॉक्स करुन घेतले. कोणताही उद्योग वाढविण्यासाठी लोकांशी संवाद मह्त्वाचा असतो. कोणत्याही कारणाने का होईना लोकांशी तुमचा संपर्क वाढला की त्याचा तुमच्या उद्योगाला नक्कीच फायदा होतो. ओळखीतून काम मिळण्याची शक्यता वाढते. विजय लेखक असल्यामुळे खूप लोक त्याला ओळखतात पण त्या ओळखीचा त्याला त्याचा उद्योग वाढविण्यासाठी फार उपयोग होत नाही कारण ते लोक त्याच्या कधी प्रत्यक्ष संपर्कात येत नाहीत. दुसरे कारण हे होते की आता त्यांच्या दुकानाचे भाडेही वाढले होते ते वाढलेले भाडे कोठून तरी वसूल करणे गरजेचे होते. त्यामुळेच विजयने उत्पन्नाचे छोटे का होईना साधन निर्माण केले व आपलेही काम प्रिंटरमुळे आडू नये म्हणून प्रिंटर विकत घेतलेला होता. नुकताच विजयने पिरामिड संबंधीत एक लेख वाचला ज्यात असे म्हटले होते की पिरामिड च्या भुमितीय आकाराबाबत अभ्यास केला असता प्रयोगाअंती असे निदर्शनास आले की मिरामिडच्या विशिष्ट भुमितीय आकारामुळेही पिरामिडच्या आत ठेवलेल्या मृत माणसांच्या शरीराचे विघटन होत नाही. त्यामूळे भविष्यात पिरामिडच्या आकाराचे रुग्णालये उभारल्यास रुग्णांचा बरे होण्याचा वेग वाढेल अशी शक्यताही वर्तवली होती. पुर्वीच्या काळातील भारतातील बर्याचशा घराचे कौलारू छप्पर पिरामिडच्या आकाराचे असायचे . इतकेच नव्हे आजही बर्याच मंदिराचे घुमट पिरामिडच्या आकाराचे असतात. म्हणजे पुर्वीच्या कौलारु घरांचे छतही वैज्ञानिक दृष्ट्या उत्तम भुमितीय आकाराचे होते. पण हल्ली ते चित्र बदलायला लागलेले आहे. असो ! आता विजयच्या कोकणातील नवीन घराचे छप्पर सपाट एका बाजुला उतरते आहे. असो ! कोणत्या गोष्टीमागे काय शास्त्र असेल काही सांगता येत नाही. पण काही बाबतीत जुने ते सोने ही म्हण खरी ठरताना दिसते.
फेसबुक पाहता पाहता विजयच्या वाचनात एक दुर्दैवी बातमी आली, अर्थातच ती बातमी आत्महत्तेची होती. भाऊबिजेच्या दिवशी एका बहिणीने एका भावाला ओवाळले पण तिचा भाव बेकार असल्यामुळे त्याच्याकडे बहिणीला ओवाळणी द्यायला पैसे नव्हते. त्याचा त्या भावाला प्रचंड मानसिक त्रास झाला ज्यातून त्याने आत्महत्या करण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला. आत्महत्या करण्यापेक्षा त्या भावाने आपण जेंव्हा कधी पैसे कमावू तेंव्हा बहीणीला भाऊबिजेला अशी काही ओवाळणी देऊ की मागच्या राहून गेलेल्या सर्व ओवाळण्यांची कसर भरून निघेल. असा विचार विजयच्या मते त्या भावाने करायला हवा होता. फक्त एका वेळेला विजय त्याच्या बहीणीला आर्थिक मदत करायला कमी पडला होता. त्यावेळीच त्याने स्वत:ला समजावले होते. की ही वेळ आपल्याला पुन्हा येता कामा नये. भले आपल्याला पैसे कमाविण्यासाठी झाडू मारायला लागली तरी चालेल... सध्या विजय आपण कोण आहोत ? काय आहोत ? हे विसरून त्याच्या बाबांच्या दुकानात दिवसातून दोन –चार वेळा झाडू मारतोच ना ! त्याची त्याला अजिबातच लाज वाटत नाही असे नाही पण काय करणार ? आडला नारायण गाढवाचे पाय धरी... जर त्याने त्याच्या पायाच्या आजारपणात त्याच्या बाबांना हे नवीन दुकान सुरु करून दिले नसते तर त्यालाही बेकार म्हणून घरात बसावे लागले असते. त्याला कधीच कोणाच्या डोक्यावरील ओझे व्हायचे नव्हते आणि कोणाचे ओझे आपल्या डोक्यावर घ्यायचेही नव्हते. या दुकानात बसूनच रिकाम्या वेळेत त्याने अनेक दिर्घकथा लिहिल्या होत्या. पण याची कल्पना त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच नाही. त्याला त्याचा वेळ वाया घालवायला अजिबात आवडत नाही. त्याला त्याचा प्रत्येक मिनिट सार्थकी लावायला आवडतो भले त्यातून काही आर्थिक फायदा झाला नाही झाला तरी. विजयच्या मते आपल्या हातात जो काही वेळ असतो ती देवाने आपल्याला दिलेली सर्वोत्तम भेट असते...
दिवाळी आली दिवाळा काढून गेल्यावर आता विजयच्या घरातील दिवाळीला केलेला फराळही संपला होता. फराळ संपला म्हणजे खर्या अर्थाने दिवाळी संपली. दिवाळी संपली की माणूस दिवाळीला झालेल्या खर्चाचा हिशोब मांडू लागतो. त्यातील ज्यांना दिवाळीला बोनस मिळालेला असतो त्यांना हा हिशोब मांडताना फार त्रास होत नाही पण ज्यांना स्वत:ला बोनस मिळालेला नसतो उलट इतरांना दिवाळी द्यावी लागलेली असते, त्या उपर दिवाळीला बर्यापैकी खर्चही करावा लागलेला असतो अशा विजयसारख्या लोकांना हा हिशोब मांडताना नाही म्हटले तरी त्रास हा होतच असतो. या दिवाळीला विजयने एक नवीन शर्ट शिवून घेताला, एक नवीन तयार सदरा आणि एक शर्ट विकत घेतला. बहिणीने त्याला भाऊबीज म्हणून एक जीन्स पॅन्ट भेट दिली . त्याने बहिणीला 2000 रुपये ओवाळणी दिली. दिवाळी संपल्यावर त्याला क्रेडिट कार्डच्या कर्जाचा हप्ता भरायचा होता. इकडून तिकडून त्याने त्याची कशी- बशी जमवाजमव केली पण यापुढे प्रत्येक महिन्याला त्याला ही जमवा जमाव करणे थोडे अवघड वाटू लागले होते. पैशासाठी आता त्याला काहीतरी भरीव काम करावे लागणार होते. त्याच्या अंगी असणारी लिखाणाची कला काही त्याचा अर्थिक प्रश्न सोडविण्याच्या कामी येणार नव्हती. त्यामुळे पैसे कमाविण्यासाठी त्याला वेगळ्या क्षेत्रातच पुर्वी ही हात पाय मारावे लागत होते आणि आजही मारावे लागत आहेत. आता ह्या महिन्यापासून त्याने आपल्या प्रत्येक दिवसाचा आर्थिक हिशोब ठेवण्याचा निर्णय घेतला. दुकानातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून विजय आठवड्यातून निदान दोन वेळा तरी दुपारच्या वेळी दुकानात विक्रिला लागणारे सामान खरेदी करायला बाजारात जातो. त्याचवेळी तो त्याची ही छोटीमोठी कामेही करून येतो म्हणजे ! कुरीअर वगैरे करणे, कोणा मित्राला वगैरे भेटणे, बॅनर वगैरे छापून घेणे इ. पण त्यावेळी निघताना तो व्यवस्थित तयार होऊन निघतो. म्हणजे एकदम रुबाबात पुर्वीसारखा ! नाही ! म्हणायला तरूण मुली त्याच्याकडे पाहतात आणि मनातल्या मनात विचार करत असतात हा तरूणपणी कसा दिसत असेल. असो... जग जरी विजयला म्हातारा समजत असले तरी तो काही स्वत:ला अजून म्हातारा समजत नाही कारण तो मनाने अजूनही तरुणच आहे. त्याला विचारानेही नेहमीच तरूण राहायला आवडते त्यामुळे आजच्या तरुण मुलांनाही त्याच्याशी संवाद साधायला आवडते. विजयशी कोणत्याही विषयावर संवाद करायला मिळणे हिच कित्येकांसाठी भाग्याची गोष्ट असते. विजय काही आता सुंदर तरूणी पाहून उत्तेजीत वगैरे होत नाही पण त्याला एकूणच सर्वच गोष्टीतील सौंदर्य पाहायला आवडते. ते सौंदर्य पाहण्यातून त्याला आनंद मिळतो. आजची तरूणपिढी ज्या गोष्टीत आनंद शोधते आहे ते पाहता त्याला सध्याच्या पिढीचे भविष्य फार काही आशादायक दिसत नाही. सुंदर, मनमोहक आणि बुद्धीमान तरुण – तरूणींना जेंव्हा तो सिगारेट ओढताना अथवा दारू पिताना पाहतो तेंव्हा त्याला प्रचंड वाईट वाटते. आजची तरूण पिढी कळत नकळत अनेक व्यसनांच्या आणि चुकीच्या जीवन पध्दतीच्या आहारी जात आहे. विजयला असे कधी वाटत नाही की आजच्या पिढीने देव देव करावे पण आजची पिढी निरोगी आणि निर्व्यसनी असावी असे नक्की वाटते. त्यामुळेच त्याने त्याच्या आयुष्यात कोणत्याच व्यसनाला कधीच जवळ केले नाही. कधीच जीभेचे चोचले पुरविले नाही. जेंव्हा जी गोष्ट खायची सोडणे आवश्यक असेल तेंव्हा ती त्याने सोडली होती. सर्वात प्रथम त्याने त्याच्या रागावर ताबा मिळविला होता, त्यानंतर त्याने जीभेवर ताबा मिळविला , त्यानंतर त्याने त्याच्या भावनांवर ताबा मिळविला आणि त्यानंतर त्याने त्याच्या मनावर ताबा मिळविला... सध्या तो सर्वात महत्वाचे म्हणजे मोहावर ताबा मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.
विजयचे बाबा विजयला दुकानात काम करायला अशा काही आज्ञा देतात की जसे काही त्यांनी त्याला कामालाच ठेवलेले आहे. विजय हे सारे ते त्याचे बाबा आहेत म्हणून सहन करतो. नाहीतर तो पूर्वी ज्या कारखान्यात नोकरीला होता त्या कारखान्याचा मालकही त्याला अशा आज्ञा द्यायची हिंमत करीत नसे. विजयच्या बाबांना जुने रिपेअर करुन विकायला आवडते आणि विजयने त्याच्या आयुष्यात नेहमीच नवनिर्मितीचा ध्यास घेतलेला होता. त्यामुळे त्या दोघांच्या विचारात दोन टोकाचे अंतर होते. त्यामुळेच विजय त्यांच्या या दुकानाकडे फक्त एक उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहतो त्या दुकानात त्याचे मन मात्र रमत नाही. कारण यापूर्वी त्याने केलेल्या कामांपुढे त्याचे बाबा या दुकानात करत असले काम अत्यंत साधे आहे. त्याच्या बाबांना सतत वाटते की विजयला हे काम करायला जमणार नाही. पण वास्तवात विजयला हे काम करायचेच नव्हते. त्यांच्या ह्या कामात पैसे जास्त मिळतात पण त्या कामात बुद्धीला खाद्य मिळत नाही. आपल्या मेंदुला भार द्यावा लागत नाही. जे काम अशिक्षीत माणूस करु शकतो असे कोनतेही काम कितीही पैसे मिळाले तरी त्याला करायचे नव्हते. त्याचा एक मित्र प्लंबरचे काम करतो. भले तो ते काम करून भरपूर पैसे कमावतो पण समाजात त्याची ओळख एक प्लंबर अशीच आहे. विजयचे तसे नाही विजय त्याच्या दुकानात झाडू मारत असताना जेंव्हा बाहेरची लोक त्याच्या दुकानासमोरून जातात तेंव्हा त्याला साहेब अशी हाक मारतात. त्याचे कारण त्याच्या अंगी असणारी हुशारी, त्याचे सामाजिक कार्य आणि त्याचा वेगवेगळ्या विषयाचा चौफेर अभ्यास... विजयला त्याच्या आयुष्यात दोन गोष्टी नेहमी खटकल्या एक त्याच्या आईचे अशिक्षित असणे आणि त्याच्या बाबांचे अज्ञानावर अधारीत अतीशहानपण...
त्याच्या आई- बाबांना दुर्दैवाने त्याची समाजातील पथ कधीच कळली नाही. त्यांनी ती कधीही मान्य केली नाही. त्याची दोन मुख्य कारणे होती. ते दोघेही कोणाचेही यश त्याच्याजवळ असणार्या पैशात मोजत होते. त्यामुळे त्यांच्या नजरेत विजय हा एक अपयशी माणूस होता. त्यामुळे त्याला नेहमीच भिती वाटायची त्याची होणारी बायको ही यांच्यासारखाच विचार करणारी निघाली तर तो तिला सहन करू शकणार नाही. त्यामुळे तो नेहमीच समविचारी स्त्रीच्या शोधात होता पण त्याच्या आयुष्यात कित्येक स्त्रिया आल्या आणि गेला पण ती एक समविचारी स्त्री काही त्याला अजूनही मिळाली नाही. यापुढे ती त्याला मिळण्याची त्याला श्क्यताही वाटत नाही कारण आता तर पैशाचे प्राबल्य आणखीनच वाढलेले आहे. आज त्याच्या इमारतीतील एका मुलीचा विवाह होता. विजय काही हल्ली कोणाच्या लग्नाला वगैरे जात नाही. कुटुंबातील कोणीच जाणार नसेल तर नाईलाजाने तो जातो. त्याला इतरांच्या आनंदात सहभागी व्हायला आवडत नाही असे नाही पण ! तेथे गेल्यावर त्याला त्याच्या आनंदावर विरजण घालणारी लोकं भेटतात. जी बोलतात,’’ कितीही दिवस दुसर्यांच्या लग्नाला जात राहणार आता तू ही लग्न करून टाक ! लग्न कर हे म्हणने किती सोप्पे आहे पण हल्ली लग्न टिकविणे किती अवघड झालेले आहे हे त्यांच्या गावात नसते. हल्ली तर अगदी 20 वर्षे संसार केलेल्या लोकांनाही घटस्फोट घ्यावासा वाटतो म्हणजे लग्नाला 20 वर्षे होऊनही ती एकमेकांशी एकरुप झालेली नसतात. त्यांना आपण एकमेकांशिवाय आयुष्य काढू शकत नाही असे वाटत नसते, म्हणजे त्या दोघांनी 20 वर्षे एका नात्याचे फक्त आणि फक्त ओझे वाहिलेले असते. विजयच्या आई- बाबांनीही त्यांच्या नात्याचे ओझेच वाहिलेले होते. फक्त ती सामान्य माणसे असल्यामुळे त्यांचे नाते टिकून होते इतकेच ! पण विजय सामान्य माणूस नव्हता त्यामुळे तो न झेपणारे नाते वाहण्याचा निरर्थक प्रयत्न करुच शकणार नव्हता. जे आजचे बहुसंख्य सामान्य माणसे करतात.
दोन वर्षापुर्वी त्याच्या एका मैत्रीणीच्या नवर्याचा कोरोनात मृत्यू झालेला होता. सुदैवाने तिला मुलबाळ नसल्यामुळे तिने दुसर्या लग्नाचा निर्णय घेतला. त्याचे मुख्य कारण हे होते की तिला तिच्या घरच्यांच्या डोक्यावरील ओझे व्हायचे नव्हते. स्त्री जर कमावती नसेल तर ती आजही तिच्या घरच्यांना नेहमीच ओझे वाटते. त्यामुळे विजयला नेहमीच त्याची बायको कमावती हवी होती. त्याला तिने कमवलेल्या पैशात रस नव्हता तर तिची समाजात स्वत:ची अशी एक स्वतंत्र ओळख असावी असे वाटत होते. त्यासोबत तिने उदरनिर्वाहासाठी अगदी त्याच्यावरही अवलंबून असावे असे वाटत नव्हते…
नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर महिना सुरु झाला की हिवाळा जाणवायला लागतो. हिवाळा सुरु झाला की मानवी मनाला उबदार गोष्टींचे आकर्षण वाटायला लागते. विजय लहान असताना त्याच्या चाळीसमोरील मोकळ्या मैदानात मित्रांना जमा करून रात्री कागद लाकडे करवंट्या जे काही जाळण्यासारखे मिळेल ते जाळून त्याची शेकोटी करून त्या शेकोटी समोर झोपायची वेळ होईपर्यत बसत. कधी – कधी त्याच शेकोटीत बटाटे ही भाजून खात. पुढे विजयसह त्याच्या मित्रांची वये वाढत गेली त्याच्या मित्रांनी उबेसाठी जोडीदार शोधली, ती कमी पडली की बाटलीला जवळ केली. विजय मात्र आजही थंडात कुडकुडतो आहे त्याच्या प्रेमाच्या गुलाबी आठवणी आठवून ! कधी कधी विजयला प्रश्न पडतो,’’ तो ज्यांच्या आठवणीत आता उब शोधतो त्यांच्या स्मृतीत तरी तो असेल का ? त्याचे उत्तर नाही असे तो स्वत:च स्वत:ला देतो. तो आजही भुतकाळातील त्याच्या गुलाबी आठवणीत जगतोय पण त्या आठवणी जगासाठी कधीच पुसल्या गेलेल्या आहेत. याची विजयला ही कल्पना आहे. पण मनुष्याला जगण्यासाठी काहीतरी निमित्त लागत. विजयकडे ते निमित्त म्हणजे आता फक्त त्याचा लिखानाचा आणि वाचनाचा छंद हाच आहे. त्याचे मित्र त्यांना काही करण्यासारखे नाही म्हणून दारुच्या नादी लागतात, फारच हिंमत वाढली तर एखाद्या दुसर्या बाईच्या नादाला लागतात. ते जमल नाही तर झुगार खेळतात किंवा फिरायला जातात. पण सगळयात त्यांचे फार पैसे वाया जातात. विजयचा छंद त्यामानाने त्याला परवडण्यासारखा आहे. बाकी त्याचे सर्व मित्र अज्ञानात वावरतात. त्यांना फक्त पैशाची भाषा कळते बाकी जगाशी त्यांना काहीही देणे घेणे नसते , मी, माझे कुटुंब आणि माझा आनंद हेच त्यांचे जग असते. विजयचे तसे नाही तो रोज काहीना काही वाचत असतो त्यामुळे रोज त्याच्या ज्ञानात थोडी थोडी भर पडत असते. त्याच्या कडील ज्ञानांचा भंडार दिवसागणिक वाढत चाललेला आहे. समस्या एकच आहे पदवी मात्र त्याच्या नशिबात नाही. ती त्याच्या नशीबात असती तर कदाचित त्याचा पैसे कमाविण्याचा मार्ग थोडा सुखकर झाला असता.
विजयने संगणकावर डी.टी.पी. तयार करायचे काम करणे कधीच सोडले होते पण सध्या त्याला त्याच्या उदर्निर्वाहासाठी ते कामही नाईलाजाने पुन्हा सुरु करावे लागले. ज्यातही त्याला हल्ली लग्न पत्रिका तयार करण्याचेच काम मिळते. ते काम तो आनंदाने करतो पण त्याला व्यक्तीश: जर कधी लग्न केले तर ते नोंदणी पद्धतीनेच करायचे होते. लग्नावर होणारा अवास्ताव खर्च त्याला कधीच मान्य नव्हता. त्यात हल्ली लग्नात हळदीला केली जाणारी दारूची बरसात तर त्याला जास्त खटकते. मागे त्याच्या वाचनात एक बातमी आली होती. एक नवरदेव त्याच्याच हळदीत दारु पिऊन नाचता नाचता हार्ट अटॅक येऊन मेला. त्यानंतर होणारी अन्नाची नासाडी ती तर त्याच्या डोक्यातच जाते. मानपानावर, रोषणाईवर, कपड्यांवर , ढोल – ताशे आणि फटाक्यांवर केला जाणारा खर्च निर्थक वाटतो. लग्नात कितीही खर्च केला तरी लोक नावे ठेवायची ती ठेवतातच ! त्यात कित्येकांची घरच्यांच्या दबावामुळे न आवडणार्या व्यक्तींसोबत लग्ने झालेली असतात. कित्येकांच्या मनात दुसरेच कोणी तरी असते. कितीही खर्च केला तरी लग्न टिकण्याची हमी आज भटजीपासून ज्योतिषापर्यत कोणीच देत नाही कारण लग्न मोडायला हल्ली कोणतेही कारण पुरेसे होते. तरीही ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांनी लग्न कार्यावर खर्च करायला विजयचा अक्षेप नाही कारण त्यामुळे कित्येकांना रोजगार मिळतो त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लागतो. विजयचा कर्ज काढून लग्न कार्ये करायला अक्षेप आहे. त्यामुळे कित्येकांची उमिदीची वर्षे ते लग्नासाठी काढलेले कर्जच फेडण्यात जातात ज्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी काही तरतुद करणेही शक्य होत नाही. त्यांच्या आयुष्यातील सर्व आर्थिक गणिते बिघडतात. विजयने लग्नही केले नाही आणि त्याचे आर्थिक भविष्य सुरक्षित व्हावे म्हणूनही काही केले नाही . त्याचा त्याला आता खूप पश्चाताप होतोय पण आता त्याच्या हातात फार काही राहिलेले नाही. त्याचे भविष्य आता त्याच्या लेखणीच्याच हातात आहे. त्या जोरावर दैवयोगाने काही झाले तर ते त्याचे नशिब आणि साहित्य सेवेचे फळीत म्हणता येईल.
बर्याच लोकांना विजयने उसने पैसे दिले होते. फार नाही... पण हजार – दोन हजार असे. पण ते पैसे परत मागण्याची त्याची हिंमत काही झाली नाही अथवा त्याला ते फार महत्वाचे वाटले नव्हते. पण आता जेंव्हा त्याला पैशापैशाचा हिशोब करावा लागतो आहे तेंव्हा त्या पैशाचे महत्व त्याच्या लक्षात येत आहे. त्यामुळे आता त्यानेच दिले पैसे परत मागण्यासाठी थोडे निर्लज्य होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ज्यांनी त्याच्याकडून पैसे उसने घेतलेले आहेत त्यांच्यांडून त्याला आर्थिक कडकी लागलेली आहे हे कारण पुढे करत पैसे मागायला सुरुवात केली. याचा एक फायदा होईल. त्याचे उसने दिलेले पैसे एकतर माघारी मिळतील किंवा ज्यांना पैसे उसने दिलेले आहेत ते पुन्हा त्याच्याकडे पैसे उसने मागणार नाहीत. आता विजयवर जे आर्थिक संकट आलेले आहे अथवा त्याने ते ओढावून घेतलेले आहे ते दूर होईपर्यत कदाचित तो लक्ष्मीचा परम भक्त झालेला असेल कारण हल्ली त्याच्या ध्यानी मनी लक्ष्मीच असते.
विजयच्या इमारतीत राहणार्या एका वृद्ध व्यक्तीचे निधन झाले. काही महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीचेही निधन झाले होते. ते जोडपे निपुत्रीक होते. त्यांना कोणी फारसे नातेवाईकही नव्हते अथवा त्यांनी नातेवाईकांना फार जवळ केलेले नसावे. त्यामुळे त्याच्या पत्नीच्या वेळेला आणि आता त्याच्या वेळेलाही अंतसंस्काराची तयारी इमारतीतील रहिवाशांनीच केली. आता सर्व सोपस्कार पार पडल्यावर त्याच्या घरावर मालकी हक्क सांगायला बरेच लोक उभे राहतील. त्या म्हातारी – म्हातार्याने आयुष्यात फार काही आनंद उपभोगला नाही. अशी संपत्ती गोळा करून त्याचा उपयोग काय ? जी आपल्याला सुखी आयुष्यही जगू देत नाही. त्यात त्या दोघांनी फार माणसेही जोडलेली नव्हती. आपल्या वाट्याला आलेल्या निपुत्रीकतेवर त्यांनी वेळीच विचार केला असता तर निदान त्यांचे म्हातारपण तरी सुखात गेले असते. पण काही लोकांना सारासार विचार करताच येत नाही. या सगळ्या गोष्टींचा विजयही आता सारासार विचार करू लागला आहे भविष्यात तो लग्न करो अथवा न करो ! पण त्याला त्याच्या भविष्याची चिंता आताच सतावायला लागलेली आहे. पण ती चिंता करण्यात त्याला त्याचा आज मात्र खराब करायचा नाही. आज त्याला प्रत्येक गोष्टीतून त्याला असा मिळणारा आनंद भरभरून मिळवायचा आहे. त्या बाबतीत त्याला तडजोड करायची नाही. पण एक गोष्ट मात्र आहे त्याची कोणतीच भव्य दिव्य अवास्ताव अशी स्वप्ने नाहीत. त्याने जी स्वप्ने पाहिली आहेत ती पूर्ण करण्याची त्याच्यात क्षमता आहे. पण माणसाच्या क्षमतेलाही कधी कधी मर्यादा येतात हे नक्की !
तो राहात असणार्या इमारतीत भाड्याने राहणारी एक स्त्री त्याला नेहमीच तिच्या नवर्याच्या आधाराने चलताना अथवा गाडीत बसताना दिसायची. त्या जोडप्याला एक लहान मुलगाही आहे. विजयला नेहमीच त्या नवरा- बायकोचे कौतुक वाटे ! त्या बाबतीत विजय स्वत:ला समजावत असे ह्याच्या जागी मी असतो तर... कदाचित माझी प्रचंड चिडचिड झाली असती. पण तिचा नवरा हे सारे फारच संयमाने आणि धैर्याने घेत होता. थोडी अधिकची चौकशी केल्यावर कळले की ती स्त्री पेशाने वकील आहे. बाळंतपण झाल्यावर तिच्या मनक्यात गॅप असल्याचे कळले डॉक्टरांनी तिला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला पण तिच्या ऑपरेशनला अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता ती तिच्या नवर्याच्या आधाराशिवाय चालूफिरू शकत नाही. आता तिच्या नवर्याचे आयुष्यही तिच्या भोवती गुंतून पडलेले आहे. त्या दोघांनी किती स्वप्ने पाहिली असतील... पण त्यांच्या स्वप्नांना कोठेतरी खिळ बसली आहे. नुसती स्वप्ने पाहून काही होत नाहीत. ती स्वप्ने पूर्ण व्हायला पोषक वातावरण लागते. त्याहून महत्वाचे म्हणजे ती स्वप्ने पूर्ण होणे हे तुमच्या नशिबात असावे लागते. विजयला नेहमी वाटायचे कोणीतरी स्वत:हून आपल्या प्रेमात पडेल, आपल्यासोबत जगता यावे म्हणून ती कोणतीही तडजोड करायला तयार होईल ... पण वास्तवात हे झाले नाही. त्यामुळे कधीकाळी प्रेमावर प्रचंड विश्वास असणार्या विजयचा प्रेमावरचा विश्वास दिवसेन दिवस उडायला लागेलेला होता.
विजयच्या वाचनात सहज एक वाक्य आले की धनवान व्यक्तीला जो मान मिळतो तो त्याचा नसतो तर तो त्याच्या धनाचा असतो. विजयला त्याच्याकडे धन नसतानाही जो मान मिळतो तो त्याच्यातील कला – गुणांमुळे मिळतो आहे. म्हणजे त्याला जो मान मिळतोय तो मान त्याचा हक्काचा आहे. त्याने तो कमावलेला आहे. म्हणजे धनवान लोक मानाच्या बाबतीत आयुष्यभर एका भ्रमात जगत असतात. काल विजयने त्याच्या एका मित्राला त्याच्या घरी सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे त्या पूजेची आमंत्रण पत्रिका तयार करून दिली. सत्यनारायण नावाचा कोणी देव होता की नाही याबद्दल त्याच्या मनात शंका आहे. पण ते काहीही असले तरी तो आपले काम मात्र पूर्ण एकाग्रतेने आणि मन लावून करतो. वास्तवात त्याला त्या कामाचे पैसे मिळणार नाही हे माहीत असतानाही. त्यामुळे फारसा तो कोणाकडे सत्यनारायणाच्या पूजाला जात नाही. सत्यनारायणाच्या पूजेत सांगितली जाणारी कथाही त्याला व्यक्तीश: तर्कसंगत वाटत नाही. कधी – कधी त्याला असेही वाटते की या सत्यनारायणाच्या पूजेच्या मागे फार मोठे अर्थकारण दडलेले आहे. प्रत्येक शुभ गोष्टींचा संबंध सत्यनारायणाच्या पूजेशी लावला गेलेला आहे. त्यात कहर म्हणजे ही पूजा सार्वजनिक रित्याही केली जाते. ही पूजा केल्यामुळेच सर्व संकटे व विघ्ने दूर होतात असा भ्रम निर्माण झालेला आहे. विजय राहात असणार्या इमारतीच्या जागेवर पूर्वी झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीत अनेक सोसायट्या होत्या. त्या झोपडपट्टीच्या जागी तीन विंग असणारा एक एस.आर.ए. चा मोठा टॉवर उभारला गेला त्या टॉवरमध्ये जवळ जवळ 600 कुटुंबे राहायला आली. त्यानंतर काही महिन्यात पाठोपाठ त्या इमारतीत काही दिवसाच्या अंतराने काही लोकांचा मृत्यू झाला. त्यावर उपाय म्हणून त्या इमारतीत सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर लोकांचे मरणे थांबले का ? तर नाही ! सत्यनारायणाच्या पूजेच्या निमित्ताने लोक एकत्र येतात, त्यांना थोडा विरंगुळा मिळतो, सांस्कृतिक कार्यक्रम होतात ज्यातून काहींच्या कलागुणांना वाव मिळतो त्यासोबत काहींना रोजगारही मिळतो. फक्त ह्या एका कारणामुळे तो ह्या पूजेला विरोध करत नाही इतकेच.
काही गावात प्रत्येक वर्षी सार्वजनिक सत्यनारायणाच्या पूजेचे आयोजन केले जाते या पुजेला उपस्थिती न लावणार्या चाकरमन्यांना दंडही आकारला जातो. याचा मात्र विजयला प्रचंड राग येतो... विजय कोणाकडच्या कोणत्याच पूजेला सहसा जात नाही जिथे जातो त्यामागे नेहमीच कौटुंबिक सामाजिक दबाव हे एकमेव कारण असते. जे त्याला पटत नाही ते तो कधीच स्विकारत नाहीत. पण कधी - कधी तो फक्त माणसे दुखावू नये म्हणून नमते पणाने घेतो. पण त्याही परिस्थितीत तो त्याच्या विचारांशी तडजोड करीत नाही. तो नास्तिक नाही पण त्याला अस्थिकतेचे ढोंग करणे आवडत नाही. म्हणजे आठवड्यातील काही दिवस देवाच्या नावाने उपवास आणि शाकाहार करायचा आणि इतर दिवशी कोंबड्या मारून खायच्या ! म्हणजे आज मांसाहार केलेले त्यांचे शरीर उद्या लगेच देव देव करायला पवित्र होते ! त्याच्या त्या मित्राच्या घरी सत्यनारायणाची पूजा रविवारी असल्यामुळे त्याच्याकडे पूजेला येणारे बरेच जण त्याच्या घरी लवकर येऊन पूजेच्या पाया पडतील आणि त्यानंतर मांसाहार करायला आणि कदाचित दारू प्यायलाही मोकळे होतील. कोणतीही पूजा ही फक्त कर्मकांड म्हणून केली जात असेल तर त्या पूजा करण्याला काहीही अर्थ नसतो. विजयला ज्याक्षणी वाटले आपण शाकाहारी व्हायला हवे ! त्याक्षणापासून तो शाकाहारी झाला इतका त्याचा त्याच्या मनावर आणि जीभेवर ताबा आहे.
त्याचे एका तरूणीवर एकतर्फी का होईना मनापासून प्रेम होते. पण त्या तरूणीने त्याच्या प्रेमाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर तिचे लग्न झाले. विजयला अगोदर वाटायचे की तिचे लग्न होणे तो सहन करू शकणार नाही. पण ! ज्या दिवशी तिचे लग्न झाले त्या दिवशी तो त्याच्या मित्रांसोबत पार्टीला गेला. जी गोष्ट आपल्याला मिळाली नाही ती गोष्ट आपल्या नशिबात नव्हती असे म्हणून सोडून द्यायची ! ती मिळविण्यासाठी अट्टहास करीत राहायचा नाही. असा विचार तो पुर्वीही करायचा आणि आजही करतो. आता त्याला तिची साधी आठवणही येते नाही. अगदी फेसबुकवरही त्याला तिचा फोटो पाहावासा वाटत नाही. त्या तरुणीमुळे त्याने त्याच्यातील प्रेम भावनेवरही विजय मिळविला होता. आता तो कोणाच्याही प्रेमात पडत नाही. जसा पूर्वी पाहता क्षणी कोणाच्याही प्रेमात पडायचा. खूप विचार केल्यावर विजयने स्वत:लाच समजावले आपण तिच्यावर प्रेम करून चूक केली की तिने आपले प्रेम नाकारून हे येणारा काळच ठरवेल. ती एक सामान्य स्त्री होती. त्यामुळे ती सामान्य स्त्री सारखीच वागली. विजयला याची खात्री होती की एका सामान्य स्त्रिच्या वाट्याला येणार्या सर्व समस्या तिच्याही वाट्याला येणार. त्यावेळी मात्र तिला विजयसारखा विचार करणारा पुरुष कधीच भेटणार नाही.
विजयच्या दुकानाच्या समोर छप्पर असल्यामुळे विजय काही बोलत नाही म्हणून त्याच्या दुकानाच्या समोर त्याचे काही मित्र त्यांच्या दुचाकी बिंधास्त उभ्या करीत असत. विजयलाही त्याचा राग येत असे पण तो काही बोलत नसे. पण प्रत्येकाला समजायला हवे ना ! ते दुकान आपले असते तर आपल्या दुकानासमोर कोणाला अशा दुचाकी लावून दिल्या असत्या का ? तर नसत्या दिल्या. पण या बाबतीत त्याचे बाबा फारच शिस्तीचे आहेत. त्यांनी त्या सर्वाना तोंडावर सांगितले दुकानासमोर गाड्या लावायच्या नाहीत. त्यांच्या बोलण्याला विजयने विरोध केला नाही कारण त्याचे मित्र त्याच्या दुकानासमोर गाड्या लावण्याच्या बाहण्याने त्याच्याकडे गप्पा मारत बसतात त्यामुळे त्याच्या लिखाणात व्यत्यय येतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याचा वेळ ही वाया जातो. त्या सर्वाच्या चर्चेचा विषय शेवटी बाई आणि बाटलीवर येतो. ज्या दोन्ही गोष्टीत त्याला अजिबात रस नाही. त्यामुळे त्यांच्यासोबत केलेली चर्चा ही विजयच्या दृष्टिने निर्थकच असते. त्याच्या वेळेची किंमत त्याच्या मित्रांना माहित नाही ती समजून घेण्याइतकी त्याची बौद्धिक क्षमताही नाही. त्याच्या इमारतीतील त्याच्या ओळखीच्या खूप मुर्खांना असे वाटते की तो त्या दुकानात बसून फक्त टाईमपास करत असतो. पण त्याच दुकानात बसून त्याने त्याची पहिली कादंबरी लिहिली आहे. हे कोणाच्याही गावात नाही. त्यापूर्वी त्याने बर्याच लघूकथा लिहिलेल्या होत्या, दोन चार दिर्घ कथा लिहिल्या होत्या पण सातत्याने लिहिण्याची सवय त्याला त्या दुकानात बसायाला लागल्यापासून लागली कारण त्या दुकानातील रिकाम्या वेळेत त्याला लिखाण करणे हेच वेळ घालविण्याचे उत्तम साधन वाटत होते. प्रथमदर्शनी जरी त्यात काही नफा दिसत नसला तरी भविष्यातील नफा त्यात दडलेला आहे. जो सामान्य बुद्धीच्या लोकांना ज्यांचा साहित्याशी काडीचाही संबंध नाही त्या लोकांना काय कळणार ? कागद म्हटला की विजयच्या डोळ्यासमोर पुस्तक येते तर या लोकांच्या डोळ्यासमोर नोटा येतात. विजय त्या दुकानात कधी - कधी बारा – बारा तास बसतो. पण तेथे बसण्याचा त्याला काही पगार मिळत नाही. तो त्याची काही छोटी – मोठी कामे करून जो काही त्याचा वरखर्च काढतो तेच काही ते त्याचे उत्पन्न पण आपला इतका बहुमुल्य वेळ वाया कसा घालवायचा ? तो वेळ सत्कारणी लागायला हवा म्हणून त्याने संगणक आणि आता प्रिटरही विकत घेतला. वास्तवात ही त्याची साहित्यातील गुंतवणुक म्हणता येईल पण त्यातून उत्पन्न मिळेलच याची मात्र खात्री नाही. पण त्याच्यातील लेखक त्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे त्याच्याकडे जो सध्या रिकामा वेळ आहे तो वाया न घालविता तो सहित्य निर्मितीसाठी खर्च करत आहे म्हणण्यापेक्षा गुंतवत आहे असे म्हणता येईल. त्यामुळे लोक त्याच्या बाबतीत नेहमीच भ्रमात होते आजही भ्रमात आहेत आणि कदाचित भविष्यातही भ्रमातच राहतील. विजयला बाहेरुन इतके पैसे येणे बाकी असतानाही त्याने त्याच्या मित्राला तो गावी जात असल्यामुळे त्याचे संगणकाचे पैसे देऊन टाकले. प्रिटरचे पैसेही देऊन टाकले. आता तसा तो फक्त बॅंकेचा देण लागतो. ते देण्यासाठीच आता त्याला पैशासाठी धावाधाव करावी लागणार होती. ती करण्याची त्याने मानसिक तयारीही केली होती. त्यामुळे आता तो त्या दिशेने विचारही करू लागलेला होता....
एका मराठी अभिनेत्याने तिसरे लग्न केल्याची बातमी विजयच्या वाचनात आली त्यावरील काही प्रतिक्रिया अशा होत्या की त्याच्यात काहीतरी कमी असेल म्हणून त्याची अगोदरची दोन लग्ने टिकली नाही. असे काही नसते प्रत्येक वेळेला पुरुषच चुकीचा असतो असे नाही ना ? तो तर तरूण अभिनेता आहे. विजयच्या इमारतीत राहणार्या दिसायला अतिशय सामान्य असणार्या एका सामान्य माणसानेही साठीत तीसरे लग्न केले आहे. त्याचे झाले असे त्याचा संसार त्याच्या पहिल्या पत्नीसोबत सुखाचा चाललेला होता. त्याची पहिली पत्नी काही घरात धुणी भांडी करत असे. त्यांना दोन सतरा- आठरा वर्षाच्या मुलीही होत्या. एके दुपारी ती तिचे काम आटपुन माघारी घरी येत असताना मोकळ्या रस्त्यावर एका गाडीने तिला धडक दिली ज्यात तिचा जगेवरच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने एका वयस्कर विधवा स्त्री सोबत दुसरे लग्न केले तिलाही पहिल्या नवर्यापासून दोन पोरं होती. ती स्त्री काही दिवस त्याच्यासोबत राहिली आणि त्याच्या घरातील सर्व दागिने घेऊन पळून गेली. त्याच्या मोठ्या मुलीने त्याचा विरोध असतानाही परक्या जातीतील मुलासोबत विवाह केला. दुसर्या मुलीची बरीच लपडी असल्यामुळे त्याने तिला गावी पठवले. अशात पुन्हा तो जेथे कामाला होता तेथे एका विधवा स्त्रीशी त्याची ओळख झाली तिला 18 वर्षाचा एक मुलगा होता. ती स्त्री दिसायलाही सुंदर आणि तरूण होती. तिला पाहिल्यावर सर्वांना त्याच्या नशिबाचा हेवा वाटतो. विजयला त्याचा हेवा नाही वाटत पण त्याला पाहिल्यावर आपल्या हवी तशी स्त्री कोणत्याही वयात आपल्याआयुष्यात येऊ शकते याची मात्र खात्री वाटते.
त्या अभिनेत्याची तीन लग्ने झाली म्हणून लोकांना त्याच्यात काही कमतरता आहे असे वाटत आहे. तसेच विजयच्या बाबतीतही कित्येकांना वाटत असेल. विजय बाबत असा गैरसमज होण्याची दाट शक्यता आहे कारण त्याचे कोणा स्त्री सोबत तसे साधे प्रकरण असल्याचेही जगाला माहीत नाही. विजयला नेहमीच त्याला हवी ! तश्या पत्नीच्या शोधात होता. त्यामुळे त्याने त्या बाबतीत तडजोड केली नाही. त्याचे महत्वाचे कारण हे होते की त्याला अशी दोन - तीन लग्ने कधीच करायची नव्हती. त्याने नेहमीच एका सुखी संसाराचे स्वप्न पाहिले होते. त्याला त्याच्या आयुष्यात फारशा हाणामार्या नकोच होत्या. कित्येक वर्षनंतर विजयने पुन्हा सायकल चालविण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याला थोडे अवघडल्यासारखे झाले पण नंतर मात्र तो व्यवस्थित चालवू लागला. एकदा का माणूस सायकल चलवायला आणि पोहायला शिकला की तो ते कधीच विसरत नाही म्हणतात ते काही खोटे नाही याची त्याला पुन्हा खात्री पटली. तसेही विजयला आता त्याचे वाढलेले पोट कमी करायचेच होते भले हल्ली ते पाहून बायका पटत असल्या तरी. हा झाला विनोदाचा भाग पण त्याला पुर्वीसारखेच सडपातळ व्हायचे आहे. वजन वाढल्यामुळेच त्याच्या पायार ताण येतो आणि फार चालल्यावर पायात गोळे येतात जे पूर्वी कधीच येत नव्हते. वजन वाढल्यामुळे अनेक शारीरिक समस्या नव्याने निर्माण होतात. विजयला बॉडी बिल्डर कधीच बनायचे नव्हते. पण त्याचे शरीर निसर्गत: पिळदार होते. अजूनही आहे पण वाढलेल्या पोटामुळे तो पिळदारपणा फार उठून दिसत नाही.
विजयने प्रिंटर आणि झेरॉक्स मशीन विकत घेतल्याचा त्याला एक फायदा झाला दिवसाला एक दोन लोकं त्याच्याकडे झेरॉक्स काढायला येतात. निदान चार ओळखीच्या लोकांच्या तरी तो कामी येतो आहे. विजयच्या कथा कविता तशा प्रत्येक वर्षी कोणत्या ना कोणत्या दिवाळी अंकात प्रकाशित होतच असतात. त्यात काही आता नवळ राहिलेले नाही. पण त्याला वाईट ह्या गोष्टीचे वाटते की त्याच्या जवळच्या कोणालाच वाचनाचीआवड नाही. त्याच्या घरातील पुढची पिढी इंग्रजी माध्यमातून शिकत असल्यामुळे त्यांना मराठी हा विषय अभ्यासक्रमात असला तरी त्यांना अजून तरी त्यांना मराठी वाचनाची गोडी लागलेली नाही, सध्याचे वातावरण पाहता ती लागेल अशी शक्यताही विजयला दिसत नाही. विजयचा इंग्रजी भाषेला, ती शिकायला कधीच विरोध नव्हता पण इंग्रजी माध्यमातून शिकणार्या मराठी माणसांना उत्तम मराठी निदान लिहिता वाचता तरी यायलाच हवे ! असा त्याचा आग्रह कालही होता आणि आजही आहे. हा आग्रह त्याचा तो लेखक आहे म्हणून अजिबात नाही तर मराठीत आतापर्यत जी साहित्य निर्मिती झालेली आहे ती निर्मिती वाया जाईल याचे वाईट वाटते. अजूनतरी मराठी भाषेची आवस्था फार बिकट वगैरे झालेली नाही. पण ती होण्यापूर्वीच मराठी भाषेचे महत्व टिकविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. नुसती साहित्य संमेलने घेऊन ते दुर्दैवाने होत नाही. त्यासाठी जाणीवपुर्वक प्रयत्न करावे लागतील. त्या प्रयत्नाना योग्य दिशा द्यावी लागेल. पुर्वी दररोज वर्तमानपत्र वाचणारे ही आता कमी होत चालले आहेत. कारण हल्ली बस आणि रेल्वेमध्ये बसून वर्तमानपत्र वाचणारे फारच क्वचित दिसतात. हल्ली लोकांना फुकट दिली तरी पुस्तके वाचायची नसतात. इतकेच काय ? कित्येकदा पुस्तके विकत घेतलेलेही ती पुस्तके वाचत नाहीत. फक्त पुस्तकांचा संग्रह तेवढा करून ठेवतात. विजय हल्ली पुस्तके स्वत:हून कोणाला वाचायला देत नाही कारण त्याला पुस्तकांचा अपमान सहन होत नाही. त्याच्या पाहण्यात असे कितीतरी नवोदित लेखक लेखिका आहेत ज्यांची लोकांनी त्यांचे लिखाण वाचावे अशी त्यांची इच्छा असते पण त्यांची व्यक्तीश: इतरांचे साहित्य वाचनाची इच्छा नसते. त्यामुळेच कित्येक कवी संमेलनातही आपली कविता वाचून झाली की निघून जाणारे कवी विजयने पाहिले आहेत. विजयला व्यक्तीश: तो इतर कवींचा अपमान वाटतो त्यामुळे तो शक्यतो हल्ली कवीसंमेलनात फारसा सहभागी होत नाही आणि झालाच तर कार्यक्रम संपल्याखेरीज बाहेर पडत नाही. विजयने आतापर्यत जी काही साहित्य निर्मिती केली ती फारच उत्तम दर्जाची आहे असे त्याला अजिबात वाटत नाही पण तो त्याचा एक वेगळा वाचक वर्ग तयार करण्यात नक्कीच यशस्वी झाला होता. तो नेहमी सामान्य वाचकांसाठी लिखाण करीत आला. पण मराठी साहित्यिकांनी सामान्य वाचकांचा विचार करून फारशी साहित्य निर्मिती केलेली नाही हे वास्तव आहे. त्यामुळे सामान्य वाचक साहित्यिक पुस्तके वाचनापासून लांब गेला आणि दुर्दैवाने तो अध्यात्मिक पुस्तके वाचनात गुंतून पडला ज्यामुळे त्याचा बौधिक विकास खुंटला. आध्यात्मिक पुस्तके विचरात फक्त गुंतवून ठेवतात ती विचार करायल प्रवृत्त करीत नाही उदा… गिता वचल्यानंतर तिच्या शेवटी बोध काय मिळतो तर मनुष्याचा मोह नष्ट झाला पाहिजे पण तो सोडायलाही कोणताच मनुष्य तयार नसतो त्यामूळे गीता वाचनाचे फळीत निदान त्या सामान्य वाचकासाठी तरी शून्य ! त्याविरुद्ध आजच्या काळातील दारु सोडण्यास प्रवृत्त केरणारी एखादी कथा सामान्य वाचकाने वाचली आणि ती त्याच्या मनाला भिडून त्याने दारू प्यायची सोडली तर त्या वर्तमान समस्यावर भाष्य करण्यार्या कथेचे वाचन मूल्य कितीतरी पटीने वाढते. हल्ली जो रामायण महाभारता सारख्या ग्रंथांचा शाळेय अभ्यासाक्रमात समावेश करण्यासाठीचा अट्टहास केला जात आहे त्याने काहीही साध्य होणार नाही असे विजयचे स्पष्ट मत आहे. आजची पिढी रामायण महाभारतातून काय बोध घेणार ? रामायणातून एक पत्नीव्रत, बंधु, मातृ- पितृ प्रेम, मैत्री की भक्ती...? महाभारतातून कूटनिती , राजकारण , हक्कासाठीचा संघर्ष कसला बोध घेणार ? या दोन्ही कथा उत्तम आहे पण त्या कथांचा रसग्रहण करणाराही तितक्याच ताकदीचा असायला हवा ! सामान्य वाचक अथवा विद्यार्थी यातून बोध घेऊ शकत नाहीत त्यांची तितकी पत्रताच नाही. गाढवापुढे वाचली गीता रात्रीचा गोंधळ बरा होता अशी परिस्थिती त्यामुळे निर्माण होईल. हल्ली नाही का ? टी.व्ही. वर सकाळ संध्याकाळ कीर्तने असतात. त्यांना टी.आर.पी . नक्कीच चांगला आहे कारण ते ऐकणार्या बहुसंख्य लोकांचा असा गैरसमज आहे अथवा करून दिलेला आहे की नुसती कीर्तने ऐकली तरी पुण्य मिळते. त्यातून बोध नाही घेतला तरी चालेल. त्यातून जर कोणी बोध घेत असते. तर देशात दारु पिणारी तरूण पिढी दिवसेन दिवस इतकी वाढली नसती. रस्त्याच्या कडेला बिनधास्त सिगारेट ओढणार्या तरुणी दिसल्या नसत्या. एका – एका स्त्री पुरुषाची घटस्फोट घेऊन तीन – तीन लग्ने होताना दिसली नसती, व्रुद्धाश्रमे आणि अनाथाश्रमे वाढली नसती... संपत्तीसाठी हाणामारी झाली नसती...
डिसेंबर महिना संपत आला आणि विजयला नवीन वर्षाचे वेद लागले. त्याच्या आयुष्यातील इतकी वर्षे कशी पटापट निघून गेली त्याला कळलेच नाही. मुंबईत राहणार्या लोकांच्या आयुष्यातील वर्षे जळत्या कापरासारखी पटापट उडून जातात. मुंबईसारख्या शहरात राहणार्या लोकांच्या जागण्याला एक वेग असतो. तो वेग ग्रामिणभागात राहणार्या लोकांच्या जगण्याला नसतो. त्यांचे जगणे तसे थोडे शांत शांतच असते. विजयच्या आयूष्यातील वर्षे अनेक समस्यांचा सामना करण्यात आणि त्या समस्यांवर विचार करण्यात भुर्कण निघून गेली. त्याच्याआयुष्यात प्रेमाच्या रुपात आलेल्या त्या सर्व जणींच्या आठवणी आजही त्याच्या मनात ताज्या आहेत पण वास्तवात त्या मात्र आता खूपच मागे पडलेल्या आहेत. त्याबाबतीत विजयचे काल्पनिक आयुष्य त्यांच्या आठवणीत घुटमळते आहे पण वास्तवात त्याचे आयुष्य बर्यापैकी संपले आहे. आता यापुढे त्याला कदाचित आयुष्य फक्त ढकलायचे आहे किंवा मिळेल तेवढे जगायचे आहे असे म्हणता येईल. आता त्याच्या आयुष्यात जगण्यासाठीचे फार मोठे ध्येय वगैरे राहिलेले नाही. ज्यासाठी जगावे अशी व्यक्तीही त्याच्या आयुष्यात नाही. आता फार फार तो फक्त स्वत:साठीच जगू शकतो. त्यानेही त्याप्रमाणे यापुढे फक्त स्वत:साठी स्वत:च्या आनंदासाठी जगण्याचा निर्णय घेतलेला होता. त्याला कळून चुकले होते, या जगात दुसर्या कोणासाठी जगण्यात काहीही अर्थ नसतो. शेवटी आपण एकटेच असतो. विजयचा एक मित्र आहे, त्याच्या आयुष्यात तशा समस्या अशा काहीच नाहीत , माणसाला आयुष्यात सुख म्हणून हव्या असणार्या सर्व गोष्टी त्याच्याकडे आहेत, पण तरीही त्याला एक वाईट सवय आहे तो कोणत्याही गोष्टीतील नकारात्मक गोष्ट शोधून काढतो आणि त्यावर बोट ठेवतो. उदा. तो एखाद्या लग्नाला गेला तर त्या लग्नातील पत्रावळीतील नेमका जो पदार्थ फसलेला असेल त्यावर तो बोट ठेवणार पण इतर चार पदार्थ उत्तम झालेले असतील तर त्याची स्तुती मात्र करणार नाही. त्यामुळे विनाकारण तो कित्येकांचा राग ओढावून घेतो. हा गुण त्याने त्याच्या आईकडून घेतलेला आहे. त्याची आई ती इमारतीतील प्रत्येक नवीन सुनेतील काहीना काही कमतरता अथवा दुर्गुण शोधून काढून त्यावर बोट ठेवते पण त्यातील एकिच्याही एकाही गुणाची मात्र ती स्तुती करत नाही.
विजय नेहमीच कोणत्याही गोष्टीतील फक्त सकारात्मक बाजू शोधतो. म्हणजे त्याच्या एखाद्या मित्राची बायको शरिराने जाड आहे म्हणून कोणी टिका करत असेल तर तो म्हणतो ,’’ ती खात्या – पित्या घरातील आहे. त्याचे तिच्यावर आणि तिचे त्याच्यावर प्रेम आहे हे महत्वाचे ! शरिर काय नश्वर आहे... भावना महत्वाच्या ! विजयच्या आयुष्यात त्याच्या प्रेमात पाडणार्या खूप आल्या पण तो आहे तसा त्याला स्विकारून त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारी मात्र कधीच आली नाही. त्याच्या प्रेमात पाडणार्या प्रत्येकिला त्याच्याकडून कशाचीतरी अपेक्षा होती. त्या अपेक्षा तो कालही पूर्ण करु शकत नव्हता आणि आजही पुर्ण करु शकत नाही. त्याच्या प्रेमात पडणार्या प्रत्येकीला त्याच्या प्रसिद्धीचा आणि दिसण्याचा मोह होता. पण त्याच्यासोबतच्या आयुष्यातील संघर्ष मात्र त्यांना नको होता. त्यामुळे त्या सर्वजणींनी सामान्य आयुष्य स्विकारले. विजयला मात्र सामान्य आयुष्य स्विकारणे कालही जमले नाही आजही जमत नाही. ते जमले असते तर कदाचित त्याच्या आयुष्यात त्याला जे आज प्रश्न पडले आहेत ते कदाचित पडले नसते.
विजयला आता नवीन वर्षाची चाहूल लागली असली तरी सरते वर्ष जर त्याला काही देऊन गेले असेल तर तो अनुभव हा असेल.की आर्थिक व्यवहार कसा करावा ? मागच्या वर्षात त्याच्याकडून अनेक आर्थिक चूका झालेल्या आहेत. अनेकांनी त्यांची आर्थिक फसवणूक केलेली आहे. काहींकडून त्याची त्याच्या गाढवपणामुळे फसवणूक झालेली आहे. असो ! मागच्या वर्षात त्याने जो आर्थिक खड्डा खोदून ठेवलेला आहे. तो खड्डा त्याला येणार्या नवीन वर्षात भरायचा आहे. आता तो खड्डा त्याला भरणे शक्य होते की तो खड्डा आणखी खोल खोदण्याची वेळ त्याच्यावर येते हे देवालाच माहीत. त्याच्या उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून तो सर्वोतोपरी प्रयत्न करतो आहे. पण त्याच्या प्रयत्नांना अजून तरी अपेक्षीत यश येताना दिसत नाही. हल्ली त्याने फेसबुकवर एक पोस्ट वाचली... ज्यात असा उल्लेख होता की एका पी.एच .डी. झालेल्या व्यक्तीला उदर्निर्वाहासाठी भंगार गोळा करून विकावा लागला होता. ही आपल्या देशातील बुद्धीजीवींची अवस्था आहे. त्यामानाने हल्ली आपल्या देशात निर्बुद्धी लोक जास्त पैसे कमावत आहेत हे वास्तव आहे . पण हे वास्तव विजयला कळायला फार उशिर झाला. पण आता तो त्याच्या आयुष्याच्या अशा वळणावर उभा आहे जेथून त्याला पुढे जाण्याखेरीज आता पर्याय नव्हता. तो आयुष्याच्या खिंडीत सापडला आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. विजयाच्या आता त्याच्या आयुष्याकडून फार अपेक्षा राहिलेल्या नाहीत. पण त्याला आर्थिक दिवाळखोरीतही सापडायचे नाही. त्याच्या मागच्या आयुष्यात त्याने ज्या आर्थिक चुका केलेल्या आहेत त्या त्याला आता सुधारायच्या आहेत. तो इतका हुशार असतानाही यश त्याला सारखी हुलकावणी का देते हे कोडे त्याला अजूनही उलगडत नाही. तो इतरांना यशस्वी होण्यास मद करू शकतो त्यांच्या यशात वाटेकरीही होऊ शकतो पण त्याचे असे एकट्याचे निर्विवाद यश त्याला मिळत नाही अजून तरी मिळालेले नाही.
कोणीही मार्गदर्शक गुरु नसताना कुंटुंबात तशी परंपरा नसतानाही तो लेखक झाला. त्याचे लेखक होणे हा त्याला मिळालेला शाप होता की वरदान हे अजून निश्चित व्हायचे आहे. लेखक म्हणून त्याला यश मिळाले, प्रसिद्धी ही मिळाली पण पैसा मात्र मिळाला नाही उलट त्याच्या खिशात जो होता तो ही गेला. विजयच्या अंगी अनेक कला आहेत त्यातील प्रत्येक कलेला आर्थिक मूल्य आहे पण त्यामुळे विजयची अवस्था अशी झाली आहे एक ना धड भाराभर चिंध्या ! वर्षाच्या शेवटी शेवटी आता कोठे विजयला छोटी मोठी कामे मिळू लागली होती. अशीच कामे सतत मिळत राहिली तर नक्कीच त्याच्या डोक्यावरचा आर्थिक कर्जाचा भार थोडा कमी व्हायला मदत होणार होती. फार पुर्वी विजयची आर्थिक मानहानी झाली होती ती ज्यांनी ज्यांनी केली होती त्यांना त्याने गुडग्यावर आणले होते त्याच्या समोर ... पण ह्यावेळी ती वेळ पुन्हा आली. त्याचे झाले असे एक दुधवाला विजयच्या घरी रोज दुध टाकायचा आणि रोज दुकानातून पैसे घ्यायचा ! विजयने विचार केला ह्याला रोज पैसे देण्यापेक्षा एकदम महिन्याकाटी पैसे देऊ ! त्याला तो दुधवाला तयारही झाला. पण महिन्याच्या शेवटी दुकानातील गल्ला रिकामा होता. त्याचे बाबा उलटे त्यालाच म्हणाले ,’’ त्याला एकदम पैसे द्यायला का कबुल केले. आता ते पैसे देण्याची जबाबदारी विजयवर आली. विजयचे बाबा तर त्याला म्हणाले,’’ दुध घ्यायचे बंद कर आणि त्याला सांग जे पैसे त्याला द्यायचेत ते थोडे थोडे घेऊन जा ! पण या परिस्थितीत त्याला त्याचे पैसे न देता दुध घेणे बंद करणे त्याला योग्य नाही वाटले त्यामुळे त्याने त्याच्याकडून रोज रोख दुध विकत घेणे सुरु ठेवले. त्याचे जे काही पैसे देणे बाकी होते ते त्यातले थोडे थोडे दोनदा दिले तरी तो दुधवाला जे काही थोडे पैसे बाकी होते ते मागण्यासाठी सारखा दुकानात येत असे ! त्यावेळी नेमकी विजयकडे रोख नसे ! त्यामुळे तो हळू हळू विजयच्या डोक्यात जायला लागला होता. त्या दुधवाल्याचा बहुतेक त्याच्या आर्थिक परिस्थिती बाबत काहीतरी गैर्समज झाला होता. आता विजयला त्याचा झालेला गैरसमज दुर करायचा नव्हता त्यामुळे त्याने त्याच्याकडे रोख रक्कम येताच ती बाजूला ठेवली. तो येताच त्याच्या हातावर पैसे ठेवले आणि त्याला म्हणाला ,’’ आपला हिशोब पूर्ण झाला. त्याच दिवशी त्याचा माणूस दुध टाकायला आला असता त्याने त्याला त्या दिवशीचे पैसे हातात दिले आणि उद्यापासून दुध टाकू नको ! असे सांगितले असता त्याने कारण विचारले , त्यावर तो त्याला म्हणाला ,’’ ह्या दुधाला फुकटचे माझ्या खिशातून पैसे जातात... त्यावर तो माणूस काहीच बोलला नाही... तो दुधवाला न मागता विजय त्याला पैसे देणारच होता. पण त्याची मागण्याची पद्धत विजयला नाही आवडली. विजयच्या बाबांवरून तो विजयची परिक्षा करू पाहात होता.... त्याचे दुधाचे एक महिन्याचे पैसे बाकी होते पण विजयने त्याच्याकडून रोखीने चार महिने दुध घेतले होते... शेवटी सामान्य दुधवाला त्याला विजयचा मोठेपणा कसा कळणार होता. त्याने त्याचे शिल्लक पैसे तेंव्हाच देऊन टाकले असते तर त्याच्याकडून दुध घेणे तेंव्हाच बंद झाले असते...
काल विजयच्या इमारतीत एक लग्न असल्यामुळे त्याची हळद होती. लग्न म्हणजे एक शुभ कार्य असते, एक शुभ सोहळा असतो. पण हल्ली लग्नातील हळदीच्या कार्यक्रमाला अक्षरश: अशुभ कार्याचे स्वरूप प्राप्त झालेले दिसते. कारण हल्ली हळदीला नवर्यापासून सारेच दारूच्या नशेत असतात. स्वत:च्या खिशातील पैसे खर्चून दारू न पिणारे आवर्जून कोणाच्याही हळदीला फुकटची दारू भेटली की भरपूर ढोसतात आणि मग उलट्या करतात. फालतू गाण्यांवर अगदी फालतू नाच करतात, ज्याला खरेतर नाचही म्हणता येत नाही, त्याला फार फार हळणे - डुळणे म्हणता येईल. बर्याचदा हळदीला तरूण मुलीच काय विवाहीत स्त्रियाही कधी-कधी अंगात आल्या सारख्या नाचत असतात. कशाला ते त्यांनाच माहीत. विजयला आयुष्यात सगळे जमले फक्त नाचायला जमले नाही. अगदी गरबा ही त्याला नाचता येत नाही, इतका तो याबाबतीत ढ ! आहे असे म्हणता येईल अथवा आयुष्यात जे करायचे ते उत्तमच करायचे हा त्याचा स्वभाव याबाबतीत त्याला आडवा येत असावा. विजयला कधीच हल्ली हळदीला घातला जाणारा धिंगाणा आवडला नव्हता. त्यामुळे तो हल्ली कोणाच्या हळदीलाच काय लग्नालाही जात नाही. फक्त नातेवाईकांच्या लग्नाला जातो ते ही आपली उपस्थिती दाखविण्यासाठी, तेथेही तो फार रमत नाही. हल्ली तर त्याने थंडाही प्यायचा बंद केलेला आहे. आज सकाळी त्याच्या इमारतीत झाडू मारणार्याने जेव्हा कचरा गोळा करून आणला तेंव्हा त्याचा मोठा कचर्याचा डबा फक्त दारुच्या बाटल्यांनी भरलेला होता. हे सध्याची तरुण पिढी किती दारुच्या आहारी गेलेली आहे याचे जिवंत उदाहरण होते. त्यात दुर्दैवाने हल्ली सरकारही दारुच्या विरोधात भुमिका घेण्याएवजी तिचे समर्थन करण्याची भुमिका घेताना दिसते. त्यामुळे हल्ली सर्रास स्त्रियाही दारुच्या व्यसनाच्या आहारी जाऊ लागल्या आहेत. एक जमाना होता गावा गावात दारू बंदी केली जात होती. काही गावात आजही आहे. पण त्या गावात दारु पिणारे काही कमी झालेले नाहीत. आता तो दिवस दूर नाही जेंव्हा कदाचित सरकार बिअरला शितपेय म्हणून मान्यता देऊन टाकेल. विजयची पुर्वीची भुमिका अशी होती की तो पुर्वी चुकीच्या गोष्टींना समोरासमोर विरोध करायचा पण हल्ली तो तसे करीत नाही. कारण त्याला कळून चुकले आहे की गाढवापुढे वाचली गिता रात्रीचा गोंधळ बरा होता. तो आता स्वता:लाच चुकीच्या गोष्टींच्या संपर्कात येण्यापासून लांब ठेवण्याचा प्रायत्न करतो. त्यात तो बर्यापैकी यशस्वी झालेला आहे.
विजयची देवावर श्रद्धा आहे पण फार देव देव करणारे मात्र त्याच्या डोक्यात जातात. आपल्या देशातील लोकांची मानसिकता नक्की कोणत्या दिशेने प्रवास करीत आहे तेच त्याला कळत नाही. त्याच्या बाबांना टी.व्ही. वरील चॅनेल बदलताना चुकून एक असा चॅनेल हाताला लागला ज्यावर दिवसभर कॅमेरा कोणत्यातरी देवळातील मुर्तीवर लावलेला असतो आणि नेहमीच देवाची गाणी आलटून पालटून वाजत असतात. आता त्याचे बाबा जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा तो चॅनेल लावून बसतात. आता ह्याने काय साध्य होणार आहे. जेंव्हा खरोखरच चांगले विचार अंगीकारण्याचे दिवस होते, तेंव्हा ते दिवस त्यांनी मौज मजेत वाया घालविले आणि आता म्हातारपणी देव देव करून काय उपयोग ? विजयचे बरेच मित्र आहेत ज्यात निर्बुद्धी मित्र, उच्च शिक्षित मित्र ते अगदी काही लेखक मित्रांचाही समावेश आहेत ज्यांनी काही बाबा, बुवा, स्वामी वाटून घेतलेले आहेत, त्यांच्या आयुष्यात काहीही चांगले घडले की ते त्यांच्या कृपेने घडते, वाईट घडणार असेल तर ते त्यांच्या आयूष्यात घडू देत नाहीत असा त्यांचा भाबडा समज आहे. विजयच्या मते ज्याच्या आयुष्यात ज्या ज्या वेळी जे जे घडायचे आहे तेच घडते त्यात कोणताही बदल होत नाही अथवा कोणाला करता येत नाही... माणसाची आस्तिकता नास्तिकता ती ही प्रत्येक माणसाच्या आयुष्यात ठरल्याप्रमाणेच असते. काही आस्तिक लोक त्यांच्या आयुष्यात संकटे आल्यावर नास्तिक होतात तर काही नास्तिक आस्तिक होतात. विजय आस्तिक आहे आणि आयुष्यभर आस्तिकच राहणार कारण त्याला माहीत आहे. त्याच्या आयुष्यात येणार्या – जाणार्या सुख- दु:खांना देव नाही तर मीच जबाबदार आहे. त्यामुळे विजय त्याच्या आयुष्यात घडणार्या चांगल्या – वाईट गोष्टींसाठी देवाला जबाबदार धरत नाही. त्यामुळे देवाच्या अस्तित्वाबद्दल त्याच्या मनात कधीच शंकाच निर्माण होत नाही. आता विजयचे लग्न झाले नाही म्हणजे त्याला ते करण्याची इच्छाच नाही. तो त्याच्या नियतीचाच एक भाग आहे असे तो मानतो, त्यालाही तो देवाला जबाबदार धरत नाही. देवाने तुम्हाला या धरतीवर संसार करण्यासाठी जन्माला घातलेले नाही तर सर्व मोहपाशातून मुक्त होण्यासाठी जन्माला घातलेला आहे. हे सामान्य माणसांच्या कधी लक्षातच येत नाही.
विजय संध्याकाळी त्याच्या दुकानाबाहेर त्याच्या एका अविवाहीत मित्राशी बोलत असताना त्याच्या इमारतीतील त्याच्या बाबांच्या ओळखीचे एक गृहस्थ त्यांच्या जवळ आले आणि कारण नसताना बोलायला सुरुवात करत त्याला म्हणाले ,’’ तुझे अजून लग्न झालेले नाही याचे मला खूप वाईट वाटते. विजय त्या मानसासोबत त्या विषयावर बोलणे टाळत त्याच्या मित्राशी वेगळ्या विषयावर बोलत बोलत पुढे निघून गेला. त्यावर त्याचा मित्र त्याला म्हणाला ,’’ हा आपली जलवायला आला होता का ? त्यावर विजय शांतपणे त्याला म्हणाला,’’ ह्या माणसाला मी फक्त कोणाचा मुलगा आहे हे माहीत आहे पण मी कोण आहे ? ते माहीत नाही म्हणून त्याने ह्या विषयावर माझ्याशी बोलण्याची हिंमत केली. लग्न ही प्रत्येकाची व्यक्तीगत बाब आहे. माझ्या आयुष्यात किती स्त्रिया येऊन गेल्या हे या माणसाला माहीत आहे का ? माझे लग्न झाले नाही म्हणजे ! मी ते केले नाही ! हे ह्या मुर्खाला कोण सांगणार ? एक सामान्य रिक्षावाला, सुमार बुद्धीचा माणूस माझ्या सारख्या एका विचारवंताचे लग्न झालेले नाही म्हणून दु:ख व्यक्त करणार ? यालाच अज्ञान म्हणतात. त्या माणसाशी मी या विषयावर चर्चा करावी इतकीही त्याची बौद्धिक क्षमता नाही. त्यामुळेच मी त्याच्यासोबत या विषयावर एक वाक्यही बोलणे टाळले. कदाचित त्याला आता तो त्याचा आपमान वाटला असेल पण आपण ज्या माणसाला नीट ओळखत नाही अशा माणसासोबत त्याच्या खाजगी विषयावर संवाद साधने यासारखा दुसरा गाढवपणा नाही. या विषयावर विजय त्याला काही बोलला असता तरी त्याचा अपमानच झाला असता. हे लोक कोणत्या जगात राहतात ? जेथे त्यांना लग्न हेच सर्वकाही वाटते. या जगात अशी ही काही लोकं असू शकतात ज्यांच्या आयुष्यात लग्न या गोष्टीला अजिबात थारा नाही. हे ह्या अशा लोकांच्या गावातच नसते. विजयकडे पाहता एकूणच त्याचे दिसणे पाहता त्याचे लग्न झालेले नसेल ! हे त्याने सांगितल्या खेरीज कोणाला कळतच नाही. बहुतेक लोक त्याला तुझे लग्न झालेले आहे का ? असा प्रश्न विचारात नाही ! तर असा प्रश्न विचारतात की तुला मुलं किती आहेत ? म्हणजे लग्न न झाल्यामुळे दु:खी असणार्या माणसाच्या चेहर्यावर जे भाव असतात ते भाव विजयच्या चेहर्यावर कोणाला कधीच दिसत नाहीत. अविवाहीत माणसाच्या वागण्यातील कोणतेच विचित्र बदल त्याच्या वागण्यात लोकांना दिसत नाही कारण सध्यातरी अविवाहीत राहणे हे त्याच्यावर कोणी लादलेले नाही तर त्याने ते त्याच्या स्वच्छेने स्विकारले आहे. त्याने विवाह करण्याचा निर्णय घेतला तरी तो वयाच्या कोणत्या टप्प्यात आणि कोणासोबत करावा ह्याचे स्वातंत्र ही त्याने त्याच्यासाठी अबादीत ठेवलेले आहे. ह्या विषयावर कोणाचीही बोलती तो एका वाक्यात बंद करू शकतो पण त्याला ती करण्यातही आपला वेळ आणि बुद्धी खर्च करायची नसते. सामान्य माणसांना हे कळत नाही,’’ सामान्य माणसांच्या दृष्टीतील समस्या ह्या त्याच्यासाठी समस्या नाहीत, तो त्या समस्या मानतच नाही, कारण त्या समस्यांच्या मुळाशी असणार्या गोष्टीवर त्याने विजय मिळविलेला आहे. ती गोष्ट म्हणजे मोह ! त्याने मोहावर विजय मिळविल्यामुळेच त्याच्यासाठी आता काहीच मिळविण्यासारखे शिल्लक राहिलेले नाही.
सामान्य माणसाच्या सामान्य बुद्धीने त्याच्या आयुष्याचा विचार करणार्या सामान्य माणसाला कधी कळूच शकत नाही त्याचे जगावेगळे आयुष्य...
विजयला मुंबईतील एका दिवाळीअंकाच्या प्रदर्शनाच्या कार्यक्रमाला आमंत्रण असल्यामुळे जायचे होते. कार्यक्रम संध्याकाळी 7.00 वाजता सुरु होणार होता. त्यामुळे विजय छान तयार होवून संध्याकाळी 5.00 वाजता घरातून बाहेर पडला. कधी – कधी त्याला सायकल सोडून इतर वाहने चालविता येत नाही याचे फार वाईट वाटते. त्यामुळे त्याला नेहमी सार्वजनिक वाहनांवर अवलंबून राहावे लागते. कार्यक्रम स्थळ बसने प्रवास केल्यास तास- दिडतासाच्या अंतरावर होते. त्यामुळे बस वेळेवर भेटल्यास तो कार्यक्रम सुरु होण्यापुर्वीच कार्यक्रम स्थळी पोहचणार होता. पण तो ज्या बसची वाट पाहात उभा होता ती बस तास दिड तास झाला तरी आली नाही. त्यामुळे त्याने दुसर्या बसने जाण्याचा निर्णय घेतला पण ती ही आली नाही त्यात आणखी आर्धा तास वाया गेला. त्याला बसस्टॉपवरच 7.00 वाजले. त्यामुळे त्याने माघारी फिरण्याचा निर्णय घेतला आणि तो थोडा मागे गेला इतक्यात त्याला हवी होती ती बस आली. पण ती पकडाला तो जाणार इतक्यात ती ही सुरु झाली. त्यामुळे त्याने स्वत:लाच दोन चार शिव्या घातल्या कारण तो दोन तास तेथे उभा होता अजून दोन मिनिटे तेथेच उभा राहिला असता तर त्याला ती बस पकडता आली असती आणि निदान कार्यक्रम संपता संपता तरी त्याला पोहचता आले असते. त्यानंतर मात्र त्याने असा विचार केला की हा कार्यक्रम आपल्या नशिबातच नाही आणि तो माघारी घरी फिरला. यावरून त्याने नव्याने बोध घेतला ज्या कार्यक्रमाला वेळेत पोहचायचे असेल त्या कार्यक्रमाला बसने जायचे नाही. जायचेच असेल तर पहिली भेटेल ती बस पकडून टप्प्या टप्प्याचा प्रवास करावा. विजयने तसे केले असते तर तो वेळेत कार्यक्रमाला पोहचला असता. थोडा त्रास वाचविण्याच्या नादात त्याने एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलेले नव्हते. त्या कार्यक्रमाच्या आयोजकांना त्याने मी कार्यक्रमाला येतो असे सांगितले होते. त्यांनाही असेच वाटले असेल ना ! हा माणूस दिलेला शब्द पाळत नाही म्हणून... कोणत्याही कार्यक्रमाला तो कार्यक्रम सुरु होण्यापुर्वी जायला विजयला आवडते. त्यामुळेच त्याने याबाबतीत आयोजकांना फोन कारणे टाळले पण दुसर्या दिवशी फोन करून न चुकता त्याने माफी ही मागितली. त्यांना कार्यक्रमाला न येण्याची कारणे देण्यात काही अर्थ नव्हता.
त्याच्या दुसर्या दिवशी विजय संगणकावर बसलेला असताना त्याच्या एक ओळखीचे गृहस्थ त्याला भेटायला आले. त्यांचे विजयकडे काहीतरे काम होते. काय काम आहे ? असे विचारले असता ते म्हणाले,’’ मुलाच्या लग्नासाठी जे परिचय पत्र तयार केलेले आहे त्यात त्याचे वय तीन वर्षाने कमी करायचे आहे. हे ऐकल्यावर विजयला खरे तर प्रचंड राग आला होता पण तो स्वत:च्या रागाला आवर घालत म्हणाला, ‘’ त्याने काय होणार आहे ? आज ना उद्या समोरच्यांना ते कळणारच आहे कारण हल्ली प्रत्येक ओळख पत्रावर जन्म तारीख असते, ते जाऊद्या त्यांनी जन्मकुंडली मागीतल्यावर काय कराल ? ती ही खोटी बनवून देणार ? त्यावर ते गृहस्थ म्हणाले,’’ आम्ही त्याची जन्मकुंडळी काढलेलीच नाही. त्याची म्हणे सासू आणि मेव्हणी गावावरून त्याच्या घरी आल्या होत्या त्यांनी हे उपधव्याप करायला सांगितेले, वास्तवात आता त्या मुलाचे वय 34 वर्षे आहे ते त्यांना मुलीकडच्यांना 31 दाखवायचे आहे. ते तसे केल्याने काही फरक पडत नाही... लग्न काय हल्ली कोणत्याही वयात होतात, कोणत्याही वयात केली तरी चालतात, विजय तसा लोकांना खूपच मदत करणारा साधाभोळा वाटतो पण चुकीच्या गोष्टी कोणी त्याला करायला सांगितले की त्याचे डोके मात्र फिरते. त्या समोरच्या गृहस्थालाही एका क्षणाला वाटले झक मारली आणि हे काम करायला ह्याच्याकडे घेऊन आलो. त्या मुलाला लग्न करण्यात फारसा रस नव्हता. पण त्याच्या घरचे त्याने लग्न करावे म्हणून त्याच्या मागे हात धुवून लागलेले होते. विजयला त्या माणसासोबत त्या विषयावर आता अजिबात बोलायचे नव्हते त्यामुळे त्याने संगणकावर त्याने आणलेला फाईलमध्ये फक्त साल बदलून दिले आणि त्याला मोकळे केले त्याचे त्याने पैसेही घेतले नाही. विजयला हे चुकीचे आहे असे करू नका असे खूप सांगावेसे वाटत होते, पण मुर्खांशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो. विजयचा ज्योतिषाचा थोडा अभ्यास असल्यामुळे त्या मुलाची जन्मकुंडळी तयार करून त्याने पाहिली असता त्याच्या लक्षात आले, सहा महिन्यांनंतर त्याच्या पत्रिकेत लग्नाचे योग आहेत, पण त्याचे लग्न झाले तरी ते त्याच्यासाठी फार लाभदायक ठरणार नाही आणि जर ते अशा फसवेगिरीच्या पायावर उभे असेल तर ते टिकणारही नाही.... विजय त्या गृहस्थाला या बाबतीत योग्य सल्ला देऊ शकला असता पण आता ते त्याला करायचे नव्हते, विजसारखा एक योग्य माणूस त्या व्यक्तीच्या ओळखीचा असतानाही त्याने चुकीच्या गोष्टीत त्याची मदत घेतली, त्याची शिक्षा म्हणून विजयने त्याला सल्ला दिला नाही. विजयला कळत नाही माणसे आजही सर्व काही आपल्याच हातात आहे या भ्रमात का जगत असतात. माणसाने काही नाही ! सर्वच गोष्टी वेळेवर सोडायला हव्यात म्हणजे त्यांच्यावर मनस्ताप आणि आत्महत्या दोन्ही करण्याची वेळ येत नाही. त्या गृहस्थाला असे वाटले असेल विजयला कदाचित त्याचे लग्न न झाल्याचे दु:ख असेल, त्यामुळे तो माझ्या मुलाचे दु:ख समजून घेईल, पण त्या माणसाची परिस्थिती त्या चालत्या गाडीखाली धावणार्या कुत्र्यासारखी झालेली होती ज्याला वाटत असते की ती गाडी तोच चालवत आहे. त्याच्या मुलाला लग्नच कारायचे नव्हते पण काहीही करून ह्याला त्याचे लग्न लावायचे होते... त्याचे लग्न होत नव्हते म्हणून त्याच्या बहिणीचे लग्न लटकले होते कारण त्याच्या बहिणीला त्याचे लग्न झाल्यावर लग्न करायचे होते. तिचे लग्न तिने लटकविण्यात काय अर्थ होता ? त्याचे तो पाहील ! तिने तिचा विचार करणे योग्य झाले असते कारण त्याचा त्याचा असा विचार तो करून झालेला आहे. हे जग कोणासाठीही थांबत नसते त्यामुळे आपण कोणासाठी थांबायचे नाही आणि कोणाला आपल्यासाठी थांबायला लावायचे नाही. त्यामुळेच विजयच्या मनात लग्न करण्याबाबत पुर्वीपासूनच संभ्रम असल्यामुळे त्याने त्याच्या लहान भावा – बहिणीचे लग्न वेळेतच होऊ दिले. आज ते त्यांच्या संसारात सुखी आहेत आणि विजय त्याच्या आयुष्यात सुखी आहे. विजय आता त्याच्या संसारात ढवळाढवळ करीत नाही आणि त्यांना त्याच्याही आयुष्यात ढवळाढवळ करू देत नाही.
बरेच लोक आपल्याला स्वत:पेक्षा जगाची चिंता जास्त आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करतात. पण वास्तवात त्यांना फक्त स्वत:चीच चिंता असते. लग्नासाठी गरज नसताना मागची पिढी सध्याच्या पिढीच्या मागे लागलेली असते. त्यामागे कारण काय ? तर म्हणे वंश वाढावा... कित्येकांचे स्वत:चेच खायचे वांदे आहेत आणि त्यांना आपला वंश वाढवायचा असतो , कशाला ? ते त्यांचे त्यांनाच माहीत नसते. वंश तर सहज वाढतो, पण त्या वाढलेल्या वंशाला आपण एक उत्तम भविष्य देऊ शकू का याचा विचार कोण करणार ? विजयच्या भावा बहिणीला प्रत्येकी दोन दोन मुलं आहेत त्यामुळे त्यांचा वंश वाढलेला आहे तो अजून वाढवायची त्याला गरज वाटत नाही. मागच्या वर्षात त्याने एका आजारावर विजय मिळविला होता. पायाच्या वाढलेल्या हाडामुळे होणारा त्रास त्याने फक्त व्यायाम करून दूर केलेला होता. पायाच्या त्रासामुळे आपला वेळ वाया जावू नये म्हणून त्याने दुकानात बसणे स्विकारले होते, हे सत्य जगाला माहीत नाही, त्याला त्याचा वेळ वाया घालवायला अजिबात आवडत नाही. त्याला त्याच्या कामाचा योग्य मोबदला नाही मिळाला तरी त्याला चालतो पण त्याला त्याचा वेळ वाया गेलेला नाही चालत. फार काही नसेल तर निदान त्याला त्याचा वेळ टी.व्ही. वरील मालिका पाहून तरी सार्थकी लावायचा असतो. तो त्या मालिकाही ह्यासाठी पाहतो की भविष्यात जर त्याच्यावर असे काही लिहिण्याची वेळ आली तर त्याला ते जमायला हवे ! निदान त्याला तसा प्रयत्न तरी करता यायला हवा !
नवीन वर्षाचा संकल्प काय बरं करावा या विचारात असताना विजयच्या डोळ्यासमोर दोनच गोष्टी आल्या त्यातील एक गोष्ट म्हणजे पोट कमी करणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे रमी खेळायला शिकणे, पोट कमी झाले काय किंवा नाही झाले काय ? त्याने त्याला काही फरक पडत नाही कारण आता काही त्याला पोरी पटवायच्या नाहीत, तसेही हल्ली पोट मोठे असणारे पुरुष म्हणे बायकांना आवडायला लागले आहेत, फेसबुकवर काही रिलही आहेत त्यावर ! रमी मात्र खेळायला त्याला शिकायचेच आहे कारण ऑनलाईन रमी खेळून खूप लोक लखपती – करोडपती वगैरे झालेले आहेत, त्यात अगदी प्रसिद्ध अभिनेत्यांचा आणि अभिनेत्रींचाही समावेश आहे, हल्ली म्हणे ते अभिनय सोडून रमीच खेळत असतात, त्यामुळे विजयनेही लेखन सोडून रमी खेळण्याचा निर्णय घेतलेला होता, पण त्याला पत्त्यातील नेमके रमी सोडून इतर सर्व खेळ खेळता येतात, त्यामुळेच त्याने ह्या नवीन वर्षात रमी खेळायला शिकण्याचा संकल्प सोडलेला होता . त्याला रमीला जुगार म्हणण्याचीही आता लाज वाटायला लागलेली आहे कारण ती खेळण्यास लोकांना प्रवृत्त करणार्यां लोकांना समाज हिताची किती काळजी आहे ! म्हणजे निदान तशी त्यांनी दाखविलेली तरी होती, विजयलाही रमी खेळून खूप पैसे कमवायचे होते आणि जगाच्या कल्याणासाठी काहीतरी भरीव कार्य करायचे होते. विजय त्याच्या लहानपणी म्हणजे सातवी आठवीला असताना तीन पत्ते खेळायचा त्याच्या मित्रांसोबत, तेंव्हा डावावर ते गोट्या लावायचे, विजयकडे 5 लिटरचा कॅन गोट्यांनी भरलेला होता, पण दुर्दैवाने त्याच्या त्या मित्रांपैकी एकही अजून ऑनलाईन रमी खेळून लखपतीही वगैरे झालेला नाही. त्यामुळे ती जबाबदारी विजयने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला. त्यात ऑनलाईन खेळल्यामुळे कोणाला कळणारही नाही, आणि कोणी त्याला जुगारीही म्हणणार नाही, मागच्या वर्षातील त्याला सर्वाधिक खटकणारी गोष्ट म्हणजे लोकांना ऑनलाईन रमी खेळण्यास प्रवृत्त करणार्या प्रसिद्ध लोकांच्या जाहिराती... ! वास्तावात हे लोक रमी खेळत असतील का ? तर नाही ! त्यांना रस आहे तो ह्या अशा जाहिराती करून फक्त आणि फक्त पैसे कमाविण्यात, या अशा जाहिराती करण्याचे त्यांचे कारणही स्पष्ट असते,’’ आम्ही नाही केल्या तर दुसरा कोणी तरी करेल... रमी हा ही एक प्रकाराचा जुगारच पण ह्या मोठ्या कलाकारांनी ऑनलाईन रमी खेळण्याच्या जाहिराती केल्यामुळे लोकांना आता रमी खेळणे हे प्रतिष्ठेचे वाटू लागलेले आहे. आता बेरोजगार तरुण काम नसताना कोणाकडून उसने पैसे घेऊन अधिकचे पैसे कमाविण्याच्या नादात ऑनलाईन रमी खेळून आणखी कर्जबाजारी होतील, एका क्षणाला त्यांच्या डोक्यात आत्महत्तेचा विचार येण्याची शक्यताही नाकारता येत नाही, एक वेळ माणसाला दारुचा नाद लागला तरी परवडतो पण जुगाराचा परवडत नाही. दारू पिणारा एका मर्यादे पलिकडे दारू पिऊ शकत नाही, पण जुगारात माणूस आयुष्यभराची कमाई गमावून बसू शकतो, जुगारच खेळायचा असेल तर लोकांनी शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणे योग्य होणार नाही का ? विजयला असा सहज मेहनत न करता मिळणारा पैसा कधीच नको होता, आजही नको आहे, पण पैसाच पैशाला खेचतो पण जर तो योग्य ठिकाणी गुंतवला तर ! त्यामुळे शेअर मार्केट मध्ये कशी गुंतवणूक होते वगैरे शिकण्यासाठी त्याने नवीन वर्षात त्याच्याकडील 1000 रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतविले, त्याचा एका वाक्यावर प्रचंड विश्वास आहे , ते वाक्य म्हणजे,’’ जेंव्हा काहीच मिळत नाही तेंव्हा मिळतो तो अनुभव ! त्या अनुभवासाठी त्याची 1000 रुपये गमावण्याचीही तयारी केलेली आहे. विजयचे आयुष्य कसे ही असले तरी त्याचा नशिबावर प्रचंड विश्वास आहे. आपल्या नशिबात जे आहे आणि जितके आहे तितकेच आपल्याला मिळते ते ही ते मिळण्याची योग्य वेळ आल्यावरच ! त्यामुळे हल्ली विजय कोणतीच गोष्ट मिळविण्यासाठी अट्टहास करीत नाही, याचा अर्थ तो प्रयत्नही करत नाही असे नाही, प्रयत्न करूनही एखादी गोष्ट नाही मिळाली तर तो निराश होत नाही. ती गोष्ट आपल्या नशिबात नाही असे म्हणून सोडून देतो. ती गोष्ट मिळविण्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करून आपला वेळ वाया घालवित नाही. या सृष्टीचा एक नियम त्याने चांगला आत्मसात केलेला आहे तो म्हणजे,’’ आज जे तुमचे आहे ते काल दुसर्या कोणाचे तरी होते, आज जे तुमचे आहे ते भविष्यात दुसर्या कोणाचे तरी होणार आहे. त्यामुळे काही मिळविण्यासाठी आपण दु:ख, हाल- अपेष्ठा सहन करणे त्याला पटत नाही. त्याला त्याच्या नशिबाने सहज मिळणार्या गोष्टीच मिळवायला आवडतात. त्यामुळेच त्याचे जगणे हे सामान्य माणसांपेक्षा वेगळे आहे. नवीन वर्षाचे भविष्य वर्तविताना काही ज्योतिष्यांनी हे वर्षे नैसर्गिक संकटाने भरलेले असेल असे भाकित केलेले आहे. नवीन वर्षाच्या दोन – दिवसातच अनेक अपघातांच्या बातम्या वाचनात आल्यावर ते खरे आहे की काय अशी भिती विजयच्या मनात निर्माण झाली. नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या दोन –चार दिवसात तरी विजयच्या हाताला काही खास काम लागलेले नव्हते. देवाच्या कृपेने म्हणा अथवा नशिबाने अजूनतरी त्याची आर्थिक गणिते व्यवस्थित जुळून येत आहेत, ती गणिते जुळवायची असल्यामुळेच त्याला त्याच्या खर्चांला आवर घालावा लागत आहे, म्हणजे त्याला नवीन कपडे, बुट विकत घेता येत नाहीत, त्याला मित्रांसोबत कोठे पिकनिकला जाता येत नाही, कोणासोबत हॉटेलात जेवायला जाणे शक्य होत नाही. थेटरमध्ये जाऊन चित्रपट पाहणे ते ही हल्ली त्याला परवडत नाही, हल्ली त्याला वाचणे आणि पाहणे हे दोनच छंद परवडतात, नवीन वर्षाचा पहिला संकल्प मात्र त्याने मनावर घेतला आणि त्याने रोज सकाळी थोडा थोडा व्यायाम करायला सुरुवात केली. थंडीच्या दिवसात व्यायाम केलेला म्हणे आरोग्यासाठी उत्तम असतो असे त्याने कोठे तरी वाचले होते. त्यामुळे नियमित व्यायाम करणे त्याने फारच मनावर घेतले होते पण तो दुसरा संकल्प रमी खेळायला शिकण्याचा तो मात्र त्याने सुरुवातीलाच सोडून दिला कारण महाभारत त्याच्या मेंदुत भिनलेले आहे, कलियुगातील माणसांनी महाभारतातून निदान जुगार न खेळण्याचा बोध तरी घ्यायला हवा होता, द्रोपदीला वाचवायला निदान श्रीकृष्ण तरी आले होते, ह्या ऑनलाईन रामी खेळल्यामुळे ज्यांचे ज्यांचे वस्त्रहरण होणार आहे त्यांना वाचवायला कोण येणार ? कोणीच येणार नाही ! हे ऑनलाईन रमीची जाहिरात करणारे तर अजिबातच येणार नाही. आज पैशापुढे माणसाला आपल्या सामाजिक जबाबदारीचे भान राहिलेले नाही, आज चित्रपटाने काय सामाजिक संदेश दिला यापेक्षा त्या चित्रपटात कोणी किती कपडे उतरवले यावर प्रसारमाध्यमात अधिक चर्चा होताना दिसते. हल्ली कोणालाही समाज हिताची कामे करून प्रसिद्धी मिळवायची नाही तर फक्त प्रसिद्धी मिळवायची आहे. विजयला ही अशी कपडे उतरविणारी प्रसिद्धी कधीच नको होती, त्यामुळेच त्याला झेपेल तेवढेच तो समाजासाठी करत आला, आता कदाचित समाजाला समजासाठी काही भरीव काम कारणार्यांची गरज उरलेली नाही. आज सोशल मिडीयावर रिल्सच्या नावाखाली जे काही व्हिडिओ तयार केले जात आहेत... त्यातील बहुसंख्य अश्लिलतेकडे झुकणारे आहेत... पण बघणारे आहेत म्हणून दाखविणारे आहेत, त्यामुळे विजय या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, आता कोणाला सुधारण्याचे आणि चार चांगल्या गोष्टी सांगण्याचे दिवस राहिलेले नाहीत, ते काम काही बुवा – बाबांनी हातात घेतलेले आहे, विजय सध्या जरी ब्रम्हचारी असला तरी त्याला बाबा मात्र बनायचे नाही, हे कलियुग आहे येथे बाबांची बुद्धी भ्रष्ट व्हायलाही वेळ लागत नाही, त्यामुळेच काही बाबा जेलची हवा खात आहेत. फारपूर्वी विजयने समाजासाठी काहीतरी करावे म्हणून राजकारणात जाण्याचा निर्णय घेतलेला होता, पण नंतर लक्षात आले, राजकाराणात जाण्यापूर्वी अभिनेताही व्हावे लागते, जवळ - जवळ सर्वच राजकारण्यांनाआम्हाला समाजाची किती काळजी आहे हे दाखविण्याचा अभिनय सतत करत राहावा लागतो, विजयचे बरेच मित्र राजकारणात आहेत, पण त्यातील कोणीच समाजकारण करताना दिसत नाहीत, सारेच अर्थकारणात गुंतलेले आहेत, राजकारण आणि समाजकारणाचा जितका संबंध येतो त्यापेक्षा जास्त संबंध राजकारण आणि अर्थकारण यांचा येतो. त्यामुळे विजयने राजकारणापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला… म्हणून तो राजकारणाची शिकार होणार नाही याची खात्री मात्र त्यालाही देता येणार नाही....
नवीन वर्षातील 14 दिवसही हा ! हा ! म्हणता संपले आणि मकरसंक्रांतीचा दिवस उजाडला. मकरसंक्रांतीच्या दिवशी लोक तीळ गुळ वाटतात आणि समोरच्यांकडून गोड बोलण्याची अपेक्षा करतात, पण विजयला मुळातच विनाकाराण कोणाशी गोड बोलायला जमतच नाही. तसा तो कधी प्रयत्नही करत नाही. त्याचे कोणाशीही बोलणे हे रोखठोक असते त्यामुळे बर्याच लोकांना तो रागीट आणि घमंडी वाटतो, त्यात थोडे तथ्यही आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कोणी कोणावर केलेला अन्याय त्याला सहन होत नाही, त्याची स्वत:कडूनही तशीच अपेक्षा असते की आपल्याकडूनही कोणावर अन्याय होता कामा नये. मकरसंक्रांत असल्यामुळे त्याच्या दुकानासमोर एक पडलेली पतंग त्याला दिसली जी थोडीशी फाटलेली होती ती त्याने उचलली तिला टेप वगैरे लावली, तिची नव्याने कनी बांधली तेथेच पडलेला साधा मांजा, तो नायलॉनचा नाही याची खात्री करून त्याने उचलला आणि पतंगीला बाधूंन पतंग उडवून पाहिली तर ती छान उडाली, जवळ – जवळ दहा एक वर्षाच्या अंतराने त्याने पतंग उडवलेली होती. इतक्यात त्याचा मित्र दिसल्यावर त्याने त्याला पतंग उडवायला बोलावले असता तो म्हणाला,’’ आता म्हातारपणी कोठे पतंग उडवतो आहे ? पतंग़ उडवयालाही काही लोकांनी वयाची मर्यादा ठरवून घेतलेली आहे की काय ? म्हणजे हे असे लोक वयाने म्हातारे होण्यापूर्वीच मनाने म्हातारे झालेले असतात, काही दिवसापूर्वीच त्या मित्राचे वडिल वारले होते त्यामुळे अचानक त्याच्या घराची संपूर्ण जबाबदारी त्याच्या अंगावर येऊन पडली, लवकर लग्न झाल्यामुळे लवकर पोरं झाली ती लवकर मोठी झाली त्यामुळे हा ही लवकर म्हातारा झाला नाही पण स्वत:ला म्हातारा समजू लागाला. विजयचे बालपण थोडे गरीबीत गेलेले असले तरी ते मजेत आनंदात गेलेले होते, त्याची त्याच्या बालपणाकडून कोणतीच तक्रार नाही. काही तक्रार असेल तरे ती तरुणपणाकडूनच आहे... तारुण्यात ज्या गोष्टी करायला हव्या होत्या त्या त्याला करता आल्या नव्हत्या. आता त्या गोष्टी तो करू शकतो पण त्याला आता त्या करायच्या नाहीत, त्या त्याच्या वयाला शोभणार नाहीत म्हणून नाही तर कदाचित त्या आता त्याच्या प्रतिष्ठेला शोभणार नाहीत. तो नेहमीच त्याच्याच मोठेपणाच्या ओझ्याखाली दबत आला. त्याचा लहान चुलत भाऊ 35 वर्षाचा झाला तरी त्याला लग्नासाठी कोणी मुलगी भेटत नाही कारण काय तर त्याचे मुंबईत स्वत:चे घर नाही. तो दिसायला इतका सुंदर आहे की तो पंचवीशीत असताना दहा पोरी लग्नासाठी त्याच्या मागे लागल्या होत्या आणि आता त्याला लग्नासाठी पोरगी शोधावी लागत आहे ते ही तडजोड करून, तो त्या दहा पैकी एका मुलीशी लग्न करून सुखी झाला असता पण मोठ्या भावाचे लग्न झाल्याखेरीज लग्न करायचे नाही या मतावर ठाम राहिला आणि फसला, आता मात्र त्याला लग्नासाठी तडजोड करावी लागत आहे... तरी कोणी त्याच्या तोलामोलाची मुलगी भेटत नाही. तो पस्तीशीतही सुंदर दिसत असल्यामुळे त्याच्या सोबत लग्न करायला तयार असणारी बत्तीशीतील मुलगी ही तितकी सुंदर दिसायला हवी ना ? ते सोडा पण सुंदर दिसणारी मुलगी बत्तीशीपर्यत लग्न करायची का राहिली ? हा नवीन प्रश्न निर्माण होतोच ! त्यातून निर्माण होणार्या अनेक उपप्रश्नांचा विचार न केलेलाच बरा... त्यात हल्ली मुलींना आपल्यापेक्षा वयाने दोन वर्षांनी लहान , समवयस्क किंवा आपल्यापेक्षा वयाने लहान असणारा पुरुषही चालतो... ज्यामुळे हल्ली लग्नाचे उलटून गेलेल्या पुरुषांकडे प्रेमविवाह करण्याखेरीज पर्याय नाही. ठरवून केलेल्या लग्नात त्यांचा तोटाच होणार... त्यापेक्षा त्यांनी अविवाहीत राहण्यातच त्यांचा जास्त फायदा आहे.
विजयच्या एका मित्राचा भाव जो त्याच्याच इमारतीतच राहतो अचानक त्याला भेटायला त्याच्या दुकानात आला, तो त्याच्या दुकानात त्याला भेटायला आला म्हणजे नक्कीच उसने पैसे मागायला आला असेल हे विजयने ताबडतोब हेरले, त्याप्रमाणे त्याने विजयकडे 500 रुपये उसने मागितले, त्यावेळी विजयच्या खिशात अवघे 150 रुपये होते, तो दुकानातील पैसे कोणालाही असेच उचलून कधीच देत नाही. त्यामुळे तो त्या मित्राच्या भावाला स्पष्ट बोलला माझ्याकडे सध्या फक्त 100 रुपये आहेत ते हवे तर देतो, त्याने त्याच्याकडून ते 100 रुपये घेतले आणि तो निघून गेला, त्याची आई – वडील दोघेही काही दिवसांपूर्वी वारलेले होते, तो घरात एकटाच राहतो अविवाहीत असल्यामुळे, त्यात त्याच्या नोकरीचे ही काही बरे चाललेले नव्हते, त्याला दारू पिण्याचे व्यसन होते, तो जवळ जवळ रोज दारू पितो, दारू प्यायला आणि हॉटेलात खायला त्याला पैसे लागत असणार ते त्याच्याकडे नसणार त्यामुळेच तो उसने पैसे मागायला आला, पण विजयला त्याच्याकडील पैसे कोणालाही दारू प्यायला देणे त्याच्या तत्वात बसत नाही, त्यामुळे खरेतर तो त्याला ते 100 रुपये पण देणारच नव्हता पण त्याने मनात विचार केला ह्याला खायला पैसे हवे असतील तर ? त्याने पैसे कशाला हवेत याचे कारण दिले नाही, विजयने त्याला कारण विचारले नाही, तो जर दारुड्या नसता तर नक्कीच त्याने कारण विचारले असते आणि शक्यतो त्याने मागीतलेले 500 रुपये त्याने त्याला दिलेच असते. विजयला पैशाच्या बाबतीतच नव्हे कोणत्याही बाबतीत त्याच्याकडे मदत मागायला आलेल्या माणसाला नाही ! बोलायला जीवावर येते. त्या मित्राचे वडील दारूच्या अती व्यसनामुळेच गेले, पण आजची तरुण पिढी दुर्दैवाने मागच्याच्या चुकातून काही बोध घेताना दिसत नाही. आता त्याला माहीत आहे आपण दारू पिऊन आजारी पडलो तर आपली काळजी घ्यायला कोणीच नाही, आताच आपण दारूसाठी लोकांकडे हात पसरत आहोत, उद्या आपल्याला आर्थिक हात देणारा कोणी भेटणार आहे का ? आपल्याला फक्त मागायची सवय लागलेली आहे, देण्याची आपल्याला सवयच नाही, आपली देवाण – घेवाण होते ती ही फक्त दारुच्या बाबतीत, विजयच्या मते दारूसाठी जे मित्र होतात ते कधीही कोणाचे खरे मित्र नसतात, त्याच्या त्या दारुड्या मित्रापैकी एकात जरी त्याला आर्थिक मदत करण्याची क्षमता असती तर तो विजयकडे पैसे मागायला आला नसता, आता त्या 100 रुपयाचे त्याने काय केले ते त्या देवाला आणि त्यालाच ठावूक ! विजयने त्याला त्याने मागितले तेवढे पैसे जर आज दिले असते तर तो पुन्हा पैसे मागण्यासाठी त्याच्यासमोर उभा राहिला असता जे त्याला नको होते.
काल त्याच्या एका मित्राचा दारुच्या नशेत बाईक चालवत असताना बाईक स्लीप होऊन अपघात झाला, सुदैवाने त्याच्या गाडीला आणि त्यालाही फार काही झाले नाही. पण फार काही होऊही शकले असते. पण इतके होऊनही आता यापुढे तो दारू पिऊन बाईक चालविणार नाही असे होणार नाही. काही लोक त्यांच्या आयुष्यात घडलेल्या कोणत्याच घटनेतून कोणताच बोध घेत नाहीत. पण विजय मात्र त्याच्या आयुष्यातच नव्हे तर आजुबाजुच्या लोकांच्या आयुष्यात घडणार्या घटनांतूनही बोध घेण्याचा प्रयत्न करतो ज्यामुळे कदाचित त्याचे आयुष्य जगापेक्षा वेगळे आहे. तो लहान असतानाच आजुबाजुच्या दारुड्या लोकांना पाहून कधीही दारुच्या थेंबालाही स्पर्ष करायचा नाही हा बोध घेतला, पण तो एकटा सोडून आजुबाजुच्या एकानेही असा बोध मात्र घेतला नाही, एकमेकांवर प्रेम नसतानाही फक्त लग्न झाले आहे म्हणून एकमेकांसोबत नाईलाजाने आयुष्य रेटणारे स्त्री- पुरुष त्याने पाहिले तेंव्हाच त्याच्यावर अशी वेळ येऊ नये असे त्याला वाटून गेले आणि तो लग्न करणे टाळत राहिला कारण त्याच्या आयुष्यात त्याला अशी स्त्री कधीच नको होती जी त्याच्यासोबत आनंदाने आणि प्रेमाने आयुष्य जगणार नव्हती तर आयुष्य रेटणार होती. त्याला त्याच्या आयुष्यात कोणतेच नाते ओझे म्हणून वाहायचे नव्हते, त्यामुळे तो जी नाती मानतो ती नाती तो कालही आनंदाने निभावत होता आणि आजही आनंदाने निभावत आहे. आपल्याला किती ही त्रास झाला तरी चालेल पण आपल्यामुळे इतरांना त्रास झालेला त्याला आवडत नाही पण कदाचित काही लोकांचा जन्मच कदाचित इतरांना त्रास देण्यासाठी झालेला असतो, असा एक लोकांना त्रास देणारा माणूस त्याच्या राशीलाही आलेला आहे त्याच्याशी नक्की कसे वागावे आणि त्याच्याशी कोणत्या भाषेत बोलावे तेच त्याला कळत नाही.
विजयच्या इमारतीत त्याच्या वरच्या मजल्यावर राहणारा गृहस्थ त्याच्या घरातून विजयच्या घरात पाण्याचे लिकेज होत असतानाही मागील वर्षभर त्याला सांगुनही ते लिकेज काढण्याचे नाव घेत नाही. हाच लिकेज जर त्या माणसाच्या वरच्या मजल्यावरून त्याच्या घरात झाला असता तर तो गप्प बसला असता का ? नसता बसला, पण विजय गप्प बसला कारण त्याला कोणाला दुखावलेले आवडत नाही, त्यात त्याच्या शब्दांना तलवारी सारखी धार आहे, एकदा त्याच्या तोंडाला लागलेला माणूस पुन्हा त्याच्या तोंडाला लागत नाही. त्यात त्याने कोणाला अद्दल घडविण्याचा निर्णय घेतला तर मग त्याला कोणीही आडवू शकत नाही. त्यावेळी त्याला फक्त कायद्याची भाषा कळते, तो त्याच्या भावना त्यावेळी गुंडाळून ठेवतो. पण आता विजयचा नाईलाज झाल्यामुळे त्याने त्याच्या विरोधातील तक्रार टाईप करुन ठेवलेली आहे. आता फक्त तो योग्य वेळेची वाट पाहात आहे. ती वेळ त्या दिवशी येईल ज्या दिवशी त्याचे डोके फिरलेले असेल. त्याचे काही अशिक्षित नातेवाईक नेहमी तो समोर दिसला आणि चर्चेला काही विषय नसेल तर त्याच्या लग्नाचा विषय काढतात. त्यात ते त्याच्या समोर जो कोणी ओळखीचा असेल त्याला म्हणतात ,’’ ह्याला लग्नासाठी कोणी मुलगी असेल तर पहा ! अशा वेळी विजय त्यांना काही न बोलता तेथून काढता पाय घेतो कारण त्याला मुर्खांशी कोणत्याही विषयावर चर्चा करायला नाही आवडत.
त्याच्या एकाही नातेवाईकाला हे माहीत नाही की त्याला कोणी मुलगी भेटली नाही म्हणून त्याने लग्न केले नाही असे अजिबात नाही, त्याला ठरवून लग्न करायचे नव्हते म्हणून त्याने लग्न केले नाही. त्याला नेहमीच अशा तरूणीशी लग्न करायचे होते जिच्या मनात त्याच्या विचारांबद्दल आदर असेल... त्याला त्याच्या आयुष्यात फक्त पत्नीच्या रुपातील स्त्री कधीच नको होती... पत्नीच्या रुपात त्याला त्याच्या आयुष्यात अशी स्त्री हवी होती जी त्याच्या विचारांचे प्रतिबिंब असेल पण तशी स्त्री त्याच्या आयुष्यात कधीच आली नाही. दुर्दैवाने आता ती येणार नाही आणि आली तरी त्याचा काही उपयोग नाही. त्याला नेहमीच वाटत आले कोणीतरी त्याच्या दिसण्याच्या नाही तर त्याच्या असण्याच्या प्रेमात पडेल , पण तसे काहीच झाले नाही. त्याच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक स्त्रीला फक्त आणि फक्त सुरक्षित भविष्य हवे होते... विजयचे कधीच आपल्या सुरक्षित भविष्याचा विचार केलेला नव्हता. तो ही सामान्य माणसासारखा जगला असता तर आज तो ही विवाहीत असता त्याचाही छान संसार असता, त्या संसारात छान बायको – मुले असती वगैरे वगैरे... पण त्याने नेहमीच जगाच्या कल्याणाचा विचार केला आणि जग त्याच्या कल्याणाचा विचार करत आहे.
एक वर्षापुर्वी पर्यत तो शेवटचा प्रेमात पडला होता. तिचेही लग्न झाले तिला हवी असणारी सर्व सुखसाधने देऊ शकेल अशा पुरुषासोबत ! त्याला वाटले होते की हिला विसरायला आपल्याला खूप वेळ लागेल पण तसे काहीही झाले नाही... तो तिला काही दिवसातच विसरला... पण त्यामुळे त्याला या जगात प्रेम वगैरे असे काही नसते हा धडा मिळाला, सर्व निर्माण होणारी नाती ही स्वार्थावर अथवा भौतिक साधनांवर अवलंबून असतात. त्याला वाईट एकाच गोष्टीचे वाटते त्याने प्रेमाच्या भरोशावर त्याचे अर्धे आयुष्य वाया घालविले. त्यामुळे यापुढे कोणाच्या काय कशाच्याच प्रेमात न पडण्याचा त्याने निर्णय घेतलेला होता. फेसबुकवर त्याच्या वाचण्यात एक वाक्य आले होते... उद्योग तोच माणूस करू शकतो जो निर्लज्य असेल... विजयनेही आता निर्लज्य होण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळेच तो त्याचे सर्व उद्योग सोडून आता त्याच्या बाबांचा उद्योग सांभाळत आहे. आज निर्व्यसनी, स्त्रियांचा आदर करणार्या, त्यांच्या समस्या जाणून घेणार्या पुरुषांच्या आयुष्यात स्त्रिया नाहीत तर, लपडेबाज पुरुषांच्या आयुष्यात खूप स्त्रिया आहेत... विवाहीत पुरुषाच्या आयुष्यात जेंव्हा अनेक स्त्रिया येतात त्यावेळी स्त्रियांचा शत्रू पुरुष नसतो तर स्त्रियांच असतात. समाज हा नेहमीच दुतोंडी असतो ज्यांनी लग्ने नाही केली, त्यांनी लग्न का केली नाही ? ज्यांनी लग्ने केली त्यांना पोरं का झाली नाही ? ज्यांना पोरं झाली तर त्यांचा घटस्फोट का झाला ? ज्यांचा घटस्फोट झाला ते आता आयुष्य कोणासोबत काढणार ? ज्यांची लग्न टिकली आहेत त्यांची पोरं त्यांच्या सोबत का राहात नाहीत ? ज्यांची पोरं सोबत राहात नाहीत त्यांना ते मेल्यावर अग्नी कोण देणार ? त्यांना अग्नी द्यायलाही कोणी नव्हता त्यांचा जन्म वाया गेला... म्हणजे समाजाचे तोंड कोणीच धरू शकत नाही. म्हणजे या समाजातील कोणताच माणूस समाजाच्या अपेक्षा कधीच पुर्ण करू शकत नाही. त्यामुळेच विजय नेहमी तेच करत आला जे त्याच्या सारासार विचार करणार्या बुद्धीला पटले.
विजयाच्या वाचनात अशीच एक बातमी आली की काही महिन्यापूर्वी एका 32 वर्षीय स्त्रीचे एका चाळीस वर्षीय पुरुषासोबत लग्न झाले होते. पण आता तो तिला शारिरिक सुख देत नाही म्हणून त्याच्या विरोधात तिने पोलीसात तक्रार केलेली होती त्या तक्रारीसोबत तिचे असेही म्हणणे होते की त्याने तिच्याशी तिची फसवणूक करून विवाह केलेले होता. त्यावर विजयचे असे म्हणणे होते की जर त्याने तिच्याशी तिची फसवणूक करून लग्न केले असेल तर ती त्याच्या विरोधात तो शारीरेक सुख देत नाही म्हणून तक्रार कशी काय करेल ? असो ! त्यांचे सध्याचे वय, त्यांच्या वयातील अंतर त्यासोबत त्यांचा विवाह हा प्रेमविवाह नाही त्यामुळे अनेक समस्या निर्माण झालेल्या असाव्यात त्यामुळेच तिला त्याच्यासोबतच्या नात्यातून सुटका हवी असणार ! नवरा बायकोत किती वेळा किती काळावधीनंतर कोणत्या परिस्थितीत शारिरिक सबंध यावेत याचे कोणतेही परिमाण नाही. विजयही चाळीशीत असताना एका तीशीच्या स्त्रीच्या प्रेमात पडला होता. पण त्याने त्याचे प्रेम तिच्यासमोर व्यक्त केले नाही कारण तिच्या शारीरीक गरजा तो पुर्ण करू शकेल का याबद्द्ल त्याला खात्री वाटत नव्हती कारण त्याचे कोणत्याची स्त्रीशी शारीरीक संबंध येण्याइतके प्रेमाचे संबंध कधीही निर्माण झालेले नव्हते. त्यामुळे तो त्याच्या आवडत्या स्त्रीवर प्रेम भरभरून करू शकतो, तिला मान- सन्मान, तिला हवी ती सुखेही देऊ शकतो, तिच्या भौतिक गरजाही भागवू शकतो पण पण आजकाल समाजाला जी शारिरिक गरज महत्वाची वाटते ती त्याला कधीच जास्त महत्वाची वाटली नाही. त्यामुळे कोणाच्या शारीरीक गरजेची मर्यादा अथवा आवश्यकता किती असू शकते अथवा असते हे त्याला माहीत नाही. त्यात वयोमानाने त्या क्षमतेवर परिणाम झालेला असतो तो वेगळा ! त्यामूळे एका वयानंतर लग्न करताना निर्माण होणार्या अनेक समस्यांचा विचार करावा लागतो. जो विचार समाज कधीच करत नसतो... समाज फक्त एक पुरुष आणि एक स्त्री यांच्या जोडीचाच विचार करत असतो जी जोडी त्यांनी एकमेकांशी लग्न केल्यामुळे तयार होत असते. आता त्या पुरुषाने सारासार विचार न करता लग्न केल्यामुळे त्याला मनस्ताप सहन करावा लागत असेल... समाजाच्या दबावाला बळी पडून मनात नसतानाही लग्न करण्यासारखा दुसरा गाढवपणा या जगात नसावा कदाचित. या सगळ्या गोष्टींचा विचार करता विजयला आता कोणाच्या प्रेमात पडायचीही भिती वाटते. हल्ली जे तरुण- तरूणी लग्नाअगोदर शारीरीक संबंध ठेवतात आणि नंतर लग्न करतात हे नैतिकतेत बसत नसले तरी कधी – कधी विजयला ते योग्य वाटते. विजयच्या आयुष्यात इतक्या तरूणी आल्या पण कोणासोबतही शारीरीक संबंध ठेवण्याचा विचारही त्याच्या मनात आला नाही, तो आला असता तर कदाचित तो आज एकटा नसता. वास्तवात त्याचा अती विचारी स्वभाव, त्याचा चांगुलपणा, त्याचा एक उत्तम पुरुष होण्याचा ध्यास, त्याच्यात ठासून भरलेली सामाजिक जाणीव, नैतिकतेच्या अवास्तव कल्पना त्यासोबत प्रेम या भावनेबद्दल असणारे भ्रम त्याच्या अविवाहीत असण्याना कारणीभूत ठरलेले होते. आता तो वयाच्या अशा टप्प्यावर होता की त्याने केलेली ती चूक त्याने आता सुधारायचे म्हटले तरी त्याचा काहीही उपयोग नव्हता. आता कोणत्याही स्त्रीला त्याच्या आयुष्यात प्रवेश देणे हे त्याला फारच जोखमीचे वाटते. त्याला त्याचा सुखाचा जीव दु:खात घालण्यासारखे वाटते, सध्यातरी त्याच्या आयुष्यात तशी कोणतीही स्त्री नसतानाही तो प्रचंड आनंदात आहे, त्याला तो आनंद कोणासाठीही गमवायचा नव्हता... अगदी कोणा स्त्री कडून मिळणार्या संभाव्य शारीरीक सुखासाठीही नाही...
विजयच्या वाचनात एक गोष्ट आली की जगात एक अशी ही जमात आहे ज्या जमातीतीतल सर्वात सुंदर मुलगी त्या जमातील ज्या तरुणाचे पोट सर्वात मोठे असेल त्याच्याशी विवाह करते. पण विजय मात्र सध्या त्याचे वाढलेले पोट कमी करण्यासाठी अट्टहास करीत आहे. आज तो त्याच्या दुकानातील माल आणायला गेला असता माघारी येताना त्याने शेअर रिक्षा पकडली तर त्या रिक्षात त्याला दोन अतिशय सुंदर स्त्रियांच्या मध्ये बसावे लागले, कारण त्या दोघींनाही बाहेरची हवा खायची होती. त्या दोघींच्या मधोमध बसल्यामुळे त्याचा मात्र पापड होत होता, कदाचित त्या दोघी त्याला फारच सभ्य गृहस्थ समजत होत्या म्हणजे तसा तो आहेच पण त्याच्या दुर्दैवाने तो सभ्यपणा त्याच्या चेहर्यावर झळकतो. त्या दोन्हीही स्त्रिया बर्यापैकी श्रीमंत घरातील दिसत होत्या, विजयही नक्कीच त्यांना काही कंगाल वगैरे वाटला नसणार ! विजय तसा कधीच कोणाला आर्थिक गरीब वगैरे वाटत नाही. त्याला एक खास कारण आहे ते कारण म्हणजे त्याच्या बोलण्यातील झळकणारा आत्मविश्वास ! तो त्या दोन स्त्रियांच्या मध्ये बसला असल्यामुळे त्याने रिक्षातून उतरेपर्यत आपल्या शरीराची अजिबात हालचाल केली नाही. इतकेच काय ? आपला मोबाईलही खिशातून बाहेर काढला नाही. उलट रिक्षावाल्याकडे पैसे सुट्टे नसल्यामुळे त्यानेच त्याला पाच रुपये जास्तीचेही दिले. खरेतर विजयला असे कोणा अनोळखी स्त्रियांच्या अशा प्रकारे मनात नसातानाही स्पर्श झाल्यास का कोणास जाणे त्याच्या मनात चलबिचल होते. स्त्रियांशी वेगवेगळ्या विषयावर बोलताना, वाद घालताना, चर्चा करताना अथवा तात्विक भांडताना त्याची अशी चलबिचल अजिबात होत नाही कारण त्यावेळी तो स्त्री- पुरुष हा भेद विसरून जातो. पण कोणी स्त्री त्याच्या अंगलट आली की मात्र त्याला घाम फुटतो.
काही दिवसापूर्वी विजयने शेअर बाजारात 500 रुपये गुंतवले होते त्याचे अवघ्या काही दिवसातच 600 रुपये झाले होते. म्हणजे त्याला 20 टक्के फायदा झालेला होता. त्यामुळे तो हळू - हळू शेअर बाजारातील आपली गुंतवणूक वाढविणार होता. आर्थिक गुंतवणुकीचा त्याने पूर्वी कधी फार विचार केला नव्हता पण आता तो त्याचा विचार करू लागला होता कारण आता त्याला त्याच्या भविष्याची तरतुद करून ठेवावी लागणार होती. ती त्याने आता पासूनच करायला सुरुवात केली तर काही तरी त्याचे होईल नाहीतर त्याची अवस्था त्या गोष्टीतील घर बांधणार्या माकडासारखी होईल. त्याने त्याच्या आयुष्याच्या बाबतीत त्याचे त्याचे जे निर्णय घेतले आहेत ते चुकीचे होते असे त्याला कधीही वाटता कामा नको होते. त्याचे महत्व कमी झाले तरी चालेल पण त्याच्या विचारांचे महत्व कमी होणे त्याला कदापी मान्य नव्हते.
विजयच्या वाचनात आणखी एक धक्कादायक बातमी आली होती ती बातमी अशी होती की लहान मुलांना किर्तन शिकविणार्या संस्थेच्या संचालकाने संस्थेतील काही मुलांवर लैंगिक अत्याचार केले होते. आता लहान मुलांना आध्यात्मिक धडे देणार्या लोकांकडूनच अशी घृणास्पद कृत्य होणार असतील तर काय बोलणार ? हल्ली आपल्या समाजात कोणत्याही क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती भरोशाची राहिलेले नाही. त्यामुळे कोणत्याही माणसावर त्याचे क्षेत्र आणि पद पाहून भरोसा ठेवणे हे हल्ली धोकादायक झालेले आहे. पालकांनी मुलांच्या बाबतीत हल्ली फक्त आणि फक्त स्वत:वर विश्वास ठेवणे गरजेचे झालेले आहे. विजयच्या दुकानात एक गृहस्थ विजयकडून एक लेटर टाईप करून घ्यायला आले होते, जाताना त्यांनी विजयकडे त्याला मुले किती आहेत म्हणून चौकशी केली असता विजयने मला मुलं नाहीत ! असे उत्तर दिले असता त्याने लग्न नाही केले का ? असा प्रश्न केला, त्यावर विजय नाही ! असे म्हणाला, त्यावर त्या गृहस्थाने त्याला त्याचे वय विचारले असता त्याने 44 असे त्याचे वय सांगताच ते गृहस्थ म्हणाले ,’’ लग्न करायला हवे कोणी तरी साथीला असलेले बरे त्यावर विजय म्हणाला,’’ आमच्या घरात साथ द्यायला भरपूर माणसे आहेत… विजय एकत्र कुटुंबात राहतो याचा त्यांना खूप आनंद झाला. आता नक्कीच विजयने लग्न का केले नाही याबद्द्ल त्या गृहस्थाच्या मनात कुतुहल निर्माण झाले असेल जे ती व्यक्ती विजयला पुन्हा भेटल्यावर त्याला त्याबद्दल विचारल्या खेरीज आता कमी होणारा नाही. त्या गृहस्थाला विजय लेखक असल्याचे ही माहीत असल्यामुळे त्याच्या मनातील कुतुहल नक्कीच अधिकच वाढलेले असणार. विजयच्या फक्त लग्न न करण्यावर एक कादंबरी लिहून होऊ शकते पण ती त्याला लिहायची नाही.
पूर्वी विजयला कोणी त्याच्या लग्नाबद्दल आणि त्याच्या वयाबद्दल विचारले असता तो बोलणे टाळत असे पण आता त्याबाबतीत तो तसे अजिबात करीत नाही कारण लग्न हा विषय आता त्याच्यासाठी अजिबात महत्वाचा राहिलेला नाही. त्याचे वाढते वय ही गोष्ट मात्र त्याला विचार करायला भाग पाडते कारण आता त्याला त्याच्या भविष्याचा विचार करावा लागणार होता. जो त्याने कधीच गंभिरपणे केलेला नव्हता. त्याला भविष्यात कोणावरही ओझे व्हायचे नव्हते. त्याच्या आयुष्यात कोणी स्त्री नसल्यामुळे त्याचे आतापर्यत तरी काही आडले नव्हते त्यामुळे भविष्यातही काही आडण्याची शक्यता तशी नव्हती.
विजयवर सध्या जे क्रेडिट कार्डचे कर्ज आहे ते त्याला हल्ली अधिकाअधिक काम करायला प्रवृत्त करीत आहे. जे यापूर्वी कधीही झालेले नव्हते. त्याच्या आयुष्यात क्रेडीट कार्ड आले आणि तो कर्जबाजारी झाला म्हणण्यापेक्षा तो पैसा पैसा वाचवायला आणि जोडायला शिकला, क्रेडीट कार्ड मुळेच कदाचित तो गरीब आहे असे त्याला वाटत नाही. पण प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम कमाविण्याच्या दडपण मात्र सतत त्याच्यावर असते. त्यामुळे हल्ली त्याला सतत आपल्या बॅँकेच्या खात्यावर लक्ष ठेऊन राहावे लागते, पूर्वी सतत सरस्वतीचा विचार करणारा विजय आता मात्र सतत लक्ष्मीचा विचार करीत असतो. पण तो तसा विचार करीत असल्यामुळे कदाचित आता लक्ष्मीची पावले त्याच्याकडे वळायला लागलेली आहेत. विजयने त्याच्या आयुष्यात किती आर्थिक चुका केलेल्या आहेत याची त्याला जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे आता त्याला त्याने पुर्वी केलेल्या आर्थिक चुका करायच्या नाहीत. त्यामुळे हल्ली पैशाच्या बाबतीत तो प्रत्येक पाऊल जपून टाकतो. कोणाला एक पैसाही उसना देताना तो हल्ली हजार वेळा विचार करतो. जेथे आर्थिक फायदा नसेल अश्या कोणत्याही गोष्टीत आपला वेळ खर्च करायला त्याला जड जाते. पुर्वी जेंव्हा विजय एका कारखान्यात कामाला होता तेंव्हा त्या कारखान्यातून जो काही थोडा- बहोत पगार त्याला मिळत होता त्यात तो सुखी होता. तो पैसे बचत करत नव्हता पण कर्जबाजारीही नव्हता, जितके कमवायचे तितकेच खर्च करायचे हे त्याचे धोरण होते. त्याला पायाचा त्रास सुरु झाल्यामुळे त्याने ती कारखान्यातील नोकरी सोडली. आपला वेळ वाया जाऊ नये म्हणून त्याच्या बाबांच्या दुकानात बसू लागला, त्या दुकानातून त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटला होता पण बाकीचे खर्च भागविण्यासाठी मात्र त्याला क्रेडिट कार्डचा आधार घ्यावा लागत होता. तो आधार आणि त्याही परिस्थितीत त्याने इतरांना दिलेला आर्थिक आधार मात्र त्याच्या गळ्याशी आला होता. पण ते काहीही असले तरी त्याला आर्थिक समस्या मात्र आली नव्हती. विजय क्रेडिट कार्डची बिले पुढच्या काही महिन्यात भरु शकेल पण तो कर्जमुक्त होईल याची त्याला खात्री वाटत नाही. कारण तो एक आर्थिक खड्डा बुजविण्यासाठी नवीन छोटा का होईना आर्थिकखड्डा खोदत चाललेला आहे. म्हणजे आता तो आर्थिक चक्रव्युहात गुंतून पडलेला आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याला आता काही तरी मोठे काम करावे लागणार होते. तसे एखादे काम मिळाले तर त्यातून तो बाहेर पडेल की त्यात अधिक गुंतून पडेल हे येणारा काळच ठरवेल. पुर्वी कर्ज काढण्यापासून लांब पळणारा विजय आता कर्जाच्या जिवावरच काही नवीन क्षेत्रे पादाक्रांत करण्याचा विचार करीत आहे. वास्तवात माणसाच्या गरजा तशा फारच कमी असतात त्या पुर्ण करण्यासाठी त्याला फार काही धावपळ करण्याची गरज नसते पण आजच्या मानवाने आपल्या भौतिक गरजा विनाकारण वाढवून घेतलेल्या अहेत. विजयने नेहमीच त्याच्या गरजा मर्यादेत ठेवल्या पण त्यामुळेच त्याला पैशाच्या मागे धावावेसे वाटले नाही आणि तो आर्थिक सुरक्षित होऊ शकला नाही...
विजयच्या पाहण्यात एका व्हिडिओ आला ज्यात असे म्हटले होते की भारतातील लोकांना भाड्याच्या घरात राहणे कमीपणाचे वाटते, त्यामुळे त्यांचा कर्ज काढून स्वत:चे घर घेण्याकडे कल जास्त असतो. कर्ज काढून घेतलेल्या स्वत:च्या घरापेक्षा भाड्याचे घर दुप्पट फायद्याचे असते. त्यामुळेच विजय नेहमी म्हणतो,’’ मी मुंबईत कर्ज काढून नवीन घर विकत घेण्यापेक्षा गावातील आमच्या वडिलोपार्जित घरात जाऊन राहणे पसंत करेन आणि उदर्निर्वाहासाठी तेथेच काहीतरी पोटापुरते काम करेन. सध्या विजयच्या डोक्यावर क्रेडिट कार्डचे जवळ जवळ 50,000 चे कर्ज आहे तर त्याला घाम फुटत आहे आणि डोक्याला ताप होत आहे. तेच कर्ज जर लाखाच्या घरात असेल तर किती मनस्ताप होईल याची त्याला कल्पनाही करवत नाही. हल्ली कर्ज घेणे अथवा ते मिळणे तसे फारच सोप्पे झाले आहे पण ते फेडणे मात्र फारच अवघड झालेले आहे. कारण आज कोणालाही आपल्याला मिळणार्या उत्पन्नाची खात्री देता येत नाही. विजयलाही कधीच वाटले नव्हते की आपल्यावरही कधीतरी आपले खर्च भागविण्यासाठी क्रेडिट कार्डची मदत घ्यावी लागेल. विजयला आता जगण्यातील अशास्वतता चांगलीच कळलेली आहे त्यामुळेच त्याने भविष्यातील त्याच्या आर्थिक तर्तुदीचा विचार गांभिर्याने करायला सुरुवात केली आहे.
हल्ली समाजात शुगर डॅडी नावाचे एक नवीन नातेसंबंध उद्याला येत आहे ज्यात आर्थिक सक्षम नसणार्या तरुणी आपल्याच वयाच्या बेकार तरुणांसोबत प्रेमसंबंध ठेवण्यापेक्षा आपल्या वडिलांच्या वयाच्या श्रीमंत पुरुषांशी प्रेमसंबंध ठेवणे पसंद करतात. यावरून आज पुरुषांच्या आयुष्यात पैशाला किती महत्व आलेले आहे हे सहज लक्षात येते. ज्याच्या जवळ पैसा असेल त्या पुरुषालाच समाजात किंमत आहे, पैसा नसेल त्याची किंमत शून्य मग तो कितीही रुपवान, गुणवान अथवा सात्विक का असेना ! हे वास्तव विजयला समजून घ्यायला फार वेळ लागला असे नाही पण हे वास्तव त्याला पचवायला जरा जड जात होते.
एक विचित्र बातमी विजयच्या वाचनात आली बायको खूप समजावूनही मशेरी लावणे सोडत नसल्यामुळे नवर्याने बायकोला घटस्फोट दिला...भविष्यात बायको दारू पिणे सोडत नाही म्हणूनही बायकांना काही नवरे घटस्फोट देतील तो दिवसही आता दूर नाही. पण हजारो वर्षापासून स्त्रिया पुरुषांची सर्व व्यसने सहन करीत आहेत त्याचे काय ? विजयने त्याच्या आयुष्यात दोनच व्यसने जवळ केली एक चहा चे आणि दुसरे वाचनाचे ! जसे स्त्रियांच्या व्यसनाकडे लक्ष देताना पुरुषांच्या व्यसनाकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. पुरुषांच्या व्यसनांचे समर्थन करता येणार नाहीच पण स्त्रियांची व्यसनाधिनता पुरुषांच्या व्यसनाधिनतेच्या मानाने अधिक चिंताजनक आहे कारण त्या नवीन पिढीला जन्माला घालतात, निसर्गाने पुरुषापेक्षा एक अधिकची आणि महत्वाची जबाबदारी स्त्रियांवर सोपविली आहे. जी पुरुषांच्या अस्तित्वालाही कारणीभुत आहे. व्यसनाधिन स्त्रिया जसे सशक्त स्त्रिया जन्माला घालू शकत नाहीत तशाच सशक्त पुरुषही जन्माला घालू शकत नाहीत. निर्व्यसनी स्त्रियांनी सशक्त स्त्री- पुरुष जन्माला घातले तरी त्यांचे भविष्य व्यसनाधिन पुरुष नासवतात. हल्ली जे स्त्री – पुरुषांच्या व्यसनाधिनतेचे समर्थन करणारी एक जमात समाजात जन्माला आलेली आहे ती जमात मानवजातीच्या भविष्यासाठी अत्यंत घातक आहे.
आता येऊ घातलेला व्हॅलेन्टाईन डे ! कधी काळी ! या दिवसाचे अप्रुप विजयलाही होते. पण कधी त्याने कोणासमोर त्या दिवसाच्या निमित्ताने आपले प्रेम व्यक्त केले नाही कारण तो प्रकार त्याला कोणाच्यातरी खांद्यावर बंधुक ठेवून चालविल्यासारखा वटतो. त्याला नेहमीच वाटायचे प्रेम हे ओठांनी व्यक्त होण्यापेक्षा डोळ्यांनी व्यक्त व्हायला हवे ! तुमच्या डोळ्यातील प्रेम जर समोरच्याला कळले नाही तर ते प्रेम नाही तर वासना... आज जे स्त्री- पुरुष एकत्र येतात ते प्रेमासाठी एकत्र येतात ! हाच एक मोठा विनोद आहे. विजय त्याच्या आयुष्यात नाही म्हणायला दोन डझन मुलींच्या प्रेमात पडला पण त्याच्या डोळ्यातील प्रेम कधीच कोणाला दिसले नाही. काहींच्या डोळ्यात त्याला दिसले पण... ते अटी आणि शर्तीवर अवलंबून असल्याचेही त्याला दिसले. आता या क्षणाला तो या जगात प्रेम वगैरे असे काही अस्तित्वातच नसते या निर्णयापर्यत येऊन पोहचलेला आहे. त्यामुळेच हल्ली त्याने प्रेम कविता लिहिणे बंद केलेले आहे. त्याच्या मते प्रेम हे प्रेमच असते असे नाही प्रेमाची परिभाषा, प्रत्येकाची वेगवेगळी असते. प्रेमाकडून प्रत्येकाला असणार्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात, पूर्वीच्या प्रेमाच्या सर्व मर्यादा आणि कर्तव्ये आता मोडीत निघालेली आहेत. पूर्वी मुलांच्या प्रेमापोटी आपल्या जीवाचे बलिदान देणारी आई आपल्या प्रियकरासाठी आपल्या मुलांचा जीव घ्यायलाही मागेपुढे पहात नाही. कधीकाळी प्रेमाच्या आनाभाका घेणारा प्रियकर ब्रेक- अप झाल्यावर आपल्या त्या पुर्वाश्रमीच्या प्रेयसीला बदनाम करतो. प्रेमाच्या प्रत्येक नात्यात आज एकतरी बलात्कार झालेला आहे, ज्याला आज कोणतेही नाते अपवाद राहिलेले नाही. आज प्रेमाची जागा वासनेने घेतलेली आहे. त्यामुळे समाज ज्याला प्रेम प्रेम म्हणून कुरवाळत होते त्या प्रेमाचे अस्तित्व कधीच या जगातून नाहीसे झालेले आहे...
एका ओळखीच्या गृहस्थांच्या मुलीची अचानक हे जग सोडून जाण्याची बातमी विजयच्या कानावर आली आणि विजय प्रचंड अस्वस्थ झाला कारण ती मुलगी विजयची चांगली मैत्रीण होती. ती मुलगी खूपच लागवी, मनमिळावू आणि माणूसकी जपणारी होती, तिच्या अचानक जाण्याचे विजयला प्रचंड दु:ख झाले, पण तिच्या जाण्याची बातमी थोडी उशिरा कळल्यामुळे त्याला तिच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहता आले नाही. पण आता तिच्या घरी जाऊन तिच्या पालकांचे सांत्वन करण्याची त्याची काही हिंमत होत नव्हती. तिच्या अचानक जाण्याचे कारण कळल्यावर मात्र विजयचा प्रचंड संताप झाला कारण तिचा मृत्यू रस्त्यावर काही बाई विकणार्या गाडीवरील खाद्य पदार्थ खाल्ल्यामुळे झालेल्या विषबादेमुळे झालेला होता. आता विजयला कळत होते की रस्त्यावरील खाद्य पदार्थ खाणे किती धोकादायक आहेत. हे खाद्यपदार्थ विकणार्या लोकांना लोकांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार कोणी दिला, त्यांना अधिकार कोणी दिला यापेक्षा आपणच आपल्या आरोग्याचा विचार करता स्त्याच्या कडेला विकले जाणारे खाद्य पदार्थ खाणे टाळायला हवे ! ते जर तिने टाळले असते तर कदाचित आज ती जिवंत असती, तिने आणि तिच्यासाठी तिच्या पालकांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण झाली असती. तिचे जाणे सर्वांनाच चटका लावून जाणारे असले तरी विजयला तिचा मृत्यू हा नैसर्गिक नसून मानवी चुकांमुळे झालेला होता याचे जास्त वाईट वाटत होते. मृत्यू कोणालाही टाळता येत नसला तरी त्याला कारणीभूत ठरणार्या मानवीय चुका ह्या टाळायलाच हव्यात. तिच्या जाण्याची बातमी कळल्यापासून विजय प्रचंड अस्वस्थ झाला होता. तिचा तो हसरा चेहरा त्याच्या नजरेसमोरून जाता नव्हता. त्याच्या दृष्टीने तिचे जाणे हे एक स्वप्न अपूर्ण राहिल्यासारखे होते. तिच्यासोबतची त्याची मैत्री ही मागच्या 12 वर्षाची होती म्हणजे ती 16-17 वर्षाची असल्यापासूनची... ती जेंव्हा जेंव्हा त्याला भेटायची त्याला घरी चहाला यायचे आमंत्रण द्यायची पण मागच्या दोन – चार वर्षात त्याला तिच्या घरी जाणे काही जमले नव्हते. आता त्याला तिच्या घरी जावे लागणार आहे पण आता ती त्या घरात नसताना याचे विजयला प्रचंड वाईट वाटत होते. आता एक महिन्यापूर्वीच ती त्याला त्याच्या इमारतीत कोणाला तरी भेटायला आली असता भेटली होती. खूप आनंदात होती. तिचे लग्न झालेले नसले तरी ती विजयसारखीच दु:खी नव्हती, ती तिचे आयुष्य भरभरून जगत होती पण कदाचित नियतिला तिला तो आनंद आणखी उपभोगण्याची संधी द्यायची नव्हती. जन्माला आलेला प्रत्येक माणूस आपली स्वप्ने मागे सोडून एक ना एक दिवस हे जग सोडून जातोच. पण हे बोलणे जितके सोप्पे असते तितकेच पचविणे जड असते. तिच्या घरच्यांवर तिच्या अचानक जाण्यामुळे जो दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे त्याची फक्त कल्पना करुनही विजयचे डोळे पाणावत आहेत. विजयच्या आयुष्यातून जेंव्हा अचानक अशी त्याच्या जवळची माणसे कमी होतात तेंव्हा त्याला नेहमीच प्रश्न पडतो या जगात आपल्या असण्याला खरोखरच काही अर्थ आहे का ? कि आपण गितेत म्हटल्याप्रमाणे अर्थशून्य जगात अर्थशून्य जीवन जगत आहोत...
विजयच्या ज्या मैत्रीणीबद्दल तिला अन्नातून विषबाधा झाल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची बातमी मिळाली होती, प्रत्यक्षात मात्र तिने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला होता, तिला योग्य वेळेत वैद्यकीय उपचार न मिळू शकल्यामुळे आणि तिच्या शरीराने वैद्यकीय उपचारांना योग्य तो प्रतिसाद न दिल्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला होता, तिचा अपघाती मृत्यू नसून ती आत्महत्या होती हे कळल्यावर आता पर्यत त्याला तिज्याबद्दल जे वाईट वाटत होते ते वाईट वाटण्याची तिव्रता थोडी कमी झाली होती कारण विजयला कधीच आत्महत्या करणार्या कोणाबद्दलही सहानुभुती वाटलेली नव्हती. त्याच्या मते आत्महत्या करणे हे पाप तर आहेच पण त्यासारखा दुसरा गाढवपणाही नाही. या जगात जीवापेक्षा काहीही मौल्यवान नाही. आपल्या जीवापेक्षा आपल्या जवळचा कोणी नाही. ज्या कारणाने माणसाला आत्महत्या करावी लागेल असे कारण या जगात अस्तित्वातच नाही. जगण्यापासून पळणारे लोक आत्महत्या करतात. दुसरीकडे कित्येक लोक मृत्यू समोर दिसत असतानाही शेवटच्या श्वासापर्यत जगण्यासाठी धडपडत असतात. विजयला शेवटच्या श्वासापर्यत जगण्यासाठी धडपडणारे ते लोक आवडतात. विजयची ती मैत्रीण जरा जास्तच हळव्या मनाची होती, त्यामुळेच तिच्या मेंदुवर जो काही ताण होता तो ती सहन करू शकली नसेल वयाची तीशी जवळ आलेली असतानाही लग्न न झालेल्या मुलीला कोणता ताण असह्य होत असणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. ज्यांची लग्न करणाचीच इच्छा नसते अशा लोकांसाठी लग्न हा मानसिक त्रास देणारा विषय ठरत नाही , पण ज्यांची लग्न कारण्याची प्रचंड इच्छा असतानाही कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांची लग्न होत नसतात ते मात्र मानसिक रुग्ण होतात आणि सतत विचार करून त्यांना असे वाटू लागते की आता आपल्या जगण्याला काही अर्थ उरलेला नाही त्यावेळी ते आत्महत्ते सारखे टोकाचे पाऊल उचलतात. आज प्रत्येक जण मोबाईलमध्ये घुसलेला असतो त्यामुळे कोणाकडे कोणासोबत प्रत्यक्ष संवाद करायला वेळच नाही. अगदी पालक आणि पाल्य यांच्यातही मोकळा संवाद होत नाही. मोकळ्या संवादाची कमतरता आणि विनाकारण ओढावून घेतलेला मानसिक त्रास यामुळे हल्ली समाजात आत्महत्तेचे प्रमाण वाढलेले आहे. तिने आत्महत्या करण्यापूर्वी जर कोणाशी संवाद साधला असता तर कदाचित तिचा जीव वाचला असता. मागच्या काही वर्षात विजयलाही तिच्याशी मोकळा संवाद साधने विजयला शक्य झाले नव्हते विजय स्वत: अविवाहीत असल्यामुळे म्हणजे त्याला लग्न करण्यातच मुळात रस नसल्यामुळे तो कोणाशीही लग्न हा विषय सोडून कोणत्याही विषयावर चर्चा करायला कधीही तयार असतो. त्याचे लग्न झालेले नसले तरी त्याला वैवाहीक समस्यांबद्दल काही माहीत नाही असे नाही पण तरीही लोक या बाबतीतील त्याची मते फार गांभिर्याने घेणार नाहीत याची त्याला ख़ात्री असल्यामुळे या विषयाबाबत तो कोणाला कोणताही सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाही. त्याचा जसा बाकींच्या विषयांचा अभ्यास तसा त्याचा लग्न या विषयाचाही उत्तम अभ्यास आहे. अगदी लग्न झालेल्या पुरुषाचाही नसेल इतका ! समज कदाचित आज कणखर मनाची माणसे तयार करण्यात कमी पडत आहे. त्यामुळे अगदी शुल्लक कारणासाठीही लोक आज आत्माहत्या करीत आहेत.
विजयने त्याच्या लहानपणापासून जो शारीरीक मानसिक सामाजिक आणि बौद्धिक त्रास सहन केलेला आहे तो पाहता त्याच्या जागी दुसरा कोणाही असता तर त्याने नक्कीच आत्महत्या केली असती. पण विजयच्या डोक्यात नेहमीच एक विचार होता तो म्हणजे आपण माणूस आहोत, आपण विश्वातील इतर प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत, मनुष्य जन्म हा कदाचित आपल्याला आपल्या भाग्याने मिळालेला आहे त्यामुळे आपल्याला जन्माला घातलेल्या त्या विधात्याचे आपल्याला बोलावणे येत नाही तोवर कितीही संकटे आली तरी आपल्याला जगायचेच आहे त्याला कोणताही पर्याय नाही.
होळी जवळ आली की विजयची आई नेहमी विजयला गावी पालकीच्या दर्शना गावी चलण्याचा आग्रह धरते आणि प्रत्येक वेळी तो नकार देतो, त्यावर त्याच्या अशिक्षित आईचे देवावरून प्रवचन वगैरे सुरू होताच, तिचे चालणारे तोंड बंद करण्यासाठी त्याचे ठरलेले उत्तर हे असते की आम्ही लहान असताना कधी आम्हाला होळीला गावी घेऊन नाही गेलात मग आताच जाण्याचा अट्टहास का ? त्यावर आईचे ठरलेले उत्तर तेंव्हा आपली परिस्थिती नव्हती पण आता आहे ना ! त्यावर विजयचे मनात म्हणने हे असते ज्यावेळीआनंद लुटण्याचे मजा घेण्याचे माझे वय होते तेंव्हा तुम्ही मला तो आनंद ती मजा घेऊ दिले नाहीतआणि आता मला त्या सगळ्यात काडीचाही रस नसताना देवाच्या नावाखाली उगाच जबरदस्ती करायची याला काय अर्थ आहे. होळीला गावी गेल्यावर विजयला खूपच मुर्खांचा सामना करावा लागतो. प्रत्येक गोष्टीचा आनंद आणि मजा घेण्याची वेळ असते, वराती मागून घोडे नाचवून त्याचा काय उपयोग ! आज आपल्याकडे भले पैसे आले असतील पण त्या पैशाने ती गेळेली वेळ तर आपण विकत घेऊ शकत नाही ना ! तेथे गेल्यावर मनशांती मिळण्यापेक्षा मनस्तापच अधीक मिळतो कारण जो भेटतो ते हे विचारत नाही की तुझा व्यवसाय कसा चाललाय, तुझे लिखान कसे चालले आहे, सध्या नवीन काय सुरु आहे, तुझी तब्बेत कशी आहे, जो भेटतो तो मुर्खासारखा एकच प्रश्न विचारतो की लग्न कधी करणार ? लग्न करणार की नाही ?? देवाचे दर्शन घ्यायला गेल्यावर जर असे प्रश्न विचारणारे डोक्याला ताप देणारी लोकं भेटणार असतील तर तेथे न गेलेलेच बरे नाही का ? बरं त्या लोकांचा उलट उत्तरही देता येत नाही ! त्यांना काही उत्तर न देता हसून टाळावे लागते त्याचा विजय सारख्या हजरजबाबी मानसाला आणखी त्रास होतो. विजयच्या आईला नेहमी वाटते होळीला गावी गेल्यामुळे होणार्या खर्चाचा विजयला त्रास होतो अथवा तो नास्तिक आहे, पण तसे नाही त्याला देवाचा नाही तर तिथल्या माणसांचा त्रास होतो. इतर कोणत्याही प्रसिद्ध देवस्थानाला चळण्याचा त्याच्या आईने आग्रह केला असता तर तो नक्की गेला असता कारण तेथे त्याला अशी बिनकामाची प्रश्ने विचारणारी माणसे भेटत नाहीत. त्यापैकी कोणालाही विजयचे लग्न न करण्याचे खरे कारण माहीत नाही आणि ते कारण कधी कळणारही नाही कारण विजयचे आयुष्यच एक कोडे आहे जे सहज उलगडने शक्य नाही. तो ज्याला जितका जास्त कळत जातो तो समोरच्यासाठी तितका जास्त रहस्यमय होत जातो. त्याला लोकांशी संवाद साधायला आवडतो त्यांच्याशी वेगवेगळ्या समस्यांवर चर्चा करायला आवडते त्याला त्याचे विचार लोकांसमोर मांडायला आवडतात, त्याच्या विचारांचा आणि त्याच्या चौफेर अभ्यासाचा कित्येकांना फायदाही होऊ शकतो पण तेथे त्याच्या संपर्कात येणार्या लोकांना काळजी असते तर कसली ? त्याच्या लग्नाची जे न केल्यामुळेच तो इतर सामान्य माणसंपेक्षा जास्त आनंदी आहे. कदाचित त्या लोकांना त्याचा आनंदच पाहावत नाही. हेच कारण आहे की तो त्याच्या नातेवाईकाच्या, गाववाल्यांच्या लग्नाला जाणे टाळतो पण त्यामुळे त्याच्या घरच्यांचा असा गैरसमज झालेला आहे की त्याला या सगळ्यात रसच नाही. प्रत्येकाचा आनंद हा वेगवेग्ळ्या गोष्टीत असू शकतो , काही तो लग्नात आणि संसारात शोधतात काहींना लग्न आणि संसार याच्यात आनंद नसेल शोधायचा तर त्यांच्यावर लग्न करण्यासाठी समाजाची जबरदस्ती का ? लग्न न झालेल्यांना लग्न कधी करणार हा प्रश्न विचारायलाच हवा का ? हल्ली तर लग्न करून घटस्फोट झालेल्यांनाही दुसरे लग्न कधी करणार हा प्रश्न विचारला जातो, हा तर गाढवपणाचा कळसच आहे. विजय तापला की समोर जो कोणी असतो त्याला स्पष्ट सांगतो, माझे लग्न होत नाही म्हणून मी लग्नाचा नाही राहिलो, मला लग्नच करायचे नाही, करायचे झालेच तर ते मी कोणत्याही वयात करू शकतो, त्यासाठी मला वयाचे बंधन नाही कारण मला लग्न करून मुलांना जन्माला घालायचे नाही कारण माझे नाव पुढे चालले काय किंवा नाही चालले काय त्याने मला काडीचाही फरक पडत नाही कारण मी स्वत:लाच नाही तर या विश्वातील प्रत्येक माणसाला एक स्वतंत्र जीव समजतो. मी आणि माझे जगणे हेच काही ते सत्य आहे बाकी सारा भ्रम आहे. हे जर विजयच्या मैत्रीणीच्या वेळीच लक्षात आले असते तर कदाचित तिने ही आत्महत्या केली नसती...
विजयच्या वाचनात एक बातमी आली नवरा सारखा पत्नीला जाडी जाडी म्हणायचा ! त्याच्या त्या रोजच्या म्हणण्याला वैतागून पत्नीने शेवटी आत्महत्या केली. आता काही दिवसापूर्वीच म्हणजे व्हॅलेन्टाईन डे नंतर दोन – तीन दिवसांनी विजयच्याच इमारतीत एका बावीस वर्षीय अविवाहित तरुणीने पंख्याला गळफास लावून आत्म्हत्या केली. तरुणी सदन कुटुंबातील होती. म्हणजे नक्कीच तिच्या आत्महत्तेमागे प्रेमप्रकरण हे कारण असणार हे सांगायला कोणा ज्योतिष्याची गरज नाही. एकतर देशात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांची संख्या कमी व्हायला लागली आहे, त्या संख्येत ह्या आत्महत्या करणार्या तरूणी आणखी भर घालत आहेत. आपल्या देशात पुरुषांच्या आत्महत्तेचे प्रमाण स्त्रियांच्या आत्महत्तेपेक्षा अडीच पट जास्त आहे . पण जगात आत्महत्या करणार्या स्त्रियांचा विचार करता आपल्या देशाचा नंबर वरचा आहे. महाराष्ट्रात स्त्रियांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याचे प्रमाण इतर राज्याच्या तुलनेत जास्त आहे असे वाचनात येते. स्त्रियांची देशात पुरुषांच्या तुलनेत घटती संख्या ही एक मोठी समस्या आहे... कदाचित देशातील सरकार स्त्री भ्रूण हत्त्या रोखण्यास म्हणावे तितके यशस्वी झालेले नाही, आजही उच्च शिक्षित लोकांनाही वंशाला दिवा हवा असतो. म्हणजे कित्येकांना पहिली मुलगी झाली तरी चालते पण दुसरा हा मुलगाच हवा असतो त्यामुळे समाजातील उच्च शिक्षित लोकांकडूनही स्त्री भ्रुण हत्या केली जाते हे वास्तव आहे. त्यात तिसरे आपत्य जन्माला घातल्यानंतर सरकारकडून घातली जाणारी बंधने ती ही काही प्रमाणात या सर्व गोष्टींना कारणीभूत आहेत. यात सरकारची काही चुकी आहे असे नाही म्हणता येणार कारण देशाची वाढती लोकसंख्या ही एक समस्याच आहे. पण आपल्या देशात त्या समस्येला कोणी फारसा गांभिर्याने घेत नाही.
विजयजवळ त्याच्या लग्नाचा कोणी विषय काढाला तर तो म्हणतो, ‘’ मला लग्न करून देशाच्या लोकसंख्येत भर नाही घालायची ! त्यावर समोरची प्रत्येक व्यक्ती एक वाक्य आवर्जून म्हणते ते म्हणजे,’’ तुझ्या एक –दोन मुलांनी असा देशाला काय फरक पडणार आहे ? हा असा विचार करणार्या लोकांमुळेच आज देशाची लोकसंख्या आणि त्या लोकसंख्या वाढीमुळे उद्भवणार्या समस्याही भरमसाठ वाढलेल्या आहेत. आज खरे तर आपल्या देशाने अविवाहीत लोकांना विशेष पेन्शन योजना सुरु करायला हवी. आज देशाला खरे तर विवाहीत लोकांपेक्षा अविवाहीत लोकांची जास्त गरज आहे. तेच समाजाच्या आणि पर्यायाने देशाच्या जास्त कामी येतात.
विजयच्या जवळच्या दोन तरुणींनी आत्महत्या केल्यामुळे आत्महत्या हा विषय सतत त्याच्या डोक्यात घोळत होता. त्यात एका बारावीच्या मुलीने परिक्षेच्या पहिल्याच दिवशी परिक्षेला जाण्यापुर्वीच आत्महत्या केली. म्हणजे हल्ली आयुष्यात कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे तेच कळत नाही. तिने आत्महत्या केल्यामुळे तिच्या आई- वडिलांखेरीज दुसर्या कोणालाही काडीचा तरी फरक पडला असेल का ? तर नाही... जी गोष्ट केल्याने काही साध्यच होणार नसेल ती गोष्ट करण्यात काय अर्थ आहे ? प्रत्येकाची यशाची परिभाषा वेगवेगळी असते , प्रत्येकाचे यशाचे कार्यक्षेत्र वेगवेगळे असते, प्रत्येकात असणारे कलागुण वेगवेगळे असतात, प्रत्येकाच्या आवडीनिवडी वेगवेगळ्या असतात प्रत्येकाची कार्यक्षमता ती ही वेगवेगळी असते, त्यामुळे प्रत्येकाला ज्याचे त्याचे असे मोकळे आकाश मिळायला हवे. दुर्दैवाने ते विजयला ही मिळाले नाही पण त्याने हार नाही मानली प्रसंगी मानहानी सहन करुनही तो आपल्या मतावर ठाम राहिला. आज ही ठाम आहे. त्या ठाम राहण्याची फार मोठी किंमत त्यालाही त्याच्या आयुष्यात मोजावी लागली. आजही मोजावी लागत आहे.
विजयच्या वाचनात आणखी एक बातमी आली ती म्हणजे,’’ तिन मुलींना वार्यावर सोडून त्या मुलींची आई तिच्या प्रियकरासोबत आणि त्या मुलींचे वडिल आपल्या प्रेयसीसोबत फरार झाले आहेत. विजयला कळत नाही ही अशी लोकं मुलांना जन्मालाच का घालतात ? या अशा लोकांना मुलांना जन्माला घालण्याचा अधिकारच नाही. आता त्या बिचार्या तीन मुलींचे भविष्य काय असेल ? ज्या मुलांना आपण आपल्या भावनांना आवर घालत एक सुरक्षित भविष्य देऊ शकत नाही अशा मुलांना जन्माला घालण्याचा अधिकार कोणालाच नाही. मुले काही अपघाताने होत नाहीत, तुम्ही लग्न करता, लग्न करून आपली शारिरिक गरज भागवत असतानाही पालक होणे न होणे हे तुमच्या हातात असते. तसे असताना जी मुले तुम्हाला ओझे वाटत असतील तर अशा मुलांना वार्यावर सोडण्यासाठी तुम्ही जन्मालाच का घालता ? आपल्या देशाची लोकसंख्या पाहता काही लाख लोकांनी लग्न करुनही मुलांना जन्मच दिला नाही तरी देशाला काडीचाही फरक पडणार नाही उलट झालाच तर फायदाच होईल. विजयला तसे ही लग्न करून मुलांना जन्माला घालायचेच नव्हते त्यामुळेच खरे तर त्याने लग्न कधीही कोणत्याही वयात केले तरी त्याला फार काही फरक पडणार नव्हता.
विजयला सतत वाटत राहिले की आपल्या आयुष्यात काहीतरी वेगळे चमत्कारीक घडेल पण तसे काहीच घडले नाही. कालही त्याच्या आयुष्यात त्याला एकजात स्वार्थी माणसे भेटली होती आजही एकजात स्वार्थी माणसेच भेटत आहेत. ज्याचा त्याला प्रचंड मनस्ताप होत आहे. प्रत्येकाला त्याच्याकडून काम करून घ्यायचे असते पण त्याच्यासाठी मात्र काही करायला कोणाकडेच वेळ नसतो. ज्यावेळी तो जरासा स्वार्थी होऊन जगायला सुरुवात करतो तेंव्हा मात्र लोक त्याच्यापासून दुरावतात. पण ! कोणीही त्याच्यापासून दुरावल्यामुळे त्याला कालही फारसा फरक पडत नव्हता आणि आजही फरक पडत नाही कारण तो नेहमी तटस्थ असतो जगापासून म्हणूनच कदाजित त्याच्या वाट्याला जागणे आले आहे जगावेगळे आयुष्य ! त्याच्या आयुष्यात कधीच काही साधे सरळ सोप्पे असे घडलेच नाही. त्याच्या आयुष्यात प्रत्येक माणूस एक नग होता. त्याच्या आयुष्यात तो आतापर्यत नेहमीच देणार्याच्याच भुमिकेत राहिला, त्याच्या आयुष्यात येणार्या प्रत्येकाने त्याच्याकडून आपला काही ना काही फायदा हा करून घेतलाच ! तो जगाच्या कामी आला पण जग कधीच त्याच्या कामी येऊ शकले नाही. हेच कदाचित त्याचे प्रारब्ध असावे म्हणूच जगाला प्रेम करायला लावणार्याला मात्र त्याच्या आयुष्यात कधीच कोणाचे खरे प्रेम लाभले नाही. त्याच्यावर ज्या कोणी थोडे प्रेम केले ते करणार्यांचाही त्यामागे स्वार्थच होता. तो साध्य झाल्यावर ते ही त्याच्यापासून दुरावले.
ईश्वराने त्याला नक्की कशासाठी जन्माला घातले आहे ते कोडे त्यालाही उलगडत नाही पण त्याच्या मागे ईश्वर आहे याची त्याला खात्री आहे. त्यामुळेच तो त्याच्या व्यतीरिक्त कोणालाही मान देत नाही. इतर कोणावरही भरोसा ठेवत नाही. कोणाला काय वाटेल, कोण काय म्हणेल याचा विचार करून तो त्याच्या आयुष्यातील निर्णय कधीच घेत नाही. त्यामुळे त्याला ओळखणारे सहसा त्याला सल्ला देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. त्याला जन्माला घालणार्या त्या ईश्वराची कदाचित इच्छा नाही की त्याने भौतिक सुखात गुंतून पडावे ! त्यामुळेच जेंव्हा जेंव्हा तो भौतिक सुखे मिळविण्याचा विचार करतो तेंव्हा तेंव्हा त्याचे सुरलीत चाललले आयुष्य अस्थाव्यस्थ होते, त्याच्या वाट्याला कोणता ना कोणता मोठा मानसिक त्रास येतोच, हे मागचे कित्येक वर्षे तो अनुभवत आहे. त्याचे आयुष्य का कोणास जाणे सामान्य माणसांसारखे त्याच्या नियंत्रणात नाही, त्याला सतत वाटत राहते की त्याचे जगणे दुसराच कोणी तरी नियंत्रीत करीत आहे. त्यामुळे त्याला यश मिळते, प्रसिद्धी मिळते पण पैसे मात्र मिळत नाही, अधिकचे पैसे मिळविण्यासाठी म्हणून तो जेंव्हा जेंव्हा काही करतो त्यात त्याला अपेक्षित यश कधीच येत नाही, चुकून आले तरी तो पैसा त्याच्याकडे कधीच टिकत नाही. त्याने संसार कारावा अशी कदाचित त्या ईश्वराचीच इच्छा नाही असे संकेत त्याला वारंवार मिळूनही तो हात – पाय मारीत राहिला पण त्याचा काहीही कधीही उपयोग झाला नाही. दुसर्यासाठी म्हणून त्याने काहीही केले तर त्याला त्यात नक्कीच यश येते. जगाला वाटत आहे की त्याचे आयुष्य तो त्याच्या मर्जीने जगत आहे पण तसे अजिबात नाही ! वास्तवात तो त्याला कोणीतरी जगायला लावलेले आयुष्य मनात नसतानाही जगत आहे. त्याच्या वाट्याला जगायला जगावेगळे आयुष्य आलेले आहे... का ? ते कदाचित त्या ईश्वरालाच माहीत असेल...
© लेखक :- निलेश बामणे
--- समाप्त ---
