Vaishnavi Kulkarni

Drama Classics Others

4  

Vaishnavi Kulkarni

Drama Classics Others

भैरवी भाग १

भैरवी भाग १

4 mins
548


भैरवी. . फडके कुटूंबातील शेंडेफळ, एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली , एक साधी सरळ, कोणाच्या अध्यात मध्यात नसलेली मुलगी. घरात ती, तिचे आई- बाबा, मोठा भाऊ, आजी आजोबा, काका काकू आणि तिचे आजोळ चे केळकर आजी आजोबा ,इतकी सगळी माणसं. बाबा सरकारी नोकरीत तर आई गृहिणी.तिचे काका जास्त शिकलेले नव्हते त्यामुळे एका मित्राच्या दुकानावर ते मदतनीस म्हणून कामाला जायचे. काका काकु अपत्य रहित होते त्यामुळे ते भैरवी अन् केशव, भैरविचा सख्खा मोठा भाऊ या दोघांनाच आपलं अपत्य समजत होते. भैरवी च्या आईला सख्खा भाऊ नसल्याने केळकर आजी आजोबा त्यांच्याच सोबत राहायचे. भैरवी दिसायला अगदी साधारण होती. सावळा रंग, खांद्यापर्यंत रुळणारे केस, मध्यम बांधा असं तिचं व्यक्तिमत्व होतं. गोऱ्यापान रुपाचं भरभरून दान नसल्याने कधी ती मैत्रिणी तर कधी नातेवाईकांमध्ये थट्टेचा विषय बनायची. खूप वाईट वाटायचं तिला की परमेश्वराने आपल्याला खूप नाही पण थोडं तरी रूप बहाल करायला हवं होतं. तिच्यापेक्षा वयाने 3 वर्षांनी मोठा असणारा तिचा भाऊ केशव अगदी गोरापान होता. त्यावरून तर तिला अजूनच कमी लेखत सगळे. आईला सगळ्यांची बोलणी आणि टोमणे सहन करावे लागत. आईची आई तर भैरवी समोरच तिच्या आईला बोल लावी : " वंदे, अग ही पोरगी कोणावर गेली कोणास ठाऊक, तुझा केशव अगदी गोरापान आहे आणि हीच का ग इतकी सावळी आली? हिला उजवताना फार कष्ट होणारेत बाई तुला अन् वसंत रावांना! किती उंबरठे झिजवायला लावेल ही पोर तो भगवंतच जाणे !"


सख्खी आईच असं बोलते म्हटल्यावर बाकीचे पण तीच री ओढणार, त्यामुळे आईला कधी कधी नकोसं होई. भैरवी जवळ जे नाही ते सगळे पाहत , पण तिच्याकडे जे आहे, त्याकडे कोणी विशेष लक्ष देत नव्हतं. काय होतं असं तिच्याकडे? तिच्याकडे होते छान, मोठे बोलके डोळे, दोन्ही गालांवर पडणारी खोलवर खळी अन् समोरच्याला जपणारं, समजून घेणारं सुंदर मन. स्वतः आधी ती दुसऱ्याचा विचार करी. प्रत्येकाला मदत करण्यासाठी कायम तत्पर, हसतमुख अशी भैरवी. पण म्हणतात ना, लोकं गुण सोडून व्यंगावर आधी बोट ठेवतात, तसंच भैरवी अनुभवायची. कधी वाईट वाटलं तर तिची वसू आजी, तिच्या बाबांची आई, तिच्या कुशीत शिरून ती मनसोक्त रडून घेई, मनातलं सगळं ती आजीला सांगायची.


भैरवी अन केशव चं मात्र एकमेकांवर खूप प्रेम होतं. केशव धाकट्या बहिणीला खूप जपायचा. दोघे एकत्र फिरायचे, हिंडायचे, अगदी केशवच्या मित्रांच्या घरी जाण्यापासून ते त्यांच्या वाढदिवसाच्या असलेल्या मेजवानी पर्यंत. फडक्यांची परिस्थिती म्हणजे खाऊन पिऊन संपन्न अशी होती. पण असं असलं तरी फडक्यांच्या घरात तीन चुली होत्या. एक तिच्या आईची अन् पुष्पा आजीची , (पुष्पा आजी म्हणजे केळकर आजी), दुसरी चुल तिच्या वसू आजीची, अन् तिसरी तिच्या काकुची. . सगळ्या घरांत असतात तसे मतभेद या घरात देखील होते. पण भैरू ला मतभेद, भांडणं , संताप या साऱ्यांचा खूप तिटकारा होता. मोठ्यांची भांडणं , संताप सुरू झाले की तिला असं वाटे, या साऱ्यांपासून दूर, खूप दूर निघून जावं. निसर्ग खूप आवडायचा तिला. त्यामुळे पान, फुलं, पक्षी, डोंगर दऱ्या यामध्ये गुंतून सगळं जग विसरून जावं असं होई तिला.


अशा या वातावरणात भैरवी मोठी झाली होती. ती दहावीला असतानाची गोष्ट. . . ते ज्या वडिलोपार्जित जुन्या घरात राहायचे ते विकून भैरवी चं कुटुंब मोठ्या फ्लॅट मध्ये स्थायिक होणार होतं. जुनं घर नव्या मालकाला १५ दिवसांत सोपवाव लागणार होतं अन् भैरवी ची १० वी ची परीक्षा देखील अगदी तोंडावर येऊन ठेपली होती.

"आई बाबा, मला तुमच्या दोघांशी थोडं बोलायचय."

आई - का ग बाई, अभ्यास तयार नाही का तुझा?

नाही ग आई, असं कसं वाटू शकत तुला?

बाबा - मग काय झालंय ?

बाबा, "आपण या १५ ला नव्या घरात जातोय राहायला. नव्या घराचा आनंद मला देखील खूप आहे पण माझी १० वी ची परीक्षा पण अगदी जवळ आली आहे. तेव्हा तुम्ही हे घर सोडण्याची मुदत थोडी वाढवून घ्या ना १ महिन्याने"

आई - अग वेडी आहेस का तू? आपण त्यांच्याकडून घराचे सगळे पैसे घेतले आहेत. मग आता ते आपल्याला मुदत का वाढवून देतील? आणि नव्या घरात गेल्यानंतर १५ दिवस अवकाश राहतो तुझ्या परीक्षेला"

पण आई अग नवीन घर लावायला १५ दिवस लागतील मग काय कपाळ अभ्यास होईल माझा? "

आई - पण मग त्यात बाबांचं नाव खराब होईल की दिलेली मुदत पाळता येत नव्हती तर का दिली म्हणून. हे हवंय का तुला? आधीच सगळ्यांचं सगळं करून देखील कोणीच चांगलं म्हणत नाहीत त्यांना."

आई माझ्या भविष्यापेक्षा तुम्हाला लोकांनी चांगलं म्हणावं अशी अपेक्षा आहे का तुझी ? मी कोणीच नाही का तुमची? "

आई - पाहिलं ? कशी बोलायला लागलीय आई - बापाला आत्ताच? "

बाबा - तू थोडं थांबशील का वंदना? हे बघ भैरु, नव्या घरात गेल्यावर तू स्वतः ला एका खोलीत अभ्यासा साठी बंद करून घे. दोन वेळचे जेवण ,नाश्ता, अंघोळ वगैरे यासाठीच काय ते बाहेर येत जा. कोणी तुला काहीही म्हणणार नाही याची खात्री मी देतो."

पण बाबा. . . ?

आई - आता पुरे करा हा विषय. उशीर झालाय बराच. झोपा आता. उद्या बरीच काम आहेत मला. थोडी खरेदी करायचीय नव्या घरासाठी."

नाईलाजाने भैरवी झोपण्यासाठी गादीवर लवंडली, पण मनात मात्र नव्या घराचे अन् परीक्षेचे विचार फेर धरून नाचू लागले.


क्रमशः



Rate this content
Log in

Similar marathi story from Drama