STORYMIRROR

Ashvini Duragkar

Romance

2  

Ashvini Duragkar

Romance

बायकोला पत्र...

बायकोला पत्र...

3 mins
1.5K

प्रिय बच्चू..

  

     कशी आहेस...? ठीक आहे ना सगळ...? ठीकच रहा यार..? ह्म्म्म्म्म मी ही कसले विचित्र प्रश्न विचारतो आहे. दिवसातनं चारदा आपण व्हिडीयोकाॅलवर बोलतो पण मनातली एक गोष्ट सांगू... मला जे तुझ्याशी बोलायच असत ना ते रोज राहुनच जातं!! शिवाय तू अशी एकटी आणि मुक्त कधीच नसतेस... सतत कोणी तरी असतंच आजुबाजुला! .....मी बरेचदा संधी साधून बोलायचा प्रयत्नही केला पण.... बोलायला गेलं कि सूर भलतीकडेच जातो आणि ओठांवर येण्याआधीच शब्द कंठात गारठुन बसतात...


       पण काल तुझ्या डोळयात आणि तुझ्या बोलण्यात एक अनोळखी आणि वेगळाच वणवा पेटलेला दिसला!!! एरवी मोगऱ्याच्या टवटवीत कळी प्रमाणे खुललेल्या तुझ्या चेहऱ्यावर आज काल निस्तेजपणा जाणवतो मला... कपाळावरच्या मनातील घालमेल दर्शवणाऱ्या आठ्या अगदी काळजात खुपतात ग!!! ते डोळयांखाली घेराव मांडलेले काळोखाचे गाळ अजुन दाट झालेले दिसतात... नयनात काठोकाठ भरलेले पण पापण्यांच्या कडयांवरच ठाव घालुन बसलेले अश्रु हळुच माझ्या कानात गुज करून जातात... त्या अश्रुंच्या आवेगाने तुझे थरथरणारे ओठ मनाची घालमेल वाढवतात. तुझा तो कानातील हळुच हलणारा डुल गर्द घट्ट झालेल्या माझ्या मनात उधाण सरी कोसळवुन जातो...

कळत नाही काय करावं..?? खूप अस्वस्थ वाटतं..!! डोळ्यातलं तळं ओसंडून वाहतं..!! मनात खळबळ माजते!!..

तू कधीच काही सांगत नाहीस, बोलुन दाखवत नाहीस पण तुझा चेहरा मात्र सारे गुपित उलगडवुन जातो. 


    खूप हतबल वाटत ग!!! 


        आज तीन महीने झाले मी ईकडे अडकुन बसलो आहे... अवघड वाटत खूप. काय करायला आलो आणि काय होऊन गेल..या लाॅकडाऊनमुळे...बघ ना सगळच कस बिनसल!! पण एक सांगू!... तुझी सकारात्मकता नेहमीच मला ऊर्जा प्रदान करते. तुझे ते नेहमीच हास्य टिपणारे डोळे मन प्रसन्न करतात. तुझे गुलाबी गाल मनाला वेड लावुन जातात. 

 

  रोज सकाळी उठल्या उठल्या तुझा तो हसरा चेहरा आठवतो आणि माझ्या दिवसाची सुमधुर सुरुवात होते. तुझी आठवण चहाच्या त्या कडक, तजेलदार आणि स्वर्गरम्य स्वादासारखी आहे.... ज्याचा मी घोट घोट पित आयुष्य जगतो आहे....

माहिती आहे......


    “जेव्हा तू सकाळी उठते दोन्ही हात चेहऱ्यावर ठेवुन प्रार्थना करतेस आणि तोच हात माझ्या डोक्यावर ठेवतेस ना... तेव्हा आपल्या डोक्यावर परमेश्वराचा आशीर्वाद असल्याची अनुभूती मिळते” कदाचित तुला माहिती नसेल पण तुझा तो दैवीक स्पर्श मला नव चेतना देवुन जातो.. 


 ज्याप्रमाणे आत्मनिर्भर होऊन तू सगळ घर सांभाळतेस ना ..बस त्याच विश्वासावर मी ईकडे निवांत झोपु शकतो. मला खात्री आहे तू आपल्या सहन क्षमतेला बेतून सगळ नीट हाताळतेस. अजुनही ते सारे क्षण आठवतात जेव्हा तू पहिल्यांदा गृहप्रवेश केलास. तुझ्या मनातील अस्वस्थपणा स्पष्ट जाणवत होता पण तुझ्या दिलखुलास आणि आपुलकी भरलेल्या स्वभावाने सगळयांच मन जिंकलस. आई-बाबा चार लोकात तुझ तोंडभरुन कौतुक करतात तेव्हा गर्वाने मान वाढतो माझा!!..


तुझ्या येण्याने माझ नशीब तारकाप्रमाणे चमकलं!. सप्तपदीचा एक एक फेरा तू मनोभावाने निभवतेस. कुठलही संकट आल्यास तटस्थपणे सामना करतेस. कित्येकदा मी तुझ्यावर ओरडलो, चिडलो, भांडलो तरीही तू सगळ सांभाळुन घेतलस.... 

माझ्या मनात काय सुरु आहे माझ्या डोळयातन तू ओळखतेस...


कस ग जमत हे तुला.....!!!!


       खर तर आपल्या सुखी संसाराला नवीन श्वास दयायचा तू नेहमीच प्रयत्न करतेस. आजतोवर तू किती त्याग आणि समर्पण केले असशिल त्याची मोजावणी केल्यास दिवस कमी पडेल. पण तू मला दिलेल्या त्या प्रत्येक श्वासासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे ज्यामुळे आपल्या घराला घरपण लाभल आणि माझ्या आयुष्याला बहार आली. त्या प्रत्येक श्वासाचा आणि घालवलेल्या त्या प्रत्येक क्षणाचा मी ऋणी आहे. 

   आपल हे जन्मजन्मांतरीच नात असच बहरत जावो... यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असेल.

       तुझी नेहमीची तक्रार असते ना... की तुम्ही कधीच प्रेम व्यक्त करित नाही ... घे मग...

  माझ तुझ्यावर खूप खूप प्रेम.. Love you so much... सात समुद्रा पलीकडुन एक घट्ट मिठी.  

   

                       तुझा प्रेमवेडा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance