STORYMIRROR

Chaitanya Kadam

Horror Tragedy Thriller

5.0  

Chaitanya Kadam

Horror Tragedy Thriller

बावाssss

बावाssss

19 mins
140

प्रकरण १.

आजोबा आणि रान


अजूनही डोळे मिटले, की तो आवाज ऐकू येतो — "बावाsssss" अशी लांबलचक हाक आणि त्या हाकेसरशी मला आठवतात ते माझे आजोबा" विश्राम लक्ष्मण कदम".

रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूणजवळच्या कोळकेवाडी नावाच्या इवल्याशा गावात आमचं घर. कौलारू, मोठं अंगण, बाजूला गोठा, घरामागे रान आणि घराभोवती अशी शांतता, जी शहरात कधी सापडत नाही. अंगणात गोठ्यातून येणारा गुरांचा वास, कोंबड्यांचं ओरडणं, दूरवर कुठेतरी वाजणारी घंटा - या सगळ्या आठवणी आजही क्षणात गावात घेऊन जातात.

बाबा कामासाठी पुण्याला आले आणि नंतर ईथेच स्थायिक झाले. आमचं आयुष्य शहरात सुरू झालं.पण गावी आजी-आजोबा तिथेच राहिले. त्यांचं सगळं आयुष्य शेतात, रानात गेलेलं.

आजीला शहरं खूप आवडायचं. उंच इमारती पाहिल्या की ती क्षणभर थांबून त्यांच्याकडे बघत राहायची. मोठमोठ्या गाड्या पाहून तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटायचं. लिफ्टमध्ये जाताना ती दरवेळी पहिल्यांदाच गेल्यासारखी हसायची.

ती म्हणायची — "अगो बया, केवढं मोठं शहर हाय हे... माणसां वरच्यावर र्‍हवत्यात!" आम्ही सगळे हसायचो.

पण आजोबा... त्यांना या सगळ्याचं काहीच अप्रूप नव्हतं. त्यांचं मन शहरात कधीच रमलं नाही. चार दिवस पुण्यात राहिले की पाचव्या दिवशी ते आजीच्या मागे लागायचे.

"अगं.. व्हय गो, चल आता. गावाकडं जावया होया आपण."

आजी वैतागून म्हणायची, "अवं, आणखी दोन दीस र्‍हवा की. नातवांडासंगं वेळ घालवा जरा."

आजोबांचा चेहरा पडायचा. "मला करमना गं हितं. गुरांचं काय झालं असंल, रानाचं काय झालं असंल, कोन बघतंय?"

कधी खिडकीतून बाहेर बघत बसायचे. कधी बाल्कनीत उभं राहायचे, नजर मात्र लांब कुठेतरी हरवलेली. त्या वेळी मला वाटायचं — शहर एवढं छान आहे, तरी आजोबांना का आवडत नाही? आज समजतं — ज्याचं आयुष्य मातीत गेलेलं असतं, त्यांना सिमेंटच्या चार भिंती कधीच आपल्याशा वाटू शकत नाही. मग बिचारी आजी, मन मारून पुन्हा गावाची वाट धरायची.

माझ्यासाठी मात्र गाव म्हणजे आजोबा. मी उठलो की ते माझ्या मागे. मी धावलो की ते माझ्या मागे. मी पडलो तर आधी धावत येणारेही तेच. म्हणतात ना, नातवाचा पहिला मित्र आजोबाच असतो — तसंच काहीसं आमचं होतं. क्रिकेट, पकडापकडी, पत्ते, लपाछपी — गावी गेलो की हे सगळं ठरलेलं असायचं. ते बॅट धरायचे तेव्हा त्यांचा नेहमीचा एकच डायलॉग असायचा — "बघ हा, आजोबाची बॅटिंग म्हणजे काय चीज हाय ती!" आणि मग चेंडू टोलवत, स्वतःच हसत हसत रन काढायचे.

पण त्याहून जास्त मला आठवतं ते म्हणजे त्यांच्यासोबत रानात जाणं.

एका सकाळी त्यांनी माझा हात धरला. "चल बावा... तुका रान दाखवतंय."

आणि मी त्यांची वाट धरली. घर मागे राहिलं. मग शेती सुरू झाली. नंतर पायवाट. मग झाडं. मग अजून झाडं. पानांतून गाळणारं ऊन जमिनीवर ठिपके तयार करत होतं. थोड्या वेळाने मला जाणवलं — आपण खूप आत आलो आहोत. आजोबा मात्र अगदी निर्धास्त चालले होते, जणू त्या रानाचा प्रत्येक कोपरा त्यांच्या तळहातावर कोरलेला होता.

ते प्रत्येक झाडाकडे बोट दाखवत काहीतरी सांगत होते. "हे बग आंब्याचं झाड." "ही जांभूळ." "हे काजू." "ही करवंदाची जाळी." त्यांना जंगल पुस्तकासारखं पाठ होतं. एका झाडाजवळ थांबून ते म्हणाले, "हे बघ, ह्या फणसाच्या झाडाखाली मी लहानपणी दिवसच्या दिवस घालवलेत, बावा."

थोड्या वेळाने त्यांनी खाली वाकून एक पान तोडलं, माझ्या हातात ठेवलं. "हे लक्षात ठेव र्‍ह. रानात एखादा छोटा किडा किंवा मुंगी चावली, खाज सुटली तर ह्येचा पाला चोळला की आराम पडतंय."

एका ठिकाणी त्यांनी मातीवरच्या पावलांचे ठसे दाखवले. "हे बघ... हा सशाचा ठसा." मी आश्चर्याने खाली पाहत राहिलो. माझ्यासाठी ते जंगल होतं. त्यांच्यासाठी — ते घर होतं.

थोड्या वेळाने त्यांनी मला थांबवलं. "बावा... एक गोष्ट लक्षात ठेव."

मी मान हलवली.

"रानात कवा हरवलास... तर भ्यायचं न्हाई."

"मग?"

"समदयात आधी पाण्याचा आवाज शोधायचा."

"का?"

"कारण नदी माणसाला गावापर्यंत घेऊन जातंय."

मी तेव्हा फक्त ऐकत होतो. पण आजही ते सगळं माझ्या मनात तसंच आहे.

ते पुढे म्हणाले, "समदं खायाला नसतंय. दर एक फळ गोड दिसलं म्हणून खायाचं नसतंय. काई झाडं औषध असत्यात... काई इष."

त्यांनी मला थांबवून कान द्यायला शिकवलं — "हितं थांब, नुसतं ऐक." आम्ही दोघे काही क्षण नुसतेच उभे राहिलो. आणि मग रानाचे आवाज माझ्या कानात एकेक करून उलगडू लागले — पानांची सळसळ, दूरवरचं पक्ष्यांचं ओरडणं, कुठेतरी वाहणाऱ्या पाण्याचा हलकासा आवाज. हे सगळं ते मला वाचायला शिकवायचे. सूर्य कुठे उगवतो ते पाहून दिशा कशी ठरवायची, मुंग्यांची रांग कुठे जाते ते कसं पाहायचं, कोरड्या ओढ्यातून पाणी कुठे मिळू शकतं, रानात कधी उगाच ओरडायचं नाही — हे सगळं त्यांनी मला शिकवलं. आणि सर्वात महत्त्वाचं — "रानावर कवा मालकी गाजवायची न्हाई, बावा. आपण हितं पावणे असतंय." त्यांच्याकडून मी आयुष्याचा धडा शिकत होतो.

एकदा असंच आम्ही रानात हिंडून घरी परतलो. यावेळी घरी परतायला जरा उशीरच झाला होता. सूर्य मावळतीला टेकला होता, आणि आकाशात नारिंगी-जांभळ्या छटा पसरल्या होत्या. दारात आजी हात कमरेवर ठेवून उभी होती. तिच्या चेहऱ्यावरचा राग पाहून मी मान खाली करून उभा राहिलो.

"अवं! एवढ्या ल्हान पोराला कुठं घेऊन गेला व्हतास?"

आजोबा शांतपणे म्हणाले, "रानात."

"रानात म्हंजे काय? किती येळ झाला ठाव हाय का?"

आजोबांनी माझ्याकडे पाहिलं. मी त्यांच्याकडे पाहिलं. आणि आम्ही दोघेही डोळ्यांनीच हसलो.

रात्री जेवणानंतर त्यांनी मला जवळ बसवलं. हळू आवाजात म्हणाले, "बावा..."

"हं?"

"आज आपण लई आत गेलो व्हतो... हे घरी सांगायचं न्हाई हा."

मी हसलो. "नाही सांगणार."

त्यांनी हात पुढे केला. "पक्का?"

मी माझा छोटासा हात त्यांच्या हातावर ठेवला. "पक्का."

तो आमच्या दोघांमधला पहिला गुपित करार होता.


प्रकरण २.

हट्टाचा प्रवास:


हळूहळू आम्ही मोठे होत गेलो, आणि आजी-आजोबा थकत गेले. या दोन ओळींमधल्या अंतरात किती तरी वर्षं गेली, किती तरी उन्हाळे गेले — पण एक दिवस असा आला, ज्याने सगळं बदलून टाकलं.

२००५ साल. आजी गेली.

आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आजोबांचा एकटेपणाचा, खडतर प्रवास सुरू झाला.

आजी असताना त्यांचा राग, त्यांचा हट्टीपणा — या सगळ्याला एक आधार होता, एक जागा होती जिथे तो शमायचा. ती रागावली, की तेवढ्यापुरते शांत व्हायचे. ती समजावायची, तेव्हा ऐकायचे. आजी गेल्यावर तो आधारच निखळून गेला, आणि आजोबा जणू मुळापासून हलले.

आजोबा आधीपेक्षा जास्त चिडचिडे झाले. कुणाचंच काही त्यांना पटेनासं झालं. सगळ्यांशी भांडू लागले. पहाटे अंधार असतानाच उठून, कुणाला काही न सांगता एकटेच रानात निघून जायचे — कधी कधी दुपार टळून गेली, तरी त्यांचा पत्ता नसायचा. कुणी जेवायला बोलावलं, तर जायचे नाहीत. चुलीजवळ बसून स्वतःच्या हाताने भाकरी थापायचे, तिखट-मीठ कालवून एकटेच खायचे. प्रचंड हट्टी झाले होते. अंगात कणकण भरली, तापाने अंग फणफणलं, तरी डॉक्टरकडे जायचं नाव काढायचे नाहीत.

मग गावाकडून बाबांना फोन यायचा — "आजोबा ऐकत नाहीयेत. आजारी पडलेत." बाबा गावी जाऊन त्यांना समजावून यायचे. काकांना सांगून जेवणाच ताट नियमित पोहोचवण्याची व्यवस्था करायचे. पण काही दिवसांतच पुन्हा तेच चक्र सुरू व्हायचं — जणू एक न संपणारं वर्तुळ.

शेवटी बाबांनी एक निर्णय घेतला — आजोबांना पुण्याला आणायचं.

सुरुवातीला त्यांनी थोडं जमवून घेतलं. आम्ही घरीच असायचो, त्यामुळे दिवस बरा जायचा त्यांचा. पण आम्हाला शाळा असायची, अभ्यास असायचा. घर दिवसभर रिकामं व्हायचं, आणि त्या रिकाम्या घरात आजोबा एकटे बसून राहायचे — भिंतीकडे, खिडकीबाहेर, कधी नुसतेच शून्यात बघत. हळूहळू त्यांना हे शहरातलं बंदिस्त आयुष्य कंटाळवाणं वाटू लागलं. आणि एकच रट सुरू झाली — "मला गावाकडं धाडा. मला गावाकडं धाडा."

रोज तेच ऐकून, शेवटी बाबांनी आणि काकांनी मिळून एक तडजोड ठरवली — आजोबांना परत गावी सोडायचं, पण काही अटींवर. जेवण रोज काकांकडेच करायचं. रानात फार लांब, एकटं जायचं नाही. काही लागलं, खुपलं, दुखलं तर लगेच कुणाला तरी सांगायचं. आजोबांनी त्या क्षणी मान डोलावत सगळ्या अटी मान्य केल्या — "व्हय व्हय, समदं ऐकतंय मी" — आणि बाबांनी त्यांना पुन्हा गावी नेऊन सोडलं.

पण गावी गेल्यावर मात्र जुनं चक्र पुन्हा सुरू झालं. काकांकडे जेवायला जायचे नाहीत, स्वतःच बनवून खायचे. रानात एकटेच, तासन् तास आत निघून जायचे, कुणाला काही सांगायचे नाहीत. एक-दोन महिने गेले आणि पुन्हा गावाकडून काकांचे फोन यायला लागले — "आजोबा ऐकत नाहीयेत." बाबा फोनवरून त्यांना समजावायचे, आणि आता या समजावण्यात फक्त बाबाच नाही, तर माझ्या तिन्ही आत्यांनीही खूप प्रयत्न केले. पण आजोबांचं वय जसं वाढत होतं, तसा त्यांचा हट्टीपणाही वाढतच होता — जणू दोन्ही एकमेकांशी शर्यत लावून पुढे जात होते.

असाच एक दिवस, संध्याकाळी, बाबांना काकांचा फोन आला — "आजोबा पडलेत."

गावी घरात ते एकटेच राहायचे, पण त्यांची चाहूल आजूबाजूला नेहमीच जाणवायची — कधी अंगणातून येणारा त्यांचा खोकल्याचा आवाज, कधी गोठ्यात गुरांशी बोलल्याचा आवाज. त्या दिवशी मात्र सकाळपासून आजोबा कुठेच दिसले नाहीत, म्हणून काका — बाबांचे चुलत भाऊ, पण सख्ख्या भावासारखे — त्यांच्यावर सारखं लक्ष ठेवून होते. घरं शेजारी शेजारी असल्याने आम्ही आजोबांना नेहमी काकांकडे जेवायला जा म्हणायचो. रोज जाणं बर वाटत नसेल, तर काका म्हणायचे, "मी ताट घेवन येत जाईन" पण आजोबा ऐकायचे नाहीत — "नको रे बाबा, मला जमतंय स्वताचं."

सकाळपासून आजोबा दिसत नाहीत म्हणून काका अस्वस्थ होते. एकदा अंगणातून हाक मारली, एकदा गोठ्याकडे जाऊन बघितलं — कुठेच पत्ता नाही. संध्याकाळ होत आली, तरी आजोबा दिसले नाहीत, म्हणून त्यांनी घराच्या खिडक्यांमधून डोकावून पाहायला सुरुवात केली. आजोबा कुठेच दिसत नव्हते. मन धास्तावलं. शेवटी बाथरूमच्या खिडकीतून वाकून पाहिलं, तर आतलं दृश्य बघून काकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला — आजोबा चक्कर येऊन पडले होते, हातपाय शांत, कसलीच हालचाल नाही.

काकांनी लगेच मोठ्याने आरोळी ठोकली. क्षणात गावात बातमी पसरली, आणि सगळे धावत आले. बाथरूमचा पत्रा काढून आत गेले आणि त्यांना अलगद बाहेर काढलं.

बाबांनी हे सगळं ऐकताच गाडीला चावी लावली आणि निघाले. आईने बाबांना निघतानाच सांगितलं होतं — "तिकडे जाऊन चिडचिड करू नका. प्रेमाने समजवा." आणि बाबांनी तेच केलं. गावी जाऊन आजोबांना एका शब्दानेही रागावले नाहीत. "काय झालं, कसं पडलात" एवढंच शांतपणे विचारलं. आजोबांचा चेहरा ओशाळलेला होता, नजर जमिनीकडे. बाबा हळुवारपणे म्हणाले — "चला, थोडं औषध आणूया, दवाखान्यात जाऊन येऊ." असं सांगत सांगतच, गुपचूप त्यांचे कपडे एका बॅगेत भरले, आणि आजोबांना थेट पुण्यात घेऊन आले — यावेळी कायमचं.

रस्त्यात आजोबांनी दोन-तीनदा विचारलं, "आपण कुठे चाललोय रे?" बाबा काहीच बोलले नाहीत, फक्त गाडी चालवत राहिले, नजर रस्त्यावर खिळलेली. पण आजोबांना तोपर्यंत कळून चुकलं होतं. गाडीच्या खिडकीबाहेर मागे पडणारं गाव बघत ते गप्प बसले. कदाचित त्याच क्षणी त्यांना जाणीव झाली असावी — आता आपण इथेच, पुण्यातच राहणार.

या वेळी पुण्यात आले, तेव्हा मात्र आजोबा खूप शांत शांत झाले होते. घराबाहेर पडायचे नाहीत. आम्ही त्यांना समजवायचो — "थोडं बाहेर पडा. पार्किंगमध्ये फिरा. वर टेरेस आहे, तिथे वेळ घालवा." पण नाही. त्यांनी स्वतःची खोलीही सोडली नाही. त्या खोलीला लागून एक बाल्कनी होती — तिथल्या कुंड्यांमधल्या झाडांची काळजी घेणं, त्यांना खत-पाणी घालणं, एवढंच त्यांनी सुरू ठेवलं. रोज सकाळी त्या दोन-तीन कुंड्यांशी ते बराच वेळ रेंगाळायचे, पानांना हात लावायचे, जणू तीच झाडं त्यांच्या शेताची शेवटची खूण होती. पण खोलीबाहेर, हॉल किंवा स्वयंपाकघरात यायचे नाहीत.

त्यामुळे माझी एक जबाबदारी ठरून गेली होती — त्यांच्या जेवणाचं ताट नेऊन देणं, आणि त्यांच्या पाण्याचा तांब्या रिकामा तर नाही ना, हे बघणं. रोज पाच-सहा वेळा मी त्यांच्या खोलीत डोकावायचो, तांब्या उचलून बघायचो, आणि गरज असेल तर परत भरून ठेवायचो.

हळूहळू त्यांचा स्वभाव, त्यांचा आवाज नरम पडत चालला होता. पण ते आता गावी जायचा विषय काढेनासे झाले होते. घरात माझ्याशिवाय कुणाशी बोलायचे नाहीत. कधी मला त्यांच्या शाळेतले किस्से सांगायचे — कसे ते शाळेला दांडी मारून रानात फिरायचे. बाबांच्या लहानपणीच्या खोड्या सांगायचे, हसत हसत. तर कधी आजीबरोबरची जुनी भांडणं आठवून डोळ्यांत हलकं पाणी आणायचे.

कधी कधी, जर मी त्यांच्यासोबत असेन आणि घरी दुसरं कुणी नसेल, तर ते हळूच चाहूल घेऊन यायचे आणि दबक्या आवाजात म्हणायचे — "बावा, मला गावाला धाडशील?" त्यांची ती निरागसता पाहून माझं मन हलायचं. मी त्यांना समजवायचा प्रयत्न करायचो — "तुम्ही गावी एकटे राहता. मागे बाथरूममध्ये पडलात, तसं परत पडलात तर? रानात एकटे जाता, स्वतःचं जेवण बनवता... काकांकडे जेवणार असाल तरच मी बाबांना सांगेन." पण त्यावर ते पुन्हा गप्प व्हायचे, आणि खोलीत निघून जायचे.

खरं तर ते खूप स्वावलंबी होते. स्वतःची कामं स्वतः करायची सवय होती त्यांना — स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे, स्वतःचं जेवणाचं ताटही स्वतः धुऊन ठेवायचे. कुणावर अवलंबून राहणं त्यांच्या स्वभावातच नव्हतं.

मला अजून आठवतो तो एक दिवस, जेव्हा घरी फक्त मी आणि आजोबा होतो. मी नेहमीप्रमाणे त्यांच्या तांब्यात पाणी आहे का हे बघायला त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा ते म्हणाले, "बावा, घरात कोन न्हाई का?" मी "नाही" म्हणालो आणि लगेच बाहेर आलो — कारण मला माहीत होतं, ते आता मला परत विनंती करणार, "मला गावाकडं घेवन चल."

त्यांनी मला दोन-तीन वेळा हाक मारली, पण मी ओ दिली नाही. त्यांची ती मागणी पूर्ण करणं माझ्या हातात नव्हतं. एका बाजूने बाबाही बरोबर होते — त्यांना आजोबांची काळजी होती. आणि दुसरीकडे आजोबांना कोंडल्यासारखं झालं होतं, हेही मला जाणवत होतं.

आवाज देत देत ते पहिल्यांदाच स्वतःच्या खोलीबाहेर, हॉलपर्यंत आले. त्यांच्या पावलांचा हलका आवाज मला ऐकू येत होता. आणि माझाही जीव घाबरा झाला — आता त्यांना कसं सामोरं जायचं. म्हणून मी गुपचूप हॉलच्या पडद्यामागे लपून उभा राहिलो, श्वास रोखून.

त्यांनी दोन-तीन वेळा मला हाक मारली — "बावाऽऽ." मी काहीच बोललो नाही. थोडा वेळ शांतता पसरली. मला माहीत नाही त्यांनी मला पाहिलं की नाही, पण थोड्या वेळाने ते पुन्हा त्यांच्या खोलीत जाऊन बसले.


प्रकरण ३.

शेवटचा घोट:

पुढे दिवसामागून दिवस गेले, आणि आजोबांची तब्येत हळूहळू खालावू लागली. सुरुवातीला फक्त थकवा जाणवायचा त्यांना. पूर्वी ज्या उत्साहाने ते पहाटे उठायचे, तो उत्साह आता मावळू लागला होता. जेवण कमी झालं. बाल्कनीतल्या झाडांची काळजी घेणंही मंदावलं. आधी ते रोज सकाळी उठून स्वतः त्या झाडांना पाणी घालायचे, पानांना हळुवार स्पर्श करायचे — आता ते दोन-तीन दिवसांतून एकदा व्हायला लागलं. काही कुंड्यांमधली माती वाळून तडे जाऊ लागली होती, जणू आजोबांच्याच शरीराप्रमाणे तीही थकत चालली होती.

मग एक दिवस त्यांना ताप भरला. आम्ही डॉक्टरांना घरी बोलावलं. औषधं सुरू झाली, पण फार फरक पडला नाही. ताप उतरायचा, परत यायचा — जणू शरीराशी काहीतरी लपंडाव खेळत होतं. हळूहळू ते अंथरुणातून उठणंही कमी झालं. आधी जेवढं ते स्वावलंबी होते, तेवढेच आता परावलंबी होत चालले होते. मी नेऊन दिलेलं ताट आता ते पूर्ण संपवत नसत. दोन घास खाऊन, "बास बावा, नको आता" म्हणत ताट बाजूला ठेवत.

दिवसामागून दिवस असेच गेले. त्यांचं बोलणं कमी होत गेलं. आधी जे मला त्यांचे शाळेतले किस्से सांगायचे, बाबांच्या खोड्या सांगायचे — ते आता नुसते ऐकत राहायचे, मान हलकीशी डोलावायचे, किंवा डोळे मिटून पडून राहायचे. खोलीत शिरलं की त्यांच्या श्वासांचा आवाज तेवढा ऐकू यायचा, बाकी सामसूम.

एक दिवस डॉक्टरांनी परत घरी येऊन तपासलं. स्टेथोस्कोप कानातून काढत, चष्मा सारखा करत, त्यांनी बाबांना बाजूला घेतलं आणि स्पष्ट सांगितलं — "आता फार तर चार-पाच दिवस."

ते शब्द ऐकून घरात एक वेगळीच शांतता पसरली. कुणीच काही बोललं नाही, पण प्रत्येकाच्या डोक्यात तेच एक वाक्य फिरत राहिलं.

हळूहळू ही बातमी सगळ्या नातेवाइकांपर्यंत पोहोचली. फोन एकामागोमाग एक वाजू लागले. एक-एक करून सगळे भेटायला येऊ लागले. घरातलं वातावरण बदलून गेलं. नेहमी शांत असणारं घर आता माणसांनी भरून गेलं होतं — पाहुण्यांचे आवाज, बॅगांचा आवाज, दाराची घंटा वाजतच राहायची. पण त्या गर्दीतही एक विचित्र, जड शांतता होती. हसणं-बोलणं दबक्या आवाजात सुरू होतं, जणू मोठ्याने बोललं तर काहीतरी तुटेल.

आता आजोबांना कुणाची ओळखही राहिली नव्हती, कुणाशी बोलतही नव्हते. त्यांनी जेवणही पूर्णपणे सोडलं होतं. माझ्या तिन्ही आत्यांपैकी दोघी आधीच येऊन पोहोचल्या होत्या. तिसरी अजून यायची होती — तिचा प्रवास लांबचा होता, त्यामुळे तिला पोहोचायला वेळ लागणार होता.

त्या दिवशी दोन आत्या, बाबा आणि आई आजोबांच्या खोलीतच बसून होते. त्यांचे जुने किस्से आठवत होते. कुणी शाळेतल्या दिवसांबद्दल बोलत होतं, कुणी आजोबांच्या हट्टीपणाबद्दल हसत हसत सांगत होतं — "आठवतंय, आप्पा कसे रानातनं भर दुपारी घरला यायचे, अंगावर काटे-कुटे घेऊन, आणि आईला बोलायचे 'मला काय बी लागलं न्हाई गं'!" कुणाच्या डोळ्यात नकळत पाणी येत होतं. हसणं आणि रडणं एकाच वेळी सुरू होतं त्या खोलीत, जणू आनंद आणि दुःख हातात हात घालून बसले होते.

बोलता बोलता मोठी आत्या अचानक थांबली. आजोबांकडे बघत राहिली — त्यांचा श्वास, त्यांचा चेहरा, बारकाईने न्याहाळत. मग सगळ्यांकडे वळून हळू आवाजात म्हणाली — "चला... सगळ्यांनी एकदा पाणी पाजा त्यांका."

खोलीतलं हसणं क्षणात विरून गेलं. कुणीच काही विचारलं नाही, कुणी काही बोललं नाही. बाबा, आई आणि दोन्ही आत्या एकामागोमाग एक पुढे झाले आणि चमच्याने त्यांना पाणी पाजू लागले. प्रत्येकाच्या हातातला चमचा किंचित थरथरत होता.

तेवढ्यात तिसरी आत्या येऊन पोहोचली. दाराशीच तिचा जीव कासावीस झालेला दिसत होता. ती आत आली, तशी तिने बॅग खाली ठेवलीही नाही, चपला उतरवायचंही भान राहिलं नाही. सगळ्यांनी लगेच तिला जवळ घेतलं आणि म्हणाल्या — "आधी आप्पांका पाणी पाज." दुसरं काहीही न बोलता, ती थेट आजोबांच्या बिछान्याजवळ गेली आणि चमचा उचलून त्यांना पाणी पाजलं.

ते बघून माझ्या मनात एक विचित्र भावना दाटून आली. मी नेहमी त्यांचं जेवण-पाणी नेऊन द्यायचो. त्यांचा तांब्या कधी रिकामा होऊ दिला नाही. दिवसातून कितीतरी वेळा त्यांच्या खोलीत डोकावून बघायचो — तांब्यात पाणी आहे ना, ताट व्यवस्थित आहे ना. इतकं सगळं करूनही, आज या क्षणी, मला कुणीच म्हणालं नाही — "तूही पाणी पाज." मला थोडं वाईट वाटत होतं, आणि मनात एक चलबिचलही होती — मलाही त्यांना पाणी पाजायचं होतं. एकदा तरी, माझ्या हाताने.

मी कुणाला बोलून दाखवलं नाही. फक्त एका संधीची वाट पाहत राहिलो — कधी सगळे थोडा वेळ आजोबांपासून दूर होतील, आणि मी एकटाच जाऊन, स्वतःच्या हाताने त्यांना चमच्याने पाणी पाजेन.

दुपारी जेवणाच्या वेळी ती संधी आली. सगळे जेवायला बसले होते, मी माझं जेवण घाईघाईने आटपलं आणि आजोबांच्या खोलीकडे धावलो. खोलीत एक वेगळीच शांतता पसरली होती — फक्त पंख्याचा घरघर आवाज.

मी अलगद त्यांच्या खोलीत गेलो. दार हलकंसं लोटलेलं होतं. ते निपचित पंख्याकडे डोळे लावून झोपले होते — ना काही हालचाल, ना काही चाहूल. त्यांच्या शरीराकडे मी काही क्षण नुसताच पाहत राहिलो. त्या चेहऱ्यात, ज्याने मला रान दाखवलं होतं, ज्याने माझा हात धरून पायवाटा शिकवल्या होत्या, ज्याने हसत हसत "बघ हा, आजोबाची बॅटिंग म्हणजे काय चीज हाय ती" म्हणत चेंडू टोलवला होता — तो चेहरा आज इतका शांत, इतका थकलेला वाटत होता. त्यांच्या हातांच्या नसा स्पष्ट दिसत होत्या, गाल आत ओढल्यासारखे वाटत होते.

मग मी हळूच त्यांचा तांब्या घेतला. तोच जुना पितळी तांब्या, जो मी वर्षानुवर्षं भरून ठेवायचो. चमच्यात पाणी भरलं आणि थरथरत्या हाताने त्यांच्या तोंडाशी नेलं — आणि तेवढ्यात मला दिसलं की, थोड्या वेळापूर्वी तिसऱ्या आत्येने जे पाणी पाजलं होतं, तेही अजून त्यांनी गिळलेलं नव्हतं.

माझ्या अंगावर काटा आला. त्यांना आता गिळताच येत नव्हतं. माझी काही हिंमत झाली नाही. हातातला चमचा तसाच थरथरत राहिला, त्यातलं पाणी थोडं सांडलंही. मी पाणी परत तांब्यात ओतलं, तांब्या जागेवर ठेवला, आणि खोलीबाहेर डोळे पुसत आलो.

त्या रात्री, मोठी आत्या आणि बाबा आजोबांजवळ जाऊन बसले. खोलीत मंद दिवा लावलेला होता, बाकी सगळीकडे अंधार. आत्याने त्यांच्या डोक्यावरून हळुवार हात फिरवला आणि हळू आवाजात विचारलं — "आप्पा... कशात अडकलंय का जीव तुमचा? आता डोळे मिटा."

काही क्षण शांतता पसरली. फक्त त्यांच्या श्वासाचा आवाज. मग बाबा त्यांच्या कानाशी वाकले आणि हळुवार आवाजात म्हणाले — "आप्पा, तुम्ही आता काळजी करू नका. तुमचे शेवटचे सगळे विधी मी गावच्या घरी जाऊनच करेन. शब्द देतो तुम्हाला."

खोलीत एक भयाण शांतता पसरली होती. फक्त त्यांची घर लागल्याचा तो आवाज ऐकू येत होता — एक पातळसा, घरघरणारा आवाज, जो ऐकणाऱ्याच्या काळजाचा ठोका चुकवत होता. आम्ही सगळे दाराशी उभे राहून हे बघत होतो — कुणीच काही बोलत नव्हतं. कुणाचा हात कुणाच्या खांद्यावर होता, कुणी ओठ घट्ट दाबून उभं होतं.

हळूहळू तो आवाजही मंदावत गेला. जणू शरीरच आता निरोप घेण्याच्या तयारीत होतं. खोलीतली शांतता अजूनच गडद होत गेली, इतकी की भिंतीचं घड्याळ टिकटिक करतंय हेही स्पष्ट ऐकू येऊ लागलं.

आणि त्याच रात्री आजोबा गेले.

दुसऱ्या दिवशी पहाटेपासूनच घरात एकच लगबग सुरू झाली. रात्रभर कुणीच नीट झोपलं नव्हतं. डोळे सुजलेले, चेहरे थकलेले — पण करण्यासारखं खूप काही होतं, त्यामुळे दुःखालाही थांबायला वेळ नव्हता.

सकाळी लवकरच ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली गेली. आजोबांना गावी, कोळकेवाडीलाच घेऊन जायचं होतं — तिथेच जिथे त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य घालवलं होतं, तिथेच शेवटचा प्रवासही पूर्ण व्हायचा होता.

बातमी वाऱ्यासारखी पसरली. पुण्यात राहणारे गावाकडचे काही लोक, आमचे जवळचे नातेवाईक — फोन खणखणू लागले, एकामागोमाग एक सगळे घरी येऊ लागले. काही जण थेट गावाकडेच निघाले. प्रत्येकाने आपापल्या गाड्या काढल्या. घराबाहेर गाड्यांची रांग लागली.

निघताना घरातलं वातावरण जड होतं. कुणी सामान भरत होतं, कुणी लहान मुलांना सांभाळत होतं, कुणी नुसतंच स्तब्ध उभं राहून सगळं बघत होतं. मी बाबांच्या मागे मागे फिरत होतो, त्यांना एवढ हतबल झालेलं मी कधी पाहिलं नव्हतं. एरवी गावी जाताना जो उत्साह असायचा, आज त्याच रस्त्यावर एक वेगळीच उदासीनता होती.

आम्ही सगळे निघालो. गाडीत शांतता होती. कुणीच फार बोलत नव्हतं. मी खिडकीबाहेर बघत राहिलो — तीच वाट, ज्यावरून लहानपणी आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत हसत-खेळत जायचो, आज त्याच वाटेवरून आम्ही आजोबांना कायमचं घरी घेऊन जात होतो.

गावी पोहोचलो, तेव्हा अख्खं गाव जमलं होतं. ज्या अंगणात आजोबा रोज उभे राहायचे, तेच अंगण आज माणसांनी भरून गेलं होतं. ज्यांनी त्यांना लहानपणापासून ओळखलं होतं, ज्यांच्यासोबत त्यांनी शेतात राबून आयुष्य घालवलं होतं — ते सगळे आज त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आले होते. कुणी डोळे पुसत होतं, कुणी शांतपणे हात जोडून उभं होतं. गोठ्यातली गुरंही आज विचित्र शांत उभी होती, जणू त्यांनाही काहीतरी जाणवत होतं.

सगळे विधी यथासांग पार पडले. गावातल्या रीतीरिवाजाप्रमाणे एकेक टप्पा पूर्ण होत गेला, आणि त्या कोळकेवाडीच्या मातीने आपल्या याच मुलाला, विश्राम लक्ष्मण कदमांना, कायमचं आपल्यात सामावून घेतलं.

संध्याकाळपर्यंत सगळं संपलं. आणि मग मला व माझ्या लहान भावाला परत पुण्याला निघण्याचे निर्देश दिले गेले — कारण माझं कॉलेज आणि भावाची शाळा १२ दिवस बुडवणं शक्य नव्हतं. मन तयार नव्हतं जायला, पण जबाबदाऱ्या थांबत नाहीत — हे शिकवण्यासाठी जणू आजोबाच शेवटचा धडा देऊन गेले होते.


प्रकरण ४.

बावाsss:

आम्ही घरी परतलो. दारातून आत पाऊल टाकताना एक विचित्र भावना दाटून आली. घर तेच होतं — तीच भिंत, तोच सोफा, तोच टीव्ही — पण काहीतरी हरवल्यासारखं वाटत होतं. इतकी वर्षं ज्या खोलीत आजोबा राहिले, आज तिथे कुणीच नव्हतं. त्या खोलीचं दार बंद होतं, आणि त्या बंद दारावर नजर पडली, की छातीत काहीतरी धस्स व्हायचं — जणू आतून कुणीतरी बघतंय, कुणीतरी अजूनही तिथेच आहे.

मी आणि माझ्या भावाने त्याच रात्री एक गोष्ट ठरवली — जोपर्यंत आई-बाबा गावाहून परत येत नाहीत, तोपर्यंत आपण त्या खोलीचं दार उघडायचं नाही. आम्हाला स्पष्टपणे कशाची भीती वाटत होती, हेही सांगता येत नव्हतं — कारण म्हणायला काहीच घडलं नव्हतं. पण तरीही, त्या बंद दाराकडे नजर गेली, की मनात एक अनामिक अस्वस्थता दाटून यायची.

घर विलक्षण शांत भासत होतं. नेहमी ज्या घरात आजोबांच्या खोलीतून हलकासा खोकल्याचा आवाज यायचा, तांब्याचा खणखणाट यायचा — आज तिथे नुसती शांतता होती.

आम्ही घरी पोहोचलो त्या रात्री आई-बाबांनी फोनवर आमची विचारपूस केली. "घाबरू नका. भीती वाटली तर शेजारच्यांकडे झोपायला जा, किंवा मित्रांना घरी बोलवा," असं सांगितलं. पण आम्ही यातलं काहीच केलं नाही. फक्त आजोबांच्या खोलीचं दार नीट लावून घेतलं, त्याला हलकासा धक्का देऊन खात्री करून घेतली की व्यवस्थित लागलंय, आणि आपल्या खोलीत जाऊन झोपलो.

दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आईचा फोन आला. "झोप लागली का... नाश्ता करून घ्या," असं नेहमीचं बोलणं सुरू होतं. आणि अचानक, बोलता बोलता, बाबा मध्येच म्हणाले — "तुम्हाला काही स्वप्न वगैरे आलं का आजोबांचं? काही स्वप्न पडलं तर सांगा."

हे ऐकताच माझ्या अंगावर एक शिरशिरी आली. फोन ठेवल्यावर मी नकळत त्या बंद दाराकडे बघितलं. हृदयाचा ठोका किंचित चुकला. का विचारलं असेल बाबांनी हे? काही झालं आहे का तिकडे, गावी? की त्यांना स्वतःला काही जाणवलं असेल?

त्या रात्री झोपताना मी मनातल्या मनात एक प्रार्थना केली — डोळे घट्ट मिटून, हात जोडून — "आजोबा... तुम्हाला जर कधी स्वप्नात यायचंच असेल, तर आत्ता येऊ नका. मला खूप भीती वाटेल." दिवस उजाडला, पण तसं काही घडलं नाही, आणि मी सुटकेचा नि:श्वास टाकला.

बाराव्याला परत गावी जाणं होतं. मी आणि माझा लहान भाऊ, आमच्या काही नातेवाइकांबरोबर निघालो. बारावा, तेराव्याचे सगळे विधी पार पडले — गावातल्या रीतीरिवाजाप्रमाणे, ब्राह्मणांचे मंत्र, कावळ्याला ठेवलेला नैवेद्य, सगळं यथासांग.

आता आम्ही पुण्यात परतलो. आई-बाबांनी सगळ्यात आधी आजोबांची खोली उघडली — दार-खिडक्या सताड उघडल्या. आतली कोंदट हवा हळूहळू निघून गेली, आणि उन्हाचा एक कवडसा त्या खोलीत पहिल्यांदाच इतक्या दिवसांनी सरळ आत आला. आईने ती खोली नीट स्वच्छ केली, बाल्कनीतल्या कुंड्यांना पाणी घातलं — त्या वाळलेल्या मातीत पुन्हा ओलावा आला. त्या खोलीत धूप, अगरबत्ती लावली, भजन लावलं. हळूहळू खोलीचा तो जडपणा निवळत गेला, आणि आमच्यातली ती भीतीही हळूहळू कमी होत गेली.

दिवसामागून दिवस गेले. आजोबा जाऊन जवळपास एक महिना झाला असेल.

आणि अचानक एक दिवस — माझ्या स्वप्नात आजोबा आले.

खूप छोटं स्वप्न म्हणू शकतो आपण. ते माझ्या पाठीमागे उभे होते. मी मागे वळून त्यांना बघितलं, आणि दचकून जागा झालो. हृदय धडधडत होतं, अंधारात डोळे उघडे ठेवून मी काही क्षण नुसताच पडून राहिलो.

त्यानंतर सलग २-३ दिवस हाच प्रकार चालू होता. मला ते अचानक दिसायचे, आणि मी दचकून जागा व्हायचो. मी घरी कुणाला याबद्दल बोललो नाही — हा अनुभव मी पहिल्यांदाच माझ्या लिखाणाच्या मार्गाने व्यक्त करतोय, याआधी कधी कुणाला सांगितलंच नाही.

हळूहळू त्यांच स्वप्नात येण्याचा प्रकार वाढू लागला. मी झोपेत ओरडायचो, घामाघूम व्हायचो. पण मला कळत नव्हतं असं का होतंय. एका रात्री अचानक असंच आजोबा स्वप्नात आले, माझ्या मागे उभे राहिले, आणि मी दचकून जागा झालो. यावेळी मात्र मी उठून बसलो. अंधारात डोळे विस्फारून बसून राहिलो. मग परत डोळे मिटले, स्वप्न पुन्हा डोळ्यासमोर आणलं, बारकाईने आठवायचा प्रयत्न केला — पण त्याचा अर्थ लागण्यासारखं काहीच नव्हतं.

तेव्हा मी खूप त्रस्त होऊन, जवळजवळ रागातच, आजोबांना मनातल्या मनात म्हणालो — "अहो, काय हवंय तुम्हाला? किती दिवस असे स्वप्नात येणार आहात? मी घाबरतोय, मला झोप लागत नाहीये... तुम्हाला नक्की काय हवंय?" असं बोलून मी झोपून गेलो. त्या रात्री मला परत आजोबांचं स्वप्न पडलं नाही.

आता दुसरी रात्र. मी आजही ओरडून दचकून जागा होणार, हाच विचार मनात ठेवून झोपलो. मन थकलं होतं, पण झोप डोळ्यात नव्हती. बराच वेळ अंधाराकडे बघत पडून राहिलो, खिडकीबाहेरच्या दिव्याचा हलकासा प्रकाश भिंतीवर पडत होता, आणि कधीतरी डोळा लागला.

आणि ज्याची कल्पना होती, तेच झालं — आजोबा परत माझ्या स्वप्नात आले.

ते माझ्या पाठीमागे उभे होते. मला त्यांची चाहूल जाणवली — तीच जुनी चाहूल, जी लहानपणी रानात चालताना मला नेहमी मागे जाणवायची, तोच जुना, ओळखीचा स्पर्श. त्यांनी मला हाक मारली — "बावाss... बावाssss..."

तो आवाज ऐकताच माझ्या छातीत धस्स झालं. मी मागे न बघता सरळ पुढे निघून आलो. पावलं जड होती, पण मी थांबलो नाही. ते माझ्या मागे मागे यायला लागले — त्यांच्या खोलीतून, हळूहळू हॉलपर्यंत. त्यांची पावलं मला मागून ऐकू येत होती, हलकीशी, तरीही स्पष्ट. मी वळून बघायचं धाडस केलं नाही. मी गपचूप हॉलच्या पडद्यामागे लपून उभा राहिलो, श्वास रोखून. हृदयाचे ठोके कानात घुमत असल्यासारखे वाटत होते.

त्यांनी मला परत आवाज दिला — "बावाऽऽऽ." यावेळी आवाजात एक हळवेपणा होता, जणू त्यांना काही सांगायच होतं. मी काहीच ओss दिली नाही. काही क्षण शांतता पसरली — इतकी गडद, की मला माझ्याच श्वासाचा आवाज ऐकू येत होता. मग हळूहळू मला त्यांचा आवाज माझ्या जवळ येत असल्याचं जाणवलं — जणू ते हळू-हळू माझ्या दिशेने चालत येत होते. आता पडद्याच्या अगदी जवळ येऊन ते मला आवाज देत होते. माझं मन धडधडत होतं.

मी अजूनही काही बोलत नव्हतो. आणि मग त्यांनी हळूच पडदा बाजूला केला.

आम्ही एकमेकांकडे बघत उभे होतो — मी आणि आजोबा, अगदी तसेच, जसे कधीतरी रानाच्या वाटेवर उभे राहायचो, तेच अंतर, तीच नजरानजर. सुरकुतलेला तोच जुना चेहरा, तेच पांढरे केस, तोच शांत भाव. ते फक्त माझ्याकडे बघून हसले —

आणि तेव्हाच माझं लक्ष माझ्या स्वतःच्या हाताकडे गेलं — माझ्या हातात त्यांचा तो जुना पाण्याचा तांब्या होता. तोच तांब्या, जो मी वर्षानुवर्षं रोज भरून ठेवायचो, ज्याच्याकडे मी दिवसातून कितीतरी वेळा बघायचो, रिकामा तर नाही ना म्हणून. त्या तांब्यावरचा पितळी रंग, त्यावरची ती छोटीशी खाच — सगळं अगदी तस्संच.

त्यांनी हळूच पुढे होऊन तो तांब्या माझ्या हातातून घेतला. त्यांची बोटं माझ्या बोटांना स्पर्शून गेली — तांब्यातून ते पाणी प्यायले....

तेच पाणी कदाचित, जे मी त्या दिवशी त्यांना पाजू शकलो नव्हतो. जे माझ्या हातातून त्यांच्यापर्यंत कधीच पोहोचलं नव्हतं. आज, या स्वप्नात, त्यांनी ते स्वतःहून घेतलं....

आणि त्याचक्षणी मला जाग आली.

मी उठून बसलो. काळोखात काही क्षण नुसताच बसून राहिलो. मला त्या रात्री घाम आला नव्हता. भीतीही वाटत नव्हती. मनावरचं ओझं उतरल्यासारखं वाटलं, छातीत साठलेला एक मोठा श्वास शेवटी मोकळा झाला. हलकचं हसू आलं... मला कळलं — ते स्वप्नात का येत होते.

त्या रात्रीनंतर ते पुन्हा कधी माझ्या स्वप्नात आले नाहीत...


खरंच...अत्तराच्या कुपीला गंध देऊन गेले ते,

फार काही नाही, पण फार देऊन गेले ते!


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror