Chaitanya Kadam

Romance

3  

Chaitanya Kadam

Romance

निरोप समारंभ २

निरोप समारंभ २

8 mins
1.0K


नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर आईला मदत करुन, बाबांना त्यांची औषधं देवून मी माझ्या खोलीत आले. चंद्राचा प्रकाश खिडकीतून माझ्या बेडपर्यंत आला होता. मी वि. स. खांडेकराच "गुलमोहर" वाचत पडलेच होते तोच मोबाईलची रींग वाजली. सुमितचा फोन असेल म्हणून पटकन मोबाईलकडे हात गेला. पण, शरयूच नाव बघताच थोडी हिरमुसले.

मी फोन उचलला.

शरयू : झाल का जेवण? अावरली कामं?

मी : हो. आत्ताच जस्ट पुस्तक हातात घेतल होत.

शरयू : अजून वाचून झाल नाही तुझं? का ग? एरवी तर चार दिवसात चारशे पानी पुस्तक वाचून काढायचीस अन् आता काय झालय?

मी : काही नाही ग, वेळच मिळत नाही.

शरयू : Hmmmmmmm.... सुमितच्या विचारातून वेळ मिळेल तेव्हा वाचशील ना पुस्तक.

मी : ए श्श्श्श्श्श अस काही नाही बाबा. पण बघ ना उदया आपला निरोप समारंभ, म्हणजे कदाचित हयानंतर आम्ही एकमेकांना भेटू की नाही, लांब तर नाही ना जाणार आम्ही, याचच टेन्शन आलय मला.

शरयू : तू सुद्धा ना हट्टी आहेस. खूप आधीपासून म्हणत होते तुला की, विचारुन टाक त्याला पण तू एकशील कुणाच.

मी : तस नाही ग पण माझ्या मनात त्याच्याविषयी जे प्रेम आहे तसच त्याचही असेल का? त्याच्या मनात अस काही नसल तर? आमच्या मैत्रीवर परिणाम होईल का? हया प्रश्नांनी मला अगदी Confuse करुन टाकलय. उदया मला शेवटची संधी आहे. सांगून टाकू का त्याला? काय करु सांग ना.

शरयू : (आता हिला काय सांगू मी, तो सुद्धा वेडा आहे ग तुझ्यासाठी. पण, पुढाकार कोण घेतच नाही. आता उदया तुला तो प्रपोज करणार आहे, असं म्हटलाय खरा पण तसं तो याआधी सुद्धा चार वेळा बोलला आहे. काय करु....??)

अग ऐक, मला ना मगाशी अभिचा मेसेज आलेला. म्हणे सुमित उदया कुणाला प्रपोज करणारे आता हे गमतीत म्हटलाय का खरचं?, ठाऊक नाही. बघ, मी तर म्हणतीये सांगूनच टाक त्याला तुझ्या मनातलं

मी : (तीचे बोलण ऐकल आणि मला एकदम धस्स्स झाल) नाही ग, मजेतच बोलला असेल. त्याच्या मनात कुणी असत तर मला नक्कीच बोलला असता.

शरयू : बघ कस ते तू आता. तू सांगून टाकावस त्याला अस मला वाटतं.

मी : हम्म्म ठीक आहे. उदया बोलतेच त्याच्याशी.

शरयू : अरे व्वा!!!! चल मग भेटू उदया लवकरच. बाय.

मी : बाय.

तिचा फोन ठेवला अन् विचारांच्या गर्दीत वाहून गेले. खरंतर चार वर्षांपासून आम्ही एकमेकांना ओळखतो. माझ्यासाठी तो नेहमीच खास होता. मैत्रीच रुपांतर प्रेमात कधी झाल मला कळलच नव्हतं. साधा, सरळ, कुणाशी जास्त न बोलणारा, पण माझ्याशी हक्काने भांडणारा, खोड्या काढणारा. त्याच्या मनात काही असेल का माझ्याबद्दल? मी खरच सांगून टाकू का त्याला? आणि तो खरच उदया कुणाला प्रपोज करणार असेल तर?.... छे छे! अस काही नसेल.

तो मला नेहमी म्हणायचा, की तुला साडी मध्ये बघायचय. मग उदया साडीच नेसते अन् त्याला म्हणते एकत्रच कॉलेजला जाऊ.

मी त्याला फोन केला,

तो : .......

मी : हॅलो....हॅलो?

तो : hmm

मी : hmm काय माकडा, हॅलो बोल की.

तो : hellooooo (थोड ओरडत.)

मी : एssss.. श्श्श्श् इतक्या रात्री ओरडत का कोणी असं, वेडा आहेस का?

तो : मग इतक्या रात्रीच कोणी फोन करत का?, झोपलेलो ना मी.

मी : तू कधीपासून एवढ्या लवकर झोपायला लागलास रे. उगाच नाटकं करतोय.... गच्चीवरच असशील.

तो : हा हा.... बोला राणीसाहेब, एवढ्या रात्री काय काम काढलत?, का हा वेडा राजकुमार स्वप्नात आला होता तुमच्या?

मी : (तो राणी म्हणाला अन् मी मागच्या मागेच उशीवर पडले....स्वप्नात तर तू रोजच येतोस रे)हं आला मोठा शहाणा. शाहरूख समजतो का स्वत: ला?

तो : हो, म्हणजे काय?

मी : बरं मला सांग उद्या कॉलेजला कसा जाणार आहेस?

तो : डायरेक्ट हेलीकॉप्टर....

ती : (वाटलच होत काहीतरी पांचट बोलशील.)बास रे आता.... सांग ना कसा जाणार आहेस?

तो : अग कसा म्हणजे.... माझ्या बाइकवर.

मी : हा ग्रेट,मग मला घ्यायला ये ना उद्या.(हा काय सरळ उत्तर देणार नाही.)

तो : का? उद्या पायाला मेंदी लावणारेस?

मी : नाही रे,उदयाच्या कार्यक्रमात साडी नेसेन म्हणतीये. (तुझ्यासाठी)

मी : अरे वाह!!.... पण काय गं, कॉलेजच्या प्रत्येक साडी-डे ला तुला ये ये म्हणायचो तेव्हा काहीही कारणं देऊन टांग दयायचीस आणि उद्या....

ती : तू येशील का नाही सांग ना रे.( त्याला मध्येच थांबवत विचारलं)

तो : येईन येईन. पण, उशिर करायचा नाही हा. नाहीतर एक काम कर, आत्तापासूनच आवरायला घे, सकाळपर्यंत होशील तयार.

मी : हा हा.... very funny (माकड कुठचा)

तो : मग उदया काहीतरी स्पेशल दिसतयं. कोणाला प्रपोज वगैरे करणारेस का?

मी : नाही रे.( तुलाच करणार आहे रे)

तो : मग तूला कोणीतरी प्रपोज करणारे अशी बातमी मिळाली आहे का?

मी : (अरे हा का मला त्रास देतोय) उम्म्म....बहूतेक.

आणि मी फोन ठेवून दिला.

आता मी उदयाच्या प्लॅनिंग मध्ये गुंगुन गेले. उदया कोणती साडी नेसू बरं. लाल, पिवळी का निळी? मी जरा गोंधळले, दोन मिनिटं डोळे बंद केले आणि उदयाचा प्रसंग डोळ्यापुढे आणला. काळ्या रंगाची साडी नेसली होती. तर मग माझ ठरलं होत की काळ्या रंगाची साडी नेसेन. एव्हाना बरीख रात्र झाली होती. मी झोपण्याचा प्रयत्न केला पण झोप काही येत नव्हती. घड्याळाच्या काट्याचा आवाज मोठा होऊ लागला होता. माझ्या वाढदिवसादिवशी त्याने दिलेल्या टेडीला मिठी मारुन, डोळ्यांना घट्ट मिटून तो आवाज घालवण्याचा प्रयत्न करत होते. तरीही उदयाच टेन्शन डोक्यात घंटा वाजतच होत.

सकाळी अलार्मच्या आधीच डोळ्यांच्या पापण्या उघडल्या आणि त्याबरोबर डोक्यातील विचारांनीसुद्धा किलबील चालू केली. लगबगीने आवरायला घेतल. पण मन मात्र कासवपावलंच चालत होत.

आता साडी नेसून तयार झाले होते. सुमितला बोलवण्यासाठी फोन घेतला आणि पुन्हा मनामधली धकधक वाढू लागली. त्याच नाव समोर आलं आणि काॅलवर क्लिक करणार इतक्यात वाटलं तो आत्ताच भेटला तर मला रहावणार नाही. अन् समजा उत्तर नकारार्थी असेल तर माझा मूड जाईल आणि त्याचीही इच्छा होणार नाही कार्यक्रमाला येण्याची. काॅलवरच बोट मी मेसेजवर केलं आणि म्हटल , " माझा दादा मला काॅलेजला सोडणार आहे, काॅलेजवरच भेटू, बाय." आणि मी शरयूबरोबर काॅलेजला जाण्याचा निर्णय घेतला.

मी काॅलेजला पोहचले. अजून दहा मिनिटं होती कार्यक्रम चालू व्हायला. सुमित अजून आला नव्हता. वेळेवर कधी आलाय म्हणा तो. मला खरंतर त्याची वाट बघत बाहेरच उभं रहायच होत. पण ते शक्य नव्हत, मैत्रिणींनी गलका करुन मला बसवून घेतल. मला माहित होत अजून १५-२० मिनिटं काही हा येणार नाही. तरीसुद्धा माझी नजर त्यालाच शोधत होती. आता कार्यक्रम चालू झाला होता. माझ्या डोळ्यातली धडपड बहूतेक शरयूला समजली होती. तिने हलकेच माझा हात दाबला आणि म्हणाली, 'येईल ग तो, उशिर त्याला नेहमीच होतो.' पंख्याने उडणार्‍या केसांना सावरत मी हसण्याचा फसवा प्रयत्न केला.

मी पुन्हा एकदा आजूबाजूला नजर फिरवली. तो गर्दीला मागे टाकत पुढे येत होता. "अभी ढूँढ ही रही थी तुम्हे ये नजर हमारी के तुम आ गये अचानक" स्टेजवर कोणीतरी गाणं म्हणत होत. माझ्या चेहर्‍यावर हसू आलं. त्याची नजर माझ्या नजरेला धडकणार इतक्यात मी नजर चुकवली. का बरं केलं मी हे? कालपर्यंत तर आत्मविश्वासाने हवा भरली होती आणि आता मात्र त्याच्या नजरेला नजर मिळवण्याची भिती मला वाटत होती.

कार्यक्रम संपला होता. आता आम्ही जेवणासाठी एकत्र आलो. मी त्याला पाहिलं. त्यानेही मला पाहिल. मी साडीवरुन हात फिरवून कशी दिसतीये? डोळ्यांनीच विचारल. त्याच्या हातांनी छान! असं उत्तर दिलं. खरंतर त्याच्याजवळ जाऊन बोलायला काहीच हरकत नव्हती. पण आता मला थोडी भिती वाटत होती. त्याच्या डोळ्यात जास्तवेळ पाहू शकत नव्हते. जेवणानंतर पुन्हा एकदा घोळके झाले. गप्पा चालू झाल्या होत्या. मी त्याच्याशी एकांतात बोलण्याची संधी शोधत होते. फोटो काढण्याच्या बहाण्याने त्याच्या जवळ गेले. सेल्फीसाठी हात वर केला फोटो काढण्यासाठी क्लिक करणार इतक्यात दादाचा फोन आला. थोडी चिडचिडच झाली होती त्याच नाव वाचून. कारण खूप वेळाने मला एक संधी मिळाली होती त्याच्याशी बोलण्याची. मी थोडी बाजूला झाले अाणि फोन उचलला. महाशयांचा चुकुन फोन लागल्याच समजल आणि माझा पारा चढला. थोडी शांत होऊन मी परत एकदा माझा मोर्चा सुमितकडे वळवणार इतक्यात मैत्रिणींनी गराडा घातला. गप्पा मारायला मला खूप आवडतं, पण आज नाही. आज माझ सगळ लक्ष सुमितकडेच होत. आता जवळपास तास होत आला तरी गप्पांच्या पंगती उठत नव्हत्या. शरयू माझ्याजवळ आली आणि म्हणाली सुमित वर जाधव सरांना भेटायला गेलाय. तिने मला तिच्या गाडीत ठेवलेलं गुलाबाच फुल घेवून काॅलेजच्या मागच्या गेटने यायाला सांगितल आणि अभिलाही फोन करुन सुमितला तिथे आणायला सांगितलं. सगळ अगदी व्यवस्थित ठरल होत.

मी शरयूच्या गाडीत ठेवलेलं गुलाब घ्यायला गेले. वाटेत मला हजारो प्रश्नांनी घेरलं होत. काय बोलणार होते मी? कसं सांगणार होते त्याला? जीव भीतीने कावराबावरा झाला होता. डीक्कीमधलं गुलाब मी हातात घेतलं. आता ती भीती माझ्या बोटांपर्यंत येवून पोहचली होती. मी आता हळूहळू पावलं टाकत जात होते. घसा कोरडा पडला होता. पण पाणी प्यायची बुद्धी नव्हती. माझ्या आयुष्यातल्या अविस्मरणीय क्षणांपैकी हा एक क्षण माझी वाट बघत होता. त्याच्याबरोबर घालवलेल्या प्रत्येक क्षणांच्या आठवणी डोळ्यासमोर येत होत्या. अजूनही मागे फिरावसं वाटत होत, काही चुकीच नाही करत ना? असं भासत होत. सांगू ना नक्की त्याला? कसा रीअॅक्ट होईल तो? आमच्या मैत्रीवर त्याचा परिणाम तर होणार नाही ना? काही पावलं चालल्यावर मला अस जाणवलं की माझ्या मागून कोणीतरी येतयं पण मन मात्र त्याच्याच धुंदीत पुढे चालत राहीलं. तेवढ्यात मागून "सौम्या.." म्हणून कुणीतरी हाक मारली. मी आवाज ओळखला, सुमित होता. आता मात्र मला गहिवरुन आलं. माझ्या अश्रूंनी पापण्यांचा काठ गाठला होता. वातावरणातली हवा अपुरी वाटू लागली. मी मागे वळून पाहिलं त्याने माझ्या हातातलं गुलाब पाहिलं आणि त्याच्या चेहर्‍याचा रंगच बदलला. आता मात्र मला मी चूक करतीये असं जाणवलं. मी हळू हळू त्याच्या जवळ गेले. त्याने त्याचा एक हात पाठीमागे ठेवला होता. कदाचित काहीतरी लपवत होता. मी माझ्या हातातलं गुलाब त्याला देण्यासाठी पुढं केल आणि टचकन त्याच्याही डोळ्यात पाणी आलं. त्याने मागे लपवलेला हात पुढे केला. त्याच्या हातातल गुलाब पाहून माझ्याही डोळ्यांना पाझर सुटला. दोघांनाही हसावं की रडावं समजत नव्हतं. एकमेकांंच्या डोळ्यात बघत राहिलो. गालावरचे अश्रू गुलाबाच्या पाकळ्यांवर पडत होते. खूप काही बोलायचं होत पण आवाज मात्र निघत नव्हता. निशब्द झालो होतो....


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance