निरोप समारंभ
निरोप समारंभ


नेहमीप्रमाणे जेवण झाल्यावर शतपावली करावी म्हणून गच्चीवर आलो. आज तसा हवेत गारवा नव्हता. ढगामागचा चंद्र हळूच डोकावून बघत होता. रात्रीची निरव शांतता रातकीडे गीळू पाहत होते. रस्त्यावर सामसूम होत होती. हळूहळू सगळ्यांच्या घरातले दिवे बंद होत होते. तेवढ्यात whats'app वर ३-४ मेसेज खणाणले,"उद्या भेटू...., सगळे या रे...., लेक्चर नाही होणार बाबांनो.... नक्की या." मी झोपाळ्यावर बसत सगळे मेसेज वाचले. क्षणात माझ्या ओठांची वक्ररेषा झाली. उद्या आमचा निरोप समारंभ होता.
आयुष्यातलं पुस्तकी शिक्षण थांबणार होत. गेल्याच महिन्यात गावी गेलो होतो. तिथे एका आजीबाईंनी विचारलं,"कोणत्या वर्गात बाळ तू?", आता त्यांना इंजिनीयरींग करतोय सांगून समजणार नव्हतं. मी म्हणालो,"१६वीत आहे आता", तेव्हा मला वाटलं होत खूप शिकलो आपण. पण, आज मात्र ही २१ वर्षं मला मागे खेचत होती. गेली २१ वर्षं मला २१ तासांप्रमाणे वाटायला लागली होती. झोपाळ्याचा प्रत्येक झोका मला माझ्या आठवणींमध्ये घेऊन जात होता. शाळेत असताना बाबांशी भांडायचो, तुमचं बर आहे बाबा, शाळा नाही, अभ्यास नाही, गृहपाठ नाही, शिकवणी नाही आणि परीक्षा पण नाही. फक्त ऑफिसला जायचं, computer वर काम करायच आणि संध्याकाळी यायच घरी. तेव्हा ते मला सांगायचे,"असं नाही बेटा, बालपणासारखे सोनेरी क्षण नाहीत, मोठं झाल्यावर बालपणच जास्त आठवतं." तेव्हा मी म्हणायचो, "छे! मी असं कधीच म्हणणार नाही की बालपण सोनेरी असतं." आणि आता.... त्याच आठवणींत रमलोय. शाळेचे बाक, मधल्यासुट्टीची घंटा, वर्गाबाहेरची शिक्षा.... कॉलेजचा कट्टा, bunk लेक्चर आणि कॅंटीनमधल्या गप्पा.
खरचं....
"सगळं काही बघताना आरशात बघायच राहून गेलं,
सुखाची तहान भागवताना समाधान कधी दूर वाहून गेलं?"
तेवढ्यात फोन वाजला. तीच नावं वाचून भूवया उंचावल्या. इतक्या रात्री हीच काय काम असेल, म्हणत फोन उचलला.
मी : .......(काहीच बोललो नाही.)
ती : हॅलो....हॅलो?
मी : hmm
ती : hmm काय माकडा, हॅलो बोल की.
मी : hellooooo (थोड ओरडत.)
ती : एssss.. श्श्श्श् इतक्या रात्री ओरडत का कोणी असं, वेडा आहेस का?
मी : मग इतक्या रात्रीच कोणी फोन करत का?, झोपलेलो ना मी.
ती : तू कधीपासून एवढ्या लवकर झोपायला लागलास रे. उगाच नाटकं करतोय.... गच्चीवरच असशील.
मी : हा हा....(हिला सगळं कसं कळत?), बोला राणीसाहेब, एवढ्या रात्री काय काम काढलत?, का हा वेडा राजकुमार स्वप्नात आला होता तुमच्या? (मी मोठ्या ऐटीत केसावरून हात फिरवत विचारलं.)
ती : हं आला मोठा शहाणा. शाहरूख समजतो का स्वत: ला?
मी : हो, म्हणजे काय?( मी झोपाळ्याला जोरात झोका देत म्हटलं.)
ती : बरं मला सांग उद्या कॉलेजला कसा जाणार आहेस?
मी : डायरेक्ट हेलीकॉप्टर....
ती : बास रे आता.... सांग ना कसा जाणार आहेस?
मी : अग कसा म्हणजे.... माझ्या बाइकवर.
ती : हा ग्रेट,मग मला घ्यायला ये ना उद्या.
मी : (गेल्या चार वर्षात एकदाही माझ्या मागे न बसणारी मुलगी आज अचानक मलाच फोन करून बोलवतीये, जणू माझ्या ह्रदयाने टूणकन उडीच मारल्याच भासलं, असं वाटल जुन्या साॅफ्टवेयरला नविन अपडेट मिळालं...."मी मात्र नेहमीच्या सुरात बोललो")
का? उद्या पायाला मेंदी लावणारेस?
ती : नाही रे,उदयाच्या कार्यक्रमात साडी नेसेन म्हणतीये.
मी : (क्षणात माझ्यासमोर साडीतली ती उभी राहिली.) अरे वाह!!.... पण काय गं, कॉलेजच्या प्रत्येक साडी-डे ला तुला ये ये म्हणायचो तेव्हा काहीही कारणं देऊन टांग दयायचीस आणि उद्या....
ती : तू येशील का नाही सांग ना रे.
मी : येईन येईन. पण, उशिर करायचा नाही हा. नाहीतर एक काम कर, आत्तापासूनच आवरायला घे, सकाळपर्यंत होशील तयार.
ती : हा हा.... very funny ( तिने कटाक्षात उत्तर दिलं)
मी : मग उदया काहीतरी स्पेशल दिसतयं. कोणाला प्रपोज वगैरे करणारेस का?
ती : (थोडीशी हसून) नाही रे.
मी : मग तूला कोणीतरी प्रपोज करणारे अशी बातमी मिळाली आहे का?(मी थोडं चिडवण्याचा प्रयत्न केला)
ती : उम्म्म....बहूतेक.
मी : (थोडं ओरडतच विचारलं) काय?....कोण?....हॅलो....हॅलो?
(फोन ठेवला होता तिने.)
तिच्या शेवटच्या शब्दाने माझ्या मनात प्रश्नचिन्ह तयार केल होतं. सून्न झालो होतो. रूखरूख लागली. भिती वाटायला लागली. खरंतर मी तिला प्रपोज करणार होतो हे फक्त अभि आणि शरयूला माहितं होत. आता ह्या दोघांपैकी कुणी माती खाल्ली असेल बरं. काय सांगितल असेल तिला. छे!.... आता विचार करून काही होणार नव्हतं. आता फक्त उदयाचा सूर्य उगवायचा होता. एव्हाना खूप उशिर झाला होता. झोपायला हवं म्हणून खाली आलो. खळबळलेलं मन शांत करण्याचा प्रयत्न करत होतो पण, विचार मात्र तिच्या शेवटच्या शब्दाचा अर्थ लावण्यात व्यस्त झाल होतं. माझ्या खोलीत आलो आणि ऊशीवर डोक ठेवून झोपलो. ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून पुन्हा ह्या. मला काही केल्या झोप येत नव्हती. डोळे बंद करूनही काही उपयोग नव्हता. माझ्या बंद डोळ्यांना फक्त तिच दिसतं होती. मग किशोर कुमारचं 'आनेवाला पल जानेवाला है' ऐकत पडून राहीलो. सुरवातीच्या चार ओळी सोडल्या तर परत ये रे माझ्या मागल्या.... मला काही सुधरत नव्हतं. काय करावं कळत नव्हतं.
आपल्याच घरात आपल्याला चार्जिंग पॉइंट मिळत नाही तेव्हा जस वाटत, तसच काहीस वाटत होत मला.
सकाळी अलार्म वाजला. रोज कर्कश वाटणारा आवाज आज तितकासा त्रासदायक नव्हता. आज मी तिला पहिल्यांदाच साडीमध्ये बघणार होतो. जगातली कोणतीही स्री भारतीय पारंपारीक साडीमध्ये सुंदरच दिसते. सवयीप्रमाणे मोबाईलकडे हात गेला, झोपेतून उठल्यावर डोळे उघडतील ना उघडतील पण बंद डोळ्यांनी मोबाईलचं लाॅक नक्की उघडतं. तीचा मेसेज आला होताच, "माझा दादा मला कॉलेजला सोडणार आहे, कॉलेजवरच भेटू, बाय". चहात बुडवलेल्या parle-G बिस्कीटासारखं तोंड झाल माझं. पण, आज हताश होऊन चालणार नव्हतं. आज मला माझ्या मनातलं तीच्याविषयीच प्रेमं व्यक्त करायचं होत. गेली दोन वर्ष तिला मी हे सांगण्याचा प्रयत्न करत होतो.पण ती समोर आली की, साखरेसारखा विरघळून जायचो. कुणीतरी म्हटलयं ना,
"छुपाना भी नही आता, जताना भी नही आता ;
हमे तुमसे मोहब्बत है, बताना भी नही आता."
"उठलास का रे साहेबा? आवर पटकन, पाणी जाईल आता." आमच्या मातोश्रींनी जाग केलं. "काल तूला लाईट बिलं दिल होत, भरलसं?, आणि रात्री गच्चीवरून वाळलेले कपडे घेऊन ये म्हटलं होत. एक काम होत नाही तुझ्याने. तू आणि तुझा तो डबडा मोबाईल, कधी सुधारणार नाही." आता ह्यात माझ्या मोबाईलची काय चूक होती. पुढचं भाषण सुरू व्हायच्या आत बाथरूममध्ये शिरलो. अंघोळहोईपर्यंत तिच्याशी काय काय बोलायच?, कसं बोलायच?, कसं उभ रहायच?, हात खिशात ठेवायचे का बाहेर?, का हाताची घडी घालू? सगळ्या गोष्टी ठरवून बाहेर आलो. तसं आधी मी तिला पत्रच लिहायच ठरवल होत पण माझ्या काळजाच्या तुकड्याला, कागदाच्या तुकड्यावर मांडण मला काही जमलं नाही. असो, मी पुन्हा आरशासमोर ३-४ वेळा प्रॅक्टीस केली. सगळी व्यवस्थित तयारी झाली होती. आईने नाष्ट्यासाठी आवाज दिला. मस्तपैकी गरमा गरम उपमा केलेला तिने. पण आज मात्र तो घशाखाली उतरत नव्हता. १०वी च्या पहिल्या पेपरला जाताना जेवढी भिती वाटली होती तशीच आजही वाटत होती. किंबहूना त्यापेक्षा जास्त. कसाबसा उपमा संपवून आईचा निरोप घेतला. खरंतर आज मला तिचा आशिर्वाद घ्यायचा होता पण त्यामुळे तिच्याकडून होणाऱ्या प्रश्नांच्या बाणांनी मला घायाळ व्हायचं नव्हत म्हणून मी ते टाळलं. गाडीची चावी घेतली आणि घराबाहेर पडलो.
मी तशी कधी गाडी पुसत नव्हतो, पण आज का बरं ती मी पुसली होती. माझ मलाच कळत नव्हत. एकदा आरशात पाहिलं. केसांवरून हात फिरवून ते व्यवस्थित केले. मनातून एक आवाज आला, 'जर का तुझी बाईक आज एका कीकमध्ये चालू झाली तर आजची कामगिरी फत्तेह होईल.' कुणास ठाऊक आज हे अस का वागत होतो. मी मोठया गंभीरतेने गाडीवर बसलो. एक मोठा श्वास घेतला आणि जोरात कीक मारली....आणि बाईक चालू झाली. आईशप्पथ!!, without A.T.K.T. रिझल्ट लागल्यासारखा आनंद झाला होता मला. स्वारी कॉलेजच्या दिशेने निघाली. वाऱ्याच्या वेगाने हेअर स्टाईल बिघडू नये म्हणून जेमतेम ३०च्या स्पीड ने गाडी चालवत कॉलेजमध्ये पोहचलो. कधीच न भरणारं पार्किंग आज फुल झालेल. मी गाडी पार्क केली. परत आरशात पाहिलं आणि कॉलेजमध्ये शिरलो.
कार्यक्रम चालू झाला होता. कोणी आभार मानत होत, कोणी शायरी करत होत, कोणी गाणं म्हणत होत तर कोणी कुणाला सॉरी म्हणत होत. मी मात्र तिला शोधत होतो. माझ्या समोरच्या बाजूला उभ्या असलेल्या अभिला मी हात केला. मी त्याला काही खुणवायच्या आत त्याने मला ती कुठे बसली आहे ते दाखवलं. खरचं न बोलता आपल्या मनातलं कळत तोच आपला सच्चा मित्र. माझे डोळे तिला शोधू लागले. देवा तू खरच किमयागार आहेस, डोळे ब्लॅक अँड व्हाइट दिलेस पण स्वप्नं रंगीत दाखवतोस. माझ्या समोरच्या गर्दीमुळे मला ती दिसत नव्हती. गर्दीला डावलून थोडं पुढे आलो. आता तिच्या तिरप्या दिशेनेच पायाच्या बोटांवर उभा राहीलो.
ती फारच सुंदर दिसत होती. तिचा निरागस चेहरा मनाला भुरळ पाडत होता. गौरवर्णी नसली तरी कृष्णतेकडे झुकणारा सावळा रंग खूप काही बोलत होता. तिने नेसलेली काळ्या रंगाची साडी, कपाळावरची चंद्रकोर, मोकळे सोडलेले लांबसडक केस....काय हे सौंदर्य! बघत रहाव असं आणि मी तेच करत होतो. स्टेजवर काय चालल होत ह्याच्यात मला रस नव्हता. नजर तिच्यावरच रोखलेली. 'सर्वमंगलमांगल्ये', तिच्याकडे एकटक बघत मनोमन म्हटलं. घडवणाऱ्याने आपल सर्व कौशल्य पणाला लावलं असेल हे नक्की. आणि ह्यात आणखीन भर म्हणजे ती नेमकी फॅन समोर बसली होती. त्यामुळे तिच्या उडणाऱ्या केसांना बघून ही कोणासारखी दिसतीये बरं? हेमामालीनीसारखी का श्रीदेवीसारखी? माधूरीसारखी?, प्रियांकासारखी का दिपिकासारखी?....नाही, अशी तुलना तरी मनात आली कशी? हीची तुलना कोणाशीच करता येणार नाही. तिच रुप अलौकीक आहे. त्यात कामुकतेचा लवलेश नाही.केवळ निव्वळ सौंदर्य. विचारशून्य सौंदर्य.
कार्यक्रम संपला होता. आता आम्ही जेवणासाठी एकत्र आलो होतो. तिच्या नजरेतील कटाक्ष तिने माझ्याकडे टाकला. मी हसलो. त्यावर तिने मला नाक मुरडून चिडवलं आणि मोठया कुतुहलाने साडीवरून हात फिरवून कशी दिसतीये?.... डोळ्यांनीच विचारलं. माझ्या हातांनी, 'छान!'.... असं उत्तर दिलं. खरंतर तिच्याजवळ जाऊन बोलायला काहीच हरकत नव्हती. पण आज मला थोडी भिती वाटत होती. तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हतो. जेवणानंतर पुन्हा एकदा कट्टा जमला. गप्पा चालू झाल्या. काहीजण पुन्हा भेटण्याचं प्लॅनिंग करत होते. प्रत्येकाला प्रत्येकाबरोबर फोटो काढायचे होते. ती माझ्याजवळ आली. तिने मारलेला सेंटचा सुगंध तिच्या सौंदर्यात अधिकच भर घालत होता. 'एक सेल्फी', एवढंच बोलून तीने मोबाईल वर धरला, तोच तिच्या दादाचा म्हणजेच माझ्या लवस्टोरीच्या विलनचा फोन आला. फोन घेण्यासाठी ती थोडी बाजूला गेली. शेवटी आमचा फोटो राहिलाच. इकडे गप्पांची मैफिल चांगलीच रंगात आली. ती पण आता तिच्या मैत्रिणींमध्ये गुंग होती. आता मी तिला एकटं गाठण्याच्या संधीची वाट बघत होतो. जवळपास तास होत आला, तरी हीच्या गप्पा थांबत नव्हत्या. इतकं काय बोलत असतात ह्या?
हळूहळू प्रत्येक जण घरची वाट धरत होत. पण मला मात्र अजूनही तीची वाट धरता येत नव्हती. त्यात मधेच काहींनी जाधव सरांबरोबर फोटो काढायचं सुचवलं. मला ते मुळीच पटलं नव्हतं. तिच्यापासून लांब जायच नव्हतं, पण काय करणार मित्रांना नाही म्हणून चालणार नव्हतं. मग आम्ही सगळे वरच्या मजल्यावर गेलो. सरांबरोबर फोटो काढले, त्यांचा आशिर्वाद घेतला. त्यांनीही आम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सरांचा निरोप घेवून आम्ही खाली आलो.
आता वेळ आली होती हिम्मत करायची. मी तिला शोधू लागलो. ती कुठेच दिसत नव्हती. आता मात्र घाई झाली. मला काही कळेनास झालं. तिकडून शरयू माझ्याकडे येत होती. तेवढयात अभ्याचा फोन आला. त्याने हॅलो म्हणायच्या आतच मी विचारलं, "अरे कुठे गायब झाली ही?" तो म्हणाला, "आत्ताच कॉलेजच्या बाहेर पडली आणि ऐक, तू...." मी पुढंच ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हतो. मी फोन कट केला. शरयूला लांबूनच बाय बोललो आणि पळत सुटलो. आता मला कशाच भान राहिलं नव्हत. मी झटपट पायऱ्या उतरू लागलो. शेवटच्या पायरीवर थोडा पाय घसरला, पाय लचकला. पण आता थांबून चालणार नव्हतं. मला आज तिला सगळं सांगायच होत. मी धावत-पळत कॉलेजच्या बाहेर आलो. आता तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघत राहिलो. घसा कोरडा पडला. आवाज फुटेनासा झाला. चित्त्याच्या वेगाने कॉलेज बाहेर धावत आलो होतो. तिला बघताच कासवाच्या गतीने चालू लागलो.पायात गोळे आले. स्वत:ला सावरून तिला गाठण्यासाठी पटपट पावलं उचलली. तिच्या पाठमोऱ्या शरीराकडे बघून पुन्हा एकदा शेवटची उजळणी केली. काय बोलणार होतो मी तीला....काय आहे माझ्याकडे.... थोडे शब्द....थोडया भावना.... आणि त्यावर शिंपडलेलं माझं प्रेम.... बस्स इतकंच.... आणखी काही नाही. आता तिच्या-माझ्यातलं अंतर दहा पावलांच होत. तिला आवाज दिला....,
"सौम्या...."
ती हळूच मागे वळाली. मला बघून गोड लाजली आणि मी बघत राहिलो तिच्या झुकलेल्या डोळ्यांकडे...., ओठांच्या हास्याकडे आणि हातातल्या गुलाबाकडे.......
"मैत्रीच एक नातं प्रेमात येता येता राहून गेलं
माझ्या मनातलं प्रेम मनामध्येच राहून गेलं".