# बाबा तू कधी येशील??
# बाबा तू कधी येशील??
छोटी तिर्था अगदी जेमतेम अडीच ते पावणे तीन वर्षाची. किती सुंदर जग होतं न तिचं. आई , बाबा,आजी आणि आजोबा अशा चौकोनी कुटुंबातली अतिशय लाडकी परी म्हणजे तीर्था!
किती लाड करायचे ना सगळे तिचा,त्या कुटुंबातील पाहिलं वाहिलं अपत्य ती. दोन मोठ्या आत्या आणि त्यांची मुलं होती पण मुलाची मुलगी ,कुटुंबात सतत सोबत असलेली हक्काची लाडकी नात म्हणून ती जास्तच लाडाची. आजोबा खूप नवनवीन गोष्टी सांगायचे तिला.आजी पण खूप लाड करायची ,तिच्या आवडीचे सगळे करून खाऊ घालण्याचे काम आजीकडेच!
सगळी आपापल्या कामात व्यस्त असली की तिची सखी आजीच ! आई आणि बाबाची तर ती जीव की प्राण. कित्ती लाडाची गोडूलि होती ना ती! शेजारचे चिनू आणि स्वीटी तिचे सवंगडी. संध्याकाळी त्यांच्याशी धूम खेळण्यात तिचा वेळ कसा निघून जायचा कळायचेच नाही तिला.
आई तर म्हणत होती की यावर्षी तीर्था शाळेत जाणार.किती गम्मत वाटत होती ना तिला या गोष्टीची!!! मग तिला चिनू, स्वीटी सारखे नवीन ड्रेस आणि स्कूल बॅग पण मिळाली असती ना! कसं मस्त जग होतं ना तिचं.
अचानक काय झालं कळलेच नाही. एका प्रोग्राम वरून आल्या नंतर आजोबांची तब्येत बिघडली. मग आजी ,बाबा आणि आई ची पण. आजोबांना अगदीच बरं नसेल काही दिवसांनी आजोबा हॉस्पिटल मध्ये आहेत असं आई आणि आजी सांगत होत्या तिला. मग काही दिवसांनी बाबा पण हॉस्पिटल मध्ये गेले म्हणून सांगू लागले सगळे. तब्येत बरी नाही म्हणून आई आणि आजी तिला खेळायला पण जाऊ देत नव्हत्या. मग ती घराच्या खिडकीतून च बाहेर बघत बसायची. तिचे फ्रेंड्स तिला तिथून आधी खेळताना दिसले की ती पण जायची पण हल्ली ते पण खेळतांना दिसत नव्हते. घरी पण आजी आणि आई चूप चूप असायच्या. तिर्थाच्या आवडीचे कुणीच काही बनवून नाही द्यायचे. चॉकलेट वगैरे तर कुणीच आणून नाही द्यायचे कारण बाबा आणि आजोबा नव्हते ना!
मग तिर्था त्या खिडकीतून च बाहेर अंगणात बघत बसायची. झाडाजवळ येऊन ठेवलेलं पाणी पिणारी चिऊताई तिला आता खूप आवडू लागली होती.मग ती चिऊताई आणि तिचे पिल्ल पाहण्यात च तिचा दिवस निघून जायचा. खरं तर घरी कोंडून राहायचा तिला कंटाळा आला होता खूप पण कुणीच बाहेर जाऊ देत नव्हते ना!
अचानक एक दिवस आजी खूप रडू लागली. तिला कळेचना ना की आजी एवढी कां रडते. आई पण रडत होती थोडी थोडी.मग तिनी कुणाला तरी बोलतांना ऐकलं की आजोबा गेले. कुठे गेले? केव्हा गेले? तिला काही कळलेच नाही !!!
ते हॉस्पिटल मध्ये गेले होते हे फक्त तिला माहित होतं. आता तर घर खूपच चुप चूप वाटत होतं. बाबांना फोन लावला की ती बाबांशी बोलायची.
खूप आठवण यायची तिला बाबा आणि आजोबांची . बाबा पण दवाखान्यात जाऊन खूप दिवस झाले होते . आई तर इतक्यात खूपच उदास असायची आणि आजी तर खूपदा रडतच दिसायची.हा कोरोना कोरोना आला आणि सगळं कसं बदललं ना सारं. असं खूपदा वाटायचं तिला.
काल रात्री तर ती बाबाशी खूप रडली फोन वर बाबा लवकर ये आणि चॉकलेट आण म्हणून. पण बाबा तर आलाच नाही आणि दोन ,तीन दिवसापासून त्याचा फोन पण आला नाही. आई तर खूपच चूप चूप होती आता. आणि अचानक एक दिवस आई आणि आजी खूपच रडू लागल्या. तिर्था ला काही कळेचना. कोणीतरी म्हणत होते की बाबा गेले .पण कुठे??? तिला काहीच कळले नाही. आता तर तिला कळतच नव्हते काय चालले आहे. आधी आजी रडतांना दिसायची आता तर आई खूपच रडत होती.
तिला ना या कोरोना चा आता खूप राग येत होता. त्यांनी तिचे मित्र तिला भेटत नव्हते. घराबाहेर जाता येत नव्हते, बाबा आणि आजोबा दवाखान्यात गेले तिथून घरी यायच्या ऐवजी कुठे गेले? तिला कळतच नव्हते. आधी तिच्या भोवती घुटमळणारे घर............. पण आज तिच्याकडे कुणाचेच फारसे लक्ष नव्हते. आई आणि आजी एवढ्या कां रडतात तेही तिला कळतच नव्हते. काही दिवसांपूर्वीचे तिचे जग आणि आताचे जग किती बदलले होते ना!
तेवढ्यात एक दिवस अचानक मामा,आजी आणि आजोबा आले. त्यांना पाहून ती खूप खुश झाली. आई पुन्हा आजीच्या गळ्यात पडून खूप रडली. आजी पण रडली आणि तिनी आईचे डोळे पुसले. आजोबा आणि मामानी मग तिर्थाला जवळ घेतले. खूप दिवसांनी आज तिला खूप छान वाटले.मामा म्हणाला मग आज आपल्याला गावाला जायचंय.कित्ती आनंद झाला तिला. खूप दिवसांनी पिंजऱ्यातून बाहेर काढलेल्या पक्ष्या सारखे वाटले तिला.मामाच्या घरी जायचं म्हणून स्वारी मग एकदम खुश झाली.
मामाच्या घरचे दिवस थोडे बरे जात होते. इथले आजोबा आणि मामा खूप लाड करत होते. पण आई मामाच्या घरी आली की नेहमी कित्ती खुश असायची ना पण यावेळी मात्र ती खूपच चूप असते. असं कां तिला कळतच नव्हते. मामाच्या घरी ती नेहमी आली की मग काही दिवसांनी बाबा तिला घ्यायला यायचे आणि मग गाडीनी सगळे भुरकन घरी जायचे. आता मात्र तिर्था ला बाबांची खूप आठवण येऊ लागली होती. ती मग रोज समोरच्या खिडकीत बसायची आणि बाबांची वाट बघत बसायची. ती रोज वाट बघायची पण बाबा काही येत नव्हते. वाट बघून बघून एक दिवस तिने घरी फोन लावून मागितला.
फोन वर आजी होती. बाबा बाहेर गेला म्हणून आजी सांगत होती. आजोबा पण गेले होते. आजीशी बोलून लाडात येऊन तिला छान वाटत होते. शेवटी फोन ठेवतांना " आजी, बाबाला पाठव ग लवकर,त्याला सांग तिर्था खूप वाट बघतेय त्याची. मला लवकर घ्यायला ये म्हण ना त्याला." म्हणत आज तिर्था रडू लागली होती. फोन वरची आजी आणि इकडचे सगळे हतबल होते. त्या लहानग्या जीवाला कसे समजवावे कुणालाच कळत नव्हते. ...?
लहानगी तिर्था रडत रडत पुन्हा खिडकीत जाऊन बसली होती.कधीही न येऊ शकणाऱ्या बाबाची वाट बघत........!
कोरोना मुळे तिर्था सारख्या अनेक छोट्या बालकांचे भावविश्व उध्वस्त झाले आहे. अनेकांनी आपले पालकच गमावले आहेत. अशा एका छोट्या मुलीचे भावविश्व मी या कथेतून मांडायचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून त्यांचीही संवेदना सर्वांना कळावी. एका सत्यकथेवर आधारित कथा.
धन्यवाद!
