दिपमाला अहिरे

Inspirational

3  

दिपमाला अहिरे

Inspirational

अवकाळी पाऊस..

अवकाळी पाऊस..

10 mins
180


तिच्या त्या भयानक स्वप्नाने आज तिला पुन्हा जाग आली.डोळे उघडले तशी ती ताडकन उठून उभी राहिली.पहाटेचे साधारण तीन वाजले असतील.घामाने डबडबलेले शरीर आणि हृदयाचे वाढलेले ठोके. घाबरलेल्या अवस्थेत एका हाताने आपल्या लुगड्याच्या फाटक्या पदराने घाम पुसतच ती झपाझप पावले टाकत बाहेरच्या ओसरीत आली. तिथे तिचा धनी काश्या झोपलेला होता.त्याच्या जवळ जाऊन ती त्याच्या डोक्यावर हात फीरवते. त्याची थोडी चुळबुळ झाली की ती परत आतल्या खोलीत जाऊन झोपली.


तिच्या एका बाजूला मुलगी बबली आणि दुसऱ्या बाजूला मुलगा परशा झोपलेला होता.मध्ये ती म्हणजे लक्ष्मी झोपलेली होती.या तिघांच्या समोरच एका मुडक्या खाटेवर लक्ष्मीची सासु झोपलेली होती.त्या खाटेच्या पायाकडच्या दोऱ्या पुर्ण जीर्ण झालेल्या असतात.अर्ध्या तुटलेल्या असल्याने त्याच्यातुन पाय सर्व बाहेर येत असल्याने म्हातारी पाय पोटाशी धरून आपल्या शरीराचं गाठोडं करून तशीच झोपुन राहते.

लक्ष्मी वर छताकडे एक टक नजर लावून तशीच पडलेली असते.तिच्या मनात चाललेली घालमेल तिला शांत झोपु देत नाही.कधी एकदा कोंबडं बांग देईल आणि उजाडेल याची ती वाट पाहत आहे.

त्या गोष्टीचा विचार करायचा नाही असं कितीही ठरवलं तरी तिला तिचे ते स्वप्न परत परत आठवत असतं.


आजकाल हे तिचे नेहमीचेच झाले होते शेजारी राहणाऱ्या तिच्या सख्ख्या मैत्रिणीच्या धन्याने स्वतः ला फासावर लटकवून घेतले तेव्हा पासून तिची झोप उडाली होती.आजुबाजुच्या काही घटना बघुन तिच्या मनानेही धास्ती घेतली होती.सततची होणारी नापिकी, अवकाळी पाऊस, उत्पन्न काही नाही, सावकाराचं वाढत जाणारं कर्ज.आपली परिस्थिती ही इतरांपेक्षा वेगळी नाही.आपल्या धन्याने असे पाऊल उचलु नये या विचारात ती कायम असायची.म्हणुनच की काय तिला दर दोन दिवसांनी तेच स्वप्न दिसायचे आणि मध्यरात्री उठून ती अशी त्याला बघायला जायची.

तिचा धनी काश्यालाही या गोष्टीची कल्पना होती.तो तिच्या मनाची अवस्था जाणुन होता.आणि म्हणून ती त्याला टेन्शनमध्ये दिसली की, तो काही ना काही जोक करून तिला हसवत असे.


लक्ष्मी आणि काशीराम म्हणजे लक्ष्मी नारायण सारखा सुंदर जोडा.एकमेकांत जेवढे प्रेम होते तेवढेच दोघेही समंजस,एकमेकांचा आदर करणारे, मनं जपणारे होते.

कुणाचीही नजर लागावे असे दांपत्य होते.प्रकाश आणि बकुळा ही त्यांची दोन मुले त्यांच्या संसारवेलीची शोभा वाढवणारी दोन सुंदर फुलं.आणि लक्ष्मी ची सासु रखमा, आणि त्यांच्या दोन शेळ्या त्यांनाही आपल्या मुलांसारखी मानायची ती.

असे यांचे कुटुंब घरातील सर्व माणसे समजदार आणि आहे त्यात समाधान मानणारी होती.


पण पिढ्यान् पिढ्या गरीबी अनुभवलेलं काश्याचं ते झोपडीवजा घर, घरात अठरा विश्व दारीद्रय कायमच नांदायचे.शेतीचा एक छोटासा तुकडा तोच कसायचा आणि येईल त्यात जेमतेम भागवायचं कारण अर्धा शेतीचा तुकडा काश्याच्या बापानं आधीच विकला होता.


लक्ष्मी आपल्या धन्याला सर्वोतोपरी मदत करीत असे.लोकांच्या शेतात जाऊन काम करत होती.गावातील प्रतिष्ठीत बायकांच्या घरी बरीच कामे मिळायची ती कामेही लक्ष्मी करीत असे, शेतात आलेला भाजीपाला गावच्या आठवडे बाजारात जाऊन विकत असे.पण पाच लोकांचा उदरनिर्वाह, मुलांच्या शाळेचा थोडाफार खर्च या सर्वांचा मेळ घालणं काशाला कठीण जात होते.पण लक्ष्मी आपल्या धन्याला धीर देत असे.


शेतात काम करतांना काश्याच्या डोक्यात सतत विचारचक्र चालत असे.आणि आपल्या धन्याच्या काळजीने लक्ष्मीच्या डोक्यातही विचार चालत असे

आता तर गावातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या पाहुन लक्ष्मी आणि काशाच्या आईच्या जीवाला घोर लागला होता.


शेतात खत टाकायला पैसे आणायचे कुठून या विचारात असतानाच काशाला बांगड्यांची किणकिण कानी पडली आणि त्याच्या चेहऱ्यावर हसु आले कारण जिला पाहुनी तो सर्व चिंता विसरायचा ती लक्ष्मी त्याच्यासाठी जेवणाचा डबा घेऊन आली होती.


लक्ष्मी उंच, सडपातळ, गोरीपान, टपोरे पाणीदार डोळे, धारदार नाक, रेखीव ओठ, चापुनचुपुन नेसलेली नववारी, दोन्ही हातात हातभार हिरव्या बांगड्या, कपाळावर मोठा लालभडक कुंकवाचा गोल, केसांचा मोठा काळाक्षार अंबाडा, कुंकू भरलेला सरळ भांग आणि गळ्यात काळ्या मन्यात ओवलेले जाड भरीव डोरलं आणि पायात चांदीची जोडवी एवढेच काय ते दोन दागीने होते तिच्या कडे.काश्याला आपली बायको खऱ्याअर्थाने लक्ष्मी भासायची.कारण परीस्थिती कुठलीही असो ती नेहमीच काश्याला धीर देत असे.


शेतात आल्यावर तिने लगेच आपल्या धन्याच्या चेहऱ्यावरील काळजी हेरली.आणि विचारु लागली.

"काय झालं चेहरा एवढा पडला का तुमचा?"

बादलीतील पाणी चेहऱ्यावर मारत तो बोलतो

"काय नाही,आज उन जरा जास्त आहे, म्हणून असेल."

डोक्यावर धरुन ठेवलेली पाटी खाली ठेवत ती बोलते

"धनी माझ्याशी खोटं बोलायची कायबी गरज नाय, जे काय असलं ते सम्दं सांगायचं मला.मनात काय बी ठेवायचं नाय.बोलुन मन मोकळं करायचं त्यानं मनात वंगाळ इचार बी येत नाही."

भाकरी बांधून आणलेला रुमाल काढून ती त्याच्या पुढ्यात ठेवते.हाताची मुठी आवळून कांद्यावर जोरात मारत काश्या बोलतो. " आरं वा पिठलं,म्हाया लक्ष्मी च्या हातचं पिठलं म्हंजी अमृतच!"

"मध्येच दुसरं काय बी बोलु नका काय चिंता हाय ते सांगा अगुदर." लक्ष्मी रागाच्या स्वरात बोलते.

"अगं काय बी चिंता असु दे तुझ्या रुपाचं चांदणं पाहीलं ना की सर्व चिंता इसरतो मी, पोरांचं प्रेम आणि आईचा आशीर्वाद बळ देतोच की मला. तु हाय मला मोठा पाठिंबा कोंड्याचा मांडा करुन माझा संसार रेटतच हाय की तु अजुन काय पाहिजे मला?"


लक्ष्मी काशाच्या बोलण्याला मध्येच तोडत सांगते

"असाच चांगला ईचार ठेवा. दुसरा कायबी वंगाळ पाऊल उचलण्याचा ईचार बी करायचा नाय."

काश्या म्हणतो "कितीबी अडचणी आल्या तरी मी कदिबी चुकीचे पाऊल उचलणार नाही. आणि मरणाचा विचार तर अजिबात करणार नाही, माझं वचन आहे तुला. चिंताच सोड तु."

काशाला लक्ष्मी पासुन कुठलीही गोष्ट लपवायला आवडत नाही म्हणून तो तिला सांगतो.


"पेरण्या सुरू झाल्यात, गावातल्या सम्द्यांच्या पेरण्या

उरकायला आल्यात.खत पाणी आणायला पैकं कमी पडत्यात, तसं बोललो आहे एक दोन जणांना.

पण पहिलंच देणं बाकी हाय तर कुणी द्यायला तयार नाही."

"सावकाराकडे मागायला जायची हिंमत होत नाही

आधीच डोक्यावर त्याचं कर्ज आहे.आजुन व्याजावर व्याज लावुन माह्या आज्याची कमाई हाय ही शेती.

या जमिनीवर डोळा हाय त्याचा.आणि एवढाच जमिनीचा तुकडा हाय.ज्याच्यावर आपलं जगणं हाय

शेती गहाण टाकून माझ्या लेकरांच्या तोंडचा घास काढून नाय घ्यायचा मला."


लक्ष्मी काश्याला सुचवते ते बॅंक कडुन काय कर्ज‌‌‌ असतं ते बघाना.त्याला टाईम लय लागतो बघ, आणि 

कागदपत्रं करायला टाईम आणि पैका बी खुप लागतो.

ते बगु नंतर.आता काय तरी दुसरा मार्ग बघायला हवा

लक्ष्मी काश्याचा चिंताग्रस्त चेहरा पाहून गळ्यातील डोरल्याला हात लावते.

काश्या तिच्या कडे बघून बोलतो नाही आधीच तुझी कर्णफुले आणि आईच्या पाटल्या या शेतापायी विकलेत मी . तुझं स्त्रीधन घ्यायचा मला कायबी हक्क नाही पण तरीही कर्णफुले मोडलीच मी.

विषय संपवावा म्हणून काश्या घाईघाईने उभा राहिला

हातात पाण्याचा तांब्या घेऊन दोन चार पावलं पुढे गेला.आणि लक्ष्मी कडे न बघताच बोलतो जा निघ लवकर घरला.. पोरं शाळेतुन यायचा टाईम झाला.

लक्ष्मी घरी येते.पण काश्याचा चिंतातुर चेहरा तिच्या डोळ्यासमोरून जात नाही.


सायंकाळी दिवे लागणीला पोरं आभ्यास करत बसली होती

लक्ष्मीची सासु बाहेर ओसरीत आपल्या लेकाची वाट पाहत बसली होती. लक्ष्मी ने चुल पेटवली होती आणि भाकरी साठी तावा ठेवला होता.परातीत पीठ घेऊन त्यात पाणी ओतून तशीच बसुन राहिली होती.आणि पैशांचा विचार करत होती.परत तिचा हात आपोआप गळ्यातील डोरल्याकडे जातो. आणि ती तिच्या भुतकाळात जाते.वयाच्या सतराव्या वर्षी आईबापाने लग्न लावून दिले.अल्लड वय‌ आपल्याला नवरी बनुन छान सजायला मिळणार.हाच मोठा आनंद.सासुने परीस्थिती प्रमाणे बारीक वाटीचे नाजुक मंगळसूत्र निवडले. पण सासऱ्यांना ते आवडले नाही.

"अगं रखमा एकच लेक हाय आपला, एकच सुन

जरा जास्त वजनाचं जाडजूड भरीव डोरले घे.

लग्न एकदाच होतं.आपल्या सुनेला आवडेल आणि शोभेल असे घे. सोन्याचं डोरले, कर्णफुले, चांदीची जोडवी आणि चाळ हे सर्व पाहून लक्ष्मी भारीच खुश झाली होती.सासरे गेल्यापासून लक्ष्मी च्या घराला अवकळा आली होती.शेतीच्या कामासाठी,कधी खतपाण्यासाठी,कधी घरातील इतर गरजांसाठी

लक्ष्मी चे आणि तिच्या सासुचे थोडेफार काही दागिने होते ते नाईलाजाने काशाला मोडावे लागले होते.

पण लक्ष्मी ला याचे कधीही वाईट वाटले नाही.

बाईचं खरं धन तिचा नवरा असतो.हे संस्कार तिलाही मिळाले होते.म्हणुन नवरा अडचणीत होता.तेव्हा तिने स्वतः आपली कर्णफुले दिली होती.


या सर्व विचारात गर्क असतांना शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज आला आणि लक्ष्मी भानावर आली.बाहेर काय गडबड आहे हे पाहण्यासाठी

दोन्ही मुलं आणि लक्ष्मी बाहेर जातात.तर काशा एका इसमाला आपल्या दोन्ही बकऱ्या देत असतो.

पैशासाठी काशाने हे पाऊल उचलले आहे हे लक्ष्मी आणि रखमा च्या लक्षात आले होते.त्या मुक्या जनावरांना ही कळलं होतं आपला मालक आपल्याला विकतो आहे.म्हणुन ते ही आक्रोश करत होते.

बबली आणि परशा दोन्ही शेळ्यांना धरुन रडु लागली.

आपल्या शेळ्या आपण कोणाला देणार नाही म्हणून बापाला विनवण्या करुन लागले.दोन्ही भावंडे शेळ्यांना सोडायला तयार नव्हते.काशाच्याही डोळ्यात पाणी होते.रखमा आणि लक्ष्मी दोघींच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या.

काशा हात जोडून पोरांना घरात घेऊन जाण्यासाठी ईशाऱ्याने विनवणी करत होता. लक्ष्मी कशीबशी मुलांना शेळ्यांपासुन सोडवुन घेते. दोन्ही शेळ्यांवरुन मायेने हात फीरवते. ज्या शेळ्यांना आपल्या लेकरांसारखा जिव लावला त्यांना विकतांना पाहुन तिला खूप वाईट वाटत होते.


आज दोन्ही मुलं बिना जेवताच झोपली होती.आपल्या शेळ्या आपल्याला परत दिसणार नाही.हे त्यांचं मनं मानायला तयार नव्हते.


काशाने पेरणीला सुरवात केली होती.दोन्ही नवरा बायको जोमाने कामाला लागली होती.पण म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना आणि लक्ष्मी आणि काशाच्या बाबतीत ते नेहमीच व्हायचे.

रखमा काशाची आई ओसरीवरुन पाय घसरून पडली. पायाला फ्रॅक्चर झाले,पायाला प्लास्टर बसले.दवाखाना आणि औषध,गोळ्यांसाठी बराच पैसा लागला.आईला आपल्या पोराची अवस्था माहिती होती.म्हणुन ती स्वतः ला दोष देत होती.

आणि देवाला विनवण्या करत होती."माझ्या लेकराचे हाल मला बघवत नाही.लवकर सांगावा धाड देवा.

जगण्याची इच्छा नाही".लक्ष्मीला सासु चे हाल पहावत नव्हते. आपण दोघं मिळून कर्ज फेडू पण सासु बाईंचे हाल बघवत नाही.तुम्ही सावकाराकडे जाऊन पैसे घेऊन या. आपल्या डोक्यावर सासुबाई चा हात पाहिजे मला.

पैशाची व्यवस्था करुन लक्ष्मी सासुला पुर्ण बरं करुन घरी आणते.आपल्या पायावर ती सासुबाई ला परत उभं करते.

 काशाची शेताची कामं पूर्ण झाली होती.यंदा पाऊसही चांगला होता.हिरवगार शेत डुल लागलं होतं,कणसं छान भरली होती. काश्य आणि लक्ष्मी आपल्या शेतातील सोन्याला पाहुन आनंदी होते.

काशा मोठ्या उत्साहाने लक्ष्मी ला सांगत होता.यार्षी 

उत्पन्न चांगलं आलं तर आपण सावकाराचे अर्ध कर्ज व्याजासकट फेडु शकतो आणि एखादी शेळी बी घेऊ शकतो.

काश्याला आनंदात पाहून लक्ष्मी ही आनंदी होती.

असेच काही दिवस बरे जात होते.कापणी,मळणीच्या तयारीला सर्वे लागले होते.

एके दिवशी भर दुपारी कडकडीत ऊन पडलेले असतांना अचानक काळेकुट्ट आभाळ भरून आले.

रखमाला काही तरी मोठं संकट येणार.याची चाहूल लागली. कधी घरात तर कधी बाहेर अशी येरझारा घालत होती.

लक्ष्मी चे तिला दोन तीन वेळा सांगुन झाले होते.

थोडा आराम करून घ्या पण तिचे मन तयार नव्हते.आणि अचानक काही कळण्याच्या आतच 

ढगफुटी झाली आणि धो धो पाऊस पडु लागला.

दोन तास झाले, तीन तास झाले. पावसाचा जोर वाढतच होता. पाऊस थांबण्याचे कुठेही चिन्ह दिसत नव्हते. पावसाच्या जाड सरींसोबत मोठमोठ्या गारा पडत होत्या.अवकाळी आल्याने शेतकऱ्यांची सारी पिके वाहून जात होती.सारी मेहनत अवकाळी पाऊस आपल्या सोबत वाहुन नेत होता.शेतकरी हवालदिल झाला होता.

लक्ष्मी आपल्या धन्याच्या आणि भविष्याच्या चिंतेने डोक्याला हात लावून बसली होती.काशाच्या चेहऱ्यावर विलक्षण भिती दिसत होती. 

पाऊस थांबत नव्हता उलट गारांचा जोर वाढतच होता.रखमा चाही बांध आता पावसासारखा फुटला होता.तिला एकदम रडु कोसळले आपल्या मुलाचा चेहरा तिला बघवत नव्हता.अचानक उठून ती पावसात जाते.अंगणात उभी राहुन वर आकाशाकडे बघत जोरजोरात ओरडते "आरं बसं की देवा आता ,किती पडशील? असा अवकाळी धो धो बरसुन 

शेतकऱ्याचा हाता तोंडाचा घास काढून घेशील.

आमची लेकरं बाळं उपाशी मरतील.थांब की आता

जरा शांतता घे."

रखमा जोरजोरात आपली छाती बडवुन जिवाच्या आकांताने ओरडत होती. लक्ष्मी आणि काशा तिला हात धरून घरात घेऊन जात असतांना अचानक ती बोलायची थांबली.तिचा आवाज कायमचा थांबला.लक्ष्मी तिला खाली बसवण्याचा प्रयत्न करत होती.तेव्हा काशाला समजले की, तिने आपले प्राण सोडले होते.आपल्या डोळ्यांदेखत आपल्या आईचा असा मृत्यू झाला.या गोष्टी वर लक्ष्मी आणि काशाच्या विश्वास बसत नव्हता.


पुढच्या तीन दिवस पावसाचा जोर चालु होता.कधी रीपरीप,कधी गारा बरसत होत्या.काशा आपल्या शेतात गेला.पाच दिवसांपूर्वी आपल्या शेतात डोलणारे दाणेदार कणीस तो चिखलात शोधण्याचा प्रयत्न करत होता. ज्या हिरव्या गार शिवाराला पाहुन त्याने आणि लक्ष्मीने जी स्वप्ने रंगवली होती.ती सारी त्या गारांच्या खचात गाडली गेली होती.

पाऊस थांबायला तयार नव्हता.शेतकऱ्यांच्या हाता तोंडाचा घास या अवकाळी पावसाने काढून घेतला होता.

निसर्गाच्या प्रकोपापुढे शेतकऱ्याने हात टेकले होते.

रीकामे हात, डोळ्यात अश्रू आणि हतबलता या शिवाय काही उरले नव्हते.

काशाच्या डोळ्यासमोर अंधार होता.रीकामे हात, सावकाराचे कर्ज, दुबार पेरणीचे संकट, उपाशी पोट याशिवाय काही उरलं नव्हतं.आणि काशाच्या डोळ्यासमोर त्याची आई येत होती. या पावसाने त्याच्या आईलाही गिळले होते.


दरवेळी काही ना काही करुन नव्याने उभे राहण्याचा माझा प्रयत्न नेहमीच कमी पडतो आणि मी रीकाम्या हातीच उभा असतो.असे अनेक विचार काशाच्या मनात गर्दी करत असतात.एक जोराने वीज चमकते,पावसाचा पुन्हा हाहाकार माजतो.तसा काशा तडक उठून झाडाखाली जातो.


इकडे लक्ष्मी काशाच्या येण्याकडे डोळे लावून बसलेली असते.लगेच माघारी येतो सांगून गेलेला काशा बराच वेळ झाला परत आला नाही.

म्हणून काळजीने तीही शेताकडे निघाली.

बबली आणि परशाला दार बंद करून घरात बसायला सांगुन गेली.ती शेताकडे निघाली.तिची पावले झपाट्याने शेताकडे पडत होती.तिच्या मनात विचारांचा कल्लोळ माजला होता.वरुन वरुण राजाचा प्रकोप चालू होता. रोजचा रस्ता आज तिला खूप लांबचा वाटत होता.रस्ता जणु संपत नव्हता.


तिच्या पावलांच्या वेगाबरोबर. पावसाचा ही वेग वाढला होता. पाऊस इतका की,समोरचे काही दिसत नव्हते.लक्ष्मीच्या डोळ्यातील अश्रू त्या पावसासोबत वाढत होते. कधी एकदा आपल्या धन्याला सुखरूप पाहते असे तिला वाटत होते.


इकडे शेतात काशाच्या मनात विचारांचा काहूर माजला होता.आपले सारे मार्ग बंद झाले.या विचाराने हतबल होऊन काशा झाडाला बांधलेल्या झोक्याचा दोर घेतो.एका क्षणात आपले आयुष्य स़ंपवावे या विचाराने गळ्याभोवती दोरीचा वेढा घालतो.

तेवढ्यात समोरून त्याला लक्ष्मी येतांना दिसते.


आणि लक्ष्मी चे ते स्वप्न सत्य बनुन तिच्या डोळ्यासमोर उभे असते.असाच जोरदार पाऊस आणि आपला धनी फासावर लटकतो असे तिचे ते स्वप्न .


लक्ष्मी काशाकडे धावत सुटते.ती जोराने ओरडुन त्याला थांबवत असते.पावसाचा जोर इतका असतो की,तिचा आवाज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही.


ती जिवाच्या आकांताने ओरडत असते. तिचा आक्रोश पाहुन काशा भानावर येतो. हे आपण काय करणार होतो हे त्याला कळले, त्याच्या डोळ्यासमोर त्याची मुलं आली.याच झाडाखाली बसून बायकोला दिलेलं वचन आठवलं.काशा आपल्या हातातील दोर बाजुला टाकून देतो.लक्ष्मी काशाच्या जवळ येते. चिखलाने माखलेली ती फक्त काशाच्या चेहऱ्याकडे पहात होती.

पाऊस थोडा थांबला होता.दोघेही एकमेकांशी काही बोलत नव्हते.एक वेगळीच शांतता दोघांमध्ये असते.

दोघेही घरी जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलं आणि काशा झोपलेली असतांना लक्ष्मी घराबाहेर पडते.जातांना मुलीला हळुच काही तरी सांगुन जाते.

एक दोन तासांनी परत येते.काशा तिच्या कडे प्रश्नार्थक नजरेने पाहतो. ती त्याच्या जवळ जाते. आणि कालपासून दोघांत असलेली भयाण शांतता मोडत ती बोलते.ती काशाच्या हात आपल्या हातात घेते. आणि दुसऱ्या हातात असलेली रुमालाची पुरचुंडी त्याच्या हातात देते. काशा पुरचुंडी उघडुन पाहतो.आणि त्याच्यात असलेले एवढे पैसे पाहुन तो लक्ष्मी च्या गळ्याकडे पाहतो. आणि बोलतो "तुझं स्त्रीधन मोडुन आणलेलं पैकं मला नको."

तेव्हा लक्ष्मी त्याला सांगते "धनी तुम्ही माझं सर्वस्व आहात एका बाईसाठी तिचा नवरा, कुटुंब हेच तिचं धन असतं.. तुम्ही आहात म्हणून माझ्या जिवनाला शोभा ,कुकंवाला लाली हाय.तेच माझं खरं स्त्रीधन हाय.माझं सौभाग्य हाय...हे तर एक सोन्याचं दागिनं आहे फक्त.तुमच्या जिवापेक्षा मोठं नाही.आपण दुबार पेरणी करु. भरपूर मेहनत करून बक्कळ पैसा कमवुन, सम्दी देणी बी चुकवु. पण आपल्या पोरांसाठी आपल्याला जंगलं पाहिजे ना? माझ्या धन्याला हयाती लाभो. असं भरपूर सोन्याचं दागीनं येतील.हाच ईचार करते मी,तुम्ही बी तसाच ईचार करा.. यापेक्षा भारीतलं डोरलं घालीन मी.. पण कवा?? तुम्ही असाल तेवाच ना? माझं खरं सोनं, खरं स्त्रीधन तुमीच आहात, जास्त ईचार करु नका, लवकर कामाला लागू!" 


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational