swati khandare

Abstract Romance Tragedy

2  

swati khandare

Abstract Romance Tragedy

अवचित्

अवचित्

3 mins
136


सृष्टी सौंदर्याचे नादमय पडघम निनादत असताना नवचैतन्याचा सोहळा पूर्णाविष्कारत होता. नवकिरणांनी तेजोमय सकाळ नहाली होती. धवल धरा आभाळाकडे डोळे भरून पाहत होती. आज कोण जाणे कसे पण स्वच्छ मनासारखे असे आकाशही निरभ्र झाले होते. शांत,मंद वारा मनाला सुखावत होता. एरवी या बर्फाळ पर्वतावरचा वारा जीवघेणा राहतो पण आज मात्र काही न्यारे होते. संपूर्ण सृष्टीच जणू आनंदसोहळा साजरा करीत होती. या निःस्तब्ध वातावरणात, निसर्ग सौंदर्याची कैफ असणा-या माझ्या मनाच्या झडपाही मोकळ्या होत होत्या. दवाचे थेंब झेलायला जिथे गवतही नव्हते तिथे संपूर्ण देह मात्र दवमय झाला होता. काय सांगू तुम्हाला, नोकरीच्या जबाबदारीच्या ओझ्याखाली कायम कुतरओढ सहन करीत आलो,ज्यांना झाड म्हणून सावली दिली त्यांनी गवत म्हणून पायदळी तुडविले, भाकरीच्या अर्ध्या तुकड्यासाठी पार- पार लाचार झालो, नशीबाला दोष देत कायम कुढत राहिलो होतो. 

या सर्वांत ती मात्र सतत माझ्या सोबत होती. कायम म्हणायची,' संपले जरी हे जग सारे मी कायम तुझ्याच सोबत असेन, सोन्यासारख्या मातीत या तुझे-माझे लवलेश असेन, अंकुरूनी पुन्हा नव्याने घेऊ भरारी आकाशात, फिनिक्स पक्षाचे उदाहरण गिरवूया प्रत्यक्ष आयुष्यात '.मित्रहो, माझ्या आयुष्यातील तिचे स्थान अनमोल होते. पुस्तकांच्या गर्दीत हरवलेल्या मला तिने मैत्रीच्या दुनियेत आणलं होतं, तत्त्व आणि करड्या शिस्तीत वावरणा-या मला भावनापूर्ण व्यावहारिक जगात आणलं होतं, मितभाषी होतो मी, तिनेच शब्दफुलांची भरली ओंजळ दिली, मैत्रीच्याही पुढे जाऊन ऋणानुबंधाची ओढ वाटावी अशी आस दिली. शब्द ही अपुरे पडतात तिच्यासाठी, खरंच माझ्या आयुष्यातील ती चाँद होती. मी कधी-कधी गमतीने तिला म्हणायचो, 'समाँ यूँ बँधा है अफसानों में की अब मयख़ानो में पैमाने छलकते नहीं ', तर लटकेच रूसव्याने ती म्हणायची, ' पैमाने से छलकता जाम नहीं मैं, बीते समय की धारा नहीं मैं'। 

पण आज मात्र ती माझ्या सोबत नाहीये. तिच्या आठवणींच्या वेदना मला सोसत नाहीयेत. हा स्वप्नांचा लपंडाव खेळता-खेळता मी पुरता दमलो आहे. खेळ हा आशा-निराशेचा मी हरलो आहे, एक क्षण विसावा घेऊ द्या मला मी माघार घेणार नाही, खेळ दैवाचा असला जरी मीच जिंकणार आहे. आज नाही पण कधी तरी स्वप्नांची धूसर वाट मला तुझ्याकडे नक्की घेऊन येईन. सखे, भरल्या डोळ्यांनी तुझ्याकडे पाहात खूप खूप रडेन, तुझ्या खांद्यावर डोके ठेवून मन मोकळे करेन, तुझ्या कुशीत शिरून कधी नव्हे ती शांत झोप घेईन आणि पहाट होता-होता तुझ्या अधिकाराचं लेणं लेवून विरघळून जाईन. 

चला इथं तर उन्हं डोक्यावर आलीयेत, तिच्या आठवणीत दिवस सरेल, पण आठवणी सरणार नाहीत. या वेदना मी मनाच्या कप्प्यात जपून ठेवल्या आहेत. त्या विव्हलतेची आच मी तुला लागू देणार नाही. तुझ्या आठवणींचा काटा अंगावर सर-सर येतो आणि अंगभर रोमांच उठवून जातो. तुझ्या नजरभेटीसाठी मी चातक झालो आहे. हो, सोसतो आहे दुःख मी येथे, पण माझ्या भावना भंजाळलेल्या आणि संवेदना बोथट जाहलेल्या नाहीत. या एकांती मी क्षीण जीवन जगत आहे पण माझ्या हॄदयी मात्र आपल्या प्रितीचा फुलोरा कायम फुलवीत आहे. अगं राणी समजून घे मला, 'तुझमें समाँ जाऊँ इतनी किस्मत कहाँ मेरी, तेरे दर पे बेआबरू हो जाऊँ इतनी हैसियत कहाँ मेरी '।

माझं कायम असंच होतं पाहा, क्षणभर आठवणी मनभर गुंता करून जातात आणि रात सरली तरी काळजावर घाव मात्र कायमच्या देऊन जातात. माझं बांधलेपण लक्षात येऊनही हात देण्याच्याच प्रयत्नात असायचो मी पण त्यात काही नाती जुळली तर काही माणसं सुटली.....काळाच्या ओघात. यांच्यासोबतच माझ्यातील अल्लड बालपणाला कायम जपत राहिलो होतो. हे आयुष्य सुंदर करण्यासाठी 'मी'पणातला मी त्यागण्याचा पण करीत होतो. 

माझ्या ओंजळीतील मोगऱ्यांना जेव्हा तिचा सुगंध आला होता, मी तिच्यात किती सामावून गेलो आहे याचा प्रत्यय तेव्हा आला होता. आता दैवाची गाठ जेव्हा सैल होईल तेव्हाच तिची-माझी भेट होईल, त्या क्षणांच्या पूर्ततेसाठी आसुसलो आहे.....शब्दफुले वेचताना भावनांना हळूच फुंकर मारत आहे अन् नेत्रदव झेलताना मनीच्या गुंत्याची वाट सरतो आहे.


Rate this content
Log in

More marathi story from swati khandare

Similar marathi story from Abstract