अपंगांचे जीवन - एक गोष्ट
अपंगांचे जीवन - एक गोष्ट
अहो !, तुम्ही सर्व जण माझ्याकडे असे का बघतात. दिन, दया या नजरेने. मी अपंग आहे म्हणून का?
मला तर देवाने जन्मतः अपंग निर्माण केले आहे. यात माझा काय दोष, काय माहीत ह्यात त्या विधात्याची काय योजना होती ती. अजून मला ही नाही कळालं.
हो जेव्हा मला सर्व समजायला, उमजायला लागलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं, दुःख झालं, खूप रडली ही. माझ्या आईबाबानी अतोनात प्रयत्न केले माझ्या शरीराचा अधुपना घालविण्यासाठी. खूप डॉक्टर कडे ये जा केले. अक्षरशः डॉक्टरांसमोर पदर पसरवले. पण काही एक फरक पडला नाही. किंवा उपाय सापडला नाही. डॉक्टरांनी एकच सांगितलं ही जशी आहे तशी तिला स्वीकारा
आणि मग हळूहळू माझ्या आई बाबांनीही मला आनंदाने देवाची देणगी म्हणून स्वीकारले.
ते माझी खूप काळजी घ्यायचे, काहीच कमी पडू द्यायचे नाहीत.
मला अगोदर घराबाहेर पडायला लाज वाटायची, लोकं काय म्हणतील, काय बोलतील हे विचार मला एकटे पाडत होते.
मलाही तेव्हा वाटायचं की मी खेळावं, स्वतःच्या पायावर उभ राहावं, चालावं पण माझे पायच नाहीत तर मला कसे काय चालता खेळता येणार होते. व्हीलचेअरवरच माझं जीवन अडकलेलं होतं.
कॉन्व्हेंट शाळेत जायला वाटत होतं, पण मला तेथे प्रवेशच नव्हता, मग मला अपंगाच्या शाळेत घातले, तेथे मी माझ्यासारखेच खुप मुलं मुली पाहिल्या, आणि मग वाटले की मी ह्या जगात अशी एकटी नाही आहे तर कितीतरी अपंग म्हणून जीवन जगत आहेत. मी शिकत होती, एकेक वर्ग पुढे जात होती. माझं अक्षर खूप सुंदर होतं, माझ्या वर्गशिक्षिकांना माझं अक्षर खूप आवडायचे ते नेहमी माझ्या पाठीवर कौतुकाचे थाप द्यायचे, आणि कधी कधी घरी जाताना गोष्टीची पुस्तके, आत्मचरित्र पुस्तके वाचावयास द्यायचे, आणि मी घरी गेल्यावर ते सर्व पुस्तके मन लावून वाचत बसायची, त्यातून मला वाचनाची गोडी निर्माण झाली आणि वाचनातून लिखाणाची आवड मनात रुजली, हळूहळू मी स्वतः लिहू लागली, एखादा विषय मनात ठेवून जे काही सुचेल, ते लिहीत जाऊ लागली. माझे हे लिखाण शाळेत शिक्षकांना आवडू लागले. दिवसेंदिवस माझे वाचन लिखाण वाढू लागले,मला अनेक शिक्षकांचे मार्गदर्शन मिळू लागले, लहान वयातच मी स्वतः ला एका वेगळ्याच वळणावर उभे केले होते, माझे लेख, मी लिहिलेल्या कथा वेगवेगळ्या मासिकात येऊ लागले, वाचकांकडून चांगल्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. माझी कल्पनाक्षमता, विचार मंथन वाढले, आणि अपंगावर मात करत करत मी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी एक चांगली लेखिका बनली. कोण म्हणतं की अपंग जीवनात काहीच करू शकत नाही. एक पाय नसलेले गिरीश शर्मा खेळात प्राविण्य मिळवू शकतो, दोन्ही पायाने अधू असलेल्या प्रीती श्रीनिवास क्रिकेट टीम च्या कॅप्टन असू शकतात. तर मग का अपंगांना दया ह्या नजरेने बघतात. आम्हाला कोणी दया, बिचारे ह्या नजरेने पाहिलेलं आवडत नाही. आम्ही शरीराने अपंग असतो मनाने नाहीत. उलट देवाने प्रत्येक अपंग व्यक्तीमध्ये वेगवेगळे खूप दमदार असे कलागुण दिले आहेत, आणि हे मला वाचन करताना समजले.
समस्यां :- शारीरिक किंवा मानसिक बिघाडामुळे सर्वसाधारण व्यक्तींप्रमाणे आपली दैनंदिन कामे करणे ज्यांना शक्य होत नसते अशा व्यक्तींना आपण ‘अपंग व्यक्ती’ म्हणतो. मुख्यत: आनुवंशिक वारसा, अपघात किंवा रोग या तीन कारणांनी अपंगता निर्माण होऊ शकते.
अपंगांमध्ये, आंधळे, मुके—बहिरे आणि हातापायाने लुळे असलेले किंवा हातपायच नसलेले पांगळे-थोटे आणि मनाने दुर्बल असणाऱ्या व्यक्ती यांचा मुख्यतः समावेश असतो.
ह्रदय, फुप्फुस, डोळे इ. महत्वाच्या अवयवांच्या चिरकारी व्याधींमुळे अकार्यक्षम झालेले स्त्रीपुरुष व शैक्षणिक दृष्ट्या कमकुवत असणारी मुले यांचाही अपंग व्यक्तींत समावेश करण्यात येतो.
उपाय :- अपंग माणूस हा हीन दर्जाचा नसून केवळ दुर्दैवाने त्याच्याच उणीव उत्पन्न झाली आहे, म्हणून त्याचा कोणत्याही प्रकारे अपमान न करता समाजाने त्याला त्याचे योग्य ते स्थान मिळवून देण्यास साहाय्य केले पाहिजे. आणि कायम अपंग व्यक्तींना कार्यक्षम बनवून त्यांना आर्थिक स्वावलंबनाची संधी दिली गेली पाहिजे.