बदलते जग
बदलते जग


सकाळी पक्ष्यांच्या चिवचिवाटने मला छान अशा साखर झोपेतून जाग आली. उठायला कंटाळा आला होता; पण कामावर जाणे तर भाग होते आणि म्हणून बळेबळेच उठले. खिडकी उघडण्यासाठी खिडकीजवळ गेले. सहज खिडकीतून एक फक्त नजर टाकली आणि लक्षात आले, जग पूर्णपणे बदललेलं दिसतंय, आणि जेव्हा कॅलेंडरकडे लक्ष गेले, तेव्हा मला मोठा धक्काच बसला.
हे काय! मी 2020 मधून 2050 मध्ये कधी गेले. अरे बापरे हे काय! मी तर आश्चर्याने आ वासून कॅलेंडरकडे बघू लागले. आरशासमोरून जात असताना सहज आरशात नजर गेली आणि... मी... मी इतकी कशी काय वयाने मोठी दिसू लागले? माझे रूप कसे बदलले? मला काही समजतच नव्हते.
मी खोलीमधून बाहेर आले. पण हे काय? मला माझं घर माझ्या घरासारखं वाटत नव्हतं. माझ्या भल्यामोठ्या हॉलचे दोन विभाग पडले होते. एक विभाग हॉलसाठी तर दुसरा विभाग किचनसाठी. माझे भलेमोठे घर मला छोटे दिसत होते. आणि घरात कोणीच दिसत नव्हते. मी हॉलचा दरवाजा उघडून बाहेर येऊन पाहते तर हे काय मी फ्लॅटमध्ये असल्याचे मला जाणवले. मला काही सुचेनासे झाले.
मी तशीच फ्रेश होऊन आणि नाश्ता करून ऑफिससाठी निघाले. एप्रिलचा महिना होता. ज्या महिन्यात कडकडीत गरम व्हायला पाहिजे त्या महिन्यात चक्क थंडी लागत होती. रस्त्यातून जाताना मला खूप काही वेगळं दिसत होतं. माझ्या घराच्या (बंगल्याच्या) बाजूला जी दुसरी घरं (बंगले) होते, ते सर्व नाहीसे झाले होते आणि त्या जागी भल्या मोठ-मोठ्या 100 एक मजल्यांच्या पांढऱ्याशुभ्र अशा इमारती दिसत होत्या. रस्ता रुंद करण्यात आला होता. एक छोटा रस्ता चालणाऱ्या माणसांसाठी ठेवला होता. रिक्षा कुठेही दिसत नव्हती पण टॅक्सी, कार हे प्रवाशांना घेऊन जात होते. माझ्या ओळखीचे मला दिसत होते पण त्यांच्याही वयात बऱ्यापैकी फरक पडला होता. मी त्यांच्या सोबत हसत बोलत होते, पण माझ्या मनातल्या विचारांचे जाळे कोणीच तोडत नव्हते. तेवढ्यात माझ्यासमोर एक कार थांबली आणि माझ्याशी काही न बोलता त्या कारवाल्याने माझ्या हातात एक टॅब दिला आणि ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणावर क्लिक करण्यास सांगितले. मी स्टेशनला क्लिक केले, मी जसे त्यावर क्लिक केले तसे त्या ठिकाणाचे पोहचायचे किती रुपये होतील हे मला त्या टॅबवर दिसले. आणि नंतर त्याने मला माझ्या मोबाईलचा गुगल मॅप ओपन करण्यास सांगितला. कार पुढे जात होती. सर्व खूप वेगळंच दिसत होतं. जिथे तिथे भल्यामोठ्या इमारतीच दिसत होत्या. आमचं गाव हे गाव राहिलंच नव्हतं ते तर एक चक्क शहर झालं होतं. Corporate ऑफिसेस माझ्या पायाशी आल्या होत्या. पण माझं ऑफिस मात्र अंधेरीला होतं.
काचेच्या पारदर्शक उंचच उंच इमारती दिसत होत्या. गगनाला भिडतील अशा होत्या त्या. रस्त्यावर ट्रॅफिक तर नव्हते पण गाड्यांचा सुळसुळाट फार वाढला होता. रस्ता हा इतका सुंदर आणि स्वच्छ दिसत होता की क्षणभर असं वाटलं की मी विदेशातच आहे. परंतु माझे लक्ष एका Electronic बोर्डवर गेले आणि माझा हिरमोड झाला कारण त्यावर लिहिलेलं होतं "Welcome to Virar City."
एका रस्त्यांच्या दुतर्फा काही ठिकाणीच छोट्या छोट्या कुंडीमध्ये झाडे लावलेली दिसत होती. जशी अगोदर हिरवळ होती आपल्याकडे अशी आता हिरवळ परिसर राहिलाच नव्हता.
कारवाल्याने एका ठिकाणी गाडी थांबवली बाहेर पाहिलं तर एका काचेच्या प्लेटवर मोठ्या कर्स्युरायटींगमध्ये "विरार" असं लिहिल
ेलं मला दिसलं. मी कारमधून बाहेर आले आणि त्या कारवाल्याला पैसे देऊ लागली तसं तो बोलला. Sorry, आणि त्याच्या मोबाईलचा एक App उघडून तो मोबाईल माझ्या हाती दिला आणि मला माझ्या मोबाईलवरून गुगल मॅप स्कॅन करण्यास सांगितले आणि माझ्या मोबाईलवर जो O.T.P. आला तो त्याच्या मोबाईलला टाकला. आणि लगेच तितकेच पैसे माझ्या अकाऊंटमधून त्याच्या अकाऊंटला ट्रान्सफर झाले. मी बघतच राहिले की हे कसं काय शक्य आहे? गुगल (Map) मॅपवरून पैसे ट्रान्सफर!
आता मी चालत चालत स्टेशनजवळ आले होते. पण मला ट्रेनच्या जागी मेट्रो दिसत होत्या. स्टेशनवर आल्यावर क्षणभर असं वाटलं, जणू काही मी एअरपोर्टवर आले आहे. इतकं रिच वाटत होतं सर्वच. एक काचेचा मोठा दरवाजा आपोआप उघडला. मी आत प्रवेश केल्यावर तो दरवाजा आपोआप बंद झाला. उजव्या कोपऱ्यात भिंतीला लावून T.V. सारखी एक इलेक्ट्रॉनिक मशीन होती तिथून आपण स्वतःच तिकीट स्वतः घ्यायचं. पण ते तिकीट नाण्याच्या आकाराचं होतं. ते घेऊन मी मेट्रोची वाट पाहत उभे राहिली. मला माझ्या बाजूच्या काकीची मुलगी दिसली. बापरे ही तर शाळेत होती ना. किती बारीक दिसत होती. आता अशी गुबगुबीत.. बाजूला कोण उभा आहे तिच्या, अरे गळ्यात मंगळसूत्र दिसते म्हणजे हिचं लग्न झालं की काय?
तिच्याजवळ बोलायला जाणार इतक्या वेळेत मेट्रो आली. दरवाजे उघडले. सर्व जण रांगेत जात होते. 2020 पेक्षा किती तरी पटीने लोकसंख्या जास्त दिसत होती. आणि मेट्रोचा आकार ही लोकसंख्येनुसार वाढला होता. मेट्रो रुंदीने उंचीने आणि आकाराने खूपच मोठी होती. 2-2 मिनिटांवर मेट्रो येतच होत्या. मेट्रोनी वेग वाढवला, ती पुढे जात होती. मी बाहेरच बघत होते. मला वाटलं विरारच बदललं आहे परंतु, येथे तर पूर्ण मुंबई बदलली होती. हरित वसई, हरित मुंबई गडप झाली होती. सर्वत्र इमारतीच्या रांगाच लागलेल्या होत्या. कोण कोणाशी जास्त बोलत नव्हतं. भांडण नव्हतं चेंगराचेंगरी नव्हती. इतकी लोकसंख्या असूनही कोणाला त्रास होत नव्हता. जो तो आपल्या मोबाईलमध्ये गुंतला होता.
ऑफिसमध्ये पोहोचले. मला माझा बॉस खूप वयाने मोठा दिसत होता. केस पांढरे झाले होते. डोळ्यावर चष्मा आला होता. मला ऑफिसमध्ये नवनवीन चेहरे दिसत होते. पण तिथेही कोण कोणाशी बोलत नव्हते. कोण कोणाशीही न बोलता कसे काम करू शकतात हेच मला समजत नव्हते.
मला तर खूप जणांच्या केबिनमध्ये रोबोटसारखे यंत्र दिसले. मला खूप विचित्र वाटत होते.
माझं 2020 सालचं हसत-खेळत असलेलं ऑफिस आता यंत्रासारखं झालं होतं मला काही सुचेनासे झालं. शेवटी न राहावून मी माझ्या काहीच अंतरावर असलेल्या माझी सोबतीन स्वाती हिला जोरात हाक मारली. माझी हाक इतकी जोरात होती की तो आवाज माझ्या बॉस पर्यंत पोहोचला, रागारागाने ते माझ्याजवळ आले आणि काही बोलणार तोच... ...
अलार्म वाजला, मी घामाघूम झाले होते. आणि माझी झोपमोड झाली. मी उठून आजूबाजूला पाहिले सर्व तर व्यवस्थित होतं. उठून आरशासमोर उभी राहिली, मी तीच होती, कॅलेंडर बघितले, 7 फेब्रुवारी 2020 हा दिवस होता. मी स्वप्न पाहिले होते. असे स्वप्न, जे कदाचित भविष्यात अशाच प्रकारे घडणार असेल. खरं तर याची सुरुवात झाली असे म्हणायला हरकत नाही. निसर्गचक्र बदलत चालले आहे, हिरवळ विरळ होत चालली आहे. लोकसंख्या वाढत चालली आहे. असं एक विचित्र स्वप्न पाहून पुढची भयानक अवस्था काय असेल याचा अंदाज मला आला.