vinit Dhanawade

Thriller

3.0  

vinit Dhanawade

Thriller

" अनुजा ... !! (भाग दुसरा )

" अनुजा ... !! (भाग दुसरा )

29 mins
2.6K



       " अनू !! " पुन्हा त्याचं अस्पष्ट आरोळ्या, अनूजा बेडवरच पडून होती. बेशुध्द झालो होतो... धावत होती.... साहेबराव, नंदा, आदित्य आणि सन १८९९ , अनू अजूनही बेडवर पडूनच विचार करत होती. हे सर्व खरं आहे का.. बाहेरून पावसाचा आवाज येतं होता. कमाल आहे ना.. एवढे दिवस पाऊस पडतच आहे. अनुजा बेडवर उठून बसली. एकटीच रूम मध्ये. 


       बाहेर आली. सकाळच्या मानाने , रात्री काळोखच सगळीकडे. दिवे असूनही ते बंद होते. एखाद-दुसरा तेव्हडा चालू होता. त्याचा प्रकाश सुद्धा अंधुक असा. कसला आवाज नाही , का काही नाही. हळूच पुढे होऊन तिने खाली वाकून पाहिले. हॉलमध्ये सुद्धा कोणी नाही. फक्त आणि फक्त पावसाचा आवाज. कुठे गेले सर्व. मधेच दिव्याची ये-जा सुरु होती. विजेचा आवाज मधेच. एकदा पक्षी , त्या रात्रीत सुद्धा केविलवाणा ओरडत होता. भीतीदायक वातावरण.. अनू घाबरली. 


        पुढे जाऊया का.. कि सरळ बाहेर पळत जाऊया. अनुजा मागे वळली. नंदा हातात बॅटरी धरून उभी. काळोखात त्या अंधुक प्रकाशात नंदाचा चेहरा किती भयावह दिसत होता. अनूजा केवढ्याने दचकली. " काय झालं बाईसाहेब ... काही हवं आहे का ? " नंदा निर्विकार चेहऱ्याने उभी होती. " क... काही नाही.. " अनुजा घाबरत म्हणाली. पट्कन धावत ती तिच्या खोलीत शिरली. दरवाजा लावून घेतला. हळूच दरवाजा उघडून पाहिला. नंदा बाहेर नव्हतीच. अरेच्या !! आता तर बाहेर होती. इतक्या जलद कुठे गेली नंदा. 


        अनु पुन्हा बाहेर आली. कानोसा घेऊ लागली. तिच्या खोलीपासून बरोबर उलट्या दिशेला असलेल्या रूमचा एक दरवाजा जरासा उघडा आहे असं अनूला वाटलं. हलक्या पावलांनी अनू दरवाजापाशी पोहचली. हळूच डोकावून पाहिलं तिने आत. नंदा केस सोडून बसली होती, पाठमोरी होती. मघाशी अंगावरची साडी वेगळी होती, आता हि मळकी साडी कशी.. अनू विचार करत राहिली. ती रूमसुद्धा पडीक वाटत होती. संपूर्ण रूममध्ये एकच दिवा... तोही अंधुक प्रकाश... त्या प्रकाशात , खोलीचा बकालपणा अंगावर येत होता. अस्थाव्यस्थ सामान , भिंतीवर कोळ्यांची जळमटे, कुठे भिंतीचे बांधकाम पडलेलं , एक कपाट ... त्याचा एक दरवाजा नाही, उरलेल्या दारातून कपडे नुसते कोंबलेले...उघड्या खिडकीतून आत येणार पाऊस... विचित्र सगळं....  म्हणजे ... इतर हॉटेल स्वच्छ , टापटीप... आणि हिची खोली अशी कशी... त्यातही नंदा वेगळी का भासते , काही कळायला मार्ग नाही... .


         आणखी डोकावण्याचा नादात अनूचा दरवाज्याला धक्का लागला. हलकासा आवाज झाला. नंदाने पट्कन मागे वळून पाहिलं. इतक्यात जोराची वीज चमकली बाहेर... भयंकर आवाज.. अनुचं लक्ष नंदाच्या चेहऱ्यावर गेलं. नंदाचा तर चेहराच नव्हता.. नाक , डोळे , कान , तोंड .. काही काहीच नव्हतं. सपाट चेहरा. अनूला दरदरून घाम फुटला. तशीच अडखळत मागे आली.पण एवढी घाबरली होती कि तोल गेलाच तिचा, मागेच असलेल्या खोलीच्या दारावर आदळली. त्या धक्क्याने दरवाजा उघडला. आतील व्यक्ती समोर आली. कपड्यावरून साफसफाई करणारा... पुन्हा तसंच... मळके कपडे.. परंतु जसा बाहेर आला , तेव्हा दिसलं.. त्याचाही चेहरा नव्हता. अनूजा आणखी घाबरली. ओरडावे वाटतं होते, आवाज कुठे निघत होता तोंडातून.. पुन्हा उठली आणि पळत सुटली. आजूबाजूला आदळत पळत होती, पडत होती. फुलदाण्या.. चिनी मातीच्या.. पडून फुटत होत्या. त्या आवाजाने , बंद असलेले खोल्यांचे दरवाजे उघडत होते. बाहेर येणारी प्रत्येक व्यक्ती चेहरा विरहित होती.. अनू जोर काढून ओरडत होती.. आवाज का नाही फुटत तोंडातून माझ्या... अनू विचित्र अडचणीत होती. स्वतःची खोलीसुद्धा विसरली ती. धावत धावत दुसऱ्या टोकाला असलेल्या खिडकीपाशी पोहोचली. त्यात तिला दम लागलेला.. समोरच्या खिडकीच्या काचेत स्वतःच प्रतिबिबं दिसलं. आणखी एक धक्का !! अनू ओरडू शकत नव्हती कारण ... कारण तिला तिचं तोंडच दिसत नव्हतं. हो.. अनूने हात लावून पाहिलं. नाकाच्या खाली पूर्ण सपाट त्वचा.. जबदस्त धक्का होता हा.. अनू पुन्हा स्वतःची खोली शोधू लागली. धावता धावता पुन्हा एकदा एक फुलदाणीला आपटून खाली पडली आणि बेशुद्ध झाली.    


          सकाळ झाली नेहमीप्रमाणे. अनुजाने डोळे उघडले तर बेडवर होती. कालची रात्र आठवली तिला. ताड्कन उठून बसली बेडवर. स्वप्न होतं का ते. पण हातावर फुलदाणी लागल्याची नाजुकशी जखम होती. म्हणजे माझं तोंड ????? .... लगेच हात लावून पाहिला तिने.. होते तोंड जागेवर.. उठून आरशासमोर आली. ओठ ,दात सगळं तपासून बघितलं. परंतु मनगटावर काही दिसलं तिला. कसलीशी खूण , नक्षी होती. शाईने केलेली खूण असावी. हाताने पुसण्याचा प्रयत्न झाला करून, नाहीच गेली. पक्का रंग असावा. कोणी लावला पण, काही समजत नाही. खिडकीतून बाहेर पाहिलं ... पाऊस !! .. अरे.. मला इथे येऊन ३ दिवस तरी झाले. पाऊस थांबत कसा नाही. इतक्यात नंदा आली. " नमस्कार बाईसाहेब ... कशा आहात तुम्ही.. नास्ता करून घ्या.. " नंदाला बघून अनूजा दचकली. नंदा तर नीटनेटकी दिसत होती. मग काल रात्री काय झालं नक्की... नंदा नास्ता ठेवून निघूनही गेली. अनुजा तिला बाहेर जाई पर्यत बघत होती. नास्ता करू कि नको या विचारात अनू.. एका मागोमाग विचित्र घटना. नास्ता तसाच सोडून, हिंमत करून बाहेर आली अनूजा. 


          काल रात्री तर किती ठिकाणी धडपडलो, फुलदाणी ... ४-५ तर फुटल्याच... हाताला त्यानेच जखम झाली माझ्या... मनात बोलत अनूजा बाहेर आली. परंतु बाहेर सगळंच वेगळं. सर्व फुलदाण्या.. तश्याच्या तश्या अगदी. कुठे फुलदाणी तुटल्याचे निशाण नव्हतं. बाहेर साफसफाई सुरू होती रोजची. कालचे चेहरा नसलेली माणसे , आता नेहमीसारखी हसून स्वागत करत होती.... काय नक्की, मी काल बघितलं ते काय होते... हाताला तर जखम आहेच.. म्हणजे मी नक्की जागी होते... तशीच चालत चालत अनुजा खाली आली. खाली हॉलमध्ये कामे सुरु होती नेहमीची. आदित्य दिसला तिला. तशी ती त्याच्या जवळ पोहोचली. 

" नमस्कार !! कशा आहात आता. बरं वाटते आहे ना.. " आदित्यने हसून स्वागत केलं. 

" मी ठीक आहे.. " अनू बोलली पण लगेच तीच लक्ष त्याच्या मनगटावर गेलं. त्याच्याही मनगटावर तशीच खूण होती, जी अनूच्या मनगटावर होती. 

" जरा बोलायचं होतं.. एका कोपऱ्यात जाऊन बोलूया का ?? " आदित्य तयार झाला आणि दोघे हॉलच्या कोपऱ्यात एका टेबल होते, तिथे जाऊन बसले. 


" बोला .. काय बोलायचे आहे.. " आदित्य... 

" आधी सांग, हे हातावर काय आहे ? " आदित्य मनगटाकडे बघत राहिला. 

" हि नक्षी ना.. माहीत नाही मला सुद्धा, मी इथे आल्यानंतर किंवा आधी असावी. नक्की माहित नाही. ",

" माहित नाही म्हणजे ? ",

" माहित नाही म्हणजे लक्षात नाही.. ",

" कसं काय ? ",

" तेच... मी इथे कधी आलो ते सुद्धा लक्षात नाही माझ्या. जास्तीत जास्त ३ दिवसापूर्वीच राहते लक्षात. बाकी नाही आठवत, कदाचित त्याआधी कोणी हातावर गोंदवले असेल " अनूजा चिडली. 

" काय बोलतोस ते कळते का तुला.. एकतर आधीच काय घडते आहे ते कळत नाही.. त्यात तू असा विचित्र बोलतो आहेस.. असं कसं विसरलास.. मग या लोकांची नावे कशी माहित तुला... " ,

" अरे !! हे रोज भेटतात .. म्हणून आहेत ध्यानात.. तुम्हीपण बघा आठवून आधीचे... बघा काही आठवते का... " आदित्यने शंका व्यक्त केली. अनुजा मेंदूवर जोर देऊन आठवू लागली. खरंच तिला आठवत नव्हतं. फक्त इथे आलो ती सकाळ तिला आठवत होती. कमाल आहे... कसं आठवत नाही मला... आणखी डोक्यावर ताण देऊ लागली... डोकं दुखायला लागलं. परंतु काही आठवलं नाही तिला.. आणखी एक धक्का... मला वेड लागणार बहुतेक... डोकं धरून बसली... आणि तेव्हाच तिला कालची रात्र आठवली. 


" हा... आणखी एक... तू कधी रात्रीचा या हॉटेलमध्ये फिरला आहेस का ..कसं विचित्र असते सगळं.... ",

" म्हणजे कसं ?",

" तू कुठे होतास रात्री काल... ",

" खरं सांगायचं झालं तर तेही आठवत नाही... संध्याकाळ होतं आली कि सगळं हॉटेल रिकामी होते.. ",

" नक्की काय.. " ,

" संध्याकाळी ७ वाजले कि बाहेरची मंडळी साहेबरावांचा निरोप घेऊन निघून जातात आणि जे इकडचे आहेत ते येतेच राहतात. ते आपापल्या खोलीत जाऊन झोपतात. मला तर ७ नंतर काय होते ते पण मला माहित नाही. " अनूजा घाबरली. 

" थोड्यादिवसांनी तुलाही सवय होईल. आमच्यातली एक होईन जाशील ना तूसुद्धा... " 

आदित्यच्या या बोलण्याने अनूजा सुन्न झाली. खरंच होतं का असं... अनूजा अजूनही आठवायचा प्रयत्न करत होती. पण व्यर्थ सगळं. हॉटेलमध्ये सकाळी जाग आली तेच आठवत होतं तिला. पाणी आलं डोळ्यात. 

" रडतेस का ... माफ करा... रडता का तुम्ही.. " आदित्य....  

अनूजा काही बोलली नाही. लक्ष हॉलला असलेल्या खिडकी बाहेर गेली. पाऊस सुरूच. 


अनूजा चालत खिडकीपाशी आली. 

" हा पाऊस थांबत का नाही. " ,

" काय ? ", आदित्य.. 

" हा पाऊस.. मला आठवते आहे... मी इथे आल्यापासून पडतो आहे. म्हणजे ३ दिवसापासून पाऊस थांबलाच नाही का... आणि जर एवढा पाऊस पडतो तर पूर वगैरे यायला पाहिजे होता ना.. तर तेही नाही.. मी पळायचा प्रयत्न केला होता तेही आठवते मला. मग पाऊस कसा थांबत नाही. " 

आदित्यकडे उत्तर नव्हतं याचे. शांत उभा होता. अगदीच शांत वारा होता, पावसासोबत. अनुचं लक्ष पुन्हा त्या मनगटावर असलेल्या नक्षीकडे गेलं. आदित्यकडे वळली. 

" मी पळायचा प्रयत्न केला तेव्हा तुही होतास ना तिथे..",

" हो.. ",

" तुही इथे खूप दिवस आहेस ना.. तुला तुझ्या घरी जावेसे वाटतं नाही का... ",

" सुरुवातीला वाटलं ... आता तर आठवतं पण नाही माझं घर , कुटुंब होतं का ते.... एवढंच काय..... मला माझं नावं सुद्धा लक्षात नाही." 

"मग मला तुझं नावं सांगितलंस ते.. ",

" ते... हे इकडचे सगळे हाक मारतात या नावाने .. तुम्हाला तुमचं नावं आठवते का.. ", प्रश्न तर बरोबर होता आदित्यचा. अनूला तिचं "नाव" आठवत नव्हतं. नावं आठवायचा एक -दोनदा प्रयत्नही झाला... पण नाहीच. एक आठवलं, त्या अस्पष्ट हाका.. 

" नाव तर नाही आठवत पण काही वेळेस "अनू " या नावाच्या हाका ऐकू येतात मला.. तू ऐकलं आहेस का असं कधी ",

" नाही.. तरी अनू नाव छान आहे. " आदित्य हसत म्हणाला तरी अनू विचार करत होती. 


         म्हणजे मी खरंच इथलीच होणार का.. जसा हा आदित्य झाला आहे. म्हणजे याला तर काही वाटतंच नाही आता. निदान नाव तरी लक्षात राहिलं माझ्या. तरी मला इथून बाहेर जायचेच आहे. 

" इथून कोणी बाहेर जाऊ शकत नाही. असं काही ऐकलं होतं मी.. कोणाकडून आठवत नाही. मग कोणीच प्रयत्न करत नाही का बाहेर जायचा... " अनुचा पुढचा प्रश्न... 

" चांगला प्रश्न आहे... जास्त आठवत नाही, परंतु या हॉटेलच्या बाहेर कोणी जात नाही. कारण रोजचीच मंडळी असतात. हे इंग्रज लोकं येतात कधी कधी, ते काही वेळेपुरते दिसतात.. नंतर माहित नाही कुठे आणि कसे बाहेर जातात.. " अनुजा त्या बोलण्याकडे लक्ष देत खिडकीतून बाहेर बघत होती. 

" दिवसभर काय करतोस मग ? ", 

" काही नाही.. सकाळचा वेळ वृत्तपत्र वाचण्यात जातो. तोपर्यत दुपारचं जेवण तयार होते. जेवून झालं कि सगळेच झोपतात दुपारचे. संध्याकाळ होतं आली कि बरेचशे लोकं असतात हॉलमध्ये.. नंतर ७ वाजत आले कि सर्वच स्वतःच्या खोलीत जाऊन बसतात. " अनुजा सर्व ऐकत विचार करत बसली होती.  


           त्यानंतर आदित्य अनुजाला तिथेच सोडून बाकीच्या लोकांसोबत बोलण्यासाठी निघून गेला. अनू मग तशीच बाहेर पडणाऱ्या पावसाकडे बघत बसली. खरंच आठवणार नाही का आधीचं काही.. हे कसं शक्य आहे ना.. कसं,कोणी आपलं आयुष्य , आठवणी विसरू शकते.. आदित्य बोलला , त्यालाही आठवत नाही काही... त्यात हा पाऊस.. का थांबत नाही.... सारखा सारखा पाऊस, हे सुद्धा शक्य वाटत नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे या जागेत.. अनूने सगळं हॉटेल बसल्याजागी बघून घेतलं. सर्व काही जुन्या काळात असल्या सारखं... म्हणजे हे खरं आहे. स्वप्न नाही. हि माणसं खरी आहेत.. पाऊस खरा आहे.. फक्त या सर्वामध्ये काहीतरी चुकीचे होते आहे.. एक मिनिट... या सर्वामध्ये मीच वेगळी आहे.. याचा अर्थ, मी इथे नसायला पाहिजे... मी चुकून आलेली आहे. किंवा हा काळ चुकीचा आहे. काहीतरी केलंच पाहिजे... त्यापेक्षा , आपल्याला इथून निघायचं आहे , हे लक्षात ठेवलं पाहिजे. अनूने नंदाकडे एक वही आणि लिखाणासाठी पेन मागितला. पेन नव्हता.. शाईचे दौत आणि काही जुनाट कागदाची पाने तेवढी मिळाली. चालेल हे सुद्धा.. मनात म्हणत अनुने एका कागदावर " मला इथून निघायचे आहे.. " असं लिहून ठेवलं. तिच्या खोलीतच बसली होती. तर संध्याकाळ होण्याच्या आत, गेल्या ३ दिवसांचे जेवढं आठवलं तेवढं लिहून ठेवलं. रात्री, ती बाहेर आलीच नाही.. एका रात्रीचा "अनुभव" पुरेसा होता तिला. 


          पुढचा दिवस, सकाळ झाली. नेहमीचीच सकाळ... नेहमी सारखी उजाडली. नास्ता बेडवरच, तोही नेहमी सारखा. नास्ता, अंघोळ करून अनू खाली हॉलमध्ये आली. आदित्य होताच खाली. आदित्यला पाहिल्यावर कालची गोष्ट आठवली. आपण जुनं विसरलो आहे हे तिला "आठवलं ". पुन्हा आठवण्याचा प्रयन्त, आता तर ती इथे कशी आली तेच विसरली. म्हणजेच इथला पहिला दिवस.. तोही लक्षात नाही. भयानक आहे हे. परंतु तिने लिहून ठेवलं आहे हे आठवलं. आपल्याला निघायचे आहे तर आधी एक हॉटेल पूर्ण बघितलं पाहिजे, म्हणत अनूजा हॉटेलचा फेरफटका मारू लागली. वरच्या मजल्यावर तर ती फिरली होती. हॉलमध्ये कमीच... हॉल तरी बराच मोठा होता.बऱ्याच ठिकाणी सुंदर पेंटिंग्स लावली होती. चालत चालत हॉलच्या दुसऱ्या टोकाला पोहोचली. खिडकीतून बाहेरच द्रुश्य पाहत राहिली. जागोजागी ठेवलेल्या टेबल, खुर्च्यावर लोकं चहा, कॉफी घेत गप्पा मारत होती. मोठठंच मोठा पसरलेला बगीच्या.. मोठमोठी झाडे... काही दगडी खांब... आणि एक मोठ्ठा लोखंडी गेट.. सोबत पाऊस बाहेर होताच. एकच दरवाजा बाहेर जाण्याचा .. पुन्हा आल्यापावली , हॉलच्या दुसऱ्या टोकाकडे निघाली. सर्व भितींवर हात फिरवत चालत होती. चित्र, फुलदाण्या.. छान छान फुलं... सुगंधी वातावरण... किती छान वाटतं होतं ते. पुन्हा हॉलच्या एका टोकाला पोहोचली. 


        सगळंच तर परफेक्ट होतं. मग गडबड कश्यात आहे... तिथल्या एका खिडकीतून बाहेर बघितलं असता, काही इंग्रज अधिकारी बाहेर निघाले होते. ते कसे बाहेर जातात, हे बघत होती अनूजा. गेटजवळ येताच त्यांच्याभोवती धुक्यासारखं काही जमा झालं. त्यापुढे काही दिसलं नाही. धुकं विरळ झालं तर कोणीच नव्हतं तिथे.. कमाल आहे.. विचार करत अनू पुढे आली. विचारांच्या धुंदीत चालत होती, तर एका नोकराला , जो नास्ता घेऊन जात होता .. त्याला आपटली.. सगळा नास्ता खाली.. " माफ करा.. माझं लक्ष नव्हतं. " तोच म्हणाला आधी. जमीन साफ केली आणि लगबग करत निघून गेला. अनूने फक्त नजर दुसरीकडे वळवली असेल.. अगदी २-३ सेकंदांचा अवधी, तोच पुन्हा तसाच नास्ता घेऊन येताना दिसला. ऑ !! कसं शक्य आहे हे.. अनूला वेगळाच प्रश्न... 


        अरेच्या !! एक लक्षातच आलं नाही.. किचन कुठे दिसलंच नाही आपल्याला.. या हॉलभर फिरली... वरच्या मजल्यावर फक्त खोल्या आहेत.. मग किचन कुठे... आणि किचनच नाही तर नास्ता , जेवण कसं बनवतात. काय सुरू आहे नक्की... काय जागा आहे हि... पुन्हा एकदा तिने हॉलभर फेरी मारली. नाहीच.. चक्रावून गेली.. समोर नंदा दिसली. नंदाला काहीतरी सांगू.. " नंदा... मला काहीतरी खायला घेऊन ये .. " नंदा टेबल साफ करत होती. " हो बाईसाहेब... आणते.. " नंदा निघाली तशी अनूजा तिच्या मागोमाग निघाली. काही पावलं चालली तशी नंदा थांबली.. मागे अनू... " काय झालं बाईसाहेब... आणते तुम्हाला खायला... " म्हणत झपझप निघून गेली. इतकी अचानक कुठे गेली हि.. विचार करत होतीच. इतक्यात " बाईसाहेब !! " असा मागून आवाज आला. अनूजा दचकली. नंदा मागेच उभी.. समोरून गेली आणि काही सेकंदात मागून कशी काय.. " न.. नको मला... घेऊन जा परत... "," ठीक आहे.. " म्हणत नंदा पुन्हा लगेच दिशेनाशी झाली. काहीतरी भयंकर आहे हे.. आदित्य समोरच वृत्तपत्र वाचत होता. पळत त्याच्याकडे गेली. 


" आदित्य !! अरे तू काय पेपर वाचत बसला आहेस.. इथे काहीच बरोबर नाही. ", 

" काय झालं एवढं ओरडायला.. " ,

" तुला कळते का.. इथे किचनच नाही आहे.. मग हे सर्व नास्ता , जेवण कुठून आणतात... " ते ऐकून आदित्य उभा राहिला.

" काय !! कसं शक्य आहे.. " ,

" हो रे... मी बघितलं सगळं हॉटेल... नाहीच आहे कुठे " आता आदित्य सुद्धा चक्रावला. धावतच त्याने हॉटेलभर फेरी मारली. 


आदित्यला पटलं अनुजाचे बोलणे, " खरंच ग... तू बरोबर बोलतेस.. पण काय करणार आपण.. साहेबरावच्या परवानगी शिवाय कोणी बाहेर जाऊ शकत नाही. ",

" हो.. तेही माहित आहे मला.. तरी काही करून मला या हॉटेलच्या बाहेर जायचे आहे.. तू मदत करशील का ? " अनुजा काकुळतीने बोलली. 

" पण कसं.. इथे ३-४ दिवसापूर्वीचच आठवते.. काही ठरवलं करायचे तरी ते विसरून जाणार... त्यात आता हे नवीन समोर आले... डोकं चक्रावून गेलं अगदी.. ",

" चल... काही दाखवते तुला.. " आदित्यचा हात पकडून त्याला स्वतःच्या खोलीत घेऊन आली. तिने जे लिहून ठेवलं होतं ते आदित्यला दाखवलं. त्याला ती कल्पना आवडली. 

" एक विचार केला इथून बाहेर जाण्याचा तरी ते शक्य वाटत नाही. त्या गेटजवळ काय झालं तुझं हे आहे आठवणीत माझ्या... तुझा श्वास कोंडला होता. मग त्याच्या पलीकडे कसं जाणार... " आदित्य बोलला तेही बरोबर होते. 


" एक काम करूया.. हे मी तरी असं रोज लिहिणार आहे, म्हणजे लक्षात राहील.. तू सुद्धा असंच लिहायला सुरुवात कर.. आणि यातून बाहेर पडण्यासाठी काही मार्ग असेलच... काहीतरी कमजोरी शोधली पाहिजे. ",

" ठीक आहे... मी करिन मदत.. " आदित्यने विश्वास दिला अनूला. पुढच्या दिवसापासून सकाळ झाली कि दोघांचे एकच काम.. हॉटेलभर फिरून काहीतरी शोधायचे... अर्थात कोणाला समजणार नाही असं.. रोजच्या घडामोडी लिहून ठेवायच्या.. असा पुढे एक आठवडा गेला. दोघांचे प्रयन्त सुरु होते. पण वेगळं तरी काय भेटणार.. ते लिहून ठेवायचे म्हणून सर्व गोष्टी लक्षात राहिल्या. अश्याच एका दिवशी, दोघे सकाळचे "फिरून" आल्यावर निराश होऊन एक टेबलावर बसले. अनुचं लक्ष टेबलावर असलेल्या मेणबत्ती कडे गेलं.. तिला काही वेगळं जाणवलं. तसं आजूबाजूच्या टेबलावर पाहिलं. सर्व ठिकाणी मेणबत्या होत्या. पण होत्या तश्याच होत्या.. 

" विचित्र आहे ना.. " ,

" काय ते ",

" या मेणबत्या.. सर्व आहे तश्याच आहेत, कधी वापरात नाहीत.. शिवाय रात्री तर कोणी नसते इथे .. मग कश्यासाठी ठेवल्या आहेत... कळलं ना तुला.. " आदित्यने नजर फिरवली. 

" हो गं.. लक्षात नाही आलं माझ्या.. " 


आदित्यने एका नोकराला आवाज दिला.. " या मेणबत्या पेटवत का नाहीत.. " त्यावर त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव बदलले.. 

" का.. कशाला पाहिजे तुम्हाला नसत्या चौकश्या... ",

" पण विचारलं तर काय झालं... " अनूजा.. तेव्हड्यात साहेबराव येताना दिसले. 

" शोभेच्या आहेत त्या... छान दिसतात म्हणून ठेवल्या आहेत.. मिळालं उत्तर... " साहेबराव उत्तरले. 

" हे उत्तर नाही आहे.. मला खरं उत्तर पाहिजे आहे.. ",

" हेच उत्तर आहे.. जास्त शहाणपणा करायचा नाही... तुम्हा दोघांना गेला आठवडा भर बघतो आहे.. मला काही समजत नाही तुमच्या बद्दल.. असं वाटतं असेल ना , तर ते काढून टाका मनातून.. जेवायला मिळते ना... ते गिळायचा आणि चुपचाप राहायचं इथे.. " साहेबरावांचा आवाज चढला. 

" नाही राहायचं आहे इथे... सोडत का नाही आम्हाला... " अनुचा आवाज सुद्धा चढला.

" सोडीन... वेळ आली कि.. " साहेबराव मोठयाने हसला आणि निघून गेला. 


आदित्यने अनुला जबरदस्ती खाली बसवलं. 

" शांत हो.. त्यांच्याकडे काहीतरी आहे.. म्हणून आपण बाहेर जाऊ शकत नाही. " अनुजा शांत झाली. थोड्यावेळाने बोलली. 

" तू अश्या किती लोकांना ओळखतॊस जे आपल्यासारखे रोज दिसतात.. " ,

" खूप जण आहेत.. " ,

" तुला कसं माहित तेही अडकले आहेत.. " ,

" एक अंदाज लावला. कारण हे इंग्रज लोक येतात ना.. त्यांनाच खूप वेळेला बाहेर जाताना पाहिलं आहे मी.. हि आपल्या मनगटावर नक्षी आहे ना, तशी त्यांच्या हातावर नसते.. आपल्या सारखे भारतीय आहेत ना.. जे रोज दिसतात... त्यांच्या हातावर अशी नक्षी आहे. ते कधीच बाहेर जात नाहीत.. " नवीन शोध.!! अनूजा तिच्या मनगटावरील नक्षी निरखून पाहू लागली. सापाची नक्षी होती ती. जणू काही सापाने, विळखा घातला आहे अशी.. म्हणजे टाळे लावावे असे भासले तिला. आदित्यच्या मनगटावर तशीच नक्षी.. अचानक तिला तो बाहेरचा गेट आठवला. त्या लोखंडी गेट वर सुद्धा अशीच एक मोठी नक्षी बनवली आहे.. शिवाय आजूबाजूच्या भिंतीवर सारख्याच नक्षी होत्या. 


" काहीतरी ध्यानात येते आहे माझ्या... हे असं काही मनात नाही मी.. पण कोणत्यातरी शापाने , दुष्ट शक्तीने हि जागा प्रभावित आहे असं वाटते.. या सापाचं काहीतरी असणार .... या मेणबत्या.. त्याचंही कळलं.. किचन नाही इथे... मेणबत्या तश्याच शाबूत.. कधी पेटवल्याचं नाहीत.. आगच नाही वापरात हे... नास्ता , जेवण जादूने करतात वाटते." यावर मात्र अनु स्वतःवरच हसली. 

" मग पुढे काय ? ",

" अजून एक गोष्ट... साप आगीला घाबरतो.. तसं करून बघू... आग लावण्यासाठी काही साहित्य आहे का... मेणबत्ती पेटवून बघितली असती.. " ,

" माहित नाही.. कधी विषयच आला नाही... जेवण , नास्ता मागितला कि लगेच पुढ्यात आणून देतात... किचन मध्ये जाण्याचा संबंध आलाच नाही कधी.... त्यात ते नाहीच आहे हे तुझ्यामुळे कळलं.. " त्यावर अनुचा चेहरा पडला. 

" एक मिनिट.. ते इंग्रज येतात ना.. त्याकडे काही असलं तर.. त्यांच्याकडे काहीतरी नक्की मिळेल.. ,"

"चालेल " अनुजा खुश झाली. " नक्की बघ.. एक काम करूया. मी जाते खोलीत.. तुझ्या ओळखी आहेत इथे बऱ्यापैकी.. बघ काही मिळते का.. " म्हणत अनुजा तिच्या खोलीत गेली.. विचार करता करता कधी डोळा लागला ते कळलंच नाही. 


        कसलातरी आवाज येतं होता. अनुने हलकेच डोळे उघडले. बघते तर मागे एक गुहा.. खाली बघते तर ट्रेनचे रूळ.. याचा अर्थ तो रेल्वेचा भोगदा होता. दुरून ट्रेन येण्याचा आवाज.. आणि आपण बरोबर समोरच बसलो आहे, हे अनुच्या लक्षात आलं. उठायचा प्रयन्त केला तिने.. परंतु तिचे हात-पाय बांधलेले... गाडी जवळ येतं होती. जोर लावून तिने दोऱ्या तोडल्या. उभी राहत होती. इतक्यात ट्रेन जवळ आलीच. अनुने डोळे मिटून घेतले. 


         काही वेळ असाच गेला.. काही घडते आहे का ते पाहण्यासाठी तिने एक डोळा उघडून बघितलं. एका किल्ल्याच्या टोकावर उभी होती ती. खाली खोल दरी... कसाबसा तोल सांभाळला तिने, सोबतीला सुसाट वारा.. इतका कि अनुचा तोल गेलाच.. खोल दरीत पडू लागली ती. मोठयाने किंचाळली.. " वाचवा !! " जमिनीपासून काही अंतरावर असताना, कपाळमोक्ष होणार आता.. म्हणत तिने डोळे मिटून घेतले. 


          पुन्हा एकदा डोळे मिटून बसली होती. " अनू !! ", " अनू !! "... दोन वेळेस तिला हाक ऐकू आली. एका डोळ्याने बघितलं तिने. अस्थाव्यस्त सामान, एक मुलगी.. जवळपास तिच्याच वयाची.. सामान आवरत होती. कोण हि, हिला ओळखते का मी.. " अनू !! बाई उठ ग... किती झोपणार अजून.. " अशी ती मुलगी सारखी सारखी बोलत होती. खूप वेळ तिच्याकडे बघून सुद्धा "ती" नक्की कोण ते आठवतं नव्हतं. कोणीतरी नक्कीच ओळखीची आहे असं वाटत होतं सारखं.. खूप जोर दिला मेंदूवर , तेव्हा काही आठवते आहे असं वाटू लागलं.. आणखी एकाग्र करण्यासाठी डोळे मिटून आठवू लागली. 


" अनू मॅडम , अनू मॅडम .. " असा शेजारून आवाज आला.तसे अनुने डोळे उघडले. आदित्य शेजारी बसून होता. 

" काय झालं.. डोळे मिटून का बसलात.. " आदित्य विचारात होता. अरे !! मी तर झोपले होते ना.. मग इथे कशी.. स्वप्न आहे कि काय हे सुद्धा... 

" मी तर माझ्या खोलीत झोपली होती ना..", अनुने आदित्यला विचारलं. 

" नाही, आपण तर जवळपास एक तास गप्पा मारत बसलो आहोत इथे. " अनुजा पुन्हा विचारात.. 

" आपण आग लावण्याचे साहित्य या विषयावर बोलत होतो. आणि मधेच तुम्ही डोळे मिटून बसलात.. " जाऊदे .. हि जागाच विचीत्र आहे.. असो 

" तुला भेटलं का काही.. " ,

" हो " आदित्य आजूबाजूला पाहत म्हणाला. " हि काडेपेटी मिळाली एकाच्या खिश्यातुन.. ",

" व्वा !! कशी काय मिळाली.. " ,

" ते राहूदे .. आता पुढे काय.. ",

" अरे पण इथे .. आग हा प्रकारच नाही ना.. मग त्याने काडेपेटी कशी आणली. ",

" अहो.. ते इंग्रज लोक काही तरी ओठात धरून तिला आग लावतात.. मला माहित नाही काय असते ते... ते बाहेर तसं करत असतात... हॉटेलमध्ये परवानगी नाही त्याला.. म्हणून एकाच्या नकळत घेतली हि काडेपेटी.. ते जाऊ दे ना.. पुढे काय करायचं आपण.. ".

"थांब ... विचार करू दे मला.. " अनु विचार करू लागली.. काहीच सुचलं नाही.. " मी माझ्या खोलीत जाऊन विचार करते.. तेथे सुचेल काहीतरी.. " म्हणत अनुजा तिच्या खोलीत जाऊन बसली. 


            काडेपेटी कितीतरी वेळ हातात धरून विचार करत बसली होती. काय करूया ... काय करूया.. अचानक तीच लक्ष मनगटावर असलेल्या सापाच्या नक्षीकडे गेलं. काही विचार करून तिने खोलीचा दरवाजा बंद केला. दरवाजा बंद आहे हे नक्की करून ते बेडवर येऊन बसली. एक काडी काढून भुर्रकन पेटवली. हळूच सापाच्या नक्षी जवळ नेली. अजबच !! ... सापाने हळूच त्याचा विळखा सोडला..आणि धूसर होतं होतं... नाहीसा झाला साप.. जणूकाही जिवंत साप असावा असंच झालं. अनुला किती आनंद झाला. पण जशी काडी विझली, तसा तो साप पुन्हा दिसु लागला आणि मनगटावर पुन्हा होता तसा विळखा घातला.अनुला समजलं... इथून बाहेर जायचे असेल तर आगीचा वापर करावाच लागेल.. त्याशिवाय पर्याय नाही. 


            दुपार नंतर , अनुजा पुन्हा खाली आदित्यला भेटायला आली. आदित्यशी छान जमलं होतं तिचं. आदित्यला बघत होती. कुठे दिसत नाही.. झोपला असेल म्हणत एकटीच खाली येऊन बसली. बाहेर बघत बसली. आदित्य आला काही वेळाने... 

" मग काय ठरवलं पुढे... ",

" हा.. " अनुजा भानावर आली. " मी एक प्रयोग करून बघितला. काडी पेटवली आणि या सापाच्या नक्षीजवळ नेली. तर ती गायब झाली, काडी विझल्यावर पुन्हा होती तशी परत हातावर आली. म्हणजेच आगीचा उपयोग केला तर मी बाहेर जाऊ शकते... सोबत तूसुद्धा.. बाहेर पडशील यातून.. " अनुजा आनंदात सांगत होती. 

" हो हो.. पण काडेपेटी किती वेळ राहणार.. संपेल ना.. " ,

" मग मशाल बनवीन मी... पण बाहेर जाईनच.. " अनूजा आनंदात.. 

" मशाल ?? .. बाहेर पावसात राहील का आग.. " यावर अनूजा शांत बसली. 


        खरंच यार.. किती दिवस.. पाऊस पडतोच आहे.. पूर्ण तयारी वाया जाणार पावसामुळे.. खूप विचार करून अनूजा बोलली. 

" एकच पर्याय आहे.. संपूर्ण हॉटेललाच आग लावायची. " यावर आदित्य "आ" वासून तिच्याकडे पाहत राहिला. 

" बऱ्या आहात ना तुम्ही.. कसं शक्य आहे हे... ",

" सगळ शक्य आहे.. फक्त मला मदत कर.. " आदित्य कसा बसा तयार झाला. आग मोठी लावली पाहिजे.. तरच शक्य आहे याच्या नजरेतून सुटायला, हे अनूजाला चांगलंच समजलं होतं. परंतु आगीला पसरायला मदत करेल असं पाहिजे काहीतरी.... मेणबत्या.. त्याकडे कोणाचंच लक्ष नसते. हो.. त्याचाच वापर करायचा. दोन-तीन तरी पुरेशा होतील. मनात आलं तसं तिने बघता बघता टेबलावरची एक मेणबत्ती लपवून खोलीत नेली सुद्धा. आदित्यला हि तिने तसेच करायला सांगितलं. पुढच्या दोन दिवसात अनूने चांगली तयारी केली. आदित्य तयार होता. कोणीच मेणबत्त्या गायब होतं आहेत, याची तसदी घेतली नाही. 


अखेर त्यांनी ठरवलं, हॉटेल पेटवायचे.. पण सुरुवात कुठून आणि कधी करायची..... ते ठरत नव्हतं. 

" कधी लावणार आग.. " अनु आदित्यला विचारत होती. 

" हे बघा अनू मॅडम.. मी आधीच घाबरलो आहे या विचाराने... पण तुम्हाला मदत करायचे ठरवले आहे मी.. " ,

"अरे आदित्य ... घाबरू नकोस...काही वाईट होणार नाही. उलट, इथे सर्व अडकले आहेत ना.. ते सर्व आपापल्या घरी जातील.. तूही.. " त्यावर आदित्यला थोडा धीर आला. 

" वेळ दुपारची ठीक असेल आपल्यासाठी.. कारण तेव्हा सर्वच झोपलेले असतात... तुमच्या आणि माझ्या खोलीत आग लावायला सुरुवात करूया.. आणि या हॉटेलमध्ये पाहिलंत ना.. सर्व बांधकाम लाकडी आहे.... त्यात सगळीकडे मोठे मोठे पडदे आहेत.. आग झटक्यात पसरेल.. फक्त काळजी घ्या, आग लावताना.. मी दोन मशाली बनवल्या आहेत.. अशीच लाकडे जमवून.. त्यात मेण लावून ठेवलं आहे. म्हणजे खोलीच्या बाहेर आलो कि आग लावायला बरं पडेल. शिवाय.. आपल्या मजल्यावर.. ती शेवटची खिडकी आहे ना.. त्याच्या बाजूला एक लहानशी खोली आहे..अडगळीची.. तिथे सर्व जुनं सामान, हे रोजचे वृत्तपत्रे.. ठेवलेले असतात.. शिवाय ती खोली उघडीच असते... तिथूनच मशाली साठी लाकडं मिळाली.. त्यात जर आग लावली तर मग आग चांगलीच भडकेल. " आदित्यने एका दमात सर्व सांगितलं. 


" खूप छान !! किती तयारी केलीस तू.... मग ठरलं..आपण आजच हे करायचं सर्व.. ",

" चालेल ... नक्की करायचं.. ",

" पण साहेबरावला कळलं तर.. " अनुजाला प्रथमच भीती वाटली. 

" आता तुम्ही घाबरत आहात मॅडम.. घाबरू नका... त्याचीही तयारी केली आहे मी.. साहेबराव दुपारी बरोब्बर २ वाजता झोपायला जातात... त्याचवेळेस मी त्याची खोली बाहेरून बंद करिन..येणेंकरून ते बाहेर येणार नाहीत,.. ते येतील बाहेर तोपर्यंत आपण वरचा मजला पेटवला असेल.. " मग अनुजाला धीर वाढला. छान प्लॅन होता. दुपारची वेळ झाली. सगळ्यांची जेवणे वेळेवर म्हणजे १२.३० ला झाली. रोजचीच दुपार..रोजप्रमाणे जेवून झाल्यावर सगळे झोपायला आपापल्या खोलीत गेले. आदित्य , अनुजा फक्त जागे होते आपल्याला खोलीत... २.१५ वाजले तसे दोघे बाहेर आले. अनुने हळूच दरवाजा उघडून पाहिलं. बाहेरचा कानोसा घेतला , कोणीच नव्हतं बाहेर.. आदित्यने एक मशाल अनु कडे सोपवली. हळू हळू पावलं टाकत आदित्य , साहेबरावच्या खोलीबाहेर येऊन उभा राहिला. आजूबाजूला कोणी नाही बघून त्याने ती खोली बाहेर कडी लावून बंद केली. 


            अनुजा आधीच तिच्या खोलीत जाऊन बसली होती. आदित्य आला तसं तिने एक मशाल पेटवली. त्यावर दुसरी मशाल पेटवून आदित्यला बोलली. " तुझ्या खोलीत सुरु कर .. मी माझ्या.. आणि एक एक मेणबत्ती पेटवून बाहेरच्या पडद्याखाली ठेवून देऊ.. जळतील ते स्वतःच.. शिवाय तुला त्या अडगळीच्या खोलीत आग लावायची आहे... आहे ना लक्षात.. ",

" हो " आदित्य ते ऐकून निघू लागला. अनुने थांबवलं. " आदित्य... घाबरू नकोस.. होईल सर्व ठीक.. ".

" हो नक्की... सगळ्यांना वाचवू... स्वतःच्या घरी जाऊ.. " म्हणत आदित्य धावतच त्याच्या खोलीत निघून गेला. 


           अनुजाने तिच्या खोलीचा दरवाजा बंद केला आतून.. एक दिर्घ श्वास घेतला तिने आणि "कामाला" सुरुवात केली. प्रथम पडद्यांना जळती मशाल टेकवली. त्यानंतर दुसरा पडदा.. किती मलमली स्पर्श त्या कापडाचा... भरभर जळू लागलं ते.. त्यानंतर तिने बेडवर मशाल टेकवली... इतके दिवस यावर आपण झोपत होतो.. आठवणी जाग्या झाल्या.. त्यात अनुने खिडकी उघडली. वाऱ्याने आगीचा जोर आणखी वाढला. लाकडी सामानाने आग पकडली. आता इथे थांबणे शक्य नाही म्हणत ती खोलीच्या बाहेर आली. आदित्यही त्याच वेळेस बाहेर आला. अनुजाने एक एक मेणबत्ती पेटवत बाहेरील मोठ्या पडद्याखाली ठेवायला सुरुवात केली. आदित्यने एक मेणबत्ती पेटवून त्या अडगळीच्या खोलीत टाकून दिली.. कागदांनी पट्कन आग पकडली. सगळं अगदी ठरल्याप्रमाणे झालं... अनुने तिचा काम चोख बजावलं.. बघता बघता वरचा सगळा मजला पेटू लागला. जशी आग आजूबाजूच्या खोलीत पसरू लागली तसे सर्व लोकं बाहेर येऊ लागले. 


         किती मोठ्ठी आग लागली वरती.. सर्वच खाली पळू लागले.. साहेबरावची खोली अजूनही बंदच होती. अनुने आदित्यला खूण करून " खाली जाऊया " असं सांगितलं. दोघे खाली पोहोचले.. कोणाचेच लक्ष नाही या दोघांकडे.. पळापळ नुसती.. त्याचा फायदा घेत दोघे हॉलच्या एकेका टोकाला गेले. आणि दोघांनीही लगेच आपलं काम सुरु केलं. त्यात ते दोघे हॉलमधील खिडक्याही उघडत होते.. बाहेर पावसासोबत वारा होताच.. खालीसुद्धा आग पसरू लागली. सर्वचजण आग विझवण्याचे प्रयन्त करत होते. पण व्यर्थ... अनुजाने मनगटाकडे लक्ष दिलं.. सापाची नक्षी... साप विळखा सोडून होता, पण गेला नव्हता.. एका खिडकीजवळच्या पडद्याजवळ आली. त्याबाजूलाच एक दरवाजा दिसला तिला.. हा तर कधीच दिसला नाही एवढ्या दिवसात.. तिने दरवाजा उघडून पाहिलं.. थोडी खालीच होती ती खोली. मिट्ट काळोख होता आत. तळघर असावे.. मग दरवाजा का उघडा ठेवला यांनी.. कदाचित कोणी गेलं असेल आत.. आग लागली तेव्हा राहून गेलं बंद करायचं... स्वतःशीच बोलत ती २-३ पायऱ्या उतरली. आत मध्ये दारुगोळा.. शस्त्रसाठा... खूप होतं आतमध्ये.. बापरे !!.. किती आहे हे... म्हणून इथे आगीचा वापर करत नाहीत तर... अनुजा पटकन बाहेर आली. अचानक विजेचा मोठा आवाज झाला. अनुने खिडकीतून बाहेर पाहिलं.. पावसाचा जोर प्रचंड वाढला होता. आभाळसुद्धा अधिक काळे आणि भयावह दिसत होते. वाऱ्याने भयानक जोर पकडला होता. वादळ येणार बहुदा.. अनु विचार करत होती. आणि पुन्हा वीज चमकली.. डोळे दिपून गेले. किती लख्ख प्रकाश !! तसे तिने आत पाहिलं... वरची आग आता खाली येतं होती. आजूबाजूला सगळंच जळत होतं. आणि समोर साहेबराव... आदित्यला एक हाताने पकडून ठेवलं होतं आणि रागात अनुकडे पाहत होते.   


" दोघेही जिवंत राहत नाही तुम्ही आता.. " साहेबराव दात-ओठ खात होता. " दरवाजा तर आधीच बंद केला आहे.. बघतोच कोण कसं बाहेर जाते ते.. " आदित्यला त्याने मानेकडून पकडलं होतं. या साहेबरावला कळलं बहुदा.. आम्ही आग लावली ते.. अनुने हातातली जळती मशाल बाजूलाच असलेल्या पडद्यावर फेकून दिली. 


" सोडा त्याला.. त्याने काहीच केलं नाही... मी जबाबदार आहे या सर्वाला.. " अनुजा बोलली. 

" तुम्हा दोघांना आता याच आगीत ढकलून देणार मी ...आणि तुमच्या सोबत बाकीचे सुद्धा जळू दे जिवंत... " असं साहेबराव बोलतो न बोलतो, तोच वरच्या मजल्याचा काही भाग त्या दोघांच्या अंगावर पडला. " आदित्य !! " अनूजा जोराने ओरडली. आणि धावत त्या दोघांजवळ पोहोचली. दोघेही वाचलेले.. तरी साहेबराव बेशुद्ध... आणि आदित्य जखमेने कण्हत होता. " चल आदित्य.. चल... निघूया बाहेर... " अनुने आदित्यला त्याचा पायावर उभं केलं. 


        बाकी सर्व आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. आग भयंकर पसरली होती. आग विझवणं शक्य नव्हतं. अनुजा ,आदित्य दरवाजासमोर आले. आगीने विराट रूप धारण केलं होतं. वरचा मजला काही वेळाने कोसळणार , खाली हॉलसुद्धा पेटत होता.. एक विचित्र होतं यात.. बाहेर जाण्याचा कोणीच प्रयन्त करत नव्हतं. साधा बंद दरवाजा उघडण्याची तसदी कोणी घेतली नव्हती. आदित्यने जोर लावून दरवाजा उघडला. बाहेर तुफान वारा , पाऊस... दरवाजा उघडता क्षणी, त्या वाऱ्याने आग आणखी भडकली. आता जास्त वेळ राहणार नाही हॉटेल, हे दोघांना कळून चुकलं. भर पावसात दोघेही त्या लोखंडी गेट कडे धावू लागले. आतमध्ये होते तेव्हा ती सापाची नक्षी अस्पष्ठ होती. जसे आगीपासून दूर आले, तर ती पहिल्यासारखी होऊ लागली. मुख्य लोखंडी गेट जवळ जसे येऊ लागले... तसा दोघांचा श्वास कोंडू लागला.. एवढी मेहनत करून देखील हे असं कसं.. दोघेही आश्यर्यचकित झाले. एका जागी थांबले श्वास ठीक होईपर्यत... पुढे जाणे शक्यच नव्हते. काय करावे आता... विचार करत असताना.. मागून मोठयाने आवाज आला.. " मी जिवंत असेपर्यंत कोणी बाहेर जाऊ शकत नाही.. " 


         साहेबराव !! हॉटेलच्या दरवाजापाशी उभा होता.. डोक्यातून रक्त वाहत होतं त्याच्या.. मागे हॉटेल जळत होतं... भयानक द्रुश्य... खरंच का .. आपली सुटका होणार नाही या पासून... अनुच्या मनात आलं. आदित्यकडे पाहिलं तिने. आदित्यने एकदा अनुकडे आणि नंतर साहेबराव कडे नजर टाकली. " भेटू पुन्हा...कधीतरी " आदित्य हसला आणि साहेबरावच्या दिशेने धावत सुटला. " आदित्य !! थांब !! " अनुजा ओरडली. पण त्याआधीच तो पुढे निघून गेला होता. हॉटेलमध्ये तेव्हाच एक लहानसा स्फोट झाला.. अनुच्या लक्षात आलं. आग त्या दारुगोळ्यापर्यत पोहोचली. साहेबरावने मागे वळून पाहिले. आणि आदित्यने पूर्ण ताकदीनिशी , मागे बघत असलेल्या साहेबराव सहित आत उडी घेतली.. अगदी ५ ते १० सेकंद झाली असतील. अनुजा हॉटेलच्या दिशेने पळत होती. 


       आणि प्रचंड मोठा धमाका झाला... एवढा मोठ्ठा कि त्या धक्कयाने अनूजा मागे उडाली. त्यामागोमाग अनेक छोटे छोटे धमाके होतं राहिले. अनुजा उठून बसली. डोक्याला जखम झालेली... हॉटेल पूर्णपणे कोसळलं होतं. यात कोणीच वाचणार नाही, हे अनूला कळून चुकलं. आपल्यासाठी आदित्यने जीव दिला. काय केलं आपण... अनूजा पावसात रडू लागली. मनगटावर लक्ष गेलं. मनगटावरचा साप..... निघून गेला. वारासुद्धा हळूहळू होतं कायमचा थांबला. जो इतका दिवस न थांबलेला पाऊस .. तोही कमी कमी होतं थांबला. काळवंडलेले आभाळ स्वच्छ झालं. काही जादू व्हावी असंच सगळं होतं होते. 


        उरलेलं हॉटेल आता मोठया-मोठयाने जळत होते. अनुजा उभी राहून पाहत होती. रडणं अजून सुरूच होतं. हळूच तिला पायाखाली जमीन हलल्याचा भास झाला... भासचं होता का... नाही... पडलेलं हॉटेल आता जमिनीखाली जातं होतं. त्यासोबत त्याच्या आजूबाजूची जमीन सुद्धा खाली जात होती. बागेत असलेले दगडी खांब.. झाडे... सगळी कोसळत होती. अनुला कळेना .. पुन्हा काय होते आहे हे... पायाखालची जमीनच पृथ्वीच्या पोटात जात होती. अनुजा ते बघून मागे पळू लागली. जेवढा जोर शिक्कल होता शरीरात , तेवढा जोर लावून अनु त्या लोखंडी गेटच्या दिशेने पळत होती. तो गेट तर कधीच जमीनदोस्त झाला होता. अनुचा श्वास कोंडला नाही यावेळेस.. एका क्षणात अनुजा , त्या बगीच्या सोबत खाली जाणार , त्याचवेळी अनूने एक मोठी उडी मारली... त्या सर्वा पासून दूर अशी.. आणि तशीच पडून राहिली जमिनीवर.. 


         त्या लोखंडी गेटपर्यंतचीच जमीन खाली गेली होती. अनूजा तशीच पडून बघत होती.. हातापायाला लागलं होतं.. पुन्हा एकदा पावसाची रिमझिम सुरू झाली. अनूला काही आठवू लागलं. तिचं घर... तिची मैत्रीण.. सई.. सागर... सगळं हळूहळू आठवत होतं तिला. घरी जायला पाहिजे आता. अंगात त्राण नव्हते. डोक्यावर झालेल्या जखमेतून खूप रक्त गेलं होते. त्राण नव्हते अंगात, तरी कशी बशी उभी राहिली. घरी जाण्याची ओढ लागली होती तिला. एक -दोन पावलं चालली असेल. शुद्ध हरपली आणि जमिनीवर कोसळली. 


         सुगंधी सुवासाने तिला जाग आली. वरून फुलांचा पाऊस होतं होता. वेगळंच काहीतरी होतं ना ते.. छानच वाटत होते तिथे.... आणखी एक सुवास अनुकडे झेपावला. डोळे बंद करून त्याचा आस्वाद घेऊ लागली. पुन्हा डोळे उघडले तर एका बंदिस्त खोलीत होती ती. कोणीतरी तिला जखडून ठेवलं होते.. समोरच्या भिंतीतून मोठ्या आकाराच्या मुंग्या तिच्या दिशेने येतं होत्या.. हे स्वप्नच असावे.. म्हणत पुन्हा तिने डोळे मिटले. डोळे उघडले तर पाऊस पडत होता. आदित्य साहेबरावच्या दिशेने धावत होता.. साहेबरावचे डोळे रागाने लाल झाले होते... अरे !! हे पुन्हा कस घडते आहे.. आपण तर यातून बाहेर आलो..तरी आदित्यला थांबवण्यासाठी अनूजा जोरात ओरडली... " आदित्य !! " 


आणि अनुजा बेडवर उठून बसली. आजूबाजूचे सर्व तिच्याभोवती गोळा झाले. काहीवेळ अनूला कळलंच नाही काय सुरु आहे ते.. जशी भानावर आली , तेव्हा कळलं ... आपण हॉस्पिटल मध्ये आहोत.. आजूबाजूला डॉक्टर, नर्स... उभ्या होत्या. ओळखीचं कोणीच नाही.. १-२ मिनिटात कोणीतरी बाहेरून तिच्याजवळ धावत आली. हीच ती मुलगी.. मला एकदा स्वप्नात दिसली होती ती.... सई !! सईच होती ती. अनूला हळूहळू आठवतं होतं. गर्दीत सागर सुद्धा होता. " अनू !! " सईने अनुजाला घट्ट मिठी मारली. आणि रडू लागली... तसे आणखी काही चेहऱ्याचे डोळे पाणावले. 

" अनू .. बोल काहीतरी.. बोल ना.. " एक बाईसुद्धा रडत होत्या.. 

" अनू !! ... बोल काही.. आई आहे तुझी मी... ओळखत नाही का मला.. हे तुझे बाबा.. आहे ना लक्षात आम्ही.. " अनूला काही आठवत नव्हतं. 

" एक मिनिट.. " डॉक्टर बोलले. " ती आताच शुध्दीवर आली आहे ना ती.. तिला लगेच काही आठवणार नाही.. थोडावेळ आराम करू दे.. कोणीतरी एकाने थांबा... तिच्याजवळ.. " ,

" मी थांबते.. " सई लगेच बोलली. तसे सगळे पांगले. 


" अनु .... किती miss केलं तुला... आता किती बरं वाटते आहे मला.. explain करू शकत नाही माझा आनंद.. " सई अजूनही रडत होती. अनूला जाणवलं काही. डोक्याला जखम झाली होती काल... अनूजा डोकं चाचपडू लागली. " हो.. तुझ्या कपाळावर जखम झालेली. पण आता बरी झाली आहे " सईने उत्तर दिलं. 

" लगेच कशी बरी होईल... काल तर झालेली होती जखम.. " अनूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह.. त्यावर सई , अनूकडे बघतच राहिली. डॉक्टर काही औषध घेऊन आले. गुंगीचे औषध होते त्यात.. अनू पुन्हा झोपी गेली. 


पुढचा दिवस, अनु सकाळीच उठून बसलेली. काही चेहरे पुन्हा तिला आठवू लागले होते. जवळचे चेहरे... आई-बाबा.. सई - सागर.. तिच्या बाकीच्या मैत्रीणी.. आणि हो.. आदित्य सुद्धा.. तो खरंच जिवंत असेल का.. थोडयावेळाने , तिचे आई-वडील.. मित्र - मैत्रिणी सर्व भेटून गेले. सई मात्र तिच्याजवळच थांबली. 

" काय गं.. तुला काल विचारलं मी काहीतरी... माझ्या डोक्यावर जखम झालेली... ती इतक्या जलद कशी भरली.. तेव्हा चेहरा कसा विचित्र झालेला तुझा " सर्व गेल्यावर अनुने सईला विचारलं. 

" बस आधी बेडवर.. सांगते.. " सई बोलली. 


" तुला वाटते तस काही नाही. " सई बोलली.

" काय वाटते तसं नाही.. जखम एका दिवसात कशी भरेल.. सांग ना.. ", अनुच्या मनात पुन्हा ते हॉटेलचे दिवस येऊन गेले.. 

" एका दिवसात नाही.. एका वर्षात... ", 

" काय बोलते आहेस तू ... ती जखम भरायला एक वर्ष लागलं.. काय वेडी-बिडी झालीस का तू.. " सई शांतपणे तिची चिडचिड ऐकत होती. 

" अनूजा ... तू एक वर्ष कोमात होतीस.. ",

" काय ? " अनुजा उडालीच. " कसं शक्य आहे.. ? " ,

" हो.. तुझं accident झालेलं... तू जॉब वरून घरी जाताना... तुझ्या कपाळावर ज्या जखमेच्या खुणा आहेत ना त्याच.. तुझ्या मेंदूला मार लागला होता. कुणीतरी तुला इथे आणून ऍडमिट केलं. operation झालं पण तू कोमात गेलीस. सांगायच झालं तर.. १ वर्ष १ महिना ... तू कोमात होतीस.. " सांगताना सुद्धा सईच्या डोळ्यात पाणी आलं. शेजारीच अनुचे रिपोर्ट होते. पट्कन घेऊन वाचू लागली.. एक वर्षांपूर्वीची तारीख.. आणि बरंच काही लिहिलं होतं. त्यात " patient कोमामध्ये आहे " हे सुद्धा लिहीलं होतं. धक्काच बसला तिला.. म्हणजे... ते हॉटेल.. न थांबणार पाऊस.. नंदा.. आदित्य.. साहेबराव... ती आग.. काय होतं... झुरर्कन डोळ्यासमोरून गेलं तिच्या. 


          धक्काच होता तो. पुढचे २ दिवस तरी ती कोणाशी काही बोलली नाही. पण ते दिवस... हॉटेलमधले.. ते कसे खोटे.. खूप प्रश्न होते. डॉक्टर एकदा औषध देयाला आला तेव्हा अनुने विचारलं. 

" कोमामध्ये असताना patient त्याच्या दुनियेत असतो असं म्हणतात. नक्की कोणाला माहिती नाही... तरी कोमात जाण्याआधी तो जे अनुभवतो... त्यातच तो झोपते जगत असतो. असं मोठे डॉक्टर बोलतात. " डॉक्टरचे उत्तर.. अनुला काही गोष्टी लक्षात येऊ लागल्या.तिला तिचे वाचनाचे वेड आठवले. सईला विचारलं काही तिने. 

" मी शेवटचं कोणतं पुस्तक , कादंबरी वाचत होती. तुला सांगितलं होतं का काही... " ,

" का... परत वाचायचं आहे का.. ",

" हो.. इथे कंटाळा येतो खूप..." , 

" आणते उद्या.. तुझी ती भाड्याची रूम तशीच आहे अजून.. जशी तू एक वर्षांपूर्वी ठेवून गेली होतीस... उद्या आणते नक्की ते पुस्तक... " 


दुसऱ्या दिवशी, पहाटेच.. सईने ते पुस्तक तिच्यासमोर ठेवलं. 

" आता कसं वाटते तुला... आठवली ना माणसं सगळी." सईच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. परंतु अनु वेगळ्या जगात होती. 

" मी कोमात असताना, नक्की माझी हालचाल होयाची नाही का.. " अनुने प्रश्न केला.

" कशी होणार.. सांग.. तू निस्तेज झोपून होतीस... कधी कधी वाटायचं तू झोपली आहेस.. ती वाईट स्वप्न पाहते आहेस.. मी हॉस्टेल वर जशी जागी करायची ना तुला.. तशी इथे मग " अनू ...अनू ... " असं ओरडत बसायची.. तू जागी होण्यासाठी... तू जागी नाही झालीस कधी.. " समजलं अनुला... त्या हॉटेलवर असताना... आवाज, अस्पष्ठ आरोळ्या ऐकू यायच्या... " अनू !! " अशा... म्हणजे सईचा आवाज ऐकायला यायचा मला... तो हॉटेलच्या बाहेर न थांबणारा पाऊस... शेवटी पावसातच अपघात झाला होता ना माझा... तेच डोक्यात राहिलं.. पण ते आदित्य , साहेबराव... ते काय प्रकरण होते... ते अद्याप कळलं नव्हतं अनूला. सईने आणलेलं पुस्तक बघितलं तिने... पुस्तकाचे नावं.. " सन १८९९ " अनुचे डोळे विस्फारले. मी तर याच कालावधी मध्ये होते... 

" नक्की हेच पुस्तक होतं का... मी शेवटचं वाचलेलं.. " अनुने प्रश्न केला. 

"हो गं... मीच दिलेलं पुस्तक तुला.. आपली आदल्या रात्री चर्चा सुद्धा झाली होती या पुस्तकावर... ",

" तू वाचलंस ना.. काय आहे स्टोरी.. " सई आवरून बसली. 


"१८९९ मधली गोष्ट आहे... एक मुलगी वाट चुकते आणि जंगलात हरवते.. शुद्धीवर येते तेव्हा एका हॉटेलमध्ये असते... हॉटेल छान असते पण मंतरलेले असते.. एक पिंजराच असतो तो जणूकाही.. एकदा आत आलं कि बाहेर पडू शकत नाही. साहेबराव ते हॉटेल चालवत असतात.. ती मुलगी बाहेर जायचा खूप करते.. पण काही होतं नाही.. मग आदित्य नावाचा मुलगा तिला तिथेच भेटतो.. त्याच्या मदतीने हॉटेलला आग लावते ती.. आदित्य साहेबरावला मारतो... आणि ती मुलगी पुन्हा free होते... छान आहे स्टोरी.. " सईने एका दमात सांगितले. 


म्हणजे आदल्या रात्री आपण जे वाचत होतो.. त्याच जगात मी जगत होते.. काल्पनिक सगळं.... साहेबराव.. नंदा.. ते हॉटेल आणि आदित्यही.. काल्पनिक... " तुझा सगळं पुस्तक तेव्हा वाचून झालं होतं... त्या मुलीचं नाव आहे काहीतरी.. त्यावरच आपण कॉल करून बोलत होतो... काय नाव होते तिच..." सई विचार करू लागली. अनुला राहवलं नाही. तिने पुस्तकचे शेवटचे पान उघडले. जे तिने अनुभवलं होते, तसेच त्या पुस्तकात लिहिलं होतं. सगळेच खोटं होतं ते... आणि एका क्षणी, अनुजा पुस्तक वाचायची थांबली. " भेटलं का नाव तुला त्या हिरोईनचे... " अनुने पुस्तक तिच्यासमोर धरलं. त्या पुस्तकातील ... काल्पनिक कथेतील मुख्य स्त्री पात्राचे नावं होते...... " अनुजा !! "  


Rate this content
Log in

Similar marathi story from Thriller