Sarita Sawant Bhosale

Inspirational

3  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

अंत्यसंस्कार कोण करेल

अंत्यसंस्कार कोण करेल

4 mins
550


रमाताई सुरभीचा एकुलता एक आधार होत्या. नवऱ्याचा तर तिच्या पत्ता नाही... आईचंही तिच्या वय झालंय. रमाताई खंबीर पाठीशी उभ्या होत्या तिच्या पण नियतीने तिच्यावर घालाच घातला म्हणावं लागेल..काय होईल पुढे आता तिचं. हे खरं आहे पण रमाताईंचा मुलगा इथे नाही... कुठे असतो.. आहे की गेला कोणाला काही माहीतही नाही मग आता रमाताईंचे अंत्यसंस्कार करणार कोण? पुढे सगळेच विधी कोण करणार? रमाताईंचं अवघ्या पंचावन्नाव्या वर्षी निधन झालं. मागचं एक दीड वर्ष अर्धांगवायूच्या आजाराने त्या अंथरुणालाच खिळून होत्या. रमेशचं (त्यांच्या मुलाचं) चार वर्षाआधी सुरभीसोबत त्यांनी लग्न लावून दिलं. रमेश फार शिकला नव्हता. त्यात मित्रांची संगतही वाईट.. जुगार, दारू असे सगळे नाद त्याला लागलेले. रमेश लहान असतानाच त्याच्या वडिलांचं निधन झालेलं... रमाताईंनी जेवणाचे डबे पुरवून रमेशचा सांभाळ केला होता. आता मुलगा मोठा झाल्यावर त्याचा थोडाफार हात लागेल ही रमाताईंची आशा फोल ठरली होती. रिक्षा चालवून मिळालेले पैसेही तो दारू, जुगार यात खर्च करत होता. असा मुलगा लग्न केल्यावर तरी सुधारेल म्हणून सुरभीसारखी समंजस, शांत मुलगी त्यांनी सून म्हणून करून आणली.   


लग्न झाल्यावरही रमेश काही सुधारला नाही पण सुरभीसोबतही त्याचं वागणं चांगलं नव्हतं. रोज पिऊन येऊन शिव्या देणे, मारणे चालूच होतं. सुरभीच्या घरची परिस्थितीही बेताचीच त्यात एकट्या आईचाच आधार तिला होता. इकडेही सासू लेकीप्रमाणे जीव लावायच्या. तिच्यासाठी रमेशसोबत भांडायच्या. आईचा जीव लावणाऱ्या सासूला सोडून सुरभीची जायची इच्छा होत नव्हती. दोनेक वर्षे सुरभीचा संसार असाच रडतकुढत चालू होता. एक दिवस मी दुसरं लग्न करतोय. तुम्हाला कसं राहायचं तसं राहा असं सांगून रमेश निघून गेला ते आता दोन वर्षे झाली तरी परत आलाच नाही. त्या धक्याने रमाताईंची तब्येत खालावली आणि अर्धांगवायूशी लढाई सुरू झाली. त्यानंतर सुरभीने एकटीने रमाताईंच्या खाणावळीचा व्यवसाय पुढे चालू ठेवला होता. रमेशने त्याची जबाबदारी झटकली पण सुरभीने मात्र रमाताईंना खूप सांभाळलं. अंथरुणाला खिळून होत्या तेव्हाही त्यांची खूप काळजी घेतली. रमाताईंनीही सून न मानता मुलगी मानून तिचे लाड, कौतुक केले.. तिला हवं नको ते बघितलं. सुरभीचा सुखी संसार त्यांना पाहायचा होता पण त्याआधीच त्यांची प्राणज्योत मालवली.


रमेशला नातेवाईकांकडे, मित्रांकडे खूप ठिकाणी शोधून झालं होतं पण त्याचा पत्ता कोणालाच माहीत नव्हता. रमाताईंच्या जाण्याच्या धक्क्याने सुरभीही पुरती कोसळून गेली होती. नातं रक्ताचं नव्हतं पण आईची मायाच तिला रमाताईंच्या रुपात मिळाली होती. थोडेफार जवळचे नातेवाईक आले की रमाताईंना घेऊन जायची लगबग सुरू झाली. मुलगा नाही पण मग अंत्यसंस्कार कोण करणार हा प्रश्न सगळ्यांच्या नजरेत आणि तोंडातही. सुरभीच्या कानावर तो पडताच तिने सरळ सांगून टाकलं "मी करणार अंत्यसंस्कार. त्यांनी जन्म दिला नसेल मला एवढाच काय तो फरक पण माझ्या आईच होत्या त्या". ती भावनेच्या भरात बोलते अस समजून सगळेजण तिलाच समजवायला लागले की तू एक सून आहेस आणि स्त्री आहेस. आपल्या समाजात स्त्रीने हे विधी केलेले चालत नाहीत. कोणीतरी नात्यातला पुरुषच हे करेल. पण सुरभीला हे मान्य नव्हतं. "पुरुषच का हवा या विधीसाठी? शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत होते. त्यांचा स्वतःचा मुलगाही त्यांचा जराही विचार न करता त्यांना वाऱ्यावर सोडून गेला... त्यानंतर मीच सांभाळलं त्यांना.. जीव लावला. एका मुलानेही केली नसती एवढी सेवा मी केली. त्यांनीही माझा कधी तिरस्कार केला नाही. दिलं ते फक्त प्रेमच. मुलाप्रमाणे जर मी ही तेव्हाच सोडून गेले असते तर तुम्ही लोकांनीच कशी निर्दयी बाई आहे.. सासूला एकटीला टाकून गेली.. स्वार्थी वगैरे अशी बरीच दूषणे लावली असती. आणि मुलानेच विधी करावे हे नियम कोणी काढले? मुलींना तो हक्क का नसतो? स्त्रीला तो हक्क का दिला जात नाही? तिने तुमचा सांभाळ करावा.. तुमची काळजी घ्यावी.. तुमच्या इच्छा पूर्ण कराव्यात... अशी अपेक्षा असते तर आपलं माणूस गेल्यानंतर त्याचे अंत्यसंस्कार करण्यासाठी तिला विरोध का? स्त्री म्हणजे चूल न मूल आणि पितृसत्ताक व्यवस्था याच गोष्टी जबाबदार आहेत या प्रथेला. ज्या मुलाला जन्मदात्या आईची काळजी नव्हती... ज्याला आई या शब्दाची महती कळली नाही अशा कुचकामी मुलाकडून अंत्यसंस्कार करवून घेणं त्या आईलाही मान्य नसतं झालं. पण हा समाज रात्रंदिवस सेवा करणाऱ्या लेकीसमान सुनेला तो अधिकार देण्याऐवजी त्या मुलाला शोधणार किंवा आजवर अंथरुणावर असताना कोणी बघायलाही आलं नाही अशा एखाद्या नातेवाईकाला तो हक्क देणार. मला हे चालणार नाही... त्यांची सून म्हणून आणि लेक म्हणूनही हा हक्क माझा आहे आणि मीच हे विधी करणार."      


आजपर्यंत चालत आलेल्या या प्रथेला सुरभीने केलेला विरोध पाहून सगळ्या नातेवाईकांनी काढता पाय घेतला. तिच्या बाजूने कोणीही उभं राहिलं नाही. सुरभीनेही आपलं मत बदललं नाही. शेवटच्या क्षणाला आलेले दिखाव्याचे नातेवाईक तिला आधार न देता तिलाच मानसिक त्रास देत होते. जड अंतःकरणाने सुरभीने रमाताईंवर अंत्यसंस्कार केले. त्यानंतर होणारे सगळे विधीही तिनेच स्वतःने पार पाडले. सावित्रीबाईंनी जी धडाडी त्यांच्या काळात दाखवली होती तीच धडाडी सुरभीने आजच्या काळात दाखवून या प्रथेला छेद देणारी कामगिरी केली. इतका काळ लोटूनही आजही अंत्यसंस्कार फक्त पुरुषांनीच करायचे ही प्रथा रूढ आहे. सुरभीसारख्या काहीजणींनी ही प्रथा मोडून समाजासमोर नवीन आदर्श उभा केला आहे हे कौतुकास्पद आहे पण आज एकविसाव्या शतकातही या हक्कासाठी स्त्रीला लढावं लागतं हे दुर्दैव.


मुलगा नसतानाच काय मुलगा असतानाही मुलगी मोठी असेल तर तिला हा हक्क देण्याइतपत समाजात प्रगल्भता यायला हवी. कित्येक ठिकाणी मुलगा नसेल तर जावयाने अंत्यसंस्कार केलेले बघायला मिळतात पण तोच हक्क त्या मुलीला दिला तर? किंवा जर लेक नसेल आणि रमेशसारखा मुलगा असून नसल्यासारखा असेल किंवा काही कारणाने मुलाचं निधन झालं असेल तर हा हक्क देतो का समाज सुनेला किंवा विधवा सुनेला? पुन्हा विधवा स्त्री आणि तिचे हक्क हा वेगळा विषय इथे उपस्थित होतोच. स्त्रीने कितीही शिक्षण घेतलं, कितीही प्रगती केली तरी या हक्कांपासून नको त्या रूढी, प्रथांमुळे वंचित ठेवलं जातं हे चित्र बदलायला हवं.      


Rate this content
Log in