अनोळखी
अनोळखी
या जगात आपण जन्माला येतो ,तेव्हा हे जग आपल्याला अनोळखी असते.
तीन-चार महिन्याचं बाळ झाल्यानंतर ,आईला ओळखू लागतं ,आणि मग हळूहळू इतरांना ओळखू लागत.
जेव्हा प्रत्येकाला आपण पहिल्यांदा भेटतो तेव्हा ती व्यक्ती आपल्यासाठी अनोळखी असते.
मग हळूहळू प्रेमाचे, नात्याचे, विश्वासाचे, मैत्रीचे बंध तयार होतात .
पण कधी कधी असं असतं अचानक एखादा अनोळखी मुसाफिर ऐनवेळी आपल्याला मदत करतो. आणि आपण असे म्हणतो की, याच्या रूपात जणू देवच आला. कारण नंतर ती व्यक्ती आपल्याला भेटत नाही दिसत नाही, तर अशी एका अनोळखीला मीच केलेली मदत आज तुम्हाला कथा रूपात सांगत आहे.
दापोली दाभोळ मुक्कामाची शेवटची गाडी माणसाने भरलेली, कंडक्टर तिकडे फाडत फाडत अख्या बस भर फिरला. तेव्हा एक काळा सावळा साधारण 20 /22 वर्षाचा तरुण दाभोळ मध्ये कुठे राहण्याची सोय होईल का? असे कंडक्टरला विचारत होता .
कंडक्टरने काही त्याला उत्तरच दिले नाही.
तो बिचारा हिरमुसला झाला, आणि शांत बसला. त्याच्यानंतर सारे प्रवासी शांत झाले. गाडीतले लाईट गेले , आणि प्रवास सुरू झाला.
साधारण 30 किलोमीटरचा हा प्रवास एक तासापेक्षा जास्तच वेळ घेतो.
कारण शेवटी तो कोकणचा रस्ता, सदैव नागमोडी वळणे असणारा .
दापोली दाभोळ रस्त्यावरती म्हणे 92 वाकण आहेत. वाकण हा तिथला शब्द म्हणजे आपल्या भाषेत वळण.
त्यामुळे सुरुवातीला तर मी जीव मुठीत धरून बसायची.
दाभोळ मोठ निसर्गरम्य गाव! गावाच्या जवळ एसटी आल्यावर ती, सड्यावरूनच खालची निसर्गरम्य खाडी आणि माडा पोफळीने गच्च भरलेला हिरवा गार किनारा!
निळीशार खाडी आणि त्याला हिरवागार किनारा खूप निसर्गरम्य असे ते वाटते.
तेव्हा काही दाभोळ एवढे डेव्हलप नव्हते, फेरीबोट वगैरे प्रकार नव्हता.
आणि राहण्या खाण्याची देखील सोय नव्हती.
शेवटी गाडी दाभोळ मुक्कामी पोहोचली, अंधार पडलेला, धक्क्यावरती बोटी दिसत होत्या.
त्यांचे ढण् ढण् पेटलेले रॉकेलचे दिवे दिसत होते.
गाडीतले एक एक उतारू हळूहळू खाली व्हायला लागले, आणि तो बिचारा इथे कुठे राहण्याची सोय होईल का? हे विचारत राहिला, आणि कोणीच त्याला काही उत्तर देत नव्हते.
मला वाटलं कोकणची माणसं खूप प्रेमळ आहेत. काहीतरी सोय करतील. कोणीच काही म्हटलं नाही. तेव्हा मी 22 23 वर्षाची आणि अन मॅरीड मुलगी होते.
"शेवटी माझ्याच्याने राहावे ना, आणि मी त्याला म्हटले बाबा रे !माझ्या घरी तुला मी आजची रात्र आश्रय देऊ शकते ,जर माझ्यावर विश्वास असेल तर माझ्यासोबत चल "आणि तो बिचारा तयार झाला .
तो दाभोळ मध्ये शिक्षक या पोस्टसाठी एका शाळेमध्ये इंटरव्यू द्यायला आला होता.
त्याचे नाव पृथ्वीराज झेंडे, मग त्याला मी रात्री माझ्यासोबत घरी घेऊन आले.
येता येता दाभोळच्या धक्क्यावरून "अंडी आणि ब्रेड "घेऊन आले. त्याला ब्रेड आमलेट खाऊ घातले. कारण मी पण गावावरून येत होते.
माझ्याकडे संध्याकाळचा काही स्वयंपाक वगैरे नव्हता, आणि करण्याची ताकद देखील नव्हती. दोघांनी खाल्ले आणि त्याला झोपायला बाहेरच्या खोलीमध्ये चटई, उशी ,आणि जो काय माझ्याकडे होता तो बिछाना घालून दिला.
मी किचनमध्ये झोपले. आणि रात्रभर अक्षरशा आम्ही एकमेकाकडे न बघता पाठ करून झोपलो. सकाळी तो उठला आपला आवरून इंटरव्यू ला गेला, तो काही सिलेक्ट झाला नाही .
पण नंतर त्याने मला एवढे छान पत्र लिहिले होते की, आशा तुझ्या एवढी डेरिंगबाज आणि अशा बिंदास स्वभावाची मुलगी मी आयुष्यात बघितली नाही .
मी तुला अनोळखी असताना देखील तू मला एक रात्रीचा आश्रय दिलास, मी एक पुरुष असून देखील तू माझ्यावर विश्वास ठेवलास.
अशा अद्भुत स्वभावाची मुलगी कदाचित ,जगात पुन्हा मला भेटणार नाही. कुठे असशील तिथे खुश रहा ,आनंदी रहा ,
आणि अशा रीतीने मी एका अनोळखी माणसाला मदत केली.
