अमानुष प्रथेविरोधी लढा मातेचा
अमानुष प्रथेविरोधी लढा मातेचा


कुसुम एका ग्रामीण भागातील,गरीब घरातील मुलगी. बाप आणि आई दुसऱ्याच्या शेतावर कामावर. घरात या तिघी मुली. कुसुम दोन नंबरची आणि तिघींमध्ये एकदम हुशार. बोलायला तर फटाकडीच. शाळेत पहिला नंबर सोडला नाही कधी तिने. कुसुम ग्रामीण भागात त्यातल्या त्यात अशा समाजात वाढत होती ज्यात अंधश्रद्धा, भूत खेत,बाईने फक्त चूल मुलं बघावं, शिक्षण जास्त घेऊ नये अशा विचारांचाच पगडा जास्त होता. तिला या विचारांची प्रचंड चीड होती. शाळेत जात असल्यामुळे हे सगळं थोतांड आहे, आपण शिकलो तरच प्रगती करू, पुढे आपलं कुटुंब प्रगती करू शकेल हे विचार तिच्या डोक्यात भिनलेले. बऱ्यापैकी तिच्या समाजात असे विचार असलेल्यांशी ती वाद घालायची. आई वडिलांनाही समजवायचा प्रयत्न करायची पण आई मात्र तिलाच म्हणायची "तुला कोणी झपाटलं का काय? चार बुक शिकतीस म्हणून काय पण बोलशील आणि आम्ही ऐकून घ्यावं.. तसलं काय सांगत जाऊ नको आणि तू पण जास्त डोक्यात घेत जाऊ नकोस." बापाचा मात्र कुसुमवर खूप जीव होता...पोरगी शिकते तर तिला शिकू द्यायचं असं त्याचं मत होतं. पण नियतीला कदाचित ते मान्य नव्हतं...कुसुम दहावीत असतानाच तिचा पाठीराखा असलेला बाप तिला सोडून गेला. कोणत्यातरी दुर्धर आजाराने त्याचं निधन झालं. कुसुम पूर्ण कोसळली.. पुरती एकटी पडली. तिच्या विचारांमागे ठाम उभं राहणारं छत्रच हरवलेलं. तरीही नेटाने अभ्यास करून तिने दहावीत ७९% गुण मिळवले. आईची इच्छा नसताना तिने अकरावीला प्रवेश घेतला. मोठ्या बहिणीचं लग्न झालं आता कुसुमच्या लग्नाची बोलणी सुरू झाली. आर्थिक परिस्थिती बेताची त्यात वडिलांचं छत्र नाही. मामाने कशीतरी तिची बारावी पूर्ण केली आणि एक दहावी शिकलेल्या,कुठल्याश्या दुकानात कामावर असलेल्या मुलासोबत कुसुमचं लग्न ठरवलं. मुलाच्या घरची परिस्थिती तशी बरी होती. कुसुम आईला त्रास नको म्हणून मनाविरुद्ध लग्नाला तयार झाली. लग्न होऊन सासरी आली तशी इथेही त्याच बुरसटलेल्या अंधश्रद्धा आणि मागासलेल्या विचारांत अडकलेली माणसं तिला भेटली. तिची पुढे शिकायची इच्छा होती पण नवऱ्याचं सासूसमोर काही चालत नव्हतं आणि सासू चूल आणि मूल याच विचारांची. खूप तगादा लावून शेवटी तिने शिवणक्लास लावला आणि उत्तम ब्लाउज,ड्रेस शिवू लागली. स्वतः स्वावलंबी झाली याचा तिला खूप अभिमान वाटायचा. मोठी जाऊ,सासू जरा फुगूनच असायच्या तिच्याशी पण सगळीकडे दुर्लक्ष करून स्वतःचं काम करणं तिला चांगलं जमायचं. एकदा जावेच्या मुलाला खूप ताप आला. काही केल्या कमी होत नव्हता. सासू कोणती वाईट बाधा,नजर असं काही झालंय का हे बघायच्या मागे लागली. इकडे उतारा दे,तिकडे नारळ दे,कोंबडा दे असे प्रकार सुरू झाले पण ताप कमी व्हायचं नाव घेईना. कुसुमने पोटतिडकीने सांगितलं डॉक्टरकडे घेऊन जाऊ त्याला पण तिचं ऐकलं नाही...ताप कमीच होत नव्हता म्हणून शेवटी डॉक्टरचाच रस्ता पकडला आणि दोन दिवसात ताप गेला. तरीही कुसुमचे विचार कोणालाही पटायचे नाहीत. दोन वर्षांनी कुसुमला कन्यारत्न झाले. कुसुम आणि तिचा नवरा एकदम खुश. मुलगी म्हणून सासू जरा नाराजच पण चेहऱ्यावर कधी दाखवलं नाही. ओवी कुसुमची मुलगी कुसुमच्या संस्काराखाली वाढत होती. एक दिवस ओवीचे केस विंचरताना तिच्या आजीला केसात जट दिसली. जट दिसताच कुसुमच्या सासूने सगळ्यांना बोलवून ती दाखवली. जट आली म्हणजे देवीचा काहीतरी संकेत आहे..आता कायतरी घडेल...लवकर याचं कायतरी केलं पाहिजे असं बडबडायला लागली. तशी कुसुम चिडलीच आणि समजवण्याचा प्रयत्न केला की ही फक्त एक अंधश्रद्धा असते...हे असलं काही नसतं. पण तिची सासू तिलाच मूर्ख समजून कोणत्यातरी भोंदूबाबाकडे इलाज विचारायला जाते. जट आली म्हणजे तुमच्या घरावर संकट येईल...अशा मुलीला घरात न ठेवता तिला देवाला सोडून द्या असे त्या बाबाने सांगितले. त्या भागात कोणालाही जट आली की देवाला सोडण्याची प्रथा होतीच. ओवीला देवाला सोडायचं असं सांगितल्यावर कुसुम चवताळलीच. आधीच या प्रथा म्हणजे अंधश्रद्धा आहेत हे तिला माहीत होतं...त्यात आता स्वतःच्या मुलीला या प्रथेचा बळी होऊ द्यायचं नव्हतं तिला. देवीला सोडल्यावर त्या मुलीला देवदासी बनून फिरावं लागत, पोट भरण्यासाठी देवीच्या नावाने घरोघरी जाऊन अन्न मागावं लागतं, इतकं कमी की काय म्हणून देवीला सोडले म्हणजे गावालाच दान केले असा समज असणाऱ्या नराधमांकडून रोज बलात्कारही सहन करावा लागत असे. काही मुलींना तर याच प्रथेतून पुढे वेश्याव्यवसायात विकले जात असे. कुसुमने तिच्या चुलत बहिणीच्या बाबतीत असाच प्रकार होताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिला होता. रोज शरीराचे धिंडवडे निघालेले तिला सहन नाही झालं...या प्रथेला कंटाळून शेवटी तिने जीवन संपवलं. स्वतःच्या बारा वर्षाच्या कोवळ्या ओवीचं आयुष्य या घाणेरड्या प्रथेपायी उद्ध्वस्त होऊ नये म्हणून कुसुमने या परिस्थितीचं वास्तव कुटुंबासमोर मांडलं तरी कोणालाही ते समजून घ्यायच नव्हतं. देवाला सोडल्यावर मुलीचं असंच होतं..तेच तिचं आयुष्य असतं...ते तिला सहन करावंच लागेल अशा भाषेत कुसुमला ऐकवलं जाई. कुसुम मात्र तिच्या मतावर ठाम होती आणि जीव गेला तरी चालेल पण माझ्या मुलीला मी त्या नरकात ढकलणार नाही अशी शपथच तिने सगळ्यांसमोर घेतली. कुसुम अशी ऐकणार नव्हती हे सगळ्यांना माहीत होतं म्हणून तिच्या सासू आणि नवऱ्याने ओवीला गोड बोलून, फसवून एकदा पळवण्याचाही प्रयत्न केलेला पण कुसुमच्या करडया आणि चौफेर नजरेतून ते सुटणं अशक्यच होत. तेव्हा मात्र कुसुमने सगळ्यांनाच ताकीद दिली पुन्हा ओवीला असा त्रास द्यायचा प्रयत्न केला तर पोलिसात तक्रार करेन. कुसुममध्ये तेवढी हिम्मत होती हे सगळ्यांना माहीतच होते म्हणून काही दिवस तरी शांतता पाळली सासूने.
कुसुम शाळेत असताना एकदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अश्याच अंधश्रद्धा प्रथेविरोधी व्याख्यानासाठी आलेली. तेव्हाही या प्रथेचा कडाडून निषेध करण्यात आलेला... त्याचवेळी त्या समितीने त्यांचा फोन नंबरही दिला होता ते कुसुमला आठवलं. पेटीतली धूळ खात पडलेली डायरी शोधून त्यातला नंबर कुसुमने मिळवला आणि गावच्या सरपंचांना जाऊन सगळी परिस्थिती सांगितली. सरपंच सुशिक्षित आणि भला माणूस होता. नशिबाने तोही या अघोरी प्रथेविरोधात होता. कुसुमकडून नंबर मिळवून एक दिवस त्याने त्या समितीला गावात येण्याचा आग्रह केला. दोनच दिवसांनी समिती त्या गावी पोहचली आणि सगळ्या गावासाठीच अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी बऱ्याच अंधश्रद्धा दूर केल्या. केसातीळ जटा या देवीच्या कोपण्यामुळे नाही तर अस्वच्छतेमुळे,वेळेत केस न धुतल्यामुळे,धूळ मातीचे कण जमून तीच जट वाढत वाढत जाते आणि कित्येक मुली नाहक या अमानुष प्रथेचा बळी होतात हे समजावलं. त्याचबरोबर ज्यांच्या जटा त्यांनी स्वतः काढल्या होत्या अशा स्त्रियांना त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी सोबत आणलेलं होत. त्यामुळे या मुली किंवा स्त्रियांना घरात ठेवलं तर संकट येत, घराचा नायनाट होतो हा मोठा गैरसमज दूर झाला. सभेला कुसुम आणि तिचं कुटुंब आवर्जून हजर होतं. सरपंचांनी त्यांच्या घरी जाऊन तशी सक्तीच केलेली. कुसुमने एकदा सासू आणि नवऱ्याकडे पाहिलं. त्यांचे खजील झालेले डोळेच तिला सांगत होते की त्यांना ही एक प्रथा नसून अंधश्रद्धा आहे हे पटलंय आणि ओवीच्या आयुष्यातलं संकट आता टळलंय. त्याचवेळी तिने ओवीच्या डोक्यातील जट समितीकडून काढून घेतली आणि ओवीला या प्रथेपासून मुक्त केलं. तिथून पुढे कोणत्याही कुटुंबात असा प्रकार घडत असेल तर त्या भागातल्या स्त्रिया कुसुमलाच कळवतात आणि कुसुम तिच्या परीने या अंधश्रद्धेचा बिमोड करते. कुसुमने मोठ्या हिमतीने,धीटपणे ही लढाई स्वतःच्या मुलीसाठी लढली आणि जिंकलीसुद्धा. कुसुमला सुचलेलं शहाणपण प्रत्येक आईला सुचलं तर एकही मुलगी जट आली म्हणून या अंधश्रद्धाळू प्रथेचा बळी होणार नाही. कित्येक स्त्रिया आपणही समाजात बघतो जटांचं ओझं तर मानेवर घेऊन फिरतातच ज्याने त्याने शारीरिक त्रास होतो पण त्यापेक्षाही जास्त त्रास त्यांना सामान्य माणूस न समजता घाणेरड्या नजरेने पाहून त्यांच्यावर अत्याचार केला जातो याचा होतो. देवाला सोडलं असं म्हणून मंदिरात तिला सन्मान देण्याऐवजी तिच्याच शरीराचे लचके तोडायचे, तिच्यावर पाशवी अत्याचार करायचे, तिला तिचं अस्तित्वच नाही असं मानून जनावरापेक्षाही क्रूर वागणूक द्यायची हेच सगळं या प्रथेत, धर्मात सांगितलंय का?? आणि कोणी सांगितलं??? देवाने का देवीने??? कुठून आणि कसा जन्म झाला या प्रथेचा माहीत नाही पण एकविसाव्या शतकातही तितक्याच प्रखरतेने ही अंधश्रद्धा चालू आहे...हजारो लाखो मुली या विळख्यात अडकतात आणि त्यांचं अस्तित्वच स्वाहा केलं जातं या माणूसरूपी राक्षसाकडून ही दुर्दैवी गोष्ट आहे. धर्माच्या नावाखाली जे अधर्मी कृत्य चालू आहे ते जेव्हा समूळ नष्ट होईल तेव्हाच मुलीला असं देवीचं रूप न देता मुलगी म्हणून तिच्या अस्तित्वाचा सन्मान होईल.