ऐसा नकोच पुढारी,
ऐसा नकोच पुढारी,
मराठीमध्ये एक म्हण आहे 'भिक नको पण कुत्रा आवर' आज ती म्हण सर्वच राजकीय पक्षातील वाचाळविरांना लागू पडते. जसे की शेतक-यांना तुमच्याकडून काही नको मात्र तुमचे तोंड आवरा तसेच 'लगाम दिखती नही हैं पर , जुबान पर होनी चाहिये !' अशी म्हणण्याची वेळ आली आहे.
भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. परंतू आज याच देशात ' कृषी - प्रधान - देश ' यांची अवस्था ही प्रत्येकजन अनुभवत आहे.
कृषी - शेती करणारा शेतकरी आज हजारोंच्या संख्येनं आत्महत्या करत आहे तर प्रधानमंत्री मात्र देश - विदेशात फिरताहेत, तसेच देशातील तरूण हा 'गाय - मंदिर - मस्जिद' यामध्ये गुंतला आहे. याविषयी तुकाराम महाराज म्हणतात
'माकडाचे गळा मोलाचा तो मणि ! घातला चावुनी टाकी थुंकोनि !!'
बाप भर उन्हात शेतात राबताना पोरांच्या मनात दुःखाची जाणिव निर्माण होत नाही तर एसीत बसणा-या पुढा-यांविषयी बोलताना मोठ्या आदराने बाता मारताना दिसतात. तो राजकारणी त्याला नावानिशी ओळखतही नाही परंतू आमची पोरं त्यांना साहेब , दादा , भाऊ म्हणण्यातच स्वतःला थोर समजतात. हा नेता आमच्या मुलांसमोर कधी आला तर फक्त लांबूनच हात जोडतो , आमची पोरं मात्र नेत्याजवळ जाऊन फोटो कढण्याचा प्रयत्न करतात. समजा एखादा वाकडा तिकडा फोटो काढलाच तर मग हवेतच फिरतात , त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो , तो फोटोचा वापर गावातील इतर गोर - गरीब लोकांची पिळवणूक करण्यासाठी करतो. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात 'काही अतिनम्रता दाखविती ! साहेबांचे जोडेही पुसती !' अशा ना - लायक कार्यकत्यांच्या जिवावर मग राजकारणातील सर्वच पक्षातील राजकीय पुढारी शेतक-यांविषयी अपशब्द काढतात त्यावेळी मात्र हा गावातील कार्यकर्ता शांत बसून करतो तरी काय ? याचा बाप शेतकरी नाही का ? हा प्रश्न निर्माण होतो.
काल परवाचीच गोष्ट संत शिरोमणी श्री सावता माळी शेतकरी आठवडी बाजाराचा शुभारंभ कार्यक्रमात परभणी जिल्हयाचे पालकमंत्री तथा सहकार मंत्री भर सभेत शेतक-यांना म्हणतात , 'शेतमालाला चांगला भाव तरीही शेतक-यांचे रडगाणे' असे बोलतात तर एकीकडे राज्यातील शेतकरी दुष्काळामध्ये होरपळत असताना शासनाकडून शेतक-यांना आधार मिळणे आवश्यक असताना राज्याच्या एका जबाबदार मत्र्यांने शेतक-यांविषयी असे अपशब्द वापरून एक प्रकारे शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात
'मत हे दुधारी तलवार ! उपयोग न केला बरोबर ! तरी आपलाचि उलटतो वार ! आपणावर शेवटी !!' मग बापाचा आपमान सहन करून घेणारे तरूण आता काय 'बापापेक्षा राजकीय प्रतिनिधीना मोठं करायला लागली की काय ?' हा प्रश्न पडतो.
यापुर्वी काही राजकीय नेत्यांनी गरीबांच्या मुलांनी शिक्षणासाठी ऐपत नसेल तर शिकू नका, नोकरी करा तर शेतक-यांना रडतात साले , चोर , ढोंगी , पाण्याविषयी बोलताना लघुशंका , मुलींना उचलून नेऊ म्हणाले काहीनी शिवरायांचा वेष परिधान करून चुकीचे वर्तन केले तर काही नगरसेवक शिवरायांविषयी अपशब्द बोलले तसेच काही भगवानबाबाच्या मुर्तीची विठंबना करत आहेत. याशिवाय कोणाला शेतीचे काहीच माहीत नसताना अंदोलन करणा-या शेतक-यांना जेलमध्ये टाकले पाहीजे व त्यांची जमानतही नाही झाली पाहीजे म्हणतात. अशी वक्तव्य केल्यास कोणताच शेतक-यांचा तरूण मुलगा त्याला भरसभेत जाब का विचारु शकत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात
'ऐसा नकोच पुढारी ! ज्याने नाही केली कर्तबगारी ! तो मित्र नव्हे, वैरी ! समजतो आ
म्ही !!'
आमच्या तरूणांना ही विधाने माहीत होऊ नयेत याचा पक्का बदोंबस्त ही राजकीय दलाल करताना दिसतात. त्यामध्ये शेतक-यांच्या तरूणांना कधी 'गाय - मंदिर - मस्जिद - मुर्ती' तर कधी 'निळा - भगवा , भगवा - पिवळा , तसेच भगवा - निळा - पिवळा' अशा प्रकारचा जातीय वाद करण्यात गुंतवले जाते. एवढे करूनही तरूण जाळ्यात आला नाहीच तर त्यासाठी राजकीय पक्षांनी मोठी उपाययोजना केलेली आहे ती त्यांच्या पक्षाच्या जिल्हा - तालुका - गाव कमिटीच्या एखाद्या पदावर घेऊन पक्षवाढीसाठी मोफत पुर्णवेळ त्याचा वापर करून घेतला जातो. असे राजकीय पक्ष खेळी खेळत आहेत. आपण जे आपल्या जातिपातीचे म्हणून निवडूण दिलेले ना - लायक राजकीय पुढारी शेतकरी , महाषुरुष , महीला यांच्याविषयी प्रक्षोभक वक्तव्य करतात तेव्हा गावातील गावकमिटीचा राजकीय प्रतिनिधी शांत का बसतो हे मात्र समजत नाही.
सातारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतक-यांना आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न होऊन मोर्चा काढावा लागतोय तर कुठे सेलू येथिल एस.आर. काँटन जिनिंग मध्ये शेतक-याला हातात पाण्याचा ग्लास व कापूस धरून शपथ घेऊन सत्यपणा सिध्द करावा लागतोय, ही खुप मोठी शोकांतिका आहे.
सत्तेत असणारे पण शेतक-याविषयी काहीच ठोस उपायोजना न करता डब्बल भुमिका घेतात त्यांना लोक कांदा... कांदा म्हणतात तर ते त्यांना मंदिंर - मस्जिद सांगत होते. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात 'स्वार्थासाठी सेवा - विरोध ! करणारे जे गावाचे मैंद ! ते नानामार्गे करिती बुध्दीभेद ! जनतेचा तयेवेळी !!'
केंद्र सरकार म्हणते की, शेतक-यांना कर्जमाफीची गरज नाही, सरकारकडून दुष्काळी परीस्थितीवर अजून ठोस भुमिका घेतलेली नाही तर राज्यशासनाने दोन नेत्यांचे ५९ लाख रूपये माफ केले यांना शेतक-यांच्या प्रश्नापेक्षा राजकारण म्हत्वाचे असल्याने ते लोकसभेच्या ४८ पैकी ४० जागा जिंकायच्या तयारीला लागा असे बोलतात.
देशाच्या कृषीमंत्रालयात शेतक-यांच्या आत्महत्येची आकडेवारी उपलब्ध नाही; मात्र कत्तली केलेल्या गायींची आकडेवारी माहीत आहे. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात 'व्यक्तीस्वार्थ बोकाळला ! जो तो मनाचा राजा झाला !!' ही गोष्ट आता आमच्या तरूणांनी समजून घेण्याची गरज आहे.
आता आमच्या तरुणांनी 'गर्व से कहों हम हिंदू हैं , या ऐवजी गर्व से कहों हम किसान हैं ' असे म्हणावे लागेल. तसेच सरकारला व त्यांच्या राजकीय पुढा-यांना 'गाय - मंदिर - मस्जिद - मुर्ती' ची मागणी न करता रोजगार मागितला पाहीजे. येणा-या काळात हे राजकारणी दारोदार मताचा जोगवा मागत फिरतील तुकाराम महाराज म्हणतात त्याप्रमाणे
'जाले लोभाचे मांजर ! भीक मागे दारोदार !!'
त्यावेळी बुध्दी गहाण न ठेवता मतदान करून पुढा-यांना आता खांद्यावरून खाली उतरावे लागेल. याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात
'नाती, गोती पक्ष - पंथ ! जातपात, गरीब - श्रीमंत ! देवघेव, भीडमुर्वत ! यासाठी मत देऊचि नये !!' तसेच
तुकोबाराय म्हणतात,
'पाया झाला नारू ! तेथे बांधावा कापरू ! तेथे बिबव्याचे काम ! अधमासि तो अधम !!' शिवाय 'भले तरी देऊ काशेची लंगोटी ! नाठाळाचे माथी मारू काटी !' आपले मत किती लाख मोलाचे आहे त्याचा योग्य वापर करण्याविषयी तुकडोजी महाराज म्हणतात 'दुर्जन होतिल शिरजोर ! आपल्या मताचा मिळता आधार ! भवितव्य गाव अथवा राष्ट्राचे ! आपुल्या मतावरीच साचे ! एकेक मत लाख मोलाचे ! ओळखावे याचे महिमान'.
'बोललो ते काही तुमचिया हिता ! वचन नेणता क्षमा कीजे !!'