अबोल प्रित
अबोल प्रित


सोन कोवळ्या उन्हासारखी निरागस ती. फुलपाखरालाना हातात धरल्यावर जसे त्याचे गोड रंग आपल्या हातांवर आपल्या अस्तित्वाची नाजूक नाकाशी सोडून जातात... इतक हळव फुलपाखरी मन असलेली ती...
कधीचं कुणाला न दुखावणारी. सगळ्यांचीच मन सांभाळणारी. चेहर्यावर कायम हसु असणारी काव्या.
बहुदा तिच्या नाजूक चेहऱ्यावर सकाळी सकाळी रुळणारे केस पाहण्याच्या मोहापाई सूर्यही रेंगाळायचा खिडकीबाहेर तिच्या... 'काव्या' नावाप्रमाणेच विधात्याची एक सुंदर काव्य निर्मिती 'काव्या'....
कवू ए कवू उठ बाळा.... कॉलेजला जायला उशिर होतोय बाळा... डोळे किलकिले करून अंथरुणातून खिडकीबाहेर पाहिलं तर प्राजक्ताच्या सड्यामध्ये परसात खेळणारी खारुताई टकामका तिला पाहाताच होती. ती हसली तशी तीही बहरली... दोन्ही हाताने आळस देत, त्या रेंगाळणार्या सूर्याला आणि खारुला ती गुडमॉर्निंग म्हणाली....क्षणात बंद डोळ्यांसमोर कोणाची तरी गोड आठवण तरारली.... आणि ती मोहरलीच....
काव्या तशी घरात सगळ्यांचीच लाडकी. काळजाचा तुकडाच की बाबांचा. पण घरातल वातावरण कडक शिस्तीच. इंजिनियरींगच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशा सोबतच खुपशा सुचना आणि बंधना सोबत प्रवेश झाला तिचा. मुलांसोबत बोलायच नाही... कॉलेज सुटल्यावर थेट घरी यायच... कोणतेही डेज साजरे करायचे नाही... गॅदरींग मध्ये भाग घ्यायचा नाही... अंगभर कपडे... फॅशन करायला नाही पाठवत आहोत तुला कॉलेज मध्ये... प्रेम बीम या भानगडीतच पडायच नाही... मुलग्यां पासुन चार हात लांब रहायच... नाहीतर परिणाम भयानक होतील... बिच्चारी... घाबरलीच की...
समिरने तिला कॉलेज कॅम्पसमध्ये पहिल्यांदाच पाहिल, आकाशी व पांढर्या बांधणीच्या सलवार वर लाल पिवळ्या ओढणीमध्ये ती. जुईच नाजूक फुलावरी दवबिंदु साठल्यावर कित्ती मोहक दिसते ना... तशीच परी वाटली त्याला ती आणि पाहतच राहिला तो... मित्राने सहज गम्मत म्हणून त्याच बोट गरम चहात बुडवल, चटका बसला तेव्हा भानावर आला तो. पण आज तो चिडला नाहि, उलट हसुन निघुन गेला. स्वत:ला तिच्यात हरवून.
त्या साध्या सालस मुलिच्या प्रेमात पडला होता समिर. मंदिरातिल मुर्तिची जशी नजरेने स्पर्श करुन आराधना करावी तशी त्याची साधना सुरु झाली. तिलाही दिसल होत त्याच्या नजरेतल प्रेम. तिच्या हृदयालाही भावली होती त्याची भेदक, जिवलग नजर. मैत्रिणी सततच चिडवायच्या काय लक्की आहेस ग तू. इतक्या वर्षात त्याने कुणाकडेच साध पाहिल देखिल नाही. अस जिव तोडून प्रेम करणार मिळायला खुप खुप भाग्य लागत.
दोन जिवांच्या अंतरंगाला उमगल होत एक मेकांवरच प्रेम पण बोलणार कसं ???
इतक्या वर्षांत अभ्यास सोडून इतर कशातही न गुंतणारा तो तिच्या पाणिदार गहिर्या डोळ्यांमध्ये हरवला होता. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची लयच बदलली होती. जगण इतकही सुंदर असेल असं वाटलच नव्हत कधी. सध्या तो तिच्या वरच्या आपल्या प्रेमाच्या धुंदीतच जगत होता.
आता काही दिवसातच परीक्षा आणि तो कायमचा दुरावणार तिच्यापासून... अव्यक्त भावना मनात दाबून ती दुःखी झाली होती...
अस कॉलेजच्या वातारणात थोडी मस्तीच होती. रंगांची उधळण प्रत्येक जण होळी खेळत होता.
ती... ती मात्र थांबून होती लांब या गर्दीपासून दूर एका वर्गाच्या कोपऱ्यात आणि अचानक तिच्या समोर तो तिला शोधत...रंगलेला चेहरा पण तीच भेदक प्रेमळ अलवार नजर ती पाहातच राहिली आणि हरवलीच काही क्षण त्या डोळ्यात... त्या क्षणांमध्ये खूप काही बोलू पाहात होते त्या दोघांचेही डोळे एकमेकांसोबत आणि काही कळण्याच्या आत क्षणात तिच्या गालांना रंग लावून तो जोरात पळाला....
त्या ओझरत्या स्पर्शाने ती पुर्ती बहरली... आज कळीचे फुल झाले होते...अव्यक्त अबोल प्रितिला आज स्पर्शाची भाषा लाभली होती....
पण.....
कालपासून आभाळ जरा जास्तच भरून आलं होतं. तस तिच्या मनातलंही आभाळ आजकाळ रोजच दाटून यायचा. बरसत ही असायचा आतल्याआत आणि कधी कधी वाटा मोकळ्या ही व्हायच्या रात्रींच्या अंधारात.
आज सकाळपासून परत परत तीच ती बाबांची सूचना... ऑफिसमधून लवकर ये, तुला बघायला पाहुणे येणार आहेत. अग वय वाढत चाललंय तुझं कळत कसं नाही तुला. कसं होणार या मुलीचं..?
ती अक्षरशा विटली या साऱ्यालाच. बघायला येणारे तुमची मुलगी जरा बुटकीच आहे... जरा शिक्षण जास्तच आहे... रंग जरा जास्तर गोरा आहे तुमच्या मुलीचा, मुला पेक्षा वरच्या पोस्टची मुलगी नकोरे बाबा.. उगाचंच कशाला नाकापेक्षा मोती जड. पाहायला येणारे प्रत्येकच जण तिच्या मनाला टोचत होते.
कुणाचच मन दुखावू नये म्हणून स्वत:च्या मनाला मारुन, अगदी शेवटच्या क्षणी मनातलं ओठांवर येत असतानाही आपल्या भावना अव्यक्तच ठेवल्या होत्या तिने. तो गेलाही होता दुर निघुन... तिच्या मनाचा कोपरा नी कोपरा व्यापून, कुठे माहित नाही...
दिर्घ श्वास घेतला आणि ती निघाली. बाबा मी येते...
कुणीही सोबत नसताना आत्ताही तिच्यासोबत तोच असतो. ज्याने तिच्या सुंदर मनाला स्पर्श केला होता... इतर कोणीही तिच मन दुखावल तरीही अजूनही तिच्या कल्पनेतला तोच तिच्या जखमांवर फुंकर घालत असतो. आजही तिने त्याने केलेला ओझरता स्पर्श आणि लावलेला रंग जसाच्या तसा जपून ठेवलाय हृदयाच्या अगदी खोल खोल तळाशी... ज्याचा ठाव ती कुणालाच लागून देत नाही पण उघडते तीही ते दरवाजे एकांतात आणि जगते परत स्वतःचेच जगणे.
आज ऑफिसच्या खिडकीतून कॉफीचा मग हातात घेऊन बाहेर पाहताना तिला आठवलं.... वेडा कुठला... वेडा तर होता तो कॉलेज कँटीन मधुन कॉफी पिऊन जेव्हा ती बाहेर पडली होती तेव्हा अचानक सहज मागे वळून पाहिलं तर, त्या वेड्याने तिचा कॉफी संपलेल्या मगला ओठांना स्पर्श केला होता आणि काहीतरी बोलत होतात कॅन्टीनमधल्या मुलासोबत. कवू अग लेक्चरला उशीर होतोय असं मैत्रीण म्हणाली आणि ती निघाली होती तेव्हा..
काय माहीत का पण आज मन जरा जास्तच सैरभैर झाल होत....त्याच्या आठवणींचं गाठोडं सोडून त्यातलं एक एक मोरपीस अलगद बाजूला सरत होतं... बाहेर नव्हताच पाऊस पण पापणी मागचा पाऊस मात्र बांध सारून आपली वाट मोकळी करून बरसत होता निरंतर तिच्या डोळ्यातून... खूपच एकट एकट वाटत होत तिला... कुठे आहेस तू समीर...? दिसशील कारे या वेड्या मनाला निदान माझ्या शेवटच्या श्वासावेळी...? नजरेसमोर येशील का रे...? फक्त एकदा आणि एकदाच पहायचयं मला तुला.... नाही सहन होत रे... या वेड्या मनाची व्यथा कशी कळणार तुला.... खुप आठवण येतेय रे तुझी.. आपल्या वेड्या मनाला समजावत... आपले अश्रू पुसत ती निघाली आॅफिस मधुन आज.
आजच नेमका जास्तच उशीर झाला होता.... आत्ता परत त्या प्रश्नार्थक नको असलेल्या नजरा, पण फक्त आई बाबांसाठी ती हसत सामोरी जायची या प्रसंगांना...
वाटेतच पावसानेही आज तिला अचानक गाठल. नखशिखांत चिंब चिंब भिजली होती ती आज आणि त्यात घरी पोहचायची घाई. आई रागवेल बाबा चिडतील म्हणून धावतच निघाली ती गेट मधून...आणि अचानक काही कळण्याच्या आतच ती धडपडली... जोरात कोसळणारच होती खाली तितक्यात कुणीतरी सावरलं होतं तिला स्वतःच्या बाहुपाशात... तो स्पर्श तीच नजर... खुळ्यासारखे हसलीच ती म्हणाली भास भास तरी किती असावेत तुझे... खरंच खुळावलेय मी वेड लागलय मला...
क्षणात तो भास नव्हताच... तो... तो खरच होता... ती क्षण भर बावरली आणि सुखावलीही... त्याने नजरेने तिला खुणावलं आणि ओठांवर बोट ठेवून फक्त एवढाच म्हणाला शू...... चिंब चिंब पावसासोबत त्याच्या अबोल प्रेमाने आज परत एकदा ती चिंब चिंब भिजली होती... सावरल स्वत:ला... त्याच्या बाहुपाशातुन वेगळ होत, तीही आज मनापासुन खट्याळ हसली होती... आज ती खुप खुश होती. आज तिच प्रतिबिंबही तिच्या सोबत लाडीक मस्ती करीत होते. आज ती गुणगुणत होती तिच तेच आवडत गाण त्याच्यासाठी...छोडोना मुझे यु बेकरारसा... करभी दो इजहार तुम अपने प्यारका... तुम्हारे दिल की है यही मंजिल... मेरा दिवाना दिल...
आज इतकी वर्ष झाली त्यांच्या लग्नाला तेच प्रेम, तोच गोडवा. पण अजुनही ते एक मेकांना बोलले नाही.... आणि जेव्हाही ती ते बोलण्याचा प्रयत्न करते तो तिच्या ओठांवर बोट ठेऊन शू....... म्हणत तिचा हात आपल्या हृदयावर ठेवतो....