खिडकी
खिडकी


आज खिडकी बाहेर पाहताना, आत साठलेल्या तुफानाला ती मोकळी वाट करुन देत होती... तिचे अविरत ओघळणारे अश्रू थांबतच नव्हते तेव्हा, जसे आत्ता थांबलेले नव्हते...
याच रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तिच्या बाळाला रुग्णवाहिकेतून नेताना, ती भांडली होती बाप्पाबरोबर... ऐन गौरीगणपतीच्या सणाचा दिवस तो... माहेरी रितीरिवाजाप्रमाणे ओटी भरायला म्हणून गेली आणि परत आली तो रस्ता माणसांनी अन् रक्ताने भरलेला... समोर तिचं बाळ... काळीजच फाटलं तिचं... आपल्या ४ वर्षांच्या बेशुद्धावस्थेत असलेल्या पिल्लाच्या जिवाची भिक मागत होती ती माऊली पदर पसरुन देवाकडे.... माझं बाळ माझ्या पदरात सुखरुप घाल देवा... मी बाळरूपात तुला माझ्या घरी आणेन...
अन्नपाणी सोडलं माऊलीने... त्यालाही दया आली तिची... भावविभोर होवून पाच दिवसाने शुद्धीवर आलेल्या आपल्या बाळाला तिने छातीशी कवटाळलं... आणि त्या दिवसापासून तिने घरी गणपती आणला... नवसाचा गणपती...
आज त्याच बाळाला ती नको होती... तिच्या पॅरलाइझ झालेल्या शरीराची त्याला लाज आणि घृणा वाटत होती.
तोच रस्ता, तिच खिडकी आणि हृदय हेलावणारे तिचे तेच अविरत ओघळणारे अश्रू...
एक दुसऱ्याला जगवण्यासाठीचे... दुसरे स्वत:च्याच मरणासाठीचे...