STORYMIRROR

Suresh Kulkarni

Inspirational

3  

Suresh Kulkarni

Inspirational

अब्दुल

अब्दुल

5 mins
16.2K


परवा टी .व्ही . वर 'तानी' सिनेमा पहिला . त्यातील सायकल रिक्षा पाहून मला माझ्या परळीतील वास्तव्याची आठवण झाली . चाळीस -पन्नास वर्षा पूर्वीचा तो काळ होता . त्याकाळी 'पब्लिक ट्रांस्पोर्ट ' साठी देवांनी दिलेले दोन पाय किंवा सायकल रिक्षा असायची . फटफटी ,जीप हि खूपच श्रीमंती वहन . सामान्यांसाठी विरळच !

या सायकलरिक्षा फक्त दोन आसनी असत. सामान ,लहान पोर याना 'पॅसेंजर'च्या पायाशी जागा असे . रिक्षावाले आपापल्या रिक्षांना खूप सजवायचे . हॅण्डलला रंगीत ग्रीपर , त्या ग्रीपरला झिरमाळ्या , प्रत्यक चाकाला नायोलॉनचे गजरे , टपाल चमचमणाऱ्या टिकल्यांच्या माळा , काही विचारू नका ! अश्या सजवलेल्या रिक्षात बसलेकी आपण कोणी -राजे-महाराजे असल्या सारखे वाटायचे !

अब्दुल असाच एका 'सजी-सवरी ' रिक्षाचा चालक . कळकट चौकटीघराची लुंगी, मळका पांढरा सदरा , वेडी-वाकडी वाढलेली विरळ काळ्या -पांढऱ्या केसांची टोकदार दाढी ,बंडाच्या पायित्र्यातले करडे-वरडे डोईवर केस ,त्यांना पाय बंध घालण्यासाठी कपाळाला लाल/हिरव फडकं ! असलं पाच साडेपाच फुटी काटकुळ ध्यान ! उन्हानं रापलेल्या चेहऱ्यावर गरिबी म्हणावे कि लाचारी असले भाव !

मी नुकताच बँकेत लागलो तेव्हा त्याची 'ओळख' झाली . तसा मी परळीतच लहानाचा मोठा झालो . त्याला बरेचदा रिक्षा ओढताना पहिले होते .

" साब ,एक रिक्षा लेनी है " एक दिवस तो बँकेत येऊन मला म्हणाला .

"अभी एक है ना तेरे पास ?"

" हां ,है पर भाडे से चलता हू "

"फिर ?"

" कर्जा ,देवना ! खुद् कि लुंगा ! भाडा जाकु कुच्छीच नय बचता ." त्याचा आवाज खूप लाचार अन दिन होता .

मी त्याला मॅनेजर समोर उभा केला . आर्थिक द्रुष्ट्या अति गरिबाना साठी DIR नामक योजने खाली आमच्या मॅनेजरने त्याला केवळ चार टक्के व्याजदराने रिक्षा मंजूर केली . दोन दिवसांनी अजून दोन-चार भाऊबंद घेऊन आला !

"अब्दुल ,ये क्या ?"मॅनेजर भडकला .

"इंकू भी रिक्षा देव ना !"

"क्यू , सारी परली मी रिक्षा बाटनी है क्या ?"

"ये भी बहुत गरीब है ! सच्ची ! दुवा देंगे साब ! भुक्को मारलेले है ये लोंगा ! देव ना साब !" अजिजीचा तो कडेलोट होता . आमचा मॅनेजर 'रहेम दिलाचा ' . सब को मंजुरी दे दि !

आठ - दहा दिवस हे पाच सहा जणांचं टोळकं गायब झालं . बहुदा रिक्षा प्रकरण सम्पले असावे . मी हि विसरून गेलो . पण कसले काय ? एका सोमवारी हे टोळकं रिक्षाच्या कोटेशनसह हजर ! कोटेशन पाहून मी हादरलोच . सारी कोटेशन्स हैदराबादची ! परळीत रिक्षाची चार दुकाने होती ! मग हैद्राबाद का ? काही काळे बरे तर नसेल? त्यांच्या हेतू बद्दल मनात शंका आलीच !

"ऐसा नाय चलेगा ! हैद्राबाद का कोटेशन क्यू ? परलीमे दुकान है ना ?"

"साब मेहरबानी करो , बडी मुश्किलसे ये कोटेशन मिले है , येच लेव ना . " तो पुन्हा पुन्हा लाचारीने विनवीत होता .

"मै तो ना करू ! " मी हि हट्टाला पेटलो .

तो साहेबाकडे गेला . त्याने साहेबाला काय सांगितले माहित

नाही पण दहा मिनिटात केबिन बाहेर आला . मला ते कोटेशन दिले . 'pay by DD on Haydrabad " या कोटेशन वरील शेरा मी पहात राहिलो !

सारी कागद पत्रांची पूर्तता , लोन documents , सह्या ,सगळे सोपस्कार करून दोन दिवसांत अब्दुल & कम्पनीला हैदराबादचे DD दिले . त्यानंतर आमचा साहेब आठवड्याभरा साठी रजेवर गेला .

पाच सहा दिवस झाले तरी अब्दुल्या गायबच ! तडक हैद्राबाद शाखेला फोन लावला . सगळे DD पेड झाले होते ! बोंबला ! पंधराशे गुणिले पाच ,साडेसात हजारांची बँकेला चुना लागला ! (तेव्हा साडेसात हजार बरीच रक्कम होती !) गरीब लाचार तोंडाने अबदुल्याने गंडवले ! काय बनेल माणूस ? असेलच काही काही विचार मनात घोंगावत राहिले . त्यात साहेब सुट्टीवर ,काय करावे कळेना . आज मंगळवार बँक सुटल्यावर अब्दुल्याच्या घरी जायचे ठरवले , तेव्हा मनाला कोठे चैन पडली . पण कामाच्या रगाड्यात जमले नाही .

बुधवारी सकाळी साडे दहाच्या दरम्यान मी बँकेत आलो . माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना . सकाळच्या कोवळ्या उन्हात नव्या कोऱ्या पाच रिक्षा ओळीने उभ्या होत्या ! व त्यांची हॅन्डल धरून मलूल चेहऱ्यांची त्यांची मालक हि उभे होते !

"अब्दुल पावत्या आणल्यास का ?" मी विचारले

" हा , साब लाया हू "

मी खुर्चीत बस्ताना त्याच्या हातातून पावत्या घेतल्या . त्या घेताना त्याच्या हाताला हात लागला . चटकाच बसला ! मानवी देह इतका तापू शकतो ? !

"तेरे कु ,तो तेज बुखार है !"

" हा ,थोडा है , हम सबकुच है !"

"मतलब ?"

त्यानंतर त्याने सांगितलेली कथा (कि व्यथा ) अशी होती . हैद्राबादला रिक्षा दोनशे रुपयांनी स्वस्त मिळतात , म्हणून तेथून घेतल्या ! रेल्वे खर्चा साठी हि मंडळी चार दिवस हमाली करत होती ! शिवाय जमेल तसे पै -पै जमवत होती ! हैद्राबादला रिक्षा घेतल्या नंतर ,तेथेच फिटिंग करून घेतली होती . आणि ..... आणि ... त्या तेथून चालवत सुमारे चारशे कि. मी. परळी पर्यंत आणल्या होत्या ! सहा दिवस लागले होते ! शेवटच्या दोन दिवसात पैसे संपले ! उपाशी पोटी उन्हात .... रिक्षा आणल्या ! सहाजिकच देहाने या अत्याचारा विरुद्ध तापाच्या रूपाने निषेध व्यक्त केला !

मला मेल्याहून मेल्या सारखे झाले ! त्यांच्या बद्दल मी इतका का शंकेखोर झालो ? थोडा सुद्धा धीर धरला नाही . गुन्हेगार ठरवून मोकळा झालो होतो ! त्यांच्या प्रामाणिक कष्टाचा एक प्रकारे मी अपमानच केला होता !

आज पर्यंत मी अनेक दाहक प्रसंगांना सामोरे गेलो आहे . पण अब्दुलच्या ओझरत्या स्पर्शाने जो'चटका'दिला त्याची दाहकता अजूनही मनात जिवंत आहे . प्रमोशनने बदली झाली ,परळीचे पाश तुटले , अब्दुल हि दुरावला .कधी कधी असे वाटते कि , असेच उठून परळीस जावे , रेल्वेतून उतरून अब्दुलच्या 'सजी -सवरी ' रिक्षात बसून ' मंदिर चलो ' म्हणावे !पण क्षणात लक्षात येते कि आज अब्दुल नसेल ! त्याची ती रिक्षा हि नसेल ! मग ... मग एकदम रिकामं ,पोकळ वाटायला लागत ! काहीतरी कायमच गमावल्या सारखं उदास वाटत रहात !


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational