आठवणीतील क्षण !माझी सहल !!
आठवणीतील क्षण !माझी सहल !!
माझी शालेय सहल !!
" बालपणीचा काळ सुखाचा ! "
खरंच खूप निरागस असते बालपण . ना स्वार्थ ना कशाची चिंता , बस आपल्याच नादात !
काही काही प्रसंग इतके सुंदर घडून गेलेले असतात आपल्या बालपणात , की ते सुंदर क्षण आयुष्यात शेवटपर्यंत विसरू नाही शकत कोणीच !
माझ्यासोबतपण खूपदा अश्या घटना घडल्या आहेत ज्या कायमस्वरूपी स्मरणात कोरल्या गेल्या आहेत . त्यातली एक खुप सुंदर आणि अविस्मरणीय अशी घटना मला नेहमी आठवते आणि आजही एक वेगळीच ऊर्जा देत रहाते कायम .
मी पाचवी मध्ये गेल्यावर , प्राथमिक शाळेतून विद्यालयात प्रवेश घेतला होता . प्राथमिक मध्ये असताना सहल वगैरे काही माहीत नव्हते .
विद्यालयात आल्यावर , शाळेतर्फे एकदिवसीय , एखाद्या पर्यटन स्थळाचे आयोजन केले जाते , त्याला सहल असे म्हणतात , हे मला इथे नव्याने कळत होते .
पाचवीच्या वर्गाच्या तीन तुकड्या होत्या , तीन्ही वर्गाची मिळून , एका सहलीचे आयोजन करण्यात आले होते .
शाळेची ही सहल ओझर , लेण्याद्री आणि शिवनेरी ह्या ठिकाणी जाणार होती . सहलीसाठी १५०/- रुपये भरायचे होते .
मी कधीच कुठल्या सहलीला गेले नव्हते . मला खूप उत्सुकता होती सहलीबद्दल आणि सहलीला जायची खूप इच्छा होती .
घरची परिस्तिथी तशी बेताचीच होती . वडील जिथे कामाला होते , तिथल्या कामगारांनी नुकताच संप पुकारला होता . वडील १५ दिवसांपासून घरीच होते . आई बालवाडी शिक्षिका होती . त्यामुळे घराला तेवढाच हातभार लागत होता .
वर्गातल्या बऱ्याच मुलींनी पैसे भरले होते .
८३ - ८४ चा काळ . एक रकमी १५०/- रुपये भरणे सामान्य माणसाला नक्कीच परवडणारे नव्हते .
वडिलांना महिना दिड हजार पगार होता तेव्हा . त्यात घरभाडे , लाईट बील , घरचा पाच माणसांचा किराणा , दुधाचे पैसे , शाळेचा इतर खर्च असं सारं काही त्यातच भागवायला लागायचे .
महिन्याचा सगळा खर्च भागवून शिलकीत म्हणून कधीतरीच पैसे पडत असतील .
तेव्हा खरंतर माणसाच्या गरजा पण खुप कमी असायच्या .
" अंथरूण पाहून पाय पसरायचे ." हया म्हणीप्रमाणे सामान्य माणसाची वृत्ती होती .
हे असे जास्तीचे शोक करणे सामान्य माणसाला जरा अवघडच व्हायचे .कधी कधी खूप काटकसर करून काही गोष्टी कराव्या लागत असत . आयत्या वेळी असं काही समोर आलेलं पार पाडणे सामान्यांना नक्कीच जमत नसायचं .
बरं मी काही एकटी अपत्य नव्हते , मला अजून दोन भाऊ पण होते . मला सहलीला पाठवलं की पुढे त्यांना पण पाठवावे लागणार होते . सध्या तर परिस्थिती पण नव्हती की माझे सुध्दा पैसे ते भरू शकत होते .
पण माझी सहलीला जायची इच्छा मला स्वस्थ बसू देत नव्हती . बोलायचे धाडस होत नव्हते .
घरातले वातावरण तसे बऱ्यापैकी मोकळे होते . आई वडिलांचा धाक होता पण इतर वेळी मात्र दोघेही खुप हसून खेळून असायचे .
पैश्याची चणचण होती पण दोघेही ही गोष्ट आमच्या पर्यंत येवू देत नव्हते . त्यामुळे माझे नकळते वय आणि माझी पहिलीवहिली सहलीची इच्छा कोणी डावलणार नाही याची बाळबोध आशा ! यामुळे मला पैसे मिळणार नाही असे वाटत नव्हतं .
एकदा अण्णा आणि आम्ही सगळे असेच छान गप्पा मारत बसलो होतो . अण्णा आईला म्हणत होते , " दोन दिवसात कारखाना चालू होईल बहुतेक . उद्या बोलावले आहे सगळ्यांना . पगार वाढवून दिला तर बरच आहे .नाहीतर मग काही सांगता नाही येणार , काय होईल ते ! "
मला ही संधी जणू चालून आली होती , अण्णा जरा छान मुड मध्ये आहेत हे पाहून त्यांना म्हणलं , " अण्णा मग आपल्याला खुप पैसे मिळणार का ? "
" हो खुप ! " अण्णा गमतीने म्हणाले .
" मग मला आता सहलीला जाता येईल ? "
" सहलीला ? कुठे आणि कोण जाणार आहे ? "
अण्णा आश्चर्य चकित होवून म्हणाले .
" अहो अण्णा ! आमची शाळेची सहल जाणार आहे पुढच्या महिन्यात २० तारखेला . ओझर , लेण्याद्री आणि शिवनेरीला . पुढच्या ५ तारखेपर्यंत १५०/- रुपये भरायचे आहेत ."
" हो का ?? " अण्णा जरा शांत स्वरात म्हणाले .
" अण्णा , आता तुम्हाला खुप पैसे मिळणार ना , मग माझे पैसे भरा ना ! मला जायचंय सहलीला .मी कध्धीच , कुठे गेले नाही . वर्गातल्या खुप मुलींनी पैसे भरलेत .मला पण भरायचे आहेत सगळ्यांसमोर माझे पैसे . "
आमच्याकडे खुप पैसे आहेत आणि मी पण पैसे भरू शकते याचे मला बालसुलभ अप्रूप वाटतं होते .
मी निरागसपणे माझे म्हणणे अण्णांसमोर मांडले .
" बर ! " म्हणून अण्णा शांत झाले .मला वाटलं अण्णा आता चिडले असतील . आता काही खरं नाही माझं ! दोघे भाऊ पण माझ्याकडे रागाने बघायला लागले .
मी खाली मान घालून अभ्यासाचं नाटक करू लागले . सगळेच शांत झाले . नंतर कोणी काही विषयच नाही काढला सहलीचा .मी रोज अण्णांचा , ते काही म्हणताहेत का सहलीचं ? याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करायचे . पण कोणीच काही बोलत नसायचे . माझे मन मग जरा खट्टू व्हायचे .
मी ठरवलं आता काही अण्णांना पैसे मागायचे नाही . जाऊदे सहलीचं . जेव्हा मी पैसे मिळवायला लागेल ना तेव्हा सगळीकडे फिरत बसेन .
आपली परिस्तिथी चांगली नाही , आपण पैसे नाही भरू शकत हे त्यावेळी बालमनावर रुजायला जरा वेळ लागला .
सहलीला जायची आपली इच्छा पूर्ण होणार नाही म्हणून मन नाराज झालं होतं .
दुसऱ्या दिवशी शाळेतून आल्यावर शेजारच्या मीना काकू म्हणाल्या , " जरा सोनू जवळ बसतेस का ? मी पटकन दुकानात जावून येते . "
त्यांची ४ वर्षाची छोटी मुलगी होती सोनू . काकूंना जेव्हा जेव्हा काही कामासाठी बाहेर एकटे जावे लागायचे किंवा तिला घेवुन कुठे जायचे असेल तरी , तिला सांभाळायला त्या मला नेहमी बोलवायच्या .सोनू माझ्याकडे मस्त खेळायची . माझा लळा होता तिला .
मला एक आयडिया सुचली . मी त्यांना म्हणाले , " काकू मी खुप वेळ बसेन तिच्याजवळ पण मला तुम्ही १० रुपये देणार का ? "
काकू स्वभावाने खूप छान होत्या , त्या आम्हाला लहानपणापासून चांगलं ओळखत होत्या , आमच्यावर खुप छान संस्कार आहेत असं त्या नेहमी म्हणायच्या . माझ्या पैसे मागण्याचं त्यांना कारण सांगताच त्या हसून लगेच तयार झाल्या पैसे द्यायला . मग मी जेव्हा जेव्हा सोनूला सांभाळायला जायचे , तेव्हा त्या मला १०/- रुपये द्यायच्या . शाळेतून आल्यावर रोज मी २ - ३ तास त्यांच्याकडे जायचे . सोबत माझा अभ्यास पण व्हायचा . चार पाच दिवसात त्यांनी मला आनंदाने ३०/- रुपये दिले .
माझ्याकडे ३०/- रुपये जमा झाले . मला खुप छान वाटत होते . माझी पहिली कमाई !
माझी सहलीला जायची आशा पुन्हा पालवीत झाली .
सहलीचे पैसे आता माझे मीच जमवणार असे मी मनाशी ठरवले .अजून काय काय करता येईल म्हणजे मला अजून पैसे मिळवता येतील याचा मी विचार करू लागले .
एकदा असेच एका मैत्रिणीकडे गेले होते , तेव्हा तिची आई आजारी होती , त्या झोपूनच होत्या . त्यांच्या घरी स्वयंपाक आणि इतर कामासाठी मी माझ्या मैत्रिणीला मदत केली तर त्यांनी मला खाऊसाठी ५ रुपये दिले . मग मी त्यांच्या घरी , मैत्रिणीच्या मदतीला पुढचे ४-५ दिवस जात होते . माझी मैत्रीण सहलीला जाणार होती , तिने पैसेही भरले होते .
तिच्या आईने मला , " तू का नाही जाणार सहलीला ? " म्हणून विचारले असता , मी त्यांना कारण सांगितले आणि , " आता मी असे काम करून , पैसे जमा झाले की , माझे मीच भरणार आहे . " ही माझी आयडिया सांगितली तर त्यांना माझे खुप कौतुक वाटले . त्यांनी पण मला अजून २० /- रुपये दिले .
खरंच , तेव्हाची माणसे अगदी मोकळ्या मनाची होती .पैशांपेक्षा माणसाच्या भावनेला जपणारी ती पिढी , खऱ्या अर्थाने योग्य संस्कार आणि विश्वास ठेवून , समोरच्याला प्रोत्साहन देणारी होती .
माझ्याकडे आता एकूण ५५ /- रुपये जमा झाले होते .मग मी माझा गल्ला होता तोही फोडला . त्यात जमा झालेले १५/- रुपये पण घेतले .सारे मिळून ७०/- जमले , आता काय करावे ते कळत नव्हते .शाळेत पैसे भरायची मुदत ३ दिवसांनी संपणार होती .तीन दिवसात अजून ८० /- रुपये कसे बरं मिळवायचे ? याचा विचार चालू होता .
त्याचं दिवसात गावावरून माझी आजी आली होती , तिला सांगितले तर तिनेही मला ५/- रुपये दिले . आता एकूण ७५/- रुपये झाले . पण अजून पैसे हवे होते सहलीसाठी .
पैसे जमावण्यासोबतच , जमवलेले पैसे ठेवायचे कुठे ? ह्याचे पण मला तेव्हा खुप टेन्शन होते .
मी हे पैसे दप्तरामध्ये लपवून ठेवत होते . कारण घरात जर कोणाला कळले तर काय सांगणार ना माझ्याकडे एवढे पैसे कुठून आले म्हणून ? मी सहलीच्या पैश्यांसाठी अशी दुसऱ्यांची कामे करतेय हे जर आई अण्णांना कळलं तर त्यांना नक्कीच आवडणार नाही . हे पण मला कळत होते . म्हणून मनात अजूनच भीती होती .
पण माझा भाऊ जणू माझ्यावर लक्ष ठेवून असल्यासारखा , सारखा माझ्या दप्तराला हात लावायचा . मी ओरडले की त्याला अजून जोर यायचा , म्हणायचा , " तुझ्याकडे काय आहे का ? मला सांग , नाहीतर मी आईला सांगेन ! " त्याला काय वाटतं होते काय माहित ? एकदोन वेळा त्यामुळे मारही खाल्ला त्याने माझ्या हातचा .
पण शेवटी व्हायचे तेच झाले !!
त्याच्या खोडीलपणामुळे माझे पैसे सगळ्यांसमोर बाहेर आले . त्याने ओरडुन ओरडुन आई अण्णांना सांगितले .
मग काय होणार ???
पहिला तर यथेच्छ मार मिळाला !
सुसंस्कारी वातावरणात वाढणारी मुले जेव्हा चुकीचे वागतात असे पालकांच्या निदर्शनात आले की तेव्हा असा खाऊचा प्रसाद ठरलेला असायचा .
माझे प्रामाणिक वागणे त्यांना कळे पर्यंत , हे पैसे मी कुठून तरी चोरले असावेत असाच त्यांचा समज होता .
आमचा आवाज ऐकून शेजारच्या काकू घरात आल्या . त्यांनी आईला विचारले , " का मारता ? काय झालं ? "
आईला सांगायला संकोच वाटत होता , कसे सांगणार माझ्या मुलीने पैसे चोरले आहेत म्हणून ??
मोठ्या भावाने हळून सांगितले , " काकू , हिच्या दप्तरात खुप पैसे सापडले , म्हणून अण्णांनी चांगलं चोपल तिला ."
आईने सांगितल्यावर काकूंना लक्षात आले .
गरीब असली तरी अब्रू जपणारी माणसे ......
थोड्या थोड्या धक्क्याने सुध्दा हतबल होतात !
काकूंनी अण्णांना थांबवलं आणि मग सांगितलं की त्यांनी मला पैसे दिले आहेत .
काकूंनी ३०/- रुपये दिले , ते ठीक आहे पण मग बाकीचे पैसे कुठून आले ?
अण्णांचा राग जरा शांत झाला होता . काकू त्यांना म्हणाल्या , " आता नका मारू पोरीला , जरा जवळ घेवुन विचारा शांततेने ! "
" तुमचेच तर संस्कार आहेत तिच्यावर , तुमचा विश्वास नाही का स्वतःच्या संस्कारांवर ? "
" मारून काही होणार आहे का ? पहिलं विचारा तिला , अजाण आहे , निरागस आहे अजून , बालपणीच वर्मी बसलेले घाव पुसत नाही आयुष्यभर ! समजावून सांगा की काय बरोबर काय चूक ! "
" मुलीची जात आहे , लगेच असा हात उचलणे बरे नाही ! "
अण्णांनी मग माझे डोळे पुसले आणि मला तोंड धुवून यायला सांगितले .जवळ घेवुन मग त्यांनी मला विचारले , मी पण न घाबरता सांगितले कुठून एवढे पैसे आले ते ! .
माझी पैसे जमवण्याची धडपड आणि सहलीला जायची तळमळ अण्णांच्या लक्षात आली . आई आणि अण्णा दोघांचे डोळे भरून आले . मला जवळ घेवून त्यांनी काकुंचे हात जोडून आभार मानले .
काकू म्हणाल्या , " आता तुम्हाला मी शिक्षा देणार आहे बरं का ! तुम्ही आता पोरीचे सहलीचे राहिलेले पैसे भरा , नसतील तर मी उसने देते , सवडीने परत करा ."
मग काय !!!
माझे रडणे कुठल्या कुठे पळून गेले . वडिलांनी दोन्ही भावांना पण चांगलाच दम दिला , परत अशी चुगली करायची नाही म्हणून आणि मला पण समज दिली की आपण वेगळं काम करत असलो तरी घरच्यांपासून काही काही लपवून ठेवायचं नाही .तू काही चुकीचे केलं नाही तर मग घाबरायचे कशाला ? जे असेल ते आईला नाहीतर घरात कोणालातरी नक्की सांगायचे .
दुसऱ्या दिवशी शाळेत अण्णा स्वतः आले आणि माझे सहलीचे पैसे भरले .
माझे सहलीला जायचे स्वप्न पूर्ण झाले .
माझी अविस्मणीय अशी पहिली शालेय सहल . एक वेगळीच न कळणारी ऊर्जा मिळाली तेव्हा त्या सहलीतून .
खुप खुप मज्जा केली मी माझ्या
मैत्रिणींसोबत !!
आता असं वाटतं , तेव्हा जर एक एक क्षण लिहून ठेवता आला असता तर खुप मोठी कथा नक्कीच तयार झाली असती .
आज इतक्या वर्षांनी ते सारं जसंच्यातसं नाही जमलं लेखणीने उतरवायला .
तेव्हाचे ते मनातले निरागस भाव आज पोरसवदा वाटताहेत . ते सारं आठवून मलाच हसू येतं आहे .
पण तेव्हा पासून एक मात्र झाले की मला आत्ता सुध्दा कोणत्याही कामाची कधी लाज वाटत नाही की कोणताही कमीपणा वाटत नाही .कारण कष्ट केल्यावर त्यातून मिळणारा पैसा खुप समाधान आणि सुखद आनंद देवून जात असतो .त्याची सर आयते मिळणाऱ्या गोष्टींना कधीच येत नाही .
नंतरच्या आयुष्यात मी अनेकदा फिरले , अजूनही फिरत असते . आज आर्थिक चणचण पण नाही , कुठे जायचे ते ठरवायचे आणि निघायचे . बस एवढंच !
पण तेव्हाच्या त्या पहिल्या सहलीचा आनंद मला पुन्हा कधी एवढ्या उत्कटतेने आजही नाही मिळत . आजही मी काही सहलींना स्वखर्चाने जाते . पण तेव्हा केलेले ते छोटेसे धाडसी कष्ट आणि त्यासोबत मिळालेला अण्णांचा मार मात्र खुप आठवतो .
गेलेले क्षण फिरून पुन्हा कधीच परत येत नाही .उरतात फक्त त्या रम्य आठवणी !
म्हणूनच आजही खऱ्या अर्थाने कोरले गेले आहेत माझ्या मन:पटलावर ते बालपणीचे आठवणींचे क्षण !!
समाप्त .!!
