STORYMIRROR

ऋतुजा वैरागडकर

Inspirational

3  

ऋतुजा वैरागडकर

Inspirational

आसुसलेले मन

आसुसलेले मन

19 mins
233


“अहो, काय झालं? आज ऑफिसमधून लवकर आलात.” त्याच्या हातातली बॅग घेऊन टेबल वर ठेवत तिने विचारलं.

“काही नाही, आज दमल्यासारखं होतयं.” तो नजर चुकवत आत गेला.

पण त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कळायला तिला वेळ लागला नव्हता.

तो आत जाऊन बेडवर बसला.

ती त्याच्या बाजूला जाऊन बसली.

“अहो सोडून द्या ना, का इतकं मनाला लावून घेताय? आता सवय करून घ्या. मला माहित आहे, मी बोलते ते करणं सोपं नाही. मी रडून मोकळी होते पण तुम्ही आतल्या आत कुढत असता. अहो एकदाची त्या अश्रूंना वाट मोकळी करून घ्या. त्यांनाही सळसळ वाहू द्या. का आतल्या आत इतकं दाबून ठेवताय?” तिने त्याच्या हात हातात घेतला. त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागली.

तसा तो तिच्या कुशीत जाऊन ढसाढसा रडला...

बाई रडून तिचं दुःख व्यक्त करते पण माणूस तो कधीच डोळ्यात अश्रू आणत नाही. म्हणून त्याला भावना नसतात असं मुळीच नाही.


खर तर सगळ्यांचा खूप गोड गैरसमज असतो की पुरुषांना मन नसतं, त्यांना दुसऱ्यांच्या भावना कळत नाही, त्याच्या हृदयाला कधीच पाझर फुटत नाही. पण तो पुरुष असला तरी शेवटी तो ही एक माणूसचं आहे.

रमा आणि सारंग, लग्न होऊन दहा वर्षे झालीत. पण रमाच्या पदरात मूल नव्हतं. घरचे तसे सगळे चांगले होते. पण वेळप्रसंगी सगळेच बोलतात. बरेच प्रयत्न करूनही त्यांच्या प्रयत्नाला यश मिळत नव्हतं. देवधर्म, नवस सगळं करून झालं पण रमाच्या पदरात मूल आलं नव्हतं.

याचा जेवढा त्रास रमा व्हायचा ना तेवढाच त्रास सारंगलाही होत असे..पण तो कधी बोलून दाखवत नव्हता.

आज ऑफिसमध्ये खुप विचित्र प्रकार घडला. त्याने सारंग फार तुटून गेला. एरवी हसण्यावारी नेणारा सारंग आज हुमसून हुमसून रडला.

त्याला असं रडताना बघून रमालाही खूप रडायला येत होतं.

“अहो सांगा ना काय झालं? कुणी काही बोललं का?” ती त्याच्या केसांवरून हात फिरवत त्याला विचारत होती.

तो तिच्या मांडीवरून डोकं काढून उठून बसला. डोळे पुसले आणि बोलायला लागला.

“अग आज ऑफिसमध्ये धीरजला सगळे अभिनंदन करत होते.”

“अभिनंदन? का?” रमाने आश्चर्याने विचारलं.

“त्याच्या घरात लक्ष्मी आली म्हणून.” बोलता बोलता सारंगचे डोळे पाणावले.

तिने प्रश्नार्थक चिन्हाने विचारलं,

“त्याचं लग्न कधी झालं?”

“मागच्या वर्षी झालं, आपली दृष्ट लागायला नको म्हणून आपल्याला बोलावलं नव्हतं त्याने.” सारंग हातात मोबाईल घेत सांगितलं.

“काय? असे विचार करतात तुमच्या ऑफिसमधले लोक?”

“तेच तर.”

“किळसवाण आहे जे सगळं, आपण कधीही कुणाबद्दल वाईट विचार केला नाही तरीही.”

“हे बघ फोटो. त्याची पत्नी आणि बाळ.”

रमाने त्या फोटोकडे बघितलं.

“अरे ही तर..” ती बोलता बोलता थांबली.

तिच्या अश्या प्रतिक्रियेवर सारंगने विचारलं.

“तू ओळखतेस तिला?”

“मी तुम्हाला काय सांगू? तेच कळत नाही आहे.”

“अग काय झालं?”

“सोडा ना, जेव्हा माझी बोलण्याची वेळ येईल ना तेव्हा बोलेल मी. तुम्ही आता शांत व्हा. कुणाचाही विचार करू नका. आणि हो मी आहे तुमच्यासोबत.” तिने त्याच्याकडे बघत हलकं स्मितहास्य केलं.

ती किचनमध्ये गेली. गॅस वर भांड ठेवलं.

आणि तिच्याच विचारात गुंतली. सारंग सोफ्यावर लेटला होता. त्याला काहीतरी जळण्याचा वास आला.

‘काहीतरी जळल्याचा वास येतोय. काय जळलं असेल?’ स्वतःशीच पुटपुटत तो उठला.

जळल्याच्या वासेने रमा भानावर आली. तिने लगेच गॅस बंद केला आणि नकळत भांड उचलायला हात समोर केला तसा तिच्या हाताला जोरात चटका बसला.

“आई..” तिच्या तोंडून किंचाळी निघाली.

“काय करतेस रमा? अग जरा जपून कर, तुला काही झालं तर?” तो भावुक झाला.

“अहो मी बरी आहे. जरास झालंय.”

“जरास? जरास आहे हे? किती भाजलय बघ.”

“तुम्ही जर माझी अशीच काळजी करणार असाल तर मग रोज असच होऊ दे.”

“अग माझी आई तू शांत बस आता, मला मलम लावू दे.” सारंगने थोडा आवाज वाढवला.

तशी रमा गप्प झाली. सारंगच्या चेहऱ्यावर मात्र हास्य आलं.

त्याच्या चेहऱ्यावर असा आनंद बघून रमाला खूप बरं वाटलं.

खूप दिवसांनी असा हसरा चेहरा बघायला मिळाला होता.

‘हे देवा, यांना असंच आनंदात ठेव मला दुसरं काही नको यांच्या जीवनातला आनंदच माझ्यासाठी सर्व काही आहे.’ ती मनातल्या मनात देवाला प्रार्थना करू लागली.

दिवस जरी छान जाताना दिसत असले तरी रमा आणि सारंगच्या मनातली घालमेल कोणालाचं कळत नव्हती. बाहेरचे, नातेवाईक येऊन बोलून जायचे, घरचे टोचून बोलायचे.

रमा आणि सारंग दोघे निमूटपणे सगळं ऐकून घ्यायचे. रमा आपल्या मनातलं सगळं सारंगला सांगायची, रडून मोकळी व्हायची. पण सारंग तो आतल्याआत कुढत होता. त्याची घुसमट होत होती.

तो सांगणार तरी कुणाला? रमासमोर बोलण्याचा पर्याय नव्हता कारण तिला त्याला अजून त्रास द्यायचा नव्हता. बाहेर सांगायची सोय नाही, मित्र मज्जा उडवतील, कुणी मला समजून घेणार नाही या भीतीने तो कुणाशीच काही बोलायचा नाही. आतल्या आत कुढत असायचा.

अशातच एकदा त्याची तब्येत खराब झाली. अंगात ताप भरून आलेला. आठ दिवस, पंधरा दिवस झाले ताप काही उतरत नव्हता. औषध केले, दवाखाने केले पण ताप उतरतच नव्हता.

डॉक्टरांनी सांगितले,

“याला कशाचा तरी स्ट्रेस आहे, तो स्ट्रेस कमी व्हायला हवा. आता याचा ताप जरी उतरला तरी त्याला आनंदी ठेवण्याचं काम तुमचं आहे.” डॉक्टरांनी रमाला सांगितलं.

“आता त्यांना कुठलाही स्ट्रेस द्यायचा नाहीये, ताप जर डोक्यात गेला तर कुठल्याही रोगावर फेकू शकतो म्हणून तुम्ही काळजी घ्या.” असं डॉक्टरांनी रमाला बजावून सांगितलं.

त्या पंधरा दिवसात रमाने सारंगची खूप काळजी घेतली. त्याला हवं नको ते सगळं बघितलं.

त्या काळामध्ये दोघांचही बॉण्डिंग अजून पक्क झालं. त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. रमाला सारंगच्या डोळ्यातली तळमळ दिसत होती. त्याच्या मनाची घालमेल समजत होती. पण ती ही काही करू शकत नव्हती याचं तिला दुःख होतं. तिने त्याला आनंदी ठेवायचं इतकच मनाशी ठरवलं होतं. आणि त्याच प्रयत्नात ती लागलेली होती.

सारंगला हॉस्पिटल मधून घरी आणण्यात आलं. रमाने आज त्याच्या आवडीचं जेवण बनवलं होतं. त्याने तिला भरवलं. त्यानंतर सारंग झोपला. काही वेळाने त्याच्या कानात आवाज गुंजायला लागला.

“बाबा.. बाबा.. मी तुझी परी, मला घ्यायला येणार नाहीयेस बाबा. मला घेऊन जा ना तुझ्याकडे. बाबा मी वाट बघते आहे. मलाही या जगात यायचं आहे, हे सुंदर जग बघायचे आहे.” त्या आवाजाने सारंग दचकून उठला.

रमा धावत येऊन त्याच्या बाजूला बसली.

“अहो काय झालं? वाईट स्वप्न बघितलेत का? बोला ना काय झालं? थांबा मी पाणी देते.”

तिने त्याला पाणी दिलं, त्याच्या पाठीवरून हात थोपडला.

“बोला ना काय झालं? वाईट स्वप्न होतं का?”

“वाईट नाही ग छान स्वप्न होतं. माझी परी मला आवाज देत होती. बाबा बाबा या ना मला घेऊन जा ना तुमच्याकडे बाबा, मला या जगात यायचं आहे मला जग बघायचं. असं म्हणत होती.” सारंग बोलता बोलता रडायलाच लागला.

“अहो तुम्ही शांत व्हा, डॉक्टरांनी काय सांगितले जास्त स्ट्रेस घेऊ नका. आता तुमची तब्येत महत्त्वाची आहे, याविषयी आपण नंतर बोलूया.” रमाने सारंगला पुन्हा बेडवर लेटवलं आणि त्याच्या माथ्यावरून हात फिरवू लागली. थोडया वेळाने त्याला झोप लागली.

काही दिवस असेच गेले, सारंग ने ऑफिस जॉईन केलं.

रमा एक दिवस त्यांच्या फॅमिली फ्रेंड डॉक्टरांकडे गेली. त्यांना त्या दोघांबद्दल हे सगळं सांगितलं. त्यांना रिपोर्टही दाखवले.

डॉक्टर बोलल्या की,

“आपण प्रयत्न करून बघूया, तू देवावर विश्वास ठेव तो नक्कीच काहीतरी छान करेल.” डॉक्टरच्या बोलण्यावरून रमाला आशेचा किरण दिसत होता.

सारंग सकाळी उठून फ्रेश झाला, ऑफिसला जायला निघाला.

रमाने त्याच्यासाठी डबा बनवला, त्याच्या हातात देत म्हणाली.

“अहो, तुम्ही जरा शांत रहा ह, ऑफिसमध्ये जास्त कोणाशी काही बोलू नका. आणि कुणी काही बोललं तर तुम्ही मनाला लावून घेऊ नका आणि ऑफिस संपल्यानंतर इकडे तिकडे न बसता लवकर घरी परत या.”

“अग किती सूचना देशील.” तो तिच्या हातातला डबा घेत बोलला.

दोघांनी स्मितहास्य केलं.

सारंग ऑफिसला गेला, तो त्याच्या जागी जाऊन बसला. हळूहळू एक एक करून ऑफिसचे सगळे लोक येत होते. सारंगच्या ऑफिसमध्ये काम करणारा त्याचा बेस्ट फ्रेंड मनीष त्याच्या जवळ येऊन उभा राहिला.

“काय सारंग बरा आहेस ना आता? तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी?”

सारंगने होकारार्थी मान हलवली.

“हो मी बरा आहे.” असं म्हणून त्याने खाली मान घालून त्याच्या कामाला सुरुवात केली.

“काय झालं सारंग असा चुपचाप का आहेस? शांत शांत का बसलायस?”

“नाही रे काही नाही.”

“ओके मी काय म्हणतो, उद्या सकाळी माझ्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे तर तुम्ही दोघेही नक्की या. एकटाच येऊ नकोस वहिनीला पण घेऊन ये.” मनीष ने त्याला बजावून सांगितलं.

त्यावर सारंगने फक्त मान डोलावली.

काही वेळाने ऑफिसचे बाकीचे लोक जमा झाले. मनीषने सगळ्यांना हातवारे करून आवाज दिला. त्यांनाही सांगितलं,

“उद्या सकाळी तुम्ही सगळे माझ्याकडे सत्यनारायणाच्या पूजेला नक्की या आणि सोबत तुमच्या परिवाराला देखील घेऊन या.”

“अरे वा मनीष अचानक कशी काय पूजा ठेवलीस रे.” त्यातल्या एका व्यक्तीने विचारलं.

“काही नाही रे माझ्या मुलाचा उद्या वाढदिवस आहे ना त्यानिमित्ताने म्हटलं सत्यनारायणाची पूजा करून घेऊ. सगळं कसं छान छान होईल.”

त्यांचं सगळ्यांचं बोलणं सुरू असताना त्यातील एक व्यक्ती हळूच बोलला.

“काय रे सारंगला बोलवलस का?”

“हो..”

“का अरे अश्या शुभ कार्याला त्याला कशाला बोलवतो? उगाच काही अशुभ घडायला नको.”

सगळ्यांची एकमेकांमध्ये कुजबुज सुरू झाली.

“तुम्ही सगळे असे का बोलताय? असं काही नसतं शुभ अशुभ वगैरे. असं काही होत नाही आणि तसही सारंग माझा चांगला मित्र आहे. सो मी त्याला जर बोलावलं नाही तर त्याला वाईट वाटेल.”

त्यांच्या सगळ्यांचं बोलणं सारंगच्या कानावर पडत होतं. एकेक शब्द त्याच्या हृदयाला लागत होता पण तरीही तो शांत होता.

मनीषला वाईट वाटू नये म्हणून तो दुसऱ्या दिवशी रमाला घेऊन मनीषच्या घरी गेला. त्यांच्याकडे पोहोचल्यानंतर तिथे सत्यनारायणाची कथा सुरू होती.

सारंग आणि रमा आत मध्ये जाऊन बसणार तोच एक बाई तिथे आली.

“अरे तुम्ही दोघे इथे काय करताय तुम्ही या ना इकडे बसा, या इकडे एका बाजूला.” असं म्हणून त्या बाईने त्यांना दूर बसवलं. सारंग आणि रमाला खूप वाईट वाटलं तरीही इथे कार्यक्रम भंग व्हायला नको म्हणून ते दोघे शांत होते. काही वेळाने त्यांना कळलं की ती बाई दुसरी तिसरी कुणी नसून मनीषची आई आहे.

मनिषची आई असं वागू शकते,त्यांनी विचारही केलेला नव्हता.

सत्यनारायण पूजा झाली, एकेक जण समोर पूजा करायला जात होते. रमा आणि सारंग दोघेही उठले, रमाने आरतीच्या ताटामधील मधले फुल आणि अक्षद घेतले, सारंगच्याही हातात दिले. रमा हळद-कुंकूवाचा करुंडा हातात घेणार तोच मनीषची आई बोलली.

“ये बाई काय करतेस तू?”

“काकू नमस्कार करते.”

“नाही नाही तू नमस्कार वगैरे करू नकोस, तू मागे जाऊन बस. बाकीच्यांना आधी पूजा करू दे. बसा तुम्ही दोघे ,बसा मागे.” काकूंच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून सारंगच्या रागाची तिडीक त्याच्या डोक्यात गेली. त्याने हाताच्या मुठ्या घट्ट केल्या तो काही बोलणार तेवढ्यात रमाने त्याचा हात पकडला आणि इशाऱ्याने नाही म्हणून सांगितलं.

दोघेही मागे जाऊन बसले, त्यानंतर काही वेळाने सारंग मनीषजवळ गेला आणि

“मनीष पूजा झाली आता आम्ही निघतो, आम्हाला थोडं बाहेर काम आहे.”

“अरे असं कसं निघताय? जेवण करून जा ना, बस झालच आहे आता जेवणाची तयारी सुरूच आहे.”

“नको, जेवण वगैरे नको. पूजा झाली ना त्याला महत्त्व. जेवण वगैरे नको.” बोलता बोलता सारंगचे डोळे पाणावले.

“काय रे काय झालं चेहरा का असा पडलाय तुझा?”

सारंग डोळ्यातले अश्रू पुसत,

“नाही, काही नाही मी जेवायला थांबत नाही, येईन कधीतरी. यू एन्जॉय.” असं मनात दोघेही तिथून निघाले.

“अहो संध्याकाळच्या वाढदिवसाला बोलवले आहे, काय करायचं?”

“रमा माझी अजिबात इच्छा नाहीये तुला जायचं असेल तर तु जा.”

“अहो मी एकटीच गेले तर बरं दिसेल का? तुमचा खास मित्र आहे ना तो.”

“हो माझा खास मित्र जरी असला तरी त्याची आई आपल्याशी कशी वागली बघितलीस ना तू.”

“बघितलं, पण जाऊ द्या ना.”

“त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन कसा होता बघितलस ना तू? त्यांची एक एक नजर माझ्या हृदयाला चिरत होती. मी येणार नाहीये रमा, तुला जावसं वाटत असेल तर तू जा. आणि तू नेहमी गोष्टी सोडून द्या म्हणतेस कितीदा गोष्टी सोडून द्यायच्या. समोरचा व्यक्ती आपल्या मनाचा विचारच करत नाही. आपल्याला काय वाटेल याचा कुणी विचारच करत नाही. मी जाणार नाही.” सारंगची आता चिडचिड व्ह्यायला लागली होती.

“ठीक आहे तुम्ही जर जात नसाल तर मीही जाणार नाही.”

दोघांनी ठरवलं जायचं नाही. संध्याकाळी पुन्हा मनीषचा फोन आला.

“अरे सारंग निघाला नाहीस का अजून?”

“मनीष अरे मला जरा बरं वाटत नाहीयेस सो आम्ही नाही येत आहोत.”

“खोटं बोलतोयस ना.”

“नाही मनीष, अरे खोटं कशाला बोलू?”

“मला माहितीये खोटं बोलतोयस तू, मला सगळं कळलंय आई तुझ्याशी कशी वागली ते. मी बोलेन तिच्याशी पण तू आता मनावर घेऊ नकोस. ये रे मित्रा आईचं बोलणं जाऊ दे.”

मनीष ने खूप आग्रह केला म्हणून दोघेही वाढदिवसाला गेले. वाढदिवस हॉल मध्ये होता. पूर्ण हॉटेल बलूनने सजवलं होतं. चारही बाजूने रोषणाई होती. स्टेज बलूनने आणि मूलाच्या फोटोने सजवला होता. सगळं अगदी भव्य दिव्य होतं. मुलाला ग्रे रंगाचा ब्लेजर घातलेला होता.

सगळी तयारी छान झाली होती. सगळे पाहुणे जमा झाले, काही वेळाने केक कापला. सगळे छान एन्जॉय करत होते. सारंग ही त्याच्या मित्रांसोबत जाऊन बसला. रमा एकटीच बसली होती. काही वेळाने काही लेडीज रमाच्या बाजूच्या चेअरवर येऊन बसल्या. त्या रमाला ओळखत नव्हत्या आणि रमाही त्यांना ओळखत नव्हती. त्यांचं असंच इकडे तिकडे बघून चर्चा सुरू होत्या. कुणाबद्दल काही तर कुणाबद्दल काही असं बोलणं सुरू होतं.

“अरे तुम्हाला माहित आहे का? मनीषचा एक मित्र आहे, त्याच्या लग्नाला बरेच वर्ष झाले पण मुल नाही. सगळे बोलतात की त्याच्यातच दोष आहे.” त्यातली एक बाई बोलली.

“अग हो पण त्यात त्या बिचारीचा काय दोष, त्याच्यामुळे तिला किती सहन करावं लागत असेल.” दुसरी बाई बोलली.

“मी तर म्हणते अश्या नपुंसक माणसाने लग्नच करू नये.”

“नपुंसक” शब्द ऐकताच रमाने पाणावलेले डोळे बंद केले.

नकळत तो शब्द सारंगच्याही कानात गुंजला होता.

रमा लगेच तिथून उठली, जायला निघाली. दोन पाऊल समोर जात नाही तर तिचं लक्ष सारंगकडे गेलं. त्याच्या डोळ्यात दाटलेले अश्रू तिला दिसले, ती काहीही न बोलता निघून गेली.रमा एकटीच घरी आली. आल्या आल्या तिने पर्स फेकली आणि सोफ्यावर बसून रडायला लागली. बराच वेळ हुंदके देऊन ती थकली, उठून पाणी प्यायली आणि पुन्हा तशीच येऊन बसली.

बराच वेळ झाला तरी सारंग अजून घरी आलेला नव्हता. तिने घड्याळाकडे बघितलं,‘अजून आले कसे नाहीत, बराच वेळ झाला. मी यांना सोबत घेऊन यायला हवं होतं. मी एकटीच निघून आले, चूक माझीच आहे यांना फोन करू का? नाही नाही त्यांचा मूड नसेल तर, उगाच माझ्यावर चिडतील.’ ती मनातल्या मनात बोलू लागली.

मध्यरात्र झाली तरी सारंग घरी आलेला नव्हता. आता मात्र रमाला राहवेना, काय करू तिला कळत नव्हतं.तिने त्याला फोन केला. बऱ्याचदा रिंग वाजूनही सारंगने फोन उचलला नव्हता, तिची काळजी वाढली.

तिने पायात चप्पल घातली आणि सपासपा चालायला लागली. तिने थेट मनीषचं घर गाठलं. गेटपर्यंत गेली तर सगळीकडे शांतता पसरली होती, काळोख दाटलेला होता. तिला कळलं की इथे कोणीच नाही आहे ती तशीच जड पावलांनी परत निघाली. चालता चालता अचानक तिचं लक्ष रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बाकाकडे गेलं तिथे सारंग बसलेला होता. ती त्याच्याजवळ गेली. त्याच्या खांद्यावर हात ठेवला तसा सारंग तिला बिलगला आणि हुमसून रडायला लागला.

रमाला काय बोलावं कळेना. तिने त्याला शांत केलं आणि त्याच्या बाजूला बसली.

“अहो जाऊ द्या ना, हे आजचचं आहे का? आपल्याला सवय आहे ना या सगळ्यांची, सोडून द्यायचं. किती दिवस मनाला लावून घेणार आहात. चला घरी, चला.” असं म्हणून त्याने तिला उठवलं.

तो उठला तेव्हा तिच्या लक्षात आलं की सारंग दारू प्यायला आहे. ( दारूचं व्यसन आरोग्यास हानिकारक आहे. इथे कुठलाही संबंध जोडू नये.)“अहो हे काय तुम्ही दारू प्यायलात?”“हो प्यायलो मी..”“अहो पण का? काय गरज होती?”

“गरज होती ना, टेन्शनमध्ये होतो मी म्हणून दारू प्यायलो.”“टेन्शनमध्ये? टेन्शनमध्ये तर मी पण होते.”“हो का मग मी दु:खात होतो म्हणून प्यायलो.”

“अहो दु:खात तर मी पण होते म्हणून मग मी पण प्यायले का?” तुम्ही का प्यायलात?”

“उगाच बडबड करू नकोस ग, चल घरी.”

रमा सारंगला घरी घेऊन गेली, त्याला लिंबू पाणी बनवून दिल. त्यानंतर तो झोपला. 

दुसऱ्या दिवशी सकाळी सारंग झोपून उठला. रमा त्याच्यासाठी गरम गरम कॉफी घेऊन गेली.“अहो कॉफी.”त्याने हलक स्मितहास्य केलं.

“डोक दुखतंय का तुमचं अजून की बरे आहात आता.”

“नाही ग, मी बरा आहे.”

“अहो मी काय म्हणते मला थोडं बोलायचं होतं तुमच्याशी.”

“हो बोल ना, आपण माझ्या माहेरच्या फॅमिली डॉक्टर आहेत ना त्यांना भेटायचं का? म्हणजे मी बोलले होते त्यांना तर बोलल्या काहीतरी पॉझिटिव्ह होईल तर आपण.” ती बोलता बोलता थांबली.

“ठीक आहे बघू, जेव्हा जाऊ आपण तिकडे तुझ्या माहेरी, तेव्हा विचार करू.”सारंग पेपर वाचत बसला.

“मूल होत नाही म्हणून सासू-सासर्‍यांनी सुनेला जाळून टाकलं”त्याने मोठी हेडलाईन वाचली आणि त्याचं मन सुन्न झालं.‘अशी कशी लोकं असतात या जगात? मुल नाही म्हणून चक्क जाळून टाकलं. त्या बाईच्या मनाचा विचार केला नाही, आपल्या मुलाचा तरी विचार केला नाही की आपल्या मुलाला काय वाटेल.’ तो विचार करत होता.

‘या जागी जर तिचा मुलगा असता तर? तिने हेच केलं असतं?’ अचानक त्याला प्रश्न पडला. तो विचारात पडला अचानक त्याला विचित्र विचित्र प्रश्न पडायला लागले.

“माझ्यामुळे रमाचं आयुष्य उध्वस्त झालं, आज माझ्या जागी जर रमा असती तर मी काय केलं असतं? घरच्यांनी माझे दुसरे लग्न लावलं असतं? आज मी जर चांगला असतो तर रमाचं जीवन काहीतरी वेगळं राहिलं असतं. रमाने दुसरे लग्न केलं तर? तीच आयुष्य सुखकर होईल. तिला कोणी वांजोटी बोलणार नाही. माझ्यामुळे तिला दुःख भोगावे लागत आहे ते कमी होईल. खरंच असं जर केलं तर?” तो स्वतःशीच एकटाच बोलायला लागला.

त्याचा आवाज रमाच्या कानावर पडला, ती किचन मधून

“अहो काही हवंय का? बोलताय का तुम्ही कोणाशी? कुणी आलय का? अहो..” ती किचन मधूनच बोलत होती. पण सारंग त्याच्याच विचारात होता.

शेवटी ती किचन मधून बाहेर आली आणि जवळ येऊन विचारलं तरी तू त्याच्याच विचारात होता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला हलवलं. तेव्हा तो भानावर आला.

“अहो काय झाल? काय विचारते मी कुणाशी बोलताय तुम्ही? कुणी आलं होतं का?”

“ना.. नाही.” तो अडखळत बोलला.

मग काय झालं? कुठल्या विचारात गुंतलात? ऑफिसला जायचं नाही का तुम्हाला?”

“मी तयार होतो आणि निघतोय.” सारंग तयार झाला आणि ऑफिसला गेला. ऑफिसला गेल्यानंतर त्याच्या मनात तेच विचार घोळत होते. दिवसभराचं काम निपटवून सारंग घरी आला.

येताच त्याने रमाला आवाज दिला.“रमा.. हॉलमध्ये ये मला तुझ्याशी बोलायचंय.”

रमा हॉलमध्ये आली,“काय हो आज लवकर आलात तुम्ही.”

“काम लवकर झालं म्हणून लवकर निघालो. तू बस ना मला जरा तुझ्याशी बोलायचं.”

“थांबा ना मी पाणी घेऊन येते तुम्हाला आणि पटकन चहा ठेवते.”

“नको नको चहा वगैरे नंतर घेऊ, आधी तू बस.” असं म्हणून सारंगने रमाचा हात धरला आणि तिला सोफ्यावर बसवलं. तोही तिच्या बाजूला बसला. ती खूप आश्चर्याने बघत होती.‘आज काय झालं यांना, मला बाजूला का बसवत आहेत?’ असा मनोमन तिने विचारही केला.

“अहो काय झाले?”त्याने रमाचा हात हातात घेतला. “मला ना तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचंय.”“माझ्याशी? काय बोला ना.”“रमा तू दुसरे लग्न कर.”“काय? काय बोललात तुम्ही?”

सारंगने खाली मान घातली आणि पुन्हा बोलला.

“रमा तू दुसरं लग्न कर.”

“अहो तुम्ही काय बोलताय? भानावर आहात ना? कुणाचं दुसरं लग्न? कोण करतंय?”

“तू करतीयेस.”

“स्वप्न बघताय की काय? तुम्ही बरे आहात ना?”

“रमा मी खरंच बोलतोय, तू दुसरं लग्न कर. तू दुसरं लग्न केलंस ना की वर्षभरात तुझ्या पदरात मूल असेल.”

“म्हणजे माझ्या पदरात मूल असावं म्हणून मी दुसऱ्या कुणाशी लग्न करू? तुम्ही माझ्याबद्दल असा विचार करताय? तुम्ही मला एवढंच ओळखलंत का? माझ्याबद्दल असा कसा विचार करू शकता? मुलापेक्षा मला माझा नवरा महत्त्वाचा आहे. मला सांगा तुमच्या जागी जर मी असते तर तुम्ही दुसर लग्न केलं असतं? दुसरी बायको आणली असती.”

“माहित नाही ग, तू उलट मला प्रश्न विचारू नकोस. मी तुला जे सांगतोय ना ते तू कर.”

“नाही ते शक्य नाहीये. नाही ते खरच शक्य नाहीये. मी कधी असा विचार केलेला नाहीये आणि करणारही नाही. तुम्ही माझं सर्वस्व आहात, मी स्वतःला अर्पण केले तुमच्यासमोर, मी असं कधीच करणार नाही.” असं म्हणत ती तिच्या खोलीत निघून गेली आणि सारंग तसा स्तब्ध उभा राहिला.


रमा तिच्या खोलीत निघून गेली, सारंग उठून फ्रेश झाला.

“अग जेवायला तरी देणार आहेस का? की मी तसाच उपाशी झोपू, अग पण झोपही लागणार नाही. पोटातले कावळे ओरडतायेत.”

ती थोडी हसावी म्हणून त्याचं बोलणं सुरू होतं.

रमा खोलीतून बाहेर आली, किचनमध्ये गेली. सारंग तिच्या मागे गेला,

“रमा तू अशी रुसू नकोस ग, मी यानंतर तो विषय नाही काढणार ग.” त्याने मागेहून तिच्या खांद्यावर हात ठेवला.

ती वळली, त्याचा हातात हात घेतला.

“हे बघा काहीही झालं तरी मी असं काही करणार नाही. अहो आपल्या जीवनात काही कमी दुःख आलं का पण आपण दोघांनी मिळून दिवस काढलेत ना? इतके वर्ष निघाली मग आता समोरची वर्षही निघतील. असा का विचार करताय? आणि मी तुमच्यासोबत खूप आनंदात आहे. आपण दोघे एकमेकांसाठी आहोत मग आपल्याला आता काय गरज आहे कोणाची. मला दुःख होतोय मला त्रास होतोय हा विचार करू नका. जेवढा त्रास मला होतो त्यापेक्षा जास्त त्रास तुम्हाला होतो. तुम्ही त्याच त्रासातून चाललात ना? मग तरी असा विचार का करताय.? आता मला प्रॉमिस करा यानंतर तुम्ही असं काहीही बोलणार नाही.”

“हो ग सॉरी, पण नाही बोलणार यानंतर.”

दोन-तीन दिवसानंतर सकाळी सकाळी सारंग कडे त्याचा गावचा एक मित्र आला. बऱ्याच वर्षानंतर त्यांची भेट झालेली होती. आल्यानंतर गप्पांना सुरुवात झाली, लहानपणीच्या आठवणी, मित्रांच्या आठवणी, असं करता करता गप्पा वाढत गेल्या. मग लग्न, मुलंबाळ याची चौकशी झाली.

बोलता-बोलता त्याने सांगितले,

“माझ्याही लग्नाला बरेच वर्षे झाले होते आणि मूल होत नव्हतं म्हणून मी एक मुलगी दत्तक घेतली. आता ती पाच वर्षाची आहे. ती महिन्याभराची होती तेव्हा मी तिला दत्तक घेतलं होतं. खूप छान आहे. आता आम्हाला कुठल्याही गोष्टीची काहीच कमी वाटत नाही. मला बाबा म्हणून हाक मारते ना तेव्हा आनंद गगनात मावेनासा होतो.” तो बोलत होता सारंग मात्र शांत झाला.

“काय झालं सारंग्या असा शांत का झालास?”

“तुझी आधी जी परिस्थिती होती ना तीच परिस्थिती माझी आहे रे आता, पण माझ्या मनात हा विचार आलाच नाही. किती पुण्याचा काम केलेस तू, एक आईला तिची मुलगी मिळाली आणि मुलीला आई मिळाली. खरंच खूप छान केलेस तू.”

“सारंग्या मग तू पण हा विचार का करत नाहीस? का इकडे तिकडे पैसा घालवायचा आणि उपचार करत बसायचं. त्यापेक्षा तोच पैसा एखाद्या अनाथ मुलांच्या शिक्षणाला लावला ना तर पुण्यचं मिळेल तुला. तुझ्या मनातली पोकळी भरेल रे, तुझे आसुसलेलं मन आहे ना त्याला शांती मिळून तुझे सगळ्या इच्छा पूर्ण होतील बघ. विचार करून बघ तुला नक्कीच आनंद मिळेल मला विश्वास आहे.”

थोडावेळ त्यांचं बोलणं झालं, त्यानंतर सारंगचा मित्र तिथून निघून गेला. रमा आणि सारंग दोघेही विचार करत होते.

“अहो विचार करायला काय हरकत आहे.”

“नाही तुझं म्हणणं बरोबर आहे पण आपल्या घरचे, समाज, आपले नातेवाईक हे काय म्हणतील? ते मान्य करतील?”

“अहो कुणाचं काय करायचं, आपण आपलं बघायचं. चांगलं झालं तरी लोक बोलतात, वाईट झालं तरी लोक बोलतात. त्यांना कुणालाच कुणाचं काहीच बघवत नाही. आपण आपला विचार करूया ना. लोकांचं काय आहे ते कधीतरी आपल्या दुःखात भागीदारी झाले आहेत का सुखातही नाही होणार, काय फरक पडणार आहे.”

“ठीक आहे बघू, विचार करू आणि हो आधी आपण कुणालाच काही सांगायचं नाही. आधी आपण आपला विचार पक्का करू आणि त्यानंतर बाकीच्यांना सांगू.”

“बघा तुम्हाला काय वाटतं.”

“मी विचार करतो.” असं म्हणून सारंग ऑफिसला गेला.

ऑफिसमध्ये गेल्यानंतर सारंग मनीषशी या विषयावर बोलला. मनीषला पण खूप छान वाटलं. त्यानेही या गोष्टीला दुजोरा दिला.

आता आईला सांगण्याची वेळ आली. सारंगच्या मनात धाकधूक सुरू होती, थोडं टेंशन वाढलेल होतं. आईला कसंही करून आईला समजावून द्यायचं होतं, तिला पटण महत्वाचं होतं.

सारंगने त्याच्या आईला सांगितलं पण त्याची आई जुन्या विचाराची असल्यामुळे तिला हे कधीच मान्य झाल नव्हतं.

“वंश वाढवायला आता दुसऱ्याचं पोर आणायचं घरी, हे इतकच बघायचं बाकी राहिलं होतं. देवा रे हे बघायच्या आधी मरून गेले असते तर बरं झालं असतं.” त्याच्या आईची बडबड सुरू झाली.

“अग आई दुसऱ्याचं पोर झालं म्हणून काय झालं. रमाला एक मूल मिळेल आणि त्या बाळाला एक आई मिळेल, आईचं प्रेम मिळेल. अजून काय हवंय ग? आपल्या हातून पुण्याच काम घडणार आहे.”

“नको रे बाबा ते पुण्य, ते पुण्य म्हणजे माझ्यासाठी पापचं होय. कोणाचं कसलं पोर, कोणाचं पाप असेल कुणास ठाऊक, ते आपल्या घरात आणायचं आणि आपल्या घरात वाढवायचं, आपलं नाव द्यायचं. बघा रे बाबा मला तर काही पटत नाही.”

सारंगच्या आईची बडबड सुरू होती पण सारंग आणि रमाने लक्ष दिले नाही. त्यांनी ठरवलं की आता आपण बाळ दत्तक घ्यायचं.

एक दिवस सहज म्हणून ते अनाथाश्रम मध्ये गेले. तिथे काही छोटी मुले, काही मोठी मुले बघून रमाला खूप छान वाटलं. रमा बराच वेळ त्या छोट्या छोट्या मुलांसोबत खेळली. त्यांच्यासोबत वेळ घालवला. रमा आणि सारंग त्यांच्यासाठी काही खेळणी घेऊन गेले होते. ते त्यांना दिले. मुलांना खूप आनंद झाला.

काही दिवसानंतर दिवाळी येणार होती म्हणून रमाने अनाथआश्रम मध्ये जेवढे ही मुलं आहेत त्यांच्यासाठी काही ना काही भेटवस्तू घेतली. कुणाला कपडे, कुणासाठी पुस्तक, कुणासाठी काही खेळणी असे बरंच काही वस्तू घेऊन रमा आणि सारंग अनाथाश्रमात गेले.

रमा सगळ्यांना पुस्तकं वाटतं असताना तिचं लक्ष अचानक बाजूला बसलेल्या एका मुलीकडे गेलं. रमाने तिच्याकडे आश्चर्याने बघितलं.

काही वेळाने रमा तिच्याजवळ जाऊन बसली,

“काय ग अशी का बसलीस?”

तिने मान फिरवली, ती रमाशी बोललीच नाही.

“काय झालं बाळा? अशी का बसलीस तू?”

“आता दिवाळी येणार आहे ना? पण माझ्याकडे तर नवीन कपडे नाहीयेत, फटाके पण नाहीयेत. मग मी कसं दिवाळी करणार?”

“अगं असे कसे तुझ्याजवळ नवीन कपडे नाहीत? मी आणलेत ना तुझ्यासाठी नवीन कपडे आणि फटाके ते पण मी तुझ्यासाठी घेऊन येणार आहे. हे बघ तुझ्यासाठी नवीन फ्रॉक आणलाय. कसा आहे?”

“तुम्ही मला देणार?”

“हो, छान दिसतोय ना तुझ्या अंगावर.”

“नाही, नको मला.”

“का नको?”

“कारण तुम्ही मला फ्रॉक द्याल आणि मग मला तुम्हाला पैसे द्यावे लागणार ना? माझ्याकडे पैसे नाही आहेत, मी तुम्हाला कुठून पैसे देऊ?”

“अगं वेडाबाई तुला कोणी सांगितलं. अग तुला मला पैसे द्यायचे नाहीयेत. हे माझ्याकडून आहे तुला दिवाळीचं गिफ्ट आहे.”

“खरंच तुम्ही मला देणार?”

“हो ग बाळा..” रमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.

तिला खूप आनंद झाला. त्या मुलीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून रमाला खूप समाधान झालं.

रमा आणि सारंगने मनाशी गाठ बांधली की आपण मुलगी दत्तक घ्यायची. त्यांनी सगळे प्रयत्न केले. घरच्यांना समजावलं, आई तर तयार नव्हतीच. तरीही त्यांनी निश्चय केला होताच. त्यांनी अजून एक दोन अनाथाश्रम गाठले, सगळी माहिती मिळवली. सगळे कागदपत्र तयार केले.काही अनाथआश्रमाचे संस्थापक सारंगची आर्थिक परिस्थिती बघता त्यांना मुलगी दत्तक द्यायला तयार नव्हते. त्यासाठीही सारंगला बराच संघर्ष करावा लागला.

दिवस भरभर सरकत होते पण त्याची व्यथा काही संपत नव्हती, काम होत नव्हतं. सारंगच्या ऑफिसमध्ये ही गोष्ट माहीत झाली, त्याच्या ऑफिसचे लोक त्याची टिंगल करायला लागले. सारंगने दुर्लक्ष केलं पण तरी त्याचा त्याला त्रास होतच होता. बरेच दिवस गेले, महिने गेले, कागदपत्र तयार असूनही काम होत नव्हतं.

शेवटी एका ठिकाणी एका अनाथाश्रम मध्ये मुलगी दत्तक घेण्याचा पक्क झालं. सगळ्या प्रोसिजरमध्ये महिना गेला आणि फायनली एक तीन वर्षाची गोड मुलगी सारंग आणि रमाच्या जीवनात आली.

सारंग आणि रमा तिला घरी घेऊन आले. रमाने खूप छान तयारी करून ठेवलेली होती हे तिच्या स्वागतासाठी. कुंकवाच्या पावलांनी लक्ष्मीच्या रूपात लक्ष्मी घरात आली. त्यामुळे रमा आणि सारंगने तिचं नाव लक्ष्मी ठेवले.

ते तिला लक्ष्मी या नावाने हाक मारायचे ज्यावेळी लक्ष्मी घरात आली सगळ्यांनी नाक तोंड मुरडले. कोणी तिच्याशी बोललं नाही त्यामुळे ती लहान तोंड करून बसली होती. रमाने तिला समजवले.

“बाळा सगळे बोलतील तुझ्याशी, तू इतकी गोड आहेस ना की कुणीही जास्त दिवस तुझ्यावर रुसून बसणार नाही.”

जेव्हा लक्ष्मीने आई आई म्हणून रमाला हाक मारली, तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. तिने तिला घट्ट मिठी केली आणि डोळ्यात साठवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.सारंगनेही त्या दोघींना मिठी घातली.

लक्ष्मीने सारंगलाही मिठी दिली, त्याने तिला घट्ट पकडलं. आणि त्यानेही घट्ट डोळे मिटले. तिच्या गालाची पप्पी घेतली, तिच्या गालावरून हात फिरवला. त्याला किती प्रेम करू नी किती नाही असं झालं होतं.

आसुसलेलं मन आज शांत झालं. घरच्यांनी विरोध केला, नातेवाईकही बोलले, समाजानेही त्रास दिला. पण मनाशी असलेला निश्चय पूर्ण झाल्यामुळे दोघेही आनंदात होते. त्यांना आता कुणाचीचं पर्वा नव्हती.

आज सारंग आणि रमाचं आयुष्य पूर्णत्वास आलं होतं.

समाप्त:

आजही समाजात अशी कित्येक जोडपी आहेत, ज्यांना मुलं होत नाही. अनेक प्रयत्न करूनही यश मिळत नाही. यामुळे समाजाकडून त्या बाईला तर त्रास होतोच पण पुरुषाला देखील होतो. फरक इतकाच आहे की तो दाखवत नाही म्हणून काही त्याच्या मनाची व्यथा कमी होत नाही.

त्यालाही वाटतं आपण बाबा व्हावं, लहानसा जीव आपल्या आयुष्यात यावं. त्यालाही समाजाकडून त्रास होतोच. मग दवाखान्यात टेस्ट साठी पैसे खर्च करण्यापेक्षा, जर मूल दत्तक घेतलं तर...?

खरच खूप छान कल्पना आहे, एका अनाथ मुलाला नवीन आयुष्य मिळत. आई बाबाच प्रेम मिळतं. तुम्हाला काय वाटतं प्रतिक्रिये द्वारे नक्की कळवा.

धन्यवाद

#author of the year 2022



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational