आम्मी बुला रही है
आम्मी बुला रही है
मी हळूच दरवाजा उघडून आत डोकावलो आणि मानेनच त्याने आत येण्याची खूण केली .
"हाय इरफान, हाऊआर यु ? खरेतर मला खूप तुला पाहायला यायची इच्छा होती .पण हे लाॅकडाऊन शिवाय तुझी तब्येत ..." मी त्याच्या आय.सी.यू मधील बेडशेजारी काही अंतरावर उभे राहून काळजीने म्हंटले. तसे मला बसायची खूण करीत तो हळूच बेडवर अर्धवट उठून पाठीमागच्या साईडला टेकुन बसला .नेहमीसारखेच त्याच्या गंभीर चेहऱ्यावरचे दुर्मिळ गुढ स्माईल त्याने मला दिले. ज्या मोठ्या लाल डोळ्यातून अभिनयाच्या अनेक छटा न बोलता व्यक्त व्हायच्या त्या डोळ्यातील आजची अगतिकता बघून मला मनाला तीव्र वेदनाझाल्या.उंच,धिप्पाड ,पोलादी, शरीरयष्टीच्या कणखर देहाला त्या अवस्थेत पाहणे मला असह्य झाले .त्याच्या दुर्बल देहातून ही हुकमी हक्काचा आवाज आला ."कमॉन टेक युवर पोझीशन यार !तुझी इच्छा अपुरी नको रहायला .या वर्षात मनात असुनही ,तू खूप वेळा विचारूनही मी तुला वेळ देऊ शकलो नाही.. सॉरी .आता त्यासाठी तुला बोलावले आहे ..कॅरी ऑन..."
" नो नो तू बरा हो आपण त्या नंतर बोलु. काय गडबड आहे ?"त्याला त्या अवस्थेतत बोलायला लावणे, प्रश्न विचारणे मला प्रशस्त वाटत नव्हते. दोघातील नाते पत्रकारितेच्या पलीकडे दोस्तीचेही होते .मी त्याला भेटण्याचा प्रयत्न केलेला पण त्याची ट्रीटमेंट ,लंडनला जाणे, तब्येत आणि माझे दौरे यामुळे अपुरेच राहिलेले.कदाचित ते त्याच्या डोक्यात असावे म्हणूनच त्याने मला आवर्जून बोलावले आणि मी या लाॅकडाऊन मध्ये कितीतरी परमिशन काढून , खास करून सुतापा भाभीची परमिशन मिळाली आणि मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकलो होतो. त्या ग्रेट वाॅरियरला बेडवर बघुन माझे डोळे भरून येत होते. त्याने एक दीर्घ उसासा सोडला आणि माझ्यावर नजर रोखून म्हटले "गडबड नाही नको म्हणू, आता वेळ खूप नाही राहिला हाती .आज मला बोलू दे रे !किमान जाताना तरी रीतं होउ दे ."त्याच्या डोळ्यातून दोन टपोरे थेंब घरंगळले. मी माझ्या मूक अश्रूंनीच त्याला संमती दिली ...आणि माझ्या हातातील मोबाईलचा ऑडिओ रेकॉर्डर आॅन केला. त्याचे शब्द ...त्याचा आवाज...त्याच्या आठवणी... त्याचे प्रेम सर्व रेकॉर्ड करण्यासाठी !अनेक रोल करताना प्रेक्षकांच्या टाळ्या घेणाऱ्या त्या आवाजाची जबर मात्र तीच होती .त्याच्या शब्दाच्या सरीतून आठवणीचे ऊन पाऊस ,सुखांचे पर्वत, दुःखाच्या दऱ्या ,प्रेमाचे चषक, निराशेचे वाळवंट ,यश- अपयशाचे चढ-उतार, सगळं आयुष्यच एखाद्या चित्रपटाच्या रोल सारखे पुढे पुढे सरकू लागले... आणि मंत्रमुग्ध होऊन ऐकत, साठवत, अनुभवत राहिलो ....तो शब्दांचा उरूस ....
"आज किती तारीख ?"त्याने गोंधळुन विचारले
"29 एप्रिल इरफान !" मी म्हणालो
तसा एक सुस्कारा सोडत हुं..करत तो म्हणाला
"ओह! एस! लोकडाऊनच्या लाॅकपमध्ये कित्येक दिवस झाले तारखा ,वार,दिवस काहीच लक्षात येत नाही .प्रत्येक दिवस सारखाच. पळणेच खुंटले आहे सर्व जगाचे !अर्थात माझे तर दोन वर्षापासून मानसिक लाॅकडाऊन झालेय म्हणा ! कैद झाले आहेत अनेक आठवणींची बहार ..पतझड.. खाच खळगे ,जीवनाचे रंग बेरंग... एखाद्या पिक्चर सारखेच असते आपले आयुष्य !सुरुवात, मध्यंतर आणि शेवट .क्लायमॅक्स काय थ्रील
घेऊन येईल सांगता न येणारे !शेवटी आयुष्या तर काय ?एक पिक्चर स्टोरी ना?त्याचा दिग्दर्शक तो एक नियता .सगळी सूत्रे त्याच्या हाती !कधी वाटले नव्हते रे सिनेमांमध्ये दिग्दर्शकाच्या तालावर नाचलो या निसर्गाच्या दिग्दर्शका समोरही नाचावे लागेल.. तो म्हणेल तसा !तिथं काही वेळापूरतीची अॅक्टिंग असते, त्यातून आउट होतो काम संपले की !पण इथे तर स्वीकारावे लागते जीवनातूनच आउट होणेही....
हॉस्पिटलमधील हे बेड , हीऔषधे, काही वेळापुरते आयुष्य पुढे ढकलणाऱ्या मशनरी ,औषधांचे उग्र वास ,इंजेक्शनचा भडिमार, आयुष्या सारखेच हळूहळू कमी होणारे ते बाटलीतील सलाईन , डॉक्टरांचे गंभीर चेहरे, नर्सची पळापळी, त्यांचे मास्क ...नको नको झालय हे सर्व आता ...सतत वेगवेगळ्या रोल मधून मधून स्वतःला सिद्ध करणाऱ्या मला, तोच तो रुग्णांचा रोल करण्याचा उबग आलाय. गेले दोन वर्षे खंबीरपणे सामोरे गेलेल्या मनात महाभयानक कल्लोळ माजलाय. माझ्या शरीरातील आंगुतुक पाहुण्याची माझ्या मनातील दहशत! आणि बाह्य जगातील कोरोणाची दहशत सारखीच आहे!.मृत्यूचे भय ! सगळे बघून आधीच जीर्ण झालेले वस्त्र काट्यात अडकून आणखी फाटावे तसे फाटत चालले आहे. मृत्यू इतका सहज आहे? एखादया वावटळीने झाडाची पाने गळावीत तसे जीव जात आहेत! मग वाटते आपण तरी का जगवत आहोत हे पोखरलेले शरीर? सर्व इतके क्षणभंगूर आहे तरी ?वाटलं होतं रे आपण सावरले आहोत, पण पै ऑफ लाईफ मधील जहाजा सारखेच मन भरकटले आहे या विचारांच्या वादळी समुद्रात " इतके बोलून त्याने डोळे मिटले, पण माझे डोळे अखंड वाहत होते .थोड्यावेळाने शांत होऊन तो आपणच बोलू लागला...
" दोन वर्षांपूर्वीचे माझे आयुष्य किती वेगळे होते आणि आजचे किती वेगळे आहे! एकाच नटाने चित्रपटाच्या दोन वेगवेगळ्या टोकाच्या भूमिका करावे तसे ! ती चमचमती ग्लॅमरस दुनिया, कॅमेरा, ॲक्शन, अॅक्टिंगची धुंदी, मुलाखती, प्रसिद्धी आणि अॅवार्डसची नशा ,पैसा, संपत्ती,शानों
शौकत ,,आकाशाला गवसणी घालण्याची महत्वकांक्षा या सर्व पसाऱ्यात आत्ममग्न होतो मी! खोट्या भूमिका निभावताना खऱ्या भूमिकेचा शेवट इतक्या बेसावधपणे या बेडवर जवळ आलाय ."
"प्लीज असे नको ना बोलू.." मी मध्येच त्याला अडवत म्हणटंले ,तसे आपला उजवा हात वर करत तो मला म्हणाला "आज फक्त मी बोलणार तू ऐकायचे ." मी आज्ञाधारक बालकासारखी मान हलवली.
" आजही ती 2018 मधील एप्रिलची संध्याकाळ आठवते. जेव्हा मला समजले माझ्या शरीरात एक अनवांन्टेड आगंतुक पाहुणा प्रवेशित झालेला आहे ज्याचे नाव 'न्यूरोएन्डोक्राईन टुमर" आहे.. जो खूप दुर्मिळ आणि दहा लाखांमध्ये एकाला होणारा! म्हणजे गंमत बघ! मी त्या दहा लाखांमधील एक दुर्मिळ व्यक्ती आहे. माझ्या अतः स्त्रावी ग्रंथीवर परिणाम करून एक एक अवयव निकामी करणारा .ज्यावर फारसे उपचार नसणारा ...रिसर्च नसणारा ...खरे सांगू? तेव्हा ते मला अजिबात सहन झाले नाही .अचानक समोर येणाऱ्या गोष्टी आपल्याला आयुष्यात पुढे तर नेतात पण उध्वस्त करतात. तसेच माझेही झाले होते .पण आजूबाजूच्या लोकांचे प्रेम ,आम्मीचा विश्वास सुतापाचा धीर ,मुलांची गरज ,चाहत्यांचे प्रेम , सर्वाची दुवा,प्रार्थना ,शुभेच्छा या सर्वांनी मी सावरलो ,भारावून गेलो ..यातून आपण पूर्ण बरे व्हायचे सर्वांच्या प्रेमासाठी असा विश्वास वाटू लागला... वाढू लागला ..आम्मीला हे पचवणे तसे खूप अवघड होते. पण दुःख गिळून ती मला धीर देत होती" तू पूर्ण बरा होऊन घरी परतणार "असा तिचा विश्वास होता .तिच्या या दुर्गम विश्वासाने मला दहा हत्तीचे बळ यायचे.
मग रवाना झालो लंडनला ट्रीटमेंटसाठी. दिवसातले चोवीस तास, सातही दिवस सुतापाने माझी साथ दिली .खरेतर तिच्यासाठी तर मला खूप जगायचे होते. पण जिने मला नेहमीच खंबीर आधार दिला ,सावरले, पडत्या व चढत्या काळात सावलीसारखी नेहमी बरोबर राहिली. तिला अर्ध्या वाटेवर सोडून जावे लागणार या वेदना तीक्ष्ण सुई प्रमाणे टोचणारऱ्या आहेत .पण तिच्या सुखद स्मृतीं आहेत ना बरोबर !एनएसडीच्या शिक्षण-क्षेत्री तिच्याशी जे नातं जोडलं ते श्वासाच्या अखेरपर्यंत राहीलं. तिने माझ्या जीवनाचे घडे प्रेम रसाने नेहमीच काठोकाठ भरले. तिच्या विशुद्ध प्रेम सोबतीने इथपर्यंतचा प्रवास सुखकारक झाला .
खरे तर माझे पहिले प्रेम क्रिकेट बरं का! राजस्थानच्या छोट्या खेड्यात राहून मी स्वप्ने मात्र मोठी पाहायचो! ते का माहीत नाही? पण एक जुनून होता काही बनण्याचा. सी .के. नायडू स्पर्धेसाठी माझी निवडही झालेली. जाऊ मात्र नाही शकलो ,घरच्यांच्या विरोधामुळे आणि स्वतःकडे नसणाऱ्या पैशामुळे. मग मला ॲक्टर बनण्याची स्वप्ने पडू लागली. चित्रपटांचीही ही खूप आवड .पण चित्रपटसृष्टीत जाणे घरच्यांना पसंत नव्हते. यावेळी मात्र खोटे बोलून एनएसडीत ऍडमिशन घेतले .शिवाय तिथेही ही खोटी नाटके केल्याची खोटी यादी सादर केली .तो आपल्याच स्टाईलमध्ये खोटे बोलण्याची कबुली प्रांजळपणे हसत देत होता .मी ही त्या हास्यात सामील झालो. "स्कॉलरशिप मिळाली पण तुटपुंजी, दरम्यान वडिलांचा मृत्यू झाला. खूप बिकट दिवस होते ते! जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी त्यांची एक आठवण जेवताना नेहमी आठवते ते नेहमी म्हणायचे "इरफान पठान च्या घरी जन्मून मांस-मच्छी खात नाहीस , तु ब्राह्मणाच्या घरी जन्माला यायला हवे होतेस". त्यांची साथ सुटली पण सुतापा सारखी जीवाभावाची मैत्रीण भेटली. आयुष्य एखादी गोष्ट हिरावून घेते तेव्हा दुसरी एखादी गोष्ट पदरात टाकते याचा प्रत्यय आला. एक चांगली मैत्रीण असणारी ती, प्रसंगी मला आर्थिक पाठिंबाही दिला तिने. मैत्रीचे रुपांतर प्रेमात आणि प्रेमाचे लग्नात होऊन दोन वेगळे धर्म, वेगळ्या जाती ,वेगळे स्टेट ,एका अनोख्या बंधनात प्रेमाच्या धाग्याने एकत्र जोडले गेले आयुष्यभरासाठी!अगदी आहे की नाही रोमँटिक सिनेमासारखी आमची स्टोरी ?अरे चित्रपटातील रोमँटिक हिरो नसलो तरी रियल लाईफ मध्ये होतो बरं का! त्याच्या त्या विनोदावर मात्र दोघेही मनसोक्त हसलो .थोडा विराम घेऊन तो पुढे बोलू लागला .आमच्या जीवनाच्या रंगमंचावर दोन गोंडस बळांनी एन्ट्री मारली आणि माझ्या जीवनाचा जीवनपट परिपूर्ण होऊन नित्य उजळू लागला .प्रत्यक्ष या मायावी चित्रपटसृष्टीत कोणत्याही गॉडफादर शिवाय प्रवेश करताना प्रचंड झगडावे लागले . किती नकार पचविले ?किती उंबरे झिजविले?काय काय कामे केली! नाटकापासून सुरुवात करुन छोट्या ,छोट्या सिरीयल मध्ये हळूहळू शिरकाव केला. तुला आठवतात नावे? भूत ,चाणक्य ,भारत एक खोज, बनेगी अपनी बात, अशा कितीतरी टीव्ही सिरीयल केल्या .पडदा छोटा होता पण आनंद मोठा नसला तरी पैशाची गरज होती. आणि बॉलीवूड ची स्वप्ने पाहणाऱ्या मला तेथपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग होता .'सलाम बॉम्बे' ने बॉलीवुडचे माझे दरवाजे उघडले आणि मी बॉम्बे लाच माझी कर्मभूमी केली. छोटे-मोठे रोल करत सुरू झालेला माझा संघर्ष! झगमगती दुनिया, कामाची नशा भरभरून अनुभवली .धावत्या रेल्वेच्या एका मागून एक धावणाऱ्या डब्या सारखी वर्षे सरत होती. तशी अनेक चित्रपटांची भर माझ्या खात्यात पडत गेली. काही फ्लाॅप, काही हिट, काही सुपरहिटचा असा आलेख सतत उंचावत होता. अगदी तेलगू, बंगाली चित्रपटांची द्वारेच नव्हे तर हॉलिवूडने पण मला आमंत्रित केले .हासिल मकबूल ,रोग ,लाईफ इन मेट्रो ,पानसिंग तोमर, तलवार, सात खून माफ, दी लंन्च बॉक्स, हैदर ,गुंडे ,पिंकु, जुरासिक पार्क ,हिंदी मिडीयम अशा तीस एक सिनेमानी माझ्यातील कलाकाराला फुलविले .ग्रेट वारीअरने म
ला चित्रपट क्षेत्रातील योद्धा सिद्ध केले .स्लमडाॅग मिलेनियम ऑस्करपर्यंत घेऊन गेला .मी मागे वळून पाहिलेच नाही. यशाचे एक-एक शिखर सर करत चाहत्यांचे प्रेम ,प्रसिद्धी,मिळणारे पुरस्कार ...किती आनंद देणारे होते! स्टारडस्ट, फिल्मफेअर ,नॅशनल असे कितीतरी अॅवार्ड ,कितीतरी वेगवेगळ्या भूमिकासाठी मिळाले .पद्मश्री देऊन देशाने केलेला गौरव माझ्या कारकिर्दीतला कलगीतुरा होता रे!"
हे सर्व बोलताना त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती. तो भारावून गेला होता. एकाद्या मोठ्या स्टेजवर असल्यासारखा ! पण काही क्षणच ...काही क्षणात ते भाव लोपले .डोळ्यातील चमकीने विझलेल्या गारगुट्यांची जागा घेतली ....आणि तो सांगू लागला" मी माझ्या आयुष्याच्या सुशोभित ट्रेनमध्ये बसून माझ्या आशा-आकांक्षा ,स्वप्ने ,टार्गेटस
घेऊन मजेशीर शीळ घालत सुसाट वेगाने धावत होतो .बाहेरच्या विलोभनीय दृश्याचा अनुभव उत्कटतेने घेत .हा प्रवास संपूच नये असे वाटत असताना बेसावध क्षणी टी.सी. ने मला माझ्या स्वप्नातुन बाहेर काढले, पाठीवर हात मारत सांगितले 'पुढचे स्टेशन तुमचे आहे ते आले की उतरा '.मला क्षणभर काहीच समजेना .मी घाबरून म्हंटले "नाही हो..,हे माझे स्टेशन नाही . ते अजून खूप लांब आहे... ' तो मला मध्येच थांबवत म्हणाला 'तुम्हाला उतरावेच लागेल इथपर्यंतच तुमचे तिकीट होते ' तेव्हा सांगतो तुला अचानक जाणवले आपण समुद्रातील एखाद्यावर वाहणाऱ्या ओंडक्यासारखे आहोत जो त्या लाटेबरोबर त्या जातील तिकडे वाहत जातो. क्षणभर वाटले उधळलेल्या घोड्याच्या पाठीवर बैठक मारून त्याच्यावर काबू मिळवतो तसे त्या लाटावर काबू मिळवावा ... पण हा विचार किती फोल होता लक्षात येताच मी हादरून गेलो. वाटले नको हे असले जीवन! ज्यात मी स्वतःच्या पायावर उभा नसणार !जगायची इच्छाच नष्ट झाली. मी जवळजवळ सरेंडर झालो होतो .पण परत सर्वांच्या प्रेमाने, धीराने ,उभारीने जगण्याची अंधुक पालवी पुन्हा पालावली. ढासळू लागलेली मनस्थिती सावरली. वेदनेने मला आत: बाह्य: वेढले आणि मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालो. वेदना होतील हे माहीत होतं पण त्या इतक्या होतील याची जाणीव नव्हती .त्या अल्ला पेक्षाही विशाल होत्या. संपूर्ण विश्वाची वेदना एकाच ठिकाणी समेटली आहे असे वाटत होते .आणि आजही या क्षणाला तीच वेदना अनुभवत आहे .अति वेदनेने जमा झालेले चेहऱ्यावरील दवबिंदू त्याने टिशू पेपरने टिपले .परत थोडा विश्राम ...आणि परत त्याच्या चिंब शब्दसरी...
" मी लंडनमध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो तिथे बाल्कनीत एकदा उभा होतो .माझ्या बेडच्या वरच्या मजल्यावर कॉमा वाॅर्ड होता आणि समोर रस्त्याच्या पलीकडे लॉर्ड्स स्टेडियम! तिथे वि.वि.रिचर्डसनचा खूप मोठा हसरा पोस्टर !पण माझ्या बालपणीच्या स्वप्नांचा तो देखावा पाहूनही मला काहीच झालं नाही! अचेतन झालेलो मी! वाटले ही दुनिया माझी कधी नव्हतीच .आणि त्या शून्य नजरेने... शून्य मनाने..मला पूर्णतः हलविले. तेव्हा असं वाटलं जीवन आणि मृत्यूच्या मध्ये फक्त एक रस्ता आहे एकीकडे हॉस्पिटल आणि दुसरीकडे स्टेडियम !सर्वकाही अनिश्चित आहे. निश्चिततेचा दावा कोणीच करू शकत नाही .मग तो खेळ असो अथवा जीवन !मला खूप मोठा धक्का बसलेला .म्हणजे माझ्या आत जे शिल्लक होतं ते वास्तव मध्ये सृष्टीच्या शक्तीचा, बुद्धीचा प्रभाव होता. जेव्हा या अनिश्चिततेची समज मला आली तेव्हा मात्र मी मनाला समर्पणासाठी तयार केले .आता काही घडो महिना ,चार महिने ,अथवा दोन वर्ष ..जे हातात असतील तेवढे! केव्हा येईल तेव्हा मृत्युचे स्वागत करायचे ..चिंता नाही. दुःख, वेदना, निराशा मस्तिष्कातून बाहेर काढले आणि तेव्हा खऱ्या अर्थाने मुक्त झालो. स्वातंत्र्याचा अनुभव घेतला. एका सुखद जाणीविने
निर्धास्त झालो . विश्वाच्या पसार्यात माझा विश्वास पूर्ण सत्य बनला आणि त्यानंतर तो माझ्या पेशीमध्ये बसला .तो किती वेळ राहणार हे वेळच सांगणार होता. ती वेळ आता आली आहे असं वाटतंय. ..पण तेव्हा त्या माझ्या अवस्थेत सगळी दुनिया ,माझे हितचिंतक ,ओळखणारे, न ओळखणारे असंख्य चेहरे आणि हात वेगवेगळ्या ठिकाणाहून माझ्यासाठी प्रार्थना करत होते .आणि त्या प्रार्थना एक होऊन एक मोठी शक्ती झाली. त्याची एक जीवनधारा बनून ती माझ्या मणक्यात प्रवेशित होऊन ,मस्तिष्कापर्यंत जाऊन, रुजून अंकुरित होऊन, कधी कळी, कधी पाने, कधी फांदी तर कधी शाखा बनली .तेव्हा इतका खुश झालो की प्रार्थनेतून उगवलेल्या झाडाच्या प्रत्येक पानातून ,फुलातून, फांदीतून एक नवी वेगळी दुनिया दिसू लागली .मग तेव्हा वाटले हे जरुरी नाही की ओंडक्याचे लाटेवर नियंत्रण हवे... उलटे त्या लाटावर अलगत तरंगत निसर्गाच्या पाळण्यात जावे झोपून ...चिरशांत मनाने ...आणि या बदललेल्या, गवसलेल्या आत्मशांतीनेच बरा होऊन कमबॅक केले एक वर्षानंतर इग्लिंश मिडीयम द्वारे!केवढ्या मेहनतीने सिनेमा बनविला ..पण फिल्म प्रमोट करायला नाही जावू शकलो . कारण अनवांन्टेड मेहमानने परत शरीरात धडकी द्यायला सुरुवात केली होती ...काही काळ गप्प बसून! हे म्हणणे किती सोपे असते की "when life gives you lemons ,make it Lemonade" पण प्रत्यक्षात जगणे खूप अवघड. आपल्याला पॉझिटिव्ह राहण्याशिवाय कोणता चॉइस नसतो. मीही तोच प्रयत्न करत होतो. पण आता मी थकलो आहे. हरलो आहे .परवा चार दिवसापूर्वीच्या आम्मीच्या मृत्यूने मी पूर्ण नेस्तनाभूत झालोय. मी परत सरेंडर होतोय. बाहेर जगाचे झालेले लाॅकडाउन ..अचानक माझी बिघडलेली तब्येत.. मी इथे मुंबईत ...आणि आम्मी जयपुर मध्ये .कोणी कोणाला लाख मनात असूनही न भेटता येणारी ही लाॅकडाऊनची भिंत मध्ये उभी राहिली.भौगोलिक वाढलेले अंतर मोबाईल ,नेट ,व्हिडिओ कॉलने कमी केले .तिला माझीच काळजी सतावत असणार .. 'इरफान नक्की बरा होणार' म्हणणाऱ्या आम्मीचा माझी अवस्था बघून धीर खचला असावा का ? का करोनाच्या संकटाला घाबरली? का ती ही होती त्या समुद्रातील लाटांच्या तालावर वाहत जाणाऱ्या नियतीच्या हातातील ओंडका! माझ्यासारखाच! का आले असावे तिचेही उतरण्याचे स्टेशन ?एक एक अवयव मला दगा देणार माहीत होते ग, पण माझे सर्वस्व तू अशी दगा देशील वाटले नव्हते !माझ्यासाठी सतत दुवा मागणारे तिचे हात अनंतात विलीन झाल्यावर माझ्या हाताने तिला फुलांची चादर नाही ओढली.. की खांदा नाही देऊ शकलो. हात बांधून बघण्याशिवाय माझ्या हातात काहीच नव्हते." स्वतःच्या दोन्ही हाताकडे पहात त्याच हातांनी डोळे पुसून ...काही सेकंद तो परत शांत झाला. असे वाटत होते खोलीतील हवेचा कण न कण दुःखाने ओंथबलेला आहे .त्याला काही वेळ शांत झालेले बघून मी धास्तीने हळूच हाक मारली 'इरफान'! तसे हळूच डोळे उघडत गुढ हसत तो म्हणाला "डोन्ट वरी !अजून श्वास सुरू आहेत माझे! ...काही दिवसांपूर्वीच आम्मीचा फोन आलेला मी दवाखान्यात असताना. तिचे भरलेले डोळे , डोळे भरून पाण्याशिवाय काय करू शकत होतो? तिला म्हटलं आम्मी तुझ्या दुवेमुळेच मला ही दोन वर्ष बोनस मिळाली असावीत.खरंच आता मला या यातना सहन होत नाहीत गं .तेव्हा तिने धीर दिला पण आता ते धीर देणारे शब्द काळाच्या पडद्याआड गेले. आम्मी वाटत आहे तुझ्या मांडीवर डोके ठेवून या वेदना ,दुःख सगळं विसरावं,तुझ्या सुरकुतल्या हाताचा ओला स्पर्श अनुभवावा, तुझ्या मिठीची उब साठवून घ्यावी खोल अंतरंगात... आणि विलिन व्हावं त्या अनंतात .सगळं लाॅकडाऊन तोडून तुला भेटायला यावे वाटत होते आणि तूच गेलीस मला न भेटताच ...एकटीच..! तुझं अंत्यदर्शन मला व्हिडिओ वर घ्यावे लागले!? तुझा तो शांत ,निश्चल, अचल पडलेला देह बघून तुला सगळे अलविदा करताना पाहून मी पूर्णतः आतून कोसळलोय. आजपर्यंत गोळाबेरीज करून आणलेले उसने अवसान पण तुटून फुटलेल्या आरशासारखे चक्कणाचूर झालय. जीवनाची अनिश्चितता पून्हा:प्रकर्षाने जाणवू लागलीय.बाहेर करोनाचे घोघावणारे भयप्रद वादळआणि माझ्या मनातील भावनांचा महाभयंकर कल्लोळ !करोणाने जगाचे बदललेले भावविश्व आणि माझे आम्मीच्या पोकळीने भंगलेले भग्नविश्व ! दोन्ही सारखेच आहेत!माझ्यासाठी प्रार्थना करणारे हात स्वतःचाच जीव मुठीत घेऊन मृत्यूच्या भयाने ग्रासले आहेत. त्यांच्या प्रेमाने, विश्वासाने ,पुनर्जीवित झालेले झाड उन्मळून पडलय आता .माझी माझ्या आवडत्या चमेलीची चादर ओढण्याची वेळ आली आहे . पण चमेली नाही मिळणार या लाॅकडाऊनमध्ये..हो ना रे? आम्मी ज्या लॉकडाऊनमुळे आपली भेट झाली नाही ते तोडून तुझ्याकडे मी येत आहे...."
"इरफान काय बोलतो आहेस?" मी न राहून खुर्चीवरून उठत रागाने म्हणटले .तसे उजवा हात खिडकीकडे दाखवत तो म्हणाला " ते बघ ...आम्मी मला बोलवत आहे ...ते बघ... त्या तिथे..! आकाशाच्या अथांगातून खुणावत आहे ...आम्मी...!" मी अभावितपणे तिकडे पाहिले आय .सी.यु.च्या खिडकीच्या काचेतून दिसणारे आकाश तो दाखवत होता.
" आम्मी मी येतोय तुझ्याकडे ..जिथे या वेदना नसतील ..औषधे ,डॉक्टर ,सलाईन काही नसेल. तुझ्या मायेच्या उदरात मला परत सामावून घे. खूप धावलो ,खूप पळालो ,खूप अभिनय केला .आता कोणताच मोह मला अडवू शकत नाही. किर्तीचे प्रीतीचे सर्व धागे तोडून तुझ्या कडे यायचे आहे. मला समजलंय जीवन मागून मिळणारी गोष्ट नाही. जीवन म्हणजे पूर्णत्वासाठी अनंता कडून अनंताकडे चालणारा अखंड प्रवास! मी कायमची एक्झिट घेतोय... या अनिश्चित जगातून! "तो असंबद्ध पुटपुटत होता. मी लटपटत माझ्या शर्टच्या बाह्याने न आवरणारे डोळे पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होतो. हळूच जवळ गेलो... काही इंग्लिश शब्द त्याच्या ओठी होते त्याचेच 'लाइफ ऑफ पै 'चे शेवटचे वाक्य... शेवटच्या क्षणीही कलाकार म्हणून समृद्ध असणारा तो डायलॉग .....की सत्य..
'I suppose end the whole of life become on act letting go... but always hurts the most is not taking a moment to say a good bye.....'
क्षणात त्याचा चेतन देह अचेतन झाला आणि मी जोराने किंचाळलो....
"इरफान! नो ..नो ..प्लीज डोन्ट गो.." मला कोणीतरी गदागदा हलवत होते.
." पप्पा काय झाले ?स्वप्न पाहिले का?" मुलीचे शब्द कानावर आदळले. तसा मी जागा झालो . वाहणारे डोळे पुसत समोर पाहिले ...गोंधळून... टीव्हीवर इरफान मृत्यूची न्यूज ब्रेकिंग न्यूज म्हणून झळकत होती .मग आता काही वेळापूर्वी त्याच्याशी झालेला वार्तालाप ?स्वप्नातला ? काहीच कळेना... अविश्वासाने मी हातातील मोबाईलचा ऑडिओ रेकॉर्ड आॅन केला .तिथं ती रेकॉर्ड नव्हती पण माझ्या पंचेंद्रियांनी तिला रेकॉर्ड केले होते... आणि हृदयाच्या खोल कप्प्यात मी ती लपवणार होतो ,ऐकणार होतो ..माझ्या श्वासाच्या अंतापर्यंत.....we will miss you Irfan...we will miss you Irfan...
.मी पुटपुटत राहिलो ..मुलगी वेड्यासारखी माझ्याकडे पहात होती.