आज फिर जीने की तमन्ना है
आज फिर जीने की तमन्ना है
आज फिर जीने की तमन्ना है
"आज फिर जीने की तमन्ना हैं, आज फिर मरने का इरादा हैं." बाल्कनीतल्या झोपाळ्यावर बसून पावसाला बघत कॉफी पिताना ती गुणगुणत होती. चाळीशी गाठली होती तिने गेल्याच आठवड्यात; पण तसं कोणतंच लक्षण तिच्या अंगभर कुठेही दिसत नव्हतं.
तारूण्याची किनार अजून मोह घालत राहिली.. गालावरती बट रूंजी घालत होती..मृगजळात अडकलेलं
मन..धावू लागलं वाऱ्या सोबत..नृत्याची आवड असणारी
ती पुन्हा एकदा वळली..पाऊल थिरकले..हवेतच हाताच्या
नजाकतीने ताल धरला.. नृत्य हेच आत्मसुख मानणारी
काळाच्या ओघात लुप्त झालेली ती ..पुन्हा पावसात भिजून
चिंब.. ओठांवर गाणे तिच्या नकळत आले " आज फिर जीने
की तमन्ना है ' मनाने हळूच डोकावून पाहिले तीचे चाळीशीतले तारूण्य उजळून निघाले होते.
शांभवी तेरा वर्षांची असेल तेव्हा तिला शेजारच्या
काकू सारखं म्हणायच्या "फारच सुंदर नाचतेस तू .. तुला तर
एखाद्या नृत्य वर्गात पाठवायला हवं". पण शांभवीचे आई वडील संस्कृती जपणारे, जुन्या गोष्टी पाळणारे, शिवाय तिच्या आजीला असलं काही खपायच नाही.मग काय करणार शांभवी लपून छपून शेजारच्या मैत्रीण बरोबर कधी कधी नृत्य शिकायची.कधी कधी नृत्य कार्यक्रम पहायला जायची..पण मन मात्र तिला शांत बसू द्यायचं नाही.पुढे अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभे राहून मग या कलेला वेळ द्यावा असं तिला वाटू लागलं.. शांभवी तशी हुशार होती तिला तिच्या महत्वकांक्षी स्वभावाने आयुष्यात यश मिळाले.
ती आता मोठ्या हुद्द्यावर काम करू लागली.आई वडील ही
समाधानी झाले आता तिच्या लग्नाची चिंता त्यांना सतावू लागली.स्थळसुद्धा तोला मोलाचं हवं म्हणून सगळीकडे वर
संशोधन सुरू झालं.. शांभवीला मात्र यातील काही कल्पना नव्हती आणि अचानक एक दिवस घरी आल्यावर आईने तिला सांगितले "आपल्या पाहुण्या तील एक स्थळ आले आहे.तू उद्या सुट्टी घेतली तर बरे होईल."शांभवीने जास्त विचार केला नाही..ती फक्त" ठिक आहे" असं सांगून निघून गेली.स्थळ चांगले होते " सुजय हा मोठा वकील होता त्याचे
बाबा, काका सारेच राजकारणात होते.पिढ्यानपिढ्या त्यांचे
घराणे राजकीय असल्याने घरात सुबत्ता, आणि गावात मक्तेदारी होती.शांभवीच्या आई वडीलांना हे स्थळ जुळून यावे हे मनोमन वाटत होते.
शांभवी सकाळी आवरून बसली होती तोवरच तिकडचे लोक बघण्यासाठी आले.सुजय समोर बसला होता शांभवी जेव्हा बाहेर आली तेव्हा त्यांची नजरानजर झाली.सुयश दिसायला देखणा, रूबाबदार होता आणि शांभवी देखील साधी सुंदर पण बोलके डोळे, लांबसडक केस, पाहताक्षणी
लक्ष वेधून घेणारी होती. थोडी बोलणी झाली बघण्याचा कार्यक्रम झाला आणि नंतर दोन दिवसांत तिकडून निरोप आला..आईने शांभवीला दुपारी फोन करून कळवले.
शांभवी देखील मनापासून आनंदी होती. दोन्ही कडून होकार मिळताच लवकरच साखरपुडा करण्यात आला.
नवीन स्वप्नं,नवे लोक ह्यामध्ये शांभवी रमू लागली.सुजय सोबतही हळूहळू बोलणं वाढू लागलं एकमेकांना काय आवडतं ते पाहून एकमेकांची काळजी ते घेऊ लागले.लग्न मोठ्या थाटामाटात साजरे झाले.पै पाहुणे, आप्तेष्ट मित्रपरिवार सगळे उपस्थित होते.शांभवीच्या आई वडीलांनी हि एकुलत्या एक मुलींसाठी फारच हौस केली.ती दूर जाताना मात्र त्यांचे मन हेलावून गेले.सुजय समजूतदार होता त्याला त्यांची परिस्थिती समजत होती .शांभवी पण आई वडीलांना सोडून जायचं म्हणून उदास होती.सुजयने सर्वांना सांभाळून घेतले.गृहप्रवेशासाठी सुजयच्या घरच्यांनी जय्यत तयारी केली होती.. शांभवी घरदार तेथील नवीन पाहुणे, मोठमोठे लोक त्यांची उठबस हे पाहून जरा शांत झाली होती.पण ह्या सगळ्या गोष्टींची तिला सवय व्हायला हवी होती.सुजय तिला सगळ्या गोष्टी सांगत असायचा तो एकमेव आधार वाटायचा तिला..पण तो दिवस भर कामात व्यस्त आणि तिला घरी एकट वाटायचं, घरातील सगळे आपापल्या कामात असतं फक्त जेवण तेवढं एकत्र व्हायचं, सासूबाई, सासरे सारखे राजकीय कामानिमित्त दौऱ्यावर ,दिर जाऊ त्यांना स्थानिक पातळीवर काम पाहत होते त्यामुळे ते व्यस्त, तीने पुन्हा नोकरी करावी तर घरातले म्हणतील काय गरज आहे, म्हणून तिने हा विषय
टाळलाच..मग ती घरी सुजय च्या आजी जवळ जायची दिवसभर त्यांना काय हवं नको ते पहायची.दिवस भरभर जात होते कधी आई वडीलांना भेटायची कधी मैत्रिणींना,सुजय ही मोकळ्या वेळेत तिला फिरायला न्यायचा,सारे काही तिच्या मनासारखे होते तरीही तिला थोडंफार एकटं वाटायचं,कायम ती कामात गुंतली असायची लग्नाअगोदर पण आता तसे नव्हते.
आता निवडणुका जवळ आल्या होत्या म्हणुन घरात सारख्या बैठका आणि कार्यकर्त्यांचे येणं जाणं असायचं घरात सारखी वर्दळ असायची.हया धावपळीत सासऱ्यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्यांचा रक्तदाब वाढला आणि त्यामुळे त्यांना संपूर्ण विश्रांती सांगितली होती.आता पक्षाची जबाबदारी सांभाळावी म्हणून सुजय ला त्यांनी पुढे केले सुजय मात्र विवंचनेत होता, त्याच्या दादाला पुर्ण अनुभव असताना आपण ही जबाबदारी कशी स्वीकारावी?
पण वडिलांच्या आजारपणामुळे आणि त्यांच्या हट्टापायी त्याला ऐकण भाग पडलं तो आपल्या खोलीत येऊन शांभवी शी बोलत असताना अचानक तिथे त्याची वहिनी आली तिला हा सगळा प्रकार समजला होता पण प्रत्यक्षात घरातले कोणी उघडपणे व्यक्त होत नव्हते.आपल्या नवऱ्यास डावलेले पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली.तीने
सासऱ्यांना थांब विचारावा असा विचार केला तोच सुजय म्हणाला,"वहिनी" अंग ,"थांब इतक्या घाईत हा विषय काढू नकोस बाबांची तब्येत बरी नाही शिवाय आई हताश होऊन बसली आहे.आपण मिळून एकत्र काम करू, हळूहळू मी समजवतो बाबांना तू दादाला समजून सांग घरातलं वातावरण बिघडू शकतं." ह्यावर वहिनी शांत झाली आणि थोड्याच वेळात निघून गेली.सुजयचा दादा पहिल्या पासून
अति लाडात वाढला शिक्षणाचा फारसा विचार त्याने केला नाही.वडिलांच्या राजकारणातील पदांची लालसा त्याला आधीपासून होतीच.चार गुंड प्रवृत्तीच्या लोकांना घेऊन काही तरी अरेरावी करण्यात दिवस काढले.घरातल्या लोकांचा समाजात मान राखला नाही म्हणून अनेकदा घरात बोलणी खात असे पण आता वहिनीच्या सांगण्यावरून शांत असल्याचे भासवत होता निमूटपणे काम करत आहे असं भासवत होता. या अविश्वासापायी त्याच्या हातात काम सोपवण सगळ्यांना अवघड वाटत होतं.
सुजय चे काम आता चालू झाले राजकारण, दौरे, कार्यक्रम, कार्यकर्ते ह्यात तो पुरा अडकून पडला.शांभवी कित्येक रात्री उशिरापर्यंत वाट पाहून न जेवता झोपून जाऊ
लागली.अचानक एका रात्री सुजय जिकडे बाहेरगावी गेला आहे तिकडे दोन दिवस राहणार आहे असा फोनवरून निरोप आला.तो फोन कुठल्या तरी कार्यकर्त्यांनी केला होता
शांभवी जरा गोंधळात पडली कारण सुजय ह्या अगोदर कधी न सांगता बाहेर राहिला नाही सकाळी उठल्यावर तिने सुजय दोन दिवसांनी परत येईल असे घरी सांगितले.सुजयची आई जरा जास्तच काळजी करू लागली.
दोन दिवस झाले तरी सुजय काही परतला नाही.सुजयच्या दादा वहिनी ला मात्र काहीच वाटत नव्हते.शांभवीच्या जीवात जीव नव्हता,ती आणि आई सारख्या देवापुढे हात जोडत होत्या काही कार्यकर्ते सुजय गेला त्या गावात शोध घेऊन आले पण काही पत्ता लागला नाही.सुजयचा फोन देखील बंद होता तो ज्याठिकाणी जाणार होता तिथे तो पोहचला नाही.पोलिस आले चौकशी सुरू झाली.इकडे निवडणूक जवळ म्हणून सुजयचा दादा निवडणूक लढवणार असे ठरले.घरी मात्र सुजय नसण्याने दुःखद वातावरण, शांभवी पार कोलमडून पडली होती.आई बाबा भेटायला आले तर खूप रडली तिची अवस्था बघवत नव्हती.
सुजय नेमका कोठे गेला ह्याचा शोध लावायला पोलिस निरीक्षकांना फोन केला होता.त्यांनी तातडीने त्यामध्ये लक्ष घातले.सुजय ज्या दिवशी बाहेर पडला त्या दिवशी दिवसभर एका गावात कार्यक्रम होता तो त्या ठिकाणी गेला होता पण त्यानंतर संध्याकाळी तो कोणास दिसला नाही पुढे तासाभरात एका वाडीत जाऊन फक्त भेट घेऊन परत फिरायचे होते म्हणून तो चारचाकी गाडी नको म्हणाला, रस्ता चिंचोळा पण फार लांब नव्हता म्हणून त्याने दुचाकी वरुन जाण्याचे ठरवले.दोन्ही बाजूंनी दाट झाडी डोंगर आणि
छोटीशी पायवाट ह्यातून तो गेला.काही कार्यकर्ते मागून गेले पण तोवरच सुजय दिसेनासा झाला..अशी माहिती पोलिसांना मिळाली. शांभवी ला आलेला फोन कोठून आला ते पाहिले तर तो एका कार्यकर्त्यांचा फोन होता.पण तो कार्यकर्ता ही गायब झाला होता.साऱ्या गोष्टी चक्रावून टाकणाऱ्या होत्या पण तपास चालू होता.
इकडे सासरे आजारपणामुळे खचले आणि सुजय दिसत नाही म्हणून अजूनच प्रकृती गंभीर झाली.आईच्या डोळ्यातील पाणी हटेना.. शांभवी एकदम शांत झाली.घर उदासीन झाले फक्त दादा आणि वहिनी तेवढे घरातील खोल्यांमध्ये वावरत होते आणि आपल्या खोलीत जाऊन
काही तरी गौप्यपणे बोलत होते,घरात काम करणाऱ्या विमल ताईंना राहून राहून संशय यायचा कारण थोरल्या दादाला ती लहान पणापासून ओळखत होती.
विमलताई एकदा शांभवी कडे गेली आणि तिने धाडसाने शांभवीला सांगितले" तुम्ही दादासाहेब व वहिनी वर पाळत ठेवा मी देखील कामानिमित्त त्यांच्या खोलीत जाऊन नेमकं त्यांच काय चाललंय हे पाहते". शांभवी उदास झाली होती पण ती तयार झाली आणि जेवताना, स्वयंपाक घरात ज्यावेळी वहिनी जवळ असतील तेव्हा बारकाईने नजर ठेवत होती आणि विमल ताईंना दादासाहेबांच्या टेबलावर एका रिसॉर्टचे कार्ड सापडले.ते त्यांनी साफसफाई करताना पाहिलं आणि हळूच पदरात बांधून बाहेर आणलं आणि शांभवीला आणून दिले.शांभवीने रेसार्ट चा फोन लावला तर ते सुजय ज्या ठिकाणी गेला होता तिकडेच होते
शांभवी ला आता शंका येऊ लागली.सुजयच्या आजीचे माहेर त्या ठिकाणीच आहे हे विमल ताईंनी सांगितले लगेचच
आजी व शांभवी काही दिवसांसाठी हवापालट म्हणून तिकडे गेल्या आजीचे आजारपणाचे निमित्त करून शांभवी तिथे गेली.गावाकडे छानसा वाडा होता आजी देखील खानदानी घराण्यातील असल्याने नोकरचाकर, शेतीवाडी, आणि पंचक्रोशीतील लोक ओळखणारे होते.
शांभवी ने सर्व घरातील लोकांना हा प्रकार सांगितला आणि त्या रिसार्ट ची माहिती हवी आहे असे सांगितले.आजीचे भाचे व नातवंडे कामाला लागलीत शेतीच्या कामासाठी तालुक्यला जाताना एक रिसार्ट होत .ते सात आठ किलोमीटर अंतरावर..फारसं कुणी तिथे दिसत नसे.अधूनमधून शहरातील लोक रहायला येत असतं एवढी माहिती मिळाली.सगळ्यांनी गाडी काढली आणि त्या दिशेने चालले.तिथे गेल्यावर मात्र त्या रिस्टार्ट ला कुलूप होते.नजर जाईल तिकडे भयाण शांतता आणि दाराच्या फटीतून डोकावून पाहिले तर फक्त अंधार काही मागमूस लागत नाही म्हणून सारे परतले.शांभवी तिथली परिस्थिती ऐकून हताश झाली.का कुणास ठाऊक तिच्या मनाला वेगळा संकेत मिळत होता आपणच जाऊन पहावे काय आहे तिथे चूकून एखादा धागा हाती आला तर ..तिचे मन अस्वस्थ झाले.
"घरातील सर्वांना पुन्हा एकदा मला तेथे घेऊन चला, असे तिने सांगितले, सर्वजण पुन्हा तिकडे गेले जाताना घनदाट जंगल,डोंगर आणि निर्मनुष्य रस्ता पाहून शांभवीला थोडी भिती वाटत होती.हया जंगलात सुजयला टाकून तर दिले नसेल ,जंगली प्राण्यांनी त्याला काही केलं असेल का? पुढे जाताच तिथे रिसार्ट होते.भोवतीने झाडी आणि दाराला कुलूप पण पायऱ्यांवर चिखलात माखलेले पावलांचे ठसे ते कसे मघाशी तर दिसले नाहीत.,सारे बुचकळ्यात पडले.आता आजूबाजूला शोध सुरू झाला समोरच्या दाट हिरवळीत काही तरी पिवळे चमकदार दिसले.. शांभवी ने ते उचलून घेतले तेव्हा तिला लक्षात आले हा सुजयच्या घडयाळाचा सोनेरी पट्टा तुटून पडला आहे, तिला लगेचच कळालं कारण हे घड्याळ तिने त्याला वाढदिवसाच्या दिवशी भेट दिल होत.तिच्या डोळ्यातून पाणी आले.अजून शोधाशोध करायला हवी सगळ्यांचा विचार केला आणि ते दारापाशी आले.दाराच्या फटीतून फक्त अंधार दिसत होता.खिडकीतून डोकावून पाहिले तर एक कापडाचा तुकडा लोंबकळत होता तो रक्ताने माखलेला होता.खिडकीची तावदाने फोडून ते बाहेर काढले तर सुजयचा शर्ट होता तो..आता तर पक्की खात्री झाली..आणि तो दरवाजा कुलूप फोडून उघडला ..आज जाताच झटापट होऊन अस्ताव्यस्त पडलेले साहित्य, खुर्ची, टेबल.. धुळखात पडलेली कोपऱ्यातील अडगळीच्या खोलीबाहेर एक दोरीचा तुकडा ,रक्ताचे डाग फरशीवर होते..आणि अचानक त्या खोलीजवळ येताच आवाज येऊ लागला.. सुजयला एका खुर्चीवर बांधून घातलं होतं आणि तोंडांत बोळा कोंबला होता, अर्धवट बेशुद्ध अवस्थेत तो खुर्चीतून सुटण्याचा प्रयत्न करू लागला होता.. अंगावर जखमा रक्त त्याची अवस्था पाहून शांभवी सुन्न झाली.लगेचच सुजय ला सोडवून घेतले व प्यायला थोडं पाणी दिलं..आणि त्याला तेथून लगेच घरी आणले. आजीला सुजयला पाहताच रडू कोसळले आपली नातसून धाडसाने सुजयला परत घेऊन आली , तिला सगळ्यांचे कौतुक वाटले. सुजय पुरता बरे होईल ह्यासाठी दवाखान्यात दाखल करणे गरजेचे होते.पण त्याच्या सुरक्षिततेसाठी घरीच डॉक्टर बोलवून उपचार सुरू केले.शांभवी काळजी घेत होती,सुजय ही हळूहळू उपचारांना प्रतिसाद देत होता आता तो बऱ्यापैकी चालू लागला.इकडे निवडणूक जवळ आली होती पण सुजय आपल्यामध्ये आहे हे आई बाबांना पण कळू दिले नाही.
सुजयला तिकडे कोणी डांबून ठेवले हे काही सांगता आले नाही कारण तो दुचाकी वरुन निघाला असता वरून प्राण्यांना जाळे टाकतात तसे टाकले आणि त्याला लगेच बेशुद्ध करून नेले एवढेच काय ते कळले..नंतर त्याला जाग येण्यापूर्वीच बेशुद्ध करून टाकायचे त्यामुळे विना अन्न पाणी तो आठ दिवस तिथे कोंडून राहिला अजून उशीर झाला तर काय झाले असते असा मनात विचार येऊन शांभवीच्या काळजात धस्स झाले. आता ते शोधून काढणं अवघड होत.पण पोलिसांना कळवण गरजेचे होत. तीने सुजय आणि आजीला तेथेच काही दिवसांसाठी ठेवले आणि ती आपल्या गावी निघून आली.
इकडे घरात वातावरण काही वेगळेच आपणच आता सत्तेचे सर्वेसर्वा असं मानून दादा वहिनी उर्मटपणे वागू लागले.काही सच्चे कार्यकर्ते हे खपवून घेणार नव्हते जुन्या वृद्ध मंडळींना डावलले होते..सगळा अंदाधुंद कारभार होता.
शांभवीचे सासू सासरे दिवसेंदिवस खचून जाऊ लागले.पण शांभवी ने सुजय सुखरूप आहे हे त्यांना विश्वासात घेऊन सांगितले..पण त्यांच्यासोबत ज्या घटना घडल्या त्या कोणी घडवून आणल्या हे काम आता पोलीसांना करावे लागेल .हे
ऐकताच आई बाबा आता थोडे निवांत झाले. सुजयला त्यांनी फोन वर पाहिले,आता मात्र सुनेचे धाडस पाहून त्यांना अभिमान वाटला.
पोलिस ठाण्यात जाऊन तिने घडला प्रकार सांगितला तशी सारी सुत्रे बदलली पोलिस निरीक्षकांनी खोल चौकशी सुरू केली आणि शोध सुरू झाला जंगलातील वाटेतून सगळ्यात आधी जाळी लावून त्याला कोणी पकडले ती कोठून आणली ह्याचा शोध सुरू झाला.शेजारच्या गावात कोणी जाळे घेऊन जंगलाच्या दिशेने गेले का? चौकशी सुरू केली आणि समजले तीन ते चार लोक त्या दिवशी जाळे घेऊन गेले होते पण ते दुसऱ्या गावातील होते.त्यातील एक उंच धिप्पाड गुंड प्रवृत्तीचा होता तिथे एका दुकानात त्याने मारामारी केली होती.त्याचा व्हिडिओ गावातल्या टवाळ पोरांनी बनवला होता.तो व्हिडिओ हातात येताच दादांबरोबर असणारी ती गुंड टोळकी आहेत हे लगेच स्पष्ट झाले.आता त्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू झाली.पण ते भितीने दादांचे नाव घेत नव्हते पण तुम्ही लवकर सांगितले तर तुम्हाला ह्या प्रकरणातून निर्दोष बाहेर काढू असे सांगितले म्हणून ते बोलू लागले," आम्ही काही खून करण्याच्या उद्देशाने हे केले नाही दादांनी सांगितले होते फक्त डांबून ठेवा निवडणूक होईपर्यंत मग मी तुम्हाला भरपूर रक्कम देईन..' हे ऐकताच लगेचच पोलिस वाड्यावर पोहोचले व दादासाहेबांना चौकशी साठी घेऊन आले.सारे प्रकार इतके गोपनीय झाले की त्यांना जरासुद्धा चाहूल लागली नाही, अचानक पोलिस आपल्याला घेऊन जातात म्हणून चेहरा रागाने लालबुंद झाला..पण त्यांच्या पुढे निमूटपणे पोलिस चौकशीला सामोरे जावे लागले.
अगोदर मला काही माहित नाही ह्या प्रकरणाशी संबंध नाही म्हणणाऱ्या दादाने पोलिसांचा खाक्या पाहिला तेव्हा तोंड उघडले..मीच सुजयला डांबून ठेवले कारण मला सत्ता हवी होती.लहानपणापासून मला चीड होती सुजय फार समंजस ,सर्वांचा लाडका मला ते खटकत रहायचे.बाबांनी आता त्याला निवडणूक रिंगणात पुढे केले.माझा विचार त्यांनी केला नाही.मी त्याला डांबून ठेऊन सारी सत्ता आपल्या हाती घ्यावी असा विचार केला नंतर त्याला प्रापर्टीतून बेदखल करण्याचा माझा डाव होता. आता त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला.आपल्या भावाचे अपहरण , त्याला केलेली शारिरीक हानी ह्यासाठी त्याला तुरुंगात जावे
लागणार होते..आता तो आई वडीलांना भेटायची इच्छा व्यक्त करत होता . त्याला घरी नेऊन आई वडीलांना भेटले तेव्हा," माझी चूक झाली यातून मला सोडवा हेच तो बोलत होता." वहिनींना केल्या गोष्टींचा पश्चात्ताप झाला त्या रडत होत्या.शांभवीला मात्र आपल्या सुजय ची अवस्था आणि त्यासाठी न्याय मिळवून देण महत्वाचे वाटत होते.पोलिस आरोपी म्हणून दादांना घेऊन गेले.
सुजय दुसऱ्या दिवशी घरी आला.त्याला सुखरूप पाहून सारे आनंदी झाले सारे गाव भेटायला आले.बाबा पण आता बरे होत चालले त्यामुळे आईची चिंता मिटली.फक्त दादा तुरुंगात आहे हे सुजयला बरे वाटले नाही.त्याने त्याच्या बाबतीत चूक केली पण त्याला सुधारण्यासाठी संधी द्यावी असे त्याला वाटू लागले.बाबांनी शांभवी मधील गूण ओळखून तिला निवडणूक उमेदवार म्हणून घोषित केले.सुजय स्वतः वकील असल्याने त्याने दादांची शिक्षा कशी कमी होईल ह्यासाठी प्रयत्न केले.
शांभवी मूळातच हुशार,धाडसी, प्रामाणिक आणि आपले मत ठामपणे मांडणारी होती तिला राजकारण करणं
जमेल असं वाटतं होतं पण तिला ह्यामध्ये का जावे हा संभ्रम होता..मग आजीने तिला सांगितले,बाळ "हे घर आज आनंदी तुझ्या मुळे आहे आणि तू व सुजय मिळून हा राजकीय वारसा पुढे चालू ठेवा.आज तूझी प्रतिमा एक धाडसी, कर्तबगारी स्त्री म्हणून आहे तू मनात आणलेस तर सारे शक्य आहे." शांभवी ने आईबाबांना विचारले आणि निर्णय घेतला.आणि अवघ्या महिन्याभरात तीने निवडणूक जिंकली..साऱ्या घरादाराला आनंद झाला . सुजय देखील मनापासून आनंदी होता. रोजच्या धावपळीत त्यांना विश्रांती मिळावी म्हणून आई बाबांनी त्यांना बाहेरगावी फिरायला पाठवले. शांभवी आणि सुजय ने अतूट नाते जपले.. एकमेकांना साथ देत घरची जबाबदारी घेऊन राजकारण सांभाळून ते आता एकमेकांचे सोबती झाले.
एका वर्षानंतर शांभवीला गोड चाहूल लागली.आईने सासूबाईंनी तिची विशेष काळजी घेतली, सुजयच्या आनंदाला सीमा उरली नव्हती.तो तिला काही काम करु देत नव्हता तो तिला हवं नको ते पहात होता.आणि एकेदिवशी छोटी परी त्याच्या कुशीत आली.. सगळ्यांना आनंद झाला.
तिला गोड नाव दिले " सौम्या " तिचे लाड कौतुक करत दिवस गेले.काही दिवसांनी दादा तुरुंगातून बाहेर आला व सुजय पुढे पश्चात्तापाचे अश्रू गाळू लागला.पण सुजयने त्याला आधीच माफ केले.दादा व वहिनी आता शेतातील घरी राहू लागले.
सौम्या मोठी होत होती,सुजय आता सगळ्या कामामध्ये यश मिळवत होता.. शांभवी ने जमेल तितकी साथ देत नाय
भरभराटीस आणला होता.पण कुठेतरी निर्मळ आनंद घेणारी शांभवी पोक्त पणाच्या,समंजस पणाच्या शर्यतीत पुढे गेली होती हे तिला जाणवू लागलं..जीवनाचा प्रवास ज्या वळणावर नेईल तिकडे जावेच लागते.ती शांत झाली आणि
पुढे कामात व्यस्त झाली.
सुजयला वेगवेगळ्या प्रकारची झाडे,लावणे कुंडीत रोप लावणे, बागकाम ह्यांची आवड होती त्याने तर घरापुढे अत्यंत सुंदर बाग सजवली होती पाहताच शांभवी प्रसन्न होऊन जायची रोज सकाळी वेगवेगळ्या प्रकारची फुले सुजय तिला आणून द्यायचा, एकदा एका लहान मुलांच्या शाळेचे स्नेहसंमेलन आयोजित केले होते आणि त्या साठी
सुजय आणि शांभवी ला निमंत्रण आले होते.
सकाळी उठून सगळी कामं आवरून ते संध्याकाळी शाळेत पोहचले उद्घाटन झाले लहान मुलांना नाचताना पाहून शांभवी फार आनंदून गेली. तीने स्वतः मुलांचे कौतुक केले, प्रोत्साहन दिले.सुजय आणि ती जेव्हा घरी आले तेव्हा सुजय तिच्या उत्साहीत चेहऱ्याकडे पाहून आश्चर्यचकित झाला.तो म्हणाला " तुला इतकी नृत्याची आवड आहे तुला त्याचा अभ्यास आहे हे तू कधीच कळू दिले नाहीस,पण आज एक वेगळीच शांभवी मी पाहिली आहे.स्वतमध्ये रमणारी, मनापासून निखळ आनंद घेणारी शांभवी," तो जसे बोलला तशी शांभवी म्हणाली ,हो मला नेहमी नृत्य आवडायचं पण माझ्या घरी जुन्या परंपरा,त्यांना हे रुचले नाही शिवाय इथे देखील राजकीय घरंदाज घराणे मग नृत्याचा संबंध दूर वर नाही, म्हणून मनाच्या कोपऱ्यात दाबून ठेवली आहे एक सुप्त इच्छा तीच नृत्य आहे.सुजय ने नुसत ऐकून घेतलं आणि तो बाहेर गेला.
पहाटे पहाटे तो उठून तो आपल्या पतपेढीच्या बाजूला जी रिकामी जागा आहे तिथे मोठा हाॅल बांधून घ्यावा या विचारात होता त्याने लगेचच इंजिनिअर ला बोलवून काम चालू केले.छानसा हाॅल बांधून झाल्यावर त्यामध्ये सौम्याच्या
मदतीने नृत्य भावमुद्रा रेखाटल्या,नृत्याचे संगिता चे सारे साहित्य आणले..त्यांची सजावट केली, काही नृत्य शिक्षक नेमले, आणि आज त्यांचे उद्घाटन शांभवी त्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवले.
सकाळी सकाळी देवपूजा करुन शांभवी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारत होती सुजय आणि सौम्याने तिला गोड सरप्राइज देण्याचे ठरवले आणि संध्याकाळी तिला हाॅल वर आणले त्यांचे उद्घाटन तिच्या हस्ते करण्यात येणार होते.नेमके काय आहे हे तिला कळत नव्हते.तीने मुख्य फरक उघडताच " मनस्वी" नृत्याविष्कार कलादालन असे नाव दिसले ते पाहून तीचा आनंद शिगेला पोहोचला.आत जाताच नृत्याची परिभाषा ,भाव मुद्रा, साहित्य यांची सुबक मांडणी पाहून मनोमन ती सुखावली आणि सुजय व सौम्या कडे पाहतच राहिली.जुन्या स्मृती जाग्या झाल्या, अनेक उत्साही मुले मुली ह्या कलादालनात प्रवेश घ्यायला उत्सुक होती.तिने मनापासून सुजयचे आभार मानले.आता तिच्या जीवनात नृत्य एक सुप्त इच्छा राहिली नसून जगण्याला नवा अर्थ आला रोज तासभर ती सराव करुन लागली..
एकदा घरी असताना तिला सुजयने गुणगुणताना पाहिले "आज फिर तीने की तमन्ना है," पावसाचे पाणी अंगावर झेलत गॅलरी मध्ये थिरकणारे तिचे पाऊल आणि हाताच्या
नजाकती सुजय भारावून गेला तिचं चाळिशीतल तारुण्य पाहताना.. हळूच पडद्याआड लपून राहून तिचा चेहरा,आनंद
तिचे समर्पित नृत्य भावमुद्रा पाहून तू वेगळ्याच समाधानात
स्थित झाला..कला माणसाला आतून जिवंत ठेवते आज समोरचे दृश्य पाहून तो मनातून सुखावून गेला.
.
@ प्रतिभा महादेव चौगले
कोल्हापूर
